8 Dec 2025

पाँडिचेरी डायरी - भाग २

कर्मयोग, शुभ्रग्राम अन् सागर
------------------------------------


३० नोव्हेंबर २०२५. मु. पाँडिचेरी.


रविवारी सकाळी जाग आली, तीच पावसाच्या आवाजाने. अंदाज खरा ठरला होता. ते डिटवाह चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनाऱ्यावर धडकलं होतं. परिणामस्वरूप तमिळनाडूच्या सर्व किनारपट्टीवर पाऊस सुरू झाला होता. आजचा दिवस, किंबहुना दोनच दिवसांची ही ट्रिपच पाण्यात जातेय की काय, अशी शंका आली. मात्र, आश्चर्यकारकपणे, थोड्या वेळात पाऊस थांबला. आम्ही जे हॉटेल घेतलं होतं, तिथं ब्रेकफास्टची किंवा चहापाण्याची काही सोय नव्हती. हॉटेल अगदी गावात असल्यानं बुकिंग करताना असं वाटलं, की आजूबाजूला सगळं सहज मिळेल. मात्र, त्या वेळी पावसाची शक्यताच गृहीत धरली नव्हती. नशिबानं आमच्याकडं छत्र्या होत्या. मग मी आणि धनश्री खाली उतरून त्या गल्लीत कुठलं हॉटेल किंवा चहाची टपरी वगैरे दिसतेय का ते शोधायला बाहेर पडलो. सुदैवानं आमचा रस्ता सोडून पुढं काटकोनात वळल्यावळल्या त्या रस्त्यावर आम्हाला एक सोडून दोन हॉटेलं सुरू असलेली दिसली. ती आपल्याकडच्या ‘अमृततुल्य’सारखीच होती. जरा आडवी व मोठी होती. शिवाय एवढ्या सकाळी तिथं इडल्या आणि मेदूवडेही ठेवलेले दिसले. त्या रस्त्याच्या पलीकडंच तिथली भाजी मंडई किंवा तत्सम मार्केट होतं. तिथं काम करणारी कामगार मंडळी जास्त संख्येनं सकाळी सकाळी तिथं चहा किंवा कॉफी प्यायला जमली होती. त्यात बऱ्याच बायकाही होत्या. धनश्रीनं व मी तिथं अनुक्रमे कॉफी आणि चहा घेतला. नीलसाठी पार्सल चहाही घेतला. चहा घेतल्यानं चांगलीच तरतरी आली होती. पाऊस थांबला तरी अगदी बारीक भुरभुर येत होती.
एक चांगलं होतं, की आमच्या हॉटेलपासून व्हाइट टाउनमधील सगळी ठिकाणं अगदी चालत जाण्याच्या अंतरावर होती. आम्ही आवरून नऊ वाजता बाहेर पडलो. नाश्ताही बाहेरच कुठे तरी करू, असं ठरवलं. पहिल्यांदा आम्ही अर्थातच योगी अरविंदांचा आश्रम पाहायला गेलो. तो आमच्या हॉटेलपासून अवघ्या ६०० मीटर अंतरावर होता. मग चालतच तिथं गेलो. त्या आश्रमासमोर गेल्यावर आमचा जरा भ्रमनिरासच झाला. आश्रम किंवा कुटी म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जे चित्र येतं, तसं इथं काहीच नव्हतं. माझ्या डोक्यात, वर्धा येथील सेवाग्राम आश्रमासारखा हा आश्रम असेल, असं काही तरी होतं. प्रत्यक्षात इथं त्या इतर चार इमारतींसारखीच ही एक बैठी, तशी लहानशीच इमारत होती. तिथं समोर चपला काढून आत जायचं होतं. एका स्वयंसेवकानं मोबाइल आवर्जून बंद करायला लावले. आम्ही आत गेलो. वळून उजवीकडं गेल्यावर एका झाडाखाली योगी श्री अरविंदांची समाधी होती. आम्ही तिचं दर्शन घेतलं. तिथं काही मोजके अनुयायी बसले होते. तिथं बोलायला बंदी होती. आम्ही शांतपणे शेजारच्या इमारतीत गेलो. तिथं ग्रंथालय होतं. अरविंदांची सर्व ग्रंथसंपदा विविध भाषांत तिथं उपलब्ध होती. कर्मयोगावरचं अरविंदांचं प्रभुत्व आणि भाष्य प्रसिद्ध आहे. बहुतेक पुस्तकं तीच होती. ‘सावित्री’ हेही त्यांचं एक गाजलेलं पुस्तक तिथं होतं. नीलनं त्यांचं एक इंग्लिश, तर मी त्यांचं जीवनचरित्र असलेलं मराठीतलं छोटेखानी पुस्तक विकत घेतलं. पुढं अरविंदांच्या आणि त्यांच्या शिष्या मदर  (मीरा अल्फासा - यांनीच नंतर ‘ऑरोव्हिल’ उभारलं) यांच्या फोटोंचं दालन होतं. तिथं विक्रीही सुरू होती. आम्हाला ते फोटो घेण्यात रस नसल्यानं आम्ही बाहेर पडलो. पाँडिचेरीतलं हे एवढं महत्त्वाचं ठिकाण अशा रीतीनं केवळ २० मिनिटांत पाहून झालं होतं. आता काय बघायचं, असा आम्ही विचार करू लागलो. आम्ही निघण्यापूर्वी नीलनं ‘एआय’च्या मदतीनं एक टूर गाइड तयार केलं होतं. ते पाहिलं. त्यात इथून जवळच एक प्रसिद्ध व मोठं विनायक मंदिर आहे, ते आवर्जून पाहा, असा उल्लेख होता. ते मंदिर अगदी समोरच होतं. तिथं गेलो. तिथं बऱ्यापैकी गर्दी होती. या मंदिराचा एक हत्तीही प्रसिद्ध होता. तो मरण पावल्याचं समजलं. दाराशीच त्या हत्तीचा एक मोठा फोटो ठेवला होता. लोक तिथंही फुलं वाहत होते. मंदिराच्या समोरच्या रस्त्यावरच मंडप होता. त्या मंडपाच्या छतावर अतिशय सुंदर अशी गणेशचित्रं रेखाटली होती. आम्ही आत गेलो. आतही बऱ्यापैकी गर्दी होती. थोडी रांग होती. आम्ही त्या रांगेत उभे राहिलो. सुदैवानं त्याच वेळी आरती सुरू झाली. आतील पुजारी आरती घेऊन बाहेर आला. मंदिराच्या सर्व भिंतींवर गणपतीची विविध रूपांतील चित्रं होती. मंदिर आतूनही अतिशय भव्य व सुंदर होतं. दर्शन झाल्यावर तिथं जरा वेळ बसलो. नवीन लग्न झालेलं जोडपं सर्वांना द्रोणातून खिचडीसारखा प्रसाद देत होतं. मीही एक द्रोण आणला. तो उपम्यासारखा पदार्थ अतिशय चविष्ट होता. नाश्ता झाला नव्हता, त्यामुळं तो खाऊन बरंच वाटलं. मग बाहेर पडलो. समोरच एक छोटंसं रेस्टॉरंट सुरू झालं होतं. तिथं इडली, डोसा, मेदूवडा-सांबार असा नाश्ता केला. कॉफी घेतली, हे सांगायला नकोच. सुदैवानं आता पाऊस पूर्ण थांबला होता. आता आम्ही चालत पाँडिचेरी म्युझियमकडं निघालो. तेही अंतर अगदी जवळ, म्हणजे ६०० की ७०० मीटर दाखवत होतं. जाता जाता आम्ही त्या व्हाइट टाउनमध्येच प्रवेश केला होता. आमच्यासारखेच अनेक पर्यटक तिथं फिरत होते. त्या सुंदर इमारतींसमोर फोटो काढत होते. पाऊस नसला तरी वातावरण ढगाळ होतं. त्यामुळं छान गार वाटत होतं. आम्ही चालत पाँडिचेरी म्युझियममध्ये पोचलो. दहा रुपये तिकीट होतं. ते काढून संग्रहालय पाहिलं. तीन मजली होतं. खूप मोठं होतं असंही नाही. लगेच बघून झालं. शेवटची एक-दोन दालनं बघत असताना दिवे गेले. मग लोकांनी मोबाइलच्या बॅटरीच्या उजेडात पुढची दालनं बघितली. आम्हीही तेच केलं. तिथं एका ठिकाणी ‘अयी मेमोरियल’ची प्रतिकृती दिसली. ‘अयी’ म्हणजे तमीळ भाषेत स्त्री, बाई. त्या ‘अयी’ची एक दंतकथा आहे. ती त्या प्रतिकृतीखाली लिहिलेली होती. हे मूळ मेमोरियल चांगलं भव्य आहे. या म्युझियमसमोरच भारती पार्क नावाचं मोठं उद्यान आहे. त्या उद्यानाच्या मधोमध हे स्मारक आहे. (त्या दिवशी आम्ही त्या पार्कच्या आत गेलो नाही. दुसऱ्या दिवशी मात्र तिथं जाऊन ते मेमोरियल पाहिलं.) दिवे गेल्यामुळं म्युझियम बंदच करण्यात आलं. आमचं बघून झालंच होतं. मग बाहेर पडलो.

इथं रस्ता ओलांडला, की त्या भारती पार्कचं एक गेट आहे. त्याच्यासमोरच इथलं ‘राजनिवास’ हे राज्यपालांचं भव्य निवासस्थान आहे. तिथं फोटो काढले. मग पुन्हा त्या व्हाइट टाउनमधून हिंडलो. समुद्र अगदी समोरच होता. अनेक लोक तिकडं जायचा प्रयत्न करत होते. पण चक्रीवादळामुळं पोलिसांनी रस्ते बंद करून ठेवले होते. त्या बॅरिकेडपलीकडं तो प्रोमोनेड रस्ता आणि समुद्र सहज दिसत होता. काहो लोक बॅरिकेडमधून पलीकडं गेलेले दिसले. मग आम्हीही घुसलो. आता अगदी प्रोमोनेडच्या त्या कट्ट्यावर आम्ही उभे होतो. समोर समुद्र चांगलाच उधाणलेला दिसत होता. पोलिस होते. आत जाऊ नका, असं सतत सांगत होते. आम्हीही लांबूनच समुद्राचा आनंद घेत होतो. थोडा वेळ त्या रस्त्यानं फिरलो. आमच्या त्या ‘टूर गाइड’मध्ये इथला गांधींचा पुतळा, फ्रेंच वॉर मेमोरियल व लाइट हाऊस चुकवू नका, असं लिहिलं होतं. मग ते आम्हाला तिथं समोरच दिसलं. तिथंही पर्यटकांची गर्दी दिसली. मात्र, बसायला जागा मिळाली. निवांत बसलो. मागून समुद्राचं गार वारं येत होतं. फार बरं वाटत होतं. पाऊस नसल्यामुळं आम्हाला फिरता आलं होतं. आता दुपारचा एक वाजून गेल्यावर भूक लागली. जवळच एक व्हेज रेस्टॉरंट दाखवलं गुगलबाबानं. मग तिथं चालत गेलो. मात्र, ते नेमकं बंद होतं. मग सुरगुरू रेस्टॉरंट सापडलं. तिथं चालत गेलो. हे रेस्टॉरंट चांगलंच होतं. जेवण उत्तम झालं. तिथून बाहेर पडलो. आता मला इथले रस्ते हळूहळू समजू लागले होते. कुठून कुठं गेलो की कुठं निघतो किंवा कुठं पोचतो याचा अंदाज आला होता. मग मॅप न लावता हॉटेलवर जाऊ या, म्हणून निघालो. अजिबात न चुकता, दहा मिनिटांत हॉटेलवर पोचलो. चालून दमछाक झाल्यानं सरळ ताणून दिली. 
संध्याकाळी पुन्हा बारीक बारीक पाऊस सुरू झाला. मात्र, चहाची तल्लफ त्याहून मोठी होती. मग आवरून बाहेर पडलो. सकाळी चहा घेतला, त्याच्या समोर जे दुसरं दुकान होतं, तिथं आता चहा आणि कॉफी घेतली. पाऊस रिमझिम सुरूच होता. मग आता पावसाला न जुमानता तिथल्या मार्केटमध्ये फिरायचं आम्ही ठरवलं. मग चालत त्या मुख्य रस्त्यावर गेलो. हा अगदी आपल्या लक्ष्मी रोडसारखा रस्ता आहे. दुकानंही अगदी तशीच. बरंचसं विंडो शॉपिंग केलं. काही छोट्या वस्तू खरेदी केल्या. नीलला मला काही तरी वाढदिवसाचं गिफ्ट घ्यायचं होतं आणि ते आजच (३० नोव्हेंबर) घ्यायचं होतं, कारण वाढदिवसाचा महिना आज संपणार होता. मग एका दुकानातून मी एक शर्ट विकत घेतला. नीलनं बिल दिलं. आम्हाला रात्रीचं जेवण करूनच हॉटेलवर जायचं होतं. पण अजून वेळ होता. मग आम्ही ‘टूर गाइड’ काढलं. त्यात व्हाइट टाउनमधलं ‘अवर लेडी ऑफ एंजल्स’ हे चर्च आमचं बघायचं राहिलं आहे, असं लक्षात आलं. ते अंतर जरा जास्त, म्हणजे एक किलोमीटरपेक्षा जास्त होतं. मग रिक्षा करून जायचं ठरवलं. शंभर रुपयांत यायला एक रिक्षावाला तयार झाला. आम्ही चर्चमध्ये पोचलो. त्या परिसरात बराच अंधार होता. चर्चमध्येही अगदी मोजकीच माणसं होती. चर्च खरोखर सुंदर व भव्य होतं. आम्ही आतून ते बघत असतानाच तिथल्या लोकांनी आवराआवरी सुरू केली. खरं तर हे चर्च आठ वाजता बंद होतं, असं समजलं होतं. मात्र, ते आता सात वाजताच बंद करत होते. रिक्षावाल्याला हे माहिती असावं. याचं कारण तो थांबला होता आणि जाताना आणखी शंभर रुपये घेऊन आम्ही म्हणू तिथं सोडायला तो तयार झाला होता. आम्ही लगेच चर्चमधून बाहेर पडलो. आम्ही पुन्हा ‘सुरगुरू’लाच गेलो. हे हॉटेल आम्हाला आवडलं होतं. आता वेगळी डिश ट्राय करायची म्हणून कोच्छू पराठा ऑर्डर केला. फोडणीच्या पोळीसारखा पदार्थ समोर आला. इथं पराठाही असा कुस्करून देतात, हे त्यावरून कळलं. तो चवीला बरा होता. मी नॉर्थ इंडियन थाळी घेतली. मात्र, ती भरपूर आली. नाइलाजानं त्यातला राइस परत द्यावा लागला. ‘इथं राइस परत देणारा हा वेडा इसम कोण आहे?’ अशा नजरेनं तो वेटर माझ्याकडं पाहतोय की काय, असा मला भास झाला. खाऊन झाल्यानंतर बाहेर पडलो. आता रस्ते पाठ झाले होते. चालतच हॉटेलवर पोचलो. नीलनं तो शर्ट रीतसर माझ्या हाती दिला. लेकानं त्याच्या पैशातनं दिलेल्या या गिफ्टचं फार फार कौतुक वाटलं. मन आनंदानं भरून गेलं. दिवसभर दमल्यानं झोपही लवकर लागली.
अर्थात, उद्या एक विलक्षण अनुभव आपण घेणार आहोत, याची स्वप्नातही कल्पना आली नाही...



(क्रमश:)

------------




No comments:

Post a Comment