3 May 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - सलाम

साध्या-सच्च्या जगण्याचा कानमंत्र
 ---------------------------------------------------------------------
 किरण यज्ञोपवीतच्या कलाकृती दर वेळी आपल्याला जगण्याविषयीचं एक नवं भान देऊन जातात. म्हणजे त्या खूप काही वेगळं, या जगाबाहेरचं, अतर्क्य सांगतात असं नाही. उलट आपल्याच मातीतून रुजलेल्या, ज्यावर आपला पिंड घडला आहे, पोसला आहे अशा साध्या-सोप्या मूल्यांची आठवण करून देतात. ही मूल्यं आपण सध्या वेगानं विसरत चाललो आहोत, म्हणूनच त्यांची आठवण मनात पुन्हा जागवणाऱ्या या कलाकृतींचं मोल अधिक! या दिग्दर्शकाच्या ‘ताऱ्यांचं बेट’ किंवा ‘सुखान्त’ यासारख्या कलाकृती पाहिल्या म्हणजे याची कल्पना येते. आता किरणनं ‘सलाम’ या आपल्या नव्या सिनेमाद्वारे मैत्रीसारख्या चिरंतन नात्याचा नवा अर्थ उलगडून सांगितला आहे. पोलिस आणि लष्करात काम करणाऱ्या दोन तरुणांची दोन मुलं सिनेमाचे नायक असल्यानं त्यांच्या गोष्टीला या दोन मिती आपसूकच लाभल्या आहेत. या अनोख्या नात्यांच्या गोष्टीला गावाचं, शेताचं, नदीचं आणि हिरव्यागार निसर्गाचं डौलदार नेपथ्य असल्यानं गोष्ट केवळ प्रशंसनीयच नव्हे, तर प्रेक्षणीयही झाली आहे.
‘सलाम’ ही गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडू शकते, घडलेली असतेच. अल्लड बालपण संपून आपण किंचित मोठे झालो, की आपल्याला आजूबाजूचं जग दिसायला लागतं. घर नावाच्या छोटेखानी, सुरक्षित, ऊबदार घरट्यातून आपण जगाच्या उघड्या आकाशात उडायला बघतो, तेव्हा गांगरून, बावरून जायला होतं. घरातल्या मूल्यव्यवस्थेला जग धडका द्यायला लागतं. प्रश्न पडू लागतात. स्पर्धा उभी ठाकते. जगण्यातून तरण्याची आणि तरून टिकण्याची दुर्दम्य इच्छा जन्म घेते. संघर्ष सुरू होतो. पडत-धडपडत-लढत ही अपरिहार्य लढाई आपण लढू लागतो... अशा वेळी आपल्या माता-पित्यांनी आपल्यावर केलेले संस्कारच बळ देतात. उभं राहायला मदत करतात. ‘सलाम’चे नायक रघू आणि सदा यांच्या आयुष्यातही हीच वेळ आली आहे. त्यातही गोष्टीचा फोकस रघूच्या जगण्यावर अधिक आहे. रघूच्या डोळ्यांतूनच आपण ही सगळी गोष्ट पाहतो. सातवीत असलेला रघू (विवेक चाबूकस्वार) आणि त्याचा मित्र सदा (अभिषेक भराटे) यांचं मौजे पारगाव हे गाव पोलिस आणि लष्करातल्या लोकांचं. घरटी एक तरी माणूस पोलिसांत किंवा लष्करात आहेच. रघूचे वडील शंकर पालकर (गिरीश कुलकर्णी) मुंबई पोलिसांत असतात, तर सदाचे वडील लष्करात जवान. रघू आणि सदाच्या मित्रांचा एक ग्रुप आहे. त्यांच्यात सदैव पोलिसांपेक्षा मिलिटरी कशी भारी, याची चर्चा रंगलेली असते. रघूच्या मनात कायम आपल्याच वडिलांच्या पेशाविषयी न्यूनगंड भरलेला असतो. एकदा त्याचे वडील सुट्टीत घरी येतात. रघू त्यांना आपल्या शंका विचारतो. तेव्हा, कुठलाही पेशा लहान किंवा मोठा (भारी) नसतो, अशी समजूत त्याचे वडील काढतात. त्यानंतर रघूच्या शाळेत मुख्याध्यापक चौखुरे (किशोर कदम) गरजू विद्यार्थ्यांसाठी एक जनाधार निधी गोळा करण्याचा कार्यक्रम जाहीर करतात. रघू आणि सदा दोघेही हिरिरीनं या कामाला लागतात. मात्र, काही कारणांनी त्यांच्यात ‘स्पर्धा’ निर्माण होते. पुढं आणखी एका गंभीर प्रसंगानं सर्वच गोष्टीला कलाटणी मिळते... रघू आणि सदाच्या मैत्रीची परीक्षा पाहिली जाते... त्यात नक्की काय होतं, हे पडद्यावरच पाहणं इष्ट.
‘सलाम’मधून आपल्याला नक्की काय सांगायचंय, हे दिग्दर्शकाच्या डोक्यात स्पष्ट आहे. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठेही प्रचारकी न होता, तो आपल्याला या हरवत चाललेल्या मूल्यांची आठवण करून देतो. गाव, निसर्ग, तिथली साधी-भोळी माणसं यांच्या माध्यमातून तो आपले मुद्दे ठसवत राहतो. अशा प्रकारची हाताळणी आपण माजिदी किंवा अन्य इराणी दिग्दर्शकांच्या सिनेमांतून पाहिली आहे. अर्थात ‘सलाम’ला खास गावरान मराठी वातावरणाचा आणि मराठी मातीचा स्पर्श आहेच! याशिवाय किरणचे संवाद थेट भिडणारे असतात. तेही आपल्या रोजच्या जगण्यातूनच आलेले असल्यानं अधिक जिवंत, अधिक खरे वाटतात.
सदा आणि रघूच्या पात्रांसोबतच गिरीश कुलकर्णीने रंगवलेले रघूचे वडील म्हणजे या सिनेमाचे सूत्रधार म्हणायला हवेत. (दिग्दर्शकानं ‘प्रिन्सिपल रोल’ असा नेमका शब्द वापरला आहे.) गिरीशच्या वडिलांच्या तोंडी त्यांच्या जगण्याची सर्व मूल्यव्यवस्था येते. गिरीशनं ही छोटीशीच, पण अत्यंत महत्त्वाची भूमिका फार सुंदर केली आहे. त्यात त्यानं प्राण ओतल्यानं सर्व सिनेमा तोलून धरणारी ‘बॅकबोन’ अशी ही भूमिका ठरली आहे. याशिवाय नंदप्पा (शशांक शेंडे) हे पात्रही असंच सूचक आहे. गावापासून अलिप्त राहणारा, पण सर्वांवर लक्ष ठेवणारा हा नंदप्पा म्हणजे आपल्या बदलत चाललेल्या संस्कृतीचा मूक निषेध करणाऱ्या मोठ्या समुदायाचं प्रतीकच वाटतो. याशिवाय यातील पोस्टमन, मुख्याध्यापक, नाटकाची तालीम घेणारे सर किंवा जनाई किंवा बबन किंवा मधूकाका अशा छोट्या छोट्या व्यक्तिरेखांनाही दिग्दर्शकानं पुरेशी स्पेस देऊन, त्या प्रेक्षकांच्या मनावर व्यवस्थित ठसविल्या आहेत.
विवेक चाबूकस्वार या छोट्या नायकाचं तर करावं तेवढं कौतुक कमीच. त्यानं रघूच्या भूमिकेत खूप समज दाखवली आहे. या वयातल्या मुलांचं संभ्रमित जगणं, नंतर एकदा उद्दिष्ट सापडल्यावर जिद्दीनं त्यात उडी घेणं हे सगळं त्यानं अचूक पकडलं आहे. अभिषेक आणि अन्य मुलांनीही छान कामं करून त्याला चांगली साथ दिली आहे. ज्योती चांदेकर आणि अतिशा नाईक यांनीही आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. संजय खापरे, किशोर कदम, प्रवीण तरडे यांनीही आपापल्या कामांत मजा आणली आहे. राहुल रानडेंचं संगीत आणि विशेषतः पार्श्वसंगीत या गोष्टीतल्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागा फार छान अधोरेखित करतं. अभिजित अब्देच्या कॅमेऱ्यानं गावातला निसर्ग आणि तिथलं स्वच्छ, नितळ जीवन सुंदर टिपलंय.
तेव्हा, कृत्रिम, बनावट जगण्याचे मुखवटे फेकून आपला आतला निर्मळ, झऱ्यासारखा स्वच्छ चेहरा पाहायला आणि या शोधाबद्दल दिग्दर्शकाला सलाम करायला ‘सलाम’ पाहायलाच हवा.
---
निर्माता : डॉ. गौरव सोमाणी
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक : किरण यज्ञोपवीत
संगीत व पार्श्वसंगीत : राहुल रानडे
सिनेमॅटोग्राफी : अभिजित अब्दे
प्रमुख भूमिका : विवेक चाबूकस्वार, गिरीश कुलकर्णी, अतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे, किशोर कदम इ.
कालावधी : एक तास ५७ मिनिटे
दर्जा - *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - मटा, पुणे - ३ मे २०१४)
---

No comments:

Post a Comment