28 Jul 2015

मसान रिव्ह्यू




चुकवू नये असा संगम
--------------------------- 


मसान हा चित्रपट पाहिल्यावर माझ्या मनात पहिली प्रतिक्रिया अशी आली, की या सिनेमाचं शीर्षक मसान (स्मशान) याऐवजी संगम असं हवं होतं. अर्थात संगम नावाचा यापूर्वीचा राज कपूरचा गाजलेला सिनेमा आणि या सिनेमाचा आशय यांचा अजिबातच संबंध नाही आणि केवळ तशी अनाठायी तुलना होऊ नये म्हणूनच निर्मात्यांनी हे शीर्षक टाळलं असावं. अन्यथा संगम हेच अत्यंत उचित असं शीर्षक आहे या कलाकृतीला....!
चित्रपटाच्या सुरुवातीला ब्रिजनारायण चकबस्त यांच्या ओळी येतात -
ज़िंदगी क्या है अनासिर में जहुर-ए-तरतीब
मौत क्या है इन्ही अज़ा का परेशान होना
(जगणं म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टी सुरळीत असणं आणि मृत्यू म्हणजे काय, तर त्या केवळ विखुरणं...) मरणाला अजिबात न घाबरणाऱ्या, किंबहुना गंगेच्या कुशीत मरण म्हणजे मोक्ष असं मानणाऱ्या काशीत हे कथानक घडतं. स्मशानाचा संदर्भ येतो तो इथं! गंगा म्हणजे भारताची आदिम काळापासून चालत असलेली संस्कृतीच. या गंगेच्या काठी काशीच्या घाटांवर मसानची गोष्ट घडते. किंबहुना दोन व्यक्तींच्या दोन समांतर चालणाऱ्या गोष्टी घडतात आणि शेवटी त्यांचा संगम होतो. माणसाचं जगणं असतं अगदीच क्षणभंगुर... पण या साध्या जगण्यातही त्याला किती ताणतणावांना सामोरं जावं लागतं. आपणच हे जगणं अनेकदा गुंतागुंतीचं करतो. कधी आपल्याला नशिबात अचानक काही तरी घडतं आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. प्रेमाची गोष्ट असो की प्रेमभंगाची, काही तरी मिळतं आणि काही तरी निसटून जातं... अर्थात माणूस गेला तरी त्याचा आत्मा अमर असतो, या आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणेच गंगेच्या किनारीही तुम्ही काही तरी गमावता त्याच वेळी काही तरी तुम्हाला गवसलेलं असतं...
अनुराग कश्यपला गँग्ज ऑफ वसेपूरसाठी साह्य करणाऱ्या नीरज घायवाननं मसान दिग्दर्शित केला आहे. त्याचं सांगणं अगदी स्पष्ट आहे. अविनाश अरुणनं अप्रतिम टिपलेल्या वाराणसीच्या माध्यमातून तो हे त्याचं सांगणं ठामपणे सांगत राहतो. वरुण ग्रोव्हरनं लिहिलेली पटकथा मुळात भक्कम आहे. त्यामुळं नव्या-जुन्या पिढ्यांचा संघर्ष, काशीसारख्या सनातन शहरात राहणाऱ्या आजच्या काळातल्या तरुण पिढीची भावनिक आंदोलनं, जातीपातींचा प्रभाव, पोलिस यंत्रणेचा भ्रष्टाचार आणि सेक्ससारख्या माणसाच्या मूलभूत प्रेरणांबाबत होत असलेली त्यांची कुचंबणा म्हणा किंवा त्यात वाहवत जाणं म्हणा... हे सगळं या गोष्टींतून दिग्दर्शक मांडत राहतो. पुन्हा या सगळ्या प्रवासाला गंगेच्या अथांग आणि अथकपणे सुरू असलेल्या संथ प्रवाहाचा एक अनाहत नाद पार्श्वभूमीसारखा सतत ऐकू येतो आहे. ते घाट, तिथं सतत सुरू असलेले अंत्यसंस्कार किंवा दशक्रियांसारखे विधी, गंगेच्या पाण्यातून पैसे काढणाऱ्या छोट्या पोरांच्या जीवावर सुरू असलेला जुगार... हे सगळं आपल्याला सतत काही ना काही सांगत राहतात. आपल्या मृत्यूनंतरही आपलं जगणं संपत नाही, तर अन्य कुणाच्या मृत्यूमुळं ते संपण्याचं कारणच काय, असं सांगत राहतो...
देवी पाठक (रिचा चढ्ढा) आणि दीपक चौधरी (विकी कौशल) यांच्या आयुष्यात घडणाऱ्या दोन गोष्टी समांतरपणे आपल्याला दिसत राहतात. देवीनं मोहाच्या एका क्षणी केलेली चूक तिला आणि तिच्या विद्वान पित्याला पोलिसांकडून ब्लॅकमेल केलं जाण्यापर्यंत गेली आहे, तर दुसरीकडं डोम जातीचा दीपक गंगेच्या घाटावर मृतदेहांना अग्नी देण्याच्या कामापासून सुटका करून घेण्यासाठी जिद्दीनं शिक्षण घेतोय. देवीच्या आयुष्यातलं एकमेव प्रेम अचानक नष्ट झालंय, तर दीपकच्या वैराण आयुष्यात शालूच्या (श्वेता त्रिपाठी) रूपानं नुकतंच एक प्रेम उमलू लागलंय. देवी सगळं विसरून आयुष्यात पुढं जाऊ पाहते, तर दीपकच्या आयुष्यात अचानक एक वज्राघात होतो. सगळं काही उलटपालट होतं. हे दोन्ही प्रवाह आपापलं प्राक्तन घेऊन पुढं वाहत राहतात. सिनेमाच्या शेवटी त्यांचा संगम होणं अटळ असतं.
इंडो-फ्रेंच संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मूल्यं उच्च आहेत. दिग्दर्शकाची विषयावरची पकड जाणवतेच. अगदी साध्या साध्या प्रसंगांतून त्यानं यातलं नाट्य अधोरेखित केलं आहे. या दिग्दर्शकाला चित्रभाषा अवगत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी शांतताच बोलते. देवी त्या प्रसंगानंतर घरी आल्यानंतर तिचे वडील ज्या पद्धतीनं व्यक्त होतात, तो प्रसंग किंवा देवी नंतर अलाहाबादमध्ये तिच्या दिवंगत मित्राच्या घरी जाते, तेव्हा फक्त दाराचं फाटक दाखवून आत काय घडलं असेल हे सूचित करणारा प्रसंग... किंवा दीपकचं त्या घाटावरचं उन्मळून पडणं असेल किंवा त्या छोट्या मुलाला अंगठी सापडण्याचा प्रसंग असेल... या सर्व जागा दिग्दर्शकानं सुरेख भरल्या आहेत.

अभिनयात सर्वांनीच उजवी कामगिरी केली आहे. रिचा चढ्ढाला तिच्या करियरमधला हा एक महत्त्वाचा रोल मिळाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तिनं देवी मनापासून उभी केली आहे. संजय मिश्रांचा विद्याधर पाठक जबरदस्त. हा माणूस भूमिकेत कायाप्रवेश करून शिरतो आणि त्या पात्राचे अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म रंग दाखवतो. नवोदित कलाकार विकी कौशलनं दीपकच्या भूमिकेत कमाल केली आहे. श्वेता त्रिपाठीही गोड.
थोडक्यात, चुकवू नये असाच हा चित्रपट आहे.
---
निर्मिती :  दृश्यम फिल्म्स, फँटम फिल्म्स, मॅकॅस्सर प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेन्मेंट
दिग्दर्शक : नीरज घायवान
पटकथा : वरुण ग्रोव्हर
संगीत : इंडियन ओशन
प्रमुख भूमिका : रिचा चढ्ढा, संजय मिश्रा, विकी कौशल, श्वेता त्रिपाठी, पंकज त्रिपाठी
दर्जा : चार स्टार
---

No comments:

Post a Comment