24 Nov 2016

माधुरी दीक्षित लेख

सुहास्य तुझे...
--------------माधुरी दीक्षित. आमच्या उमलत्या तारुण्याला पडलेलं एक मुग्धमधुर स्वप्न! माधुरी दीक्षित म्हणजे मनमोहक, खळाळत्या हास्याचा धबधबा! माधुरी म्हणजे नृत्यनिपुणता, कमनीयता, सौष्ठवता!!! माधुरी म्हणजे माधुरीच... तिच्यासारखी दुसरी कुणीही नाही. 'सुहास्य तुझे मनासी मोहे' हे गाणं केवळ जिच्यासाठीच लिहिलं असावं असं कायम वाटतं ती सुहास्यवदना, कोमलांगी, चारुगात्री माधुरी...
सौंदर्य हे अजर असतं, असं म्हणतात. म्हणजेच ते कधी म्हातारं होत नाही. शिवाय ते सौंदर्य जर पाहणाऱ्याच्या नजरेत असेल, तर खरोखरच ते चिरतरुण राहतं. माधुरी दीक्षितला गेल्या मेमध्ये पन्नासावं वर्षं लागलं आणि येत्या १५ मे २०१७ रोजी ती वयाची पन्नाशी पूर्ण करणार आहे, हे केवळ आकडे झाले. माझ्या लेखी ती कायमच ती १९९० मधली अवखळ, चुलबुली माधुरी असणार आहे. याचं एकमेव कारण म्हणजे ती 'माझ्या' पिढीची तारका होती. प्रत्येक पिढीची 'आपली' अशी एक स्वप्नसुंदरी असते. अगदी मधुबालापासून ते आत्ताच्या दीपिका पदुकोण किंवा विद्या बालनपर्यंत ही यादी सांगता येईल. पण आता चाळिशीत असलेल्या माझ्या पिढीच्या समोर माधुरी अवतरली, हे आमचं भाग्य होय. माधुरी निखालस 'नाइन्टीज'ची नायिका होती. तिचा पहिला सिनेमा 'अबोध' झळकला तो १९८४ मध्ये. तेव्हा ती फक्त १७ वर्षांची होती. त्यानंतरही तिनं काही फुटकळ सिनेमे केले. मात्र, ती रातोरात सुपरस्टार झाली ती १९८८ मध्ये आलेल्या 'तेजाब'मुळं. चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्रा नावाच्या मराठी माणसानं 'एक दो तीन...'च्या ठेक्यावर माधुरीला हिंदी चित्रपटसृष्टीचा विशाल कॅनव्हास मिळवून दिला. 
माधुरी रूपेरी पडद्यावर राज्य करायला आली तेव्हा इथं निर्विवाद श्रीदेवीचं राज्य होतं. त्यापूर्वीच्या हेमामालिनी, रेखा, झीनत अमान, राखी यांचं राज्य खालसा होत आलं होतं. माधुरीला स्पर्धा होती ती फक्त श्रीदेवीची. श्रीदेवी एक अत्यंत जबरदस्त अभिनेत्री तर होतीच; पण शिवाय ती दाक्षिणात्य, नृत्यनिपुण आणि सौष्ठवपूर्ण होती या तिच्या आणखी काही जमेच्या बाजू होत्या. मि. इंडिया, नगीना आणि नंतर आलेल्या 'चांदनी'नं श्रीदेवीची लोकप्रियता कळसाला पोचली होती. मात्र, प्रेक्षकांनी 'तेजाब'च्या वेळी माधुरीला पडद्यावर पाहिलं आणि त्यांच्या हृदयात कसलीशी कळ उठली. माझ्यासारख्या तेव्हा पौगंडावस्थेत असलेल्या प्रेक्षकांच्या तर नक्कीच! पुढं इंद्रकुमारच्या 'बेटा'नं यालाच शब्दरूप दिलं - 'धक धक करने लगा...' पण ही अवस्था आमची 'तेजाब'पासूनच झाली होती, हे नक्की. माधुरीत काही तरी 'एक्स-फॅक्टर' होता, म्हणूनच तिला प्रेक्षकांनी एवढं नावाजलं. तिचं कोडकौतुक केलं. आता मागं वळून पाहताना असं वाटतं, की तिच्या चेहऱ्यात एक निरागसता होती आणि तिचं ते मुक्त, खळाळतं (हेच विशेषण वापरावं लागतंय दर वेळी, पण खरोखर दुसरा शब्दच नाही...) हास्य म्हणजे त्या निरागसतेला लागलेले 'चार चाँद'च जणू. नटीचं शारीर वर्णन करताना त्यात हमखास लैंगिक सूचन येतं. तेच संदर्भ येतात. माधुरीही त्याला निश्चितच अपवाद नव्हती. पण त्याहीपलीकडं जाऊन तिच्यात काही तरी होतं. किंबहुना तिचं ते सुप्रसिद्ध हास्य पाहताना प्रेक्षकांना केवळ लैंगिक सूचन होत नव्हतं, असं आता वाटतं. कदाचित तो काळ पाहिला, तर असं वाटतं, की समाजातला झपाट्यानं कमी होत चाललेला निरागसपणा तिच्या रूपानं पुन्हा पाहायला मिळत होता. लहानपणी आपण असे निरागस असतो. प्रत्येक गोष्टीला खळखळून हसत दाद देत असतो. मित्रांबरोबर दंगा-मस्ती करीत असतो. पण जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसं हे हास्य लोप पावत जातं. निरागसता हरवून जाते. आपण बनचुके, बनेल, अट्टल होऊन जातो. पण आपण आपल्या बालपणातला तो निरागस भाव कुठं तरी 'मिस' करीत असतो. आणि मग तो असा माधुरीच्या हास्याच्या रूपानं पुन्हा समोर आला, की त्याला कडकडून भेटावंसं वाटतं. माधुरी म्हणजे त्या हरवलेल्या निरागसपणाचं मूर्तिमंत प्रतीक होती, असं आता वाटतं. 
भारताला स्वातंत्र्य मिळून १९८७ मध्ये ४० वर्षं पूर्ण झाली होती. एखाद्या व्यक्तीच्या वयाची चाळिशी आणि एखाद्या देशाच्या स्वातंत्र्याची चाळिशी यात निश्चितच गुणात्मक फरक आहे. पण गंमत म्हणून देशाला एक व्यक्ती कल्पून तुलना केली, तर आपला देश त्या वेळी नक्कीच चाळिशीतल्या माणसासारखा काहीसा प्रौढ, बनचुका, कोरडा (आणि कोडगाही) झाला होता. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकात असलेल्या रोमँटिसिझमची पुढं १९६२ च्या चीन युद्धानं आणि नंतर नेहरूंच्या निधनानं राखरांगोळी झाली. सत्तरच्या दशकात हा हनीमून पीरियड संपला होता, तरीही स्वातंत्र्यानंतरचा देश आता वयात येऊ लागला होता. म्हणूनच या दशकात एक गोड स्वप्नाळूपण, भारावलेपण आणि नवनिर्मितीची आस दिसते. याच काळात देशभरात साहित्य, कला, संस्कृतीला बहर आला. अनेक चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, नाटकं आली, सिनेमे तयार झाले. उत्तम दर्जाचं संगीत तयार झालं. देशभरात मोठ्या प्रमाणात कारखाने, धरणं यांची उभारणी झाली. पुढं देश तिशीत आला, तेव्हा संसारातलं नवेपण संपून षड्रिपूंची लागण सुरू झाली होती. बांगलादेश युद्धाच्या पराक्रमानंतर देशातल्या चैतन्याला जी ओहोटी लागली ती लागलीच. मग १९७२ च्या दुष्काळानं देशाला तडाखा दिला. नंतर रेल्वे संप, नवनिर्माण आंदोलन आणि त्याची परिणती झालेली आणीबाणी... देशाच्या स्वातंत्र्याच्या तिशीत देश जणू पुन्हा पारतंत्र्यात गेला. लायसन्सराज, परमिटराज, बाबूंची खाबूगिरी, रेशनवरच्या भेसळीपासून ते कंत्राटांच्या कमिशनपर्यंत भ्रष्टाचारानं देशावर आपले अक्राळविक्राळ पंजे फैलावले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेली मुलं आता तिशीत आली होती. त्यांना स्वातंत्र्याहून अधिक काही तरी देशाकडून हवं होतं. मग या पिढीनं मोठ्या प्रमाणात आंदोलनं, चळवळी सुरू केल्या. देशाला अस्थिर करणाऱ्या शक्तींनीही याच काळात जोर धरला. म्हणून मग पंजाब, आसाम खदखदू लागले. देशानं पुढच्या दहा वर्षांत दोन पंतप्रधान गमावले. ऐंशीनंतर तर देश विलक्षण कात्रीत सापडला. एकीकडं महासत्तांमधल्या शीतयुद्धाचं जगावर पडलेलं सावट आणि दुसरीकडं देशातल्या नवनिर्माणाचा ओसरू लागलेला बहर असा हा दुहेरी पेच होता. त्यामुळं या काळात टीव्ही रंगीत झाला, व्हिडिओ आले, तरी सामान्य नागरिकांच्या दुर्दशेत वाढच होऊ लागली. बेरोजगारी, भ्रष्टाचार, दुष्काळ आणि सार्वजनिक बेशिस्त या मोठ्या अडथळ्यांनीच देशावर राज्य करायला सुरुवात केली. या देशात काहीच चांगलं घडणार नाही का, असा प्रश्न स्वातंत्र्य चळवळ अनुभवलेल्या ज्येष्ठ पिढीला आणि परिस्थितीपुढं हताश, अस्वस्थ झालेल्या नव्या पिढीला पडू लागला होता. (देशात १९९१ मध्ये झालेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतरची एका परीनं झालेली क्रांती हा काळ अद्याप यायचा होता..) अशा काळात भ्रष्टाचारानं गांजलेल्या, काळ्या बाजारानं त्रस्त झालेल्या (१९८७ मध्ये आलेल्या 'मि. इंडिया'मधला तो शॉट आठवा. भेसळ करणाऱ्या अजित वाच्छानीला 'मि. इंडिया' अनिल कपूर भेसळयुक्त अन्न कोंबून भरवतोय असा तो शॉट एखाद्या चऱ्यासारखा आठवणीत राहिलाय...) सामान्य जनतेला माधुरीच्या हास्यात आपलं हरवलेलं निरागस सौंदर्य सापडलं आणि त्यांनी माधुरीला एकदम सुपरस्टार करून टाकलं. माधुरीच्या निरागस व मुग्धमधुर हास्यानं प्रेक्षकांवर जी 'मोहिनी' घातलीय, ती अद्याप एवढ्या वर्षांनंतरही उतरायला तयार नाही, याचं एकमेव कारण म्हणजे त्या हास्याचा प्रेक्षकांच्या हरपलेल्या निरागसतेशी असलेला हा 'कनेक्ट' होय. 
माधुरी वेगळी होती, ती आणखी एका कारणानं. ती इतर काही नट्यांसारखी बालपणापासून सिनेमासृष्टीत आलेली नव्हती किंवा तिचं शिक्षणही अर्धवट राहिलेलं नव्हतं. तिनं रीतसर बी. एस्सी. मायक्रोबायोलॉजीची पदवी घेतली होती. खरं तर तिला त्याच क्षेत्रात पुढं काही तरी करायचं होतं. पण नियतीला कदाचित ते मंजूर नव्हतं. मध्यमवर्गीय घरातली ही तरुणी केवळ मध्यमवर्गीय आयुष्य कधीच जगणार नव्हती. पुढं तिला भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या रसिकांच्या मनातलं ड्रीमगर्ल स्टेटस मिळणार होतंच. 'तेजाब'नंतर माधुरीनं आमिर खानसह केलेला 'दिल'ही प्रचंड गाजला. ही एक सरधोपट प्रेमकहाणीच होती. पण चॉकलेट हिरो आमिर खान आणि माधुरीची मोहिनी यामुळं इंद्रकुमारला मटकाच लागला. आम्ही माधुरीच्या एवढे प्रेमात होतो, की एक्स्ट्रीम क्लोजअपमध्ये तिच्या चेहऱ्यावर दिसणारी मुरमंही आम्हाला दिसत नव्हती. (आता दिसतात...) 'तेजाब'च्या यशानंतर माधुरी-अनिल कपूर जोडीचे अनेक सिनेमे आले. जीवन एक संघर्ष, किशन-कन्हय्या वगैरे. पण त्यात सर्वाधिक लक्षात राहिला आणि गाजला तो 'शोमन' सुभाष घईंचा 'राम-लखन'... या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर माधुरी-अनिल कपूर ही तेव्हाची सर्वांत 'हिट अँड हॉट' जोडी ठरली. थोड्यात काळात माधुरी जवळपास सुपरस्टार नायिका झाली. पुढच्याच वर्षी आलेल्या लॉरेन्स डिसूझाच्या 'साजन'नंही प्रचंड यश मिळवलं. सलमान आणि संजय दत्त या दोघा नायकांसमोर लक्षात राहिली ती माधुरीच. तिची नृत्यनिपुणता या चित्रपटात विशेष झळाळून दिसली. अशा माधुरीला १९९१ मध्ये आलेल्या 'प्रहार'मध्ये विनामेकअप कॅमेऱ्यासमोर उभं केलं ते नाना पाटेकरनं. पीटरवर (गौतम जोगळेकर) मनस्वी प्रेम करणारी शर्ली माधुरीनं फार आत्मीयतेनं साकारली. तिच्यातले अभिनयगुण प्रकर्षानं दिसले. विनामेकअपसुद्धा ती अत्यंत सुंदर दिसली आणि नैसर्गिक सौंदर्याला बाह्य सजावटीची गरज नसते, हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं. 'दिल'च्या यशानंतर इंद्रकुमारनं माधुरी-अनिल या सुपरहिट जोडीला घेऊन पुढचा सिनेमा आणला - 'बेटा'. या सिनेमानं माधुरीच्या सम्राज्ञीपदावर निर्विवाद शिक्कामोर्तब केलं. आधीच्याच वर्षी यश चोप्रांच्या 'लम्हें'मधून श्रीदेवीनं अप्रतिम भूमिका केली होती. पण माधुरीनं 'बेटा'मधून जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. दोघींच्या या तीव्र स्पर्धेचा पुढच्या दोनच वर्षांत याचा फैसला होणार होता. नंतरच्या वर्षी घईंचा एक सिनेमा आला - 'खलनायक'. संजय दत्त नायक आणि माधुरी नायिका. माधुरी आणि संजयमध्ये काही तरी सुरू असल्याची कुजबुज याच काळातली. १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटांत संजय दत्त आरोपी म्हणून सापडला आणि माधुरीनं शहाणपणानं योग्य तो निर्णय घेतला. पुन्हा नंतर त्या दोघांची चर्चा कधीही ऐकू आली नाही. माधुरीची क्रेझ एवढी वाढली, की संजय कपूर आणि तिच्या 'राजा' नामक एका चित्रपटाचं खरं नाव 'रानी' असंच असायला हवं होतं, असं लोक म्हणायला लागले. 
पुढचं वर्ष होतं १९९४ आणि याच वर्षानं माधुरीच्या सुपरस्टार पदावर मोहोर उमटवली. सूरज बडजात्यानं 'हम आप के हैं कौन'मधून सलमान आणि माधुरी यांना दिमाखात पेश केलं. लग्नाची व्हिडिओ कॅसेट अशी या सिनेमाची समीक्षकांनी संभावना केली असली, तरी तो त्या वर्षीचा नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला तोपर्यंतचा सर्वाधिक हिट चित्रपट ठरला. तेव्हा २९ वर्षांचा असलेला सलमान आणि २७ वर्षांची माधुरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. घरगुती, कुटुंबात रमणारी, तरीही प्रियकरासाठी क्षणात 'रसिकमोहिनी' होणारी सेन्शुअस निशा माधुरीच्या गात्रागात्रांतून उभी राहिली. भारतीय पुरुषी मानसिकता अचून हेरून सूरज बडजात्यानं 'हम आप के'चं पॅकेज आणलं होतं. ते हिट होणारच होतं. श्रीदेवी हळूहळू फेडआउट होत होती, माधुरी तेव्हा या हिंदी चित्रपटसृष्टीतली एकमेव सुपरस्टार नायिका उरली होती. 
माधुरीनं एवढं प्रचंड यश मिळवलं तरी तिच्या अभिनयक्षमतेविषयी काही समीक्षकांना शंका असायची. माधुरी केवळ सुंदर दिसणं आणि नृत्यनिपुणता याच जोरावर चित्रपटसृष्टीवर राज्य करते आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. हे काही अंशी खरंही होतं. अगदी कस लागेल अशा फार कमी भूमिका माधुरीच्या वाट्याला येत होत्या. त्यांची ही शंका दूर केली ती प्रकाश झा यांच्या १९९७ मध्ये आलेल्या 'मृत्युदंड'ने. या चित्रपटात माधुरीची अभिनयक्षमताही दिसून आली. माधुरीचा झंझावात सुरूच राहिला तो पुढच्या वर्षी आलेल्या यश चोप्रांच्या 'दिल तो पागल है'मुळं. शाहरुख आणि करिश्मा कपूर यांच्या जोडीला असलेली माधुरी हा या चित्रपटाच्या यशाचा महत्त्वाचा 'यूएसपी' होता, यात शंकाच नव्हती. 
यशाची ही चढती कमान आणि अपरंपार यश पदरात असतानाच माधुरीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला तो १९९९ मध्ये लग्न करून! तेव्हा ३२ वर्षांच्या असलेल्या माधुरीनं अमेरिकेतील डॉ. श्रीराम नेने या डॉक्टरशी विवाह केला आणि भारतात एकाच वेळी लाखो हृदयं अक्षरशः विदीर्ण झाली. माधुरीनं हातातले प्रोजेक्ट पूर्ण केले आणि ती अमेरिकेला निघून गेली. मला वाटतं, अनिल कपूरसोबतचा 'पुकार' हा तिचा चित्रपट तिच्या लग्नानंतर प्रदर्शित झाला.  माधुरी बॉलिवूडमधून एखाद्या धूमकेतूसारखी निघून गेली. ती अमेरिकेत स्थायिक झाली, संसारात रमली, तिला दोन मुलं झाली या सगळ्या बातम्या तिचे चाहते उदासपणे वाचत होते, ऐकत होते. पाच वर्षं निघून गेल्यावर अचानक बातमी आली, की संजय लीला भन्साळी शाहरुखला घेऊन 'देवदास' बनवतोय आणि ऐश्वर्या पारो आणि माधुरी 'चंद्रमुखी' करतेय. ही बातमी ऐकताच माधुरीच्या चाहत्यांना अपार आनंद झाला. पुढं भन्साळीनं पडद्यावर आणलेल्या 'देवदास'बद्दल कितीही वाद-प्रवाद झाले, तरी माधुरीच्या 'चंद्रमुखी'नं सर्वांची हृदयं पुन्हा एकदा काबीज केली, यात कुणालाच संशय नव्हता. पं. बिरजू महाराजांच्या नृत्य दिग्दर्शनाखाली 'धाई शाम रोक लई' ही बंदिश स्वतः म्हणत, अफाट नृत्य करीत तिनं पडद्यावर चंद्रमुखी साक्षात उभी केली. माधुरीच्या या 'कमबॅक'नं ती अद्याप संपलेली नाही, हे सिद्ध केलं. लग्नानंतर नट्यांना कामं मिळत नाहीत, हा समजही तेव्हा हळूहळू दूर होत होता. माधुरीनं त्याचा अचूक फायदा घेतला. पण या सिनेमानंतर ती पुन्हा दीर्घ ब्रेकवर गेली. या वेळी तिच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. त्यानंतर २००७ मध्ये ती पुन्हा 'आजा नच ले'द्वारे मोठ्या पडद्यावर आली. हा सिनेमा फार चालला नसला, तरी माधुरीच्या अजर सौंदर्याचं आणि थिरकत्या पायांचं कौतुकच झालं. माधुरीनं नंतर भारतात कायमसाठी परत येण्याचा निर्णय घेतला. अगदी दोन वर्षांपूर्वी आलेल्या 'गुलाब गँग'मध्येही तिनं तडफेनं भूमिका साकारली होती. 
माधुरीचं गुणगान गाताना इथं एक सलणारी गोष्ट सांगितलीच पाहिजे. जन्मानं मराठी असलेल्या माधुरीनं मराठी चित्रपटांत वा नाटकांत कधीच काम केलं नाही, ही मराठी रसिकांची खंत आहे. सुयोग नाट्यसंस्थेचे सुधीर भट तिला घेऊन 'लग्नाची बेडी' नाटक पुन्हा रंगमंचावर आणणार आणि माधुरी 'रश्मी' साकारणार, अशी जोरदार चर्चा कित्येक वर्षं ऐकायला येत होती. मात्र, ही कल्पना कधीच वास्तवात उतरली नाही. दुर्गा खोटे, सुलोचनापासून ते स्मिता पाटील, सोनाली कुलकर्णी, ऊर्मिला मातोंडकरपर्यंत सर्व मराठी अभिनेत्रींनी हिंदीबरोबरच मराठीतही (किंवा मराठीसोबत हिंदीतही) उत्तम कामं केली. माधुरी ही मात्र एकमेव अभिनेत्री आहे, की जिनं कधीच मराठी चित्रपट वा नाटकात काम केलं नाही. अगदी पाहुणी कलाकार म्हणून तोंडी लावण्यापुरतंही नाही! मराठी चित्रपट दिग्दर्शक-निर्माते माधुरीच्या बड्या इमेजला टरकून आहेत म्हणावं तर मराठीत अनेक बडे बडे लोक काम करताना दिसतात. माधुरीची स्वतःची कितपत इच्छा आहे, हे कळत नाही. तिची इच्छा असती, तर तिनं एव्हाना नक्कीच मराठीत काम केलं असतं. माधुरी, नाना, सचिन खेडेकर, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी किंवा अश्विनी भावे या सर्वांना एकत्र आणून महेश मांजरेकर किंवा सचिन कुंडलकर किंवा चंद्रकांत कुलकर्णी यांसारखे बडे दिग्दर्शक एखादा सिनेमा का नाही तयार करत? असा सिनेमा भविष्यात तरी तयार व्हावा, असं वाटतं. 
अर्थात चिरतारुण्याचं वरदान लाभलेल्या या सुंदर, गोड अभिनेत्रीवरचं आमचं प्रेम कायमच राहणार आहे. ती आता पन्नाशीची होईल. यापुढंही ती तिच्या लाजवाब अदांनी आणि त्या मोहक हास्यानं आम्हाला कायम प्रसन्न ठेवील, यात अजिबात शंका नाही.
---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्य शिवार दिवाळी अंक २०१६)

No comments:

Post a Comment