30 Dec 2019

मटा - रविवार लेख

‘२०-ट्वेंटी’ची ‘कसोटी’
--------------------------

एकविसाव्या शतकातलं दुसरं दशकही संपत आलं आणि आता आपण ‘२०२०’ या वर्षात पदार्पण करीत आहोत. आपले दिवंगत माजी राष्ट्रपती - अन् कदाचित सर्वाधिक लोकप्रियही - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘महासत्ता’ होण्यासाठी ज्या वर्षाचं लक्ष्य आपल्याला दिलं होतं, तेच हे वर्ष! आपण ‘२०२०’मध्ये महासत्ता होऊ की नाही, याचं उत्तर आता आपल्याला मिळालेलंच आहे. तरीही वर्षाच्या सुरुवातीलाच नकारात्मक विचार कशाला मनात आणायचा? याच वर्षात म्हणजे २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात ‘२०-२०’ची, अर्थात टी-२० ची विश्वचषक स्पर्धा होते आहे. ती स्पर्धा जिंकून आपण याच वर्षात ‘२०-२०’मधील महासत्ता तर नक्कीच होऊ शकतो. आपल्या संघाला त्यासाठी शुभेच्छा...
क्रिकेट संघाचं तसं बरं चाललंय. पण आपल्या ‘भारत’ नावाच्या १३७ कोटी जनतेच्या संघाचं काय? एकविसावं शतक सुरू होण्याच्या वेळी म्हणजे २००१ मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या एक अब्जाचा टप्पा ओलांडून गेली होती. त्या जनगणनेत आपली लोकसंख्या १०७ कोटी नोंदली गेली होती. ही लोकसंख्या १९ वर्षांनंतर तब्बल ३० कोटींनी वाढून १३७ कोटी झाली आहे. लोकसंख्या नियोजनाचे सर्व प्रयत्न करूनही आपली लोकसंख्या एका दशकात १५ ते २० टक्क्यांनी वाढते आहे. त्यामुळंच आपण लवकरच चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरणार आहोत. डॉ. कलाम यांच्या मनातल्या ‘महासत्ते’शी आपल्या आत्ताच्या परिस्थितीची तुलना केली तर हाती काय येतं? गेल्या दोन दशकांत आपण कुठून कुठं आलो? यापुढं कुठं जाणार? आपल्या पुढच्या पिढीच्या हाती आपण कोणता वारसा सोपवत आहोत? या गोष्टींचा धांडोळा घेण्यासाठी ‘२०२०’मध्ये पदार्पण यापेक्षा चांगला मुहूर्त नसेल.
एकविसाव्या शतकाच्या आगमनाची पहिली ग्वाही आपल्याला मिळाली ती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या भाषणांमधून. एका अनपेक्षित परिस्थितीत थेट देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारावी लागलेल्या या तरुण पंतप्रधानाच्या डोळ्यांत पुढच्या शतकाची स्वप्नं होती. ‘हमें देखना हैं’ या त्यांच्या सानुनासिक उच्चारातील भाषणांची चेष्टा खूप झाली; पण ‘इक्कसवीं सदी’ हा शब्द सतत ऐकायला मिळाला तो त्यांच्याकडूनच. मोठमोठ्या आकाराचे कम्प्युटर सगळ्या कार्यालयांत विराजमान होण्याचा तो काळ होता. काय दुर्दैवी योगायोग... एकविसाव्या शतकाचं स्वप्न दाखविणाऱ्या राजीव गांधींची १९९१ मध्ये हत्या झाली आणि तेच वर्ष आपल्या इतिहासातलं एक वेगळं वळण देणारं वर्ष ठरलं. पुढच्या दशकात आपला देश कुठं जाणार आहे त्या रस्त्याची दिशा याच वर्षी निश्चित झाली. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली झाली आणि पुढच्या दहाच वर्षांत देश एका वेगळ्या वळणावर येऊन उभा राहिला. या आर्थिक धोरणांतील बदलांची फळं आता दिसू लागली होती. देशातील तरुणांना नवनव्या संधी उपलब्ध होत होत्या आणि देशाचा चेहरामोहराच बदलत होता. केबल टीव्हीपासून ते ‘कोकाकोला’पर्यंत आणि खासगी नोकऱ्यांपासून ते घराघरांत वाढू लागलेल्या आर्थिक सुबत्तेपर्यंत हा बदललेला चेहरा स्पष्टच जाणवत होता. वीस वर्षांपूर्वी म्हणजे २००० हे वर्ष उजाडण्याच्या वेळी सगळ्या जगात एक वेगळाच जोष संचारला होता. एका महत्त्वाच्या कालखंड बदलाचे आपण साक्षीदार आहोत, असं प्रत्येकाला वाटत होतं. ‘वायटुके’ नावाच्या कम्प्युटर प्रॉब्लेमचा तेव्हा बोलबाला होता. ‘इंटरनेट’ ही ‘इन थिंग’ व्हायला सुरुवात झाली होती. महानगरांमध्ये मॉल आणि मल्टिप्लेक्स संस्कृती रुजू लागली होती आणि महामार्गांचा चेहरा जरा गुळगुळीत होऊ लागला होता. सनदशीर मार्गानं, बुद्धीचा वापर करून भरपूर पैसे मिळविता येतात आणि संपत्ती निर्माण करता येते, याचा नवमध्यमवर्गीय तरुणांना झालेला साक्षात्कार ही त्या दशकाची सर्वांत मोठी देणगी होती. पैसा आल्यानं पारंपरिक मूल्यव्यवस्थेला हादरे बसण्याचाही हाच काळ होता. थोडक्यात, भौतिक सुखाची गंगा भारतभूमीवर अवतरली आणि लवकरच या ‘गंगे’चं पात्र आसेतुहिमाचल असं विस्तारलं.
पुढच्या दोन दशकांत हाच प्रवास अधिक वेगानं, अधिकाधिक वेगानं होत गेला. नेपथ्यरचना थोडीफार बदलली, तरी मूळ नाटकाचा संच तोच होता. एकीकडं संपत्तीनिर्माणाची संधी आणि दुसरीकडं पारंपरिक मूल्यव्यवस्थेशी संघर्ष असा हा जोडप्रवास काही काळ चालू राहिला. नंतर तंत्रज्ञानातील अफाट वेगवान बदलानं जगण्याची सगळी मितीच बदलवून टाकली. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाअखेर आपल्याकडं ‘स्मार्टफोन’ आले आणि आपलं जगणं खरंच पहिलं राहिलं नाही! त्यामुळं काय काय झालं आणि काय कमावलं-गमावलं हे आपल्याला आता सगळं ठाऊक झालं आहे. आता पुढं काय, हा प्रश्न आहे.
आता लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा, की २००० मध्ये जन्मलेली मुलंही आता १९ वर्षांची झाली आहेत. प्रौढ आहेत. त्यांनी मतदानही केलेलं आहे. त्याच्या लेखी विसावं शतक म्हणजे केवळ इतिहास आहे. त्यांच्यासमोर हे सगळं शतक उभं आहे. अजून ८० वर्षं आहेत. ही मुलंच हे शतक घडवणार आहेत. (विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा शेवटी जन्मलेल्यांचाही ठसा या शतकावर असेलच!) या मुलांसाठी आपण ‘वारसा’ म्हणून काय देणार आहोत, याचा विचार करू लागलो तर मात्र काहीशी निराशा दाटून आल्याखेरीज राहत नाही. यात सगळ्यांत महत्त्वाचा असेल तो पर्यावरणाचा प्रश्न. पर्यावरणाचे घातक परिणाम पुढील पिढ्यांना भोगायला लागू शकतात. याची जाणीव आता जागतिक पातळीवर सगळीकडं होऊ लागली आहे. ऋतुचक्र बदलत चाललं आहे, हे आपणही आत्ता अनुभवतोय. निसर्गाचा समतोल ढासळला तर माणसानं बसवलेली घडी विस्कटायला अजिबात वेळ लागणार नाही. हा प्रश्न आपल्या अस्तित्वाशीच निगडित असल्यानं त्यावर पुढच्या काळात अधिकाधिक काम करावं लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक प्रगतीचा. देशासमोर बेरोजगारी, मंदी, घटलेला वृद्धिदर हे सगळंच मोठं आव्हान आहे. या तरुण पिढीच्या हाताला काम मिळालं नाही, तर त्यांच्यातील ऊर्जास्रोताला विघातक वळण मिळण्यास वेळ लागत नाही. आपण आत्ताही आजूबाजूला याची लागण झालेली पाहतोच आहोत. तेव्हा पुढच्या काळात तातडीनं या प्रश्नावर सगळ्यांनी मिळून मार्ग काढलाच पाहिजे. तिसरा प्रश्न आहे तो महानगरांमधील पायाभूत सुविधांचा. आपली खेडी ओस पडत चालली आहेत आणि शहरं अतिभयानक पद्धतीनं फुगत चालली आहेत. ही नैसर्गिक वाढ नाही. ही आपल्या फसव्या नियोजनामुळं आलेली सूज आहे. महानगरांमध्ये आत्ताच वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, महागाई आणि बेशिस्त या दुर्गुणांचा सर्वत्र संचार दिसतो. भविष्यात ही स्थिती सुधारली नाही तर रस्त्यारस्त्यावर खून पडायला वेळ लागायचा नाही. हे अराजक टाळण्यासाठी शहरांमधली गर्दी नियंत्रित केलीच पाहिजे.
सगळं जगणंच ‘टी-२०’सारखं वेगवान होत चाललेलं असताना आणि सगळ्याच प्रश्नांवर झटपट उत्तरं शोधण्याचा जमाना असताना, काही गोष्टींकडं दीर्घ पल्ल्याच्या कसोटी क्रिकेटसारखं बघितलं पाहिजे. टिकून राहणं एवढंच आव्हान केवळ पुरेसं नाही, तर टिकून राहून जगण्याचा आणि मानव्याचा दर्जा टिकवणं ही खरी ‘कसोटी’ आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २९ डिसेंबर २०१९)

---

25 Dec 2019

मटा रविवार संवाद लेख

स्वप्नांचा 'केक'वॉक
-----------------------

ख्रिसमसची चाहूल लागली, की तो शुभ्र दाढीधारी, लाल टोपीवाला सांताक्लॉज आठवतो. नाताळच्या आदल्या दिवशी रात्री हा गुपचूप घरी येऊन मुलांना भेटवस्तू ठेवून जातो. त्यासाठी घरोघरी मुलं ते सॉक्स टांगून ठेवतात. (याहून बरी वस्तू चालली असती खरं तर!) असो. तर मुलांची अशी दर वर्षी मजा मजा असते. पण आमचं म्हणणं, मोठ्यांनी काय पाप केलंय? त्यांनाही सांतानं भेटवस्तू द्याव्यात की...
आमच्या मागण्या तशा काही फार नसतात. मध्यममार्गीय विचारांची आणि मध्यमवर्गीय मनांची धाव कुठवर जाणार हो! पण पहाटे पहाटे येऊन सांताबाबानं कधीही बिल न येणारं एखादं क्रेडिट कार्ड आमच्या मोज्यात टाकलं, तर काय हरकत आहे? नोटाबंदीच्या धसक्यानंतर आम्ही शक्यतो रोख रक्कम बाळगणं बंदच केलंय. तसंही खिशात पैसे असले, की ते नाहक खर्च होतात. त्यापेक्षा ते नसलेलेच बरे. मात्र, कधीच बिल न येणारं क्रेडिट कार्ड मिळालं तर आम्ही आयुष्यभर सांताची गुलामी करायला तयार आहोत. विरक्ती ही संतांची शिकवण असली, तर आसक्ती ही सांताची शिकवण आहे. आणि आम्ही आमच्या आयुष्यात अजून आसक्ती सोडलेली नाही. आम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी करायला आवडतात. आम्हाला चांगले सिनेमे पाहायला आवडतं, नाटकं पाहायला आवडतात, सवाई गंधर्व महोत्सव सोफ्यावर बसून ऐकायचा असतो; याशिवाय बिझनेस क्लासनं इंटरनॅशनल प्रवास करायचा असतो. सगळं जग हिंडून बघायचं असतं. आणखी म्हणाल, तर अंबानींच्या मुलीच्या लग्नात (वाढपी म्हणून नव्हे) मिरवायचं असतं; प्रियांका-निकच्या लग्नात तिचा बेस्ट मॅन व्हायचं असतं (आता दुसरा पर्याय तरी कुठं ठेवलाय तिनं?); याशिवाय सहकारसम्राट, शिक्षणसम्राट, मद्यसम्राट आदी मंडळींच्या दर वर्षी नित्यनेमानं होणाऱ्या वेगवेगळ्या समारंभांना, लग्नांना-बारशांना-मुंजींना आम्हाला हेलिकॉप्टरनं जायचं असतं. फक्त बारीकशी अडचण एवढीच, की या सगळ्यांसाठी फार पैसे लागतात हो! म्हणून आम्हाला ना सांताकडून ते कधीही बिल न येणारं क्रेडिट कार्ड हवंय. (वास्तविक आपल्या देशात कधीही परत न फेडण्याची कर्जे सरकारी बँकांकडून घेऊन, मोठमोठ्या लोकांनी केवढा 'आदर्श' घालून दिला आहे. पण आम्हाला एवढी मोठी झेप काही जमायची नाही. त्यामुळं आम्हाला आपलं बिल न येणारं कार्ड पुरे!) बघा सांता, जमवा तेवढं!
आणि हो, सांता, आम्हा शहरवासीयांना अजून एक हक्काची जागा हवीय. ती द्याल का तुम्ही? आम्ही जिथं कुठं आमची दुचाकी किंवा चारचाकी घेऊन जाऊ, तिथं तिला लगेचच पार्किंग मिळेल, अशी काही तरी जादू करा ना! म्हणजे बटण दाबलं, की गाडीच्या समोर बरोबर तेवढी मोकळी जागा तयार झाली पाहिजे. अहो, आम्ही साधी भाजी आणायला गेलो, तरी पार्किंगसाठी दोन दोन, तीन तीन चकरा माराव्या लागतात आम्हाला. म्हणजे भाजी शंभर रुपयांची आणि त्यासाठी पेट्रोल जाळायचं दोनशे रुपयांचं असा आमचा उफराटा कारभार झालाय बघा. त्यामुळं आमच्या गाडीला अशी एक जादूची यंत्रणा बसवा, की ती गाडी आम्ही जिथं कुठं घुसवू तिथं आपोआप त्या गाडीच्या आकाराची जागा तयार व्हायला हवी. आजूबाजूची गर्दी अशी अवाक होऊन बघत राहिली पाहिजे. (पुण्यात हे दृश्य जमवणं तसं अवघड आहे म्हणा. इथं कितीही भारी सेलिब्रिटी शेजारून गेला, तरी आपल्या कट्ट्यावरच्या टोळीतून मान न वळवणारेच जास्त!) पण तरीही ती पार्किंगला आयती जागा मिळण्याची आमची फँटसी कायम आहे. सांताबाबा, आता अशी जादू फक्त तुमच्या पोतडीतच आहे बघा. तर विचार करा. तेवढं काम करूनच टाका...
अजून एक छोटीशी मागणी. खरं तर ही छोटीशी मागणी नाही म्हणता येणार; कारण त्या मागणीतच आम्हाला 'खूप काही' हवंय. सांता, आम्ही आता भारी भारी स्मार्टफोन वापरतो. पण त्यात कितीही जागा असली, तरी ती आम्हाला पुरत नाही. त्यामुळं आम्हाला अनलिमिटेड डेटा दिलात, तसंच अनलिमिटेड स्पेस पण द्या ना! हे म्हणजे खायला द्यायचं, पण पोट नाही द्यायचं असं झालं. असं करू नका. पोटावर मारा; पण डेटावर मारू नका. आमचं वाय-फाय, आमचं नेटवर्क कधीही बंद पडू देऊ नका. आमच्या स्मार्टफोनची बॅटरी कधीही उतरू देऊ नका. तुम्हाला तर माहितीच आहे, की हल्ली आम्ही एक वेळ न जेवता राहू (पण एक वेळच हं... रात्री मजबूत जेवू!), पण स्मार्टफोनशिवाय आम्हाला एक मिनिटही काढणं केवळ अशक्य आहे. आमच्या पोस्टवर येणाऱ्या 'लाइक'च्या संख्येवर आमचा त्या त्या वेळचा मूड असतो, हेही आता सांगायला नको. तेव्हा सांता, येताना भरपूर जीबी, टीबी भरून स्पेस घेऊन या आणि आमच्या गरिबाच्या स्मार्टफोनच्या झोळीत तेवढी टाका. हे तुम्हाला नक्की जमेल सांता... बघाच! तुम्ही हे एकदा केलंत की आमचे सगळे 'लाइक' तुम्हालाच!
सांता, आमच्या आजूबाजूला सध्या गुडघ्यात मेंदू असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हे असे वेडपट लोक आम्हाला रोज रस्त्यानं जाता-येता दिसतात. काही जण भयानक धूर सोडणाऱ्या गाड्या चालवत असतात, काही जण बेदरकारपणे सिग्नल मोडून पुढं आपलं बाइकरूपी घोडं दामटत असतात, काही जण बसमधून बाहेरच्यांची पर्वा न करता पचापच थुंकत असतात, काही लोक रस्त्याच्या डाव्या बाजूला येऊन उभे राहतात आणि सिग्नल सुटला, की समोर जाणाऱ्यांना गाडी आडवी घालून उजव्या बाजूला वळतात, काही जण 'नो एंट्री'तून सरळ घुसतात आणि वर त्यांना काही म्हटलं, की बोलणाऱ्याचीच आय-माय उद्धरतात, काही महाभाग मध्यरात्री प्रचंड मोठा आवाज करीत, महागड्या गाड्या उडवीत बेफाम उद्दामपणा करतात, काही जण वाढदिवसाच्या नावाखाली वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथं फटाके उडवतात आणि अक्षरशः लाखो रुपयांचा धूर करतात, काही थोर महात्मे दारू पिऊन गाड्या चालवतात आणि स्वतःबरोबरच दुसऱ्याच्याही जीवाला धोका उत्पन्न करतात. तेव्हा सांताजी, या सगळ्यांचा मेंदू गुडघ्यातून काढून पुन्हा डोक्यात जागच्या जागी बसवणं तुम्हाला जमेल काय? ही मागणी आम्ही स्वतःसाठी नाही, तर आमच्या शहरासाठी, सगळ्या समाजासाठी करतो आहोत. तुम्हाला 'सीएसआर' म्हणून काही जबाबदारी असेलच की! त्या 'हेड'खाली एवढं काम करून टाका आणि तुम्हीही पुण्य कमवा...
याखेरीज अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ऑफिसात बॉसने न कुरकुरता हवी तेवढी रजा देणे, बायकोनं न कुरकुरता मित्रांसोबत हव्या तेवढ्या पार्ट्या करायला वा हुंदडायला जाऊ देणे, आपल्या क्रिकेट संघाने परदेशात जाऊन दर वेळीच माती न खाणे, मराठी सीरियलमध्ये डोक्यात न जाणारे (आणि डोक्याला पटणारे) प्रसंग घडविणे, वेळच्या वेळी बस/ट्रेन/विमान यांचे रिझर्व्हेशन मिळणे, फार अपेक्षा ठेवून वाचायला घेतलेले पुस्तक अगदीच टुकार न निघणे, फेसबुकवर आपण एका हेतूनं टाकलेली पोस्ट लक्षात न घेता, मूर्खासारख्या भलत्याच कमेंट करणाऱ्या लोकांना लिस्टीतून आपोआप गायब करणे अशा किती तरी गोष्टी तुम्ही सहज करू शकता, सांता... तुम्ही हे केलंत ना, तर लक्षावधी लोक तुम्हाला दुवा देतील बघा! (आमच्याकडं तर लगेच तुमचं मंदिरही बांधतील आणि वर तुमच्या धर्माच्या/जातीच्या चौकशा सुरू होतील.) असो.
आता शेवटची एकच मागणी - आमच्या राजकारण्यांना भ्रष्टाचार न करण्याची बुद्धी द्या...
अरे, अरे! असे पळून जाऊ नका हो सांता, एवढं अवघड आहे का हे? अहो, थांबा ना... असं काय करता? ओ सांता...

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २३ डिसेंबर २०१८)

---