31 Dec 2017

मटा - संवाद लेख

गोइंग ऑन एटीन...
----------------------


आज इसवी सन २०१७ संपणार... सन २०१८ सुरू होणार... अव्याहत चाललेल्या कालयज्ञात आणखी एका वर्षाची समीधा पडणार... एकविसाव्या शतकातील पहिली १७ वर्षं बघता बघता संपलीसुद्धा... एकविसावं शतक येणार, त्यात असं होणार, तसं होणार असं आम्ही लहानपणी शाळेत ऐकायचो. तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी हे एक स्वप्नाळू सद्-गृहस्थ होते. त्यांच्या भाषणांत अनेकदा या ‘इक्किसवीं सदी’चा उल्लेख यायचा. हे नवं शतक उजाडलं, तेव्हा आमची पिढी ऐन गद्धेपंचविशीत होती. दोन शतकांचं स्थित्यंतर पाहणारी आमची ही पिढी अनेक अर्थांनी ‘युनिक’ आहे.
फार थोड्या काळात फार मोठी स्थित्यंतरं या २०-२५ वर्षांत घडली. आपल्या देशानं १९९१ मध्ये स्वीकारलेल्या खुल्या आर्थिक धोरणाचाही एक संदर्भ यात आहेच. या धोरणाची फळं आमच्या पिढीच्या पदरात पडायला पुढची आठ-दहा वर्षं गेली. त्यामुळं तसं पाहता बरोबर २००० सुरू होताना हे बदल खऱ्या अर्थानं जगण्यात दिसू लागले होते. पुढच्या १७ वर्षांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यांसमोर आहे. ही १७ वर्षं माझ्या मते, एका नव्या पिढीच्या जन्माची वर्षं होती. सन २०००ला जन्मलेल्या पिढीचा हा जमाना आहे. येत्या वर्षात ही पिढीही अठराव्या वर्षांत पदार्पण करते आहे. ‘साउंड ऑफ म्युझिक’मधील ‘आय अॅम सिक्स्टीन, गोइंग ऑन सेव्हन्टीन’ या प्रसिद्ध गाण्यात थोडा बदल करून ‘आय एम सेव्हन्टीन, गोइंग ऑन एटीन’ असं गाणं आता या पिढीच्या तोंडी असेल. हा जमाना या पिढीचा आहे हे खरंच; पण या पिढीबरोबर बदललेल्या इतर सर्व वयीनांचाही हा जमाना आहे. काळानुसार बदलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी वय कायमच चिरतरुण राहतं. त्यामुळंच आशा भोसलेंसारखी गायिका ही आजही आजच्या जमान्याची गायिका वाटते. आमिर खान ५२ वर्षांचा असला, तरी तो ‘दंगल’ किंवा ‘सिक्रेट सुपरस्टार’सारखा सिनेमा घेऊन येतो, तेव्हा आजच्या जमान्यातलाच नायक वाटतो. 
आजचा संदर्भ १८ या आकड्याचा आहे आणि आपल्याकडं १८ वर्षे पूर्ण झाली, की ती व्यक्ती सज्ञान, प्रौढ झाली, असं मानलं जातं. मतदानाचा अधिकार मिळतो, कार चालविण्याचा परवाना मिळतो, प्रौढांसाठीचे सिनेमे पाहता येतात, मुलींना विवाहाचा अधिकार मिळतो. थोडक्यात, आपलं ‘टीनएज’ संपून आपण ‘मोठे’ होतो, असं कायदा मानतो. त्यामुळं येणारं २०१८ हे वर्ष संपलं, की ही एकविसाव्या शतकातली पहिली पिढी सर्वार्थानं ‘प्रौढ’ होणार आहे; ‘मोठी’ होणार आहे. आधी म्हटलं, तसं काळानुसार बदलणारे सगळेच या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळं त्यांचं वय १७ असो वा नसो, त्यांनाही आपल्या ‘प्रौढत्वा’च्या दर्जाबाबत आत्मपरीक्षण करण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे.
आपल्या जगण्यात या १७ वर्षांत काय बदल झाले? सहज मागं वळून पाहिलं, तर लक्षात येतं, की आपल्या जगण्याला वेग आला आहे. आपली जीवनशैली वेगानं ‘अपग्रेड’ होत गेली आहे. आपण नाही म्हटलं, तरी सुखासीन झालो आहोत. महानगरांमधला एक मोठा वर्ग जवळपास परदेशांतील लोक जगतात, त्या धर्तीची किंवा काही बाबतींत त्याहूनही सरस जीवनशैली अंगीकारून मोकळा झाला आहे. आपल्याकडं पैसा आला आहे. त्यामुळं मोठी घरं, मोठ्या गाड्या, मोठ्या इमारती, उंची हॉटेले असं सगळं अपग्रेड होत गेलं आहे. तंत्रज्ञानातील बदल अफाट आहे. आपले मोठे टीव्ही गेले, फ्लॅट स्क्रीनचे स्मार्ट टीव्ही आले. मोबाइलची पिढी तर दर दोन महिन्यांनी बदलते आहे, ‘फोर जी’वरून आता ‘फाइव्ह जी’कडं प्रवास सुरू आहे. थोडक्यात, भौतिक प्रगतीच्या आघाडीवर आपली गाडी अगदी एक्स्प्रेसवर एखादी उत्तम ‘एसयूव्ही’ १४०-१५० च्या स्पीडनं पळवावी, तशी पळते आहे. त्यामुळंच आपल्या जगण्याची एक वेगळीच गोची झाली आहे. सुखासीनतेचा धबधबा अंगावर कोसळताना, ‘किती घेशील घेता दो कराने’ अशी अवस्था झाल्यानं निवडीचं स्वातंत्र्य आपण गमावून बसलो आहोत. कुठलीही नवी पिढी जन्मल्यापासून १८ वर्षांची होईपर्यंत प्रत्येक अनुभव पहिल्यांदा घेत असते. त्या नवथरपणामुळं तिच्या वागण्यात एक स्वाभाविक आवेग असतो. नव्या गोष्टीला, नव्या अनुभवाला भिडण्याची तीव्रतम असोशी असते. या एकविसाव्या शतकातील प्रत्येक नव्या गोष्टीला सामोरं जाताना आपल्या या नवथर पिढीचीही अवस्था अगदी अशीच झालीय. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं झालेल्या भौतिक सुखांच्या माऱ्यानं आपण अत्यंत उत्तेजित तर झालो आहोतच; पण याचं पुढं कसं व्यवस्थापन करायचं, हेच आपल्याला कळेनासं झालंय. आपली पिढी आता त्या अर्थानं १७ वर्षांचीच आहे, हे एकदा मान्य केलं, की मग तिच्या हातून होणारे हे गोंधळ, चुका क्षम्यच म्हणता येतात. पण आता हे महत्त्वाचं वळण आलंय. आपण १८ व्या वर्षात पदार्पण करतो आहोत. फार तर अजून हे एक वर्ष आपल्याला ‘लहान’ म्हणून माफी मिळेल; पण एकदा १८ पूर्ण झाली, की ‘प्रौढ’पणाच्या फायद्यांसोबतच ती प्रगल्भतेची अपेक्षा आणि जबाबदारीही येणार आहे.  
नव्या गोष्टींचा, पहिलेपणाचा अनुभव हा चुकांचाच असतो. तीव्र आवेगानं या अनुभवाला भिडताना अनेकदा धडपडायला होतं, जखमा होतात. पण एकदा हा आवेग ओसरला, की आपण त्या गोष्टीकडं चिकित्सक नजरेनं पाहू शकतो. ‘अच्छा, हे असं आहे का? बरं बरं, आत्ता कळलं...’ अशी भावना मनात येते. नव्यानं डाव मांडायला आपण तयार होतो. आपल्या आयुष्यात गेल्या १७ वर्षांत घडलेल्या प्रत्येक बदलाबाबत आता हा विचार करण्याची वेळ आली आहे. २०१८ या वर्षात जर आपण या दृष्टीनं विचार केला, तर पुढची वाटचाल प्रगल्भतेनं करणं सोपं होईल. पूर्वीच्या काळी सुख-सुविधांची वानवा असल्यानं अगदी छोट्या छोट्या गोष्टीही (उदा. एसी थिएटरमध्ये सिनेमा/नाटक पाहणं वा एसी टॅक्सी घरी बोलावून प्रवास करणं) आपल्या मागच्या पिढीला लाभल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आता हे सगळं मिळतं आहे; पण त्याच जोडीला तणावपूर्ण जगण्याचे आणि त्यातून येणारे बीपी, डायबेटिससारखे नवे दागिनेही आपल्याला लाभले आहेत. अनेकांच्या बाबतीत सुखलोलुपतेचा अनुभव पहिलाच असल्यानं त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हेही कळत नाही. थोडक्यात, वय वर्ष १० ते १७ या काळात आपण जेवढा वेडेपणा केला आहे, तेवढाच आपण सगळे आत्ता करतो आहोत. पण, आता हा वेडेपणा संपवून प्रौढ व्हायची संधी २०१८नं आपल्याला दिली आहे. आपल्या जगण्यातले सगळे नवथर अनुभव घेऊन झाले आहेत, अशी स्थिती आज आहे. आता या अनुभवांबाबतची आपली असोशी कमी होत जाईल आणि त्यांच्याकडं चिकित्सक नजरेनं पाहण्याची संधी मिळेल. त्या अर्थानं हे येणारं वर्ष आपल्याला ‘प्रौढ’पणाकडं घेऊन जाणारं आहे. तेव्हा ‘गोइंग ऑन एटीन’ म्हणताना आपल्याला हा ‘प्रगल्भते’चा पैलूही लाभो, इतकंच...
….
(ता. क. कवीनं ‘प्रौढत्वी निज शैशवाचा बाणा’ जपण्यास सांगितलं आहे. तेव्हा प्रौढ झालो, तरी कधी कधी लहान मुलांसारख्या निरागस चुका करायला हरकत नसावी.) 
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, संवाद पुरवणी) 
----

2 comments:

  1. अतिशय सुंदर! खरचं सर्वानी प्रौढ होऊन विचार करण्याची गरज आहे।

    ReplyDelete