12 Sept 2025

दिलीप प्रभावळकर - मटा मुलाखत

‘आस्वादक व्हा; रसरशीत जगा’
-------------------------------------

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उद्या, सोमवारी  (४ ऑगस्ट) वयाची ८१ वर्षे पूर्ण करत आहेत. प्रभावळकर याही वयात अतिशय व्यग्र आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेला मराठी सिनेमा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. याशिवाय ‘पत्रापत्री’ हा अभिनव नाट्यप्रयोग ते विजय केंकरे यांच्यासह सादर करतात, त्याचेही प्रयोग सुरू आहेत. याशिवाय वाचन, आवडीची जुनी हिंदी गाणी ऐकणं, क्रिकेट सामने पाहणं हे सर्व जोडीने सुरू आहेच. प्रभावळकर अतिशय सकारात्मक नजरेने आयुष्याकडं पाहतात. अनेक गोष्टींमध्ये असलेली रुची आपल्याला ताजीतवानी ठेवते, असं त्यांना वाटतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी श्रीपाद ब्रह्मे यांनी केलेली ही विशेष बातचीत...


सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त तुमचं अभीष्टचिंतन व ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... तुमचा नवा मराठी चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. यातल्या तुमच्या भूमिकेविषयी सांगा.

दिलीप प्रभावळकर : वय हा केवळ एक टप्पा आहे, असं मी मानतो. यात माझं काही फार कर्तृत्व आहे, असं नाही. मात्र, मी अलीकडंच जो नवा सिनेमा केला, त्यातली भूमिका निश्चितच माझ्या वयाच्या मानाने दमवणारी, आव्हानात्मक होती. ‘दशावतार’ असं या सिनेमाचं नाव आहे. यात मी दशावतारी मंडळींत काम करणाऱ्या ‘बाबुली’ नावाच्या कलाकाराची भूमिका केली आहे. यात त्याचा संघर्ष तर आहेच; शिवाय त्याचे दशावतारातले कामही आहे. त्यात तो ज्या वेगवेगळ्या भूमिका करत असतो, त्या मला साकाराव्या लागल्या. आम्ही कोकणात तब्बल ५० दिवस याचं चित्रीकरण केलं. कोकणातला आतापर्यंत कधीही न दिसलेला निसर्ग, तिथली जंगलं, गावं असं सारं काही यात आहे. सुबोध खानोलकर या तरुणानं हा सिनेमा लिहिला आहे आणि दिग्दर्शितही केला आहे. सुबोधसह सुजय हांडे, ओंकार काटे हे निर्माते आहेत. माझ्यासोबत सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, महेश मांजरेकर, भरत जाधव, सुनील तावडे, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, आरती वडगबाळकर असे बरेच कलाकार आहेत. या चित्रपटासाठी मी आधी दशावतारी खेळ पाहिले. त्यातल्या कलाकारांना भेटलो. आता कोकणातही ही कला फारशी बघायला मिळत नाही. मात्र, या सिनेमामुळं मला या अस्तंगत होत चाललेल्या कलेची व त्यातल्या एका कलाकाराची व्यथा प्रातिनिधिक स्वरूपात दाखवता आली याचा आनंद आहे.

ज्या भूमिकेची एवढी वर्षं वाट पाहिली, ती भूमिका अखेर करायला मिळाली, असं वाटलं का?

दिलीप प्रभावळकर : हो. ही भूमिका निश्चितच आव्हानात्मक होती. मात्र, याही आधी मी अशा काही भूमिका साकारल्या आहेत. ‘हसवाफसवी’तला कृष्णराव हेरंबकर किंवा ‘साळसूद’ मालिकेतला खलनायक किंवा ‘नातीगोती’मधला काटदरे ही सारी पात्रं साकारण्यासाठी आव्हानात्मक होती. ‘हसवाफसवी’तली इतरं पाच पात्रं अर्कचित्रात्मक होती, मात्र ‘कृष्णराव’ ही भूमिका अगदी ‘मानवी’ होती. एरवी आम्ही कलाकार भूमिका साकारताना अलिप्त असतो. मात्र, ‘कृष्णराव’ साकारताना क्वचित ती भूमिका आणि वैयक्तिक मी यांतलं द्वैत मिटून गेलं, असा अनुभव मला काही वेळा आला आहे. ‘काटदरे’ या भूमिकेतही असा अनुभव आला आहे. याशिवाय ‘अलबत्या गलबत्या’मधली चेटकीण असो की ‘रात्र-आरंभ’मधली स्किझोफ्रेनिक माणसाची अंगावर काटा आणणारी भूमिका असो; या सगळ्याच तशा आव्हानात्मकच होत्या. पण ‘दशावतार’मधील सर्वांत जास्त. तुमची शारीरिक, मानसिक, भावनिक कस पाहणारी ही भूमिका होती. मला वाटतं, एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला अनेक गोष्टींत असलेली रुची या भूमिका साकारताना मदतीला येत असावी. लता मंगेशकरांची गाणी ऐकताना त्यातली भावनांची अद्भुत अभिव्यक्ती मला सतत खुणावते. अगदी क्रिकेट पाहतानाही मला त्यातून काही तरी मिळतं. माझ्यातल्या लेखकाला अनेक पात्रं लिहिताना या सर्व अतिरिक्त आवडी-निवडींचा, विविध रसांच्या आस्वादनाचा फायदा झालेला आहे.

या सर्व काळात तुमच्यावर कोणत्या व्यक्तीचा, अभिनेत्याचा किंवा दिग्दर्शकाचा सर्वाधिक प्रभाव पडला, असं तुम्हाला वाटतं?

दिलीप प्रभावळकर : माझ्यावर पु. ल. देशपांडे यांचा बराच प्रभाव आहे, असं मला वाटतं. मीच काय, आमच्या सर्व पिढीवरच तो प्रभाव होता. पुढील पिढ्यांपर्यंत तो कायम राहिला. पुलंची ‘बटाट्याची चाळ’ हे सर्वोत्कृष्ट गद्य विडंबन आहे, असं मला वाटतं. त्यांचं लेखन, त्यांचे नाट्यप्रयोग, त्यांचे एकपात्री प्रयोग पाहत आम्ही मोठे झालो. त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मला त्यांनी लिहिलेल्या लेखांमधले उतारेच्या उतारे आठवत होते. पुलंमधला ‘परफॉर्मर’ही अतिशय आवडणारा, लोभस असा आहे. पुलंव्यतिरिक्त चार्ली चॅप्लिनचाही प्रभाव आहे, असं म्हणता येईल. त्याचे सर्व मूकपट तेव्हा पाहिले होते. नंतर आलेल्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ या बोलपटासह त्याचे सर्वच सिनेमे काही ना काही शिकवून गेले. जागतिक रंगभूमीचा मी अगदी अभ्यास वगैरे केला नाहीय, पण ब्रॉडवेवर किंवा स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन (शेक्सपिअरचं गाव) इथं रंगभूमीवरील सहकलाकारांसोबत नाटकं निश्चितच पाहिली. भरत दाभोळकरसोबत इंग्लिश रंगभूमीवर काही काळ काम केलं, तेव्हा त्या अनुभवाचा फायदा झाला. बाकी इतर भारतीय भाषांतली रंगभूमी पाहायची मात्र राहून गेली.

तुमच्यातला अभिनेता आणि लेखक यांच्यातला तोल कसा साधता? मुळात लेखक कसे झालात?

दिलीप प्रभावळकर : मला जे काही अभिव्यक्त व्हायचं असेल तर मी ते माझ्या भूमिकांमधून होऊ शकतो आणि लेखनातूनही होऊ शकतो. त्या दृष्टीने लिहीत राहणं मला महत्त्वाचं वाटतं. मी हे नेहमी सांगत आलोय, की मला चांगली संधी देणारी माणसं भेटत गेली. मी रुईया महाविद्यालयात असताना भित्तिपत्रकांसाठी लेखन करायचो. त्यानंतर एकदा आनंद अंतरकरांना ‘नाटक’ नावाची कथा दिली. ती प्रसिद्ध होईल का, हेही माहिती नव्हते. मात्र, त्यांनी ती ‘मोहिनी’ दिवाळी अंकात प्रसिद्ध केली. अंतरकरांनी माझा लेखनाचा आत्मविश्वास वाढवला. त्या काळात त्यांनी मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ‘षटकार’मध्ये मी ‘गुगली’ हे सदर चालवलं ते निखिल वागळे यांच्या आग्रहामुळे. मला अजिबात आत्मविश्वास नव्हता, की मी असं काही सदर वगैरे लिहू शकेन; मात्र, वागळेंना होता. नंतर वृत्तपत्रांत साप्ताहिक सदरंही चालविली. पुढं त्याची पुस्तकं झाली. ‘गंगाधर टिपरे’सारखी मालिकाही आली. मुंबई आकाशवाणीवरच्या माधव कुलकर्णींनी मला मुलांसाठी श्रुतिका लिहायला सांगितली. त्यातून ‘बोक्या सातबंडे’ची निर्मिती झाली. पुढे ‘राजहंस’ने त्याची पुस्तकं आणली. पुस्तकांसाठी त्या कथा नव्याने लिहिल्या. त्या पुस्तकांच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या निघाल्या, एवढा ‘बोक्या’ लोकप्रिय झाला. त्यावर पुढे मराठी चित्रपटही आला.

प्रश्न - एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून तुम्ही अतिशय समृद्ध आयुष्य जगलात. कुठलाही माणूस आपलं आयुष्य असं रसरशीतपणे जगू शकतो. त्यासाठी त्यानं काय करायला हवं?

दिलीप प्रभावळकर : मी कलाकार म्हणून किंवा सर्वसामान्य माणूस म्हणूनही जगताना एका आस्वादकाच्या भूमिकेतून जगलो. तुम्हाला जगण्यातल्या निरनिराळ्या पैलूंमध्ये रुची हवी. कुतूहल हवं. मला जुन्या हिंदी गाण्यांची आवड आहे. मी साठ-सत्तरच्या दशकांतली हिंदी गाणी कितीही वेळ ऐकू शकतो. मला क्रिकेटमध्ये - त्यातही कसोटी, आयपीएलशी माझी जरा खुन्नस आहे - अतिशय रुची आहे. मी क्रिकेटवर, खेळाडूंवर भरपूर लिहिलंही आहे. मी नवनव्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अलीकडंच मी सोशल मीडियावर माझं अकाउंट सुरू केलं आहे. खरं तर मला त्यातलं तांत्रिक फारसं काही कळत नाही. मात्र, अलीकडच्या काळात जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचं ते प्रभावी साधन आहे, यात शंका नाही. त्यामुळं मी आता तेही करून पाहतो आहे. एकूण आयुष्याकडं आस्वादकाच्या दृष्टीतून पाहिलं आणि तसंच रसरशीतपणे जगलं तर एकूण माणसाचं जगणं आनंददायी होऊ शकेल, असं मला वाटतं. 

---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी, ३ ऑगस्ट २०२५)

---