10 Apr 2023

मुंबई ट्रिप ९-४-२३

‘जिओ’ जी भर के...
-----------------------


एखाद्या ठिकाणी नवं काही झालं, की ते (शक्य असेल तर अर्थात) तातडीने बघावं, असं मला वाटतं. मला नव्या गोष्टींविषयी सतत कुतूहल असतं. शिवाय आपल्याकडे एखादं ठिकाण नवं असताना जितकं चांगलं, आकर्षक असेल तितकं ते नंतर राहीलच असं नाही. मुंबईला सागरी सेतू बांधून तयार झाला, तेव्हा केवळ तो बघायला मी सहकुटुंब मुंबईला गेलो होतो. ही गोष्ट आहे २००९ मधली. त्यानंतर अशी बरीच ठिकाणं एक्स्प्लोअर केली. उदा. हाडशीचं विठ्ठल मंदिर. अगदी अलीकडं २०१८ मध्ये बडोद्याजवळ ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ तयार झाल्यावर लगेच मी सहकुटुंब भेट दिली होती. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (लोकप्रिय नाव - बीकेसी) भलं मोठं जिओ कन्व्हेन्शन सेंटर उभं राहतं आहे, ही बातमी मला कळली तेव्हापासून मला त्या ठिकाणाविषयी उत्सुकता वाटत आली आहे. अगदी गेल्या महिन्यात अखेर हे केंद्र तयार झालं आणि त्याला ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (एनएमएसीसी) असं नाव दिलंय, असं समजलं. (स्वत:चंच नाव दिलं म्हणून आधी नाक मुरडून झालं...) पण जन्मजात कुतूहलापोटी जरा ‘गुगल’ करून या केंद्राची माहिती घेतली. त्यात तिथं ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल : सिव्हिलायझेशन टु नेशन’ अशा लांबलचक नावाचा एक कार्यक्रम सादर होणार आहे हे समजलं. तिथल्या ग्रँड थिएटरविषयी वाचलं होतंच. परदेशांत - न्यूयॉर्कमध्ये किंवा लंडनमध्ये - अशा ब्रॉडवे पद्धतीच्या नाटकांच्या किंवा सांगीतिक कार्यक्रमांच्या भव्य सादरीकरणाविषयी ऐकून माहिती होतं. तसा एखादा कार्यक्रम आयुष्यात एकदा तरी बघायला मिळावा, हे केव्हापासूनचं सुप्त मनातलं सुप्तच स्वप्न होतं. या कार्यक्रमाच्या जाहिरातीमुळं आणि त्यातल्या ग्रँड थिएटरच्या वर्णनामुळं हे स्वप्न अचानक पूर्ण झालं. मी १५ मार्चला सहज ‘बुक माय शो’वर या कार्यक्रमाची माहिती बघत होतो. तेव्हा बरीचशी तिकिटं विकली गेल्याचं दिसलं. मी सहज ९ एप्रिलचं तिकीट काढू या असा विचार केला आणि मला तीन तिकिटं मिळालीही! (नंतर कळलं, की हा शो २३ एप्रिलपर्यंत आहे, पण आता सगळीच तिकिटं विकली गेली आहेत.)
सर्वप्रथम हे सांगायला पाहिजे, की हे केंद्र म्हणजे एक सार्वजनिक ठिकाण आहे. ते अर्थातच सर्वांना खुलं आहे. तेथील कार्यक्रमांना आपण ‘बालगंधर्व’ किंवा ‘गणेश कला-क्रीडा मंचा’त जसं तिकिटं काढून जातो, तसं जाता येतं. त्या सेंटरच्या वेबसाइटवर किंवा ‘बुक माय शो’वर कार्यक्रम व तिकिटांची माहिती मिळते. (सेंटरच्या वेबसाइटवर आपण रजिस्ट्रेशन केलं, तर त्यांच्या आगामी कार्यक्रमांच्या सर्व मेल आपल्याला येतात.) या देखण्या, भव्य सेंटरमध्ये तीन सभागृहं आहेत. सर्वांत मोठं म्हणजे ग्रँड थिएटर. हे नावाप्रमाणेच मोठ्ठं आहे. यात दोन हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी व्यवस्था आहे. अत्याधुनिक सुविधा असलेलं हे थिएटर परदेशातील कुठल्याही अशा थिएटरपेक्षा कमी नसावं. याशिवाय ‘द स्टुडिओ’ नावाचं २५० प्रेक्षकक्षमतेचं आणखी एक सभागृह आहे, तर ‘द क्युब’ नावाचं १५० प्रेक्षकक्षमतेचा समीप रंगमंच इथं आहे. (यातल्या ‘द स्टुडिओ’त शनिवारीच ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे...’ या माझ्या अतिशय लाडक्या कार्यक्रमाचा प्रयोग झाला, हे कळल्यावर आनंद वाटला.) ही सभागृहं अर्थातच (तिकीट काढलं असेल तर) सर्वांना खुली आहेत. आपण आपले स्वत:चे कार्यक्रमही तिथं करू शकतो. (किंबहुना करायला हवेत.)
आम्ही (म्हणजे धनश्री, नील व मी) रविवारी (९ एप्रिल) दुपारी एक वाजता पुण्यातून निघालो. पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर कधीही गेलात तरी कायम ट्रॅफिक असतं. त्यात अनेकदा जॅमही लागतो. त्यात अडकायचं नसेल तर जाण्या-येण्याच्या वेळा ‘ऑड’ ठेवाव्या लागतात. कुठला दिवस आहे, रविवार किंवा लाँग वीकएंड वगैरे फार अभ्यास करावा लागतो. मी नेहमीप्रमाणे तो सगळा करूनच ठेवला होता. त्यामुळं जनरली, रविवारी जेवून लोक झोपतात, त्या वेळी, म्हणजे एक वाजता आम्ही घराबाहेर पडलो. स्वाभाविकच आम्ही कुठेही अडथळा न येता पावणेपाच वाजता बीकेसीत, अगदी ‘एनएमएसीसी’त पोचलो. अर्थात फूड मॉलला एक स्टॉप झालाच. तिथं कायमच गर्दी असते. खाण्यासाठी वेटिंग असतं. मला हे असलं अजिबात आवडत नाही. पण इलाज नव्हता. मग ती महागामोलाची पोटपूजा आटोपून आम्ही एकदाचे पुढं निघालो. तो अर्धा तास वजा केला तर आम्ही बरोबर सव्वातीन तासांत पोचलो होतो. पनवेल संपल्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी सुरू झाली. तरी वाहतूक हलत होती. एका जागेवर थांबावं लागलं नाही. मुंबईत एप्रिल किंवा मेमध्ये प्रचंड उकाडा असतो. त्यामुळं आपली गाडी घेऊन जाणं इष्ट. निदान कारमधल्या एसीमुळे ‘जिवाची होतिया काहिली’चे एपिसोड टळतात. नवी मुंबईपासून पुढं एक रस्ता ठाण्याकडं जातो आणि एक डावीकडं मुंबईला. इथं वास्तविक तसे मोठे व ठळक बोर्ड हवेत. इथं थोडी गडबड होते. अर्थात शेवटी मी योग्य मार्ग धरला. वाशीच्या खाडी पुलावर नेहमीच प्रचंड गर्दी असते. इथं वाहतूक अगदी मंद चालली होती. मानखुर्दला आता मानखुर्द ते घाटकोपर नवा फ्लायओव्हर झाल्याने बीकेसीकडे जायचा वेळ बराच वाचतो. पूर्वी मला वाटतं, सायन, चुनाभट्टीकडून वांद्रे परिसराकडे जावं लागायचं. नव्या फ्लायओव्हरमुळे आम्ही लवकर पोचू असं वाटलं. पण पुढे एका ठिकाणी फ्लायओव्हरवर जाण्याऐवजी खालून पुढे आलो. मग जरा वळसा पडला. तरी आम्ही ४.४५ वाजता बीकेसीत पोचलो. मी बीकेसीचं वर्णन ऐकून होतो, मात्र प्रत्यक्षात तिथं जाण्याचा योग कधी आला नव्हता. त्या फ्लायओव्हरवरून बीकेसीची स्कायलाइन भारी दिसत होती. जणू परदेशात आलोय असंच वाटतं. उंच उंच देखण्या, काचेच्या इमारती, आखीव-रेखीव रस्ते... सगळंच लय भारी! गुगलताईंच्या मदतीनं लगेचच सेंटरपाशी पोचलो. ११ नंबरच्या गेटमधून कार पार्किंगकडे एंट्री आहे. तिथं आपल्याकडे मॉलमध्ये शिरताना होते तशीच सगळी तपासणी झाली. तळघरात चार मजले भरतील एवढं, दोन हजार कार मावतील एवढं प्रचंड पार्किंग आहे. आम्हाला पी-२ म्हणजे वरून खालच्या दिशेने दुसऱ्या मजल्यावर पार्किंग मिळालं. गाडी लावल्यावर तिथल्या पोरानं त्या पिलरचा फोटो काढून घ्या, असं सांगितलं. ते योग्यच होतं, कारण गाडी कुठं लावलीय हे परत आल्यावर तिथं शोधणं कर्मकठीण. लिफ्टमधून वर आलो, तर एका हसतमुख युवतीनं आमचं स्वागत केलं. ‘तुम्ही गल्ली चुकला आहात’ हे तिच्या चेहऱ्यावर जवळपास वाचता येत होतं. तेच तिनं गोड आंग्ल भाषेत सांगितलं. वर मधल्या वेळात तुम्ही काय काय बघू शकता, हेही सांगितलं. तिथं ‘संगम’ नावाचं एक कलाप्रदर्शन भरलं होतं. मात्र, त्याचं तिकीट खालच्या मजल्यावरून काढून आणायचं होतं. आम्ही खाली उतरलो. हा तळमजला म्हणजे या सेंटरचं मुख्य प्रवेशद्वार होतं. आम्ही पोचलो तेव्हा अगदी पाच वाजत होते, त्यामुळं तुरळक गर्दी होती. ती नंतरच्या दोन तासांत बऱ्यापैकी वाढली. आम्ही तो तळमजला बघत हिंडू लागलो. तिथं भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचे स्टॉल होते. बाजूला इन्स्टॉलेशन्स होती, भिंतीवर भव्य पेंटिंग्ज होती. एकूण सगळा प्रकार एकदम उच्च होता. सगळा परिसर सेंट्रली एसी असल्यामुळं उकाड्याचा प्रश्न मिटला होता. जागोजागी खाण्याचे स्टॉल, बसायला जागा, अत्यंत लखलखीत अशा वॉशरूम, तिथंही अपंग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर आणि बॅटरी ऑपरेटेड गाड्या... थोडक्यात, प्रगत देशांत अशा सेंटरमध्ये ज्या ज्या सुविधा असतील, त्या सर्व इथं पुरवण्यात आल्या होत्या. आम्हाला भूक लागली होती, म्हणून समोसा आणि चहा-कॉफी घेतली. दर महाग असले, तरी आपल्याकडच्या मॉल, मल्टिप्लेक्ससारखेच होते. दोन छोटे समोसे ८० रुपयांना, तर चहा व कॉफी प्रत्येकी ६० रुपयांना होती. अर्थात फूडमॉलमधले दर यांहून जास्त होते, त्यामुळं आम्हाला हे ठीकच वाटले. जागोजागी हात सॅनिटाइझ करण्याची व्यवस्था होती आणि डस्टबीनही होत्या. मग आम्हाला एकदम त्या कलाप्रदर्शनाच्या तिकिटांची आठवण झाली. त्या बॉक्स ऑफिसवर विचारलं, तर आजची तिकिटं संपल्याचं तिथल्या (हसतमुख) युवतीनं सांगितलं. थोडक्यात, ते प्रदर्शन बघायचं राहिलं. मग आम्ही खालीच टाइमपास करत बसलो. भरपूर फोटो काढले. तिथं बनारसी साड्यांचं दालन होतं. तिथं एक वृद्ध विणकर आजोबा स्वत: त्या हातमागावर साडी विणण्याचं काम करत होते. पैठणीचं दालन होतं. त्यावर मराठी नावं होती. (या सेंटरमध्ये एक गोष्ट मात्र खटकली. सगळीकडं इंग्रजी व हिंदी पाट्या होत्या. आता देवनागरी म्हणजेच मराठी असं अनेकांना वाटत असल्यानं कुणाला त्यात काही खटकत नसावं. मात्र, मला वाटलं, की व्यवस्थित मराठी पाट्याही तिथं हव्या होत्या.) बाकी एक राजस्थानी चित्रकार होता. एक ओडिशातला पट्टचित्र काढणारा कलाकार होता. एक काश्मिरी शाली विणणारे गृहस्थ होते. लोक कुतूहलानं तिथं जात होते. ती कला बघत होते. मात्र, विक्रीसाठी असलेल्या वस्तू काहीच्या काही महाग होत्या. (उदा. एका शालीची किंमत होती ८६ हजार ९०० रुपये) आम्ही अशा ठिकाणी दुरूनच नमस्कार करून पुढं जात होतो. एका ठिकाणी एक अंध व्यक्ती मेणबत्ती आणि मेणाच्या वस्तू तयार करत होती. त्या वस्तू मात्र सुंदर होत्या. अर्थात त्या खरेदी करून नंतर पडून राहतात. म्हणून आम्ही काहीच घेतलं नाही.
संध्याकाळी त्या सेंटरच्या बाहेर एक मोठं रंगीत फाउंटन सुरू करतात. त्यालाही तिकीट होतं म्हणे. चौकशी केली तर तेही अपेक्षेप्रमाणे ‘सोल्ड आउट’ होतं. वास्तविक आम्ही जिथं बसलो होतो, तिथून काचेतूनही ते दिसणारच होतं. अनेक लोक ते सुरू होण्याच्या अपेक्षेनं काचेसमोरच्या जागा पकडून बसले. आम्ही तिथंच बसलो होतो. मात्र, आमच्या ‘शो’ची वेळ साडेसात होती आणि आम्हाला सव्वासातला निघावंच लागलं. थोडक्यात, फाउंटन शो राहिला. (पुढच्या वेळेला आता कलाप्रदर्शन आणि फाउंटन...) आम्ही जिन्यानं वरच्या मजल्यावर गेलो. तिथं ड्रेस सर्कलचे प्रवेश होते. आम्हाला अजून एक मजला वर जावं लागणार होतं. मग लिफ्टनं वर गेलो. इथं आमच्या लोअर बाल्कनीचे प्रवेश सुरू होते. पाच मिनिटांतच तिथल्या रांगेतून आम्ही त्या ‘ग्रँड थिएटर’मध्ये शिरलो.
आत शिरल्या शिरल्या ते भव्य आणि देखणं सभागृह बघून एकदम ‘अहा’ असं झालं. नीट बसल्यावर लक्षात आलं, की या बाल्कनीची उंची बरीच आहे. शिवाय लोअर बाल्कनी व अप्पर बाल्कनी यातल्या रांगा सगळ्या एकापाठोपाठ एक अशाच होत्या. फक्त वरच्या काही रांगांना अप्पर बाल्कनी म्हटलं होतं आणि आम्ही बसलो होतो त्या पुढच्या रांगांना लोअर... त्यापेक्षा ड्रेस सर्कलची जागा खाली, पण रंगमंच उंचावरून दिसेल अशी नेमकी होती. पुढच्या वेळेला ड्रेस सर्कलचं तिकीट काढायचं हे ठरवून टाकलं. थिएटर भव्य होतं, दोन्ही बाजूला ते बॉक्स वगैरे होते. पण मला नंतर जरा ते थोडं छोटं वाटलं. म्हणजे याहून भव्य असू शकलं असतं असं वाटून गेलं. मुख्य रंगमंचावर एक भव्य डिजिटल पडदा होता. या पडद्याचा वापर नंतर त्या शोमध्ये महत्त्वाचा होता. ‘शो’विषयी फार काही माहिती नव्हतं. त्यामुळं पाटी कोरी होती. फिरोझ अब्बास खान यांनी हा शो दिग्दर्शित केला आहे आणि अजय-अतुल यांचं संगीत आहे, हे माहिती होतं. शोला अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं निवेदन होतं. पडद्यावर काही ओळी यायच्या. उदा. गीतेतलं वचन. मग त्यावर अमिताभ यांचं भाष्य... मग तो डिजिटल पडदा वर जायचा आणि समोर भव्य रंगमंचावर नृत्य सादर व्हायचं. सुरुवातच ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ या आपल्या आरतीने झाली. गणेशाची एक भव्य मूर्ती वरून खाली आली आणि एकदम दोनशे-तीनशे नृत्य कलाकार त्या भव्य मंचावर येऊन आरतीवर नृत्य करू लागले. ते दृश्य प्रेक्षणीय होतं. शेवटी अगदी ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण...’ वगैरे जोरदार झालं. माझ्या डोळ्यांतून नकळत पाणी झरलं ते ऐकताना... प्रेक्षकांनीही मस्त ताल धरला होता. एकूण जोरदार सुरुवात झाली. अमिताभच्या धीरगंभीर आवाजामुळं त्या कार्यक्रमाला एक अभिजात रूप प्राप्त झालं होतं. खाली पिटात हंगेरी की ऑस्ट्रियाचा लाइव्ह ऑर्केस्ट्रा आणून बसवला होता. सभागृहाचं ॲकॉस्टिक्स उत्तम होतं. आवाज घुमत नव्हता. खणखणीत येत होता. नंतर रामायण-महाभारतापासून विविध धर्मांचं आगमन, उत्पत्ती, विचार आणि त्यावर आधारित साजेसं नृत्य किंवा गाणी असं सादर होत गेलं. प्रियांका बर्वेनं ‘कानडा राजा पंढरीचा’ अतिशय सुंदर म्हटलं. (कलाकारांत ती एकच तेवढी ओळखू आली...) एकूण कार्यक्रम चांगला रंगला. शेवटी भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत आला आणि राष्ट्रगीत होऊन ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली. मग जोरदार ‘कर्टन कॉल’ही झाला. शेवटी नीता अंबानी यांची ध्वनिमुद्रित चित्रफीत बघावी लागली. त्यात त्यांनी हे सेंटर उभे करण्यामागची त्यांची भूमिका मांडली. त्यातलं ‘हे केंद्र देशाला समर्पित केलं आहे आणि इथं केवळ महानगरांतीलच नव्हे, तर छोट्या शहरांतील, अगदी सुदूर गावांतील कलाकारांनी येऊन आपली कला सादर करावी, अशी आमची इच्छा आहे,’  हे वाक्य ठळक महत्त्वाचं. हा हेतू किती पूर्ण होतो, हे भविष्यकाळात कळेलच.
कार्यक्रम संपल्यावर वॉशरूम आणि लिफ्ट दोन्हींकडं झुंबड उडाली. मात्र, मुंबईचे लोक शिस्तीचे आहेत. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, तीन इंग्रज एकत्र आले, की लाइन लावतात, तद्वत इथेही सर्वांनी शांततेत रांगा लावून आपला कार्यभाग उरकला. पार्किंगमध्ये आलो. दुपारीच दूरदृष्टीनं घेऊन ठेवलेली सँडविचेस गाडीत बसल्या बसल्या फस्त केली आणि लगेचच निघालो. (सेंटरच्या समोरच्या बाजूने फोटो काढायचा राहिला, हे नंतर लक्षात आलं. असो. पुढच्या वेळी!) गुगलताईंच्या मदतीनं पनवेलच्या मार्गाला लागलो. रविवारची रात्र असल्यानं मुंबईकडून पुण्याला या वेळी वाहतूक कमी असेल असा अंदाज होता. तसंच झालं. अजिबात ट्रॅफिक जॅम न लागता, सुरळीत आलो. फूड मॉलला पोटपूजेसाठी थांबावं लागलं, तेवढा वेळ फक्त मध्ये खर्च झाला. बाकी बरोबर एक वाजता घराच्या पार्किंगमध्ये होतो. 
दमल्यामुळं लगेच झोप लागली. मात्र, स्वप्नातही तो भव्य रंगमंच आणि तिथले रंगबिरंगी नृत्य गिरक्या घेत येत राहिले. ‘जिओ’ जी भर के म्हणत...!

---

(अधिक माहितीसाठी http://nmacc.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.) 

----

याआधीच्या मुंबई ट्रिपचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

---

2 comments:

  1. अतिशय सुंदर, अप्रतिम वर्णन. प्रत्यक्षात भेट दिली असेच वाटले. पुढच्या मुंबई भेटीत जाणे अनिवार्य आहे.

    ReplyDelete