29 Oct 2025

रोहन मैफल लेख - दुलत यांचे पुस्तक

‘भ्रमजाला’च्या प्रदेशातले अंतरंग
--------------------------------------------------------------

गुप्तचरांचे जग वेगळेच असते. आपल्या सगळ्यांना गुप्तचरांच्या कथांमध्ये रुची असते. गुप्तहेर मंडळी कसं काम करतात, याविषयी उत्सुकता असते. ‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’ ही भारताची गुप्तचर संस्था. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सत्तरच्या दशकात ही संस्था स्थापन केली. आर. एन. काव हे या संस्थेचे पहिले प्रमुख. त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी अनेक अभिमानास्पद दंतकथा आपण ऐकत आलेलो आहोत. ‘रॉ’ ही संस्था प्रामुख्याने भारताबाहेरील कामे पाहते, तर देशांतर्गत कामे ‘इंजेलिजन्स ब्यूरो’ (आयबी) ही संस्था पाहते. या दोन्ही संस्थांमध्ये दीर्घकाळ काम केल्याचा अनुभव असलेले ज्येष्ठ गुप्तचर अधिकारी अमरजितसिंग (ए. एस.) दुलत यांचं ‘ए लाइफ इन द शॅडोज’ हे नवं पुस्तक वाचताना आपल्याला या गुप्तचर विश्वाविषयी अधिक कुतूहल वाटू लागतं, त्याविषयी अधिक जाणून घ्यावंसं वाटतं, हे नक्की. रोहन प्रकाशनाने याच नावाने या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. मिलिंद चंपानेरकर यांनी सहज-सोप्या भाषेत केलेला हा अनुवाद वाचनीय आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, दुलत यांचं हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंत (मूळ पुस्तक २०२३ मध्ये प्रकशित) कोणत्याही भारतीय वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने आपल्या कारकिर्दीच्या आठवणी सांगणारं पुस्तक लिहिलेलं नव्हतं. दुलत यांच्या या पुस्तकाचं महत्त्व त्या अर्थानेही खूप मोठं आहे. भारतीय गुप्तचर संस्थांच्या अंतरंगाची एवढी तपशीलवार ओळख आणि मुख्य म्हणजे दुलत यांचे वैयक्तिक अनुभव या पुस्तकामुळे आपल्यासमोर येतात. ते वाचताना एखादी घटना घडते तेव्हा त्याच्या आगेमागे किती तरी गोपनीय गोष्टी कशा घडत असतात, याचा काहीसा अंदाज वाचकाला येऊ शकतो.
दुलत यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे टप्पे आले. त्यातही काश्मीरमध्ये त्यांनी केलेले काम विशेष महत्त्वाचे मानले जाते. दुलत यांना काश्मीर विषयाचे तज्ज्ञच म्हटले जाते, एवढा त्यांचा या समस्येचा अभ्यास आहे. काश्मीर समस्या सोडविण्यासाठी तेथील जनतेशी संवाद साधायला हवा, हे त्यांच्या धोरणाचे सूत्र होते. ‘काश्मीर - द वाजपेयी इयर्स’ आणि ‘द स्पाय क्रॉनिकल्स’ या दोन पुस्तकांतून त्यांनी या विषयावर तपशीलवार व भरपूर लिखाण केले आहे. ‘ए लाइफ इन द शॅडोज’ या पुस्तकातही अर्थातच काश्मीरचा उल्लेख आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांच्याशी दुलत यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे फारुक यांच्याविषयी व एकूणच अब्दुल्ला घराण्याविषयी त्यांनी अतिशय आत्मीयतेने लिहिले आहे. ‘रॉ’मधून निवृत्त झाल्यावर दुलत यांची पंतप्रधान कार्यालयात ‘काश्मीरविषयक सल्लागार’ म्हणून नियुक्ती झाली. वाजपेयी पंतप्रधान असताना म्हणजे जानेवारी २००१ ते मे २००४ या काळात ते या पदावर होते. या काळात त्यांनी काश्मिरी लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. दुलत यांच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांचा ‘मि. काश्मीर’ असाच उल्लेख केला जात असे, यावरून त्यांचा या प्रश्नातील सखोल अभ्यास लक्षात येतो. दुलत यांचा जन्म १९४० मध्ये (आता पाकिस्तानात असलेल्या) पंजाबमधील सियालकोट येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे वडील न्या. समशेसिंग दुलत सर्व कुटुंबीयांसह दिल्लीला आले. दुलत यांचं शिक्षण दिल्ली, सिमला व चंडीगड इथं झालं. चंडीगड या शहराविषयी दुलत यांना विशेष प्रेम आहे आणि ते त्यांच्या लिखाणातूनही दिसून येतं. ते १९६५ मध्ये आयपीएस झाले आणि भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले. त्यानंतर, १९६९ मध्ये त्यांनी ‘आयबी’त नियुक्ती झाली. तिथं ते सुमारे ३० वर्षं होते. नव्वदच्या आसपास काश्मीरमध्ये अत्यंत तणावपूर्ण वातावरण असताना व काश्मिरी पंडितांचे भयानक स्थलांतर सुरू असताना दुलत ‘काश्मीर ग्रुप’च्या प्रमुखपदी होते. पुढे ‘रॉ’च्या प्रमुखपदी त्यांनी नियुक्ती झाली.
या पुस्तकात एकूण नऊ प्रकरणे आहेत. त्यात दुलत यांच्या जवळपास सर्व कारकिर्दीचा आढावा त्यांनी घेतला आहे. यातील ‘काही थोर व्यक्तींच्या सान्निध्यात’ आणि ‘राष्ट्रपतींसोबत प्रवास’ ही दोन प्रकरणे विशेष वाचनीय झाली आहेत. ‘काही थोर व्यक्तीच्या सान्निध्यात’ या प्रकरणात ज्येष्ठ पोलिस अधिकारी अश्विनीकुमार, पॅलेस्टिनी नेते यासर अराफत, प्रिन्स चार्ल्स (सध्याचे ब्रिटनचे राजे), मार्गारेट थॅचर, आधुनिक सिंगापूरचे जनक मानले जाणारे थोर नेते ली क्वान यू, राजेश पायलट आदी व्यक्तिमत्त्वांविषयी दुलत यांनी तपशीलवार लिहिले आहे. यातील परदेशी नेत्यांच्या भारत दौऱ्यात दुलत यांच्याकडे त्या व्यक्तींच्या सुरक्षेची व दौऱ्यातील प्रवास वगैरे सर्व बाबींची जबाबदारी होती. त्यामुळे या प्रकरणातील त्यांचे सर्व अनुभव अतिशय वेधक व वाचनीय झाले आहेत. राजेश पायलट यांच्याबरोबर त्यांची अतिशय हृद्य मैत्री झाली होती व पायलट यांच्या अकाली निधनाने दुलत यांना अतिशय दु:ख झाले. या व्यक्तिचित्र वर्णनाला थोडी वैयक्तिक व भावनिक किनार लाभल्याने ती वाचण्यास अतिशय रोचक झाली आहेत. ‘राष्ट्रपतींसोबत प्रवास’ या प्रकरणात तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्यावर अमेरिकेत होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी दुलत त्यांच्याबरोबर अमेरिकेत गेले होते, त्या सर्व दौऱ्याचं रंजक वर्णन आहे. ते मुळातूनच वाचायला हवं. या दौऱ्यात झैलसिंग यांचे कुटुंबीयही होते. खुद्द झैलसिंग यांचा स्वभाव, त्यांच्या कुटुंबीयांचे वागणे यावर दुलत त्यांच्या खास शैलीत टिप्पणी करतात, तो सर्व भाग अनुवादकानेही अतिशय सहज-सुलभपणे आपल्यापर्यंत पोचविला आहे.
‘डॉक्टरसाहिब आणि काश्मिरीयत’ या प्रकरणात फारुक अब्दुल्लांसोबत असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांबद्दल दुलत यांनी लिहिलं आहे. त्याच अनुषंगाने या आणि त्यापुढच्या ‘काश्मिरीयत : काश्मिरी लोक आणि दिल्ली’ या प्रकरणात काश्मीर प्रश्नाविषयीही त्यांनी पुरेसा ऊहापोह केला आहे. त्यावरून हा प्रश्न किती गुंतागुंतीचा झाला आहे, हे आपल्या लक्षात येतं. अर्थात दुलत यांची सध्याच्या सत्ताधारी पक्षाविषयीची नाराजीही त्यातून लपून राहत नाही.
 काही वाचकांना या पुस्तकातील सर्वांत रोचक प्रकरण वाटेल ते ‘गुप्तचर मित्र : दोन ‘स्पायमास्टर्स’ची कहाणी’ हे. या पुस्तकात दुलत यांनी सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व भारताचे अतिशय ज्येष्ठ, यशस्वी व महत्त्वाकांक्षी गुप्तचर अजित डोवाल यांच्याविषयी लिहिले आहे. डोवाल हे दुलत यांना ज्युनिअर. त्यांची सर्व कारकीर्द दुलत यांच्यासमोर घडली आहे. त्याआधारे दुलत यांनी डोवाल यांच्याविषयी लिहिले आहे. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
गुप्तचर अधिकाऱ्यांना अनेक घटनांविषयी फार तपशिलात लिहिता येत नाही. त्यांच्यावर अनेक बंधने असतात. तरीही दुलत यांचे हे पुस्तक पुरेसे रंजक झाले आहे. उलट या पुस्तकाच्या वाचनानंतर त्या विश्वाविषयीचे आपले कुतूहल अधिकच वाढते आणि तेच या पुस्तकाचे यश आहे.

 ए लाइफ इन द शॅडोज
लेखक : ए. एस. दुलत
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
किंमत : ४९५ रुपये.


---

(पूर्वप्रसिद्धी : रोहन मैफल)

---