16 Sept 2023

लंडनवारी - भाग ९

राजवाडा, गॅलरी अन् पोर्ट्रेट्स...
--------------------------------------------------------लंडन, बुधवार, २३ ऑगस्ट २०२३.

लंडनला आलो आणि बकिंगहॅम पॅलेस पाहिला नाही असं कसं चालेल? हे म्हणजे दिल्लीला जाऊन इंडिया गेट, मुंबईला जाऊन गेट वे ऑफ इंडिया किंवा पुण्याला जाऊन शनिवारवाडा न पाहिल्यासारखंच झालं! वास्तविक मला इंग्लंडच्या राजघराण्याविषयी विशेष रुची अगदी अलीकडं निर्माण झाली. ‘नेटफ्लिक्स’वरील ‘द क्राउन’ ही ब्रिटिश राजघराण्यावरची भव्य मालिका हे त्याचं प्रमुख कारण. ही मालिका पाहिली आणि त्या मालिकेतील अतिशय बारीकसारीक तपशिलांनी, जबरदस्त कास्टिंग आणि उत्कृष्ट निर्मितीमूल्यांनी मी विलक्षण प्रभावित झालो. ही ‘नेटफ्लिक्स’वरील सर्वांत खर्चीक मालिका. या मालिकेसाठी तिच्या कर्त्या-करवित्यांनी केलेले प्रचंड कष्ट जाणवतात. तर सांगायचा मुद्दा, या मालिकेमुळं मला ब्रिटिश राजघराण्याविषयी अतिशय कुतूहल निर्माण झालं. यापूर्वी त्यांच्याविषयी वृत्तपत्रांतून आणि काही प्रासंगिक लेखांतून जेवढं थोडं फार वाचलं होतं, तेवढंच मला माहिती होतं. मात्र, ‘क्राउन’नं माहितीचा महाखजिनाच उघडला. त्यातही या मालिकेत क्लेअर फॉय या अभिनेत्रीनं रंगवलेलं तरुण राणी एलिझाबेथचं काम मला अतिशय आवडलं. एकूणच विसाव्या शतकातील जागतिक इतिहास (अर्थात राजघराण्याच्या संदर्भाने) या मालिकेतून उलगडत जातो. तेव्हा मला या कारणासाठी बकिंगहॅम पॅलेस बघायचाच होता. मी ‘सकाळ’मध्ये १ सप्टेंबर १९९७ रोजी रुजू झालो, तो दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात आहे. आदल्याच दिवशी प्रिन्सेस डायनाचं अपघाती निधन झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या कचेरीत त्याचीच सगळीकडं चर्चा होती. नंतर अगदी अलीकडे एलिझाबेथच्या संदर्भाने मी ‘मटा’त काही लेख लिहिले होते. राणीचं निधन झाल्यावर ‘एक होती राणी’ या शीर्षकाचा लेख तर अगदी अलीकडे प्रसिद्ध झाला होता. या सर्व कारणांनी बकिंगहॅम पॅलेसची भेट चुकवून चालणार नव्हती. तिथं चालणारा ‘चेंजिंग ऑफ द गार्ड्स’ सोहळा पाहण्यासारखा असतो. त्यामुळे तो सोहळा असेल तेव्हाच राजवाड्याला भेट द्यावी असं ठरलं. लंडन मुक्कामी शनिवार-रविवारी अधिक माहिती घेता, असं कळलं, की या सोहळ्याचंही एक वेळापत्रक असतं आणि तो काही रोज होत नाही. मग आम्ही इंटरनेटवर त्या वेळा पाहिल्या तर कळलं, की येत्या आठवड्यात सोमवारी व बुधवारी हा सोहळा आहे. आम्ही गुरुवारी परत निघणार होतो आणि सोमवारी आम्ही ‘लंडन आय’ व ‘मादाम तुस्साँ’ची तिकिटं आधीच काढली होती. तेव्हा उरला बुधवार. मग बुधवारी सकाळी ११ वाजता होणारा हा सोहळा बघायला जायचं आम्ही ठरवलं.
नेहमीप्रमाणे आम्ही तिघं व काका सकाळी आवरून निघालो. बकिंगहॅम पॅलेससाठी ग्रीन पार्क स्टेशनला उतरावं लागतं, हे मी हिथ्रोवरून येताना पहिल्याच दिवशी बघून ठेवलं होतं. त्यामुळं आम्ही बागेतून चालत मेनर हाऊस स्टेशनला गेलो आणि ‘पिकॅडिली लाइन’ घेऊन ग्रीन पार्क स्टेशनला उतरलो. आम्ही इथं आल्यापासून आकाश चक्क रोज निरभ्र होतं. सुंदर ऊन पडत होतं. आम्ही ग्रीन पार्क स्टेशनला उतरून ते अवाढव्य पार्क पायी ओलांडून बकिंगहॅम पॅलेसच्या दिशेनं निघालो. या बागेत बसण्यासाठी भाड्यानं आरामखुर्च्या मिळतात. त्याचे दरही तिथं लावले होते. अनेक लोक त्या खुर्च्या घेऊन ऊन खात बसले होते. मला पुलंनी ‘अपूर्वाई’त लिहिलं होतं ते आठवलं. फक्त इथं झोपताना तोंडावर ‘टाइम्स’ दिसला नाही. मुळात सकाळची वेळ होती, त्यामुळं कुणी ‘पाच मिनिटं जरा पडतो...’ या मूडमध्ये नव्हतं. सगळे मस्तपैकी ते ऊन एंजॉय करत बसले होते. आम्ही दहा मिनिटं चालत बकिंगहॅम पॅलेसच्या प्रांगणात पोचलो. तेव्हा साधारण सव्वादहा वाजले होते. मात्र, तरीही तो सोहळा बघण्यासाठी त्या पॅलेसच्या गेटसमोर प्रचंड गर्दी झाली होती. त्या गर्दीत आम्हीही सामील झालो. अगदी समोरच्या बाजूला व्हिक्टोरिया राणीचं एक शिल्प आहे. त्या शिल्पाभोवती असलेल्या कट्ट्यावरही अनेक लोक बसले होते. आम्ही पॅलेसच्या कंपाउंडच्या बाजूने, पण समोरच्या मैदानाकडं तोंड करून उभे होतो. इथं आता चक्क ऊन लागायला लागलं होतं. काही लोक खाली बसकण मारून बसले होते. ते घोड्यांवरून फिरणारे इथले खास पोलिस गर्दीवर नजर ठेवून होते. त्यातला एखादा अचानक ‘डुगना लगान देना पडेगा,’ असं म्हणतो की काय, असं मला वाटायला लागलं. खरं तर वाट बघून पेशन्स संपायला लागला होता. पुन्हा एकदा तो पोलिस आला आणि पाकीटमारांपासून सावध राहा, तुमच्या सॅक पुढच्या बाजूला घ्या, वगैरे सांगून गेला. आम्ही जरा सावध होऊनच बसलो. अखेर एका कोपऱ्यातून त्या सैन्याची ती टिपिकल धून ऐकू येऊ लागली. एका बाजूने पोलिसांची एक तुकडी आली. त्यांच्यासमोर त्यांचं ते बँडपथक वाजत होतं. पॅलेसच्या एका कोपऱ्यातलं गेट उघडलं व ती तुकडी आत गेली. कंपाउंडच्या आत व पॅलेसच्या इमारतीसमोरही बरीच मोकळी जागा आहे. तिथं त्यांचा ड्युटी बदलण्याचा सोहळा सुरू झाला. मधोमध ते बँड पथक वेगवेगळ्या धून वाजवत होतं. एकेक तुकडी येत होती आणि आधीच्या तुकडीची जागा घेत होती. मग ती तुकडी दुसऱ्या गेटनं बाहेर जात होती. या इंग्रजांना प्रत्येक गोष्टीची रुढी करून ठेवायची फार सवय! अर्थात ते जे काही करत होते, ते शिस्तबद्ध आणि चांगलंच होतं. मात्र, एकूण या सगळ्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न मला पडला. अमृतसरजवळ त्या अटारी-वाघा बॉर्डरवरही मला हाच प्रश्न पडला होता. लोकांना आवडतंय म्हणून चाललंय की काय, असं वाटलं. त्या गार्ड्सचे ड्रेस लालभडक आणि त्यांची ती उंच पिसांची टोपी मात्र मजेदार होती. पायदळ आणि घोडदळ या सगळ्यांची परेड झाली. मग त्या धूनचं वादन झालं. लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि सुमारे ४० मिनिटं चाललेला तो सोहळा एकदाचा संपला. 
बकिंगहॅम पॅलेस आतूनही बघता येतो. हर्ष-अनुजा आणि काका-काकूंनी तिथं खुल्या असलेल्या काही खोल्या बघितल्या आहेत. या वेळी मात्र आम्ही तिकीटही काढलं नव्हतं आणि आम्हाला तेवढा वेळही नव्हता. राणी एलिझाबेथ या आज्जीबाई आत्ता हयात असायला हव्या होत्या, असं मला वाटून गेलं. मी तीन वर्षांपूर्वी इकडं येण्याचा प्लॅन केला होता, मात्र तेव्हा कोव्हिडमुळं आणि लॉकडाउनमुळं तो रद्द झाला होता. तेव्हा आमची ही आज्जीबाई हयात होती. बिचारी माझी वाट बघून बघून गेली. (असं मनातल्या मनात म्हणून मीच माझं सांत्वन केलं.) खरं तर किंग चार्ल्सला रीतीप्रमाणे समाचाराचं भेटायला जायला हवं होतं. मात्र, त्याची फार काही इच्छा दिसली नाही. त्या लोकांनी पण लगेच गेट लावून घेतलं. आमच्यासारखे एवढे पाहुणे आले होते, तर निदान चहा तरी विचारायचा. मात्र, राजघराण्याला एकूण रीत कमीच, असं (मनातल्या मनात म्हणून) आम्ही शेजारच्या बागेची वाट धरली. बाकी हा बकिंगहॅम पॅलेस म्हणजे अगदीच ठोकळा आहे. त्या मानाने अगदी आपल्याकडंही इंग्रजांनी बऱ्या इमारती बांधल्या आहेत. अगदी आपलं राष्ट्रपती भवनच घ्या ना! उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना आहे तो! मात्र, बकिंगहॅम पॅलेसची इमारत अगदी अनाकर्षक, ठोकळेबाज व सर्वसामान्य आहे. सामान्य इंग्लिश लोकांना मात्र या राजघराण्याचं कोण प्रेम! मीडियाचं तर लव्ह-हेट असं नातं आहे. एका बाजूला या राजघराण्यातल्या कुचाळक्या, गॉसिप बाहेर काढण्यात तिथली सायंदैनिकं आघाडीवर असतात, तर दुसरीकडं राजा किंवा राणी म्हटलं, की अति हळवेपणा पण हेच लोक करणार! असो.
त्या सोहळ्यापायी तास-दीड तास तळपत्या उन्हात उभं राहून आमचे पाय गेले होते. मग बागेत जरा टेकणं आलंच. तिथं बसलो असताना एक मराठी तरुण, त्याची बायको व त्यांची अगदी लहान मुलगी आमच्या अगदी जवळच बसले होते. त्यांच्या बोलण्यावरून ते पुण्या-मुंबईतले (त्यातही कोथरूड, एरंडवणे, पार्ले, दादर) होते, हे उघडच समजत होतं. क्षणभर वाटलं, की ‘काय पाव्हणं, कुणीकडे?’ असं विचारावं. मात्र, लंडनच्या ‘झू’मधल्या कावळ्याची पुलंनी सांगितलेली गोष्ट आठवली. मग गप्प बसून राहिलो. थोडं पुढं चालत गेल्यावर एक असंच मराठी कुटुंब दिसलं. ते मराठवाड्याकडं असावं, असं एकूण ‘बारदान्या’वरून वाटलं. इथंही ओळख दाखवण्याचा मोह टाळला. (कारण तेच... ‘झू’मधला कावळा...)
आता आम्हाला नॅशनल गॅलरीत, म्हणजेच ट्रॅफल्गार स्क्वेअरला जायचं होतं. तसं जवळच होतं. पण आम्हाला चालायचा कंटाळा आला होता. म्हणून बसनं जायचं ठरवलं. ग्रीन पार्क सोडून मुख्य रस्त्यावर आलो. रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला उभं राहिलो. इथं बसस्टॉपना इंग्रजी आद्याक्षरांची नावे आहेत. आम्हाला ‘जे’ नावाच्या स्टॉपवर जायचं होतं. ‘सिटी मॅपर’ मदतीला होतंच. नऊ नंबरची बस मिळणार असं दिसत होतं. आम्ही स्टॉपवर उभे होतो, पण लवकर बस येईना. त्या रस्त्यावर हळूहळू बरीच गर्दी वाढताना दिसली. तेवढ्यात बस आली. आम्ही बसमध्ये शिरलो. बसायला जागाही मिळाली. केवळ तीनच स्टॉपनंतर आम्हाला उतरायचं होतं. मात्र, त्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालं होतं. लंडनमध्ये हीच गोष्ट बघायची राहिली होती, तीही झाली. नंतर काही वेळानं अग्निशामक दलाच्या गाड्या विरुद्ध दिशेनं जोरात आवाज करत गेल्या. कदाचित त्यामुळंच रस्त्यातली वाहतूक थांबविली असावी. आमची बस हळूहळू पुढं सरकत होती. अर्थात जॅम असला तरी जॅमला साजेशी गोष्टी - उदा. जोरजोरात हॉर्न वाजवणं, लेन तोडून गाडी घुसवणं, दुचाकी फूटपाथवर चढवणं आणि जोडीला जिभेवर भाषेला वैभव प्राप्त करून देणारे मधुर शब्द - यातलं काहीही नव्हतं. लंडनचं ट्रॅफिक जॅम अगदीच अळणी होतं. आम्ही मात्र बसमध्ये जास्त वेळ बसायला मिळणार, याच आनंदात होतो. शेजारच्या देखण्या इमारती आणि खालच्या फूटपाथवरून चालणारी देखणी माणसं बघत बसलो. एका इमारतीवर तर भलं मोठं मोराचं शिल्पही होतं. तिथल्या एकूण सौंदर्याचा आणि टापटिपीचा आपल्याला नंतर नंतर त्रास व्हायला लागतो हो! असं कुठं असतं का, असं वाटायला लागतं. ट्रॅफिक जॅम ही चिंतन करण्यासाठीची उत्तम जागा असते, एवढं खरं...
अखेर आम्ही त्या चार सिंहवाल्या चौकात पोचलो. चालत मागच्या बाजूला असलेल्या नॅशनल गॅलरीत गेलो. इथंही तिकीटवाल्यांची वेगळी लाइन आणि फुकट जाणाऱ्यांची (म्हणजे आमच्यासारख्यांची) लाइन वेगळी. अखेर आत जाण्याची परवानगी मिळाली. आत गेल्यावर त्या उंच, दगडी व गारेगार इमारतीनं माझं लक्ष वेधून घेतलं. लंडनमधलं वास्तुवैभव ही एक कमाल चीज आहे. प्रत्येक इमारत या लोकांनी काय अप्रतिम, देखणी बांधली आहे! त्यात ही तर चित्रकलेची श्रीमंती मिरवणारी वास्तू! ते भलेमोठे खांब, वरती अर्धगोलाकार घुमट, त्याच्या खाली काचेची नक्षी, प्रत्येक भिंतीवर सुंदर कमानी आणि त्यात लावलेली उंच-भली मोठी आणि केवळ अद्भुत अशी चित्रं! युरोपात मध्ययुगात जे सांस्कृतिक पुनरुत्थान (रेनेसान्स) झालं, त्याची साक्ष मिरवणारी, आश्चर्यानं डोळे विस्फारायला लावणारी किंवा इंग्रजीत ज्याला ‘जॉ ड्रॉपिंग’ म्हणतात, तसली अवस्था आणणारी ती विलक्षण देखणी चित्रं पाहत पुढचा काही काळ कसा गेला, हे मला कळलं नाही. नॅशनल गॅलरी हे प्रत्येकानं अनुभवावं असंच प्रकरण आहे. ते शब्दांत सांगणं कठीण. आपल्याकडच्या आधुनिक चित्रसंस्कृतीवर पाश्चात्त्य चित्रसंस्कृतीचा केवढा पगडा आहे, हे तिथं गेल्यावर कळलं. आपल्याकडच्या चित्रकारांनी ही आधुनिक चित्रकला आपल्या पद्धतीने वाढवली, मोठी केली तो निराळा भाग. मात्र, पहिला प्रभाव नि:संशय या प्रतिभावान युरोपीय चित्रकारांचा होता, असं मला तरी वाटलं. त्या दालनांत तिकडच्या राजे-रजवाड्यांची, ख्रिस्ताची व त्याच्या आयुष्याची, तसंच चर्चची चित्रं अधिक असणार हे स्पष्टच होतं. मात्र, त्या चित्रांसाठी वापरलेले रंग, पोत, एकूणच त्या चित्राचं स्केल हे सगळं फारच अचंबित करणारं होतं. याच गॅलरीत लिओनार्दो द विंची आणि मायकेलएंजेलोची मूळ चित्रंही पाहायला मिळाली. मायकेलएंजेलोचं चित्र अर्धवट सोडलेलं होतं. रेम्ब्रांट सोडला, तर इतर चित्रकारांची नावंही माझ्या लक्षात नाहीत. मात्र, त्यांचीही चित्रं अफलातून होती. त्यातलं एक घोड्याचं जवळपास आठ ते दहा फूट उंचीचं व तेवढ्याच रुंदीचं भव्य चित्र तर मी विसरूच शकत नाही. कमाल!
आम्ही याच नॅशनल गॅलरीत असताना आपल्या ‘चांद्रयाना’च्या सफल चंद्रावतरणाची बातमी व्हॉट्सअपवर समजली. सगळ्या देशभर जल्लोष सुरू झाला आणि तिकडे आम्हीही आनंदलो. क्षणभर वाटून गेलं, की आत्ता आपण भारतात, आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये असायला हवे होतो... मग त्या गॅलरीतील एका बाकावर बसून पुढचा काही वेळ चांद्रयानाच्या बातम्या, व्हिडिओ असं सगळं बघण्यात घालविला. आता दोन वाजून गेले होते. भूक लागली होती. त्यामुळं बाहेर पडलो. इथून जवळच एक सुपर मार्केट होतं. तिथं मिनी लंच पॅक मिळतो, असं आम्हाला अनुजानं सांगितलं होतं. मग आम्ही चालत तिकडं गेलो. तिथून वेगवेगळे चार पॅक घेतले आणि पुन्हा नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीसमोर येऊन एका कट्ट्यावर बसलो. इकडे ही एक चांगली सोय आहे. जागोजागी बसायला बाक असतात. पुरेशी झाडी असल्याने सावली असते. शिवाय कुणीही तुमच्याकडं (ढुंकूनही) बघत नाही. आपलं आपण खात बसायचं. शेजारी जवळच डस्टबिन असतेच कुठं तरी... तिथं कचरा टाकायचा, पाणी प्यायचं आणि पुढं चालू पडायचं. आम्ही ते पॅक घेऊन येत असताना, एका हॉटेलबाहेर बरीच गर्दी दिसली. फायर अलार्म वाजला होता. (दिवसभरातला हा दुसरा अनुभव...) तिथं तातडीनं एक अग्निशामक दलाची गाडी येऊन उभी राहिली होती. अगदी आपल्यासारखेच तिथंही लोक भोवती गोळा झाले होते आणि कुणी कुणी तर व्हिडिओही करत होते. त्या गर्दीतून आम्हाला फार काही दिसेना आणि आगही फार मोठी नसावी. मग आम्ही पुढं निघालो आणि कट्ट्यावर येऊन आमचं खाणं संपवलं.
इथं अगदी समोरच ती नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी होती. नावाप्रमाणेच इथं फक्त व्यक्तिचित्रांचंच प्रदर्शन होतं. आम्ही आत शिरल्यावर एका बाजूला तिकिटाचं काउंटर दिसलं. पुन्हा प्रश्न! तिकीट आहे की फुकट? नील चौकशी करून आला, तेव्हा कळलं, की कुठल्या तरी दोन दालनांत विशेष प्रदर्शनं भरली आहेत, ती बघायची असतील, तर फक्त तिकीट होतं. बाकी अन्य दालनं नेहमीप्रमाणे चकटफू होती. मग आम्ही लगेच एस्कलेटरनं पहिल्या मजल्यावर गेलो. हे संग्रहालयही बऱ्यापैकी मोठं होतं. अधिक चित्रं अर्थातच इथल्या राजघराण्यातल्या व्यक्तींची! ती उत्तमच होती हे खरं; पण साधारण एकाच साच्याची ती चित्रं बघून नंतर फार मजा येईना. अर्थात कीट्स, वर्डस्वर्थ अशा कवींची व्यक्तिचित्रंही होती. ती बघून छानच वाटलं.
याच दालनात बार्कर नावाच्या चित्रकाराचं ‘रिलीफ ऑफ लखनौ’ नावाचं एक चित्र होतं. आपल्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा विषय होता. हा विषय ब्रिटिश चित्रकाराने अर्थातच त्यांच्या बाजूने मांडला होता. लखनौत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना ताब्यात घेतल्याचे ते चित्र आहे. ते चित्र बघून मला अर्थातच वाईट वाटलं. शिवाय वर या चित्रकारानं त्या काळात हे चित्र इंग्लंडभर फिरवून इंग्रजांच्या विजयाचे प्रतीक म्हणून मिरवलं आणि पैसे कमावले म्हणे. या चित्राच्या शेजारीच झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचं अगदी छोटंसं चित्र होतं. तिथं त्यांची माहितीही दिली होती. त्याशेजारीच ‘१८५७ च्या बंडा’ची थोडक्यात माहिती दिली होती. ‘आता त्या ‘शिपायांच्या बंडा’ला काही लोक स्वातंत्र्यसमर असेही म्हणतात,’ असेही तिथं लिहिलं होतं. या घटनेचा परिणाम असा झाला, की राणी व्हिक्टोरियानं ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा कारभार स्वत:च्या, पर्यायानं ब्रिटिश पार्लमेंटच्या थेट नियंत्रणाखाली आणला. या स्वातंत्र्यसमरात भारतभरात एकूण सहा हजार ब्रिटिश नागरिकांना ठार मारण्यात आलं, तर हे ‘बंड’ चिरडण्यासाठी ब्रिटिशांनी जी दडपशाही केली, त्यात त्यांनी तब्बल आठ लाख भारतीयांना ठार केलं, हेही तिथंच लिहिलं होतं. याशिवाय ‘हे बंड दडपण्याचा खर्च म्हणून राणीने भारतात इथल्या लोकांवर १८५८ पासून इन्कम टॅक्स लादला,’ असंही तिथं लिहिलं होतं. लंडनमधील अंडरग्राउंड ट्रेन सुरू झाली १८६३ मध्ये. याशिवाय लंडनमध्ये त्या काळात अनेक विकासकामं सुरू झाली. नॅचरल हिस्टरी म्युझियमची ती भव्य इमारतही १८८१ मध्ये उभारण्यात आली. इंग्लंडच्या या विकासाचं इंगित मला वरच्या त्या माहितीवरून एकदम कळून आलं. बराचसा पैसा तर भारतातूनच आणला होता. अर्थात आता हा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. त्या क्षणी मला तिथं जरा ते आतून लागलं, हे नक्की!
ही गॅलरी बघतानाही भरपूर पायपीट झाली होती. आता आणखी चालण्याची ऊर्जा आमच्यात शिल्लक नव्हती. बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती. गेले आठ दिवस आम्ही सतत फिरत होतो. सतत असा मारा झाल्यावर एका टप्प्यानंतर मेंदूची काही नवं ग्रहण करण्याची क्षमता काही काळ कुंठित होते. माझ्यासाठी तरी बुधवारी संध्याकाळी बहुतेक तो क्षण आला होता.
खरं तर हर्षनं आम्हाला ब्रिटिश म्युझियम आवर्जून बघायला सांगितलं होतं. त्यात ब्रिटनचा आणि लंडनचा इतिहास आणखी तपशीलवार पाहता आला असता. पण तसं तर या एकाच सहलीत आमचं सगळं काही बघून होणार नव्हतं, हे उघड होतं. तरीही आम्ही गेल्या आठ दिवसांत महत्त्वाची सर्व ठिकाणं बघितली होती; तिथं पाय लावले होते. तरीही अजून बरंच काही राहिलंच होतं. पाच वाजून गेले होते आणि आता आम्हाला घरी जायचे वेध लागले होते. जाताना बसने जाऊ या, असं ठरवलं. ट्रॅफल्गार स्क्वेअरवरून ‘वूड ग्रीन’ला जाणारी २९ नंबरची डबल डेकर बस फिन्सबरी पार्कमार्गे जात होती. आम्ही बस स्टॉपवर येताच २९ नंबर आली. आम्ही लगेच बसमध्ये चढून वर धाव घेतली. आणि अहो आश्चर्यम्! समोरच्या दोन्ही सीट मोकळ्या होत्या, याचं कारण ही बस याच स्टॉपवरून सुटत होती. मला तर कमालीचा आनंद झाला. आता पुढचा जवळपास तास-सव्वा तास लंडनच्या मध्यवर्ती भागातून, तेही संध्याकाळच्या मस्त वेळी ही बस मला फिरवणार होती. मी मोबाइल खिशात ठेवून दिला आणि अगदी रिलॅक्स होऊन ती शहरशोभा समोरच्या मोठ्या काचेतून बघू लागलो. (परवा मुंबईत डिझेलवरील शेवटच्या डबल डेकर बसला निरोप, ही बातमी वाचली आणि मुंबईतील डबल डेकर बसमध्ये बसायचे राहिलेच, याची परत एकदा दुखरी जाणीव झाली. आता मुंबईतही लंडनसारख्या एसी, इलेक्ट्रिक डबल डेकर बस येतील. पण त्यात समुद्रावरचा खारा वारा समोरच्या खुल्या खिडकीतून पिऊन घेण्याची मज्जा नसेल... असो.)
सुमारे सव्वा तास हा डबल डेकरचा टिबल-चौबल आनंद लुटल्यावर आमचं घर आलं. स्टॉपला उतरून पुन्हा बागेतून चालत हर्षचं घर गाठलं. आता आमच्या नियोजनातला आजचा हा शेवटचा दिवस होता... आता उद्या संध्याकाळी भारतात परतायचं होतं... त्यामुळं गुरुवारी काहीच कार्यक्रम ठेवला नव्हता...
दमून झोपताना पॅलेस आणि पोट्रेट्सचा कॅलिडोस्कोप डोळ्यांसमोर सिनेमासारखा सरकत होता!(क्रमश:)

-----------------------

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

4 comments:

  1. मस्त लेखन ...सर्व काही डोळ्यासमोर आल...लंडनला न जाता घर बसल्या आमची लंडन वारी झोकात होते आहे ...खूप धन्यवाद 👌👍🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद, वीणाताई!

      Delete