14 Feb 2025

मुंबई ट्रिप ८-२-२०२५

मोठं होत जाण्याचं सुरेल गाणं...
-------------------------------------


मित्र डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही...’ या कार्यक्रमाचा दोन हजारावा प्रयोग मुंबईतील नीता मुकेश अंबानी सेंटरमधील ‘ग्रँड थिएटर’मध्ये होणार आहे, हे कळलं त्याच वेळी या कार्यक्रमाला आपण जायचंच हे मी मनोमन निश्चित केलं होतं. ‘आयुष्यावर बोलू काही...’ (एबीके) कार्यक्रम २००३ मध्ये सुरू झाला. गेली २२ वर्षं तो सतत सुरू आहे. अर्थात सलील व संदीप या दोघांशीही माझी मैत्री या कार्यक्रमापेक्षा जुनी. संदीप व मी तर एकाच कॉलेजचे - पुण्यातील गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकचे. मी पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा संदीप तिसऱ्या वर्षाला (इलेक्ट्रिकल) होता. त्या वर्षीच्या गॅदरिंगमध्ये त्यानं ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यांत’ हे गाणं स्वत: पेटी वाजवून म्हटलं होतं. म्हणजे हे गाणं मी आता ३० हून अधिक वर्षं ऐकतो आहे. (आम्ही तेव्हा काही एकमेकांना भेटलो नाही व मित्रही झालो नाही. नंतर मी ‘सकाळ’मध्ये असताना आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी त्याला हा किस्सा सांगितला होता. तेव्हापासून संदीप मला ‘कॉलेज मित्र’च म्हणतो.) सलीलची ओळखही मी १९९७ मध्ये ‘सकाळ’मध्ये रुजू झाल्यानंतरचीच. सलील व संदीपच्या कार्यक्रमांवर मी आमच्या ‘कलारंजन’ पुरवणीत तेव्हा काही छोटेखानी लेखही लिहिले होते. या दोघांचा ‘आयुष्यावर बोलू काही...’ हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा मी तो लगेचच पाहिला. बहुतेक टिळक स्मारक मंदिरात असेल. या कार्यक्रमाचा ताजेपणा व तारुण्य दोन्ही चटकन जाणवलं. पुढं अनेकदा हा कार्यक्रम ऐकला. कॅसेट आणल्या. सीडी आणल्या. नंतर कार घेतल्यावर याच सीडी सतत वाजत असायच्या. पुढचेही सगळे अल्बम विकत घेतले आणि सतत ऐकत राहिलो....
...म्हणूनच परवा, ८ फेब्रुवारीला ‘एनएमएसीसी’च्या भव्य प्रयोगाच्या सुरुवातीलाच शुभंकर व रुमानी यांनी निवेदन केलं, तेव्हा मला अगदी भरून आलं. कार्यक्रम सुरू झाला आणि सलील व संदीपनं ‘जरा चुकीचे... जरा बरोबर...’ म्हणायला सुरुवात केल्याबरोबर नकळत डोळे वाहू लागले. असं का व्हावं, याचं मला आश्चर्य वाटलं. पण नंतर जाणवलं, की ही तर आपल्याच मोठं होण्याची गोष्ट आहे. सलील, संदीप व मी जवळपास समवयस्क. मी थोडा लहानच त्यांच्यापेक्षा. पण आमची मुलं साधारण एकसारख्या वयाची. ‘अग्गोबाई, ढग्गोबाई’वर महाराष्ट्रातल्या अगणित आयांनी आपापल्या मुलांची जेवणं केली तसं आम्हीही नीलला भरवलं आहे. शुभंकर किंवा रुमानी जसे मोठे झाले तसाच नीलही आता मोठा झाला आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’चा पाचशेवा प्रयोग गणेश कला-क्रीडा मंच इथं झाला होता. तेव्हा नील बराच लहान होता. तो कार्यक्रम ‘झी मराठी’वर नंतर सादर झाला होता. त्यात काही सेकंद लहानग्या नीलवर कॅमेरा गेलेला आहे. आम्हाला अक्षरश: सर्व महाराष्ट्रातून नातेवाइकांनी फोन करून नीलला पाहिल्याचं कळवलं. आम्हीही तो कार्यक्रम कधीही परत टीव्हीवर लागला, की नील दिसेल म्हणून परत परत पाहत असू. अशा वेगळ्याच रीतीनं तोही या कार्यक्रमाशी जोडला गेला आहे. शुभंकरचं गाणं त्याला आवडतं. एकदा पुण्यातल्या त्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (२०१७) कुप्रसिद्ध कसोटी सामन्यात सलील त्याच्या लेकीला - अनन्याला घेऊन आला होता आणि मी नीलला घेऊन गेलो होतो. दुर्दैवानं त्या वेळी एकाच सत्रात आपला डाव गडगडला आणि आम्ही लगेच तिथून निघालो. आमची मुलं अशी सोबत मोठी होत असल्यानं आणि त्यांच्यासोबत आम्हीही पालक म्हणून मोठे होत असल्यानं, ‘एबीके’ हा नुसता कार्यक्रम न राहता, आमच्यासाठी ती एक भावना झाली आहे. कार्यक्रम सुरू होताना डोळ्यांत पाणी का तरळलं, याच्यामागं ही सगळी अबोध कारणं होती. असो.
नीता मुकेश अंबानी सेंटर (एनएमएसीसी) सुरू झाल्यावर आम्ही लगेचच तिथं जाऊन ग्रँड थिएटरला ‘इंडियन म्युझिक फेस्टव्हल’ हा अजय-अतुल यांचा भव्य कार्यक्रम पाहिला होता. त्यानंतर मात्र तिथं काही जाणं झालं नव्हतं. त्यामुळं आता एक मराठी, कवितेचा कार्यक्रम - तोही आपल्या मित्रांचा - होतोय म्हटल्यावर आम्ही लगेचच जायचं निश्चित केलं. बऱ्याचदा अशा ट्रिपच्या वेळी आमच्यासोबत असणारा माझा आतेभाऊ साईनाथ, वहिनी वृषाली व त्यांचा मुलगा अर्णव हेही आमच्यासोबत येणार होते. मग आम्ही एक ‘इनोव्हा’ बुक केली आणि रीतसर एक दिवसाची ट्रिपच ठरवली. मला ते टूर ऑपरेटर तयार करतात, तसा प्रवासाचा कार्यक्रम आखायला आवडतं. आम्हाला नुकताच सुरू झालेला अटल सेतू पाहायचा होता, नवा कोस्टल रोडही पाहायचा होता. मुंबईचा भूगोल मला तोंडपाठ असल्यानं कुठून कुठं, कसं जाणं सोयीचं पडेल हे मला माहिती होतं. अटल सेतूवरून भायखळ्याच्या जिजामाता बागेत असलेल्या भाऊ दाजी लाड म्युझियमला जाणं सोयीचं पडेल, हे लक्षात आलं होतं. हे म्युझियम आम्ही मागे गेलो होतो, तेव्हा बंद होतं. आता नूतनीकरणानंतर ते सुरू झाल्याचं मी बातम्यांत पाहिलं होतं. साईनाथ व मला दोघांनाही संग्रहालयं बघण्यात रुची आहे. त्यामुळं भाऊ दाजी लाड म्युझियमला जाणं नक्की केलं. नंतर कोस्टल रोडनं वांद्र्याला जाऊन, बीकेसीत नीता मुंकेश अंबानी सेंटरला जाणं अगदीच सोयीचं होतं. त्यानुसार सगळं नियोजन केलं. कार्यक्रम रात्री अकराच्या पुढं संपेल आणि तिथं जेवायला थांबलो तर उशीर होईल, हे लक्षात घेऊन निघतानाच पॅक डिनर सोबत घेतलं.
शनिवारी सकाळी बरोबर आठ वाजता कार बोलावली होती. साईनाथची फॅमिली आमच्याकडं येऊन निघेपर्यंत आम्हाला साडेआठ झाले. बरोबर दहा-सव्वादहा वाजता आम्ही खालापूरच्या फूड मॉलवर होतो. तिथं ब्रेकफास्ट करून लगेच निघालो. जेएनपीटीची (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) एक्झिट घेऊन आम्ही अटल सेतूच्या रस्त्याला लागलो. मी पहिल्यांदाच या रस्त्यानं जात होतो. हा रस्ता न्हावाशेवा बंदराकडं जात असल्यानं रस्त्यानं स्वाभाविकच कंटेनरची मोठी गर्दी होती. अटलसेतू बराच पुढं होता. त्या सेतूपासून एक्स्प्रेस-वेपर्यंत स्वतंत्र उड्डाणपूल केल्याशिवाय ही कनेक्टिव्हिटी सुलभ व वेगवान होणार नाहीय, हे लगेच लक्षात आलं. साधारण २५ ते २७ किलोमीटर अंतर प्रवास केल्यानंतर आम्ही अटल सेतूच्या रस्त्याला वळलो. डावीकडं एक वळण घेऊन आम्ही उड्डाणपुलावर आलो. इथूनच अटल सेतू खरं तर सुरू होत होता. हा उड्डाणपूल खालच्या रस्त्याला आडवा छेदून काहीसा उत्तरेला जातो व एका डोंगराच्या बाजूनं शार्प वळण घेऊन पुन्हा पश्चिमेकडं वळतो. तिथंच टोल नाका आहे. तो पार केल्यावर खरा अटल सेतू सुरू झाला. ‘मुंबई २५ किलोमीटर’ अशी पाटी दिसली. अटल सेतूवर सर्वत्र कॅमेरे आहेत आणि वेगमर्यादा पाळूनच गाडी चालवावी लागते. त्यामुळं आमचा ड्रायव्हर त्या मर्यादेत, पण एका लयीत कार चालवत होता. त्या दिवशी (आणि बहुतेक कायमच) त्या सगळ्या परिसरात धुरकं असल्यानं आम्हाला आजूबाजूचा परिसर नीट दिसतच नव्हता. त्यात काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणासाठी दोन्ही बाजूंनी उंच उंच अडथळे उभारले आहेत. उजवीकडं ट्रॉम्बेची अणुभट्टी असल्यानं ती बाजू झाकलेली समजू शकतो. मात्र, डावीकडंही तेवढेच उंंच पत्रे लावून पलीकडचं काही दिसण्याची सोयच ठेवलेली नाही. अर्थात हे अडथळे सर्वत्र नाहीत. थोडं पुढं गेल्यावर डावीकडं अगदी धुरकट असं समुद्राचं पाणी दिसू लागलं. नंतर घारापुरीचा डोंगरही अस्पष्ट दिसू लागला. दोन वर्षांपूर्वी आम्ही घारापुरीला आलो होतो, तेव्हा या पुलाचं काम चालू असलेलं बोटीतून बघितलं होतं. आज त्या पुलावरून घारापुरीचा डोंगर पाहत होतो. एकूणच अटल सेतूवरचा हा प्रवास अतिशय सुखद आणि अभिमानास्पद म्हणावा असा होता. अगदी अर्ध्या तासात एकदम आम्हाला वडाळा, शिवडीचा परिसर दिसू लागला आणि एक से अक अजस्र स्कायस्क्रेपरही दिसू लागल्या. इथं सगळीकडं पाट्या लावल्या असल्या आणि मी ‘गुगल मॅप’ लावला असला, तरी वडाळ्याकडं वळायचं सोडून आम्ही पुढंच गेलो. आता परतीचा मार्ग नव्हता. मग बरंच पुढं जाऊन, ईस्टर्न फ्री वेवरून उतरून, यू टर्न घेऊन आम्ही पुन्हा मागं आलो. अर्थात, ठरलेल्या वेळेच्या आत, म्हणजे बरोबर १२ वाजून १० मिनिटांनी आम्ही भायखळ्याच्या जिजामाता उद्यानाच्या पार्किंगमध्ये होतो. 

शनिवार असल्यानं उद्यानात गर्दी होती. आम्हाला संग्रहालयात जायचं असल्यानं तिथली तिकिटं काढली. (प्रत्येकी २० रुपये फक्त) इथं दर शनिवारी साडेबारा वाजता मराठीतून म्युझियम टूर असते, हे मला माहिती होतं. त्याप्रमाणे तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी ‘त्या मॅडम तिथं एका ग्रुपला माहिती सांगत आहेत,’ असं सांगून त्यांच्याकडं पिटाळलं. त्या मॅडम पाच-सहा जणांच्या एका ग्रुपला इंग्रजीतून (बहुदा त्यात एक परदेशी व्यक्ती असल्यानं) माहिती सांगत होत्या. खरं तर संग्रहालयात सर्व दालनांत माहिती लिहिलीच होती. मग आम्ही त्या मॅडमचा नाद सोडला आणि आपले आपले संग्रहालय फिरायला लागलो. या संग्रहालयाचं मूळ नाव ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ असं होतं आणि ते १८७२ मध्ये सुरू झालं आहे, ही माहिती मला नवीन होती. दीड वर्षांपूर्वी आम्ही लंडनला गेलो असताना, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसमोर अर्धा तास बसूनही केवळ कंटाळा आल्यानं ते म्युझियम बघितलं नव्हतं. (याच संग्रहालयात वाघनखं आहेत हे मला तेव्हा माहिती नव्हतं. नंतर ती साताऱ्यातील संग्रहालयात आली तेव्हा मी व साईनाथनं खास ती बघायला सातारा ट्रिप केली होती.) तर त्याच मूळ नावाचं संग्रहालय आता तरी बघता आलं, याचा एक कोमट आनंद माझ्या मनाला झाला. संग्रहालयाच्या मधोमध त्या युवराज अल्बर्टचा पूर्णाकृती संगमरवरी पुतळा उभारलेला आहेच. संग्रहालय छोटेखानी असलं, तरी आकर्षक आहे. मला तिथं वरच्या मजल्यावर असलेलं, मिनिएचर पुतळ्यांनी सजलेलं दालन विशेष आवडलं. 
संग्रहालयाच्या मागं एक छोटंसं कॅफे आहे. तिथं बसून छान ताक प्यायलो. आता भूक लागली होती. ‘गुगल’वरच जवळपास रेस्टॉरंट शोधलं. अगदी जवळ एक इसेन्स नावाचं रेस्टॉरंट असल्याचं कळलं. मग तिथं गेलो. ते एक हेरिटेज नावाचं जुनं, बैठं असं छान हॉटेल होतं. त्यांचंच हे रेस्टॉरंट होतं. एसी होतं हे महत्त्वाचं. मग तिथं छान, भरपेट जेवलो. तिथले काका मराठीच होते आणि त्यांनी आमची अगदी उत्तम सरबराई केली. बिलही तुलनेनं माफकच होतं. (पुण्याबाहेर गेलं, की हे फार प्रकर्षानं जाणवतं. सगळं स्वस्तच वाटायला लागतं.) 
तिथून आम्हाला कोस्टल रोडला जायचं होतं. पण नीलला राजाबाई टॉवर बघायचा होता. मग टूर कंपन्यांच्या भाषेत आम्ही तिथं एक ‘फोटो स्टॉप’ घेतला. नील व अर्णव खाली उतरले आणि त्या टॉवरचे व परिसराचे भराभर फोटो काढून आले. थोड्याच वेळात आम्ही मरीन ड्राइव्हच्या रस्त्यावर आलो. दोन वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हा या कोस्टल रोडच्या कामासाठी सगळं खोदून ठेवलेलं पाहून वैतागलो होतो. आता त्याच कोस्टल रोडमधून आम्ही निघालो होतो. छत्रपती संभाजीमहाराज किनारी मार्ग मरीन ड्राइव्हपासून बोगद्यात शिरतो, तो थेट पश्चिम किनाऱ्यावर बाहेर पडतो. तिथून खऱ्या अर्थानं कोस्टल रोड सुरू होतो. आम्ही अगदी क्षणार्धात हाजी अलीपाशी आलो. इथून सगळीकडं जाण्यासाठी वेगवेगळे फाटे काढण्यात आले आहेत. रस्त्यावर पाट्या आहेत, पण तरीही गोंधळ होऊ शकतो. आम्ही चुकलो. आमच्याप्रमाणे आणखी दोन ट्रॅव्हल कारही चुकल्या. मग रिव्हर्स घेऊन योग्य रस्त्याला लागलो. पण पुढं गेल्यावर पुन्हा चुकलो. मात्र, मला कोस्टल रोडवरूनच जायचं असल्यानं मी आमच्या ड्रायव्हरला यू टर्न घ्यायला लावला आणि आम्ही वरळीतून पुन्हा रॅम्पवर आलो. आता मात्र आम्ही योग्य रस्त्याला लागलो. हा कोस्टल रोड जिथं जुन्या सागरी सेतूला मिळतो, तिथं निळ्या आकाराच्या दोन लोखंडी कमानी उंच अशा दिसतात. त्या लांबूनही दिसत होत्या. त्यामुळं आम्हाला आपोआप दिशादर्शन झालं. कोस्टल रोडवरून जुन्या सागरी सेतूवर आपण अगदी ‘सीमलेस’ म्हणतात तसं जातो. वरळीकडून जुन्या सेतूवर जायला डाव्या बाजूनं आता एका नव्या रॅम्पचं काम सुरू आहे. काही दिवसांत ते पूर्ण होईल. वांद्रे बाजूच्या टोल नाक्यानंतर आम्ही लगेचच बीकेसीत शिरलो. आमच्या अपेक्षित वेळेच्या अर्धा तास आधीच, म्हणजे दुपारी चार वाजता आम्ही ‘एनएमएसीसी’त पोचलो. पार्किंगला गाडी लावून, मग वर जिओ प्लाझात आलो. तिथं टाइमपास केला. पुण्याहून आलेली काही मंडळी भेटली. साईनाथ व वृषाली पहिल्यांदाच इथं येत होते. मग तो सगळा एरिया त्यांना फिरून दाखवला. तिथं चहापान झालं. थोडं निवांत बसलो. मग फ्रेश झालो. बरोबर सात वाजता प्रेक्षकांना ‘ग्रँड थिएटर’मध्ये आत सोडायला सुरुवात झाली. 
आमच्या दोन्ही मुलांची तिकिटं अगदी पुढं, म्हणजे दुसऱ्या रांगेत होती. आमची साधारण बाराव्या लायनीत होती. मागच्या वेळी आम्ही मधल्या बाल्कनीत बसलो होतो. त्या तुलनेत अगदी खाली बसल्यावर हे थिएटर आणखी भव्य वाटत होतं. बरोबर साडेसातला कार्यक्रम सुरू झाला. पुढचे तीन तास म्हणजे निव्वळ नॉस्टॅल्जिया, धमाल गाणी, आठवणी असं सगळंच होतं. सलील हा मैफलींचा राजा आहे. त्याला मैफल ताब्यात कशी घ्यायची हे व्यवस्थित कळतं. त्यामुळं त्याच्या मैफली रंगत नाहीत, असं सहसा होत नाही. संदीपची हजरजबाबी आणि नेमकी साथ असतेच. ग्रँड थिएटरचं एकूण लायटिंग, नेपथ्य अपेक्षेप्रमाणे भव्य व नेत्रदीपक होतं. सलील व संदीपचे सर्व सहवादक कलाकार आदित्य आठल्ये, डॉ. राजेंद्र दूरकर, रितेश ओहोळ आणि अनय गाडगीळ या सर्वांनी उत्तम साथसंगत केली. आर्या आंबेकर आणि शुभंकर यांनीही काही गाणी म्हटली. ‘एकटी एकटी घाबरलीस ना आई...’ या गाण्याच्या वेळी सलीलनं ‘कोल्ड प्ले’प्रमाणे सर्व प्रेक्षकांना मोबाइलची बॅटरी लावायला सांगितली. क्षणार्धात त्या सभागृहात दीड-दोन हजार हात मोबाइलचा लाइट लावून हलू लागले. ते दृश्य अभूतपूर्व होतं. मराठी कवितेच्या कार्यक्रमाला मिळणारा हा जबरदस्त प्रतिसाद केवळ भारावून टाकणारा होता, यात शंका नाही. या गाण्यानंतर शुभंकरसाठी सलग दोन मिनिटं आम्ही टाळ्या वाजवत होतो, एवढं तो सुंदर गायला. सलीलला अगदी भरून आलं, हे जाणवत होतं. अनेक गाण्यांना ‘वन्स मोअर’ मिळाले, अनेक गाणी सर्वांनी मिळून म्हटली. एकूण ही प्रेक्षकांनीही रंगवलेली मैफल होती. ‘एबीके’च्या बहुतेक प्रयोगांना असाच अनुभव येतो. दोन हजारावा ‘ग्रँड’ प्रयोगही त्याला अपवाद नव्हता. केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, पुणे, नाशिक अशा सर्व ठिकाणांहून रसिक इथं आले होते आणि सलील-संदीपनं कुणालाही निराश केलं नाही.

कार्यक्रम संपल्यावर बाहेर कॅफेटेरियाच्या परिसरात त्या दोघांना भेटायला एकच झुंबड उडाली होती. त्या गर्दीत आम्हीही घुसलो आणि फोटो काढून घेतले. एरवी त्यांना भेटतच असतो, पण या विशेष मैफलीचे फोटो आम्हाला हवेच होते. कार्यक्रम संपल्यावर थोडा वेळ अशी एक शून्यावस्था येते. आम्ही पार्किंगमध्ये जाऊन कारमध्ये बसेपर्यंत आम्ही एकमेकांशी काहीही बोललो नाही. एका अविस्मरणीय मैफलीला मिळालेली ती ‘दिल से’ दाद होती. साडेअकराला पुण्याकडं निघालो. कारमध्येच सगळ्यांनी खाऊन घेतलं. सगळ्यांना झोप येत होती. मधे फूड मॉलला थांबून ड्रायव्हरदादाचं चहा-पाणी झालं. बरोबर अडीच वाजता घरी येऊन पोचलो. घरात गादीला पाठ टेकताच गाढ झोप आली. स्वप्नात मात्र ‘एबीके’ची मैफल सुरूच राहिली...

---

याआधीच्या मुंबई ट्रिपवरचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

वाघनखं पाहण्यासाठी केलेल्या सातारा ट्रिपवरचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----