16 Feb 2016

थप्पड नं. १

थप्पड नं. १ 
--------------


गोविंदा हा एके काळी अत्यंत लोकप्रिय असलेला अभिनेता. त्याच्या अनेक चित्रपटांची नावं हिरो नं. १, कुली नं. १ वगैरे अशी होती. आता परवा त्याच्याबाबत घडलेल्या प्रसंगाला त्यामुळं ‘थप्पड नं. १’ हे नाव छान शोभून दिसेल. गोविंदानं एका चाहत्याला मारलेल्या थपडीमुळं हा सारा प्रकार घडला; पण ती ही ‘थप्पड नं. १’ नव्हे! या प्रकरणात त्याला सुप्रीम कोर्टाकडून परवा जी बसली आहे, तिला खरी ‘थप्पड नं. १’ म्हणता येईल. संतापाच्या भरात चाहत्याच्या श्रीमुखात भडकावणाऱ्या गोविंदाला कोर्टाने त्याची वैयक्तिक माफी मागायला सांगितली आहे. या प्रकरणात गोविंदाने भरपाई म्हणून पाच लाख रुपये देऊ केले आहेत. या सर्वच प्रकरणात गोविंदाचं हसं झालं आहे आणि सुप्रीम कोर्टापर्यंत आत्मसन्मानाची लढाई नेणाऱ्या संतोष राय या चाहत्याचं कौतुक होत आहे. या प्रकरणामुळं तरी आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांशी कसं वागावं याचे धडे सेलिब्रिटी मंडळी घेतील, अशी आशा आहे.
आपल्या देशात सर्वसामान्य जनतेचं सिनेमा नट-नट्यांविषयी असलेलं प्रेम काही नवं नाही; पण आपल्या देशात असलेली टोकाची आर्थिक विषमता, त्यातून येणारं उच्च वर्तुळात वावणाऱ्या आणि सार्वजनिक जीवनात नावाजलेल्या लोकांविषयीचं सुप्त आकर्षण, व्यक्तिपूजेचं अवास्तव माजवलेलं स्तोम आणि कुठल्याही व्यक्तीच्या आत्मसन्मानाविषयी असलेला अनादर किंवा त्याविषयीची संपूर्ण अनभिज्ञता यामुळं अनेकदा हे संबंध ताणले जातात किंवा त्यात काही तरी बिघाड होऊन बसतो. गोविंदाचं प्रकरण असंच आहे. ही घटना आहे २००८मधली. गोविंदा महाशय तेव्हा उत्तर मुंबईचे खासदार होते. फावल्या वेळेत ते सिनेमेही करीत असत. अशाच एका ‘मनी है तो हनी है’ नामक (गोविंदालाच शोभेल अशा) सिनेमाचं चित्रिकरण मुंबईच्या फिल्मिस्तान स्टुडिओत सुरू होतं. तिथं या संतोष राय नामक माणसाबरोबर त्याची काही तरी बाचाबाची झाली. त्यातून गोविंदानं आपली प्रतिमा, एकूण प्रतिष्ठा, खासदारपदाचा आब वगैरे सगळं विसरून त्या संतोष रायच्या श्रीमुखात भडकावली. तेव्हा तिथं वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे होते आणि त्यांनी हा प्रकार थेट टिपला असल्यामुळं त्याच्या सत्यतेविषयी काही शंका नाही. किंबहुना गोविंदाच्या वकिलांनी कोर्टात हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला, तेव्हा ते फूटेज वृत्तवाहिन्यांनी घेतलेलं असल्यानं ते चुकीचं असणार नाही, असं सांगून कोर्टानं त्यांना फटकारलं. एरवी दुसरा कुणी माणूस असता, तर तो गुपचूप गाल चोळत निघून गेला असता; पण गोविंदाभाऊंच्या दुर्दैवानं संतोष राय हा माणूस लढणारा निघाला. त्यानं या प्रकरणात थेट कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढविली. वास्तविक, एखादा उमदा माणूस असता, तर त्यानं राग शांत झाल्यावर तिथल्या तिथं त्या माणसाच्या खांद्यावर हात टाकून विषय मिटवला असता. तो माणूसही त्या कलाकाराच्या या वर्तणुकीबद्दलचा राग विसरून गेला असता; मात्र गोविंदा काय किंवा त्याच्यासारखे अन्य सेलिब्रिटी काय, यांचा ‘अहं’ (इगो) सामान्य माणसाच्या आत्मसन्मानापेक्षा मोठा असतो. त्यामुळं गोविंदानंही ही कायदेशीर लढाई प्रतिष्ठेची करून सुप्रीम कोर्टापर्यंत दाद मागितली. अनेक वाट्टेल तसे खोटे दावे केले. संतोष राय हा त्या सेटवर कुणा नवोदित अभिनेत्रीशी गैरवर्तन करीत होता, येथपासून तो थप्पड मारल्याचा व्हिडिओ खोटा आहे, इथपर्यंत अनेक वकिली कारणं त्यानं सादर केली; मात्र त्याचा एकही दावा टिकला नाही. अखेर गोविंदानं पाच लाख रुपये भरपाई आणि विनाशर्त माफीचा प्रस्ताव ठेवला - तोही कोर्टासमोर. तेव्हा सुप्रीम कोर्टानं गोविंदाच्या वकिलांना खडसावून सांगितलं, की आमच्यापाशी माफी मागू नका. त्या माणसाकडे जा आणि त्याची माफी मागा. 
कोर्टाला एवढा थेट आदेश देण्याची वेळ यावी, हा केवढा या उन्मत्त कलाकाराचा मस्तवालपणा! एवढे झाल्यावरही गोविंदाचे वकील कोर्टाला म्हणतात, ‘आमच्या अशिलाचा गैरसमज झाला आणि लेखी माफी पुरेशी आहे, असे आम्हाला वाटले.’ आता काय म्हणावे याला? संतोष राय हा खमक्या माणूस होता म्हणून आणि त्यानं सुप्रीम कोर्टात दहा लाख रुपयांहून अधिक पैसे खर्च केले म्हणून तरी एवढं झालं! एरवी सामान्य माणसाला विचारतो कोण?
गोविंदाच नव्हे, तर अनेक सेलिब्रिटींचं वागणं वाह्यात आणि विचित्र असतं; (सगळेच तसे नसतात. अपवाद असतात, हेही खरं.) पण बहुतांश सेलिब्रिटींच्या डोक्यात हवा गेलेली असते आणि आपण सामान्य माणसांपेक्षा कुणी तरी वेगळे आहोत, असं त्यांना वाटू लागतं. भारतात जेव्हा मोठ्या पडद्यावरचा सिनेमा हीच एक सर्वांत मोठी करमणूक होती, तेव्हाच्या सुपरस्टार मंडळींचे किस्से आपल्याला माहिती आहेत. शम्मी कपूरनं एकदा एका नवोदित अभिनेत्रीचा गुडघा आपल्या बुटाच्या सोलनं लाथा मारून मारून (आणि हे गमती-गमतीत म्हणे) कसा रक्तबंबाळ केला होता, याचा किस्सा शिरीष कणेकर त्यांच्या कार्यक्रमात सांगायचे. बाकीचेही पुष्कळ किस्से आहेत. ते सगळेच जाहीरपणे सांगण्यासारखे नाहीत. काही तरी अत्रंगीपणा केल्याशिवाय आपल्याला सेलिब्रिटी म्हणणार नाहीत किंवा सामान्य माणसापेक्षा आपण वेगळे कुणी तरी आहोत, हे आपणच विचित्र वागून सिद्ध केलं पाहिजे, हीच त्यांची त्यामागची भावना असावी.
आपल्याकडे काही सन्माननीय अपवाद वगळले, तर प्रेक्षकांशी एक माणूस म्हणून वागणारे मोठे कलावंत फार थोडे. आपल्या चाहत्यांचा अपमान करायला प्रत्येक वेळा त्यांना थप्पडच मारायची घटना घडावी लागते, असे नाही. अन्य कित्येक वेळा चाहत्यांचा कळत-नकळत अपमान या सेलिब्रिटींकडून होत असतो. काही जण प्रेक्षकांना रंगमंचावरून दम देतात, काही जण सह्या मागायला आलेल्यांवर ओरडतात, त्यांच्या वह्या भिरकावतात, काही जण प्रेस कॉन्फरन्समध्ये दादागिरी करतात, काही जण उपस्थितांचीच लायकी काढतात. एका मोठ्या दिग्दर्शकाच्या ‘कौटुंबिक’ प्रेस कॉन्फरन्सला जातानाच बहुतेकांची खात्री असते, की आज आपलीच शाळा होणार आहे! कारण कुठलाही मुद्दा काढला, तरी यांचे म्हणणे एकच असते - आमचे बरोबर आहे; तुम्हाला काही कळत नाही.
याउलट अमिताभसारख्या लोकप्रियतेच्या बाबतीत वर्षानुवर्षे सर्वोच्च स्थानी असलेल्या माणसाचं वागणं किती तरी सुसंस्कृत आणि साध्या माणसालाही सुखावणारं असतं. मराठी चित्रपट किंवा नाट्यसृष्टीतले कित्येक कलाकारसुद्धा आपले पाय जमिनीवर ठेवून आहेत आणि त्यांचं ते तसं असणंच त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढविणारं असतं; मात्र गोविंदासारख्या उटपटांग नटासारखे किती तरी वाह्यात सेलिब्रिटी सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतरच सरळ होणार असतील, तर त्यांनी यापुढं अशा थपडा खाण्यासाठी सज्जच राहावं हे बरं. याचं साधं कारण म्हणजे आपल्या देशात आता सामान्य माणसाला या कलाकारांविषयी आकर्षण असलं, तरी ते आता आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेविषयीही तेवढेच जागरूक झाले आहेत. त्यांचा येता-जाता अपमान करता येणार नाही. ‘थप्पड नं. १’चा हाच धडा आहे.
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १६ फेब्रुवारी २०१६)
---

No comments:

Post a Comment