27 Apr 2023

गोवा ट्रिप १५-१९ एप्रिल २३ - उत्तरार्ध

लोभस हा ‘गोवालोक’ हवा...
--------------------------------


गोव्यात आलो आहे आणि बा. भ. बोरकरांची आठवण आली नाही, असं शक्यच नाही. कोलवा बीचवरच्या त्या संध्याकाळचा सुंदर सूर्यास्त बघत असताना, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या-कपाऱ्यांमधुन घट फुटती दुधाचे; माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फणसांची रास, फुली फळांचे पाझर, फळी फुलांचे सुवास’ या ओळी आठवल्याच. त्या बीचवर सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या सगळ्या जीवांची अवस्था बोरकरांच्याच शब्दांत ‘सुखानेही असा जीव कासावीस’ अशीच झाली असणार, यात शंका नाही.
आमच्या पोरांना तिथं तिथं वॉटर स्पोर्ट, ते पॅरासेलिंग करायचं होतं. मात्र, सूर्यास्तानंतर तिथं एक पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी सगळ्यांना रास्तपणे पाण्याबाहेर काढलं. मग आम्हीही दुसऱ्या दिवशी परत येऊ, असं म्हणत तिथून निघालो. तिथं बाहेर आलो, की एक ‘सागरकिनारा’ नावाचं उडुपी हॉटेल होतं. पोरांना काही तरी खायचं होतंच. मग मंदार सगळ्या मुलांना घेऊन तिथं गेला. आम्ही तिथल्या बाहेरच्या दुकानांत शॉपिंग करत हिंडत राहिलो. तिथून आमच्या व्हिलाला परत जायचं कसं, हा एक प्रश्नच होता. तिथं रिक्षा किंवा टॅक्सी फारशा दिसत नव्हत्या. आपल्याकडे शहरात कसं, नऊ-साडेनऊ वाजले तरी फार काही उशीर झालाय असं वाटत नाही. तिथं मात्र लगेच सामसूम व्हायला सुरुवात होते. बीचच्या अगदी जवळचा परिसर तेवढा दुकानांमुळं जागता होता. आम्ही काजू वगैरे आवश्यक खरेदी करून टाकली. पोरांचं खाणं झाल्यावर आम्ही टॅक्सी शोधायला लागलो. सुदैवानं फार वाट बघावी लागली नाही. लगेच दोन टॅक्सी मिळाल्या आणि आम्ही पहिल्या दिवशी सुखरूप आमच्या व्हिलावर पोचलो. रात्रीचं जेवण तिथंच सांगितलं होतं. फार भूक नव्हती, तरी डाल-राइस सगळ्यांनीच खाल्ला. नंतर यजमानांकडून अत्यंत उत्कृष्ट असं होममेड आंबा आइस्क्रीम मिळालं आणि दिवसभराचा शीण पळून गेला. नंतर निवांत गप्पा मारत बसलो. पहिल्या दिवशीच्या शिणवट्यामुळं लगेच झोप लागली.
दुसऱ्या दिवशी मंदार, अभिजित व सगळे बेतालबाटिमच्या, हां - ‘वेताळभाटी’च्या - बीचवर गेले. हा बीच तुलनेनं जवळ, म्हणजे दोन किलोमीटरवर होता. आम्ही तिघं मात्र उशिरापर्यंत झोपलोच होतो. त्यामुळं गेलो नाही. तसंही समुद्राच्या पाण्यात खेळायचा आम्हाला फार सोस नाहीच. जवळपास तीन तासांनी हे सगळे भरपूर खेळून परत आले, तेव्हा जवळपास दहा वाजले होते. तोवर आमचं सगळं आवरून झालं होतं. आज ब्रेकफास्टला पोहे, फळं आणि नंतर चहा-कॉफी असं होतं. ब्रेकफास्ट झाल्यानंतर सकाळी समुद्रात खेळून दमलेली मंडळी विश्रांतीला गेली. त्यामुळं आम्हीही जरा निवांतच होतो. मि. गोडबोले बाहेरगावी गेले होते, ते आज सकाळी परत आलेले दिसले. त्यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया व लोकमत हे दोन पेपर येत असल्यानं माझी सोय झाली. आम्ही खरं तर पणजीला एक दिवस जायचा विचार काल केला होता. मात्र, काल पेपरमध्ये कळलं होतं, की पणजीत १७ ते १९ एप्रिल या काळात जी-२० ची परिषद भरते आहे. त्यामुळं तिथं बऱ्यापैकी बंदोबस्त असणार होता. पर्यटनस्थळं खुली असतील की नाही, याची कल्पना नव्हती. म्हणून मनस्विनीला फोन लावला. ती मसुरीत होती. मात्र, तिनं तिकडून फोनाफोनी करून सांगितलं, की स्ट्रीट मार्केट वगैरे सगळं बंद ठेवलं आहे. मांडवी नदीतील क्रूझ पण रविवारी बंद होत्या. पण आज, म्हणजे सोमवारी त्या चालू असतील. पण आम्ही राहत होतो, तिथून दोन टॅक्सी करून पणजीला केवळ त्या क्रूझसाठी जाणं काही व्यावहारिक नव्हतं. शिवाय गोव्यात अन्य वेळी बाकी सर्व ठिकाणं तशी बघून झालीच होती. अगदी दहा वर्षांपूर्वी आम्ही सगळ्यांनी ती क्रूझ राइड केलीच होती. या वेळी जरा निवांतपणा हवा होता. म्हणून पण पणजीला जाणं सर्वानुमते रद्दच केलं. दुपारचं जेवण ‘कोटा कोझिन्हा’मध्ये करायचं हे ठरलंच होतं. मग दुपारी परत तिकडं गेलो. रस्त्यातच मालकीणबाई दिसल्या. कुणाच्या तरी दुचाकीवरून कुठे तरी निघाल्या होत्या. ‘आलेच’ या टाइपचं काही तरी बोलल्या आणि भुर्र निघून गेल्या. आज गर्दी कमी होती. त्यामुळं आज आतमध्ये बसायला मिळालं. मुख्य जेवण सोडल्यास आज कालचीच ऑर्डर ‘रिपीट’ होती. थोड्या वेळातच मालकीणबाई परत आल्या आणि पुन्हा आमची सरबराई करू लागल्या. त्यांच्या ‘व्यवसायचातुर्याला’ यश आलं आणि कालच्यापेक्षा आज बिल थोडं जास्तच आलं! भरपेट जेवण झाल्यावर फोटोसेशनही झालं. इथून आम्हाला ते ‘बिग फूट म्युझियम’ बघायला जायचं होतं. टॅक्सी लवकर मिळेना. पण अखेर दोन टॅक्सी बुक झाल्या व आम्ही त्या संग्रहालयाकडे रवाना झालो. मडगाव शहरावरून आम्ही लोटली या ठिकाणी गेलो. अंतर आठ किलोमीटर असलं, तरी इथं ते नेहमीच जास्त वाटलं. तसंच आत्ता येतानाही वाटलं. 

हे ‘बिग फूट संग्रहालय’ म्हणजे कुणा एका महात्म्याचं (नाव विसरलो) उमटलेलं मोठं पाऊल. त्यावरून हे नाव दिलंय. त्या महात्म्याची गोष्ट सांगणारा एक व्हिडिओही तिथं दाखवतात. ते मोठं पाऊलही तिथं जतन करून ठेवलंय. तिथं चर्चप्रमाणे उदबत्त्या वगैरे लावतात. त्या बाहेर विकायलाही होत्या. हे संग्रहालय म्हणजे आपल्याकडे पंढरपूरला कैकाडी महाराज मठ किंवा कोल्हापूरजवळचा कण्हेरी मठ किंवा हाडशीमधलं संग्रहालय आहे, तसंच आहे. प्राचीन काळापासूनचा गोव्याचा इतिहास तिथं मांडला आहे. पुतळे चांगले होते. फोटो काढायला भरपूर संधी होत्या. तिथं दोन छोटी दुकानंही होती. तिथल्या संभाषणचतुर बायकांमुळे आम्ही तिथंही भेटवस्तूंची खरेदी केलीच. जवळपास तासभर तिथं गेला. मग बाहेर येऊन सरबत प्यायलो तेव्हा बरं वाटलं. आमचे टॅक्सीवाले तिथंच थांबले होते. (ते तसे थांबणार याचा अंदाज होताच.) मग त्यांनी आम्हाला कोलवा बीचला सोडलं. काल राहिलेलं पॅरासेलिंग आज करायचंच होतं. मंदार, नील, निमिष, सेतू या चौघांनी एकापाठोपाठ एक पॅरासेलिंग केलं. आम्ही आपलं खालून त्यांचं शूटिंग केलं. (मी व धनश्रीनं फार पूर्वी दिवेआगरला केलं होतं. तेव्हा मंदार फॅमिलीसोबत गेलो होतो.) नील ते करून आल्यावर फारच ‘एक्साइट’ झाला होता. मजा आली. आज सोमवार असल्यानं बीचवर कालच्या तुलनेत गर्दीही कमी होती. आम्ही निवांत बसलो मग! सूर्यास्त झाल्यावर निघालो. आजही तिथं बाहेरच्या दुकानांत शॉपिंग केलं. विशेषत: आमच्या दोन छोट्या जुळ्या पुतण्या-पुतणीला खास ते ‘आय लव्ह गोवा’ वगैरे लिहिलेले ड्रेस घेतले. तिथं एक उसाचा रस विकणारा गाडा होता. तो रस प्यायल्यावर मस्त वाटलं. नंतर आम्ही सगळेच ‘सागरकिनारा’ला गेलो. सँडविच, डोसे, चहा असं सगळं हादडून बाहेर पडलो. टॅक्सी मिळायला फार त्रास झाला नाही. मग लगेच व्हिलावर परतलो. आजही जेवण तिथंच सांगितलं होतं. निवांत रात्रीचं जेवण झालं. रात्री परत गप्पा, पत्ते यात कसा वेळ गेला कळलंही नाही.
तिसऱ्या दिवशी सकाळी ही सगळी मंडळी पुन्हा ‘वेताळभाटी’च्या बीचवर जाणार होती. फक्त अभिजित थांबणार होता, कारण त्याचं काही काम बाकी राहिलं होतं. मग आम्ही लवकर आवरून सगळेच बाहेर पडलो. श्वानमंडळी आमच्या स्वागताला प्रत्येक घराबाहेर उभी होतीच. त्यांच्या भुभुकाराच्या गजरात आम्ही त्या बीचवर पोचलो. बीच अगदीच काही जवळ नव्हता. आम्ही पोचेपर्यंत आठ वाजले होते. सगळे जण पाण्यात खेळले. मी व धनश्री बीचवरच थांबलो. थोड्या वेळानं नीलही कंटाळला. मग आम्ही तिथं जरा आधी तिथून निघालो. हातात काठी घेऊन दोन किलोमीटर परत चालत आलो. सकाळची वेळ असली तरी ऊन व दमट हवेमुळं चांगलीच दमछाक झाली. आल्यावर शॉवर घेणं मस्टच होतं. बाकी मंडळी जरा वेळानं परत आली. मग एकत्र ब्रेकफास्टला जमलो. आज ब्रेकफास्टला उपमा होता. मि. गोडबोलेंनी त्यांच्या अंगणातल्या काजूच्या मोठ्या झाडाचे काजू बोंड काढून ते कापून आम्हाला खायला दिले. मी पहिल्यांदाच खाल्ले. रसाळ, आंबटतुरट अशी वेगळीच चव होती.
आज आमचा निघायचा दिवस होता. ‘चेकआउट’ची वेळ दहा असली, तरी आमची ट्रेन दुपारी असल्यानं आम्हाला बारा वाजेपर्यंत थांबायला परवानगी मिळाली होती. सगळं आवरून होईपर्यंत बारा वाजलेच. दुपारच्या जेवणाचा प्रश्न होता. ‘कोटा कोझिन्हा’ मंगळवारी बंद असतं. मग गोडबोलेंनी आम्हाला तिथं असलेलं ‘फिश्का’ हे दुसरं हॉटेल सुचवलं. आम्ही सामान तिथंच ठेवून जेवून यावं, मग टॅक्सी बोलवावी असं त्यांनी सांगितलं. हे आम्हाला सोयिस्कर होतं. मग पुन्हा एकदा आमची वरात चालत चालत (कुत्र्यांचा सामना करत, हे आता सांगायला नको!) ‘फिश्का’ हॉटेलमध्ये पोचली. ते हॉटेल उघडं असलं, तरी तिथं अक्षरश: एकही ग्राहक नव्हता. आम्हीच आधी पोचणारे. पण निवांत, साग्रसंगीत जेवण झालं. हे हॉटेल ‘कोटा’पेक्षा थोडंसं महागही होतं. पण वेळेला जेवण मिळालं, हे काय कमी म्हणून आम्ही पुन्हा पदयात्रा करत व्हिलावर आलो.
आता निघायची वेळ झाली होती. नेहमीप्रमाणे दोन टॅक्सी बुक केल्या. एक टॅक्सी पुढं गेली. दुसऱ्या टॅक्सीत अभिजित, निमिष, मी, धनश्री व नील जाणार होतो. अभिजितनं बुक केलेली टॅक्सी आली. मात्र, त्यानं आल्या आल्या ‘फक्त चार प्रवासी नेणार, तुम्ही पाच जण आहात,’ असा पवित्रा घेतला. आम्ही बुचकळ्यात. गेले दोन दिवस आम्ही बाकी सगळ्या टॅक्सींतून पाच जणच गेलो होतो. त्यात आमच्यात दोन तशी लहान मुलं होती. गोडबोले दाम्पत्यानंही बाहेर येऊन मध्यस्थी केली. मात्र, तो टॅक्सीवाला काही हटेना. बाहेर पोलिसांनी पकडलं, तर जबाबदारी कोण घेणार, असं सारखं विचारत होता. माझ्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली. याचं व पोलिसांचंच साटंलोटं असणार. हा बाहेर नेऊन पोलिसांसमोर गाडी उभी करणार. आम्हाला दोन किंवा तीन हजारांचा दंड पोलिस लावणार. त्यात याचा वाटा असणार! मी ताडकन आमच्या बॅगा काढून घेतल्या व त्याला म्हटलं, आप चले जाओ. हमें नहीं चाहिए आप की टॅक्सी! त्यावर तो भाई जरासा आश्चर्यचकितच झाला. त्याला ही प्रतिक्रिया अपेक्षित नसावी. मग जरा तणतणतच तो निघून गेला. आम्ही दुसऱ्या टॅक्सीच्या शोधाला लागलो. रविवारी आम्हाला सोडणाऱ्या टॅक्सीवाल्याचा नंबर माझ्याकडे होता. त्याला फोन लावला. तो मराठी होता. लगेच येतो म्हणाला. मी पैसे विचारले. ‘पाचशे’ असं तो म्हणाला. (किंवा मला तसं ऐकू आलं...) मी लगेच ये म्हटलं. आमचे यजमान खूप चांगले होते. टॅक्सी मिळाली नाही, तर मी तुम्हाला गाडीने स्टेशनला सोडतो, असं मि. गोडबोलेंनी सांगितलं होतं. त्यामुळं आम्ही तसे निर्धास्त होतो. आमची ट्रेन साडेतीन वाजता होती. अखेर दोन चाळीसला मी फोन केलेला टॅक्सीवाला उगवला. आम्ही लगेच सामान टाकलं आणि निघालो. त्यानं आडवाटेनं, कुठून कुठून पळवत तीन वाजून पाच मिनिटांनी मडगाव स्टेशनला गाडी आणली. पाचशे रुपये दिले, तर ‘आठशे’ झाले म्हणाला. मला तरी तो आधी फोनवर ‘पाचशे’च म्हणाल्याचं आठवत होतं. मग आता पर्याय नव्हता. अडचणीच्या वेळी तो आला होता, हे खरं होतं. त्यामुळं आम्ही फार वाद न घालता त्याला आठशे रुपये देऊन टाकले.

स्टेशनमध्ये मंदार व बाकी सगळे आमची वाटच पाहत होते. थोड्याच वेळात ट्रेन आली आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. ट्रेन फक्त अर्ध्या तासापूर्वी वास्कोतून सुटल्यामुळे आता इथं स्वच्छता होती. आमच्यातले तीन नंबर एकदम वेगळ्याच डब्यात (तीन डबे सोडून) आले होते. मग अभिजित, हर्षदा व निमिष तिकडं गेले. आम्ही सहा जण पहिल्या डब्यात बसलो. अर्थात सगळे डबे जोडलेले असल्यानं आम्ही ये-जा करतच होतो. गोवा एक्स्प्रेस ही दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून चालविली जाते. या विभागाचं मुख्यालय आहे हुबळी. आत्ता गाडी त्या हद्दीतूनच जात असल्यामुळं इथं तैनात एकदम जोरदार होती. एक इन्स्पेक्टर बाई गाडीतून सिंगल प्रवासी असलेल्या महिलांची चौकशी करून गेल्या, तेव्हा तर मला भरूनच आलं. बाकी सतत झाडलोट, स्वच्छता हे सुरू होतं. या वेळचे बेडशीट, ब्लॅंकेट आदीही जरा बरे होते. सतत खायला येत होतं. मग आम्ही भेळ खाल्ली. नंतर घाट सुरू झाला, तर आम्ही पुन्हा दाराशी जाऊन उभे राहिलो. पण ‘दूधसागर’ कधी गेला ते कळलंच नाही. ही गाडी लोंडा नावाच्या जंक्शनला बराच वेळ थांबते. इंजिन पुढचे काढून मागे जोडले जाते. प्रवासाची दिशा बदलते. पूर्वी हुबळीवरून निजामुद्दीनला जाणारे दोन डबेही याच स्टेशनात या गाडीला जोडले जायचे. आताही जोडले जातात का माहिती नाही. आमची गाडी या स्टेशनवर थांबल्यावर आम्ही निवांत खाली उतरून फोटो वगैरे काढले. अर्ध्या तासानं गाडी बेळगावच्या दिशेनं हलली. हळूहळू रात्र झाली. गाडी साडेसात वाजता बेळगावात पोचणार होती. मला बेळगावला जाऊन आता २३-२४ वर्षं झाली. मला ते मस्त गाव पुन्हा बघायचं होतं. मी पुन्हा दारात येऊन थांबलो. सुंदर थंड हवा होती. एसीपेक्षा बरं वाटत होतं. आकाश निरभ्र होतं. सगळे ग्रह, तारे दिसत होते. मुलांना ते आकाशदर्शन घडवलं. हळूहळू गाडी बेळगावच्या हद्दीत शिरत होती. सर्व शहर आता संध्याकाळच्या दिव्यांनी झगमगत होतं. बेळगाव आलं, की ‘रावसाहेबां’ची आठवण येणं अपरिहार्य होतं. त्यांचं ते रिट्झ थिएटर, आर्ट सर्कल, ते राणी पार्वती कॉलेज इथंच कुठे तरी असणार... मी आत्ताच्या त्या आधुनिक, झगमगीत शहरात साठ सालचं बेळगाव शोधायचा निरर्थक प्रयत्न करत होतो. बेळगाव म्हटलं, की आणखी लंपनची आठवणही होणारच. अगदी एक हजार नऊशे अडुसष्ट वेळा... तंतोतत! (आमचा निपुण ‘लंपन’ आता पडद्यावर आणतोय. फार उत्सुकता आहे तो बघायची...)
बेळगाव स्टेशनात गाडी थांबली. स्टेशनही चकाचक होतं. एकदाच जाऊनही मी या गावाच्या प्रेमात आहे. त्यामुळं बेळगाव सोडून गाडी पुढं निघाली तसं उगाच हुरहुर वाटायला लागली. मग घटप्रभा, रायबाग, कुडची वगैरे स्टेशनं घेत मिरजला, म्हणजे महाराष्ट्रात आली. इथं आलं की आपण ‘आपल्या एरिया’त आलो, असा फील येतोच. अर्थात याही वेळी खाली उतरलो नाही. रात्री ट्रेनमधलं जेवण घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मग ते मागवून जेवलो आणि झोपलो सरळ! पहाटे पावणेचारचा गजर जवळपास प्रत्येकानं लावला होता. पुण्याला बरेच लोक उतरणार असल्यानं त्या सुमारास बरीच जाग आली गाडीला. गाडी अगदी वेळेत म्हणजे पहाटे सव्वाचारला पुण्यात पोचली.
ओला-उबरची टॅक्सी बुक करायला लागलो तर एकही टॅक्सी आत येईना. आतल्या रिक्षावाल्यांची दादागिरी! ते या ओला-उबरवाल्यांकडून अनधिकृतपणे ५० रुपये वसूल करतात. खंडणीच ही! मग आम्ही बाहेर जाऊन एक कॅब बुक केली. तोही शहाणा. केलेलं बुकिंग रद्द करा आणि ते पैसे मला द्या, म्हणायला लागला. ‘अडला हरी...’ या न्यायाने आम्ही ‘बरं बाबा, सोड एकदाचं आम्हाला घरी’ असं म्हणालो आणि पुढच्या पाऊण तासात घरी पोचलो. घरी पोचल्यावर आपल्या बेडवर पाठ टेकवून पडल्यावर जे सुख झालंय म्हणता, त्याची कुठं तुलनाच नाही! 
अर्थात तीन-चार दिवसांचा ‘जिवाचा गोवा’ केल्यावर हा गारवा येणारच होता. पुन:पुन्हा गेल्या चार दिवसांतली स्मरणचित्रं डोळ्यांसमोरून सरकत होती आणि आवडत्या बाकीबाब यांच्या ओळीही स्मरत होत्या - 

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा

---

(समाप्त)

---

याआधीच्या गोवा ट्रिपवरचा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-----

No comments:

Post a Comment