29 Nov 2024

मटा पुणे दिवाळी अंक २४ – कथा

रघू आणि रघू २.०
---------------------

दिवाळीच्या सुट्ट्या जवळ येऊ लागल्या, तसा रघू खूश झाला. या सुट्टीत त्याचा आनंदमामा अमेरिकेहून पुण्याला येणार होता. हा मामा रघूचा अतिशय आवडता होता आणि मामाचाही रघू एकदम लाडका. त्यामुळं कधी सुट्ट्या लागताहेत आणि कधी मामा आपल्या घरी येतोय असं त्याला झालं होतं. सातवीची सहामाही परीक्षा म्हणजे रघूच्या डाव्या हातचा मळ होता. त्याचे आई-बाबाही ‘अभ्यास एके अभ्यास’ असा धोशा लावणारे नव्हते. उलट रघूनं अभ्यासाबरोबरच खेळ, सिनेमा, नाटक, भटकंती या सर्वांचा आस्वाद घेत, एक अष्टपैलू आणि जबाबदार नागरिक व्हावं यासाठी रघूचे आई-बाबा नेहमीच प्रयत्नशील असायचे.
रघू पूर्वी वाड्यात राहायचा. मात्र, आता ते उपनगरातील एका सुंदर वास्तुसंकुलात राहायला गेले होते. इथून रघूच्या बाबांचं ऑफिस जवळ पडायचं. मुंबईकडून येणाऱ्या महामार्गाच्या जवळच हे संकुल होतं. इथूनच नवा मेट्रो मार्गही जात होता. रघू अगदी आतुरतेनं मेट्रो पूर्ण व्हायची वाट पाहत होता. त्याला मेट्रोनं शाळेत जायचं होतं.
लवकरच रघूची सहामाही परीक्षा संपली आणि रघू आता मामाची वाट पाहू लागला. एरवी तो मित्रांसोबत निदान सिंहगडाची एक वारी तरी नक्की करून आला असता. पण आता त्याचं लक्ष मित्रांशी खेळण्यात किंवा भटकण्यात नव्हतंच. कधी मामा येतो आणि प्रॉमिस केल्याप्रमाणे आपलं गिफ्ट आणतो, असं त्याला झालं होतं. साधारण महिन्यापूर्वी मामाचा व्हिडिओ कॉल आला होता, तेव्हा तो आईशी बोलत असताना रघूनं मधेच घुसखोरी करून मामाला ‘हाय’ केलं होतं. नंतर तेच दोघं बोलायला लागले तशी रघूच्या आईनं वैतागून तो फोनच रघूकडं दिला आणि ‘बसा बोलत तुम्ही मामा-भाचे’ म्हणत, कृतककोपानं ती आपल्या कामाकडं वळली होती. त्याच वेळी रघूचं आणि मामाचं ते बोलणं झालं होतं. अमेरिकेत नुकत्याच विक्रीस आलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या रोबोबद्दल रघूनं ऐकलं होतं. हा रोबो आपली सगळी दु:खं स्वत:कडं घेतो आणि फक्त आनंदाच्या गोष्टी तेवढ्या आपल्याला देतो, असं रघूनं वाचलं होतं. हे रघूनं मामाला सांगितलं तेव्हा मामा मोठ्यानं हसला होता. मात्र, लगेच ‘रघूशेठ, हा रोबो आणणं तर मला काही शक्य नाही, पण तुम्हाला एक सरप्राइज गिफ्ट मात्र मी नक्की आणणार बरं का,’ असंही हसत हसत म्हणाला होता. रघूला आता त्याच गिफ्टची मोठी उत्सुकता लागून राहिली होती.
अखेर तो दिवस उजाडला. मामाचं फ्लाइट मुंबईत उतरलं. खरं तर रघूचे बाबा रघूसह मुंबई विमानतळावरच जाणार होते मामाला आणायला; मात्र त्या दिवशी नेमकं बाबांना दुसरं महत्त्वाचं काम आलं आणि मग मुंबई ट्रिप राहिलीच. रघू जरा हिरमुसला. पण मुंबईच्या विमानतळावर उतरल्या उतरल्या मामाचा फोन आला, की मी टॅक्सी करून थेट घरी येतोय रे…. हे ऐकून रघूचा मूड परत जागेवर आला. आता केवळ चार ते साडेचार तासांची वाट पाहायची. मामा कधीही घरी येईल. रघू त्या दिवशी भराभर जेवला. बिल्डिंगमध्येच त्याचा खास दोस्त श्रेयस राहत होता. त्याच्याकडे जाऊन आला. आता आपण पुढचे काही दिवस भेटणार नाही; मामा येतोय असं तो श्रेयसला सांगून आला. खरं तर दर दिवाळीच्या सुट्टीत रघू आणि त्याचे आई-बाबा कुठे तरी चार दिवस ट्रिपला जातात. यंदा मामा आल्यावर त्याच्याबरोबरच जायचं असं ठरलं होतं. नेहमीप्रमाणे कोकणात न जाता, बाबांचे एक चुलतभाऊ फलटणला राहतात तिकडं जायचं, असं त्यांचं ठरलं होतं. मामा आणि फलटणचा काका इंजिनीअरिंगला एकाच कॉलेजमध्ये होते. त्यामुळं ते एकमेकांचे मित्रच होते. त्यामुळं फलटणचा रामकाकाही त्याच्या मित्राची – आनंदाची – वाटच पाहत होता. श्रेयसला हा सगळा कार्यक्रम सांगून रघू घरी पोचतो, तोच खाली टॅक्सीचा हॉर्न वाजला. ‘नक्कीच आनंदमामा...’ असं म्हणत रघू थेट लिफ्टमध्येच शिरला. चौदाव्या मजल्यावरून तळमजल्यावर लिफ्ट येईपर्यंतचा एकेक सेकंद त्याला एकेका तासासारखा वाटला. अखेर लिफ्ट खाली आली. दार उघडताच समोर बघतो तो आनंदमामा. रघूनं धावत जाऊन मामाला मिठीच मारली. मामाकडं भरपूर सामान होतं. ते एकेक करून लिफ्टमध्ये ठेवायला रघूनं आणि वॉचमनदादांनी मदत केली. रघूची नजर त्या सर्व बॅगांवर भिरभिरत होती. मामानं त्याला टपली मारली आणि म्हणाला, ‘रघूशेठ, तुमचं गिफ्ट आणलंय, पण आधी घरात तर चला…’
मामा घरात शिरला तोच हास्याच्या गडगडाटात. भाऊ-बहीण प्रेमानं भेटले. रघूचे बाबा मात्र घरी नव्हते. रघू नुसता मामाभोवती नाचत होता. मामा फ्रेश होऊन येईपर्यंत आईनं त्याच्यासाठी गरमागरम चहा आणि नुकत्याच केलेल्या खमंग चकल्यांची डिश समोर ठेवली. चहा घेत आणि चकलीचा तुकडा मोडत ते गप्पा मारू लागले. मामा खरं तर दमला होता. अमेरिकेहून जवळपास २०-२२ तासांचा प्रवास आणि मुंबईहून पुण्यापर्यंतचा जवळपास पाच तासांचा प्रवास करून मामा अगदीच शिणला होता. मात्र, त्याच्या ताईला आणि भाच्याला बघून त्याच्याही अंगात उत्साह संचारला होता. तो प्रवास कसा कसा झाला, मुंबईत किती ट्रॅफिक लागलं, घाटात कसा अडकलो, मिसिंग लिंकचं काम कधी पूर्ण होणार, मेट्रो कधी पूर्ण होणार असलंच काही तरी बोलत बसला. रघूला यात फार रस नव्हता. त्याचं सगळं लक्ष लागलं होतं ते मामानं आणलेल्या सरप्राइज गिफ्टकडं. शेवटी न राहवून रघूनं ‘आनंदमामा, माझं गिफ्ट?’ असं विचारलंच. त्यावर आई रघूला जरा ओरडलीच. म्हणाली, ‘अरे, आत्ताच आलाय ना तो? जरा विश्रांती घेऊ दे… संध्याकाळी बाबा आले की मग सगळे परत निवांत गप्पा मारू.’ मग मामाही म्हणाला, ‘रघूशेठ, तुमचं गिफ्ट कुरिअरनं येतंय मागून…. थोडा धीर धरा…’ हे ऐकल्यावर रघू पुन्हा जरा नाराजच झाला. मामा तर आला, पण गिफ्ट मागून कुरिअरने? हे काही त्याला झेपलं नाही. पण मग मामाही ‘जेटलॅग’मुळं झोपायला गेला आणि आईही तिच्या दिवाळी फराळाच्या कामात गुंगून गेली, तसा रघू खालच्या गार्डनमध्ये सायकल खेळायला निघून गेला. सगळंच घर थोडा वेळ शांत झालं.
संध्याकाळी बाबा आले तशी रघूची कळी पुन्हा खुलली. आज बाबांनी संध्याकाळी सगळ्यांना त्याच्या आवडत्या हॉटेलमध्ये पार्टीला न्यायचं कबूल केलं होतं. मग त्यांच्या कारमधून ते सगळे त्या हॉटेलमध्ये गेले. रघूनं मामाला मुद्दाम मागं बसवलं आणि तो स्वत: त्याच्या शेजारी बसला. त्याला मामाशी खूप गप्पा मारायच्या होत्या. रघू पुन:पुन्हा त्या अमेरिकेतल्या रोबोविषयी विचारत होता आणि मामा त्यावर मोठ्यांदा हसत होता. मधेच बाहेर बघत, ‘पुणं काय बदललंय… एवढी ही गर्दी… आम्ही कॉलेजला होतो, तेव्हाचं पुणं किती शांत होतं…’ असं काही काही बोलत होता. मामानं आपल्या बोलण्याकडं लक्ष द्यावं, म्हणून रघू मधूनच मामाचं जर्किन ओढत होता. मग मामा त्याला जोरात ओढून जवळ घ्यायचा आणि हसत त्याच्या पाठीवर धपाधपा थोपटायचा. रघूला ते आवडायचं, पण मामा आपल्या प्रश्नांची उत्तरं का देत नाही, असंही वाटायचं. त्या हॉटेलमध्येही जेवताना, त्याचा आवडता पास्ता खाताना रघू मामाशी बोलण्याचा प्रयत्न करत राहिला आणि मामा मात्र आई-बाबांशी वेगळ्याच विषयावर बोलण्यात गुंगून गेला. रघूला तो सगळा प्रकार बोअरच झाला. नंतरचे तीन-चार दिवस मामा दिवसाही झोपायचा आणि रात्री तो आणि बाबा टेरेसमध्ये गप्पा मारत बसायचे. तेव्हा रघू परत श्रेयसकडं जायला लागला. अखेर दिवाळी आली आणि सगळं घर पुन्हा पणत्यांनी, उटण्याच्या वासानं, आकाशकंदिलाच्या आणि दिव्यांच्या माळेच्या प्रकाशानं न्हाऊन निघालं. रघूची सगळी बिल्डिंग नुसती झगमगत होती. आता मामाचा ‘जेटलॅग’ही कमी झाला होता आणि तो दिवसा जागा राहून गप्पा मारायला लागला. बिल्डिंगच्या खाली रघू, श्रेयस आणि त्यांच्या इतर मित्रांनी किल्ला केला होता. मामाही तो किल्ला बघायला आला; इतकंच नाही तर त्यानं तो सजवायला मदतही केली.
दिवाळीचे चार दिवस भुर्रकन निघून गेले. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना फलटणला रामकाकाकडं निघायचं होतं. रघूच्या मनातून अजूनही गिफ्टचा विषय गेला नव्हता. ’मामानं आपल्याला शेंडी तर लावली नाही ना?’ असंही त्याच्या मनात येऊन गेलं. मात्र, त्याच दिवशी त्यांच्या दाराची बेल वाजली आणि कुरिअरवाला आला. स्वत: रघूनंच ते कुरिअर घेतलं. मामानं रघूसाठी मागवलेलं ते गिफ्ट होतं. रघूनं पत्ता पाहिला. ते कुरिअर अमेरिकेतूनच आलं होतं. मग मामानं ते स्वत:सोबत का आणलं नाही, हे त्याला कळेना. तेवढ्यात मामा आलाच. ‘रघूशेठ, मिळालं ना गिफ्ट? उघडा बघू…’ असं मामानं हसत म्हणताच रघूनं ते पार्सल फोडलं. आतून एक बाहुला बाहेर आला. पूर्वी ‘झपाटलेला’ सिनेमात असाच एक बाहुला होता. रघूनं तो सिनेमा बघितला होता. तो बाहुला बघून तो पुन्हा जरा हिरमुसलाच. ‘मामा, मला रोबो हवा होता. आता असल्या बाहुल्याशी खेळायला मी काही लहान नाही,’ असं तो फुरंगटून म्हणाला. त्यावर आनंदमामा म्हणाला, ‘अरे, हाच तर रोबो आहे. आता हा तू सांगशील तसं ऐकणार. तुझ्या फोनच्या ब्लूटूथशी कनेक्ट कर त्याला…’ हे ऐकून रघूनं उडीच मारली. त्यानं त्याचा स्मार्टफोन आणला आणि तो त्या रोबोला कनेक्ट केला. आधी त्या रोबोनं ‘तू मला काय नावानं हाक मारशील?’ असं विचारलं. रघूनं त्याचं नाव ‘पोपटराव’ ठेवलं. पोपटराव चांगला रोबो होता. त्यानं रघूला खूश करून टाकलं. रघूच्या आवडीची गाणी ऐकवली. रघूच्या आवडत्या सिनेमांची यादी करून ठेवली. होमवर्कचं एक फोल्डर करून दिलं. मित्रांचे वाढदिवस पाठ करून टाकले. घरातल्या सीसीटीव्हीलाही स्वत:ला जोडून घेतलं.
खरं तर आता घरात सगळी प्रवासाला निघायची गडबड होती. रघू मात्र पोपटरावला सोडायला तयार नव्हता. नुसता आनंदानं नाचत होता. त्याला हा ‘रोबो’ भलताच आवडला होता.
बाबांनी फलटणच्या दिशेनं कार भन्नाट सोडली. दिवेघाट जवळ येताच वातावरण बदललं. शहरातील गर्दी, धूळ, प्रदूषण जाऊन सगळीकडं हिरवीगार जमीन, अजूनही सुरू असलेले छोटे धबधबे, भरलेले तलाव असं सुंदर दृश्य सुरू झालं. मध्येच एका छोट्याशा, पण खूप प्रसिद्ध हॉटेलमध्ये मिसळही खाऊन झाली. आता सासवड, जेजुरी, नीरा असं करत करत गाडी सुमारे अडीच-तीन तासांच्या प्रवासानंतर फलटणला पोचली. रामकाकाचा बंगला थोडासा गावाबाहेर होता. आजूबाजूला सगळं उसाचं शेत. रघूला हे गाव आवडलं. रामकाकाच्या घरी आगत-स्वागत झालं. आनंद आणि राम हे दोन मित्र दीर्घकाळानं भेटत होते. त्यामुळं त्यांच्या गप्पा लगेच रंगल्या. रामकाकाचा मुलगा स्वानंद रघूच्याच वयाचा होता. रघूनं त्याला आपला रोबो दाखवला. स्वानंद तो रोबो बघून भयंकर खूश झाला. रघू आणि सगळे आता रामकाकाकडं दोन दिवस राहणार होते. संध्याकाळी सगळे गावात रामाच्या दर्शनाला गेले. ते सुंदर मंदिर, रामकाकाच्या शेतातली विहीर, तिथं पोहणारे स्वानंदचे मित्र, तिथली पेरूची बाग हे सगळं बघून रघू एकदम खूश झाला.
रात्रीचं जेवण बंगल्यासमोरच्या अंगणात होतं. दिवाळी संपल्यानंतर असते तशी किंचित थंडी हवेत होती. मात्र, आजूबाजूला शेती असल्यानं आणि त्यात कालव्याचं पाणी खेळवलेलं असल्यानं थंडी नेहमीपेक्षा इथं जरा जास्त वाजत होती, हेही रघूला जाणवलं. रात्रीच्या जेवणात पिठलं-भाकरीचा बेत होता. दिवाळीत खूप गोड खाऊन सगळ्यांचीच तोंडं काही तरी खमंग खायला आतुरली होती. सोबत शेतातून आणलेला कच्चा कांदा, गाजर, मुळा, काकडी असं सगळं सॅलड होतं. सगळे जेवता जेवता गप्पा मारत होते. रघू स्वानंदशी बोलत असला तरी त्याचं सगळं लक्ष मोठ्यांच्या बोलण्याकडं होतं. रामकाका सांगत होते, की आता खेड्यात शेती करत राहणं कसं परवडत नाही, सगळे तरुण कसे शहराच्या दिशेनं धाव घेतात, खेड्यात अजूनही पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत म्हणाव्यात अशा सुविधा फार नाहीत वगैरे वगैरे. नंतर नंतर तर गाडी राजकारणावर घसरली तेव्हा तर त्या सगळ्या गोष्टी रघूच्या डोक्यावरूनच गेल्या…
रघूला सगळंच समजलं नसलं, तरी इकडं सगळं काही आलबेल नाही, एवढं त्याच्या लक्षात आलं. स्वानंदशी बोलतानाही काही गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. आपल्या शहरात असलेल्या अनेक सुखसुविधा इकडं नाहीत, हे त्याच्या लक्षात आलं. ऑनलाइन फूड मागवणं किंवा मोठे मॉल किंवा मल्टिप्लेक्स अशा गोष्टी तर इथं नाहीत, पण इंटरनेटलाही चांगला वेग नाही. स्मार्टफोन मात्र प्रत्येकाकडं होता. अगदी स्वानंदकडंही लेटेस्ट मॉडेलचा, चांगल्या ब्रँडचा फोन होता. गावात काही अत्याधुनिक कार किंवा एसयूव्हीही त्यानं पाहिल्या. मात्र, त्याच वेळी अगदी झोपडीसारखी म्हणावीत, अशा साध्या घरांतून राहणारी माणसंही त्यानं तिथं पाहिली. उघडी गटारं दिसली. रस्त्यात फतकल मारून बसलेली गुरं, रस्त्याच्या कडेला अस्वच्छता, गुटखा खाऊन रंगलेल्या टपऱ्या हेही दिसलं. यातल्या काही गोष्टी त्याला शहरातही दिसत होत्याच. 
रात्री जेवणं झाल्यावर सगळे त्याच अंगणात शतपावली करायला लागले, तेव्हा त्यानं बाबांना हे विचारलं. तेव्हा बाबा हसून म्हणाले, ‘तुला हे सगळं दिसतंय आणि जाणवतंय हे खूप चांगलंय बाळा…’ पण बाबांच्या या कौतुकानं रघूचं काही समाधान झालं नाही. त्यानं मामालाही हेच विचारलं. मामा म्हणाला, ‘रघू, एक सांग. तू उद्या शिकून मोठा झालास की काय करणार? माझ्यासारखंच अमेरिकेत किंवा इंग्लंडला जाणार आणि तिकडंच राहणार ना?’ रघूला काय उत्तर द्यावं कळेना. मग त्यानं स्वानंदला विचारलं, की तू पुढं मोठा होऊन काय करणार? त्यावर स्वानंदचं उत्तर ठरलेलं होतं, तो म्हणाला, ‘कुठंही जाईन, पण इथं नक्कीच राहणार नाही. इथं आमचं घर आहे, चांगला बंगला आहे, पण हळूहळू सगळेच शहराकडं निघालेत. साधं शेतीला पाणी द्यायचं तर इथं आठ-आठ तास वीज नसते. तरी आमचं तालुक्याचं ठिकाण आहे, म्हणून बरं आहे. जरा इथून आठ-दहा किलोमीटवरच्या छोट्या गावांत जा. तिथं याहून भयंकर परिस्थिती दिसेल.’
स्वानंदचं हे बोलणं ऐकून रघू विचारात पडला. आपल्याकडं येणारी भाजी, धान्यं अशा सगळ्या लहान-मोठ्या गोष्टी अशा लहान गावांतील शेतकऱ्यांकडूनच तर येतात. आपण ऑनलाइन खरेदी करतो, पण आपल्या शहराशेजारीच असलेल्या गावात फारसं कधी जात नाही. या विचारानं रघूच्या मनाचा ताबा घेतला. रघूला अचानक त्या ‘रोबो’ची आठवण झाली. स्वानंदनं आल्या आल्या खूप कुतूहलानं त्याच्याविषयी रघूला विचारलं होतं. रघूच्या मनात एक कल्पना आली. त्यानं मनातल्या मनात काही गोष्टी ठरवल्या. तो पुन्हा मामाजवळ गेला. मामा आता रामकाकाशी बोलत होता. तरी त्यानं मामाला बाजूला बोलावून त्याच्या कानात काही गोष्टी सांगितल्या. मामा समाधानानं हसला.
दुसऱ्या दिवशी परत पुण्याला निघायचं होतं. खरं तर रामकाकाचं घर आणि तो सगळाच परिसर रघूला एवढा आवडला होता, की पुन्हा लवकरच स्वानंदकडं राहायला यायचं असं त्यानं मनोमन ठरवून टाकलं होतं. आनंदमामा, रघूचे आई-बाबा आणि रघू गाडीत बसले. रामकाका, काकू, स्वानंद आणि त्यांचं सगळं कुटुंब त्यांना ‘टाटा बाय बाय’ करायला मुख्य रस्त्यापर्यंत आलं. अगदी निघताना रघूनं स्वानंदच्या हातात एक बॉक्स ठेवला. नंतर उघड, असं सांगून ते सगळे पुढं निघाले.
स्वानंदची उत्सुकता शिगेला पोचलो होती. तो पळतच घरात शिरला आणि त्यानं तो बॉक्स उघडला. बघतो तो काय, त्यात रघूचा ‘पोपटराव’ हा रोबो होता. सोबत तो रोबो कसा वापरायचा याच्या सगळ्या सूचना लिहून प्रिंटआउट काढून ठेवल्या होत्या. स्वानंदला लक्षात आलं, की आपण या रोबोच्या मदतीनं पुष्कळ गोष्टी करू शकतो. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विहिरीवरचा पंप इथून चालू-बंद करता येईल. त्यासाठी त्याच्या वडिलांना रात्रीचं अंधारात लांब-वर जायची गरज नाही. शिवाय वीजपुरवठा, इंटरनेटचा स्पीड इ. गोष्टींसाठी काय काय करायचं याचीही लिस्ट सोबत होती. स्वानंदला कळलं, की आपण एक सोशल मीडिया अकाउंट काढून संबंधित यंत्रणेपर्यंत आपल्या तक्रारी थेट पोचवू शकतो. त्यासाठी या रोबोचीही मदत होईलच. आपण नुसतं बोललं तरी हा सगळं टाइप करून देतो. शाळेतले अवघड विषय शिकण्यासाठीही ‘पोपटराव’ची मदत होईल.
हे सगळं बघितल्यावर तर रामकाका खूश झालेच, पण काकूही लगेच रामाच्या देवळात पेढे ठेवायला गेल्या. देवळातला रामराया आपल्याकडं बघून मंद हसतोय, असा भास स्वानंदच्या आईला झाला. इकडं रघूची कार पुण्याच्या दिशेनं भरधाव निघाली होती. मागच्या सीटवर बसून रघू आनंदमामाकडं बघून समजुतीनं हसत होता. मामाही त्याला जवळ घेऊन थोपटत होता… जाताना रघू नुसता रघू होता, येताना तो ‘रघू २.०’ झाला होता… रस्त्याकडेची हिरवीगार पिकं आनंदानं वाऱ्यावर डुलत होती…

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स (पुणे) दिवाळी अंक, २०२४)

---

27 Nov 2024

मनशक्ती दिवाळी अंक २०२४ लेख

यश म्हणजे नक्की काय असतं?
-------------------------------------

आयुष्यात आपण मोठं झालं पाहिजे, यश मिळवलं पाहिजे असं जन्माला आल्यापासून आपण सतत ऐकत आहोत. यश मिळवायचं म्हणजे नक्की काय करायचं, असा प्रश्न पडायच्या आतच त्या प्रश्नाची उत्तरं आपल्यासमोर तयार ठेवण्यात आली होती. परीक्षेत चांगले मार्क मिळवून पास व्हायचं हे एक प्रकारचं यश असायचं. त्यातून तुम्ही सहज पुढं गेलात तर आणखी कठीण आव्हानं तयार असायची. मग नुसतं पास होऊन चालायचं नाही तर पहिल्या तीन नंबरांत तुम्ही पास व्हायला पाहिजे असायचं. त्यातून तुम्ही कधी दुसरे किंवा तिसरे आलात तर पहिल्या नंबरचं उद्दिष्ट तातडीनं समोर ठेवलं जायचं. आयुष्यात पहिला नंबर मिळवून सातत्यानं पास झालात तर पुढच्या कठीण परीक्षाही लगेच तयार असायच्या. आता तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनीअर होऊन दाखवायचं असतं. त्यासाठी पुन्हा तुमच्या राज्यातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये नंबर मिळवून दाखवणं हेही तुमच्या यशाचं एक माप असायचं. ती कसोटी पार केलीत की मग पुढं उत्तम नोकरी मिळवणं, ‘चांगली’ बायको (किंवा नवरा) मिळवणं, मग आजी-आजोबांना नातवंडं मिळवून देणं, नोकरीत सतत चांगल्या ग्रेड मिळवत राहणं, खाली मान घालून काम करणं, नेटका संसार करणं या सगळ्या क्रमाक्रमानं येणाऱ्या ‘यशा’च्या पायऱ्या असायच्या. तुम्ही एक पायरी चढलात, की पुढची तयारच असते. आता नक्की काय केलं म्हणजे आपण सर्वोच्च यश मिळवलं असं सगळे म्हणतील, असं कित्येकदा वाटून जातं. या ऐहिक किंवा भौतिक यशाच्या मोजमापाला काही मर्यादा नाही. ते कितीही मिळवा, त्याहून अधिक मिळवणारा कुणी तरी असतोच. शिवाय आपल्याकडं सगळ्या यशाचं मोजमाप हे इतरांशी तुलनेनं चालतं. ‘भला उस की कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?’ हा तर त्या तुलनेचा मुख्य आधार. मग ते सर्वोच्च म्हणवलं जाणारं यश मिळणार तरी कसं?
यश नक्की कशाला म्हणायचं असा प्रश्न पडेपर्यंत आपलं निम्मं आयुष्य सरलेलं असतं. आयुष्यात स्थिरस्थावर होण्याची लढाई संपली, की मग आपल्याला जरा स्वत:बद्दल विचार करण्याची उसंत मिळते. तेव्हा लक्षात येतं, की आपण एवढे दिवस ज्या कथित यशासाठी राबत होतो, ते यश खरंच आपल्याला साध्य करायचं होतं का? की आपण एवढे दिवस कुणा दुसऱ्याच्याच स्वप्नांच्या यादीसाठी स्वत:चा जीव कष्टवत होतो? आपल्याला आयुष्यात जे करायचं होतं, ते आपण करतो आहोत का? आपल्याला ज्या गोष्टी करण्यात आनंद वाटतो, त्या आपण करतो का? जरा विचार केल्यावर आणि आजूबाजूला नजर टाकल्यावर आपल्या असं लक्षात येतं, की केवळ आपणच नव्हे, तर आपल्या पिढीतले बहुसंख्य तरुण आपल्यासारखंच तर करत आले आहेत! ही ‘मेंढरांच्या कळपा’ची मानसिकता हे आपलं व्यवच्छेदक लक्षण. सगळे इंजिनीअरिंगला जात आहेत ना, मग आपणही तिकडंच जायचं. सगळे डॉक्टर होताहेत तर मग आपणही तीच वाट निवडायची. यात धोका नाही. वाट मळलेली आहे. आपण फक्त पुढच्या मेंढरामागं चालत राहायचं. डोळ्यांना परंपरेची, रुढीची, स्वतंत्र विचार न करण्याची अदृश्य झापडं लावलेली असतातच. त्यामुळं इकडं-तिकडं बघायचं काही कारणही उरत नाही. एखाद्याला चुकून वाटलं, की आपल्याला चित्रकलेत रस आहे, तर तो रस मारून टाकण्याकडं आपला सगळ्यांचाच कल. समाजानं मान्य केलेल्या चौकटीत मिळालेलं यश तेच ‘यश’ असतं, असंच आपल्यावर लहानपणापासून बिंबवलं जातं. आपण वेगळा विचार करण्याची थोडी फार शक्यताही त्यातून नष्ट होते. मी स्वत: दहावीनंतर इंजिनीअरिंगला जाऊन, अपयशाच्या थपडा खाऊन शहाणा झालेला एक विद्यार्थी आहे. आपल्याला भाषा विषयात गती आहे, आपण वृत्तपत्रात, माध्यमात लेखनाचं काम करून यश मिळवू शकतो, हे कळेपर्यंत तारुण्यातली महत्त्वाची तीन-चार वर्षं गेली. अर्थात ती ‘वाया गेली’ असं मी म्हणणार नाही. याचं कारण शिकण्याची प्रक्रिया सुरू होतीच. त्यावर परीक्षेतील गुणांचं वा प्रमाणपत्राचं शिक्कामोर्तब झालं नाही इतकंच. अनेक थोर-मोठे कलावंत लौकिक अर्थानं फार शिकलेले नव्हते. परिस्थितीमुळं त्यांना शिक्षण सोडावं लागलं किंवा नीट घेता आलं नाही. मात्र, पुढं त्यांच्या कर्तृत्वात त्यामुळं कुठेही उणेपणा आला नाही. गानसम्राज्ञी लता मंगेशकर किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ही अगदी सर्वांना माहिती असलेली उदाहरणं. या दोघांनीही जेमतेम प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण घेतलं होतं. मात्र, लतादीदी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात एवढ्या उत्तुंग स्थानी गेल्या, की ते स्थान गाठणं इतरांना जवळपास अशक्य व्हावं. तीच गोष्ट वसंतदादांची. दादांकडं शाळेचं प्रमाणपत्र नसेलही; मात्र, जगण्यातून ते जे शिकले होते, ते कित्येकांना पदवी घेऊनही समजलं नसतं. खेड्यापाड्यांतील माणसांची वेदना, दु:ख जाणणारा असा हा मुख्यमंत्री होता. राजभवनाचं ऐश्वर्य मिळालं, तरी भाजी-भाकरी गोड मानून खाणारा मातीतला नेता होता. मग यांनी जे ‘यश’ मिळवलं ते कसं मोजायचं? सचिन तेंडुलकरचं उदाहरणही महत्त्वाचं. रूढार्थानं बारावी पण उत्तीर्ण नाही. मात्र, त्याच्या क्षेत्रात त्यानं एवढं यश मिळवलं, की त्याचं यश हीच एक दंतकथा झाली. बारावी किंवा त्याआधीच्या वर्गांना त्याचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा लागला. ‘यश’ या शब्दाची व्याख्याच बदलावी लागेल, एवढं उदंड यश मिळवलं. ‘मायक्रोसॉफ्ट’चं साम्राज्य उभं करणाऱ्या बिल गेट्सची कथाही अशीच. थोर गायक पं. भीमसेन जोशींची कहाणी पण तशीच. किती तरी उदाहरणं आहेत. शाळेतलं किंवा मार्कांचं यश हा नेहमीचा मापदंड ओलांडून ही माणसं पुढं गेली. त्यांनी रूढ यशाच्या चौकटी लांघल्या. आपले स्वत:चे मानदंड प्रस्थापित केले.
याशिवाय प्रयत्नपूर्वक चौकट मोडून वेगळं काही तरी करून धजणारे, त्यासाठी अविरत कष्ट करणारे, त्याची किंमत मोजणारे असे किती तरी लोक आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातला प्रत्येक जण प्रसिद्ध होऊ शकतो असं नाही. पण माझ्या मते, असा प्रत्येक माणूस हा सेलिब्रेटीच आहे. आपल्याकडं ५०-६० वर्षांपूर्वी किंवा अगदी ३०-४० वर्षांपूर्वी जी शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती होती, त्या तुलनेत आता काळ थोडा बदलला आहे. आता निदान मुलांना त्यांच्या आवडी-निवडी समजतात. कल चाचणी असते. त्यानुसार अभ्यासक्रम निवडता येतो तरी. शिवाय आता पालकही पुरेसे जागरूक झाले आहेत. मुलांना एखाद्या क्षेत्रात गती नसेल तर तिकडं त्याला पाठवू नये एवढा विचार तरी ते नक्कीच करतात. ‘तुला हवं ते कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,’ असं म्हणणाऱ्या पालकांची संख्या वाढते आहे. निदान शहरांत तरी असे पालक दिसताहेत ही जमेची बाजू आहे. किमान चौकट मोडता येणं, ही भावी यशाची नांदी असू शकते. आपल्या चौकटबद्ध, चाकोरीबद्ध, पारंपरिक विचारांमुळं आपण किती तरी वेगळ्या, अज्ञात वाटा धुंडाळण्याविना राहिलो. किती तरी ज्ञानशाखा आपल्याला ठाऊकच झाल्या नाहीत. आता ही सगळी वाट खुली होताना दिसते आहे. दार निदान किलकिलं झालं आहे. पायवाट दिसते आहे, तिचा लवकरच महामार्गही होईल. त्यामुळे यशाच्याही नवनव्या व्याख्या तयार होतील. आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे, तो किती मोलाचा आहे, याची जाण होणंही महत्त्वाचं. त्यामुळं आपण जन्माला आलो आहोत ते काही तरी करून दाखवण्यासाठी अशी एक जिद्द मनात तयार होते. निदान तयार व्हायला पाहिजे. आपलं जगणं कायम उदात्त आणि उन्नत असायला पाहिजे, याची खूणगाठ मनाशी बांधता येते. आपल्या जगण्यातून आजूबाजूच्या चार लोकांचं भलं कसं होईल, याचा विचार सुरू होतो. आतापर्यंत जगात विज्ञानानं जी प्रगती केली, शास्त्रज्ञांनी जे मोठमोठे शोध लावले त्यामागे हाच मूलभूत विचार आहे. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ हे जसं खरं आहे, तसंच ‘जगाच्या कल्याणा शास्त्रज्ञांच्या विभूती’ हेही तितकंच खरं आहे. विशेषत: मध्ययुगापासून गेली चार-पाच शतकं माणसाच्या इतिहासात जी क्रांती घडली, त्यामुळं आपलं अवघं जीवनच बदलून गेलं आहे. या क्रांतीच्या मुळाशी हाच अभ्यास होता, हाच ध्यास होता. त्यामुळं एकेका शोधामुळं मानवी जीवनानं प्रगतीचा एकेक पुढचा टप्पा गाठला. मोठी मजल मारली. विविध औषधांचे शोध असोत, किंवा तंत्रज्ञानातील प्रगतीचे अद्भुत आविष्कार असोत; या प्रत्येक शोधामुळं आपलं जीवन आणखी सुकर, आणखी सुखकर झालं आहे. मानवी कल्याणासाठी केल्या गेलेल्या या प्रत्येक गोष्टीला आपण यश म्हटलं, तर या यशाचं परिमाणही फार वेगळं व उच्च असेल.
यशाच्या फूटपट्ट्या अनेक आहेत. माझ्या मते, माणसाच्या जगण्यातील मूलभूत मूल्यांचा आदर राखून मिळवलेलं यश हे अधिक उजवं मानायला हवं. उदा. प्रामाणिकपणा, सचोटी, मेहनत, जिद्द हे गुण आणि सामाजिक समानता, भिन्नलिंगी व्यक्तीवषयी आदर, देशाप्रति निष्ठा, आपल्या कामावरील प्रेम, समाजाचे नियम पाळण्याची असोशी ही मूल्यं यांचं पालन करून मिळवलेलं यश खरोखर सुवर्णयश मानायला हवं. आपण वरील गुणांचं व मूल्यांचं पालन करून यश मिळवलं आहे का, हे जाणण्याची छोटी कसोटी आहे. यश मिळाल्यावरही आपल्या अंगी विनम्रता कायम असेल किंवा आपले पाय जमिनीवर असतील तर आपण ही कसोटी उत्तीर्ण झालो, असं खुशाल समजावं.
हे जग अतिशय विशाल आणि वैविध्यानं भरलेलं आहे. आपल्याला ते जेवढं उमजत जाईल, तेवढे आपण विनम्र होत जाऊ. आपल्याआधी या जगात किती तरी थोर माणसांनी केवढे तरी महान पराक्रम करून ठेवले आहेत. आपल्याला त्याची नुसती जाणीव असणंही पुरेसं आहे.

 तुम्ही कधी रायगडावर गेला आहात का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेथील पुतळ्यासमोर आपण काही क्षण उभे राहिलो, तरी डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. राजांचं अवघं जगणं त्या अश्रूधारांत प्रतिबिंबित होत असतं. आपल्या सर्वांसाठी महाराजांनी काय काय करून ठेवलं आहे, याची नुसती उजळणी केली तरी आपली छाती अपार कृतज्ञतेनं भरून येते. अवघ्या पन्नास वर्षांच्या जीवनात महाराजांनी यशाचे एकेक मानदंड स्वत: प्रस्थापित केले. असा युगपुरुष हजारो वर्षांतून एकदाच जन्माला येतो. अर्थात म्हणूनच त्यांना युगपुरुष म्हणतात.
महाराजांचे समकालीन म्हणावेत असा ज्येष्ठ शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन किंवा महान शास्र्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन किंवा जेम्स वॅट किंवा लुई पाश्चर किंवा मार्कोनी किंवा जगदीशचंद्र बोस यांचाही मी विचार करतो, तेव्हा माझं मन कृतज्ञतेनं असंच भरून येतं. या मंडळींनी मूलभूत स्वरूपाचे असे शोध लावले नसते तर आपण आज कसलं आयुष्य जगत असतो कुणास ठाऊक. हीच गोष्ट महात्मा गांधी किंवा डॉ. आंबेडकर किंवा सावरकर यांच्याविषयी म्हणता येईल. या सर्व महान विभूतींनी त्यांच्या आयुष्यात जे काही केलं, जे काही मिळवलं त्याला निर्विवाद यश म्हणता येईल. ही यशाची एक वेगळीच व्याख्या होऊ शकते.
या सर्वांच्या जगण्यातलं एक समान सार काढलं, तर एक लक्षात येईल, की या सर्वांनी केवळ स्वत:चा विचार केला नाही. त्यांनी संपूर्ण समाजाचा, किंबहुना सर्व मानवजातीचा विचार केला. त्यामुळंच त्यांच्या हातून एक किंवा अनेक अलौकिक गोष्टी होऊ शकल्या.
आपल्याकडं मोठी संतपरंपरा आहे. संत म्हटलं, की त्यांच्याविषयी आपल्या मनात एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. आपल्यासारख्या सामान्य संसारी माणसांशी त्यांची तुलना होऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं. ते काहीसं खरं असलं, तरी पूर्णांशांनं खरं नाही. संत म्हणजे आपल्यासारखीच हाडामासांची माणसं होती. संत तुकाराम महाराज तर संसारी गृहस्थ होते. मात्र, त्यांनी विठ्ठलभक्तीचा ध्यास घेतला आणि त्यातून त्यांच्या हातून गाथेसारखी अजरामर रचना निर्माण झाली. मात्र, या संतांकडून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांची त्यांच्या श्रद्धास्थानावर असलेली प्रचंड भक्ती आणि ऐहिकाबाबत असलेली विरक्ती. आपल्याला आपल्या साध्या जगण्यात या दोन गोष्टी जरी साध्य करता आल्या, तरी आपण मोठं ‘यश’ मिळवलं असं म्हणता येईल. भौतिक सुखाची आसक्ती आणि ते मिळविण्याची सक्ती हाच आपल्या आयुष्यातला कार्यकारणभाव असला तरी एका मर्यादेनंतर आपल्याला या ऐहिक गोष्टींबाबत विरक्ती अंगी बाणवता आली पाहिजे. ‘सगळ्यांत असूनही कशात नसल्याची अवस्था’ गाठली आणि सोपे मोह टाळले तर आपलं सगळ्यांचंच आयुष्य अतिशय सहजपणे सुखी होऊन जाईल.
या सर्व कथनामागचा खटाटोप एवढाच, की यश ही संकल्पना सापेक्ष असली तरी आपल्यापुरतं आपल्याला तिचं गमक सापडलं तरी पुरे. हे गमक कशात आहे? आपल्या आयुष्याचं, आपल्या जन्माचं प्रयोजन आपल्याला समजलं पाहिजे. प्रत्येक जण काही तरी थोर कार्य करायलाच जन्माला आलेला असतो असं नाही, हे मान्यच! मात्र, आपल्या वाट्याला जे काही काम आलं आहे ते नेटकेपणानं, प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीनं करणं म्हणजेसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अनेकदा हीच गोष्ट अनेकांकडून होताना दिसत नाही, म्हणून अनेक समस्या निर्माण होत आहेत. आपल्यासमोर लहानपणापासून ज्या ‘यशा’चं गाजर ठेवलं जातं, त्या यश नावाच्या मृगजळाच्या मागं उरस्फोड करीत धावण्यातून काहीही साध्य होत नाही. याउलट आपल्याला जगण्याचं प्रयोजन सापडलं, की त्यातून होणारी प्रत्येक कृती आनंददायी होते आणि यश आपोआप मागून येत राहतं. उदाहरण द्यायचं झालं, तर डॉ. प्रकाश आमटे व मंदा आमटे असोत, किंवा डॉ. अभय बंग – डॉ. राणी बंग असोत… जगण्याचं प्रयोजन सापडलेली ही माणसं आहेत. त्यांच्या जीवनाशी आपलं जगणं ताडून बघितलं तरी कळेल, की ‘यश’ या संकल्पनेचं नक्की काय करायचं ते… या मंथनातून आपल्याला आपलं जगणं थोडं अधिक समृद्ध करता आलं, थोडं अधिक आनंददायी करता आलं, तरी ते आपल्या पातळीवरचं, लहानसं का होईना, पण यशच असेल!

----

(पूर्वप्रसिद्धी : मनशक्ती दिवाळी अंक, २०२४)

---