17 May 2016

लघुकथा - वळीव

वळीव
-----

मे महिन्याचे अखेरचे दिवस. उकाडा 'मी' म्हणत होता. सगळ्यांचीच काहिली काहिली होत होती. माणसं सोडा, पण दुपारच्या वेळी चिटपाखरूपण रस्त्यावर दिसत नव्हतं. आमच्या वाड्यातल्या विहिरीचं पाणी पार तळाला गेलं होतं. सगळी झाडं शुष्क दिसत होती. बाभळींवर धुळीचे थरच्या थर साठले होते. 'पाणी पाणी' होत होतं. नुसतं पाणी पिऊनच पोट फुगत होतं. जेवण जातच नव्हतं. दुपारच्या वेळी आईचा डोळा लागलेला असतो. शेजारी-पाजारीही जरा सामसूमच असते. अशा वेळी बाहेर सटकायला चांगली संधी असते. तसा मी सटकलो. पाय चांगलेच भाजत होते. आत्ताच्या चप्पलचा अंगठा तुटलाय. बाबा नवी घेऊन देणारेत. पण शाळा चालू झाल्यावर! तोपर्यंत मातीत पाय बचकत हुंदडायला मजा येते. 
आमच्या गावच्या पेठेतून सरळ खाली गेलं, की विठ्ठलाचं मंदिर आहे. पेठेत सामसूमच होती. मंदिरात दोन-तीन म्हातारबुवा लवंडले होते. मंदिराच्या दारासमोरूनच मोठ्ठं गटार वाहत होतं. तिथं वर वर अगदी नितळ पाणी वाहतं. मी त्यात पाय बुचकळले. जरा गार वाटलं. तसाच पुढं गेलो. मंदिर मागं टाकलं, की जिल्ह्याच्या गावाकडं जाणारा हमरस्ता लागतो. तिथल्या मैलाच्या दगडावर बसायला मी नेहमी येतो. रस्ता ओलांडला, की म्हशींचं तळं लागतं. या तळ्यात सदा न् कदा म्हशी डुंबत असतात, म्हणून हे म्हशीचं तळं! आत्ताही तिथं भरपूर म्हशी निवांत डुंबत होत्याच. शेजारी दलदलीत झुडपं माजली होती. तळ्याकाठी वळसा घालायला बैलगाडीवाट आहे. त्या वाटेनं गेलं, की सोपानरावांची आमराई लागते. या आमराईत भर उन्हाळ्यातही कसं गार वाटतं! आमची गँग एरवीही इथं येतेच. पण कुणी सोबत नसताना मला इथं येऊन बसायला आवडतं. आम्ही पलीकडच्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळायला ग्राउंड तयार केलंय. खेळत नसलो, की आमराईत येऊन बसतो. आताही मी माझ्या नेहमीच्या 'केशऱ्या'खाली येऊन बसलो. उन्हामुळं दूरवर नुसतं पिवळं पिवळंच दिसत होतं सगळं. पाखरं तर कुठं गेली होती, कुणास ठाऊक! असल्या शांततेचा आवाज ऐकायला मला फार आवडतं. विमानात बसल्यावर असं वाटत असेल, असं मला उगीचच वाटतं! इथं येऊन बसलं, की मला दिवसासुद्धा स्वप्न पडतं. त्यात 'चित्रहार'मधल्या नट्याच बऱ्याचदा दिसतात. पण आमच्या वर्गातली सुशीसुद्धा दिसते. सुशी दिसते बाकी मस्त! फक्त तिला त्या दोन लांबड्या वेण्या शोभत नाहीत. तिचा 'बॉबकट' असता, तर ती कशी दिसली असती, हे मी इथं डोळ्यांपुढं आणत राहतो.
आजच्या या पिवळ्या-पिवळ्या दृश्यांत सुशी कुठंच दिसत नव्हती. शेतांत, त्यापलीकडं, त्याच्याही पलीकडं पार डोंगरांपर्यंत सगळीकडं नुसताच रखरखीतपणा भरला होता. अशा वातावरणात मला भयंकर तहान लागते; पण मी तसाच बसून राहतो. बाबा ओरडले, की म्हणतात, 'आता जीभ टाळूला चिकटली का तुझी?' पण असल्या उन्हात माझी जीभ नेहमीच टाळूला चिकटते. खरं तर आंबे खाऊन खाऊन जीभ अशी जडावते, की बोलावंसंसुद्धा वाटत नाही. आंब्यांच्या आंबट-तुरट चवी जिभेवरून जाऊच नयेत, असं वाटतं. पूर्वी मी मे महिन्यात आमच्या शेतातल्या दगडी विहिरीत पोहायला शिकायला जायचो. पण हल्ली विहिरीचं पाणीच आटलंय. आणि मला का कोण जाणे, पोहायला आवडतही नाही फारसं! त्यात आमच्या विहिरीत तर पोरांची ही गर्दी असायची. सारखे आपले हात-पाय दुसऱ्याला लागायचे. त्यात काय डुंबत बसायचं? मग मी मामाकडं कॅरम खेळायला शिकलो. पण पुढच्या वर्षीच त्यातली मजा गेली. आता फक्त इथं येऊन डोळ्यांपुढं 'चित्रहार' आणत पडून राहावंसं वाटतं.
अचानक या शांततेला भेदत मोठ्ठी वावटळ आली. बचकाभर धूळ डोळ्यांत गेली. डोळे चोळून चोळून लाल लाल झाले. नीट दिसायला लागेपर्यंत बघतो, तर मघाचं ऊन कुठल्या कुठं गायब झालं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. वर आकाशात एक मोठ्ठा काळा ढग चाल करून आला होता. कसले कसले आवाज यायला लागले! गडगडायला लागलं. कुठून तरी दुरून मातीचा ओला वास नाकात शिरला. इतकं छान वाटलं! तेवढ्यात 'टप टप' आवाज करीत मोठमोठे थेंब अंगावर पडायला लागले. विजा कडकडू लागल्या. विजा कोसळत असताना झाडाखाली उभं राहू नये, म्हणून मी पटकन झाडाखालून आमच्या ग्राउंडवर गेलो. आता पाऊस जोरातच कोसळायला लागला होता. मी न ठरवतासुद्धा आपोआप 'गाड्या गाड्या भिंगोऱ्या' करीत गोल फिरायला लागलो. पावसानं चिंब भिजलो होतो... कपडे ओलेकच्च झाले होते. डोळे मिटूनच घेतले होते... अचानक मला कुणी तरी उचललं! मी जणू पिसासारखा तरंगत ढगांकडे निघालो. ढगांच्याही वर आलो. खाली सगळीकडं हिरवीगार पृथ्वी दिसत होती. हळूहळू मी डोंगररांगांच्या वर आलो. हा सह्याद्री पर्वत बहुतेक! शिवरायांचे गड-कोट दिसू लागले. हा टॉवर असलेला सिंहगड, मग हा तोरणा, शेजारचा गरुडासारखे पंख पसरलेला राजगड... मग हे मोठ्ठं शहर कोणतं? ही तर मुंबई! शेजारी अथांग पसरलेला अरबी समुद्र... हे काय! मी हळूहळू समुद्रावर उतरलो... समुद्राच्याही खाली... इथंही पाऊस पडतोय... शिंपले उघडले जातायत... मोत्यांमागून मोती बाहेर पडतायत... आणि... चक्क सुशी... इथं? तीही समुद्रदेवतेच्या वेषात? गॅदरिंगमध्ये तिनं डिट्टो असलीच पांढरी साडी नेसली होती! मी भारावून सुशीकडं बघतच राह्यलो. या सुशीनं चक्क 'बॉबकट' केला होता! मी तिच्याजवळ गेलो... मला तिला जवळ घ्यायचं होतं... तिच्या केसांतून हात फिरवायचे होते... पण छे! मला पुन्हा कुणी तरी उचललं आणि समुद्राबाहेर काढलं. समुद्रावरही जोरदार पाऊस पडत होता. समुद्रावरचा पाऊस मी कधीच बघितला नव्हता. देव तरी काय! समुद्रावर पाऊस म्हणजे निव्वळ पाणी वाया घालवणं! हळूहळू समुद्रही आटला. तिथं आता आमचं ग्राउंड दिसायला लागलं. हळूहळू मी गोल फिरायचा थांबलो. डोळे उघडून बघितलं, तर पाऊस थांबला होता... स्वच्छ, पिवळं सोन्यासारखं ऊन पडलं होतं.... आकाशात सुरेखसं इंद्रधनुष्य उगवलं होतं... समोर एक कण्हेरीचं फूल नुकतंच उमललं होतं... जणू माझ्याकडं बघून हसत होतं... 
घरी गेलो तर आई कुणाला तरी सांगत होती... 'चिरंजीवांना शिंगं फुटलीयत!' मी लगेच आरशात बघितलं आणि मनसोक्त हसलो!




---------------------------

3 comments:

  1. ललित लेखन छानच करता .कथाही लिहायला हरकत नाही.आम्हाला वाचायला आवडतील.

    ReplyDelete