22 Jul 2018

लतादीदी, बाबूजी आठवण


लतादीदी, बाबूजी आणि दगडूशेठ...
-------------------------------


बरोबर २५ वर्षे झाली त्या घटनेला... १९९३ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा शताब्दी महोत्सव सुरू झाला होता. त्यामुळं त्यांनी गणपती बसायच्या आधी जवळपास ५० की ५५ दिवस भव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यासाठी सारसबागेजवळच्या सणस मैदानात मोठा मंडप टाकला होता आणि तिथं रोज अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. पावसाळा होता, पण वरून पत्रे वगैरे टाकून तो मोठा मंडप वॉटरप्रूफ करण्यात आला होता. मी तेव्हा पुण्यातगव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये शिकत होतो. मी अनेक दिवस या मंडपात हजेरी लावली आणि तेव्हा सादर झालेले बरेच कार्यक्रम पाहिले. प्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते. माझ्या आठवणीनुसार, हे सर्व दिवस रोज त्यांचं कीर्तन त्या मंडपात होत असे हजारो लोक ते ऐकायला येत असत. बाकी कार्यक्रम आता फार आठवत नाहीत, पण या सोहळ्यांची सांगता नीटच लक्षात आहे. त्याचं कारण म्हणजे त्या दिवशी मी साक्षात लतादीदींना प्रत्यक्ष गाताना ऐकलं. ‘अमृताचा घनुहा कार्यक्रम पं. हृदयनाथ मंगेशकर सादर करीत होते आणि राम शेवाळकर निरूपण करीत होते. हा कार्यक्रम मी प्रथमच पाहत होतो आणि माझे कान अगदी तृप्त झाले. ‘आइसिंग ऑन केकम्हणावे तसं शेवटीपांडुरंग कांती दिव्य तेज झळकतीहा अभंग गायला शेवाळकरांनी आशा भोसलेंनाच बोलावलं. आशाताई आल्या. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार उभं राहून, हातात माइक धरून अत्यंत दणदणीत आवाजातपांडुरंग कांतीसादर केलं. श्रोत्यांना अतोनात आनंद झाला. पण गणपतीबाप्पा त्या दिवशी सगळ्या प्रेक्षकांवर जरा जास्तच प्रसन्न असावा. कारण कार्यक्रमाची सांगता करायला बाळासाहेबांनी समोर बसलेल्या दीदींनाच बोलावलं. ‘पसायदानदीदी म्हणणार हे जाहीर होताच त्या मंडपात अपरिमित आनंदाची झुळूक पसरली. मी तर वेडाच झालो. लता मंगेशकरांना लाइव्ह ऐकायला मिळेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण तो योग आला... दीदी आल्या. त्यांच्या त्या अमृतासम आवाजात त्यांनीआता विश्वात्मके देवेंसुरू केलं आणि भान हरपलं. मी तेव्हा १७-१८ वर्षांचा होतो. असे कार्यक्रम फक्त कानांनी ऐकायचे ते दिवस होते. कानावर पडणारे सूर आत - हृदयात - पोचण्यासाठी वयाला एक मॅच्युरिटी यावी लागते, ती आली नव्हती. तरी दीदींच्या त्या स्वरांनी माझ्या मनावर फार मोठं गारूड केलं. तल्लीन झालो. एकरूप झालो... 
पुढं लता मंगेशकरांना समोरासमोर भेटण्याची प्रश्न विचारायची संधी मिळाली ती . . महाविद्यालयाच्या मैदानात. डिसेंबर २००० मध्ये दीनानाथ रुग्णालयाच्या मदतीसाठी दीदींनी पुण्यातसंगीत रजनीआयोजित केली होती. तेव्हासकाळतर्फे या सर्व कार्यक्रमाचं रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी माझ्यावर टाकली होती. डॉ. धनंजय केळकरांशी ओळख झाली ती याच काळात. . . महाविद्यालयात रजनीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी दीदी रंगीत तालीम करणार होत्या. तेव्हा आम्हा काही पत्रकारांना तिथं जाता आलं. दीदींची रंगीत तालीम पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. मला आठवतंय, दीदींनी सजना बरखा बहार आयीया गाण्याचं बंगाली व्हर्जनना जेबो ना, रोजोनी कोनोबाशी’ (की असंच काही तरी) गायलं होतं. त्या मस्त आनंद लुटत गात होत्या. सहगायकांची गंमत करत होत्या. हे एरवी पाहायला मिळालं नसतं. तिथं या रंगीत तालमीचं शूटिंग एका खासगी न्यूज चॅनेलचा पत्रकार करीत होता. तेवढ्यात आदिनाथ मंगेशकर आले आणि त्यांनी त्या कॅमेरामनचा कॅमेरा जप्तच केला. रंगीत तालमीचं असं शूटिंग करायचं नसतं, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावर त्या दोघांची बरीच वादावादी झालेली आठवतेय. खुद्द पंडितजी मुख्य रंगमंचाच्या बरोबर समोर उभारलेल्या एका उंच व्यासपीठावर (जिथे कॅमेरे लागणार होते) बसून, सर्व व्यवस्था पाहत होते. ‘वेडात मराठे वीर दौडले सातगाण्याची रंगीत तालीम सुरू झाली. दीदींनी पहिला अंतरा, प्रतापराव गुजरांनी ज्या वेगात घोडा फेकला असेल, त्याच वेगात फेकला आणि अंगावर सरसरून काटा आला. एखादं कडवं झालं असेल-नसेल, बाळासाहेबांनी गाणं थांबवलं. ते समोर हेडफोन लावून ऐकत होते. काय झालं कुणालाच कळेना. त्यावर बाळासाहेब हातातल्या स्पीकरवरून ओरडले, की कोरसमध्ये कुणी अमराठी गायक आहे काय? त्यावर एक जण तसा असल्याचं निष्पन्न झालं. बाळासाहेबांनी त्याला या कोरसमध्ये गाऊ नकोस, असं सांगितलं. झालं होतं असं, कीवेडात मराठी वीर दौडले सातही ओळ म्हणताना तो हिंदी गायकदोडलेअसं हिंदी टाइप उच्चारत होता. मराठीनुसार + + डलेअसं उच्चारायला हवं होतं. बाकी मराठी गायक बरोबर उच्चारत होते. फक्त तो हिंदी गायक तेवढा + + डलेअसं उच्चारत होता. बाळासाहेबांच्या तीक्ष्ण कानांनी ती चूक बरोबर हेरली त्याला बाहेर काढलं. तालीम पुढं सुरू झाली. हे पाहून मी थक्क झालो. बाळासाहेबांविषयी आदर होताच; (कोतवाल चावडीसमोर दर रामनवमीला दगडूशेठ गणपतीसमोर होणाऱ्या मैफली आणि त्या मैफलीच्या अंताला होणारंदयाघनाआम्ही कधीच चुकवलं नव्हतं.) पण आता तो शतपटीनं द्विगुणित झाला
तर ही रंगीत तालीम संपल्यावर दीदी खाली उतरल्या. आम्ही पत्रकारांनी त्यांना गाठलं. त्यांच्यासोबत मोहन वाघ होते. त्यांनी आम्हाला सांगितलं, की दीदी आता फार थकल्या आहेत (तेव्हा त्या ७१ वर्षांच्या होत्या), तर तुमच्यापैकी कुणी तरी एकानेच एकच प्रश्न विचारा. असं म्हणून मी त्यांच्या शेजारीच उभा असल्यानं त्यांनी मलाहं, तुम्ही विचाराअसं सांगितलं. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी लगेच दीदींना प्रश्न विचारला, की आत्ता तुमच्या मनात काय भावना आहेत वगैरे. त्यावर दीदींनी यथोचित उत्तर दिलं. त्या माझ्यापासून दोन फूट अंतरावर उभ्या होत्या. डिसेंबरचे दिवस होते. थंडी होती. त्यांनी गळ्याभोवती शाल पांघरली होती. तेवढ्यात आमच्यासोबत असलेल्या एका ज्येष्ठ वृत्तसंपादिकेनं त्यांना आगाऊपणाने विचारलं, ‘दीदी, दीदी, तुम्हाला थंडी वाजतेय का थंडी?’ त्यांच्या या प्रश्नावर हसावं की रडावं हे आम्हाला कळेना. दीदी छानसं हसल्या आणिअहो, मी पुण्याचीच आहे. मला सवय आहे,’ असं काही तरी त्यांच्या किणकिणत्या आवाजात म्हणाल्या आणि लगेच गाडीत बसून निघून गेल्या. वास्तविक त्यांचा मूड चांगला होता. या बाईंनी आगाऊपणा केला नसता, तर त्या आमच्याशी अधिक काही बोलल्याही असत्या. पण ते व्हायचे नव्हते...
त्यानंतर दीदींशी मी फक्त एकदाच बोललो. निमित्त होतं सुधीर फडके यांच्या निधनाचं. तेव्हा मी आमच्या ऑफिसमध्ये आल्यावर बाबूजी गेल्याचं कळलं. तत्क्षणी माझ्या मनात विचार आला, की आपल्याला लतादीदींची प्रतिक्रिया घेता येईल. तेव्हा माझ्याकडं मोबाइल नव्हता. मी आमच्या ऑफिसच्या लँडलाइनवरून थेट डॉ. केळकरांना फोन लावला आणि दीदींची प्रतिक्रिया कधी मिळू शकेल, कुठं फोन करू असं विचारलं. त्यावर ते म्हणाले, ‘दीदी माझ्या शेजारीच आहेत. बोल त्यांच्याशी...’ आणि असं म्हणून त्यांनी थेट दीदींकडंच फोन दिला. मला हे अनपेक्षित होतं. पण मी त्यातून सावरून पटकन कागद-पेन घेतले आणि दीदींशी बोलायला सुरुवात केली. म्हणजे पुढची दहा मिनिटं त्याच बोलत होत्या आणि मी ऐकत होतो. त्या संपूर्ण संभाषणात त्यांनी बाबूजींचा उल्लेखफडकेसाहेबअसाच केला. सावरकर हे आमचं समान दैवत होतं, अशा अर्थाचं काही तरी म्हणाल्या. मला अर्थातच सगळं आठवत नाही, पण एक गोष्ट लख्ख आठवते - ती म्हणजे त्या एकदम म्हणाल्या, ‘अहो, त्यांचं अन् माझं एक ड्युएट आलं होतं. १९४८ मध्ये... कोळ्याच्या राजा रं... (असे काही तरी बोल होते. मला नक्की आठवत नाही....)’ असं म्हणून त्यांनी ते गाणं दोन ओळी चक्क गाऊन दाखवलं. साक्षात लता मंगेशकर फोनवर मला गाणं ऐकवत होत्या. आजूबाजूचा सगळा कोलाहल, गर्दी, आवाज मी पार विसरून गेलो. माझे पंचप्राण माझ्या कानात येऊन थांबले... दीदी गात होत्या... गातच होत्या... 
निरोपाचं काही तरी बोलून मी तो फोन ठेवला. सुमारे दहा मिनिटं त्या बोलत होत्या. त्यांची स्मरणशक्ती पाहून मी चाट पडलो होतो, तर त्यांचे स्वर कानात असल्यानं दुसरं काहीही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हतो. मी तो क्षण माझ्यापुरता धावत्या काळालापॉझकरून मनात कायमचाफ्रीजकरून ठेवला...
सध्या जुलै सुरू आहे. दगडूशेठ गणपतीचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव सुरू आहे... पण कार्यक्रमांचा असा धूमधडाका आता दिसत नाही. फडकेसाहेब आज आपल्यात नाहीत, पण येत्या २५ जुलैला त्यांची जन्मशताब्दी सुरू होईल... लतादीदी आपल्यात आहेत; पण पुष्कळ थकल्या आहेत. त्यामुळं त्यांना आतालाइव्हऐकता येईल, असं वाटत नाही....
जुलैतला पाऊस पडतो आहे... उद्या आषाढी एकादशी आहे... आपापले विठ्ठल आपल्याजवळच असतात... ते मनात असे अखंड पूजायचे असतात... हीच वारी... हेच देवाचे भेटणे... हेच आपले पसायदान...
आणखी काय लिहिणे?
----


7 comments:

  1. वा, अविस्मरणीय अनुभव शेयर केल्याबद्दल आभार

    ReplyDelete
  2. आईवप्पत... खरा भाग्यवंत आहेस तू...

    ReplyDelete
  3. मखमली पेटीत अनंत काळ जपून ठेवाव्यात अशा सुवर्ण स्मृती.

    ReplyDelete
  4. मखमली पेटीत अनंत काळ जपून ठेवाव्यात अशा सुवर्ण स्मृती.

    ReplyDelete
  5. मस्त लिहिलंय श्रीपाद.

    ReplyDelete