4 May 2013

किचन कॅबिनेट...




लग्न झालेल्या चार पुरुषांची मैत्री असेल, तर त्यांच्या बायका आपोआपच मैत्रिणी होतात. काही पर्यायच नसतो त्यांना! एकदा का आपला नवरा या बाकीच्या तीन-चार जणांचा घट्ट मित्र आहे, हे त्यांना कळलं, की मग त्या परिस्थितीशी जमवून घेतात. नवं लग्न असेल, तर एकमेकांच्या घरी जाणं, एकत्र ट्रिपला जाणं, फिरायला जाणं किंवा अनेक सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करणं हे सुरुवातीला खूप उत्साहात होतं. आमचं कसं छान चाललंय हे दाखवण्याची या काळात सगळ्यांची स्पर्धाच असते. वागण्यात नाही म्हटलं, तरी किंचित औपचारिकता असते. बायकोच्या तर सोडाच, पण नवऱ्याच्या घरच्यांविषयीही या ग्रुपमध्ये फारसं बोललं जात नाही. सगळ्या प्रकाराला नव्या कपड्यांना किंवा नव्या फ्लॅटला असतो, तसा नवेपणाचा खास वास असतो. मित्राच्या बायकांशी आपलंही असं थेट बोलणं नसतं. त्यांच्यातही तो खास वहिनीपणा मुरलेला नसतो. त्यामुळं मित्राच्या घरी गेलं, की त्याच्या बायकोनं केलेल्या पदार्थांची वारेमाप स्तुती करणं, घर कसं मस्त आवरलंय, ड्रेसचा सेन्स किती छान आहे वगैरे बोलणं होतं. आपली बायकोही या नव्या मैत्रिणीला प्रोत्साहन देते. तिला मदत करते. विशेषतः पार्टीनंतर चहा किंवा सरबत आणणं असल्या कामात हमखास आपली बायको तिच्या किचनमध्ये शिरून तिला मदत करते. आपण इकडं नेहमीप्रमाणं बेसावध असतो. मित्राबरोबर (नेहमीप्रमाणे) कुठल्या तरी तिसऱ्याच बाईविषयी रंगून बोलत असतो. अशा वेळी आपल्या सौं.चा मित्राच्या किचनमध्ये झालेला प्रवेश पुढं क्या 'गुल खिलानेवाला है' याविषयी आपण अगदीच अनभिज्ञ असतो. मग कधी तरी आपण मित्राला घरी बोलावतो. अशा वेळी त्याची बायको तिची जत्रेत हरवलेली जुळी बहीण भेटावी, तशा ओढीनं आपल्या बायकोला भेटते. दुसऱ्याच क्षणी आपली सौ. तिला किचनमध्ये घेऊन जाते. आपण पुन्हा मित्राबरोबर तिसऱ्या (नाही, आता चौथ्या) बाईविषयी दिवाणखान्यात बोलत बसतो आणि इथंच घात होतो. या बायकांच्या अशा किचन भेटी वाढत जातात आणि मग त्या दोघींचा/तिघींचा/चौघींचा/पाच जणींचाच स्वतंत्र ग्रुप जमतो. हे 'किचन कॅबिनेट' नंतर आपल्यासकट आपल्या जीवाभावाच्या मित्रांवर राज्य करायला लागतं. नंतर नंतर तर त्यांच्याच पार्ट्या ठरायला लागतात. त्या परस्पर मोबाईलवर एकमेकींशी बोलायला लागतात. त्यांच्या चर्चेचा विषय काय असतो, हे सांगायला ज्योतिषांची मुळीच गरज नसते. आपले नवरे आणि एकूणच त्यांचं घराणं हाच तो विषय. सुरुवातीचा औपचारिकपणा किंवा खोटं खोटं वागणं सगळं आता गळून पडलेलं असतं. एकदा किचनमध्ये शिरल्यावर खोटं वागताच येत नाही म्हणा. त्यामुळं घरोघरी मातीच्याच चुली असतात, याची खात्री या किचन कॅबिनेटला पटलेली असते. एकूणच आपल्या मित्रांविषयी आपल्याला जे जे काही माहिती असतं, त्यापेक्षा बरीच जास्त माहिती हे कॅबिनेट आपापल्या सख्यांना देत राहतं. आणि त्यांचा निष्कर्ष ठरलेला असतो - यांच्याकडून काही होणार नाही. आपल्यालाच सगळं पाहावं लागणार आहे पुढं! यात स्वतःच्या करिअरपासून ते पोरांच्या करिअरपर्यंतचा प्रवास गृहीत धरलेला असतो. नवऱ्यात आता काही सुधारणा होणे नाही, ही केस हातातून गेलेलीच आहे... केवळ मी आहे म्हणून चाललंय अशा आशयाच्या चर्चांची देवाण-घेवाण रंगते. त्यातही सासर आणि सासूबाई हा विषय आला तर काय विचारता... गॉसिपची नुसती गंगा वाहते. आणखी बऱ्याच नाजूक गोष्टींवरही कानगोष्टी होतात आणि नंतर त्या चुकून आपल्या कानावर आल्या, तर आपणच कानकोंडले होतो. तर ते असो.
पण मुळात आम्हा मित्रांचे धागे मस्त जुळलेले असतात आणि अशा निखळ मैत्रीत काहीच लपवून ठेवायचं नसतं. त्यामुळंच खऱ्याखुऱ्या वहिनीपेक्षा ही अशी मानलेली वहिनी म्हणा किंवा बहीण म्हणा किंवा मैत्रीण म्हणा, अधिक खरी वाटते, जिव्हाळ्याची वाटते. नवऱ्याच्या मित्रांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवून त्यांना सर्व्ह करणारी, त्यांचे लाड करणारी, स्वतःच्या नवऱ्यासोबत नंतर आपल्यालाही थेट टोमणे मारणारी, तर कधी कौतुक करणारी ही मित्राची बायको खरोखर आपली मैत्री जगवते, टिकवते. या निखळ नात्यात कधी खळ न पडो, एवढंच रामरायाकडं मागणं...

- मिस्टरांचे जी. डी. 

(पूर्वप्रसिद्धी - पुणे टाइम्स)

3 comments: