29 Jun 2025

दोन पुस्तकांविषयी...

१. वार्तांच्या झाल्या कथा
------------------------------

मोलाचा सामाजिक-सांस्कृतिक दस्तावेज

ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांनी लिहिलेलं ‘वार्तांच्या झाल्या कथा’ हे रोहन प्रकाशनतर्फे आलेलं नवं पुस्तक म्हणजे एक महत्त्वाचा सामाजिक, सांस्कृतिक दस्तावेज आहे. आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. त्यातील काहींच्या बातम्या होतात, तर काही काळाच्या उदरात गडप होतात. पत्रकार जेव्हा अशा घटना अनुभवतो, तेव्हा तो त्या घटनांचे वार्तांकन करत असताना एक प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय असा महत्त्वपूर्ण दस्तावेजच तयार करत असतो. साबडे यांनी ‘सकाळ’सारख्या पुण्यातील आघाडीच्या, प्रथितयश दैनिकात तब्बल ३४ वर्षं काम केलं. हे काम करताना साबडे यांनी अक्षरश: हजारो बातम्या लिहिल्या असतील किंवा संपादित केल्या असतील. प्रत्येक बातमीची काही कथा होत नाही. मात्र, काही बातम्या नक्कीच तशा असतात. त्या केवळ बातमीरूपात राहणं शक्यच नसतं. अशा घटनांचे दीर्घकालीन परिणाम त्या त्या वेळी समाजावर, त्या शहरावर होत असतात. या घटनांची बातमी आणि त्या बातमीमागील घटना यांची साद्यंत गोष्ट साबडे आपल्या त्यांच्या खास शैलीत सांगतात, तेव्हा आपणही त्या काळातील त्या अनुभवाचे रोमांच अनुभवू शकतो. ही साबडे यांच्या अस्सल अनुभवांची आणि ते शब्दबद्ध करणाऱ्या लेखणीची ताकद आहे.
साबडे यांचे हे पुस्तक दोन विभागांत आहे. पहिल्या विभागात पुण्याशी संबंधित बातम्या व त्यांच्या कहाण्या आहेत, तर दुसऱ्या विभागात देश-विदेशांतील महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेण्यात आली आहे. पहिल्या भागाचं शीर्षक ‘अवती-भवती’ असं असून, त्यात रजनीश आश्रमापासून ते जोशी-अभ्यंकर हत्याकांडापर्यंत आणि ‘टेल्को’पासून ते मार्केट यार्डच्या स्थलांतराच्या घटना येतात. या सहा दीर्घ लेखांमध्ये साबडे आपल्याला पुण्यातील सहा महत्त्वाच्या घटनांची सांगोपांग आणि वस्तुनिष्ठ माहिती देतात. दुसऱ्या भागाचं शीर्षक ‘देश-विदेश’ असं असून, त्यात श्रीलंकेपासून ते जेरुसलेमपर्यंत विषय साबडे यांनी हाताळले आहेत. राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी या माजी पंतप्रधानांची अतिशय मनोज्ञ अशी व्यक्तिचित्रं त्यांनी या विभागात रेखाटली आहेत. मुळात पत्रकाराची लेखणी असल्यामुळं आपोआपच त्यांच्या लेखनात एक तटस्थपणा, नेमकेपणा आणि माहितीची सत्यता यांचं सुखद दर्शन घडतं. अर्थात ही तटस्थता कोरडी नाही. साबडे यांच्या पत्रकारामधला ‘माणूस’ सदैव जिवंत असतो आणि तो अतिशय संवेदनशीलतेनं या सर्व घटनांकडं पाहतो. त्यामुळं या सर्व कथनाला एक आत्मीय ओलावाही आहे. साबडे यांची शैली रसाळ आहे. वस्तुनिष्ठ तपशिलांचे कोंदण असल्यामुळं हे लेखन वाचताना बौद्धिक आनंद लाभतो.
साबडे केवळ ज्येष्ठ पत्रकार व माध्यमतज्ज्ञ नाहीत, तर लेखक व शिक्षकही आहेत. ‘सकाळ’मधील ३४ वर्षांच्या काळात विविध पदांवर काम करताना साबडे यांनी देश-विदेशांतील अनेक महत्त्वाच्या घटनांचं वार्तांकन केलं. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा सर्व प्रवास साबडे यांनी त्या त्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवला आहे. अवघ्या २७ व्या वर्षी पाकिस्तानला भेट देणारे ते सर्वांत कमी वयातील मराठी पत्रकार असावेत. पुण्यात बातमीदारी करताना साबडे यांचा समाजातील विविध घटकांशी संबंध आला. त्यातून पुण्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी ते जोडले गेले. पुणे श्रमिक पत्रकार संघापासून ते ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’पर्यंत पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संस्थांवर त्यांनी दीर्घकाळ काम केलं आहे. त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करून, शब्दश: घडवलं आहे. (मीही त्यांचा एक विद्यार्थी आहे.) पत्रकारिता अभ्यासक्रमांत त्यांनी बातमीदारी, संपादन, फीचर रायटिंग असे अनेक विषय विद्यार्थ्यांना शिकवले आहेत. त्यांनी आपल्या शैलीदार भाषेत वृत्तपत्रांतून अनेक विषयांवर पल्लेदार लेख लिहून, वाचकांना आनंद दिला आहे. साबडे यांनी अनेक युरोपीय देशांना भेटी दिल्या असून, तेथील विविध सेमिनार, परिसंवाद, चर्चासत्रांत सहभाग घेतला आहे.
अलीकडं निवृत्तीनंतर ‘पुण्यभूषण’सारख्या दिवाळी अंकांतून ते पुण्यासंबंधी अतिशय मोलाचं, माहितीपूर्ण व रंजक लेखन करीत आहेत. विशेषत: जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर त्यांनी लिहिलेला सविस्तर, सर्वांगीण लेख वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. अशा लेखांद्वारे एका अर्थाने पुणे शहरासंबंधीचा एक दस्तावेजच त्यांच्या हातून तयार होत आहे. डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या ‘सकाळ स्कूल ऑफ जर्नालिझम’चे साबडे हे एक ‘टॉपर’  विद्यार्थी आहेत, असं म्हटल्यास वावगे ठरू नये. वृत्तपत्रीय संकेत, मर्यादा व सभ्यता पाळून त्यांनी केलेलं वस्तुनिष्ठ वार्तांकन वाचकांना संपूर्ण व अचूक माहितीसह नवी दृष्टी प्रदान करतं, असं म्हटल्यास गैर ठरणार नाही. 
‘एका सेनानीचा अंत आणि जिंदा-सुखाशी गाठ’ हा लेख असेल किंवा ‘पुणेरी बावाजी – तुम जियो हजारो साल’ हा पुण्यातील पारशी समाजाविषयीचा लेख असेल; साबडे त्या विषयाची सर्वांगीण माहिती आपल्याला पुरवतात. वाचकाच्या मनात उत्पन्न होऊ शकणाऱ्या सर्व प्रश्नांचं, सर्व शंकांचं उत्तर त्याला लेखात मिळेल, याची पुरेपूर काळजी ते घेताना दिसतात. त्या त्या वेळी प्रत्यक्ष बातमीत लिहिता न आलेले, ज्याला ‘बातमीमागची बातमी’ म्हणतात, तसे – अनेक रंजक तपशीलही ते आपल्या लेखांत खुबीने पेरतात. त्यामुळं एखादी उत्कंठावर्धक मालिका पाहावी तसे आपण या लेखनात गुंतून पडतो. पोलंडमधील छळछावण्यांना भेट दिल्यानंतरच्या आठवणींवर आधारित ‘औशवित्त्झच्या असह्य स्मृती’ या लेखातून लेखकाची संवेदनशील बाजू लख्खपणे दिसते.
रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर यांनी उच्च निर्मिती मूल्यांची परंपरा अबाधित राखून या देखण्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. तब्बल ३१४ पानांच्या या पुस्तकाचं संपादन अनुजा जगताप यांनी केलं असून, मुखपृष्ठ राजू देशपांडे यांचं आहे.
पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे या लेखनात साबडे यांनी अनेकांना न रुचणारं आपलं परखड मतप्रदर्शनही केलं आहे. या ‘कथा’ एकमेकांपासून वेगळ्या असल्या, तरी त्यातील समान सूत्र चिकित्सक पत्रकाराच्या वेधक दृष्टीचं आहे. त्यामुळं चोखंदळ वाचकांना नक्की आवडेल, असं हे पुस्तक आहे, यात शंका नाही.

(पूर्वप्रसिद्धी : रोहन मैफल - रोहन प्रकाशन)

----

२. अप अगेन्स्ट डार्कनेस
-----------------------------

फिटे अंधाराचे जाळे

मध्यंतरी मी सुनंदा अमरापूरकरांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’ हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचलं. ते मला अतिशय आवडलं. त्यानंतर मी सुनंदाताईंशी बोललो. एकूणच नगरच्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. मी त्या पुस्तकावर इथं ब्लॉगवरही लिहिलंय. त्यानंतर मग साधारण महिन्यापूर्वी त्यांनी मला एक पुस्तक पाठवलं. ‘तुला नक्की आवडेल. वाच...’ असं म्हणाल्या. ते पुस्तक होतं मेधा देशमुख भास्करन यांचं ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’. या इंग्लिश पुस्तकाचा सुनंदाताईंनीच अनुवाद केला आहे. सकाळ प्रकाशनानं तो प्रकाशित केलाय. त्या पुस्तकाचं नाव ‘फिटे अंधाराचे जाळे’ असं अगदी समर्पक आहे. हे पुस्तक नगरमधील प्रसिद्ध स्नेहालय संस्थेचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी यांच्या ‘स्नेहालय’ उभारणीतील संघर्षाची गाथा सांगतं. हा अनुवाद सुनंदाताईंनी करणं अतिशय योग्य होतं, कारण त्यांचंही बरंचसं आयुष्य नगरमध्ये गेलंय. त्यामुळं अनुवादात व्यक्ती, संस्था, परिसर, ठिकाणं यांची नावं अचूक आली आहेत. काही वेळेला त्यांनी मूळ मराठी संभाषण कसं झालं असेल, हे लक्षात घेऊन अगदी अस्सल नगरी भाषाही वापरली आहे. त्यामुळं मला तरी बऱ्याचदा वाटलं, की हे मूळ पुस्तक खरं तर सुनंदाताईंनीच आधी मराठीत लिहायला हवं होतं. इतका तो अनुवाद ‘अनुवाद’ वाटतच नाही.
हे पुस्तक आवडलं याचं दुसरं कारण वैयक्तिक आहे. गिरीश कुलकर्णी यांच्या कुटुंबाशी आम्ही नात्याने जोडले गेलो आहोत. गिरीशची आई म्हणजे आमच्या शोभाकाकू. त्यांंचं माहेर जामखेड. गिरीशचे बाबा दिनूभाऊ कुलकर्णी यांनाही मी वैयक्तिकरीत्या ओळखत होतो. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे नगरमधल्या माझ्या अल्प वास्तव्याच्या काळात माझी गिरीश कुलकर्णींबरोबर एकदाही भेट झाली नाही. अर्थात मी तेव्हा लहान होतो आणि नेमका तोच काळ (१९८८-१९९१) ‘स्नेहालय’च्या प्रारंभीच्या उभारणीचा होता. मी नगरच्या मार्कंडेय विद्यालयात आठवी ते दहावी ही तीन वर्षं शिकलो. आमच्या शाळेच्या समोरच गांधी मैदान होतं आणि एका बाजूला चित्रा टॉकीज. तिच्या शेजारीच नगरची चित्रा गल्ली ही वेश्या वस्ती होती. गिरीश कुलकर्णींचं कार्य याच ठिकाणाहून सुरू झालं. म्हणजे मीही तेव्हा त्याच परिसरात वावरत होतो. अर्थात शाळेतल्या मुलांना त्या गल्लीकडं जायला बंदी असायची. पण गिरीश कुलकर्णी तेव्हा त्याच भागात त्यांच्या कार्याची उभारणी करत होते, हे वाचून मला एकदम आपुलकी वाटली.
गिरीश कुलकर्णी यांनी वेश्यांच्या मुलांसाठी, एड्स झालेल्या वेश्यांसाठी ‘स्नेहालय’च्या माध्यमातून मोठं काम उभं केलं. ज्या काळात या लोकांना जवळही करायला कुणी तयार नसे किंवा सामाजिक बहिष्काराचे ओझे त्यांना सोसावे लागे, त्या काळात गिरीश कुलकर्णी धाडसाने या महिलांजवळ गेले. त्यांचा विश्वास संपादन करताना त्यांना प्रचंड त्रास झाला. पुरुषांकडून त्या महिलांना कधी अशा वागणुकीची अपेक्षाच नव्हती. त्यामुळे त्यांना गिरीश यांच्याविषयीही विश्वास निर्माण व्हायला खूप वेळ लागला. गिरीश यांनी नगरमधलं ‘बिल्वदल’ हे त्यांचं निवासस्थानच अशा महिलांना राहण्यासाठी खुलं केलं. त्यानंतर समाजानेही मोठ्या प्रमाणात मदतीचे हात पुढं केले. अर्थात आपली सामाजिक व्यवस्था, पोलिस यंत्रणा, हितसंबंधी लोक आणि गुंड मंडळी या सर्वांशी लढता लढता गिरीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगी शारीरिक मारही सोसला. मात्र, ते कधीही हिंमत हरले नाहीत. नगरच्या एमआयडीसीमध्ये अक्षरश: ओसाड जागेवर त्यांनी प्रचंड कष्टातून ‘स्नेहालय’चे नंदनवन उभे केले. ही सर्व संघर्षगाथा सुनंदाताईंनी या पुस्तकातून अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.
सर्वांनी अगदी आवर्जून वाचावं, असं हे पुस्तक आहे. ‘स्नेहालय’चं काम आता खूप मोठं झालं आहे. जोवर समाजात वेश्या आहेत, एड्ससारखा आजार आहे, त्यांचे प्रश्न आहेत तोवर ‘स्नेहालय’सारख्या संस्थांची गरज कायमच लागणार आहे. गिरीश कुलकर्णींसारखे सामाजिक कार्यकर्ते मात्र क्वचितच तयार होताना दिसतात. हे पुस्तक वाचून आणखी काही ‘गिरीश कुलकर्णी’ तयार झाले तर हा समाज आणखी सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही.

----


------------

2 comments:

  1. दोन कर्तबगार व्यक्तींची व त्यांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या पुस्तकांबद्दलची छान माहिती मिळाली ...खूप धन्यवाद ! 👏👌👍🌹🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद, वीणाताई!

      Delete