23 Sept 2013

फर्स्ट डे फर्स्ट शो - द लंचबॉक्स


प्रेमाचं (अन् बुद्धीचंही) खाद्य...

---------------------------------------




'द लंचबॉक्स' या रितेश बत्रा दिग्दर्शित नव्या हिंदी सिनेमाची टॅगलाइन आहे - 'लव्हस्टोरी ऑफ द पीपल हू नेव्हर मेट...' नेमके शब्द हेच आहेत का, माहिती नाही, पण अशीच काही तरी ती टॅगलाइन आहे. प्रेम म्हणजे काय, ते कसं होतं, कुणाबरोबर होतं, त्यासाठी माणूस प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसण्याची गरज आहे का, तसं माणूस डोळ्यासमोर दिसत नसेल, तर जे काही होतं त्याला प्रेम म्हणायचं की आणखी काही, मग माणूस डोळ्यांसमोर असताना त्यांच्यासोबत होतं ते काय अशा अनेक बेसिक प्रश्नांना 'लंचबॉक्स' हात घालतो. विशेषतः हल्ली फेसबुक, व्हॉट्सअपच्या आणि चॅटिंगच्या आभासी जगात अर्ध्याहून अधिक जग डुंबत असताना तर हे प्रश्न अधिकच सयुक्त (रिलेव्हंट) वाटतात. 'लंचबॉक्स'चं कौतुक अशासाठी, की तो हे सगळे प्रश्न एका छानशा गोष्टीच्या वेष्टनात नीट तर मांडतोच, पण शेवटी त्याचं एक पटेल असं उत्तरही देतो. हे उत्तर आभासी जगातून आपल्याला वास्तवात आणणारं आहे. खूप प्रगल्भ आहे, मॅच्युअर आहे. म्हणूनच 'लंचबॉक्स' हे नुसतं मनोरंजनाचं आणि त्यातल्या प्रेमाचं खाद्य नाही, तर ते बुद्धीलाही दिलेलं खाद्य आहे...
'लंचबॉक्स' ही साधी-सुधी गोष्ट आहे साजन फर्नांडिस (इरफान खान) या पन्नाशीतल्या, विमा कंपनीतल्या लहान पदावरच्या अधिकाऱ्याची आणि इला (निम्रत कौर) या पस्तिशीतल्या विवाहित स्त्रीची. इलाला एक सात-आठ वर्षांची मुलगी आहे आणि तिच्या नवऱ्याचं बाहेर 'अफेअर' सुरू आहे. अशा परस्थितीत गृहिणी असलेली इला भावनिकदृष्ट्या फारच एकाकी पडली आहे. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या देशपांडे काकूंशी किचनमधूनच मारलेल्या गप्पा हाच तिचा एकमेव विरंगुळा. (या देशपांडे बाई पडद्यावर कधीच दिसत नाहीत. फक्त त्यांचा आवाज ऐकू येतो. तरीही भारती आचरेकरांनी फक्त आवाजातून हे कॅरेक्टर उभं केलं आहे. हा प्रयोग भन्नाटच आहे.) तर या इलानं नवऱ्यासाठी पाठवलेला डबा चुकून फर्नांडिसकडे जातो. फर्नांडिसला डबा आवडतो व तो चाटून-पुसून तो डबा पुन्हा पाठवून देतो. रात्री नवरा आल्यावर इलाला कळतं, की नवऱ्याला आपण दिलेला डबा पोचलेलाच नाही. पण ती काही बोलत नाही. आपला डबा आवडीनं खाणाऱ्या अनोळखी व्यक्तीविषयी कुतूहल वाटून ती एक चिठ्ठी त्या डब्यात पाठवते. फर्नांडिसची बायको मरण पावलेली असते. पन्नाशीच्या पुढं वय असलेल्या आणि स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्या फर्नांडिसच्या एकाकी जगण्यात या डब्यामुळं आणि त्यातल्या चिठ्ठीमुळं एक नवंच 'थ्रिल' येतं. तोही चिठ्ठीला उत्तरं पाठवू लागतो. फर्नांडिसच्या जागेवर नंतर काम करण्यासाठी अस्लम शेख (नवाझुद्दीन सिद्दिकी) या तरुणाची नेमणूक झालेली असते. तो फर्नांडिसकडून प्रशिक्षण घेण्यासाठी त्याला वैताग येईल, अशा पद्धतीने त्याच्याशी संवाद साधत असतो. इकडे चिठ्ठ्यांचा सिलसिला सुरूच राहतो. इलाला देशपांडे काकू आणि फर्नांडिसला शेखशिवाय आपल्या भावना शेअर करण्यासाठी कोणी नसतं. त्यामुळं या चार पात्रांत कथा फुलत राहते. इलाला एकदा वाटतं, की आता आपण या व्यक्तीला भेटलं पाहिजे... मग ते एका रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरवतात. इला तिथं जाऊन त्याची वाट पाहत बसते. पण कुणीच येत नाही... का? नक्की काय होतं? पुढं त्या दोघांचं काय होतं? मुळात असा कुणी फर्नांडिस असतो का? इलाचं काय होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत, काही नवे अनुत्तरित प्रश्न बाकी ठेवून सिनेमा संपतो. 
 'लंचबॉक्स'ची हाताळणी निश्चितच वेगळी आहे. ती लोकप्रिय सिनेमाची पायवाट चोखाळणारी नाही. यात टिपिकल हिरो-हिरॉइन नाहीत, नाच-गाणी नाहीत, आयटेम गर्ल नाही... पूर्वीच्या काळात याला कदाचित 'आर्ट फिल्म' म्हटलं गेलं असतं. अत्यंत साधी कथा, सामान्य माणसांसारखी दिसणारी-वागणारी पात्रं, सामान्यांचंच जगणं चित्रित केल्यासारखी उलगडत जाणारी गोष्ट आणि सामान्यांच्याच मनातल्या प्रश्नांना उत्तरं देत होणारा शेवट अशी ही मांडणी आपण पूर्वीही बासू चटर्जी, हृषीकेश मुखर्जी, सई परांजपे, अमोल पालेकर यांच्या मध्यमवर्गी सिनेमात बघितली आहे. रितेशवर या स्कूलचा नक्कीच प्रभाव आहे. सुरुवातीच्या लोकलच्या दृश्यापासून ते जाणवतं. सिनेमाचा मूक नायक एक लंचबॉक्स असल्यानं मुंबईच्या डब्यावाल्यांचं दर्शन अपरिहार्यपणे यात घडतं. मुंबईचा पाऊस, लोकलमधील गर्दी, विमा कंपनीतलं टिपिकल वातावरण, लंचच्या वेळी कँटीनमध्ये उडणारी झुंबड, फर्नांडिसचं वांद्र्यातलं एकाकी घर, समोरच्या घरातली डिनरच्या वेळी खिडक्या लावून घेणारी मुलं, लंचच्या वेळी शेखचं फक्त फळं घेऊन येणं, इलाचं एकाकीपण, देशपांडे काकूंशी सुरू असलेला तिचा अखंड संवाद, त्या काकूंनी दोरी लावलेल्या टोपलीतून वस्तू खाली देणं, त्या टोपलीच्या हालचालीतून भावना व्यक्त करणं, इलाला नवऱ्याच्या कपड्यांच्या वासावरून (म्हणजे सेंटच्या) त्याचं अफेअर समजणं, डबेवाल्यांची धावपळ, लोकलमधील त्यांची ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात सुरू असलेली भजनं, लोकलमधील भिकारी मुलं असं सगळं नेपथ्य दाखवून रितेश आपल्या नायक-नायिकेचं एकाकीपण दाखवीत राहतो. विशेषतः 'गर्दीतला एकटा' ही फर्नांडिसची प्रतिमा फारच लखलखीतपणे समोर येते. इलाची मानसिक अवस्थाही दिग्दर्शक तिच्या कपड्यांमधून, तिच्या देहबोलीतून दाखवत राहतो. एकदा एक बाई व मुलगी एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करते, त्या वेळी हीच तर ती नसेल ना, असं वाटून फर्नांडिसला वाटणारी तडफड आणि इलाची नंतर याच घटनेवर चिठ्ठीतून व्यक्त होणारी प्रतिक्रिया, त्या वेळी सर्व दागिने काढून त्या बाईच्या जागी स्वतःला कल्पून इमारतीच्या गच्चीत जाणारी इला पाहून अंगावर काटा येतो. नंतरही एकदा एका दृश्यात इला झोपताना तिचे फक्त दागिने काढून टेबलावर ठेवते, तेव्हाही चरकायला होतं. या दोन्ही पात्रांच्या भावनिक जगात असलेली रिक्तता अशा प्रतिमांतून दिग्दर्शकानं अत्यंत तीव्रतेनं मांडली आहे. त्यामुळंच त्या चिठ्ठीतील संवादातून दोघांना मिळणारा भावनिक आधार आणि त्यातून नकळत त्या न पाहिलेल्या व्यक्तीत दोघांचंही गुंतत जाणं फार पटत जातं. इलाला फर्नांडिसनं प्रत्यक्ष पाहिलेलं नसलं, तरी तिनं तयार केलेल्या अन्नाला त्याचा रोज स्पर्श होत असतो. त्या अर्थानं दोन्ही पात्रांमध्ये आपोआप एक जैव संबंध निर्माण होतो. कुणाच्याशी मनात अन्य कुणाविषयी तरी अशी प्रेमाची, जिव्हाळ्याची, आपुलकीची भावना तयार होण्यासाठी असा काही तरी जैव धागा लागतो. इलाच्या हातच्या सुंदर जेवणातून फर्नांडिसच्या जिव्हातृप्तीपर्यंत हा धागा जोडला जातो. हा अनुभव आपण सर्वांनीच कधी ना कधी घेतलेला असतो. त्यामुळं फर्नांडिस आणि इलामधलं अनोखं नातं प्रेक्षक म्हणून आपण सहज समजून घेऊ शकतो. पस्तिशी आणि त्यापुढल्या टप्प्यावर विवाहित असो वा अविवाहित; कुणाही व्यक्तीच्या भावनिक गरजा बदलतात. वाढत्या वयाबरोबर आपल्यावर मनःपूत प्रेम करणारं कुणी तरी असावं, ही भावना वाढू लागते. दर वेळी या भावनेला लैंगिक सुखाचा संदर्भ असतोच असं नाही. किंबहुना नसतोच. पण तरीही विरुद्ध लिंगी व्यक्ती आपल्यावर असं प्रेम करू लागली, तर या भावनेला प्रबळ खतपाणी मिळतं, हे नक्की. या वयातल्या अशा 'शेअरिंग'ला नक्की काय म्हणायचं, हा मोठा प्रश्न आहे. प्रेम हा शब्द तसा खूप व्यापक आहे. तो बऱ्याचदा आपण फार संकुचित अर्थानं वापरतो. मैत्री हीदेखील खूप वेगळी संकल्पना आहे. मला वाटतं, मैत्रीच्या पुढचं आणि शारीर प्रेमाच्या अलीकडचं असं कुठलं तरी हे नातं आहे. ते नक्कीच आभासी आहे; पण खूप गोड आहे. कुणाला हे नातं गवसलं, तर या नात्याच्या अमर्याद शक्यता लक्षात येतात आणि त्याच वेळी आपल्या प्रचंड मर्यादाही! अशा वेळी जीवाची जी काही तडफड होते, ती ज्याला हे नातं गवसलंय त्यालाच कळू शकेल. 'लंचबॉक्स' नक्कीच या नात्यापर्यंत पोचतो आणि सुरुवातीला म्हटलं, तसं सिनेमाचा क्लायमॅक्स या नात्याच्या भविष्यावर नेमकं भाष्य करतो आणि तूर्त तरी तेच योग्य आहे, असं वाटतं. (भविष्यात कदाचित अशा नात्याचे काही नवे पैलू लक्षात येतील आणि एक वेगळा सिनेमा त्यातून आकार घेईल...) असो.


इरफान खान या अभिनेत्याविषयी काय बोलावं? अत्यंत ताकदीच्या अशा या अभिनेत्यानं साजन फर्नांडिस फार समजून-उमजून उभा केला आहे. त्याचं सुरुवातीचं कोरडं वागणं, इलाचा डबा मिळाल्यानंतर त्याच्या वागण्यात होणारा बदल, त्याचा इलाला दिला जाणारा प्रतिसाद, क्लायमॅक्सच्या वेळचं त्याचं अत्यंत प्रगल्भ वागणं हे सगळं इरफाननं जबरदस्त साकारलं आहे. तीच गोष्ट निम्रत कौरची. या अभिनेत्रीचा हा पहिलाच सिनेमा आहे, हे पटत नाही, एवढी तिनं यातली इला सुंदर साकारली आहे. पतीच्या अफेअरविषयी तिचं गप्प राहणं फारसं पटत नाही; पण ते ठीक आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीनं नेहमीच्या शैलीत शेख उभा केला आहे. त्याच्या अस्तित्वामुळं प्रत्येक प्रसंगात जान येते.
तेव्हा वेगळं काही पाहायची आवड आणि तशी अभिरुची असल्यास लंचबॉक्सला नक्की जा... अन्यांसाठी ग्रँड मस्ती सुरू आहेच!
---
निर्मिती - यूटीव्ही, दार मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - रितेश बत्रा
प्रमुख भूमिका - इरफान खान, निम्रत कौर, नवाझुद्दीन सिद्दिकी, भारती आचरेकर (आवाज)
दर्जा - ****
---

No comments:

Post a Comment