कवी ‘जगवतो’ तेव्हा...
--------------------------
(‘शिक्षणवेध’या उच्च व तंत्रशिक्षण खात्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या नियतकालिकात सध्या ‘रूपे रूपेरी’ हे चित्रपटविषयक सदर लिहितो आहे. त्यातील हा पहिला भाग.)
चित्रपट बघायला आवडत नाही, अशी व्यक्ती सापडणं अवघड. आपल्या सगळ्यांना रूपेरी पडद्यावरच्या या जादूने गेल्या शतकाहून अधिक काळ वेड लावलं आहे. या काळात अनेक उत्तमोत्तम चित्रपट तयार झाले. त्यातल्या काही विशेष, त्यातही तरुण विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहाव्यात अशा काही कलाकृतींचा वेध आपण ‘रूपे रूपेरी’ या सदरामधून घेणार आहोत. पहिल्या लेखात ‘डेड पोएट्स सोसायटी’ या गाजलेल्या इंग्लिश चित्रपटाविषयी...
-----
अमेरिकेतलं एक उच्चभ्रू महाविद्यालय. तिथं सगळंच कसं शिस्तीत आणि आखीवरेखीव! अशा महाविद्यालयांत घडतात ते अत्यंत हुशार, प्रज्ञावंत विद्यार्थी. पुढे जाऊन आपल्या देशाच्या कीर्तीत, लौकिकात, महत्तेत भर घालणारे अतिशय बुद्धिमान विद्यार्थी. असे विद्यार्थी मानेवर खडा ठेवून तासन् तास अभ्यास करतात. त्यांचं जीवनही कसं शिस्तबद्ध आणि काटेकोर असतं. प्रत्येक क्षणाचा जणू हिशेब त्यांना कुणी तरी मागत असतं. हे विद्यार्थीही महाविद्यालयाच्या त्या ठरावीक साच्यातून, तेथील वरिष्ठांना जसे हवे तसे, होऊन बाहेर पडतात. हे असंच वर्षानुवर्षे चालत असतं. मात्र, या सगळ्यांत या विद्यार्थ्यांकडून एक थोडी महत्त्वाची गोष्टच करायची राहून जात होती - त्यांचं ‘जगायचं’च राहून जात होतं...
अशा वेळी तेथे प्रकटतो एक कवी. म्हणजे कविमनाचा प्राध्यापक. ज्ञान मिळविण्याच्या, मोठं होण्याच्या वरील चाकोरीची मळलेली वाट त्याला मान्य नसते. मग तो यातल्या काही भाग्यवान विद्यार्थ्यांना वेगळी वाट दाखवतो. त्यांना कविता शिकवतो. जगण्यातली मौज समजावून सांगतो. त्या विद्यार्थ्यांनाही हळूहळू समजत जातं, की आपल्याला नक्की काय हवंय? आपल्याला काय आवडतं? आपल्याला आवडते तीच गोष्ट आपण आयुष्यात करत राहिली पाहिजे... अर्थात विद्यार्थ्यांना हे ज्ञान मिळण्यासाठी एका दुर्दैवी जीवाचा बळी जावा लागतो.
‘डेड पोएट्स सोसायटी’ या १९८९ मध्ये आलेल्या अमेरिकी चित्रपटाचं हे कथासार. पीटर वेअर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यातील जॉन कीटिंग या कवी-प्राध्यापकाच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता रॉबिन विल्यम्सने कमाल केली होती. नील पेरी या विद्यार्थ्याची भूमिका रॉबर्ट सीन लेनर्ड याने, तर टॉड अँडरसन या विद्यार्थ्याची भूमिका इथन हॉकने केली आहे. चित्रपटाचं कथानक वेल्टन अकादमी या व्हरमाँटमधील काल्पनिक शिक्षण संस्थेत घडते. या महाविद्यालयाची चार प्रमुख तत्त्वे आहेत - परंपरा, सन्मान, शिस्त आणि उत्कृष्टता. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे अधोरेखित केलं जातं. या महाविद्यालयात इंग्रजी शिकविण्यासाठी जॉन कीटिंग या शिक्षकाची नियुक्ती होते. इतर शिक्षकांपेक्षा कीटिंग वेगळे असतात. ते पुस्तकी ज्ञानापेक्षा इतर काही महत्त्वाची तत्त्वे विद्यार्थ्यांना शिकवू पाहतात. स्वतंत्र विचार करायला शिकवतात. मुख्य म्हणजे कविता शिकवतात. ‘कार्पे डिअम’ (लॅटिन शब्दप्रयोग - अर्थ सीझ द डे - दिवस भरभरून जगा) हा त्यांचा मूलमंत्र असतो. या सरांचं सगळंच वेगळं असतं. ते कवितांच्या पुस्तकांतील गणिती पद्धतीनं कवितेला रेटिंग देण्याच्या प्रकाराविषयी लिहिलेली पानं आधी फाडायला सांगतात. प्रत्येकानं कवितेचं स्वतंत्र मूल्यमापन करावं, असा त्यांचा आग्रह असतो. त्या महाविद्यालयाचे कडक शिस्तीचे प्राचार्य नोलन यांना कीटिंग यांची ही शिकविण्याची तऱ्हा अजिबात आवडत नाही.
कालांतरानं मुलांना कीटिंग सर तरुणपणी चालवत असलेल्या ‘डेड पोएट्स सोसायटी’ नावाच्या ग्रुपविषयी समजतं. मग नील, नॉक्स, रिचर्ड कॅमेरॉन, स्टीव्हन मीक्स, गेरार्ड पिट्स आणि चार्ली डाल्टन हे सगळे विद्यार्थी पुन्हा हा ग्रुप पुनरुज्जीवित करतात. एका गुहेत जाऊन कवितावाचन, वाद्यवादन असे उपक्रम ते सुरू करतात. यातूनच या विद्यार्थ्यांना त्यांचा ‘स्व’ गवसायला लागतो. नॉक्स त्याचं एका मुलीवर असलेलं प्रेम धीटपणे व्यक्त करायला शिकतो, तर नीलला त्याची अभिनयाची आवड गवसते. स्थानिक स्तरावर शेक्सपिअरच्या ‘मिडसमर नाइट्स ड्रीम’ या नाटकातली ‘पक’ची भूमिका मिळते. टॉडचा आत्मविश्वास परत येतो आणि वर्गासमोर स्वत:ची कविता म्हणण्याएवढं धैर्य त्याच्या अंगात येतं. नीलच्या शिस्तप्रिय व एकांगी विचारांच्या वडिलांना त्याचं हे नाट्यप्रेम अजिबात मान्य नसतं. त्याने हार्वर्ड विद्यापीठात जाऊन डॉक्टर व्हावं, यासाठी ते अतिशय आग्रही असतात. चार्ली विद्यापीठाच्या मॅगेझिनमध्ये विद्यार्थिनींनाही तेथे प्रवेश मिळायला हवा, या मताचा पुरस्कार करणारा लेख लिहितो. (या कथानकाची पार्श्वभूमी १९५९ ची आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवे.) त्यावरून संतापून प्राचार्य त्याला फटके देण्याची शिक्षा करतात. शिवाय ‘डेड पोएट्स सोसायटी’त आणखी कोण कोण आहे, याची विचारणा करतात. मात्र, चार्ली ते गुपित फोडत नाही. इकडे नाटकाच्या आदल्या दिवशी नीलचे वडील त्याला त्या नाटकात काम करण्यापासून परावृत्त करतात. त्यांच्या या कमालीच्या विरोधामुळं नील टोकाचं पाऊल उचलतो. या धक्कादायक प्रकारानंतर पुढं काय होतं, हे चित्रपटातच पाहायला हवं.
कनिष्ठ महाविद्यालय (अमेरिकेत त्याला ‘स्कूल’ असंच म्हणतात) स्तरावरील, थोडक्यात पौगंडावस्थेतून तारुण्यात पदार्पण करण्याच्या अतिशय नाजूक, तरल वयातील मुलांच्या भावभावना मांडणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला आता जवळपास ३५ वर्षे उलटून गेली, तरी त्यातल्या अनेक गोष्टी आजही सयुक्तिक वाटतात. टॉम शुलमन यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. नॅशव्हिल (टेनेसी) येथील माँटगोमेरी बेल अकॅडमीतील त्यांच्या स्वत:च्या अनुभवावर आधारित ही कथा आहे. सॅम्युएल पिकरिंग नावाचे त्यांचे असेच ‘वेगळे’ शिक्षक होते, ते त्यांनी कीटिंग या पात्राद्वारे उभे केले आहेत. कीटिंग या प्रमुख पात्रासाठी आधी लिआम नीसन, डस्टिन हॉफमन, मेल गिब्सन, टॉम हँक्स आदी नामवंत अभिनेत्यांचा विचार झाला होता. प्रत्यक्षात ही भूमिका साकारण्याचे भाग्य रॉबिन विल्यम्सच्या वाट्याला आले. (‘मिसेस डाउटफायर’ या चित्रपटातील त्यांची स्त्री-भूमिका पुढे खूप गाजली. त्यावरून आपल्याकडे ‘चाची ४२०’ हा चित्रपट आला होता.) या चित्रपटाच्या शेवटी ‘कॅप्टन, ओ कॅप्टन’ या वॉल्ट व्हिटमनच्या १८६५ मध्ये (अब्राहम लिंकन यांच्या हत्येसंदर्भात) लिहिलेल्या कवितेचा अतिशय सुंदर संदर्भ आहे. (रॉबिन विल्यम्सचे २०१४ मध्ये निधन झाले, तेव्हा त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर या कवितेद्वारे त्याला आदरांजली वाहिली. अनेक शिक्षकांनी सांगितले, की विल्यम्सने साकारलेल्या कीटिंगच्या या भूमिकेमुळेच ते या पेशात येण्यास उद्युक्त झाले.)
हा चित्रपट दोन जून १९८९ रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला. त्याने उत्तम व्यवसाय केला. या चित्रपटाला ऑस्कर सोहळ्यात उत्कृष्ट मूळ पटकथा, उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक व उत्कृष्ट अभिनेता (विल्यम्स) या विभागांत नामांकन मिळाले होते. प्रत्यक्षात शुलमन यांना उत्कृष्ट मूळ पटकथा या विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाला.
आपल्याकडे या चित्रपटावर आधारित चित्रपट आला नसता तरच नवल. सन २००० मध्ये आदित्य चोप्राने ‘मोहब्बतें’ हा भव्य हिंदी चित्रपट तयार केला तो ‘डेड पोएट्स सोसायटी’च्या प्रेरणेतूनच. अर्थात आदित्यने या मूळ कथेला भारतीय वळण देताना सिनेमात भरपूर बदल केले. केवळ मूळ गाभा कायम राहिला. ‘गुरुकुल’ या केवळ मुलग्यांच्या शैक्षणिक संस्थेचे कडक प्राचार्य नारायण शंकर यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली होती. त्यांच्या मेघा या मुलीची भूमिका ऐश्वर्या रायने केली होती, तर राज या तिच्या प्रियकराची भूमिका शाहरुख खानने साकारली होती. तोच काही काळानंतर या ‘गुरुकुल’मध्ये संगीत शिक्षक म्हणून परततो आणि तेथील तीन तरुणांना (उदय चोप्रा, जिमी शेरगिल, जुगल हंसराज यांना) नव्याने प्रेमाची भाषा शिकवतो.
‘मोहब्बतें’ तुफान चालला. आदित्य चोप्राने अतिशय भव्य प्रमाणात या चित्रपटाची निर्मिती केली होती. अमिताभचे हे दीर्घ काळानंतरचे ‘कमबॅक’ होते. (त्याने स्वत: यश चोप्रांकडे जाऊन मला सिनेमात काम द्या, अशी मागणी केली होती म्हणतात.) जलित-ललित यांनी दिलेले संगीतही सुपरहिट झाले. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता २५ वर्षे होत आली, तरी त्यातली गाणी आजही लोकप्रिय आहेत.
‘डेड पोएट्स सोसायटी’ काय किंवा आपला ‘मोहोब्बतें’ काय, दोन्ही चित्रपटांनी तरुण विद्यार्थ्यांना आपल्या जगण्याचं नेमकं प्रयोजन शोधण्यासाठी मदत केली. या चित्रपटांत दाखवलेल्या विद्यार्थ्यांशी आपण प्रेक्षक म्हणून सहज रिलेट होऊ शकतो. आपणही अशा अनेक प्रसंगांतून गेलेलो असतो. ‘डेड पोएट्स सोसायटी’तल्या नीलप्रमाणेच आवडते क्षेत्र की वडिलांनी सांगितलेले करिअर क्षेत्र ही द्विधा अवस्था आजही कित्येक विद्यार्थ्यांची होत असते. सर्वांंनाच कीटिंग सरांसारखे किंवा राज सरांसारखे शिक्षक लाभत नाहीत. त्यामुळेच हे दोन्ही सिनेमे आपल्याला ‘स्वत:चं ऐका’ हा महत्त्वाचा संदेश देतात, तो लक्षात ठेवण्यासारखा आहे.
रूढ चाकोरीतलं शिक्षण घेणं, त्यासाठी झटून अभ्यास करणं, शिस्त पाळणं हे सगळं एका मर्यादेपर्यंत आवश्यक आहेच; मात्र तेच ते करताना आपला ‘रोबो’ तर होत नाहीय ना, हे सतत तपासावं लागतं. त्यासाठी एक तर कविमनाचा शिक्षक लाभावा लागतो किंवा आपलं मन तसं घडवावं लागतं. त्यामुळं या चित्रपटाचं वर्णन तीन शब्दांत करायचं झाल्यास ते ‘कवी ‘जगवतो’ तेव्हा...’ असंच करावं लागेल.
-----



No comments:
Post a Comment