ओम नमो गंगायै...
---------------------
४ एप्रिल २०२६, वाराणसी
त्या पायऱ्या उतरून खाली आलो, तर समोर गंगेचं विशाल पात्र. वास्तविक आत्ता एप्रिल महिना असल्यानं हे पाणी कमी होतं. पात्र निम्मं कोरडं होतं. तरीही जी नदी वाहत होती ती पुष्कळ रुंद व मोठीच होती. त्यातून मोठमोठ्या नौका, यॉट सहज ये-जा करत होत्या. त्या गंगादर्शनानं मन संतुष्ट झालं. ‘राम तेरी गंगा मैली हो गयी पापीयों के पाप धोते धोते...’ हे खरं असलं, तरी गंगेचं पावित्र्य व माहात्म्य अबाधित आहे. श्रद्धाळूंसाठी गंगा ही आपले सर्व अपराध पोटात घेणाऱ्या आईसारखी देवी आहे, यात शंका नाही. आम्ही ज्या घाटावर पोचलो, तो शिंदे (सिंधिया) घाट होता. इथं फारशी गर्दी नव्हती. गर्दी असणारे मणिकर्णिका, दशाश्वमेध वगैरे घाट आमच्या उजव्या बाजूला होते. आमच्याकडं वेळ होता. त्यामुळं आत्ताच गंगेतून सैर करावी, असं ठरलं. अभि व शुभम म्हणाले, की इथल्या नावाड्यांशी आम्ही बोलतो. मग त्यांनी त्यांच्या खास ‘यूपी’ भाषेतून नावाड्याशी सौदा ठरवला आणि आम्ही त्या छोट्याशा होडीत बसलो. आम्ही सहा जण होतो. सगळ्यांनी ती लाइफ जॅकेट्स घातली. सीएनजीवर चालणारी ती होडी लगेच उजव्या बाजूला वेगात जाऊ लागली. आम्ही आमच्या उजव्या हाताला वाराणसीचे ते प्रसिद्ध घाट बघू लागलो. काय बघू आणि अन् काय नाही, असं होऊन गेलं. इतके दिवस केवळ माहितीपटांत, सिनेमांत बघितलेले ते भव्य घाट, तिथली जुनी मंदिरं, त्यांचे कळस, सर्वत्र फडफडणारे भगवे झेंडे, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या रंगबिरंगी होड्या, घाटांवर लगबगीने धावणारे पुजारी किंवा पंडे, त्यांच्या मागोमाग धावपळ करणारे भाविक, अधूनमधून ऐकू येणारा घंटानाद, दक्षिण भारतीय भाषांपासून ते थेट जपानी, चिनी वा कोरियन भाषांत रंगवलेले फलक, अतिशय मजबूत बांधकाम असणारे व किल्ल्यासारखे भासणारे दरभंगा घाटासारखे अचाट घाट, मणिकर्णिका व हरिश्चंद्र घाटावर सतत जळणारी प्रेतं, त्या आगीच्या लोळांतून डोळ्यांत घुसणारे ‘मृत्यू हेच शाश्वत सत्य’ यासारखे विचार, काशीला गंगेकाठी मरण म्हणजे थेट मोक्ष मानणारी व जुन्या काळी इथं येऊन खरोखरच मृत्यूला कवटाळणारी किती तरी भोळीभाबडी माणसं... सिनेमातली दृश्यं सरकावीत, तशी पुढं जाणाऱ्या होडीबरोबर उजव्या बाजूला ही सगळी दृश्यं काही प्रत्यक्ष, तर काही मन:पटलावर तरळून जात होती. आम्ही गंगेत हात बुडवत होतो, ते पाणी हाताला, डोक्याला, डोळ्यांना लावत होतो. त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शातून आपली सगळी आदिम संस्कृतीच कडकडून भेटायला आली आहे, असं काहीसं वाटून गेलं.
गंगेकाठी एकूण १०४ घाट आहेत. आम्ही त्यातले ५०-६० तरी पाहिले असावेत. अर्थातच नदीतून, धावते असे. बरंच पुढं जाऊन होडीनं यू-टर्न घेतला. दुपारची वेळ असली, तरी सुदैवानं ढगाळ वातावरण होतं. अनेक मोठमोठ्या नौकांतून बरेच भाविक, पर्यटक गंगाविहार करत होते. एखादी होडी जवळून गेली, की ‘हर हर महादेव’, ‘जय भोलेबाबा की’ अशासारखे गजर उठत होते. प्रत्येकाचा चेहरा गंगास्पर्शानं झालेल्या आनंदानं उजळून निघाला होता. आमच्या मित्रांनी नावाड्याला आम्हाला ‘गायघाट’ इथं सोडायला सांगितलं होतं. आम्ही जिथून होडीत बसलो, तिथून पुढं डावीकडं हा घाट होता. त्यामुळं आम्हाला बरीच मोठी चक्कर मिळाली. अखेर आम्ही गायघाट इथं उतरलो. मन आनंदानं भरून गेलं होतं. अनेक वर्षं जी कामना केली होती, ती आज देवाच्या कृपेनं फळाला आली होती. गंगेत घोडं न्हालं एकदाचं!
आम्ही आत जाऊन शांतपणे ते मंदिर बघितलं. इथं मोबाइल न्यायला परवानगी होती. त्यामुळं भरपूर फोटो काढले. इथल्या महाविद्यालयांच्या इमारतीही देवळाच्या कळसासारख्या आकाराच्या बांधल्या आहेत. हे विद्यापीठ बघण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रा. जयंत नारळीकर. नारळीकरांचे वडील रँग्लर विष्णू नारळीकर या विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. त्यामुळं नारळीकरांचं शालेय जीवन याच विद्यापीठीत व्यतीत झालं. ‘मला लहानपणी मराठीपेक्षा हिंदी चांगली बोलता यायची,’ असं त्यांनी ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात लिहिलं आहे. या चार नगरांतलं एक नगर अर्थातच बनारस होतं. नारळीकरांनी त्या दिवसांचं मोठं मनोज्ञ वर्णन या पुस्तकात केलं आहे. तेव्हापासून मला हे विद्यापीठ पाहायचं होतं. अर्थात ही फारच धावती भेट होती व विद्यापीठाच्या आवारात केवळ मी जाऊन आलो. पण ‘दुधाची तहान ताकावर’ याप्रमाणे मी मनाचं समाधान करून घेतलं.
आता आम्हाला भूक लागली होती. मंदिराच्या बाहेर खाण्याचे स्टॉल होते. तिथं वडापावही मिळत होता. मग आम्ही सगळ्यांनीच तोच घेऊन खाल्ला आणि मग अर्थातच ‘कुल्हड’वाला चहा घेतला. त्यामुळं जरा तरतरी आली. मग पुन्हा कॅब करून ‘गायघाट’ला निघालो. येताना लागलं त्याहून दुप्पट ट्रॅफिक जाताना लागलं. त्यामुळं साडेसातची आरती मिळते की नाही, असं वाटून गेलं. आम्हाला त्या घाटावर पोचायला बराच उशीर झाला. जवळपास सव्वाआठ वाजत आले होते. आम्ही मगाशी इथं येऊन गेलो होतो, त्यामुळे रस्ता माहीत होता. आम्ही पळतच घाटावर निघालो. आमचे मित्र त्यांच्या दुचाकीवरून कधीच घाटावर येऊन बसले होते. आम्ही पायऱ्या उतरत असतानाच मंत्रपुष्पांजली ऐकू आली. मला वाटलं, संपली आरती. आता काही बघायला मिळत नाही. मात्र, आम्ही पोचलो तेव्हा आणखीही मंत्र, आरत्या सुरू झाल्या. त्यामुळं आम्हाला निदान तो भाग तरी बघायला मिळाला. या घाटावर तुलनेनं गर्दी कमी असते. मात्र, नदीतून नौकेत बसून समोरून आरती बघण्याची आमची संधी हुकली. आरती झाल्यावरही आम्ही तिथं जरा रेंगाळलो. तिथं अनेक जण ते दिवे सोडत होते. साई व वृषालीनं आधी तिथून तो एक दिवा विकत घेऊन नदीत सोडला. मग आम्हीही सोडला. गंगेवरून येणाऱ्या वाऱ्यामुळं तिथं बसायला छान वाटत होतं खरं... पण आता आम्हाला भूक पण लागली होती आणि बाजारपेठेत जरा चक्करही मारायची होती. मग तिथून चालत निघालो सगळे. आमच्या मित्रांना आम्हाला प्रसिद्ध काशी चाट भांडारमध्ये न्यायचं होतं. पण तिथं जाईपर्यंत बराच उशीर झाला. मग खरेदीचा मोह टाळून थेट तिकडंच गेलो. जाताना पायाचे तुकडे पडले. काशी-विश्वेश्वराच्या त्या रस्त्यावर फक्त त्या गोल्फ कार्टसारख्या संस्थानच्या गाड्या चालतात. रिक्षांना रात्री १२ नंतरच तिकडून जायला परवानगी आहे. तिथला तो प्रसिद्ध चौक ‘रोप-वे’चं काम सुरू असल्यानं आणखी अरुंद झाला होता.
त्या चाट भांडारच्या दुकानासमोर ही गर्दी होती. आम्हाला वाटलं, की बहुतेक परत जावं लागणार. मात्र, थोड्या वेळात आम्हाला चक्क आत बसायला जागा मिळाली. मग तिथं बसून भरपेट पोटपूजा केली. टमाटर चाट ही तिथली स्पेशालिटी. त्यानंतर आलू टिक्की, फालुदा असं एकेक मागवून हाणलं. भरपूर झालं. आता आम्हाला खरेदीचाही उत्साह नव्हता आणि चालायचाही. मग आमच्या या मित्रांनी चक्क जुगाड करून दोन दुचाकीवाल्यांना पटवलं. ते खरोखर रायडर होते की असेच होते, कुणास ठाऊक. पण त्यांनी आम्हाला चक्क ट्रिपल सीट नेऊन हॉटेलला सोडलं. शंभर रुपयांत फक्त. आम्ही एवढे दमलो होतो, की कसंही करून हॉटेलला पोचायचं होतं. सहज बघितलं तर दिवसभरात आम्ही १५ हजारहून अधिक पावलं चाललो होतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला अयोध्येला जायचं होतं. त्यामुळं आमच्या मित्रांचे आभार मानून, आम्ही त्यांना निरोप दिला आणि रूमवर जाऊन ढाराढूर झोपलो.
रामजन्मभूमीकडे....
५ एप्रिल २०२६, वाराणसी/अयोध्या
सकाळी लवकर उठून आवरलं. ब्रेकफास्ट करून चेकआउट केलं. हॉटेलवाल्याला स्टेशनला सोडायला रिक्षा मागवायला सांगितल्या. इथल्या मुख्य रेल्वे स्टेशनला वाराणसी कँटोन्मेंट असं नाव आहे. आमच्या तिकिटावर लिहिलं होतं, की ‘वंदे भारत’ला फक्त वाराणसी जंक्शन इथूनच बसता येईल. आमच्या मित्रांनी आम्हाला कालच सांगितलं होतं, की इथं त्या स्टेशनला ‘कैंट’ म्हणतात, तर तुम्ही तसंच सांगा. वाराणसी सिटी नावाचंही एक मोठं स्टेशन आहे. आता नवोदित माणसाचा नक्कीच गोंधळ होईल, अशीच ही माहिती होती. अखेर आम्ही स्टेशनची खात्री करून रिक्षात बसलो. दोन्ही रिक्षांनी आम्हाला वीस मिनिटांत स्टेशनवर सोडलं. हे स्टेशन भव्य होतं. आमची ट्रेन सात नंबरच्या फलाटावर लागली होती. मग आम्ही सामान घेऊन ब्रिजवरून तिकडं गेलो. ही गाडी इथूनच सुटत असल्यानं ती फलाटावर उभीच होती. इथून ती मेरठला जाते. साधारण ८०० किलोमीटरच्या अंतरात मध्ये फक्त पाच की सहा स्टेशनं घेते. इथून निघाली, की अडीच तासांनी पहिला स्टॉप अयोध्या धाम हाच होता. गाडी वेळेत निघाली. साधारण ११० किलोमीटर ताशी हा सर्वोच्च वेग तिनं काही वेळा गाठला. मला उत्तर प्रदेशचा बराच मोठा भाग या प्रवासात बघायला मिळाला. सगळा सपाट मैदानी प्रदेश. अनेक ठिकाणी धान्य काढून त्याच्या पेंड्या रचून ठेवल्या होत्या. सगळीकडं कडक उन्हामुळं एक पिवळट-मातकट रंग पसरला होता. ‘वंदे भारत’मध्ये आम्ही एसीत बसलो होतो. बाहेर मात्र रणरणतं ऊन होतं. छोटी छोटी गावं लागली. बाहेर एवढ्या उन्हातही क्रिकेट खेळणारी मुलं... एखाद्या मोठ्या झाडाला पार, त्यावर बसलेले वृद्ध... सगळी घरं विटांची आणि बाहेरून प्लास्टर न करण्याची पद्धत, त्यामुळं त्या विटा अशा उघड्या दिसणाऱ्या... अशीच सगळी एक मजली किंवा जास्तीत जास्त दुमजली घरं. दोन्ही बाजूंनी असाच अफाट व सपाट पसरलेला हा उत्तर प्रदेश! हिंदी हार्टलँड... अनेकदा ‘गायपट्टा’ म्हणून हिणवला जाणारा. मात्र, अगदी पूर्वी ‘स्टार प्लस’वरच्या ‘क्यूं की साँस भी कभी बहू थी’ या आणि अशा अनेक हिंदी मालिकांचा लाखोंच्या संख्येत असलेला ‘कोअर’ प्रेक्षक असलेली ही भूमी. आमच्या प्रवासात जौनपूर हे एकच मोठं शहर लागलं. बाकी छोटी गावं. बऱ्याच गावांची नाव जफराबाद वगैरे मुस्लिम वळणाची. अयोध्येपर्यंतचं १९० किलोमीटरचं अंतर आमच्या ‘वंदे भारत’नं अडीच तासांत कापलं. सकाळी ९.१० ला निघालेली गाडी बरोबर ११.४० वाजता ‘अयोध्या धाम’ असं नव्यानं नामकरण झालेल्या (माझ्या माहितीनुसार आधी या स्टेशनचं नाव फैजाबाद होतं...) त्या भव्य स्थानकात पोचली. गाडीला ठरलेल्या वेळेपेक्षा फक्त सहा मिनिटं उशीर झाला होता.
इथं स्टेशनची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. स्टेशनच्या दोन्ही फलाटांना धरून वरच्या बाजूला पहिल्या मजल्यावर मोठं प्रतीक्षालय व त्यावर मोठा डोम असं बांधलं होतं. आम्ही सरकत्या जिन्यानं वर गेलो. ते भव्य प्रतीक्षालय ओलांडून पलीकडच्या बाजूनं सरकत्या जिन्यानं खाली उतरलो व स्टेशनबाहेर आलो. वृषालीनं कॅब बुक केली होती. सात नंबरच्या गेटपाशी या असं त्यानं सांगितलं. तिकडं गेलो, तर तिथं बऱ्याच कॅब उभ्या होत्या. सुदैवानं आमची कॅब लगेच सापडली. इथून आम्ही बुक केलेलं ‘हॉटेल पंचशील’ सहा किलोमीटरवर होतं.
अयोध्या शहराच्या दिशेनं गाडी निघाली. भगभगत्या उन्हात ते मध्यम आकाराचं गाव अगदीच साधं वाटलं. पूर्वी तर फैजाबाद व अयोध्या ही दोन्ही गावं फारच बकाल होती, असं अनेकांकडून ऐकलं होतं. आता मात्र रस्ते एकदम चांगले दिसले. आमचं हॉटेल हायवेच्या बाजूलाच होतं. तिथं पोचलो तेव्हा फक्त सव्वाबारा वाजले होते. आमचं ‘चेक-इन’ एक वाजता होतं. मात्र, तिथल्या लोकांनी औपचारिकता पूर्ण करून आम्हाला लगेचच खोल्या ताब्यात दिल्या. आम्हाला भूक लागली होती. या हॉटेलच्या प्रांगणात त्यांचंच एक चांगलं गार्डन रेस्टॉरंट होतं. मग तिथं गेलो. हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. अगदी पुण्यात आल्यासारखं वाटलं. जेवण ठीकठाक होतं. पुन्हा अयोध्येत आल्यासारखं वाटलं. नंतर बिल आल्यावर पुन्हा पुण्यात आल्यासारखं वाटलं. असा लंचचा सी-सॉ खेळून झाल्यावर आम्ही तिथूनच बाहेर पडलो. आता श्रीरामजन्मभूमी तीर्थाकडं जाऊन ‘रामलल्ला विराजमान’चं दर्शन घेण्याची अतिशय उत्सुकता होती. आम्ही बाहेर येऊन कॅब बुक करायला लागलो. मात्र, दुपारी दोनच्या त्या रणरणत्या उन्हात एकही कॅबवाला येईना. मग पुन्हा हॉटेलमध्ये येऊन तिथल्या ‘ट्रॅव्हल डेस्क’वर आमच्यासाठी कॅब बुक करायची विनंती केली. त्याने एक हजार रुपये होतील, असं सांगितल्यावर ‘धन्यवाद’ म्हणून पुन्हा बाहेर आलो. आमच्या हॉटेलपासून रामजन्मभूमी तीर्थ सहा-साडेसहा किलोमीटर होतं. त्यामुळं जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे रुपये व्हायला हवे होते. अखेर एक कॅब बुक झाली. तो कॅबवाला चांगला होता. जाताना बरीच माहिती त्यानं दिली. अयोध्येचं बदललेलं रूप जाणवत होतं. उत्तम, रुंद रस्ते, आकर्षक पथदिवे, चित्रांनी सजलेल्या भिंती असं सगळं नवं कोरं होतं. थोड्याच वेळात आम्ही टेढी बाजार नावाच्या चौकात येऊन पोचलो. इथून पुढं कॅब वा रिक्षा जात नाही. इथून पुढं संस्थानच्या गोल्फ कार्टसारख्या गाड्याच आत जातात. तिथून रामजन्मभूमी तीर्थाच्या प्रवेशद्वारापर्यंत २० रुपये तिकीट होतं. आम्ही त्या कार्टमध्ये बसून पाच मिनिटांत त्या प्रवेशद्वारापाशी पोचलो. जाताना दोन्ही बाजूंनी विविध दुकानं आणि भाविकांची वाढती गर्दी दिसू लागली. त्या ट्रस्टच्या भव्य कार्यालयाच्या दारात आम्ही उतरलो. ‘जगद्गुरू श्रीरामानन्दाचार्य द्वार’ असं लिहिलेल्या प्रवेशद्वारातून आत गेलो. आम्ही कुठलंही ऑनलाइन बुकिंग केलं नव्हतं. ‘थेट जा, काही प्रॉब्लेम नाही,’ असं बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. तरी त्या ट्रस्टच्या कार्यालयात ‘स्वागत कक्षा’त जाऊन मी चौकशी करून आलो. तिथं फक्त व्हीलचेअर हवी असेल तर नाव नोंदवायची व्यवस्था आहे. बाकी लॉकर, चपला ठेवायची जागी वगैरे सर्व पुढं आहे, असं सांगण्यात आलं. मग आम्ही बाहेर येऊन रांगेला लागलो. इथं रांगेवर छत बांधलेलं असल्यानं उन्हाचा त्रास नव्हता. स्टीलचे बार उभे करून रांगा केल्या होत्या. त्यामुळं रांग अस्ताव्यस्त होत नव्हती. ही सर्व व्यवस्था अतिशय समाधानकारक होती. रांगेत थोडं पुढं गेल्यावर समोरच राम मंदिराच्या मुख्य कळसाचं व धर्मध्वजाचं दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं. उन्हाचा सगळा ताप गेला. ‘अनुदिनी अनुतापें तापलो रामराया’ ही भावना एकदम नष्ट झाली. अंगात वेगळाच उत्साह संचारला. तिथून साधारण ७०० मीटर अंतरावर आत डाव्या बाजूला बूट-चपला ठेवायची जागा होती. तिथं एका पिशवीत आपापल्या चपला वा बूट ठेवून कुपन घ्यायचं होतं. उन्हामुळं पाय पोळू नयेत म्हणून तिथं कार्पेट टाकण्यात आले होते. त्यामुळं पाय भाजत नव्हते. तिथून मग समोरच्या मोठ्या इमारतीत असलेल्या लॉकरच्या रांगेत उभे राहिलो. इथंही काय आता नेता येतं व काय नेता येत नाही याच्या स्पष्ट सूचना देणारे फलक व्यवस्थित लावले होते. त्यानुसार मोबाइल, स्मार्ट वॉच, कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण आत नेता येत नाही. याउलट पैसे, वॉलेट, छोटी पर्स, पारंपरिक घड्याळ, बेल्ट हे सगळं चालत होतं. या इथे मात्र बरीच मोठी रांग होती. सिंगल लाइन करताना आम्हाला बरीच यातायात करावी लागली. लोक ऐकत नव्हते. बेशिस्तीचं दर्शन घडत होतं. अज्ञानामुळं काहींचा वेळ जात होता. मात्र, ही तपश्चर्या पार पाडून आम्ही एकदाचे त्या मुख्य संकुलाकडं निघालो. आता ‘रामलल्ला’चं दर्शन काही मिनिटांतच होणार होतं... ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला तो क्षण असा जवळ येऊन ठेपला होता... १९९२ पासूनच्या सगळ्या घटना डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. त्रेतायुगात १४ वर्षं वनवास सोसाव्या लागलेल्या श्रीरामाला कलियुगात मात्र पाचशे वर्षांचा वनवास सोसावा लागला होता... तो वनवास २२ जानेवारी २०२४ रोजी संपला होता. त्या दिवसापासून इथं येण्याची आस मनात बाळगली होती. त्या स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ येत चालला होता... डोळे रामाच्या त्या बालकरूपाचं दर्शन घ्यायला आतुर झाले होते...
(क्रमश:)
-----






No comments:
Post a Comment