3 May 2013

यक्ष


देव आनंद गेला... असा रविवारी सकाळीच एसेमेस आला आणि पहिला विचार मनात आला, की अरेरे, अकाली गेला... ८८ हे काय वय होतं त्याचं जाण्याचं? देव आनंद किमान पावणेदोनशे वर्षं जगेल, अशी खात्री होती. ८८ हे आपल्यासारख्या सामान्यजनांसाठी वृद्धत्वाचं वय असेल... पण देव आनंद नावाच्या अजब रसायनासाठी नाही. तो वरचा देव या भूलोकीच्या देवाला घडविताना त्यात वृद्धत्व घालायला विसरला असावा. त्यामुळंच देव आनंद लौकिकार्थानं, वयाच्या हिशेबानं वाढला असेल, पण मनानं तो पंचविशीच्या पुढं कधीच गेला नाही. म्हणून तर आत्ता या वर्षी त्याचा 'हम दोनो' पन्नास वर्षांनी रंगीत होऊन झळकला आणि त्याच वेळी 'गँगस्टर' हा त्याचा नवा-कोरा सिनेमाही रिलीज झाला. त्यातही 'हम दोनो'च अधिक चालला हे वेगळं सांगायला नको. देव आनंदसाठी जसं त्याचं वय पंचविशीला फ्रीज झालं होतं, तसं प्रेक्षकांसाठीही तोच 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' म्हणणारा देवच आठवणींत कायमचा फ्रीज झाला होता. स्वतः देवला याची फिकीर नव्हती. 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' हेच त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची किती पराकोटीची पॅशन असावी, याचं देव हे जितंजागतं उदाहरण होतं. देव सिनेमासाठी होता आणि सिनेमा देवसाठी... दोघांनीही परस्परांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. त्यामुळंच त्याच्या नव्या सिनेमांच्या पोस्टरवर नातीपेक्षा लहान वयाच्या नायिकांना कवेत घेऊन उभा राहिलेला देव कधीही खटकला नाही.
देव आनंद ही काय चीज होती? एव्हरग्रीन, चॉकलेट हिरो, बॉलिवूडचा ग्रेगरी पेक (खरं तर ग्रेगरीला हॉलिवूडचा देव आनंद का म्हणू नये?), समस्त महिलांच्या हृदयाची धडकन अशा विविध नामाभिधानांनी ओळखलं जाणारं हे प्रकरण नक्की काय होतं? पन्नासच्या दशकानं हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या तीन महानायकांपैकी देव एक होता. राज कपूर आणि दिलीपकुमार हे बाकीचे दोघं. पुण्यात प्रभात स्टुडिओत उमेदवारी करणारा आणि 'लकी' चाय-बनमस्का खायला येणारा, केसांचा कोंबडा असलेला देव आनंद नावाचा हा देखणा युवक पुढं समस्त चित्रसृष्टीवर साठ वर्षांहून अधिक काळ राज्य करतो याचं रहस्य काय? एक तर देव आनंदचं पडद्यावरचं व्यक्तिमत्त्व सदाबहार, प्रसन्न असायचं. त्याचा अभिनय अगदी महान दर्जाचा होता, असं नाही, पण स्वतःला छान प्रेझेंट करायला त्याला जमायचं. शिवाय तो देखणा होताच. साठच्या दशकात त्यानं केलेल्या सिनेमांमुळं रोमँटिक हिरो हे बिरुद त्याला आपोआपच येऊन चिकटलं. त्याचं ते हातवारे करीत गाणी म्हणणं, त्याचा तो केसांचा कोंबडा, मिश्कीलपणे नायिकेच्या मागे गोंडा घोळणं या सगळ्यांतून देवचा नायक साकारायचा. जेव्हा सिनेमा हे एकमेव मनोरंजनाचं साधन होतं, त्या काळात भारतातल्या तमाम महिलांच्या हृदयस्थानी हे महाशय का विराजमान झाले असतील, याचा सहजच तर्क बांधता येतो. देव आनंदनं प्रेक्षकांना रोमँटिकपणा म्हणजे काय, हे शिकवलं... व्यवस्थित टापटीप राहणं, उत्कृष्ट फर्डं इंग्रजी बोलणं आणि सुंदर स्त्रीवर मनसोक्त प्रेम करणं या गोष्टी (तत्कालीन) भारतीय तरुणाई कुणाकडून शिकली असेल, तर फक्त 'देवसाब'कडून...
... कारण देव आनंद नट असला, तरी शिकलेला होता. इंग्रजी साहित्याचा पदवीधर होता. त्याला गीत-संगीताची उत्तम समज होती. त्याचे भाऊ चेतन आनंद आणि विजय आनंदही तसेच बुद्धिमान होते. पन्नास-साठच्या दशकातल्या, स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या पायावर धडपड करून उभ्या राहणाऱ्या, तरुण रक्तानं सळसळणाऱ्या भारताचं देव आनंद हे प्रतीक होतं. 'गाइड'सारख्या अभिजात साहित्यकृतीवर या बंधूंनी तयार केलेला सिनेमाही याची साक्ष आहे. पडद्यावर अतिविक्षिप्त किंवा वाह्यात प्रकार त्यांनी कधी केले नाहीत. पुढं 'हरे रामा हरे कृष्णा'सारखा सिनेमा दिग्दर्शित केल्यावर देवला आपण मोठे दिग्दर्शक आहोत, याचा 'साक्षात्कार' झाला. त्यानंतर आतापर्यंतचा त्याचा प्रवास केवळ थक्क होऊन पाहत राहण्यासारखा होता. चार-पाच वर्षांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात आला होता, तेव्हा पत्रकार परिषदेत त्याच्या नातवांच्या वयाच्या पत्रकार पोरा-पोरींसमोर त्यानं केलेली तुफान बॅटिंग लक्षात राहिलीय. त्याचे नवे सिनेमे, त्याच्या पत्रकार परिषदा, त्या सिनेमांचं प्रदर्शित होऊन पडणं हे सगळं पब्लिकच्याही अंगवळणी पडलं होतं. दर वेळेला एवढी अफाट एनर्जी कुठून आणतो हा माणूस, असा एकच प्रश्न पडायचा. आताही वाटतंय, की देव आनंदचं शरीर फक्त गेलं... पण यक्ष कधी मरतात का?

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स)
----

4 comments:

  1. यक्ष!
    अत्यंत वेगळ्या तर्हेचं TITLE!
    खूप छान लिहलय!

    ReplyDelete
  2. खरचं देव आनंद हे एकदम अजब रसायन होत ...आजही त्याच्या उमद्या व्यक्तिमत्त्वाचा जबरदस्त पगडा आहे मनावर..लेख मस्तच लिहिलाय ..पुन्हा पुन्हा वाचावा असा ...खूप अभिनंदन

    ReplyDelete