15 Feb 2020

मटा मैफल लेख

चाळिशीतला ‘व्हॅलेंटाइन’
------------------------------आमचा एक मित्र आहे. कथनाच्या सोयीसाठी आपण त्याला कान्हा म्हणू या. तर हा कान्हा आता चाळिशीच्या पार पोचला आहे. तरीही फेब्रुवारीचा दुसरा आठवडा उजाडला, की त्याला छातीत उगाचच धडधड वगैरे व्हायला लागते. वास्तविक ही धडधड हाय बीपी किंवा ॲसिडिटीची असू शकेल, असा पोक्त सल्ला आम्ही मित्र त्याला कायमच देत असतो. मात्र, तो आमच्या या जुलमाच्या फुकटच्या सल्ल्याकडे मुळीच लक्ष देत नाही. ही नाजूक धडधड ‘व्हॅलेंटाइन डे’च्या चाहुलीमुळेच निर्माण झालेली आहे, यावर त्याची नितांत श्रद्धा आहे.
अशा वेळी मग कान्हाला भेटणं क्रमप्राप्त ठरतं. चोवीस तास तारुण्य वाहत असलेल्या रस्त्यावरचं एक स्त्रीलिंगी नाव असलेलं रेस्टॉरंट कान्हा निवडतो, हे सांगायला नकोच. इथं आल्यावर आमच्यासारख्यांचं वयही दहा वर्षांनी कमी होतं, तिथं कान्हाला सोळाव्या वर्षाचा उत्साह यावा, यात नवल नाही. इथं कान्हाचं ठरलेलं कोपऱ्यातलं टेबल आहे. त्याला कधीच वेटिंग करावं लागत नाही. इथं बसल्यानंतर कान्हा ज्या नजरेनं त्या रेस्टॉरंटमधील यच्चयावत बायका स्कॅन करतो, ती नजर केवळ देवलोकीच्या गंधर्वांनाच लाभलेली असू शकते. ती इहलोकीची नजर नव्हे. आम्ही कधी चुकून नजरानजर करायला गेलो, तर संबंधित पात्रासोबत आलेलं थोराड पुरुषपात्र आमच्याकडं विनाहेल्मेटवाल्याकडं ट्रॅफिकवाला पाहतो तशा नजरेनं पाहतं. आमची पात्रता, अर्थात लायकी लगेच सिद्ध होते. कान्हाच्या राशीत मात्र टॉम क्रूझ किंवा मिलिंद सोमण आदी ग्रह उच्चस्थानी असावेत. कारण तो त्या कोपऱ्यात बसलाय आणि आसमंतातून एकही ओळखीची स्त्री येऊन त्याला भेटून गेली नाही, असं एकदाही झालेलं नाही. तर अशा रीतीनं हा सगळा सोहळा साग्रसंगीत पार पडल्यानंतर कान्हा माझ्याकडं वळाला.
‘हं, बोल... काय म्हणतोय तुमचा व्हॅलेंटाइन डे?’
‘आमचा व्हॅलेंटाइन डे संपला कधीच... दहा वर्षं झाली त्याला... तुमचं घोडं फुरफुरतंय पण अजून...’ मी वैतागानं म्हणालो.
‘मला तुझ्यासारख्या पुरुषांचं हेच आवडत नाही,’ कान्हा म्हणाला. ‘तुम्हाला व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे अजूनही ती गुलाबाची फुलं, ते एकाच स्ट्रॉनं कोका-कोला पिणं, अर्धं अर्धं चॉकलेट खाणं, गुडघ्यावर बसून प्रपोज मारणं हेच वाटतं ना?’
‘मग अजून काय वाटायचंय? आणि हे सगळे प्रकार करण्याचं काही एक वय असतं. आपलं ते वय उलटून गेलंय महाराज. वेळेत लग्न केलं असतंस तर आज मुलगा कॉलेजात असता... आणि त्यानं व्हॅलेंटाइन डे साजरा केला असता... आपण नव्हे...’
‘अरे, मुलगा असता तर त्याच्यासोबत मीही व्हॅलेंटाइन डे साजरा केलाच असता. कारण प्रेमाला फक्त ‘प्रेम’ माहिती असतं, वय नाही...’
‘हे डायलॉग सिनेमात ठीक आहेत रे कान्हा... प्रत्यक्ष आयुष्यात आम्ही आता १५-१५, २०-२० वर्षं संसार झालेले काका लोक झालो आहोत. आम्हाला कसला आलाय व्हॅलेंटाइन डे?’
‘तेच म्हणतोय मी! तुम्हाला ‘व्हॅलेंटाइन डे’चा फारच मर्यादित अर्थ दिसतो आणि जाणवतो ना, म्हणून हा सगळा घोटाळा आहे. आणि काय रे, आता तुम्ही ‘काका’ झाला आहात, तर तुमच्या बायकाही काकवा झाल्याच आहेत की...’
कान्हाचं हे वाक्य ऐकून मी दचकलो. याला चारचौघांत काय बोलावं आणि काय उच्चारावं याचं काही भानच नाही. विशेषत: ‘तुमच्या बायका’ हा बहुवचनी उल्लेख अस्मादिकांना किंचित सुखावून, पण बराचसा दुखवून गेला होता. वर हा आमच्या बायकांना काकूबाई म्हणत होता. मुळात असली वाक्यं मोठ्यानं कशाला बोलावीत? मार खाण्याची लक्षणं... पण कान्होबाचं अजिबात तिकडं लक्ष नव्हतं.
‘कामिनी...’ कान्हा थंडपणे उच्चारता झाला. तेवढ्यात शेजारून एक स्वयंघोषित रूपगर्विता जाता जाता ठेचकाळली.
‘कामिनी’त काना जास्त पडला की काय, असा एक भयंकर व्याकरणी विचार मनात येऊन गेला. पण बाई इंग्लिशमधून दोन-तीन उच्चविद्याविभूषित शिव्या हासडून पुढं गेल्या, तेव्हा दोष कान्हाच्या उच्चाराचा नसावा, हे कळलं. कान्हा स्थितप्रज्ञ होता.
‘अरे, हळू बोल. कोण कामिनी?’
‘समोरून तिसरं टेबल. डावा कोपरा... थर्ड इयरला सेकंड सेमिस्टरला भेटली होती.... गोव्याच्या सहलीत हिनं पम्याचा पाय आणि पापड एकदमच मोडला होता...’
एखाद्या ज्ञानकोशानं स्वत:हून माहिती सांगावी तसा कान्हा त्या कोणा कामिनीची कुंडली माझ्यासमोर उलगडता झाला. कान्हाच्या एकूण आयुष्यात आलेल्या, गेलेल्या, टिकून राहिलेल्या, मधल्याच स्टेशनवर चढलेल्या, स्प्रेसारख्या काही काळ सुगंध पसरवून विरून गेलेल्या, मुरलेल्या लोणच्यासारख्या, सर्दीसारख्या सात दिवस टिकलेल्या अशा समस्त बायकांची यादी त्यानंच केली असती, तर महाराष्ट्राला वेगळा स्त्रीकोश करायची गरजच भासली नसती. एवढा अनुभव गाठीशी असलेला कान्हा पाहून मला त्याच्याच नावाने एक मराठमोळा ‘कान्हा डे’ सुरू करावा, अशी कल्पना चाटून गेली.
कान्हा बोलतच होता, ‘आता ही कामिनीच बघ. तेव्हा हजार जण हिच्या मागे असावेत. तेव्हा हिनं भाव दिला नाही. आता ही किमान हजार जणांच्या मागे असेल. पण हिला कुणी भाव देत नाही... त्यामुळं आपला व्हॅलेंटाइन योग्य वयातच पार पडला पाहिजे...’
हे वर्णन खरं तर कान्हालाही लागू होत होतं. पण मी त्याला ऐकवायचं धैर्य करू शकलो नाही. (आमचं बिल नेहमी तोच देतो.) मात्र, दांडग्या अनुभवाच्या जोरावर कान्हा मला वाट्टेल ते ऐकवू शकत होता. माझं काम फक्त ऐकून घेण्याचं होतं.
कान्होबा महाराज प्रवचन देते जाहले, ‘प्रेम करण्यासाठी वयाची गरज नसते. उलट आता चाळिशीत आपल्या जोडीदाराची जास्त गरज असते. करिअरमध्ये विशिष्ट टप्पा आलेला असतो. मुलं मोठी झालेली असतात. आर्थिक स्थैर्य आलेलं असतं. अशा वेळी एकच गोष्ट आपल्याजवळ नसते, ती म्हणजे एकमेकांना द्यायचा वेळ. तेव्हा व्हॅलेंटाइन डेची गिफ्ट म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमचा वेळ दिला पाहिजे. या वयात तुम्ही समाजात काही-एक स्थान मिळवलेलं असतं. काही वेळा तुमचं नावही होतं. अनेक लोक तुम्हाला ओळखू लागतात. तुमच्या पदाला, प्रतिष्ठेला समाजात किंमत असते, मान असतो, प्रतिष्ठा असते. मग त्या पदासाठी, प्रतिष्ठेसाठी अनेक जण तुमच्याशी ओळख वाढवू लागतात. त्यात अनेक जणीही आल्याच. मग गुंते होण्याची शक्यता वाढते. तेव्हा हे सगळं मायाजाल नक्की काय आहे, हे समजून घ्यावं लागतं. आकर्षण नक्की कोणाचं आहे? तुमचं की तुमच्या वलयाचं, हे कळून घ्यावं लागतं.’
कान्हा फारच विलक्षण काही तरी बोलत होता. मला चक्क त्याच्याविषयी आदर वाटू लागला. एवढ्या बायका त्याच्या ओळखीच्या कशा, याचं कोडं सुटतंय असं वाटू लागलं. तेवढ्यात एक ‘सुंदर, खाशी, सुबक ठेंगणी’ येऊन कान्हाला कॅडबरी देऊन गेली. अजून एक काकूसदृश महिला येऊन कान्हाचा चक्क गालगुच्चा घेऊन गेल्या. पण मला आता त्याचं विशेष काही वाटेनासं झालं होतं.
‘मुळात प्रेम ही संकल्पना किती व्यापक आहे! चराचरांत व्यापून प्रेम दशांगुळे उरतंच...’ कान्हा आता छताकडे पाहून बोलत होता. तेव्हा त्यानं बोलण्यातली आध्यात्मिक पातळी गाठली, हे मी ओळ‌खलं. कान्होमहाराज वदले, ‘अशा प्रेमाला कुठल्या तरी ‘डे’ किंवा आठवड्यात अडकवणं मला हास्यास्पद वाटतं. मात्र, प्रतीकात्मक म्हणून तुम्हाला हा सण साजरा करायचाच असेल, तर त्याचं मर्म आधी समजावून घ्या. उगाच फुलं, कॅडबऱ्या आणि सेंटच्या बाटल्या यांच्यावर खर्च करू नका. आता तसंही तुमच्याकडून जरा जास्तीची अपेक्षा असते. तेव्हा जरा हिरे, प्लॅटिनमचं बघा... गमतीचा भाग सोड, पण अरे, खरंच, जरा वेगळा विचार करून पाहा. आता या वयातल्या प्रेमाला घेण्यापेक्षा देण्याची जास्त गरज असते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला द्यायचा असतो तो वेळ, विश्वास आणि कुठल्याही अडचणीत पाठीशी उभं राहण्याचा खंबीर पाठिंबा... मग बघ... प्रेम कसं मुरंब्यासारखं मुरत मुरत गोड होत जातं ते...’
कान्हाच्या या व्याख्यानानंतर मी वेळ, विश्वास आणि पाठिंबा घेऊन घरी निघालो, तर कान्हानं रस्त्यात आल्या आल्या समोरच्या एका देखण्या अंगाकडं बघून जोरात शिट्टी मारली. मी पळायच्या बेतात होतो तोच मला पकडून कान्हा म्हणाला, ‘नीट बघ हिच्याकडं... रश्मी आठवतेय का अकरावी सायन्सची?’
मी कान्हाच्या पाया पडलो आणि त्या तारुण्य वाहत असलेल्या रस्त्यातून, जरा अधिक तरुण होऊन वाहत निघालो...

---

(पूर्वप्रसिद्धी : मटा मैफल पुरवणी, पुणे आवृत्ती; १५ फेब्रुवारी २०२०)

---

3 comments:

  1. खूप आवडली ही व्हॅलेन्टाईन डे ची कथा परत एकदा वाचायला ... रोमँटिक व चिरतरुण कान्हा डोळ्यासमोर उभा राहिला .. किती मस्त रंगवलय आहे हे कान्हाच पात्र...प्रत्यक्ष भेटावस वाटतंय त्याला ..मजा आली वाचताना 👌👍😊

    ReplyDelete