29 Sept 2021

मटा दिवाळी अंक २०२० - अनुवाद लेख

अनुवादात इनकमिंग जास्त; आउटगोइंग कमी...
---------------------------------------------------------

मराठीत सध्या अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळं मराठी वाचकांना जगभरातील उत्तमोत्तम साहित्य मराठीत सहज वाचायला उपलब्ध होत आहे. असं असलं, तरी संख्या वाढल्यानं त्याचा दर्जावर परिणाम झाला आहे का? मराठीतून इतर भाषांमध्ये किती साहित्यकृती जातात? अनुवादकांची संख्या, प्रमाण किती आहे? या सर्व प्रश्नांचा नामवंत अनुवादक व प्रकाशकांशी चर्चा करून घेतलेला धांडोळा...

........

मराठी भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती होत आली आहे. आता तर हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. मराठीत पूर्वीपासून इतर भाषांमधलं साहित्य अनुवादित होऊन येत आहे. इतर भाषांमध्ये, इतर प्रांतांमध्ये, इतर संस्कृतींमध्ये काय चाललं आहे, हे जाणून घेण्याच्या माणसाच्या मूलभूत जिज्ञासेतून हे सगळं परभाषिक साहित्य आपल्याकडे येत असतं. यात अर्थातच इंग्रजीतून भाषांतरित होऊन येणाऱ्या पुस्तकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. इंग्रजीत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती होताना दिसते. ती जागतिक भाषा आहे. त्यामुळं जगातील इतर भाषांमधलं साहित्य इंग्रजीत आधी उपलब्ध होतं. याशिवाय मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषा जाणणाऱ्यांचं विपुल प्रमाण आपल्याकडं आहे. त्यामुळं इंग्रजी पुस्तकं सहज अनुवादित केली जाऊ शकतात. अलीकडच्या काळात अनुवाद मोठ्या प्रमाणावर येताना दिसतात. मराठी भाषेतील अनुवादित साहित्याचं स्थान व महत्त्व एकदम वाढल्यासारखं दिसतं आहे. या तुलनेत मराठीतून इतर भाषांमध्ये किंवा मुख्यत्वे इंग्रजीत किती पुस्तकं भाषांतरित होऊन जातात? मराठी साहित्यव्यवहाराचं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुस्तक व्यवहारांमध्ये काय स्थान आहे, मराठीत होत असलेले अनुवाद संख्येने वाढले असले तरी त्याचा दर्जा योग्य तो राखला जातोय का? या आणि अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह करण्यासाठी काही नामवंत प्रकाशक व अनुवादकांशी प्रस्तुत लेखकानं चर्चा केली. त्यातून काहीएक चित्र समोर आलं. ते मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख.
मराठीत मोठ्या प्रमाणावर होत असलेले अनुवाद ही स्वागतार्ह गोष्ट असली, तरी त्या अनुवादांचा दर्जा राखणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. याशिवाय मराठीतून इतर भाषांमध्ये साहित्य अनुवादित होऊन जाण्यासाठी प्रकाशकांनी पुढाकार घेणं; तसंच लेखकांनी स्वत:ची व्यावसायिक माहिती अद्ययावत ठेवणं, प्रकाशक-लेखकांनी देशभरात फिरणं, इतर भाषांतील साहित्यधुरिणांना भेटणं या गोष्टी सातत्यानं घडत राहायला हव्यात, असा या चर्चेचा एकूण सूर होता. मराठीत दर्जेदार वाङ्मयाची कमतरता नाही येथपासून मराठीत नव्या पिढीत आश्वासक लेखक दिसत नाहीत इथपर्यंत मतं नोंदविली गेली. अनुवाद ही एक गांभीर्यानं करण्याची बाब असून, अनुवादकाला त्या भाषांचं ज्ञान तर हवंच; याखेरीज त्याला दोन्ही संस्कृतींची सखोल माहितीही हवी, हे निरीक्षणही या चर्चेत मांडण्यात आलं.

अनुवादकाला वेगळ्या प्रज्ञेची गरज

मराठी व कन्नड या भाषाभगिनींना जोडणारे अनेक घटक व व्यक्ती आहेत. यात विठ्ठलापासून ते पं. भीमसेन जोशींपर्यंत अनेक उदाहरणे सांगता येतील. याच यादीत अनुवादाच्या क्षेत्रात अतिशय आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे उमा विरुपाक्ष कुलकर्णी. उमाताई कित्येक वर्षांपासून कन्नड पुस्तकं मराठीत अनुवादित करीत आल्या आहेत. या क्षेत्रातला त्यांचा अभ्यास, व्यासंग दांडगा आहे. मराठीतल्या सध्याच्या अनुवाद व्यवहाराबद्दल बोलताना उमाताई म्हणाल्या, “कन्नडमधील साहित्य जसं मराठीत येतं, तसंच मराठीतलंही बरंच साहित्य कन्नड भाषेत भाषांतरित झालं आहे. चंद्रकांत पोकळे यांनीच जवळपास शंभर पुस्तकं कन्नडमध्ये भाषांतरित केली आहेत. विरुपाक्ष कुलकर्णी यांनीही किमान २५ ते २७ पुस्तकं मराठीतून कन्नडमध्ये आणली आहेत. असं असलं, तरी इतर भाषांमधून मराठीत ज्या प्रमाणात अनुवादित साहित्य येतं, त्या प्रमाणात मराठीतून अन्य भाषांमध्ये जाणारं साहित्य तुलनेत कमी आहे. याचं एक कारण असं वाटतं, की आपल्या लेखकांची त्या प्रमाणात चर्चा तिकडं होताना दिसत नाही. आपल्याला भैरप्पा, शिवराम कारंत किंवा गिरीश कार्नाड ही नावं माहिती असतात. त्यांचं काम माहिती असतं. त्या तुलनेत आपल्याकडचे लेखक कमी माहिती असतात. अनिल अवचटांसारख्या लेखकाची केवळ एक किंवा दोनच पुस्तकं त्या भाषेत अनुवादित झाली असतील, तर तिथल्या वाचकांना हा लेखक कसा समजणार? त्याची चर्चा कशी होणार? लेखक हा हिंडता-फिरता पाहिजे. आपल्या लेखकांनी बेंगळुरू, म्हैसुरूमध्ये जायला पाहिजे. त्यांच्या पुस्तकांची प्रकाशनं त्या शहरांमध्ये व्हायला पाहिजेत. तिथल्या लोकांशी, साहित्यिकांशी त्यानं संवाद साधला पाहिजे. असं केलं तर लोकांना त्या लेखकाविषयी कुतूहल निर्माण होईल. त्याच्या पुस्तकांना मागणी वाढेल.”
“मराठीतल्या महत्त्वाच्या प्रवाहांबाबत इतर भाषांमध्ये जरूर कुतूहल होतं आणि आहे,” असं सांगून उमाताईंनी दलित साहित्याचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, “मराठीत साठोत्तरी काळात दलित साहित्य, स्त्री साहित्य, ग्रामीण साहित्य असे वेगवान प्रवाह निर्माण झाले. त्याबाबत कन्नड साहित्यिकांमध्ये किंवा तिथल्या साहित्य वर्तुळात जरूर चर्चा होत असे. कुतूहल वाटत असे. मात्र, पुढच्या काळात हे कुतूहल टिकवण्याचं किंवा शमवण्याचं काम त्या ताकदीनं करण्यात आपल्याकडचा साहित्यप्रवाह कमी पडला, असं दिसून येतं. आपल्याकडची पुस्तकं तिकडं मोठ्या प्रमाणात अनुवादित होऊन का जात नाहीत, तर मुळात याचं उत्तर असं आहे, की अनुवाद हे वेळखाऊ काम आहे. मीही सुमारे २५ ते ३० लेखकांचं साहित्य अनुवादित केलं आहे. त्यातले काही लेखकच वाचकांपर्यंत पोचले आहेत. याचाही विचार करायला हवा. वेळेचं म्हणून एक ‘अर्थकारण’ असतं. त्यात हे अनुवादाचं काम बसत नाही. मी काही अनुवादाच्या कामावर अवलंबून नाही. माझ्या आनंदासाठी मी हे काम करते. त्यासाठी पुष्कळ वेळ देते. ज्या लेखकाचं पुस्तक अनुवादित करायचंय त्याला त्याच्या शहरात जाऊन किमान एकदा तरी भेटते. त्याचं घर, परिसर, पर्यावरण सगळं पाहते. तो बोलतो कसा, वावरतो कसा याचं निरीक्षण करते. त्यातून प्रवाही अनुवाद करायला मदतच होते. आता एवढा वेळ कुणी देत नाही. खरं तर अनुवाद ही दोघांनी करायची गोष्ट आहे. माझं बरंचसं काम विरुपाक्ष आणि मी, दोघांनी मिळून केलंय. आपल्याकडेही पूर्वी दोघांनी मिळून अनुवाद केल्याची उदाहरणं आहेत. खरं तर आता एवढी सांस्कृतिक घुसळण होते आहे. लोक या प्रांतातून त्या प्रांतात सहजी जातात. आपल्याकडे कॉस्मोपॉलिटन शहरांत तुमच्या शेजारी आपल्या देशातील कुठल्याही प्रांताचा माणूस राहायला येऊ शकतो. त्याच्याशी मैत्री केली तर आणखी एक भाषा आपल्याला समजू शकते. आपल्याकडे अनेक अभ्यासू माणसं आहेत. दोन मैत्रिणींनी दुपारच्या मोकळ्या वेळात एकत्र येऊन अनुवादाचं काम केलं तर काहीच हरकत नाही. पण हे होताना दिसत नाही. अनुवाद वाचणारा फार सहनशील वाचक असतो. मुळात त्याला त्या परक्या भाषेतील साहित्याविषयी काही तरी कुतूहल असतं, म्हणून तर तो ते पुस्तक आणतो. तेव्हा त्याला समाधान मिळेल असं काम तुम्हाला करता आलं पाहिजे. आपल्याकडचं दलित साहित्य सगळीकडं पोचलंय. याचं कारण तेव्हाच्या प्रचलित साहित्यापेक्षा वेगळा काही आशय देण्याचं काम त्यानं केलं. आताचे लेखक असं काही वेगळं देत आहेत का? वाचकांची भूक भागेल असा आशय पुरवत आहेत का? आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्या साहित्यातून मांडत आहेत का? मराठवाड्यातून खूप चांगले नवे साहित्यिक येत आहेत. शेतकरी आत्महत्या ही आपल्याकडची मोठी समस्या आहे. त्यावर खूप वेळ घेऊन, संशोधन करून काही लिहिलं गेलंय का? तसं साहित्य निर्माण झालं तर ते इतर भाषांतले लोकही आवर्जून वाचतील. याखेरीज आपल्याकडचे प्रस्थापित लेखक स्वत: आपल्या साहित्यकृती अन्य भाषांत जाव्यात म्हणून किती प्रयत्नशील असतात? तुम्ही तुमच्या अनुवादकांना कसं वागवता, यावरही खूप काही असतं. अनुवादकाला तो मान मिळायला नको का? अनुवादकाला वेगळ्या प्रकारची प्रज्ञा गरजेची असते. हे खूप गांभीर्यानं, अभ्यास करून, वेळ देऊन करायचं काम आहे.”
“आपल्याकडं एकोणिसाव्या शतकात प्रथम अनुवादाचं एक युग येऊन गेलं. तेव्हा अनुवाद हा शब्दही नव्हता. भाषांतर म्हणत असत. परदेशी साहित्यकृतींना मायबोलीचं सौष्ठव देण्याचं काम या काळात झालं. तेव्हा ती त्या काळाची गरज होती. आता स्वातंत्र्योत्तर काळात अनुवाद ही साहित्यिक गरजेपेक्षा वैयक्तिक गरजेची गोष्ट झाली आहे. मुळात वाचकांची संख्या वाढली आहे. त्यामुळं त्यांच्यात वैविध्य आलंय. त्याला आता केवळ फिक्शन किंवा ललितकला नको आहे. त्याला माहितीपर पुस्तकं हवीत, त्याला पर्यटनावरची पुस्तकं हवीत. स्व-मदत प्रकारातली पुस्तकं हवीत. कालांतरानं ही गरजदेखील कमी होत जाईल,” असं निरीक्षणही उमाताईंनी नोंदवलं.

‘आंतरभारती’चं स्वप्न अधुरंच 

पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे म्हणाले, “आपल्याकडे मुद्रणतंत्र आल्यावर प्रकाशन व्यवहाराचा प्रारंभीचा काळ हा 'अनुवाद पर्व' म्हणावा असाच होता. ब्रिटिश राजवटीच्या प्रभावातून इंग्रजी साहित्य व पुस्तके मराठीत येऊ लागली. याचा अर्थ असा नव्हे, की ही प्रेरणा आपण इंग्रजांकडून घेतली. आपल्याकडे सातव्या व आठव्या शतकापासूनच अनुवाद प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्ञानेश्वरपूर्व काळ आणि नंतरचा म्हणजे बाराव्या शतकानंतर आपणाकडे जास्ती अनुवाद संस्कृतमधून आले. प्राकृत, पाली अशा भाषा त्या वेळीही होत्या. ज्यात भारतीय ज्ञानशाखांचा अभ्यास होत होता. इंग्रजीच्या अगोदर संस्कृतमधून खूप भाषांतरे, अनुवाद, आधारित साहित्य मराठीत आले आहे. मराठीत अनेक नाटकं, काव्यरचना संस्कृतमधून आल्या. मराठीच्या व्याकरणावरही संस्कृत भाषेची मोठी छाप आहे. आपणाकडे व्याकरण, भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र, काव्यशास्त्र संस्कृतमधून अनुवादित होत गेले व त्यात पुढे कालमानानुसार बदल होत गेले. ब्रिटिशांच्या प्रभावामुळे जे अनुवाद व ग्रंथ भारतीय भाषांत आले त्यावर इंग्रजी साहित्याचा व भाषेचा प्रभाव होता. इंग्रजीव्यतिरिक्त अन्य जागतिक भाषांतील साहित्य मराठीत यायला काही काळ लागला. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात आपण रशियन, फ्रेंच व इतर अन्य भाषांतील श्रेष्ठ साहित्यकारांचे अनुवाद आपल्याकडे येऊ लागले. ब्रिटिशांच्या प्रभावात आपणास फक्त शेक्सपिअर श्रेष्ठ वाटत होता; पण पुढे टॉलस्टॉय, दोस्तोव्हस्की, काफ्का, सार्त्र, आल्बेर काम्यू अशा किती तरी श्रेष्ठ लेखकांचा परिचय आपणास होऊ लागला.”
मराठीतून इतर भाषांत कितपत अनुवाद जातात, यावर जाखडे म्हणाले, “हे प्रमाण खूप कमी आहे. परंतु 'नॅशनल बुक ट्रस्ट व साहित्य अकादमीमुळे मराठीतील अनेक पुस्तके इतर भारतीय भाषांत अनुवादित झाली. जगभरातील इतर भाषांत झालेल्या अनुवादित पुस्तकांची संख्या फार कमी आहे. इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश भाषांत काही पुस्तके अनुवादित झाल्याचे दिसते. अर्थातच इंग्रजीत ही संख्या थोडी जास्त भरेल. साधारणत: १५०० ते २००० पर्यंत ही संख्या जाऊ शकेल. मुळात इतर भाषांमधील प्रकाशकांनी आपल्या साहित्यकृतीमध्ये रुची दाखवायला हवी. आपण इतर भाषांमधल्या साहित्यकृतीचे हक्क विकत घेतो, त्यांच्या अटी-शर्ती स्वीकारतो. वास्तविक ही देवाण-घेवाण दोन्ही बाजूंनी व्हायला हवी. भारतीय भाषांतील साहित्य अधिक प्रमाणात यायला हवे. ‘आंतरभारती’ ही संकल्पना मुळात तीच होती. मात्र, ते स्वप्न अपूर्णच राहिलं. त्यातल्या त्यात बंगाली किंवा कन्नड या भाषांसोबतचा आपला साहित्यव्यवहार अधिक राहिला आहे. आम्ही ‘उत्तम अनुवाद’ या आमच्या अंकामधून तोच प्रयत्न करीत आहोत. या भाषांव्यतिरिक्त इतर भाषांमधलं साहित्य आम्ही मराठीत आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतीय व इतर जागतिक भाषांतील पुस्तके मूळ भाषेतून येण्याऐवजी इंग्रजीमार्फत जास्त येतात, ही गोष्ट खटकते. आज अनुवादाची पुस्तके जास्त प्रमाणात प्रत्याशित होत आहेत. परंतु ती अभिजात साहित्याची होत नसून लोकप्रिय पुस्तके अनुवादित होत आहेत. ही वाढ नसून सूज आहे. वैचारिक साहित्याचे अनुवाद आपल्याकडे फार कमी येत आहेत. यामुळे वाङ्मयीन अभिरुचीला पोषक असे काही घडत नाही. विक्री हेच उद्दिष्ट समोर ठेवून पुस्तक मराठीत येत आहेत.”
आपल्याकडचे साहित्य कमी प्रमाणात अनुवादित होऊन बाहेर जाते, याबाबत बोलताना जाखडे म्हणाले, “अनुवादकांची उणीव हे एक महत्त्वाचे कारण आहे. आपल्या शेजारच्या राज्यातील वाङ्मय व सांस्कृतिक व्यवहार आपणास समजत नाहीत, ही गोष्ट चांगली नाही. त्या-त्या राज्यात राहणाऱ्या मराठी माणसांनी सांस्कृतिक दूत बनणे गरजेचे आहे. सर्व विद्यापीठांतील इंग्रजी प्राध्यापकांची जबाबदारी मोठी आहे. परंतु इतर भाषांतील समीक्षा, संशोधन व इतर ज्ञानशाखातील पुस्तकांचे अनुवाद होत नाहीत व आपलेही इतर भाषांत फारसे जात नाही. सध्या उथळ गोष्टींना प्रतिष्ठा देण्याचे षडयंत्र प्रभावी आहे. आज मायथॉलॉजीवरची बरीच लोकप्रिय पुस्तके मराठीत अनुवादित केली जात आहेत. आपल्याकडे डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आयुष्यभर याच विषयावर प्रचंड काम केले; परंतु सर्वसाधारण संकलन करून अनेक देव-दैवत विज्ञानावरची किरकोळ रंजक पुस्तके आपण विकत घेत आहोत, अनुवादित करीत आहोत. मूळ मराठीतही खूप मोठे काम झाले आहे. हे लक्षात घेऊन बाहेरचे तेवढे श्रेष्ठ हा समज आपण काढून टाकला पाहिजे.”
इतर भाषांतील पुस्तके अनुवादित करताना स्थानिक प्रतिभेला धक्का बसणार नाही व आपल्या भाषेतील साहित्यकारांचा आत्मविश्वास जाणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे, असं मत जाखडे यांनी मांडलं.

प्रकाशकांचा पुढाकार कमी

‘राजहंस प्रकाशना’चे दिलीप माजगावकर म्हणाले, “मराठीतून अन्य भाषांत अनुवाद होऊन जाण्याचं प्रमाण कमी आहे. आम्ही प्रकाशक मंडळी त्याबाबत जेवढे जागरूक असायला हवे आहोत, तेवढे जागरूक नाही आहोत, असा माझा स्वत:वरून अनुभव आहे. आम्ही व्यक्तिगत पातळीवर आमच्या पुस्तकांची जशी विक्री करतो, तशी व्यवस्था करतो तसं अनुवादित पुस्तकं हेही विक्रीचं एक साधन आहे, हे आम्ही लक्षात घेत नाही. वास्तविक हे लेखक व प्रकाशक या दोघांच्याही हिताचं आहे. मराठीत ‘मसाप’सारखी संस्था असेल किंवा सरकारच्या पातळीवर साहित्य संस्कृती मंडळासारखी संस्था असेल, तशा इतर प्रादेशिक भाषांमध्ये त्यांच्या त्यांच्या संस्था निश्चितच असणार. बंगळुरूमध्ये तर कन्नड भाषेची संस्था आहेच. अशा संस्थांशी संपर्क साधणं, त्यांच्याशी देवाणघेवाण करणं अशा गोष्टी आमच्याकडून केल्या जात नाहीत. त्यासाठी आम्ही आमच्या पुस्तकांची माहिती अगदी प्रादेशिक भाषांमधून नाही, तरी निदान इंग्रजीतून तरी त्याची माहितीपत्रकं तयार करून, त्या त्या संस्थांपर्यंत पोचवायला हवी. तिथल्या माणसांशी संपर्क साधून त्यांना हे सांगायला हवं. केरळमधल्या माणसाला मराठीत काय नवं साहित्य आलं आहे, हे माहितीच नसतं. सर्व प्रकाशकांनी हे करायला हवं. इंग्रजी प्रकाशन संस्थांत मराठी माणसं संपादक म्हणून करीत असतील तर त्यांना मराठीतील दर्जेदार साहित्यनिर्मितीविषयी माहिती असतं. इंग्रजी व मराठीत त्या पद्धतीनं देवाणघेवाण होऊ शकते. गुजराती किंवा कन्नड भाषांमधूनही अशी देवाणघेवाण थोड्या प्रमाणात होते. भविष्यात मराठीतून मोठ्या प्रमाणात अन्य भाषांत अनुवाद होऊन पुस्तकं जाऊ शकतील, एवढी उत्तम निर्मिती मराठीत होत असते.”
मराठीत सध्या येत असलेल्या भारंभार अनुवादामुळे दर्जावर परिणाम होतो का, या प्रश्नावर बोलताना माजगावकर म्हणाले, “निश्चितच दर्जावर परिणाम होतो. आता शब्दाला शब्द अशा पद्धतीचं भाषांतर वाचकाला फार रुचत नाही. अनुवाद ही एक वेगळी कला आहे, ते एक वेगळं शास्त्र आहे. अनुवाद करणाऱ्याला दोन्ही भाषा नीट माहिती असायला हव्यात. केवळ कथानकाचा गोषवारा असं रूप त्या अनुवादाला येत असेल, तर आपल्या चिकित्सक वाचकाला ते लगेच लक्षात येतं. मग वाचक अशा अनुवादाला हातच लावत नाहीत. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर अनुवाद येत असूनही त्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सगळ्याच पुस्तकांचा अनुवाद दर्जेदार असतो असं नाही. घाई केली, की संख्यात्मक फायदा मिळाला, तरी दर्जात्मक फायदा मिळतोच असं नाही. त्याच्यावर परिणाम होतोच. त्यासाठी प्रकाशन संस्थांमध्ये वेगळा संपादक असणं आवश्यक असतं. सगळ्याच प्रकाशन संस्थांमध्ये अशी व्यवस्था असतेच असं नाही. मात्र, तशी गरज असते. छोट्या प्रकाशन संस्थांना हा सेटअप परवडत नाही. त्यामु‌ळे दर्जावर परिणाम होणं अपरिहार्य असतंच.”
“अनुवादात मराठीत चरित्रं-आत्मचरित्रं, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी वाङ्मय, आरोग्य किंवा उपयोजित विषय यांना मागणी असल्याचं दिसतं. फार कमी प्रमाणात कथा-कादंबऱ्यांना प्रतिसाद मिळतो, असं दिसतो. भैरप्पांसारखा लेखक अपवाद! कथा-कादंबऱ्यांना मराठी अनुवादातच नव्हे, तर मूळ मराठी साहित्यातही सध्या कमी मागणी दिसते. कथेला तर नाहीच, असा ‘राजहंस’चा अनुभव आहे. इतर प्रकाशकांचा अनुभव कदाचित वेगळा असू शकेल. ते साहित्यप्रकार वाचण्याचं प्रमाण कमी होताना दिसतं आहे. किंबहुना कथा दिवाळी अंक किंवा मासिकातच वाचाव्यात, असं वाचकांनी ठरवलेलं दिसतं. त्यासाठी दोन-तीनशे रुपये खर्च करून पुस्तक घेण्याची त्यांची फारशी तयारी नसते,” असं निरीक्षण माजगावकर यांनी नोंदवलं.

व्यावसायिक तयारीचा अभाव

‘मेहता प्रकाशन’चे सुनील मेहता म्हणाले, “मराठीत इंग्रजीतूनच सर्वाधिक अनुवाद येतात. इंग्रजीव्यतिरिक्त फ्रेंच, जर्मन किंवा इतर भारतीय प्रादेशिक भाषांमधून थेट मराठीत अनुवाद फारसे होत नाहीत. होत असलेच तरी त्याचे प्रमाण एक टक्काही नाही. इतर भाषांमधून असे साहित्य मराठीत आणण्यासाठी मुळात प्रकाशकांकडे ती जाण असायला हवी. हे प्रकाशकांचंच काम आहे. मराठीतूनही इतर भाषांमध्ये अनुवाद होण्याचे प्रमाण फार कमी आहे. लेखक व प्रकाशक यांच्याकडे व्यावसायिकता हवी. आपल्या साहित्यकृतीचं इंग्लिशमधून सिनॉप्सिस तयार हवं. लेखकाचा इंग्रजीतील परिचय तयार हवा. विक्रीचे आकडे माहिती हवेत. आपल्या साहित्यकृतीच्या काही भागांचं भाषांतर करून तयार ठेवलं पाहिजे. एखाद्याला मराठीतून फ्रेंचमध्ये अनुवाद करून हवा असेल, तर फ्रेंचमध्ये भाषांतर करून देण्याची आपली तयारी हवी. हे काम एकट्या-दुकट्या प्रकाशकाचं नाही. भाषा मंत्रालयाचा साहित्य-संस्कृती विभाग, साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, प्रकाशक परिषद अशा संस्थांनी मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेतलं पाहिजे. मुळात इतर भाषक साहित्यिकांसोबत देवाणघेवाण व्हायला हवी. त्यांना आपल्या साहित्य संमेलनांना आमंत्रित करायला हवे. आपल्याकडे त्या वर्षी आलेल्या महत्त्वाच्या पुस्तकांचा, पुरस्कार विजेत्या पुस्तकांचा कॅटलॉग तयार हवा. संमेलनांत अशा पुस्तकांची जाहिरात व्हायला हवी. वर्षातून तीन ते चार वेळा हे आदान-प्रदान झालं पाहिजे. केवळ लेखक-साहित्यिकच नव्हे, तर सामान्य माणसांकडंही सांगण्यासारखं बरंच काही असतं. त्यांच्याकडून लिहून घेतलं पाहिजे. त्याचं संकलन केलं पाहिजे. प्रकाशकांनीही फिरलं पाहिजे. फ्रँकफर्टसारख्या जागतिक बुक फेअरला भेट दिली पाहिजे. जागतिक साहित्य व्यवहाराकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. तिथल्या घटना-घडामोडी, ट्रेंड जाणून घेतले पाहिजेत. आता मल्टिमीडिया पुस्तकांचाही ट्रेंड येऊ घातला आहे. आपल्याला याची जाण पाहिजे. आपल्या वाचकांच्या संदर्भात काय करता येईल, याचा विचार करत राहिलं पाहिजे.”
अनुवादाचे प्रमाण भरमसाठ वाढल्याने त्याचा दर्जावर परिणाम झाला आहे का, या प्रश्नावर मेहता म्हणाले, “दर्जावर परिणाम झालेला नाही. उलट मोठ्या प्रमाणात अन्य भाषांमधले साहित्य मराठीत आले. प्रकाशक अनुवादावर किती मेहनत घेतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अलीकडच्या काळात स्व-मदत प्रकारच्या पुस्तकांची व त्यांच्या अनुवादाची लाटच आली. आयटी इंडस्ट्रीनं हा ट्रेंड आणला. आताच्या वाचकांना सर्व प्रकारचं साहित्य वाचायला हवं असतं. त्यामुळं अनुवाद वाढले. महाराष्ट्रात वाचनसंस्कृती उत्तम आहे, वाढते आहे. उलट ग्रामीण भागात खोलवर प्रकाशक पोचू शकत नाहीत. तिथल्या वाचकांपर्यंत आपण पुस्तकं पोचवू शकलो, तरी खप किती तरी प्रमाणात वाढेल. इतर भाषांमधील साहित्य मराठीत आणताना केवळ व्यावसायिक विचार करून चालणार नाही. आपल्याकडे फारशा येत नसलेल्या उडिया भाषेतील साहित्यही आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आम्ही जाणीवपूर्वक असं काम करतो. अर्थात यासाठी अनुवादकांची नवी, चांगली फळी तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. इतर भाषांमधून मराठीत अनुवाद कमी होतात, त्याला दोन्ही भाषांची जाण असणाऱ्या अनुवादांचा अभाव हेही एक कारण आहे. इंग्रजी अनुवादकांच्या तुलनेत इतर जागतिक भाषांतील अनुवादकांचे प्रमाण कमी आहे. असे अनुवादक उपलब्ध असतील तर त्यांची एखादी यादी प्रकाशनाकडे असायला हवी.”

आजचा वाचक ‘डिमांडिंग’

मंजुल प्रकाशनाचे चेतन कोळी म्हणाले, “मराठीत सध्या अनुवादित पुस्तके येण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे, यात शंका नाही. यात अर्थातच इंग्रजी भाषेतून सर्वाधिक अनुवाद होतात. त्यानिमित्ताने त्या भाषेतले ‘बेस्ट सेलर’ लेखक मराठीत येतात. ‘अमेझॉन’सारख्या बड्या कंपन्या ठरावीक काळाने त्यांच्या साइटवर वेगवेगळ्या याद्या प्रसिद्ध करीत असतात. त्यात जागतिक पातळीवरून ते अगदी प्रादेशिक पातळीवरील पुस्तकांमधील सर्वोत्कृष्ट खपाचे लेखक कोण, हे प्रदर्शित केलं जातं. जगभरातले प्रकाशक या याद्यांवर लक्ष ठेवून असतात. अनेक वाचकही नियमित या याद्या वाचत असतात. अनेकदा तर वाचकच विशिष्ट पुस्तक प्रकाशकांकडे आणून, हे पुस्तक लवकर मराठीत येऊ द्या, असा आग्रह धरतात. निखळ व्यावसायिक अंगानेच बोलायचं झालं तर मराठी साहित्य व्यवहार या अनुवादित पुस्तकांमुळेच तरलाय, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मराठीत काही कायमस्वरूपी लोकप्रिय पुस्तके आहेत. उदा. मृत्युंजय! कितीही बिकट काळ असो, अगदी आत्ताचा करोनाचा वाईट कालखंड असो, ही पुस्तके कायम खपत असतात. त्यातून प्रकाशन व्यवसायाला ऊर्जा मिळत असते. हल्लीचा वाचक खूप डोळसपणे, सजगपणे वाचणारा आहे. त्याच्याकडे तंत्रज्ञान आहे, सोशल मीडिया आहे. त्यामुळे जगभरातल्या घडामोडी त्याला सहजच कळत असतात. आजचा वाचक खूप ‘डिमांडिंग’ आहे. त्यामुळे अनुवादित पुस्तके त्याची भूक भागविण्यासाठी आवश्यक आहेत आणि म्हणूनच त्यांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.”
अनुवादित पुस्तकांमध्ये कुठल्या प्रकारच्या पुस्तकांना मागणी आहे, याबाबतची आपली निरीक्षणे सांगताना कोळी म्हणाले, “कथा-कादंबऱ्या अशा कल्पित लेखनापेक्षा नॉन-फिक्शन प्रकारातील लेखनाला मराठी वाचकांची मागणी अधिक आहे. सेल्फ-हेल्प गटातील पुस्तके सर्वाधिक खपतात, हे सांगायला नकोच. याशिवाय बिझनेस मॅनेजमेंट, विविध उद्योगपतींची आत्मचरित्रं, लोकप्रिय विज्ञान, युवाल नोआ हरारी यांच्यासारख्या लेखकांची पुस्तकं यांना मोठी मागणी आहे. मराठी माणसांना एकूणच चरित्रं, आत्मचरित्रं वाचायला आवडतात. मराठीतील पुस्तके अन्य भाषांमध्ये अनुवादित होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. याचे कारण, इतर भाषिक वाचकांना रुची निर्माण होईल, असे साहित्य आधी आपल्याकडे निर्माण व्हावे लागते. त्यानंतर त्यांचा उत्तम अनुवाद व्हावा लागतो. आता ‘मृत्युजय’ ही कर्णाच्या जीवनावरची कादंबरी असल्याने तिला सर्व भारतात वाचक लाभू शकतो. या कादंबरीचे मुख्य भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. मात्र, बहुतेक वेळा हे अनुवाद इंग्रजी अनुवादावरून करण्यात आले आहेत. तमीळ किंवा तेलगूत हे काम करण्यासाठी मराठी व तमीळ किंवा मराठी व तेलगू अशा दोन्ही भाषा तितक्याच सफाईने जाणणारे अनुवादक मिळणे अवघड आहे. अनेकदा काहींना भाषा येत असते, मात्र अनुवादाचे कौशल्य नसते. अनेक जण तंत्रस्नेही नसतात. प्रकाशकांना वेगाने काम करणारे अनुवादक हवे असतात. तेही कौशल्य अनेकांकडे दिसत नाही. त्यामुळं हे अनुवाद इंग्रजीवरूनच करावे लागतात. काही काही पुस्तकं उत्तम असतात. मात्र, अन्य भाषांमध्ये त्यांचा संदर्भ कसा लावावा, असा प्रश्न पडतो. उदा. माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी उत्कृष्ट आहे, यात वादच नाही. मात्र, उद्या तिचा बंगाली किंवा पंजाबीत अनुवाद करायचा झाला, तर किती अडचणी येतील, कल्पना करून पाहा. त्यातले त्या काळाचे, त्या समाजाचे, त्या भौगोलिक पर्यावरणाचे संदर्भ आपण कसे काय अनुवादित करणार आहोत? याउलट ‘पानिपत’सारखी कादंबरी देशभरात वाचली जाऊ शकते, कारण देशभरातील वाचकांना पानिपतची लढाई या ना त्या प्रकारे नक्की माहिती असते. आता तर त्या विषयावर हिंदी सिनेमाही आला आहे. त्यानंतर अशा कादंबऱ्यांचं अनुवाद येतात आणि त्यांचं चांगले स्वागतही होतं, असा अनुभव आहे. आम्ही अलीकडंच विजय आनंद यांच्यावरचं मूळ मराठीतलं चरित्रात्मक पुस्तक हिंदीत आणलं. विजय आनंद हे मोठे दिग्दर्शक होते, पण हिंदीत किंवा इंग्रजीत त्यांचं एकही चरित्र नाही, असं लक्षात आलं. मग मराठी चरित्राचा अनुवाद केला आणि त्याचं त्या भाषेत चांगलं स्वागत झालं. नरेंद्र दाभोलकर यांचं कामही असंच भाषेपलीकडचं आहे. त्यामुळं त्यांची अंधश्रद्धा निर्मूलनावरची अनेक पुस्तकं हिंदीत आली आहेत. याखेरीज आपण मराठी लोक राष्ट्रीय स्तरावर थोडे बिचकतो, असा अनुभव आहे. अनेक नव्या, तरुण लेखकांना राष्ट्रीय स्तरावरच्या योजना, पारितोषिके, संस्था यांची माहितीच नसते किंवा तिकडं आपली पुस्तकं पाठवण्यात ते हलगर्जी करतात. युवा साहित्य अकादमीचे पुरस्कार असतात. आपल्याकडच्या लेखकांना त्यासाठी अर्ज करा, असं सांगावं लागतं. लेखकाकडं स्वत:ची नीट माहिती असली पाहिजे, अपडेट बायोडेटा असला पाहिजे. या आणि अशा अनेक गोष्टी व्यावसायिक सफाईनं केल्या पाहिजेत. मात्र, आपण मराठी माणसं यात कमी पडतो. याला अर्थातच अपवाद आहेत. मराठीत नव्या पिढीत चांगल्या अनुवादकांची संख्याही फार कमी आहे. तरुण मुलांनी या क्षेत्राकडं यायला हवं. अनुवाद म्हणजे अनुसर्जन! त्याकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, तरच चांगले अनुवादक तयार होतील आणि भाषांमधली ही देवाणघेवाण अधिक सर्जनशील व प्रभावी ठरेल, असं वाटतं.”

'सशक्त आशय मिळतो का?'

‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर म्हणाले, “इतर भाषांतून मराठी भाषेत अनुवादित पुस्तकांचं प्रमाण गेल्या वर्ष-दीड वर्षांत थोडं कमी झालेलं जाणवत असलं, तरी मध्यंतरीच्या काळात हे प्रमाण खूपच वाढलं होतं. मात्र, त्याच्या काही अंशानेही मराठी पुस्तकं इंग्रजी किंवा इतर भाषांत अनुवादित होत नाहीत. आजवर काही लोकप्रिय कादंबऱ्या जरूर प्रसिद्ध झाल्या आहेत, विशेषत: ऐतिहासिक! परंतु गेल्या एक-दोन दशकांतली किती पुस्तकं इतर भाषांत गेली आहेत? सार्वकालीन, सर्वसमावेशक असा सशक्त आशय आपण देतो का, हाही प्रश्न आहेच. त्याचप्रमाणे दोन्ही, तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेले किती अनुवादक आहेत? ही प्रॅक्टिकल अडचण आहे. त्याचप्रमाणे संशोधनात्मक साहित्य निर्माण करायचं म्हणजे आर्थिक प्रश्न निर्माण होतात. मी १७-१८ वर्षांपूर्वी विजय तेंडुलकरांना सरदार पटेलांचं चरित्र लिहिण्याचं सुचवलं. तेव्हा ते म्हणाले, की त्यासाठीचा संशोधनाचा खर्च एका मराठी आवृत्तीला कसा झेपेल? चार-पाच भाषांत त्याचा अनुवाद व्हायला लागेल. परंतु असे ‘पार्टनर्स’ मी मिळवू शकलो नाही. नंतर इंग्रजीतलं बलराज कृष्ण लिखित पटेलांचं चरित्र मी मराठीत अनुवादित करून घेतलं. ‘यांनी घडवलं सहस्रक’, ‘असा घडला भारत’ हे संशोधनात्मक ग्रंथ मी स्वबळावर साकारले. वेळ आणि पैसे भरपूर खर्चले. परंतु दोन्ही ग्रंथ मी इतर भाषांत नेऊ शकलो नाही. त्याचं कारण सक्षम अनुवादकांची वानवा. (म्हणजे उलटा अनुवाद उदा. मराठी ते इंग्रजी!) आर्थिक कारणांसोबतच मराठी माणसाची मानसिकताही कारणीभूत आहे. तो बाहेरच्या राज्यांत पोचत नाही, फिरत नाही; संपर्क वाढवत नाही. तेव्हा आपलं साहित्य बाहेरच्या जगात जाण्यास अंगभूत मर्यादा पडतात.”

'मूळ साहित्यकृतीशी प्रामाणिक राहायला हवं'

गेली ३३ वर्षे अनुवादाचं काम करणाऱ्या ज्येष्ठ अनुवादक लीना सोहोनी यांनी, अनुवाद करताना अनुवादकाला कोणते कष्ट करावे लागतात, उत्तम अनुवादासाठी काय काय प्रयत्न आवर्जून करावे लागतात, याविषयी सांगितलं. त्या म्हणाल्या, “मराठीत इंग्रजी भाषेतून सर्वाधिक अनुवाद केले जातात. पूर्वी मराठी माध्यमांत शिकलेल्या सगळ्या मुलांचं मराठी व इंग्रजी दोन्ही उत्तम असायचं. त्यामुळं इंग्रजीतून मराठीत अनुवाद करणारे भरपूर अनुवादक मिळू शकतात. एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद उत्तम व्हायचा असेल, तर मुळात त्या साहित्यकृतीशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. काहीही गाळायचं नाही आणि स्वत:ची काहीही भर घालायची नाही, हे तत्त्व पाळावं लागतं. आपली भाषा, लेखन कितीही उत्तम असलं, तरी अनुवादात स्वत:ची शैली आणण्याचा प्रयत्न करणं टाळलं पाहिजे. अनुवादकाला स्वत:ला बाजूला करून लेखकाची शैली आत्मसात करावी लागते. सुधा मूर्ती यांची अनेक पुस्तकं मी भाषांतरित केली आहेत. त्यांचं इंग्लिश अगदी सोपं, बाळबोध, शाळेतल्या मुलांसारखं आहे. त्याचं भाषांतर करताना भाषेतला तो निरागसपणा जपणं महत्त्वाचं आहे. सध्या अनुवादित पुस्तकांचं पीक आलेलं दिसत असलं, तरी बरीचशी पुस्तकं नवोदित अनुवादकांनी घाईत केलेली दिसतात. त्यामुळं ही पुस्तकं पहिल्या आवृत्तीपुरतीच मर्यादित राहतात. आपल्याला नवे अनुवादक हवे आहेत. मात्र, त्यांनी घाईघाईत काम करणं टाळणं पाहिजे. अनुवाद म्हणजे पुन:कथन. दुसऱ्यांना एखादी गोष्ट समजावून सांगणं. वाचकांना ‘इम्प्रेस’ करणं हे अनुवादकाचं काम नाही. राजकीय पुस्तकांच्या अनुवादात खूप अभ्यास करावा लागतो. संदर्भ तपासावे लागतात. पूरक वाचन करावं लागतं. कॅथरिन फ्रँक यांनी लिहिलेल्या ‘इंदिरा’ या पुस्तकाचा अनुवाद करताना मला या सर्व गोष्टी कराव्या लागल्या. काही गोष्टी अनुभवाने ठरवाव्या लागतात. दोन्ही भाषांच्या संस्कृतीची जाण असली, तर पुष्कळ संदर्भ समजतात. त्याचा उपयोग होतो. एकेका पुस्तकासाठी किमान सहा महिने तरी वेळ द्यावा लागतो. अभ्यास करून अनुवाद केला, की तो वाचकांना आवडतोच.”

'उत्तम अनुवादकांची कमतरता'

औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाचे साकेत भांड म्हणाले, “मराठीत अनुवादांची संख्या वाढली आहे हे निश्चित. मराठीतून अन्य भाषांमध्ये अनुवादाचं प्रमाण कमी आहे. मराठी भाषा आणि ज्या भाषेत अनुवाद करायचा ती भाषा अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या अनुवादकांची कमतरता हे त्याचं प्रमुख कारण आपण म्हणू शकतो. परंतु त्यासोबतच आणखी एक मुख्य कारण म्हणजे मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याची इतर प्रांतातील लोकांना ओळख करून देण्यात आपणच कुठे तरी कमी पडतोय. जागतिक दर्जा असलेल्या अनेक साहित्यकृती आजतागायत मराठी भाषेत निर्माण झाल्या आहेत. पण हे साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचवायचं कसं याकडे मात्र आपलं तितकं लक्ष नाही. अर्थात काही प्रमाणात असे प्रयत्न सुरू आहेत. भालचंद्र नेमाडे, बाबा भांड, शरणकुमार लिंबाळे, शिवाजी सावंत, लक्ष्मण गायकवाड, रणजित देसाई, व. पु. काळे यांसारख्या प्रथितयश मराठी साहित्याकांक्षा साहित्याचे  इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे मराठीतून अन्य भाषांमध्ये अनुवाद होण्याचं प्रमाण कमी असलं तरी तसे प्रयत्न मात्र नक्कीच सुरू आहेत. इंग्रजीतून मराठीत अनुवाद होणाऱ्या पुस्तकांची संख्या नक्कीच जास्त आहे. पण त्याव्यतिरिक्त आता हिंदी पुस्तकांचे अनुवादही मराठी भाषेत मोठ्या प्रमाणावर होतायत. त्याचं कारण म्हणजे हिंदी भाषेतही वेगवेगळे विषय सध्या हाताळले जातायत. हिंदीतली नवी पिढी तरुणाईसाठी त्यांना भावेल अशा भाषेत जोमानं लेखन करते आहे. हे साहित्य वाचकही उत्तम रीतीने स्वीकारत आहेत. पण त्याव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांमधून मराठी भाषेत होणारे अनुवाद मात्र कमीच आहेत. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे मराठीसह ती विशिष्ट प्रादेशिक उत्तमपणे अवगत असणारे अनुवादक मर्यादित प्रमाणात आहेत. अर्थात अनेक अनुवादकांनी बंगाली, कानडी, तेलगू, गुजराती या प्रादेशिक भाषांमधल्या उत्तमोत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद केला आहे.”
अनुवादाच्या दर्जाबाबत बोलताना साकेत भांड म्हणाले, ‘‘मराठीत होणाऱ्या विपुल अनुवादांमुळे दर्जावर परिणाम झाला आहे असं थेट म्हणता येणार नाही. परंतु कधी तरी अपेक्षेप्रमाणे दर्जेदार अनुवाद मिळत नाही हेही तितकंच खरं आहे. माझ्या मते अनुवादकांनी अनुवाद करताना चिकित्सक पद्धतीनं अनुवाद करायला हवा. जेव्हा तुम्ही दुसऱ्या भाषेतली साहित्यकृती मराठी भाषेत आणता तेंव्हा मूळ लेखकाला काय म्हणायचंय याचा मथितार्थ लक्षात घेऊन अनुवाद व्हायला हवा. असे अनुवादक मिळणं आव्हानात्मक आहे. अर्थात मराठी वाचक सजग आहे. दर्जेदार आणि दर्जाहीन अनुवादातला फरक त्याला नक्कीच माहिती आहे. त्यामुळे दर्जेदार अनुवादालाच तो पसंती देतो. त्यामुळे भाषेचा दर्जा टिकून राहण्यासाठी दर्जेदार काम होणं आवश्यक आहे.”
“मराठीत सध्या फिक्शन, चरित्रं, आत्मचरित्रं, मोटिव्हेशनल, मॅनेजमेंट, आरोग्यविषयक, मानसशास्त्रविषयक, तसेच व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भातल्या पुस्तकांचे अनुवाद मोठ्या प्रमाणात वाचले जातात. इंटरनॅशनल बेस्टसेलर्स असलेल्या अनेक पुस्तकांचे अनुवाद आम्ही प्रकाशित केले आहेत. सध्या स्पर्धेचं युग आहे. त्यामुळे प्रेरणादायी पुस्तकांच्या अनुवादांना वाचकांकडून मोठी मागणी आहे. मराठीत सध्या अनेक तज्ज्ञ अनुवादक आहेत. पुस्तकाच्या आशयानुसार ओघवता अनुवाद करणारे अनुवादक विषयाला योग्य न्याय देतात. कामाचा दर्जा सांभाळण्यासाठी त्यांची त्यावर सातत्यानं काम करण्याची तयारी असते. संपादकांशी बोलून त्यात अपेक्षित असलेले बदल करणं, आवश्यक त्या भागावर काम करणं हा अनुवादाच्या प्रक्रियेचाच भाग आहे. रेफरन्ससाठी अनुवादक इंटरनेटचाही सध्या मोठ्या प्रमाणात वापर करतात. अशा अभ्यासू पद्धतीनं केलेल्या अनुवादामुळे दर्जा सांभाळण्यास मदत होते,” असंही भांड यांनी सांगितलं.

‘प्रकाशकांनी संपर्क वाढवावा’

नगरमध्ये राहून गेली अनेक वर्षं व्रतस्थपणे बंगालीतून मराठीत मोठ्या प्रमाणावर पुस्तके अनुवादित करणारे ज्येष्ठ अनुवादक प्रा. विलास गिते म्हणाले, “मराठीतून अन्य भाषांमध्ये कमी प्रमाणात अनुवाद होतात. काही पुस्तकांचा अनुवाद होऊ शकत नाही. उदा. पुलंची पुस्तकं व त्यातला विनोद. याचं भाषांतर करणं अशक्य आहे. अलीकडे शांता गोखले यांनी ‘स्मृतिचित्रे’चा नवा अनुवाद केला आहे. तो चांगलाच झाला असेल. अनुवाद सतत होत राहिले पाहिजेत, कारण भाषा सतत बदलत असते, असं म्हणतात. जुन्या अभिजात पुस्तकांचे अनुवाद परत परत व्हायला पाहिजेत. मात्र, भाषांतराचा दर्जा सांभाळला पाहिजे. अनेक जण ‘ठोकुनी देतो ऐसा जे’ थाटात काहीही भाषांतर करतात. असं करणं चुकीचं आहे. त्यातल्या त्यात साहित्य अकादमी अनेक चांगल्या अनुवादकांकडून भाषांतर करवून घेते. एकानं केलेला अनुवाद दुसऱ्या अनुवादकाकडं तपासायला पाठवते. तो अनुवाद प्रकाशित करावा की नाही, असं विचारलं जातं. माझ्याकडे असे अनेक अनुवाद तपासायला येतात. त्यात अनेक गमतीजमती असतात. मात्र, काटेकोर तपासणी होत असल्यानं साहित्य अकादमीच्या अनुवादांचा दर्जा चांगला असतो. अनेक प्रकाशकही काटेकोर तपासून घेतात. मात्र, कधी तरी संपादकांकडून काही चुका होताना दिसतात. मराठीतून अन्य भाषांत अनुवाद कमी होतात, याचं कारण प्रकाशक संपर्क साधण्यात कमी पडतात, असं वाटतं. प्रकाशकांनी अन्य भाषिक प्रकाशकांशी संपर्क वाढविला पाहिजे. मराठीत बंगाली व कन्नड या भाषांतून मात्र थेट अनुवाद होऊन येण्याचं प्रमाण चांगलं आहे. नॅशनल बुक ट्रस्टसारख्या संस्था मराठी पुस्तकांचे अनुवाद अन्य भाषांत करून घेतात. साहित्य अकादमीही कधी कधी इंग्रजीवरून अनुवाद करून घेऊ पाहते. माझ्याकडे एकदा बिभूतीभूषण बंद्योपाध्याय यांचा कथासंग्रह पाठवला होता. म्हणजे इंग्लिश अनुवाद पाठवला होता. त्याच्यावरून तुम्ही मराठी अनुवाद करा, असं म्हटले होते. मग मी म्हटलं, मला बंगाली येत असताना मी इंग्लिशवरून कशाला करू? मग मी बंगाली पुस्तक मागवून घेतलं आणि त्यावरून अनुवाद करून दिला. त्यांनीही तो प्रकाशित केला. पूर्वी नियतकालिकांमधून मराठी कथांचे वगैरे अनुवाद येत असत. आता हिंदी नियतकालिकंही बंद पडत गेली. साहित्य अकादमीचं ‘समकालीन भारतीय साहित्य’ हे एकच नियतकालिक राहिलं आहे. त्यात अनुवाद प्रकाशित होतात.”
“चांगला अनुवाद करण्यासाठी त्याला मराठी वळण देणं गरजेचं असतं. मी पहिला अनुवाद केला होता तो ‘रवींद्रनाथांच्या सहवासात’ या पुस्तकाचा. तो अनुवाद वाचताना मलाच वाटलं, की हे मराठी वळणाचं झालेलं नाहीय. मग मी पुन्हा तीनशे पानं लिहिली. तरीही वाटलं, की काही ठिकाणी मराठी वळण वाटत नाही. म्हणून परत तीनशे पानं लिहिली. या अनुवादाला नंतर साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला,” असा अनुभव प्रा. गिते यांनी सांगितला.

आश्वासक लेखकांची कमतरता

‘प्रथम बुक्स’च्या मराठी विभागाचे संपादक व अनुवादक सुश्रुत कुलकर्णी आपला अनुभव सांगताना म्हणाले, “अन्य भाषांतून मराठीत अनुवाद होण्याचे फिक्शनचे प्रमाण नॉन-फिक्शनच्या तुलनेत खूपच कमी आहे. मराठीतून अन्य भाषांमध्ये अनुवाद होण्याचे प्रमाण नगण्यच म्हणावे लागेल. पूर्वी मराठीतील अनेक अभिजात पुस्तके, कादंबऱ्या अन्य भारतीय भाषांत व इंग्रजीतही अनुवादित झाल्या आहेत. मात्र, समकालीन लेखनाविषयी बोलायचे झाले तर मराठीत आत्ता तरी संपूर्ण भारतात अपील होईल, असे लेखन करणारा लेखक विरळाच. ही आपली मर्यादा आहे. चाळिशीच्या आतले किती तरुण लेखक मराठीत सध्या आश्वासक लेखन करीत आहेत, असा प्रश्न विचारला तर फार समाधानकारक उत्तर मिळत नाही. इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद मोठ्या प्रमाणात वाचले जातात. मल्याळी भाषेत तर गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ हा खूप मोठ्या प्रमाणात वाचला जाणारा लेखक आहे. आपल्याकडेही आता परदेशांतील मोठमोठ्या लेखकांचे अनुवाद वाचले जात आहेत. मुराकामी किंवा हरारी यांच्या पुस्तकांच्या अनुवादाला चांगली मागणी आहे. मुळात अनुवाद चांगला होण्यासाठी अनुवादकही चांगल्या दर्जाचे हवेत. अनुवादक केवळ शब्दांचा अनुवाद करत नसतो, तर एक संस्कृतीच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणत असतो. त्यामुळं अनुवादकाला दोन्ही भाषा, तेथील प्रदेश, संस्कृती यांचं उत्तम भान असावं लागतं. तसं नसेल तर अनुवादात उणेपणा येऊ शकतो.”
या प्रातिनिधिक चर्चेनंतर मराठी साहित्यातील अनुवाद प्रक्रियेविषयी काही मौलिक निरीक्षणे नक्कीच हाती गवसली. मराठीत सध्या चलती असलेल्या या सा्हित्यप्रकाराविषयी अधिक जागरूकता, अधिक अभ्यास आणि अधिक कुतूहल निर्माण झाले, तर मराठीत उत्तमोत्तम अनुवाद येतीलच; पण महत्त्वाचे म्हणजे मराठीतून अन्य भाषांत चांगल्या साहित्यकृती जातील आणि मराठीतील सकस साहित्यनिर्मितीची चर्चा जगभर होईल. एवढी अपेक्षा फार नसावी!

---


(पूर्वप्रसिद्धी ः महाराष्ट्र टाइम्स दिवाळी अंक २०२०)

---

1 comment:

  1. सविस्तर वैचारिक लेख...👏👏👏👌👍🙏🌹

    ReplyDelete