31 Oct 2025

मुंबई आकाशवाणीसाठी - ४ ललितबंध

ऐसी अक्षरे रसिके...
------------------------

(‘मुंबई आकाशवाणी’वरील ज्येष्ठ कार्यक्रम अधिकारी ज्योत्स्ना केतकर माझ्या स्नेही आहेत. काही वर्षांपूर्वी, म्हणजे २०१८ मध्ये मी त्यांच्या आग्रहावरून मुंबई आकाशवाणीसाठी ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमासाठी काही ललितबंध लिहून त्यांचं वाचनही तिथं, त्यांच्या स्टुडिओत केलं होतं. यंदा दिवाळीत त्यांनी मला पुन्हा खास दिवाळी विशेष असे ललितबंध लिहून पाठवायला सांगितले. या वेळी घरूनच रेकॉर्डिंग करून पाठवले. त्या चार भागांचं हे स्क्रिप्ट...)

---

१. लक्ष्मीपूजन 

श्रोते हो, नमस्कार! 

काय छान वातावरण आहे ना!
हवेत हलकी हलकी थंडी जाणवू लागलीय... एखादी पहाट कशी धुक्याच्या दुलईतच उमलते. नुकताच पाऊस होऊन गेलेला असल्यानं रस्ते, झाडं, पानं-फुलं स्वच्छ झालेली असतात. सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या एकदम वाढलेली दिसते. त्यातल्या हौशी मंडळींकडं नवे बूट, नवी जॉगिंग ट्रॅक, हातात स्मार्टवॉच असा सगळा जामानिमा दिसतो. दुधाची, फुलांची, बेकरीची दुकानं हळूहळू उघडू लागलेली असतात. कुणी झाडून घेत असतं, तर कुणी पाणी मारत असतं. त्या मातीचा एक खरपूस वास नाकात शिरतो. जवळपासच्या मंदिरातही आता ज्येष्ठ मंडळींची लगबग दिसते. तिथं बाहेर फुलवाल्यांच्या दुकानांत टांगलेल्या हारांच्या फुलांचा मंद सुगंध मन प्रसन्न करून जातो. पेपरांच्या स्टॉलवरही वर्दळ दिसते. तिथं आता दिवाळी अंकांची सुरेख मांडणी केलेली दिसते. उत्सुक मंडळी एकेक अंक उचलून चाळत असतात. विक्रेताही हसऱ्या चेहऱ्यानं अंकांची माहिती देत असतो. हा घ्या, तो आला नाही अजून, तो अमका पलीकडं आहे वगैरे संवाद सुरू असतात. रस्त्यावर हळूहळू रहदारी सुरू झालेली असते. आता बाकीची अमृततुल्य किंवा छोटी छोटी टफरीवजा दुकानंही उघडू लागतात. पायऱ्यांची झाडलोट होते. आता देवांची पूजा वगैरे होते. शकुनाच्या ग्राहकाची विशेष सरबराई होते. थोडं पुढं गेलं, की आपलं लाडकं नाट्यगृह दिसतं. तिथं लागलेल्या नाटकांच्या पाट्या बघून मन एकदम खुलून जातं. आता त्या पाट्या बघूनच कानात नांदीचे सूर निनादू लागतात. बटाटवड्याचा वास नाकाला अस्वस्थ करायला लागतो. यातलं कुठलं नाटक पाहता येईल, याचा मनातल्या मनात विचार सुरू होतो. समोर आपलं नेहमीचं अमृततुल्य दिसतं. घरी चहा झाला असला, तरी इथल्या चहाची खुमारी काही औरच! त्यात ही गुलाबी थंडी वगैरे. चहावाल्याशी, तिथं जमलेल्या चार जणांशी हवापाण्याच्या गप्पा होतात. त्यात मग क्रिकेट सामन्यापासून ते राजकारणापर्यंत आणि राज्यातल्या महापुरापासून ते जगातल्या महायुद्धापर्यंतचे सगळे विषय येऊन जातात. तेवढ्यात वाफाळता कप समोर येतो. त्यातल्या आल्याच्या खमंग वासानं जीव वेडावतो. चवीचवीनं चहा घशात उतरतो - ‘अमृततुल्य’ हे नामाभिधान सार्थ होतं बघा अगदी! ही प्रभातफेरी आटोपून आपण घरी येतो. सोसायटीच्या कमानीला दिव्यांची माळ लावायचं काम सुरू असतं. वॉचमनकाकांना ‘मदतीला येऊ का?’ असं हसून म्हणायचं असतं आणि त्यांनीही हात हलवत ‘नाय नाय, हे काय, झालंच’ असं म्हणायचंच असतं. आतमध्ये झाडांवरही दिव्यांच्या माळा सोडलेल्या दिसतात. गेल्या वर्षीची कसर यंदा दुपटीनं भरून काढायची, हे जवळपास प्रत्येकानंच ठरवलेलं असतं. घरी जाताना लिफ्टमध्ये पोरंटोरं हातात खेळण्यांतली पिस्तुलं घेऊन खाली टिकल्या उडवायला निघालेली बघून, सगळं कसं सुरळीत सुरू असल्याचा ‘फी‌ल’ येतो. आपल्या मजल्यावरच्या सगळ्या घरांसमोर काढलेल्या देखण्या रांगोळ्या आणि पणत्यांची ओळ पाहून आपल्या डोळ्यांतही सुखाचे दिवे लखलखू लागतात. नुकतंच स्वच्छ केलेलं घर आपल्याकडं बघून हसत असतं. घरात आजोबांनी संगणकाला आदेश देऊन हौसेनं लावलेल्या सनईचे मंद सूर कानावर पडतात. आपण टेरेसमध्ये जातो. तिथं आपण उंच टांगलेला आपला आकाशकंदील उंच मस्त डोलत असतो. आजूबाजूच्या बहुतेक घरांवर ही आकाशकंदील आणि दिव्यांची सजावट दिसतेच. तेवढ्यात स्वयंपाकघरातून अनारशांचा खमंग वास येऊ लागतो आणि आपण हसत म्हणतो - आली हं दिवाळी! 

---


२. दिवाळी पाडवा 


श्रोते हो, नमस्कार!
आज बलिप्रतिपदा... म्हणजेच दिवाळी पाडवा. महाराष्ट्रात बहुतांश घरांत आज दिवाळीचा जल्लोषात साजरी होत आहे. वसुबारसेपासून सुरू होणारा पाच दिवसांचा हा वर्षातला सर्वांत मोठा उत्सव आपल्या मनातही प्रकाशाच्या रूपानं आशेची ज्योत प्रज्वलित करतो. आजच्याच दिवशी विक्रम संवतहे नवं वर्ष सुरू होतं. व्यापारी मंडळी नव्या वह्यांचं पूजन करतात. उत्तर भारतात गोवर्धनपूजन केलं जातं. असं या बलिप्रतिपदेचं महत्त्व आहे.
आपल्याकडं समस्त विवाहित पुरुषमंडळींसाठी हा सण म्हणजे आपल्या गृहलक्ष्मीला खास भेटवस्तू देण्याचा. दिवाळी पाडव्याची ओवाळणी पूर्वी एखाद्या चांगल्या साडीत भागायची. आता मध्यमवर्गीय लोक आणि त्यांच्या गृहलक्ष्म्या फार पुढं गेल्या. एखादी सिल्कची साडी वगैरे भेटी मागं पडल्या. आता हिऱ्याच्या दागिन्यांपासून ते एखाद्या हायएंड कारपर्यंत किंवा परदेशातल्या ट्रिपपासून महागातल्या ब्रँडेड फोनपर्यंत काय द्यावं लागेल हे हल्ली सांगता येत नाही. अर्थात गेल्या काही वर्षांत आपल्या सगळ्यांच्याच जगण्यात भौतिक समृद्धी आली हे नाकारून चालणार नाही. त्यामुळं आता दिवाळी म्हटलं, की हे असं सगळं असणार हे आपण गृहीत धरलेलंच असतं, नाही का! कधी कधी मग फार उंच उड्या मारायच्या नादात बजेट कोलमडतं. शेवटी मध्यमवर्गीय माणसाचं फुगलेलं बजेट तरी असं किती फुगणार? मग आपल्या कुटुंबाच्या आनंदातच आपलाही आनंद असतो, वगैरे म्हणून मग आपल्या स्वत:च्या खरेदीवर फुली मारावी लागते. तेही आपण हसत हसत करतो. गमतीचा भाग सोडा, पण अगदी दर वेळी बायकोला अशी महागडी भेटवस्तू द्यायला लागते असं नाही. महत्त्वाचं असतं, तो वेळ देणं. हल्लीच्या काळात वेळेसारखी महाग वस्तू दुसरी मिळणं कठीण. जो तो आपला ह्यात! वेळ कुणालाच नाही. मग एकत्र कुटुंबातील भेटीगाठी, गप्पागोष्टीहे सगळं करायला दिवाळीसारखा दुसरा मुहूर्त नाही.
दिवाळीसारख्या मोठ्या सणाचं महत्त्व काय सांगावं! माणसाला जगण्यासाठी सदैव सकारात्मक विचारांची, आशेची, आकांक्षेची ऊर्जा लागते. आपल्याकडचे सण हे इंधन पुरवण्याचं काम करत असतात. शिवाय आनंदी वृत्ती असण्यासाठी ऐहिक श्रीमंतीची अट नसते. किंबहुना ऐहिकातल्या सुखाचं ओझंच होण्याची शक्यता अधिक. सुदैवानं सणांच्या रूपानं आपल्याकडं ही आनंदी वृत्ती बहुतेकांच्या अंगी अवतरते. अगदी हातावर पोट असलेल्या मजुरापासून ते अत्यावश्यक सेवा म्हणून ऐन सणाच्या दिवशीही कर्तव्यभावनेनं कार्यतत्पर असलेले सीमेवरील जवान, पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, एसटीचे ड्रायव्हर-कंडक्टर, रेल्वेचे मोटरमन, डिलिव्हरी बॉइज, पोस्टमन, कुरिअर बॉइज, डॉक्टर, नर्स, पत्रकार आणिदेशभरातील अशा अनेक व्यवसायांतील हजारो जण… अशा सर्वांनाच या सणाचा आनंद लुटण्याचा हक्क आहे. आपण करीत असलेलं काम नेकीनं, कर्तव्यभावनेनं पूर्ण करणं हाही त्यांच्या आनंदनिधानाचा भाग असू शकतो. तरीही कुटुंबासमवेत घरात राहून हा सण साजरा करण्याचं समाधान काही औरच, यात शंका नाही. घरातल्या प्रियजनांसोबत आकाशकंदील तयार करणं, रांगोळी काढणं आणि फुलांची आरास सजवणं अशा गोष्टी करण्याची मजा वेगळीच. पाडव्याच्या दिवशी गृहलक्ष्मीनं आपल्या पतीला औक्षण करणं आणि कुटुंबातील सौख्याचा हा ठेवा अबाधित राखण्यानं अबोल वचन निरांजनाच्या साक्षीनं देणं यातल्या सुखाचं मोजमाप करता येईल का? दिवाळीसारखा मोठा सण अर्थव्यवस्थेचं चाकही फिरवीत असतो. यंदा तर जीएसटीतील सवलतींमुळं अगदी खरेदीचा उत्सव आणि बचतीचा उत्सवही सुरू आहे. छोट्या छोट्याव्यावसायिकांपासून ते ऑनलाइन विक्री करणाऱ्या महाबलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत सर्वांना दिवाळीची पर्वणी खुणावत असते. नोकरदारांच्या हाती पडणाऱ्या बोनसमुळं बाजारात पैसा येतो आणि खरेदीचा आनंद घराघरांत पसरू लागतो. यंदाची दिवाळी हाच सगळा आनंद आणि सुख आपल्या आयुष्यात घेऊन आली आहे.
ज्योतीने ज्योत प्रकाशित होते, तसं या सणाच्या निमित्ताने आपण एकमेकांच्या चेहऱ्यांवर हसू फुलवू या. सगळे आनंदात असतील, सुखात असतील तर सण साजरा करण्याचा आनंद निश्चितच द्विगुणित होईल, नाही का!
प्रकाशपर्वाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा…

---

३. भाऊबीज 


श्रोते हो, नमस्कार!

आज भाऊबीज. आजच्या दिवसाला यमद्वितीयाही म्हणतात. दिवाळीतल्या पाच दिवसांपैकी हा एक खास दिवस बहीण आणि भावाच्या नात्याचा. आपल्याकडं देशभर भाऊबीज उत्साहानं साजरी करतात. उत्तरेत या सणाला भाईदूज असं म्हणतात. देशात काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाचीही पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी यमुना नदीत स्नान करणं अत्यंत पवित्र समजलं जातं. आजच्या दिवसाला यमद्वितीया का म्हणतात, यम या मृत्यूच्या देवाशी याचा काय संबंध,असे प्रश्न लहानपणी पडायचे. नंतर पुढं त्यासंबंधीची लोकप्रिय कथाही ऐकण्यात आली. ती बहुतेकांना ठाऊक असेल. बहीण-भावाचं नातं अतिशय अवखळ, तितकंच निर्मळ. आपल्या आई-वडिलांखालोखाल आपल्यावर प्रेम, माया कोणाची असेल तर ती आपल्या भावंडांची. यात सख्खे, चुलत, आत्ये-मामे, मावस अशी सगळी भावंडं आली. अगदी ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती होती. एका घरात १५-२० माणसं सहज असायची. त्यामुळं आपली सख्खी किमान एक ते तीन भावंडं असायची आणि शिवाय चुलत भावंडंही असायची. त्यात सुट्टीत आपल्या घरी येणाऱ्या आत्ये-मामे भावंडांची भर पडायची. कधी आपण त्यांच्याकडं जायचो. त्यामुळं सगळ्यांनी एकत्र खेळायचं, दंगा करायचा, मस्ती करायची हे चालायचंच. यातूनच भावंडांमध्ये बंध निर्माण व्हायचे. लहानपणी तर हे खूपच जाणवतं. त्या वयात आपल्या मनावर बाकी कसलीही ओझी, कसलेही पूर्वग्रह किंवा विकार नसतात हेही खरं. त्यातही बहिणींची भावावरची माया अंमळ अधिकच. त्यात भाऊ लहान असेल तर त्याला जपायचं, इतरांपासून वाचवायचं हे सगळं भगिनीवर्ग अगदी प्रेमानं करतो. याउलट बहीण लहान असेल तर भाऊही तिच्यासाठी एक संरक्षक कडं होऊन उभा राहतो. या दोघांचंही नातं फारच खास असतं आणि ते आपण बहुतेकांनी कायमच अनुभवलेलं असतं. कित्येक सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये, गाण्यांमध्ये हे भावंडांचं प्रेम दिसून येतं. ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’सारख्या गाण्यांतून गदिमांनीही बहिणीचा भावाकडं केलेला हा गोड हट्ट अजरामर केला आहे. अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील. लग्न होऊन बहीण सासरी गेली, की मग तिची लवकर भेट होत नाही. पूर्वी तर प्रवास करणंही फार जिकिरीचं असायचं. त्यामुळं आपल्या जवळच्या लोकांना भेटण्यासाठी सणांचं निमित्त असायचं. मंडळी, आपल्या पुराणकथा म्हणा, किंवा लोककथा म्हणा… किती अर्थपूर्ण असतात ना! आपल्या प्रत्येक सणामागं, उत्सवामागं असा काही तरी व्यापक अर्थ दडलेला असायचा. काळ बदलला, तरी बहीण-भावांचं प्रेम कायम राहिलं आहे. आता आपण आठवत राहतो, की लहानपणी किती तरी काळ भावंडांबरोबर खेळलो आहोत. काळानुसार कुटुंबं लहान होत गेली… प्रवासाची साधनं वेगवान झाली, तरी कुटुंबं देश-विदेशांत पसरत गेली. मग प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आणि व्हिडिओ कॉलवर भाऊबीज साजरी व्हायला लागली. अर्थात, बहिणीनं हट्ट करावा आणि भावानं तो पुरवावा, यात काहीही खंड पडलेला नाही. फरक पडला असलाच, तर तो इतकाच, की हल्ली बहिणीही भावांकडून भेटवस्तू फक्त घेत नाहीत, तर स्वत:ही उलट त्याला भरभरून देतात. प्रेम तर त्यांचं कायम भावापेक्षा अधिकच असतं. बहिणीचा जीव भावाला भेटण्यासाठी तळमळत असतो. त्यामागे लहानपणीच्या गोड आठवणींची ओढ असते. भावा-बहिणीच्या या अवखळ, निर्मळ आणि पवित्र नातं साजरं करण्यासाठी आजचा दिवस खास असतो. सर्वांना या खास दिवसाच्या शुभेच्छा…

---

४. दिवाळी अंक व दिवाळी पहाट 

श्रोते हो, नमस्कार!

दिवाळीचा सण संपला असला, तरी चार दिवसांनीही या सणाचा उत्साह आणि उत्सवी वातावरण अजिबात कमी होत नाही. याला कारणीभूत दोन गोष्टी. या दोन गोष्टी म्हणजे आपल्याकडच्या दिवाळी सणाचा अविभाज्य भागच झाल्या आहेत. एक म्हणजे दिवाळी अंक आणि दुसरी म्हणजे दिवाळी पहाट कार्यक्रम.
गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून मराठी माणसाची दिवाळी या दिवाळी अंकांमुळं खरोखर समृद्ध होत आलेली आहे. मराठी माणसाच्या काही खास, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. त्यात दिवाळी अंक ही महत्त्वाची. दिवाळी हा मुळातच वर्षातला सर्वांत मोठा सण असल्यानं या काळात हात सैल सोडून खरेदी होत असतेच. त्यात आवडीचे दिवाळी अंक आवर्जून विकत घेतले जातात. बहुसंख्य सुशिक्षित मराठी कुटुंबांमध्ये ही परंपरा दीर्घकाळ चालत आलेली आहे. दिवाळीच्या सुट्टीत या अंकांचं वाचन हा फार मोठा आनंदसोहळा असायचा. मराठीत विपुल प्रमाणात दिवाळी अंक निघतात. नामवंत आणि वर्षानुवर्षं प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची संख्या साडेतीनशे ते चारशेच्या आसपास आहे. याशिवाय गावोगावी निघणारे अंक धरले तर ही संख्या दीड-दोन हजारांच्या घरात सहज जाईल. नियमित निघणारे नेहमीचे अंक म्हटले, तरी वर्षानुवर्षं हे अंक निघत आलेले आहेत, यातलं सातत्य वाखाखण्याजोगं आहे. या दिवाळी अंकांमधून दर्जेदार कथा, कविता आणि कादंबऱ्याही वाचकांना वाचायला मिळतात. अनेक मोठमोठ्या लेखकांची सुरुवात दिवाळी अंकांतून लेख लिहूनच झाली आहे. मराठीत कवींचं उदंड पीक बारमाही येत असतं, त्याला कारण त्यांच्या कविता प्रसिद्ध करणारे असे शेकडो अंक निघत असतात. आपल्या लहानपणी लायब्ररीतूनच दिवाळी अंक आणून वाचायची पद्धत होती. फारच थोडे अंक विकत घेतले जात. त्यातही ‘आवाज’सारख्या विनोदी अंकावर वाचकांच्या उड्या पडत. त्यातल्या त्या ‘खिडक्यां’चं आकर्षण बरेच दिवस होतं. विनोदी अंकांखालोखाल मागणी असायची ती भविष्यविषयक दिवाळी अंकांना. त्यानंतर मग दैनिकांनी काढलेले दिवाळी अंक आणि नंतर विशिष्ट विषयांना वाहिलेल्या अंकांचा नंबर लागत असे. या दिवाळी अंकांना पुढंही जवळपास सहा महिने भरपूर मागणी असे. त्यानंतर मग जुन्या झालेल्या अंकांचीही मित्रमंडळींत देवाणघेवाण चाले.
दिवाळी अंकांच्या जोडीला गेल्या ३०-३५ वर्षांत रुजलेला आणखी एक उपक्रम म्हणजे ‘दिवाळी पहाट’. अशा एखाद्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावायची, नंतर चविष्ट फराळाचा फन्ना उडवायचा आणि मग आवडता दिवाळी अंक वाचत दुपारी लोळत पडायचं, हा अनेकांचा आजही दिवाळातला ठरलेला कार्यक्रम आहे.
खरं तर दिवाळी पहाट ही आता आमच्या सांस्कृतिक उन्नयनाची अविभाज्य गोष्ट झाली आहे. ’पूर्वी हे नव्हतं,’ असं म्हणायला एक तरी गोष्ट आमच्या पिढीला मिळाली. दिवाळीला फटफटायच्या आत आंघोळी-पांघोळी नव्हे, नव्हे अभ्यंगस्नान…. करून रसिक माणसं ज्या त्वरेने पटापटा या अफाट पहाटा पाहायला जवळपासची नाट्यगृहं किंवा लॉन्स वगैरे गाठतात, ते पाहून केवळ अचंबित व्हायला होतं. पहाट ही पूर्वी केवळ अनुभवण्याची गोष्ट होती. आता ती अनुभवण्याबरोबर पाहण्याची-ऐकण्याचीही गोष्ट झालीय. पूर्वीच्या व्याकरणात ‘मी पहाट ऐकली’ हे वाक्य शंभर टक्के चुकीचं मानलं गेलं असतं. आता पहाट केवळ ऐकलीच जात नाही, तर ती एकशे दहा टक्के पाहिलीही जाते. या पहाटांमध्ये रसिक लोक विशेषतः जुनी मराठी गाणी ऐकतात. त्यातही मराठमोळ्या संस्कृतीचं वर्णन करणारी गाणी हॉट फेवरिट असतात. या पहाटांमुळं शहरभरची तमाम रसिक मंडळी सकाळी सकाळी स्वच्छ आवरून, नवे कपडे वगैरे घालून एकत्र जमतात हे कौतुकाचं आहे. पुढचे काही दिवस असंच वातावरण असेल. आपण त्याचा आनंद लूटू या… नमस्कार!

---

(समाप्त)

-----

(मुंबई आकाशवाणीवरील (अस्मिता वाहिनी) प्रसारणकाळ - २१ ते २४ ऑक्टोबर २०२५)

----


No comments:

Post a Comment