26 Apr 2023

गोवा ट्रिप १५-१९ एप्रिल २३ - पूर्वार्ध

गोवा... आनंदाचा ठेवा...
-----------------------------------------------------


ऐन एप्रिलमध्ये, रणरणत्या उन्हात गोव्याला जाण्यामागं माझं तसंच सबळ कारण होतं. मी गोव्याला पहिल्यांदा गेलो, ते २००३ मध्ये हनीमूनला. आमचं लग्न झालं २५ मार्च २००३ ला आणि मी व धनश्री त्यानंतर चार-पाच दिवसांनी नगरवरून गोवा एक्स्प्रेसने गोव्याला गेलो होतो. त्यानंतर दहा वर्षांनी, म्हणजे फेब्रुवारी २०१३ मध्ये आम्ही पुन्हा गोव्याला जायचं ठरवलं, तेव्हा पेंढारकर व मंदार फॅमिली आम्हाला जॉइन झाली. आमची मुलं तेव्हा बरीच लहान, म्हणजे ८-१० वर्षांची होती. तेव्हा आम्ही कळंगुटला ‘कामत हॉलिडे होम्स’मध्येच (जिथं दहा वर्षांपूर्वी आम्ही राहिलो होतो, तिथंच) राहिलो. या ट्रिपला आम्हाला फारच धमाल आली होती. म्हणून मग बरोबर दहा वर्षांनी पुन्हा गोव्याला जायचं ठरवलं आणि स्वाभाविकच हाच सीझन निवडावा लागला. मागच्या दोन्ही वेळी गोवा एक्स्प्रेसनं गेलो होतो, म्हणून या वेळीही मुद्दाम चार महिने आधी (मुलांच्या परीक्षा संपल्यानंतरच्या) ट्रिपच्या तारखा फायनल केल्या आणि ट्रेनची तिकिटं काढली.
आम्ही मडगावपर्यंत जाणार होतो, त्यामुळं त्या शहराच्या आसपास कुठं होम स्टे मिळतोय का, हे आम्ही शोधायला लागलो. आमची मैत्रीण मनस्विनी (प्रभुणे) ही आमची गोव्याची ‘सिंगल पॉइंट काँटॅक्ट पर्सन’ आहे. त्यामुळं तिलाच साकडं घातलं. तिच्या ओळखीतून बाणवलीतील ‘अगस्त्य व्हिला’ची माहिती समजली. मूळ पुण्यातल्याच गोडबोले दाम्पत्याची ही प्रॉपर्टी आहे. मी प्रणाली गोडबोले यांना फोन केला, तर त्यांनी आमच्या तारखांना बुकिंग फुल्ल असल्याचं (गोड बोलून) सांगितलं. मी फारच निराश झालो. याचं कारण त्यांचा हा व्हिला मडगाव स्टेशनपासून फक्त आठ किलोमीटरवर होता. आमच्याकडं स्वत:च्या गाड्या नव्हत्या आणि आम्ही एकूण दहा लोक होतो. त्यामुळं दर वेळी टॅक्सी करावी लागणार होती. म्हणून अंतराचा विचार करावाच लागणार होता. मला काय वाटलं, माहिती नाही; पण मी पुन्हा गोडबोले बाईंना फोन केला आणि म्हटलं, बघा की, काही जमतंय का! एक-दोन दिवसांत त्यांचा उलट मेसेज आला, की आधी ज्यांनी बुकिंग केलं होतं, त्यांना विनंती केली की एक आठवडा पुढं ढकलता येईल का? आणि ते लोक तयार झाले, तर तुम्हाला बुकिंग मिळू शकेल. व्वा व्वा! मला फारच आनंद झाला. आम्ही लगेच त्यांच्याकडं बुकिंग करून टाकलं. 
गोवा एक्स्प्रेस ही गाडी माझी फार आवडती. एके काळी या गाडीचा फार दिमाख होता. आम्ही जर्नालिझमचे विद्यार्थी म्हणून दिल्ली ट्रिपला गेलो होतो ते याच गाडीनं. ही गाडी पुण्यात फार ऑड वेळेला, म्हणजे पहाटे सव्वाचार वाजता येते. मला आठवतंय, आम्ही सर्व विद्यार्थी रात्री बारा वाजताच स्टेशनवर पोचलो होतो आणि ही ट्रेन येईपर्यंत भयंकर दंगा केला होता तिथं. अतिच उत्साह होता अंगात... वर उल्लेख आला आहे, तसं वीस वर्षांपूर्वी हनीमूनला गेलो होतो ते याच ट्रेननं. तेव्हा ही गाडी प्रीमियम सुपरफास्ट श्रेणीत होती आणि अजिबात लेट नसायची. डबे व इतर व्यवस्थाही स्वच्छ, नेटकी असायची. गोव्याला जाण्यासाठी ही गाडी पुण्यात दुपारी पाच वाजता येते. हल्ली ॲपमुळं गाडी किती लेट आहे वगैरे ते नेमकं कळतं. आम्ही निघायच्या दिवशी ही गाडी एक ते दीड तास लेट पुण्यात येत आहे, असं दिसत होतं. अर्थात तरी आम्ही गाडीच्या वेळेला म्हणजे पाच वाजताच पुणे स्टेशनला येऊन पोचलो. गाडी अपेक्षेप्रमाणे लेट होती. सात वाजता येणार होती. मग एसी वेटिंगरूममध्ये (तासाला माणशी दहा रुपये दर) जाऊन बसलो. स्वाभाविकच पोरांना व पोरांच्या बापांना भुका लागल्या. मग स्टेशनवरच पाकीट हलकं व्हायला सुरुवात झाली. अर्थात एकदा ट्रिपला जायचं व मजा करायची म्हटल्यावर पैशांचा विचार करायचा नसतो. ‘होऊ दे खर्च’ हाच बाणा ठेवायचा असतो. अखेर सात वाजता ट्रेन आली. गाडीला भरपूर गर्दी होती. गाडीची पूर्वीची शान गेल्याचं जाणवलं. ‘थ्री टिअर एसी’त आमचे बर्थ होते. तिथं रिझर्वेशन असलेलेच लोक बसू शकतात, त्यामुळे गर्दी असली तरी निदान त्रास नव्हता. बुकिंग करताना सर्व दहा सीट एकत्र कधीच मिळत नाहीत. याचं कारण बुकिंग करताना जास्तीत जास्त सहा जणांचं एकत्र बुकिंग करता येतं. पुढची चार तिकिटं वेगळी बुक करावी लागतात. तोवर मधल्या सीट बुक झालेल्या असतात. त्यामुळं डब्यात शिरल्यावर प्रत्येक जण दुसऱ्याबरोबर हा सीट अदलाबदलीचा उद्योग करत असतो. आम्हीही तो केला आणि एकदाचे स्थिरस्थावर झालो. ट्रेनमधलं जेवण हा एक भयावह प्रकार असतो. त्यामुळं आम्ही जेवण घरूनच आणलं होतं. गप्पा, पत्ते, जेवणखाण यात भराभर वेळ गेला. रात्रीचे नऊ वाजले, की ट्रेनमधल्या खालच्या सीटवर बसलेल्या लोकांना एकदम इसाळ येतो. ते धाडधाड बर्थ पाडून झोपायच्या तयारीला लागतात. अशा वेळी आपल्याला इलाजच नसतो. आम्हीही गपगार आपापल्या बर्थवर जाऊन पडलो. मधला बर्थ लावणे, त्यावर त्या बेडशीट घालणे, इष्ट ब्लँकेट मिळविणे हा एक सोहळा असतो. तो सगळ्यांचा पार पडला. त्यात पोरांना अचानक बर्थ बदलावेसे वाटतात. कुणाला पंखा सुरू हवा असतो, तर कुणाला बंद! कुणाला दिवा हवा असतो, तर कुणाला गुडुप्प अंधार! रेल्वेच्या त्या एका विशिष्ट लयीत सतत आपलं अंग हलत असतं. एकूणच मला हे सगळं फार मस्त वाटतं. त्यात कुठल्या तरी स्टेशनला गाडी थांबली, की त्या स्टेशनला आपले पाय लागलेच पाहिजेत, अशा अहमहमिकेनं खाली उतरणारे महात्मे असतात. मीही एके काळी तसाच होतो. आता ते उद्योग फार करत नाही. तरी खालच्या खिडकीतून बाहेर बघण्याचा खटाटोप सुरूच असतो. आपण झोपेची आराधना सुरू केली, की खालचे घोरासुर एकसुरात घोरायला लागतात. मी इतके ट्रेन प्रवास केले, पण आपल्या कंपार्टमेंटमध्ये घोरणारा माणूस नाही, असं एकदाही झालेलं नाही. ट्रेनच्या आवाजाच्या वरताण आवाजात हे घोरासुर ढाराढूर झोपेत घोरत असतात आणि आपल्याला घोर लावत असतात. अशा वेळी सरळ इअरफोन कानात खुपसायचे आणि आपली आवडती मालिका बघायची. मी ‘वागले की दुनिया’चा एपिसोड बघून टाकला आणि घोरासुरांना पराजित केलं. नंतर अशी एक वेळ येते, की आपल्याला झोप लागतेच.... तसाच मीही झोपेच्या स्वाधीन झालो.
सकाळी जाग आली, तेव्हा गाडी अजून कॅसलरॉक आणि दूधसागर स्टेशनांच्या मधेच होती. पहाटे ५.४० ही गाडीची मडगावला पोचण्याची नियोजित वेळ. मात्र, पुण्यापासून झालेला विलंब कायम होता आणि आता ही गाडी सकाळी आठ वाजता मडगावला पोचणार होती. आम्हाला हे एका अर्थानं सोयीचंच होतं. भल्या पहाटे मडगावला उतरून तरी काय करायचं होतं? मग डब्याच्या दारात येऊन उभा राहिलो. हा घाट उतरताना दोन्ही बाजूंना सह्याद्रीचं विलोभनीय दर्शन घडतं. ‘दूधसागर’ धबधब्याचंही दर्शन घडलं. अगदी थोडासा का होईना, पण वाहता धबधबा होता. चालत्या ट्रेनमधूनही फोटो चांगला मिळाला. गाडी घाटाखाली आली आणि वातावरणातला बदल एकदम जाणवू लागला. दमट हवा आणि ऊन हे कॉम्बिनेशन बेकार होतं. सकाळी बरोबर आठ वाजता मडगाव स्टेशनवर पोचलो. आता आम्हाला टॅक्सी करूनच बाणवलीला जायचं होतं. तिथं एक बरं होतं. प्री-पेड टॅक्सी स्टँड होतं. तिथं आम्ही टॅक्सी बुक केल्या आणि निघालो. तिथंही घासाघीस करून शंभर रुपये कमी करायला लावले. पण एकूणच गोव्यात टॅक्सी महाग. प्रणाली गोडबोलेंना फोन केल्यावर कळलं, की त्यांचा व्हिला बाणवलीत नव्हे, तर ‘बेतालबाटिम’मध्ये आहे. बेतालबाटिम म्हणजे मूळचं नाव वेताळभाटी. पण गोव्यात पोर्तुगीजांनी सर्व देशी नावांची, पुढे ‘म’ लावून वाटम् लावूनम् टाकलीम् आहेम्. बाणवलीचं काय तर म्हणे बेनोलिम... त्यामुळं मूळ मराठी किंवा गोवन नावं शोधणं हे एक दिव्यच. ते एक असो. 
मडगाव स्टेशनपासून आमचा व्हिला आठ किलोमीटर असला तरी मध्ये निर्जन भाग लागत असल्याने आपण लांब कुठं तरी जातोय असं वाटत राहतं. तसं ‘बराच लांब प्रवास करून’ एकदाचे आम्ही आमच्या ‘अगस्त्य व्हिला’त दाखल झालो. तिथं गोडबोले बाईंसह त्यांच्या स्कॉट, कोको आणि एंजल या तीन कुत्र्यांनीही आमचं ‘भुभुकारा’सह स्वागत केलं. मी आणि धनश्री एकूणच प्राण्यांपासून दूर राहणारे! याबाबत ‘पाळीव प्राणी’मध्ये पु. लं.नी सांगितलेलं मत अगदी पटतं. पण आमच्यातले निमिष आणि शुभवी हे भलतेच प्राणीप्रेमी. ते आल्या आल्या या श्वानकुलाच्या गळ्यातच पडले. आमची चिंता मिटली. (मात्र, पुढच्या वेळी व्हिला बुक करताना तिथं ही जमात आहे का, याची आधी चौकशी करायला हवी, हे मनात ठरवून टाकलं.) बाकी हा व्हिला उत्तम आहे. पोर्तुगीज शैलीतलं त्याचं बांधकाम अतिशय आकर्षक आहे. आमच्या खोल्याही प्रशस्त होत्या. खाली दोन व वरच्या मजल्यावर दोन. आम्ही कुत्र्यांचा विचार न करता, खालची खोली घेतली. खोल्या एसी असल्यानं बाहेरच्या उकाड्याचा त्रास नव्हता. तिन्ही दिवस ब्रेकफास्टची सोय तिथंच होती. पहिल्याच दिवशी गोडबोलेंनी आम्हाला भाजी-पाव, मंगळुरी बन्स असा गोवन ब्रेकफास्ट दिला. आम्ही त्यावर अगदी तुटून पडलो. मग तिथंच एकत्र गप्पा मारत बसलो. दुपारच्या जेवणासाठी जवळच ‘कोटा कोझिन्हा’ नावाचं हॉटेल होतं. तिथं सगळे गेलो. या हॉटेलच्या गोवन मालकीणबाई फारच भारी होत्या. त्यांनी आमच्याजवळ येऊन प्रत्येकाला हे ट्राय करा, ते ट्राय करा असं सांगितलं. रविवार असल्यानं हॉटेलात गर्दी होती. पण आम्ही दहा जण असल्यानं अंगणात आमच्यासाठी वेगळं टेबल लावण्यात आलं. दुपारची उन्हाची वेळ असल्यानं आम्ही सगळ्यांनीच शरीर थंड करणारी विविध पेयं घेतली. आमच्यातले बहुसंख्य शाकाहारी. ते जेवण तिथं नीट मिळतंय की नाही, याची जरा शंका होती. पण उत्तम पंजाबी व्हेज जेवण मिळालं. मुळात स्टार्टर आणि पेयपानातच आम्ही ‘गार’ झालो होतो. एकूण मजा आली. हॉटेल मालकीणबाईंच्या बिझनेस स्मार्टनेसवर आम्ही खूशच झालो. आम्ही राहत होतो, तो भाग अगदी ग्रामीण आणि भलताच शांत होता. इतका, की आम्ही रस्त्यानं जाताना आमच्याच गप्पांचा आवाज सगळ्यांत मोठा यायचा. तरी खिदळतच आम्ही परत आमच्या व्हिलावर आलो. 

संध्याकाळी, इथून जवळ असलेल्या व दक्षिण गोव्यातल्या प्रमुख असलेल्या कोलवा बीचवर जायचं ठरवलं. इथं टॅक्सी वा रिक्षा मिळायची मारामार. मग गोडबोले बाईंनी त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला बोलावला. सुदैवानं तो यायला तयार झाला. मग त्यानं दोन फेऱ्या मारून आम्हाला बीचवर सोडलं. पहिली तुकडी पुढं गेली असताना आपण रस्त्यानं जरा चालत जाऊ म्हणून आम्ही निम्मी जनता बाहेर पडलो. आमच्यासोबत गोडबोले बाईही त्यांच्या तीन कुत्र्यांना घेऊन बाहेर पडल्या. आम्हाला मुख्य रस्त्याला लागेपर्यंत जरा आतल्या, निर्जन रस्त्यानं जायचं होतं. तेव्हा एकदम दोन-तीन घरांतील आठ-दहा कुत्री भुंकत बाहेर आली. ‘हातात काठी ठेवा’ हा मंत्र गोडबोले बाईंनी दिलाच होता. तो आणि रामरक्षा असं दोन्ही जपत कसेबसे त्या रस्त्यातून पुढे आलो. या परिसरात एवढी शांतता होती, की आमच्यासारखी दोन-चार माणसं तिथून जाणं हीदेखील त्या कुत्र्यांसाठी ‘दिवाळी’ असणार! मग त्यांनी यथेच्छ भुंकून ती साजरी केली. पुढं केल्यावर एक जवळपास गवाच दिसणारा महाकाय रेडा दिसला. नशीब, जाड दोरानं तो बांधून ठेवला होता. अखेर आम्ही त्या मुख्य रस्त्यावर आलो आणि ‘हुश्श’ केलं. लवकरच आमचे रिक्षावाले भाऊ आले आणि त्यांनी दहा मिनिटांत आम्हाला कोलवा बीचला सोडलं. तिथपर्यंतचा रस्ता मात्र अतीव सुरेख, टिपिकल गोव्यातल्या रस्त्यासारखा देखणा होता. दोन्ही बाजूंनी गर्द झाडी, छोटासा पण अजिबात खड्डे नसलेला, पांढरे पट्टे मारलेला रस्ता, मधूनच लागणारं एखादं चर्च... असा तो सुशेगाद गोवा बघूनच मन तृप्त झालं. अर्थात कोलवा बीच आला आणि गर्दी दिसू लागली. त्या बीचवर टिपिकल बीचवर असते तसंच ‘क्राउड’ होतं. मात्र, अगदी तुफान गर्दीही नव्हती. स्वच्छ हवा होती आणि थंडगार वारं सुटलं होतं. कोलव्याला पांढरी रेती आहे. लवकरच सूर्य मावळतीकडं निघाला. हे दृश्य आपण जगाच्या पाठीवर कुठंही, कितीही वेळा टक लावून बघू शकतो, नाही का! माझीही त्या धुंद वातावरणात, त्या गर्दीतही काही क्षण समाधी लागली. धनश्रीला व मला, दोघांनाही पाण्यात खेळायला फार आवडत नाही. आम्ही तोवर आमचा सेल्फी काढून घेतला. २००३, २०१३ आणि आता २०२३! गोव्यातल्या बीचवरच्या फोटोंची अशीही हॅटट्रिक! ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं वाटून गेलं...
बीचवरची ती संध्याकाळ फार सुंदर होती. आपलं कुटुंब, आपले जिवाभावाचे मित्र, त्यांचं कुटुंब, आमची पोरं असे आम्ही सगळे एकत्र ती मजा लुटत होतो. अशा वेळी बोलायचं नसतंच काही... आम्ही मनानं सगळे ‘इन सिंक’ होतो. सोबत होतो. हे क्षण तुमच्या जगण्यातले अमूल्य क्षण असतात. ते मावळत्या सूर्यासोबत भराभर अस्तंगत होत असतात. त्यांना मनाच्या कॅनव्हासवरच कोरून ठेवायचं असतं. बाकी जगणं वाळूसारखं हातातून निसटून गेलं, की आयुष्याच्या संध्याकाळी फक्त तो रंगलेला कॅनव्हास डोळे बंद करून बघत बसायचा असतो. ही सहल, हा खटाटोप, हे एकत्र फिरणं, एकत्र प्रवास करणं, एकत्र जेवणं, एकत्र मजा करणं हे सगळं त्यासाठीच होतं. आपण आपल्यातच असण्याचे हे खास दिवस! कोलवा बीचवरची संध्याकाळ ही अशीच कायम मन:पटलावर कोरलेली राहील...

(पूर्वार्ध)


उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
........                                                                                                                                                     

----------------------------------------

No comments:

Post a Comment