7 Oct 2023

वहिदा रेहमान - मटा लेख

‘वहिदा’ नावाचं लोभस स्वप्न
---------------------------------

वहिदा रेहमान म्हणजे मूर्तिमंत भारतीय सौंदर्य. या वहिदाचं माझ्या पिढीतल्या कित्येकांच्या आयुष्यातलं आगमन टीव्हीच्या छोट्या पडद्यातूनच झालं. म्हणजे तेव्हा ‘चित्रहार’ किंवा ‘छायागीत’मध्ये ‘भँवरा बडा नादान’ किंवा ‘चौदहवी का चाँद’ वगैरे गाणी लागायची, तेव्हाच पाहिलं असणार. माझं वय १२ असताना आमच्या घरी पहिल्यांदा टीव्ही आला. स्वाभाविकच तेव्हाच्या माझ्या ‘फेवरिट लिस्ट’मध्ये वहिदा नव्हती. ती जागा निर्विवादपणे मधुबालानं व्यापली होती. मधुबाला ते माधुरी दीक्षित अशी रेंज मी चार वर्षांतच गाठली. पण वहिदाचं सौंदर्य समजायला चाळिशी यावी लागली.
वहिदा रेहमान हे गुरुदत्तचं ‘फाइंड’. हैदराबादवरून तिला मुंबईला कसं आणलं याची सुरस कथा अबरार अल्वींनी त्यांच्या पुस्तकात लिहिली आहे. ती मुळातूनच वाचायला हवी. वहिदाला स्वतःच्या बलस्थानांचं नेमकं भान होतं. ती एक उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका होतीच (म्हणजे आहे); पण त्याच जोडीला अत्यंत चोखंदळ भूमिका करून तिनं भारतीय पडद्यावर आपलं जे वेगळेपण निर्माण केलं ते तिच्या बुद्धिमत्तेची झलक दाखवणारं आहे. ‘प्यासा’मधील गुलाबो असो, ‘रेश्मा और शेरा’मधली रेश्मा असो, ‘खामोशी’मधली राधा असो किंवा अर्थातच ‘गाइड’मधली तिची अजरामर रोझी असो... आपल्या मूर्तिमंत भारतीय सौंदर्यानं तिनं सर्वत्र आपली छाप उमटवली. अत्यंत बोलके व पाणीदार डोळे आणि तेवढाच सर्व भाव व्यक्त करणारा चेहरा हे वहिदाचं वैशिष्ट्य. नृत्यनिपुण तर ती होतीच, म्हणूनच तर अगदी १३-१४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘दिल्ली-६’मध्ये ‘ससुराल गेंदा फूल’ या गाण्यावर तिला नव्या अभिनेत्रींसोबत थिरकावंसं वाटलं.
‘भंवरा बडा नादान है’ या गाण्यातली चंचलता, ‘चौदहवी का चांद’मधली अप्रतिम निरागसता, ‘उपरवाला जान कर अंजान है’ या गाण्यातले तिचे ते ‘आपण नाही बाबा, हा वरच्या देवाला गाणं म्हणतोय’ असं सांगणारे खट्याळ भाव, ‘ये श्याम कुछ अजीब है’ या गाण्यात, नदीतलं पाणी चेहऱ्यावर आल्याक्षणी झर्रकन बदलणारा चेहरा आणि जुन्या आठवणींनी दाटून येणारा ‘दर्द’ निमिषार्धात चेहऱ्यावर दाखवणारे तिचे ते डोळे, ‘पान खाए सैंया हमारो...’ म्हणतानाची तिची चुलबुली अदा, देवसोबत ‘आज फिर जीने की तमन्ना है...’ म्हणताना बिनधास्त रस्त्यावर फेकून दिलेला तो मटका, विश्वजितसारख्या ‘अभिनेत्या’सोबत ‘ये नयन डरे डरे...’ गाण्यात दाखवलेलं परिणितेचं साक्षात रूप... वहिदाच्या एकेका विभ्रमावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो.
‘पिया तोसे नैना लागे’ गाण्यात नाकापेक्षा किंचित जडच अशी ती मोठ्ठी नथ आणि लालभडक साडी नेसून तिनं उभी केलेली मराठी स्त्री अजूनही नजरेसमोरून हटत नाही. अंगप्रदर्शन तर सोडाच; पण कधी उघडा दंडही न दाखवणाऱ्या या अभिनेत्रीनं साठ अन् सत्तरच्या दशकात तमाम भारतीय पुरुषांच्या मनात अढळ स्थान का मिळवलं होतं, ते तिचे तेव्हाचे सिनेमे पाहिलं तरच थोडं फार कळू शकेल. मध्यमवर्गीय पुरुषांच्या फाटक्या बनियनसारख्या आयुष्यात सिनेमा नट्यांच्या रूपानं असंख्य झुळुका येत असतात. पण वहिदासारखी ‘वाइफ मटेरियल’ एखादीच! त्यामुळंच वपुंना ‘मीच तुमची वहिदा’सारखी (नावाबाबत चु. भू. दे. घे.) कथा लिहावीशी वाटते. पुलंच्या ‘पाळीव प्राणी’मध्येसुद्धा फोटो दाखवणाऱ्यांच्या कथेत ‘इश्श...! वहिदा रेहमान’ येते.

गुरुदत्तसारख्या द्रष्ट्या दिग्दर्शकानं तिला सर्वप्रथम अखिल भारतीय स्तरावर पेश केल्यानं असेल, व्ही. के. मूर्तींसारख्या अभिजात सिनेमॅटोग्राफरच्या नजरेचा लाभ झाल्यानं असेल, पण वहिदा इतर अभिनेत्रींच्या तुलनेत फारच वेगळी ठसत होती. (अशीच दुसरी अभिनेत्री होती नूतन!) वहिदाच्या सौंदर्यात, हिंदीतला शब्द वापरायचा तर, एक ‘सादगी’ होती. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ अशी तिची प्रतिमा सहज तयार होऊ शकत होती. सावळेपणातलं तिचं अद्भुत सौंदर्य ब्लॅक अँड व्हाइट पडद्यावर आणखीनच खुलून दिसलं. तेव्हाच्या प्रेक्षकांसाठी वहिदा नक्की कोण होती अन् काय होती? साठच्या दशकात भारतात सर्वच क्षेत्रांत एक स्वप्नाळूपण होतं. नेहरूंचा करिष्मा अजून टिकून होता, राज कपूर आणि बी. आर. चोप्रांसारखे दिग्दर्शक त्यांच्या प्रभावाखाली डावीकडं झुकलेल्या समाजवादी विचारसरणीचा प्रसार करणारे सिनेमे बनवत होते, भाक्रा-नानगलसारखी धरणं बांधली जात होती आणि सिनेमात सत्यजित राय यांच्यापासून गुरुदत्तपर्यंत अनेक जण आगळेवेगळे प्रयोग करीत होते. कलकत्ता, मुंबईसारखी शहरं आपला आब व रुबाब टिकवून होती. त्यांचं बकाल महानगरांत रूपांतर झालं नव्हतं. किंबहुना देशाची एकमेव स्वप्ननगरी, मायानगरी मुंबापुरीच होती. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन अजून धगधगायचं होतं. या काळात म्हणजे १९५४ मध्ये वहिदा मुंबईत आली. या स्वप्नाळू दशकाचा चेहरा म्हणून अनेक पुरुषांचं नाव घेता येईल. किंबहुना नेहरूंपासून राज कपूरपर्यंत अनेकांचं घेतलंही जातं. मात्र, या नवभारताचा तरुण, सोज्वळ आणि सात्त्विक सौंदर्य ल्यायलेला स्त्री-चेहरा कुणाचा असेल तर तो वहिदाचाच होता. (अर्थात इथंही तिच्या जोडीला नूतनचं नाव घ्यावंच लागेल.) तमाम भारतीय पुरुषांना आकर्षित करून घेणाऱ्या या सौंदर्याचं विश्लेषण आत्तापर्यंत अनेक जणांनी केलंय. पण मला वाटतं, तिच्यात जे अंगभूत सौंदर्य होतं, त्याचा उल्लेख फार कमी जणांनी केला आहे. वहिदा अत्यंत आत्मविश्वासू आणि आत्मभान असलेली अभिनेत्री आहे. एक स्त्री म्हणून तिला आपल्या ताकदीचं योग्य ते भान होतं. तिचा आत्मसन्मान तिनं कायम जपला. म्हणूनच तर तिला सिनेमा क्षेत्रात नट्यांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी कधी कराव्या लागल्या नाहीत. अंगप्रदर्शन न करताही मादक दिसता येतं, हे तिनं केवळ बोलक्या डोळ्यांनी करून दाखवलं. वहिदाचं चित्रपटसृष्टीला काही योगदान असेल तर ते हे आहे. तिच्यामुळं काही भारतीय पुरुष तरी तेव्हा कदाचित स्त्रीचा सन्मान करायला शिकले असतील. मूर्तिमंत भारतीय स्त्रीचं प्रतीक असलेल्या या महान अभिनेत्रीला आता चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. तिचा जन्म १९३८ चा. आता ती जवळपास ८५ वर्षांची आहे. त्या मानानं तिला खूपच उशिरा हा पुरस्कार मिळाला. अर्थात वयाचे हिशेब वहिदासारख्या अजरामर सौंदर्याला लागू होत नाहीत. त्यामुळंच ती या वयातही आपली ‘ग्रेस’ राखून आहे. तिला शुभेच्छा देताना आजही डोळ्यांसमोर तरळतोय तो 'चौदहवी का चाँद'मधला तिचा अप्रतिम निरागस गोड चेहरा... त्या चेहऱ्याला पाहून शायर उगाच नाही म्हणत - चौदहवी का चाँद हो या आफताब हो... जो भी हो तुम, खुदा की कसम, लाजवाब हो...!


---


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे; २७ सप्टेंबर २०२३)

---------------

3 Oct 2023

लंडनला जाताय? मग हे वाचा...

लंडन प्रवास मार्गदर्शिका 
------------------------------


लंडनवारीचे ब्लॉग वाचल्यानंतर अनेकांनी लंडनला जायचे असल्यास काय काय करावे आणि काय करू नये, याची विचारणा केली. मी शेवटचा ब्लॉग याच विषयावर लिहिणार होतो. परंतु त्यापेक्षा थेट फेसबुकवर पोस्ट केल्यास अधिक जणांपर्यंत पोचेल असं वाटलं. त्यामुळे इथंच लिहितो आहे. (पण अखेर पुन्हा हा मजकूर आता ब्लॉगवर घेतो आहे; कारण फेसबुक पोस्ट शोधून लिंक देणं जरा कठीण आहे...) 
तर लंडनवारी... पूर्वतयारी आणि इतर उपयुक्त माहिती अशी : 

व्हिसा

१. ब्रिटन किंवा यूके हा देश तसा महागडा आहे. पौंड व रुपया यांचा विनिमय दर जवळपास १०७ रुपयांना एक पौंड असा (सध्या) आहे. हा कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र, कमी झाल्याचा इतिहास नाही. 

२. व्हिसा मिळताना ‘युनायटेड किंगडम’चा मिळतो. कमीत कमी सहा महिन्यांचा ते जास्तीत जास्त दहा वर्षांचा मिळू शकतो. पर्यटक म्हणून जात असल्यास सहा महिन्यांचा काढावा. यासाठी साधारण १४ हजार रुपये प्रतिव्यक्ती फी आहे. मात्र, ब्रिटनने अलीकडेच या व्हिसा फीमध्ये वाढ केल्याचे माझ्या वाचनात आले. ऑक्टोबरपासून ती वाढ लागू होणार आहे. त्यामुळे दीड ते दोन हजार रुपये वाढतील, असे गृहीत धरा.

३. पुण्यात व्हीएफएस या कंपनीकडे अनेक देशांच्या व्हिसाचे काम होते. ही कंपनी एजंटसारखे काम करते. पूर्वी विमाननगरला ऑफिस होतं. आता वानवडीत आहे. अमेरिकेच्या व्हिसासाठी फक्त मुंबईला जावे लागते आणि तिथं इंटरव्ह्यू असतो. ब्रिटनच्या व्हिसासाठी (किंवा अन्य कुठल्याही देशाच्या व्हिसासाठी) मुलाखत वगैरे काही नसते.

४. खासगी ट्रॅव्हल एजंटकडून व्हिसासाठी अर्ज केल्यास ते आणखी अडीच ते तीन हजार रुपये प्रति व्यक्ती घेतात. आपल्याला आत्मविश्वास असल्यास आपण स्वत: ऑनलाइन अर्ज करू शकतो. आम्ही या वेळी एजंटच्या माध्यमातून व्हिसा मिळविला. मात्र, पुढच्या वेळी स्वत: ऑनलाइन अर्ज करणार हे नक्की.

५. अर्ज केल्यानंतर साधारण १५ दिवसांत व्हिसा येईल, असे एजंट सांगतात. पुण्याहून आपले अर्ज मुंबईतील यूके कौन्सुलेटमध्ये जातात. तिकडून मंजूर होऊन आल्यावर व्हिसाचा शिक्का असलेले पासपोर्ट घरपोच येतात. त्यासाठीचे कुरिअर चार्जेस आपल्याला अर्ज करतानाच भरावे लागतात. आता व्हीएफएस किंवा कुठेही रोख रक्कम घेतली जात नाही. सर्व पेमेंट कार्डने किंवा ऑनलाइनच होते. त्याची रीतसर पावती आपल्याला मिळते. आमचा व्हिसा आठवड्यात आला. (यापूर्वी आम्हाला २०२० मध्ये मिळाला होता, मात्र, तेव्हा कोव्हिडमुळे जाता आले नव्हते. मात्र, त्यांच्याकडे तशी नोंद असणार. त्यामुळे व्हिसा मिळणे सोपे गेले.)

६. व्हिसासाठी भरपूर कागदपत्रे, प्रॉपर्टीचे तपशील मागतात. तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न, बँक खात्यांची सहा महिन्यांची स्टेटमेंट, प्रॉपर्टी टॅक्स असं आपल्याकडं जे जे आहे ते सगळं द्यावं लागतं. विमानाची तिकिटे आधी काढलेली असण्याची आवश्यकता नाही. मात्र, काढलेली असल्यास ती जरूर जोडावीत. त्यांना तुम्ही परत येणार आहात, याची खात्री हवी असते. त्यामुळे रिटर्न तिकिटे असतील, तर व्हिसा मंजूर होणे सोपे जाते.

७. नोकरी करत असाल, तर रजेचा अर्ज व पुन्हा कुठल्या तारखेला जॉइन होणार हे सांगणारे वरिष्ठांच्या सहीचे पत्र लागते.

८. तुम्ही तिथे नातेवाइकांकडे जाणार असाल, तर त्यांची सगळी कागदपत्रे आणि आमंत्रणाचे पत्र लागते. त्यांचा पासपोर्ट, तिकडचा व्हिसा, घरच्या पत्त्याचा पुरावा असं सगळं जोडावं लागतं.

९. हॉटेलमध्ये राहणार असाल, तर त्या हॉटेलचे कन्फर्म बुकिंग, पत्ता, त्यांची मेल असं सगळं लागतं.


चलन, फॉरेक्स कार्ड

१. ब्रिटनचे चलन पौंड आहे. तिकडे आता बहुतांश व्यवहार कॅशलेस होतात. त्यामुळे पूर्वीसारखे इकडून नोटांच्या रूपात परकीय चलन न्यायची गरज नाही. नेलेच तर अगदी थोडे, म्हणजे अगदी १०० पौंड एवढेच नाममात्र न्यावे. खरं तर एवढ्याही रोख चलनाची तिथे गरज पडत नाही.

२. फॉरेक्स कार्ड प्रत्येकाकडे अत्यावश्यक आहे. तिथे बस किंवा अंडरग्राउंड ट्रेनसाठी हे कार्ड अतिशय उपयुक्त आहे. हे कार्ड नसेल तर आपण सार्वजनिक वाहनाने प्रवास करूच शकत नाही. प्रत्येक वेळी तिथे हे कार्ड टॅप करावे लागते. ते कार्ड काँटॅक्टलेस असेल याची खात्री करून घ्यावी. आम्ही एचडीएफसीची फॉरेक्स कार्डं नेली होती. या कार्डासाठी बँक ५९० रुपये एकरकमी घेते. कार्ड मिळण्यासाठी आपले खाते त्या बँकेत असणे आवश्यक आहे. शिवाय पासपोर्ट, आधार, पॅन हे या कार्डासाठीच्या अर्जाला जोडावे लागते.

३. ऑयस्टर कार्ड - लंडन म्हटलं, की अनेकांना ऑयस्टर कार्ड आठवते. हे तिथल्या सार्वजनिक वाहतुकीसाठीचे उपयुक्त कार्ड आहे. मात्र, आपण नेलेले फॉरेक्स कार्डही बस किंवा अंडरग्राउंड ट्रेनला चालत असल्याने वेगळे ऑयस्टर कार्ड घेण्याची मुळीच गरज नाही. ऑयस्टर कार्ड फक्त बस किंवा ट्रेनला चालते. आपले कार्ड हॉटेल किंवा अन्यत्र कुठेही चालते. त्यामुळे ते एक कार्ड असले, की पुरेसे आहे.

४. किती चलन अपलोड करावे? - आपण आठ ते दहा दिवसांसाठी जाणार असू आणि आपल्या नातेवाइकांकडे राहण्याची सोय असेल, तर ५०० पौंड एका कार्डावर अपलोड केले तरी रग्गड होतात. 

५. महत्त्वाचे - एकदा लंडनमध्ये पाय टाकला, की दर वेळी एवढे पौंड गेले म्हणजे एवढे एवढे रुपये गेले, असा सतत विचार करू नये. पौंडातच विचार करावा व तसे खर्च करावेत. नाही तर फ्रस्टेशन येण्याची शक्यता असते.


सिम कार्ड

१. आम्हाला व्हिसाबरोबर तीन सिम कार्डं गिफ्ट मिळाली होती. ती लंडनमध्ये उतरल्याबरोबर activate झाली. याचा चांगला उपयोग झाला. शिवाय मी 'एअरटेल'चा दहा दिवसांचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन घेतला होता. (२९९९ रु.) हे रोमिंग आम्ही जाताना कैरोला थांबलो होतो, तिथंही चाललं. (आधी त्यांच्या साइटवर इजिप्त व यूके वेगवेगळ्या यादीत दाखवले होते. प्रत्यक्षात यूकेसाठी घेतलेलं रोमिंग इजिप्तमध्येही चाललं...)

२. मला विचाराल, तर आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून रोमिंग activate करून घेतलेलं चांगलं. आपले नंबर आपल्या फॉरेक्स कार्डला जोडलेले असतात. त्याचे एसएमएस यायला हवे असतील (आणि ते यावेत अशी सोय असावी) तर आपल्याच नंबरवर इंटरनॅशनल रोमिंग घेणं इष्ट. आम्हाला मिळालेल्या तीन कार्डांचा डेटासाठी चांगला उपयोग झाला. शिवाय लंडनमध्ये काही ठिकाणी त्यांच्याच सिमला रेंज येत होती. तेव्हा दोन्ही सोयी करून ठेवलेल्या बऱ्या. महत्त्वाचं म्हणजे मी मेव्हण्याच्या घरी राहत होतो त्यांचं 'वायफाय' आम्हाला वापरायला मिळत होतं. त्यामुळे गिफ्ट सिमवरचा डेटा बराच वाचला. त्यामुळे आम्हाला तिकडे टॉपअप करायला लागलं नाही. पण एरवी तशी गरज भासू शकते. पण ते सहज कुठेही करता येतं. फार महागही नाही. 


इतर काही Do's & Don'ts

१. लंडनमध्ये गेल्यावर City Mapper नावाचे ॲप आहे ते जरूर डाउनलोड करावे. अतिशय उपयुक्त आहे. लंडनमध्ये इंग्लिश भाषेमुळे मुळात आपल्याला काही परके वाटतच नाही. त्यामुळे चुकायचे म्हटले तरी चुकू शकणार नाही. सर्वत्र नकाशे, दिशादर्शक फलक लावलेले असतात. शक्यतो कुणाला विचारायची वेळ येऊ नये, असेच सगळे नियोजन असते.

२. लंडन आय, मादाम तुस्साँ किंवा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड अशा लोकप्रिय पर्यटनस्थळी प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी जायचे ऑनलाइन बुकिंग केल्यास फायदेशीर ठरते.

३. इकडे खासगी वाहने किंवा टॅक्सी महाग आहे. त्यामुळे सगळे जण अंडरग्राउंड ट्रेन किंवा बस वापरतात. इथल्या लाल डबल डेकर बस प्रसिद्ध आहेत. त्यातून जरूर फिरावे. अंडरग्राउंड ट्रेनमध्ये शहर दिसत नाही. बसमध्ये आयते शहरदर्शनही होते. बसला काही विशिष्ट टप्प्यांपर्यंत सरसकट १.७५ पौंड तिकीट आहे. बसमध्ये कायम पुढच्याच दाराने चढावे लागते. कंडक्टर नसतो. ड्रायव्हरसमोर मशिन असते, तिथे कार्ड टॅप करावे लागते. 

४. अंडरग्राउंड ट्रेन हे एक वेगळेच, प्रचंड विश्व आहे. याची सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. ती जरूर वाचावी. लंडनमधील भुयारी रेल्वे १८६३ मध्ये सुरू झाली आहे. अगदी अलीकडे नवी एलिझाबेथ लाइन सुरू झाली आहे.

५. हिथ्रो विमानतळावरून मध्यवर्ती शहरात येण्यासाठी हिथ्रो एक्स्प्रेस नावाची ट्रेन आहे. ती किंवा नवी एलिझाबेथ लाइन जरा महाग आहे. त्याऐवजी सरळ पिकॅडिली लाइन घेऊन शहरात यावे. ते स्वस्त पडते.

६. इकडे सार्वजनिक वाहनांत कुणीही कुणाच्या भानगडीत लक्ष घालत नाही. आपणही एखाद्या व्यक्तीकडे टक लावून पाहणे किंवा फोटो काढणे असभ्यपणाचे मानले जाते. ते टाळावे. (अनेकदा निग्रहाने तसे करावे लागते. पण तसेच करावे.)

७. रस्ता ओलांडताना ‘पादचारी प्रथम’ असा नियम इथे आहे. प्रत्येक चौकात रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नलचे बटण असते. ते दाबून वाट पाहावी. पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल हिरवा झाल्यावर बिनधास्त रस्ता ओलांडावा. कितीही भरधाव गाडी, बस येत असेल तरी ती पांढऱ्या रेषेच्या आत थांबते म्हणजे थांबते. दोन गाड्यांमध्ये साधारणपणे आठ ते दहा फूट अंतर ठेवतात. बससाठी वेगळी लेन असते. बसवाले त्याच लेनमधून जातात. सायकलस्वार भरपूर आहेत. बसने त्यांना ओलांडू नये, अशी सूचना सर्वत्र बस ड्रायव्हरसाठी असते.

८. इथे भरपूर बागा आहेत. तिथं निवांत बसून तुम्ही काहीही खाऊ शकता, पिऊ शकता. जागोजागी डस्टबिन आहेत. त्यांचा वापर करावा लागतो.

९. इकडे सार्वजनिक स्वच्छतागृहे एकूण कमी दिसली. अंडरग्राउंड स्टेशन्सवर ती सोय नाही. त्यामुळे शक्यतो म्युझियम्स, हॉटेल आदी ठिकाणी मोकळे व्हावे व मगच मोठा प्रवास सुरू करावा.

१०. अंडरग्राउंडमध्ये अनेक ट्रेनमध्ये एसी नाही. जुन्या लाइन आहेत. व्हिक्टोरियासारख्या लाइनवर चक्क उकडते. इथले हवामान अत्यंत बेभरवशाचे आहे. त्यामुळे वॉटरप्रूफ शूज, जर्किन आणि छत्री जवळ बाळगणे आवश्यक ठरते.

----

लंडनवारीचे तपशीलवार वर्णन वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----