2 Oct 2026

भाऊमहाराज बोळातले दिवस - ३

भाऊमहाराज बोळातले दिवस - ३
----------------------------------------


आपल्याकडं गावं, शहरं यांच्या तोंडवळ्यात, रंगरूपांत फारसा बदल दीर्घकाळ होत नसे. तो वेग आला एकविसाव्या शतकात. त्यातही पहिलं दशक संपताना. त्यामुळं मी भाऊमहाराज बोळाविषयी १९९७ ते २००३ या काळाबद्दल लिहितो आहे त्या आठवणी अनेकांना आपल्याशा वाटत आहेत. याचं कारण १९७५-८० मध्येही कदाचित हा भाग, तो सगळा परिसर तसाच होता. थोडे फार बदल होतातच; मात्र संपूर्ण चित्रच बदलून जाईल, एवढ्या वेगाने तेव्हा बदल घडत नव्हते. एखाद्या गावात, शहरात आपण पाच-दहा वर्षांनी गेलो, तरी ते गाव वा शहर ओळखीचं वाटू शके. आता २०१० नंतर ती परिस्थिती राहिलेली नाही. आमचा भाऊमहाराज बोळही गेल्या १५-२० वर्षांत पार बदलून गेला. जुन्या इमारती, जुने वाडे पडणं, पुनर्विकास होणं या गोष्टी आपण समजूच शकतो. मात्र, त्याबरोबर पुण्याची ‘पुणे’ म्हणून जी खास ओळख आहे, ती अजिबात नाहीशी होऊ नये, असं वाटतं. मंडई परिसरात आजही गेलं, की त्या जुन्या पुण्याच्या खाणाखुणा दिसतात. अजूनही तग धरून उभ्या असलेल्या काही इमारती, काही जुने वाडे दिसतात. सर्वांच्या कुतूहलाचा विषय असलेल्या, चमत्कारिक वा विनोदी वाटतील अशा ‘पुणेरी पाट्या’ दिसतात. काही जुनी खाण्याची ठिकाणं तशीच उभी असल्याचं दिसतं तेव्हा फार बरं वाटतं. 
मी १९९७ मध्ये या वाड्यात राहायला आलो, तेव्हाच्या पुण्यात हळूहळू बदल होत होते. मात्र, त्या बदलांचा वेग तसा कमी होता. गर्दी पुण्यात तेव्हाही होती. मात्र, ती गर्दी अनोळखी वाटत नसे. गणपतीचे दिवस किंवा विसर्जनाच्या दिवशी याचा प्रत्यय येत असे. तेव्हा पुण्यात फिरताना आम्हाला अजिबात परकं वाटत नसे. विसर्जनाच्या दिवशीही अलोट गर्दी असली, तरी त्या गर्दीचा चेहरा अनोळखी नसे. आता अनोळखी चेहऱ्याच्या गर्दीची भीती वाटते. पुण्यात होणारं वेगवान व वाढतं स्थलांतर आणि त्यामुळं इथल्या लोकसंख्येत नित्यानं पडणारी भर यामुळं या शहरावर आता असह्य ताण आला आहे. शिवाय स्थलांतरितांची बदललेली मानसिकता हा एक वेगळाच विषय आहे. सुदैवानं आम्ही ‘पारसी स्पिरिट’ घेऊन या शहरात आलो होतो आणि त्यांच्यासारखेच दुधात साखर मिसळावी तसे या शहरात मिसळून गेलो. आपल्याला इथंच राहायचं आहे आणि आपलं करिअर वगैरे जे काही व्हायचंय ते इथंच होणार आहे, ही धारणा पक्की होती. असो.
माझं रुटीन इतरांपेक्षा वेगळं होतं, हे आधी सांगितलंच आहे. मी बहुतांश वेळेस संध्याकाळी ऑफिसला जायचो. संध्याकाळी सहा ते रात्री साडेबारा अशी ड्युटी असायची. त्यामुळं दिवसाचा तोपर्यंतचा वेळ मी वाड्यातच असे. माझी रूम नंतरच्या काळात वाड्याच्या पुढं, मधल्या चौकातच असल्यानं वाड्यात येणारा-जाणारा प्रत्येक माणूस दिसत असे. आमच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला प्रकाश शहा यांची ‘डायमंड अॅडव्हर्टायझिंग कंपनी’ होती. त्यांना मी ‘सकाळ’मध्ये आहे हे कळल्यावर आमची अल्पकाळ चांगली मैत्री झाली होती. मी काही वेळा त्या ऑफिसमध्ये जाऊन बसत असे. भाऊमहाराज बोळातून चिंचेच्या तालमीकडं जायला लागलं, की पुढं डाव्या हाताचा तात्या थोरातांचा वाडा होता. हे तात्या थोरात म्हणजे मंडईचे एके काळचे अनभिषिक्त सम्राटच. त्यांचा दरारा होता. संध्याकाळी ते त्या वाड्याच्या दारात बसलेले दिसत. तेव्हा ते थकलेले होते. मी शिकाऊ का होईना, पत्रकार असलो आणि मला तात्या थोरात ही काय चीज आहे हे चांगलंच ठाऊक असलं तरी (किंबहुना त्यामुळंच) त्यांच्याशी सहज जाऊन बोलायचा धीर कधी झाला नाही. एकदा तर ते कुणावर तरी चिडले होते, तेव्हा अस्सल ‘मंडई’तल्या शिव्याही त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या आणि कान धन्य झाले! तात्या थोरात आणि ‘दगडूशेठ’चे प्रतापराव गोडसे हे दोघेही तेव्हा पुण्यातलं मोठं प्रस्थ होतं. तेव्हा ‘दगडूशेठ’ची आजसारखी क्रेझ नव्हती. गर्दी व्हायची, पण ती देखावा बघायला असायची. आम्हाला त्यांचा ‘गुढीपाडवा ते रामनवमी’ या काळात होणारा संगीत उत्सव अधिक आवडायचा. (त्याचं वर्णन पहिल्या भागात आलंच आहे.) त्या काळात माझा शेवाळे म्हणून एक मित्र झाला होता. तो या दगडूशेठ मंडळाचा कार्यकर्ता होता. त्याच्यामुळं मला एके काळी त्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बसायला मिळायचं. प्रचंड संख्येने आलेले नारळ पोत्यांत भरायचे आणि तिथं असलेल्या एका खोलीत ती पोती ठेवायची आणि त्यावर लक्ष ठेवायचं हे काम शेवाळे करायचा. मीही त्याच्याबरोबर तिथं बसायचो.
मुळात रूमवर आम्ही फारसे नसायचोच. तो संपूर्ण परिसर तर आम्ही फिरायचोच, पण इकडं कॅम्पपासून ते रेसकोर्सपर्यंत आणि दुसऱ्या बाजूला विद्यापीठापासून ते पाषाण तलावापर्यंत सगळीकडं भटकंती करायचो. कधी सायकलवर, तर कधी बसनं... क्वचित रिक्षानं फिरायचो. 
मी जर्नालिझमला प्रवेश घेतला आणि संतोष देशपांडेशी माझी मैत्री झाली. तो नारायण पेठेत कबीर मठात राहायचा. त्यानं एकदा असं फर्मान काढलं, की आपण रोज सकाळी पर्वतीवर जायचं. मुळात मी रात्री उशिरा रूममवर यायचो. सकाळी उठायचो ते नऊ-दहा वाजता. त्यामुळं संतोषची ही आयडिया मी लगेच झटकून टाकली. मात्र, त्यानं चिकाटी सोडली नाही. पर्वतीवरून आल्यावर परत झोप, असं तो म्हणायचा. मग शेवटी मी त्याच्याबरोबर पर्वतीला जायला लागलो. सायकलनं (आणि नंतर एम-८० नं) पर्वती पायथ्याला जायचं, पर्वती चढायची, थोडा वेळ बसून लगेच खाली उतरायचं आणि खाली पोहे खायचे असा नेम आम्ही बरेच दिवस केला. मला वाटतं, सहा महिने आमचा हा उपक्रम चालला असेल. नंतर (बहुतेक पावसाळा सुरू झाल्यावर) तो आपोआप बंद पडला. मात्र, पुणेकर होण्याची आणखी एक ‘अट’ मी त्यानिमित्तानं पूर्ण केली होती, हे नक्की. जर्नालिझमचं ते एक वर्ष (१९९९-२०००) खासच होतं. (त्यावर मी ‘‘रानडे’तले दिवस’ नावाचा स्वतंत्र ब्लॉग लिहिला आहे. तो जिज्ञासूंनी जरूर पाहावा. त्यामुळं इथं पुनरुक्ती करत नाही.) 
‘‘रानडे’तले दिवस’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

‘सकाळ’मध्ये माझ्याबरोबर मंदार कुलकर्णी होता आणि दीड वर्षानं, म्हणजे १९९९ मध्ये अभिजित पेंढारकर आला. या दोघांशी माझी चांगली मैत्री जुळली व ती आजतागायत टिकून आहे. जर्नालिझमच्या वर्गामुळं संतोष देशपांडे, सिद्धार्थ केळकर, श्रीरंग गायकवाड, दीपक चव्हाण हे मित्र झाले. त्यापैकी संतोष व सिद्धार्थ नंतर अनुक्रमे ‘सकाळ’ व ‘मटा’मध्ये सहकारीही झाले. आमच्या आवडी-निवडी समान होत्या. सिनेमा-नाटकं बघण्याची रुचीही सारखीच होती. अर्थात, म्हणूनच मैत्र जुळलं म्हणा. त्यामुळं आम्ही कुणी ना कुणी सतत एकमेकांसोबत नाटकं, सिनेमांंना जात असू. मला आणि मंदारला गाण्यांच्या कार्यक्रमांचीही खूप आवड होती. तेव्हा पुण्यात मराठी भावगीतं, ऑर्केस्ट्रा आदींना खूप मागणी होती. अपर्णा संत, मुकुंद फणसळकर, अनुराधा मराठे आदी गायक असायचे. अरुण नूलकर बहुसंख्या कार्यक्रमांना निवेदनाला असायचे. डॉ. राजेंद्र दूरकर तबल्यावर असायचे. ते आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांच्यावर ‘दूरकर इकडच्या आणि तिकडच्या मात्रा अजिबात चुकत नाहीत,’ ही कोटीही नूलकर न कंटाळता दर कार्यक्रमात करायचे. हे दूरकर पंडितजींच्या ‘भावसरगम’लाही असायचे. आणखी एक पाटकर नावाचे ढोलकीवाले असायचे. ‘गंगेचे पाणी पाटाला...’ किंवा अशीच कुठली तरी ओळ म्हणून पंडितजी त्यांना खूण करायचे आणि मग ते जबरदस्त ढोलकी वाजवायचे. गाण्यांचे बहुसंख्य कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरात व्हायचे. तेथे ‘वातानुकूलन यंत्रणा अंशत: सुरू राहील’ अशी पाटी कायमस्वरूपी लावलेली असायची. (अजूनही असेल.) तिथली बाल्कनी एवढी उंच आहे, की आणखी थोडं चढलं, तर पर्वतीची उंची सहज गाठू असं वाटायचं. मला तिथं जायला आवडायचं नाही; पण काय करता? बहुसंख्य गाण्यांचे कार्यक्रम तिथंच असायचे. मी ‘सकाळ’मध्ये ‘झलक’ नावाचं सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती देणारं सदर सुरुवातीपासून बघत असल्यामुळं मला अशा कार्यक्रमांचे पास काही वेळा मिळायचे. मग संध्याकाळी वेळ मिळालाच तर मंदार आणि मी तो कार्यक्रम बघायला जायचो. आणखी असाच एक कार्यक्रम मी सहसा चुकवायचो नाही, तो म्हणजे १२ मार्चला यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी रामदास फुटाणे आणि इतर कवींचं होणारं कविसंमेलन. हाही कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरातच व्हायचा आणि फार मस्त रंगायचा. महाराष्ट्रातले अनेक कवी एकगठ्ठा ऐकायला मिळायचे आणि फुटाणे व फ. मुं. शिंदे यांची तुफान टोलेबाजी हे म्हणजे ‘आइसिंग ऑन द केक’ असायचं. 
सवाई गंधर्व महोत्सव तेव्हा रमणबागेत भरायचा. तेव्हा रात्री दहाची मर्यादा नव्हती. पहाटेपर्यंत गाणी चालत. आम्ही ऑफिसचं काम संपवून अनेकदा तिथं जात असू. तेव्हा तर दारावर कुणी तिकीटही विचारायचं नाही. आम्ही थेट आत जाऊन बसायचो. पं. भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा, गंगूबाई हनगल, पं. फिरोज दस्तूर, मालिनीबाई राजूरकर असे मोठमोठे कलावंत सहज दिसायचे. आमचे अशोक रानडे सर रात्रीच महोत्सवाचं परीक्षण लिहून पाठवायचे. कुणी तरी ऑफिस बॉय ते घ्यायला यायचा. मग ते कागद ऑफिसात जाऊन, तो मजकूर कंपोझ करून, मुद्रितशोधन होऊन पानांत लागायचा. अनेकदा पहाटे चार वाजता छापलेल्या ताज्या अंकाच्या प्रती तिथं यायच्या. त्यात काहीच तासांपूर्वी झालेल्या गाण्यावर रानडेंनी लिहिलेलं अभ्यासपूर्ण समीक्षण पहाटे त्याच मंडपात वाचायला मिळायचं. फार मजा यायची तेव्हा!
याच काळात म्हणजे १९९९ मध्ये शिवउद्योग सेनेतर्फे राज ठाकरे यांनी गणेश कला-क्रीडा मंच येथे नामवंतांची व्याख्याने आयोजित केली होती. तेव्हा सुनील गावसकरचं व्याख्यान प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला होता. एकूण तो सर्व काळ मी व माझ्या मित्रांनी भरपूर एंजॉय केला. चांगलं वाचलं, चांगलं बघितलं, चांगलं ऐकलं. आपल्या अवतीभवती असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वातावरणातून आपला पिंड घडत जातो... माझ्या सुदैवानं या काळात मला सगळं काही भरभरून अनुभवता आलं, साठवून ठेवता आलं आणि त्या संचितावर आपलं पुढचं जगणं सुसह्य व आनंददायी करता आलं. त्यासाठी मी त्या काळाचा आणि भाऊमहाराज बोळातील वास्तव्याचा कायमचा ऋणी आहे.

(समाप्त)

---

1 Oct 2026

भाऊमहाराज बोळातले दिवस - २

भाऊमहाराज बोळातले दिवस - २
----------------------------------------


मी भाऊमहाराज बोळात राहत असतानाचा काळ म्हणजे दोन शतकांच्या सांध्यावरचा काळ होता. आजूबाजूला बरेच काही बदल घडत होते. तेव्हा फार काही जाणवत नव्हतं खरं; आता विचार केल्यावर जाणवतं. काळ फार भराभर बदलत गेला, हे लक्षात येतं.
मी पुण्यात आलो तेव्हा सायकल वापरत होतो. मीच नव्हे तर अनेक जण सायकल वापरत असत. आमच्या ओक वाड्यात चौकात बऱ्याच सायकली लावलेल्या असत. वाड्याला मोठं दार असल्यानं आणि ते रात्री बंद होत असल्यानं सायकली चोरीला जाण्याची भीती नव्हती. उलट रात्री ते भलंमोठं दार उघडून सायकल आत आणण्याची कसरत करावी लागे. माझ्याकडं ‘ॲटलस गोल्डलाइन’ नावाची सायकल होती. ती मी आठवीत असताना, म्हणजे १९८८ मध्ये घेतलेली होती. तीच सायकल मी इथं वापरत होतो. तेव्हा सकाळ ऑफिसमध्ये वॉचमन गेटच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये मोठं सायकल स्टँड होतं. अनेक लोक सायकल वापरत. मी पहिली दोन वर्षं सर्व पुणे शहर सायकलवरूनच फिरलो. मी जिथं जिथं बातमीदारीला गेलो, त्या सर्व ठिकाणी सायकल स्टँड असत आणि बऱ्याच मोठ्या संख्येनं लोकांच्या सायकली तिथं लावलेल्या असत. दोन वर्षं मी सायकल वापरली. पण १९९९ मध्ये मी रानडे इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतल्यावर मला कॉलेजला सायकलवर जायची लाज वाटायला लागली. वर्गातली बहुतेक मुलं स्वत:च्या दुचाकीवर तर येत किंवा बसनं तरी येत. सायकलवरून फार कुणी येत नसे. मग मी माझ्या मित्राची एम-८० गाडी विकत घेतली आणि त्या गाडीवरून ऐटीत सगळीकडं फिरू लागलो. त्यामुळं माझी सायकल वाड्यात पडून राहायला लागली. नंतर नंतर तर ती पार गंजून गेली. मी २००३ मध्ये वाडा सोडून स्वत:च्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो. आता सायकलचं काही तरी करायला हवं होतं. खरं तर ती विकणं माझ्या जिवावर आलं होतं; पण पर्याय नव्हता. मग मी रतन सायकल मार्टवाल्याकडं गेलो आणि त्याला ती सायकल विकून टाकली. पंधरा-सोळा वर्षांपूर्वी ८०० रुपयांना घेतलेली सायकल ३०० रुपयांना विकली गेली. अर्थात, त्याआधी मला त्या सायकलची मूळ खरेदी पावती द्यावी लागली. ती पावती आमच्याकडं अर्थातच नव्हती. ही सायकल नगरला सेंट्रल बँक रोडवरील धर्माधिकारी सायकल्स यांच्याकडून घेतली होती. मग मी नगरला त्या दुकानात जाऊन त्या सायकलच्या खरेदीची डुप्लिकेट पावती आणली. विशेष म्हणजे त्यांच्याकडे १९८८ च्या विक्रीची नोंद सापडली. ती पावती ‘रतन’वाल्याला देऊन मग मी तो व्यवहार पूर्ण केला.
तेव्हा भारतात मोबाईल अगदीच नवीन होते. पेजर धुमकेतूसारखे आले आणि तसेच गायब झाले. आम्ही लँडलाइनवरून घरी फोन करायचो किंवा चक्क पत्र पाठवायचो. गणपती विसर्जन मिरवणुकीत रक्त सांडल्यानंतर घरी पत्र लिहिताना मी वर ‘झुंजार पत्रकार अनिरुद्ध घाटगे’ असं गमतीनं लिहायचो. तेव्हा एम-८० ची ती जाहिरात फार प्रसिद्ध होती. त्याचा संदर्भ या उल्लेखाला होता. आमच्या वाड्यात राहणाऱ्या बहुतेक मुलांना अशी पत्रं येत. पत्रलेखनाची ही कला पुढच्या दशकभरातच जवळपास नामशेष होणार आहे, याची आम्हाला तेव्हा कल्पनाही नव्हती. वाड्यातली आम्ही सर्व भाडेकरू मुलं एकदिलानं राहायचो. बहुतेक मुलं मध्यमवर्गीय कुटुंबातली आणि शिक्षणासाठी पुण्यात आलेली होती. पुण्यात आलं, की असं कॉट बेसिसवर राहायचं ही फार जुनी प्रथा होती. ‘सकाळ’मध्ये माझा फायनल इंटरव्ह्यू तेव्हाचे संपादक विजय कुवळेकर व मुख्य व्यवस्थापक के. मो. भिडे (हे अलीकडेच निवर्तले...) यांनी घेतला होता. तेव्हा के. मो. भिडे सर माझ्या बाजूलाच बसले होते. कुवळेकर साहेबांनी मला विचारलं, की राहायला कुठे आहात? मी ‘भाऊमहाराज बोळात, ओक वाड्यात,’ असं उत्तर दिल्यावर कुवळेकर साहेब के. मो. भिडे सरांकडं बघून हसले होते. त्याचं कारण मला नंतर कळलं. कुवळेकर साहेब जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आले, तेव्हा तेही याच वाड्यात राहत होते! थोडक्यात, ही जुनी परंपरा होती आणि मी तीच पुढं चालवत होतो. आमच्या वाड्यात राहणारी बहुतेक मुलं शिकणारी होती. नोकरी करणारे काही मोजके होते. मी त्यात होतो. पुढं माझ्याबरोबर ‘सकाळ’मध्ये रुजू झालेले मंदार कुलकर्णी व संजय आवटे हेही काही काळ आमच्या वाड्यात राहून गेले. अभिजित पेंढारकर शेजारच्या ‘ज्ञानेश लॉज’मध्ये की तिथल्या वाड्यात काही काळ राहत होता. आमच्या वाड्यात सांगलीचा सचिन गोखले काही दिवस होता. तो सीएच्या परीक्षा देत होता. एका वर्षी त्यानं माझा रिटर्न भरला आणि मला घसघशीत रिफंडही मिळवून दिला. त्यासाठी आम्ही बरेच उद्योग केले, एवढंच आठवतंय. माझ्याकडं पेपरची भरपूर रद्दी साठायची. ती विकायची आणि पार्टी करायची, असा माझ्या रूम पार्टनरचा, म्हणजे योगेश जोगळेकरचा आग्रह असायचा. अनेकदा तो स्वत:ही ही रद्दी उचलून विकायला न्यायचा. संजय परांजपे हा पण आमचा मित्र होता. (दुर्दैवानं तो आता हयात नाही.) तो आधी ‘सकाळ’मध्येच ऑफिस बॉय होता आणि नंतर ‘साई सर्व्हिस’मध्ये नोकरीला लागला होता. अनेकदा काही मुलं थोड्या काळासाठी यायची आणि निघून जायची. एवढा दीर्घकाळ राहिलेले आम्ही थोडेच मित्र होतो. मात्र, नंतर आम्ही वाडा सोडून गेलो, तरी आमची मैत्री टिकून राहिली. आजही ‘ओक वाडा’ नावाचा आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. सगळेच जण हुशार होते. बहुतेकांना उत्तम विनोदबुद्धी होती. आमचा योगेश तर यात मेरुमणी होता. एकदा हे सगळे मित्र आमच्या ऑफिसमध्ये मला भेटायला आले. गेटवर वॉचमनला त्यांनी तसं सांगितलं. वॉचमनने संपादकीय विभागात फोन लावला आणि त्यांना कुणी तरी निरोप दिला, की ब्रह्मे जागेवर नाहीत; पान लावताहेत. वॉचमननं तसं सांगताच योगेश पटकन म्हणाला, ‘पान लावतोय? त्याला म्हणावं, आमचंही एक १२०-३०० लाव.’ नंतर हा किस्सा सांगून सगळे तुफान हसायचे. आमच्या वाड्यातच समोर गौरीप्रसाद करंदीकर राहायचा. त्याला सगळे ‘केडी’ म्हणायचे. तो आमच्या वाड्याच्या दारात उभं राहून येणाऱ्या-जाणाऱ्यांना विशिष्ट आवाजात, तोंडही न हलवता ‘ओ मामा... ओ ओ...’ अशा हाका मारायचा. चेहरा अगदी सरळ ठेवायचा. त्या बोळातून जाणारे लोक, त्यातही परगावचे-नवखे असे असतील, तर बावरून इकडं-तिकडं बघायचे. आम्हाला हसू आवरायचं नाही. ‘केडी’ मात्र काही झालंच नाही अशा थाटात त्या दारात उभा असायचा. त्याच काळात ‘सत्या’ रिलीज झाला होता. आम्ही सगळ्यांनी तो एकत्र बघितला. ‘केडी’नं पुढं तो अनेकदा बघितला. ‘सत्या’चे संवादच्या संवाद त्याला पाठ होते. तो येता-जाता ते आम्हाला ऐकवायचा. ‘ये सत्या का चीज है रे’ किंवा ‘मुंबई का किंग कौन? भिक्कू म्हात्रे...’ वगैरे डायलॉग तर नेहमीचेच असायचे. काही तरी बिनसलं किंवा फसलं, तर दोन्ही हात गालांना लावून ‘जमखंडीत गेम’ असं म्हणायची त्याला सवय होती. हे कुठून आलं, कुणास ठाऊक! त्याच्या नादाने मीही पुढं तसंच म्हणायला लागलो होतो. बरीच नंतर ती सवय सुटली. हेमंत शिंदे, अश्पाक यांचा उल्लेख पहिल्या भागात आलाच आहे. वाड्यात राहणारी मुलंच नव्हे, तर त्यांच्याकडे येणारे त्यांचे मित्रही आमचे मित्र व्हायचे. प्रमोद पाटील, सचिन भिडे, महाशब्दे, मंदार गोडबोले, आमोद तळवलकर हे सगळे चांगले मित्र झाले होते. मी त्या वाड्यात दोन-तीनदा रूम बदलली. एकदा योगेश, तर एकदा शौनक कुलकर्णी माझा रूम पार्टनर होता. शौनक कऱ्हाडचा होता व सीएची तयारी करत होता. आमच्या वाड्याच्या अगदी सुरुवातीलाच एक छोटी खोली होती. तिथं एकच जण राहायचा. माझा त्या रूमवर डोळा होता. शेवटी मला एकदाची ती रूम मिळाली. त्यानंतर वाडा सोडेपर्यंत मी ती रूम माझ्याकडंच ठेवली. अर्थात योगेश बऱ्याचदा माझ्याच रूममध्ये पडीक असायचा, तो भाग वेगळा. योगेशचे वडील खोपोलीला ‘महिंद्रा यूजीन’मध्ये होते. आम्ही एकदा त्यांच्या घरीही गेलो होतो. योगेशमुळंच एका चांगल्या मित्राची ओळख झाली. तो म्हणजे विक्रांत उर्फ विकी देशमुख. हा विकी अतिशय गोड स्वभावाचा, चांगला मुलगा होता. तोही शिकण्यासाठी पुण्यात होता व आमच्या वाड्यातच राहायला आला. त्याला माझं लिखाण आवडायचं. मी ‘सकाळ’मध्ये कामाला आहे, याचंच त्याला अनेकदा अप्रूप वाटायचं. विकी आता बॉलिवूडमध्ये मोठा दिग्दर्शक आहे आणि मला त्याच्या या प्रगतीचा खूप अभिमान आहे. (‘नजरअंदाज’ हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट अनेकांना आवडला. ‘नेटफ्लिक्स’वर आहे. यात कुमुद मिश्रानं अंध व्यक्तीची भूमिका केली आहे. अभिषेक बॅनर्जी, दिव्या दत्ता अशा नामवंत कलाकारांना आमच्या विकीनं दिग्दर्शित केलं आहे. असो. हे जरा विषयांतर झालं.)

आम्ही सगळ्या मित्रांनी एकदा ट्रिप काढायची ठरवली आणि ती कल्पना तडीसही नेली. आमच्या वाड्यात कल्पक चितळे राहायचा. म्हणजे त्याची संपूर्ण फॅमिलीच तिथं राहायची. त्याची आणि आमची चांगली मैत्री जमली. या ट्रिपसाठी कल्पकनं बराच पुढाकार घेतला. शौनक, मी, योगेश, आमोद, मंदार, विकी असे सगळे जीप करून किहीमला गेलो. मध्यरात्रीच निघालो. पहाटे पहाटे अलिबागच्या रस्त्याकडे वळलो. फटफटताना किहीम बीचवर पोचलो. आम्ही हॉटेल वगैरे काहीच बुक केलं नव्हतं. आम्ही त्या बीचवर पुष्कळ मस्ती केली. शौनकनं त्या बीचवर पोहे केल्याचं मला चांगलं आठवतंय. पहिल्या भागात या ट्रिपचे दोन-तीन फोटो दिले आहेत. आमच्यातला बाँड घट्ट व्हायला या ट्रिपची चांगली मदत झाली. 
आमच्यातले बरेच जण लहान गावांहून आलो होतो आणि पुण्यात येणं, इथं नोकरी करणं, इथल्या लोकांसारखं होऊन राहणं ही आमची माफक महत्त्वाकांक्षा होती. आम्हाला इथं येऊन आमचं वेगळेपण सिद्ध करायचं नव्हतं, तर आम्हाला इथल्यासारखंच होऊन राहायचं होतं. पुण्याकडं, इथल्या लोकांकडं आम्ही मान उंचावून बघत होतो. कौतुकानं, आदरानं बघत होतो. प्रसंगी त्यांचे टोमणे खात होतो, पण त्यातून शिकतही होतो. उगाच चुकीच्या कारणावरून तुम्हाला कोणी बोलत नाही; मात्र चुकलात तर बोलल्याशिवाय राहतही नाहीत, हे कळलं. बघता बघता मुठेचं पाणी आमच्या अंगात चढायला लागलं. इथे टक्केटोणपे खाऊन आम्हीही टोमणे मारायला शिकलो. इथल्या वाडा संस्कृतीत राहून, इथले सांस्कृतिक कार्यक्रम पाहून, इथली नाटकं बघून, सवाई गंधर्व महोत्सव ऐकून आम्ही पुणेकर होण्याची एकेक पायरी आत्मविश्वासानं चढत गेलो. ‘सकाळ’मध्ये कामाला होतो, त्यामुळं तिथं तर हे शिक्षण रोजच होत होतं. त्यामुळं एकविसावं शतक उजाडता उजाडताच मी जवळपास पक्का पुणेकर होऊन गेलो होतो... भाऊमहाराज बोळातील वास्तव्यानं मला हा पुणेकर होण्याचा पासपोर्ट मिळवून दिला होता...

(क्रमश:)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----