18 Jun 2019

रिव्ह्यू - वेलकम होम

काळजात ‘घर’ करणारा...
--------------------------------



घर हा विषय आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा. घराविषयीच्या आपल्या भावना पराकोटीच्या असतात. आपल्याला आपलं घर, आपली स्वत:ची खोली, स्वत:चा कोपरा असं सगळं प्रिय असतं. घरातल्या वस्तूंवरही आपला जीव असतो. आपण कष्टानं आपलं स्वत:चं घर उभं केलेलं असतं. ते ‘आपलं’ असतं आणि म्हणूनच आपल्याला अत्यंत आवडत असतं. पण स्त्रीचा विचार केला, तर तिचं स्वत:चं असं घर कोणतं, असा प्रश्न तिला पडतो. याच प्रश्नाचा वेध घेणारा ‘वेलकम होम’ हा नवा मराठी चित्रपट सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केला आहे.
सौदामिनी ऊर्फ मिनी (मृणाल कुलकर्णी) ही एक उच्चशिक्षित, उच्चमध्यमवर्गीय स्त्री. तिच्या नवऱ्याबरोबर पटत नाही म्हणून ती आपल्या वयस्कर सासूबाईंना (की आजेसासू?) व मुलीला घेऊन, सगळा बाडबिस्तरा घेऊन आपल्या आई-वडिलांकडं (मोहन आगाशे व उत्तरा बावकर) आलीय. तिथं तिची धाकटी अविवाहित बहीण (स्पृहा जोशी) राहतेय. एके काळची तिची खोली आता बहीण वापरतेय. आधी ती काही दिवसांसाठी आली असावी, असं आई-वडिलांना वाटतं. पण ती सगळं सोडून घरी निघून आलीय हे लक्षात आल्यावर त्यांच्या चर्चेचं परिमाण बदलतं. हळूहळू सौदामिनीला एकेक प्रश्न पडू लागतात. आपलं घर नक्की कोणतं, असा अगदी मूलभूत प्रश्न तिला पडतो. पण या सिनेमातली पात्रं समजूतदार व शहाणी आहेत. शेवटी या प्रश्नाचं एक सकारात्मक उत्तर मिनीला व आपल्यालाही मिळतं आणि सिनेमा संपतो.
मी काही महिन्यांपूर्वी एका फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट पाहिला. सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर हे माझे अत्यंत आवडते दिग्दर्शक आहेत. त्यांचे बहुतेक सगळे चित्रपट मी पाहिले आहेत आणि काही तर अनेकदा पाहिले आहेत. एखाद्या विषयाचा सर्वांगीण वेध घेणं आणि त्याच वेळी तो विषय मनोरंजकही करणं ही त्यांची खासियत आहे. अत्यंत बांधीव पटकथा, नेमकं कास्टिंग आणि प्रतिपाद्य विषयावर कमालीचं प्रेम ही त्यांच्या सिनेमाची व्यवच्छेदक लक्षणं आहेत. ‘वेलकम होम’ सिनेमा पाहताना ही सगळी पार्श्वभूमी डोक्यात होतीच. तिचा विचार केला, तर मला काही या जोडीचा हा सर्वांत चांगला सिनेमा वाटला नाही. अर्थात ही तुलना त्यांच्याच इतर चित्रपटांशी आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपटांचा दर्जा एवढ्या वर नेऊन ठेवला आहे, की त्या रेषेपेक्षा किंचितही खाली आलेला तो आपल्यालाच प्रेक्षक म्हणून आवडत नाही. ‘वेलकम होम’ हा तसा थोडा खाली आलेला चित्रपट आहे. पण पुन्हा आधी म्हटलं, तसं ही तुलना त्यांच्याच आधीच्या ‘कासव’, ‘अस्तु’, ‘वास्तुपुरुष’ या सिनेमांशी केल्यावरचा निष्कर्ष आहे. ही तुलना करायची नाही, असं ठरवलं, तर सर्वसामान्यत: हा एक चांगलाच चित्रपट आहे. सिनेमाची रेष थोडी खाली आल्यासारखी वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे मला हा चित्रपट काहीसा रखडला होता की काय, अशी शंका आली. निर्मिती अवस्थेत रखडलेल्या चित्रपटांच्या फ्रेममधूनच आपल्याला ते कळतं. ‘वेलकम होम’ पाहताना तसं वाटून गेलं. तसं कदाचित नसेलही... मी जिथं सिनेमा पाहिला तिथल्या प्रोजेक्शनचाही तो दोष असू शकेल. पण वाटलं हे खरं. तिसरं आणि जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे, या जोडीनं निवडलेला हा विषय. खरं तर हा विषय या जोडीच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच, म्हणजे २०-२५ वर्षांपूर्वीच यायला हवा होता. स्त्री-मुक्ती चळवळ तेव्हा जोरात होती. आता वीस वर्षांनंतर हा प्रश्न आहेच; पण त्याहीपेक्षा जटील आणि गुंतागुंतीचे पेच आपल्या आयुष्यात तयार झाले आहेत. अशा प्रश्नांना इतर कुणाच्याही आधी हात घालणं हे या जोडीचं लक्षण आहे. या सिनेमाच्या बाबत मात्र काहीसा जुनाच प्रश्न पुन्हा हाताळला, असं वाटलं.
आता या सगळ्या ‘किंतु-परंतु’नंतरही हा सिनेमा पाहायला हवा, असं मला वाटतं. याचं कारण एकदा प्रतिपाद्य विषय निवडला, की दिग्दर्शकद्वय खूप मनापासून त्यावर काम करतात. या चित्रपटातही त्यांची पटकथा, संवाद, गाणी आणि कास्टिंग या सगळ्याच बाजूंनी चांगलं काम झालंय. त्यातही संवाद आणि मुख्य कलाकारांचा अभिनय ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत. सौदामिनीचं काम करणाऱ्या मृणाल कुलकर्णीच्या कारकिर्दीतील हा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरावा. सुमित्रा भावे- सुकथनकरांच्या सिनेमात ती प्रथमच दिसली. विदाउट मेकअप किंवा अत्यंत कमी मेकअपमध्ये तिचा सिनेमाभर वावर आहे. मृणालचा चेहरा मुळातच प्रसन्न व सुखवस्तू आहे. त्यामुळं तिला घर सुटलेल्या बाईचा अभिनय करणं आणि चेहऱ्यावर सतत रडल्यानं आलेली काहीशी सूज व दुखरा चेहरा घेऊन वावरणं हे आव्हानात्मकच होतं. पण तिनं ते उत्तम पेललंय. इन फॅक्ट, तिच्याकडं पाहून आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा अनेक मिनी अनेकांना दिसू शकल्या असतील, तर ते निखालस या अभिनेत्रीचं यश आहे.
मृणालखालोखाल या चित्रपटात लक्षात राहतो तो सुमीत राघवन. मिनीचा जुना जिवलग मित्र सुरेशचं काम त्यानं केलंय. (वास्तविक या मित्राला जरा बरं नाव देता आलं असतं. सुरेश काय!) सुमीतमध्ये एक अंगभूत प्रसन्नता आणि शांतपणा आहे. या मित्राच्या भूमिकेसाठी तो फार आवश्यक होता. त्यामुळं या सिनेमातले या दोघांचेही सगळे प्रसंग खास जमून आले आहेत. विशेषत: मिनीच्या घरी ते दोघं जातात, तेव्हाचा कुलूप बदलल्याचा प्रसंग खासच!
याखेरीज डॉ. मोहन आगाशे आणि उत्तरा बावकर यांच्याविषयी काय बोलावं? दोघंही अत्यंत सहज अभिनय करतात. म्हणजे ते अभिनय करतात असं वाटतच नाही. उत्तरा बावकर या अभिनेत्रीच्या क्षमतेचा अंदाज ‘वास्तुपुरुष’ पाहिल्यावर येतो. स्पृहा जोशीनंही तिचं काम चांगलं केलंय. या चित्रपटाला आजच्या पिढीच्या विचारांचा एक अँगल हवा होता. त्या गोष्टीची पूर्तता स्पृहाचं पात्र करतं. तिच्या मित्राच्या भूमिकेत सिद्धार्थ मेनन अगदी एक-दोन दृश्यांत दिसतो. सौदामिनीच्या मुलीचं काम करणाऱ्या छोट्या मुलीनंही मस्त काम केलंय. सेवा चौहान यांचा वावर सहज व अस्सल! दीपा श्रीराम अगदी छोट्या भूमिकेतही लक्षात राहण्यासारखं काम करून जातात. तीच गोष्ट सेवा चौहान यांची...! अगदी शेवटच्या दृश्यात सुबोध भावेची एका शॉटपुरती एंट्री आहे.
या चित्रपटात सौदामिनीच्या पतीचं - सदानंदचं - पात्र पडद्यावर कधीच येत नाही. त्यामुळं त्याची अशी काही बाजू असेल, तर ती समोर येत नाही. अर्थात सिनेमा सौदामिनीच्याच बाजूनं बोलतो असंही नाही. मुळात कुठल्याच पात्राच्या बाजूनं झुकतं माप घेणं हे यात होत नाही. परिस्थितीनुसार, माणसं कशी रिअॅक्ट होतात, हे अगदी नैसर्गिकरीत्या समोर येतं. घरासंबंधी वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या भावना आणि मतमतांतरं कोलाजसारखी समोर येत राहतात. ती सगळीच मतं आपल्याच जगण्यातून आलेली असतात व त्यामुळं सहज पटतात.
या चित्रपटात दोन-तीन गाणी आहेत. ‘राधे राधे’ हे गाणं त्याच्या पार्श्वभूमीमुळं लक्षात राहतं. बाकी एक रेव्ह पार्टीतलं गाणं आहे. ते लक्षात नाही. मुळात मला ते सिनेमातही अनावश्यकच वाटलं. तिसरं गाणं कोणतं, ते आता आठवत नाही. पण ते बरं होतं.
सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर असं दोघांचंही नाव दिग्दर्शक म्हणून असल्याचा या जोडीचा हा शेवटचा सिनेमा असावा बहुतेक. कारण यानंतर सुमित्रा भावेंनी केलेला ‘दिठी’ही मी पाहिलाय. त्यावर ‘दिग्दर्शक’ म्हणून फक्त सुमित्रा भावेंचं नाव आहे. त्यामुळं एका अर्थानं ही ऐतिहासिक कलाकृती आहे. घराविषयीच्या आपल्या संकल्पना पुन्हा नव्यानं तपासण्यासाठी जरूर पाहा.

---

दर्जा : साडेतीन स्टार

---

No comments:

Post a Comment