2 Jan 2016

नटसम्राट - रिव्ह्यू

नटसम्राट? ना... ना...!!
----------------------------


फर्स्ट थिंग फर्स्ट! महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि नाना पाटेकर अभिनित नटसम्राट हा नवा मराठी चित्रपट आपल्यावर प्रथमदर्शनी चांगलाच प्रभाव टाकतो. वि. वा. शिरवाडकरांच्या 'नटसम्राट'चं हे माध्यमांतर मांजरेकरांनी त्यांच्या पद्धतीनं व्यवस्थित पेललं आहे, हे नक्की. नानाही निराश करत नाही. तो मोठा अभिनेता आहेच. त्यामुळं त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा तो अर्थातच पूर्ण करतो. त्यामुळं सिनेमा संपताना प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करून नानाला दाद देतात.
सिनेमाचा हा भारावून टाकणारा अनुभव आणि त्याचा भर ओसरल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात आणि या सिनेमाचं कौतुक करताना त्याही सांगितल्याच पाहिजेत.
शेक्सपीअरची 'किंग लिअर' ही मूळ शोकान्तिका. त्या कथानकाला अस्सल मराठी मातीचा बाज देऊन तात्यासाहेबांनी नटसम्राटची बुलंद इमारत बांधली. पल्लेदार वाक्यरचना, चमकदार संवाद, उत्कंठापूर्ण नाट्यमयता आणि या सर्वांच्या मुळाशी एखाद्या ठसठसणाऱ्या जखमेसारखी सदैव साथ करणारी कलावंताची करुण, शोकात्म तडफड यामुळं नटसम्राट नाटकानं मोठी उंची गाठली. या कलाकृतीचं सिनेमात माध्यमांतर करण्याचा प्रयत्न हाच मुळात धाडसी म्हटला पाहिजे.  नाटकाचं वेड अंगात भिनलेल्या कलावंताची वास्तव जगण्यात होणारी फरफट एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. शेक्सपीअर काय किंवा शिरवाडकर काय, यांनी एका व्यक्तीच्या जगण्यातल्या या भावनांना वैश्विक परिमाण दिलं. मग यातलं दुःख किंवा वेदना फक्त त्या गणपतराव बेलवलकरांची राहत नाही, तर ती संपूर्ण कलावंत जमातीची किंवा त्याही पुढं जाऊन सर्व मानवजातीची वेदना बनून समोर येते. बेलवलकरांचं नट म्हणून उभं राहणं आणि मग एक माणूस म्हणून कोसळणं आपल्याही सबकॉन्शस लेव्हलवर आदळत राहतं. आपल्याही जगण्यावर घाव घालतं. आपल्यालाही अंतर्बाह्य हादरवून टाकतं.
भावनांचं हे किती वहन प्रभावीपणे होतं, यावर त्या कलाकृतीचं यशापयश मोजायचं तर नटसम्राट नक्कीच यात यशस्वी झालाय असं म्हणता येईल. याचं कारण बेलवलकरांच्या भूमिकेतील नानाला ते कळलं आहे. रंगभूमीवर एके काळी अफाट यश मिळवून नटसम्राट झालेला मोठा कलावंत साध्या जगण्यात, कौटुंबिक पातळीवर मात्र अपयशी ठरतो. त्याचे आडाखे चुकत जातात, हिशेब बिनसतात आणि होत्याचं नव्हतं होतं. इथं नानानं हा आलेख अगदी सूक्ष्म पातळीवरही योग्य जोखला आहे. या भूमिकेत नानामधला नट त्या पात्रावर स्वार होतो की काय, अशी भीती अनेकांना आधीपासून वाटत आलेली आहे. मात्र, प्रत्यक्ष सिनेमा पाहताना असं काही झाल्याचं फार जाणवलं नाही. याचं प्रमुख श्रेय अर्थातच दिग्दर्शकाला.
सिनेमाची एक लय असते. उत्सुकता वाढविणारा आरंभ, ती विकसित करणारा मध्य आणि त्या उत्सुकतेचं उत्कंठेत रूपांतर करून योग्य ते समाधान करणारा शेवट म्हणजेच कळसाध्याय अशीच कुठल्याही यशस्वी कलाकृतीची मांडणी असते, असं ढोबळमानाने म्हणता येईल. नटसम्राटमध्ये सुरुवातीला जरा गोंधळ वाटला, तरी तो लगेचच सावरतो आणि पुढं शेवटपर्यंत ही लय सोडत नाही, हे त्याचं यश म्हणता येईल. मूळ कलाकृतीची आणि या सिनेमाची अनेकदा तुलना होणार. पण ती करू नये. कारण मुळात ही एक स्वतंत्र कलाकृती म्हणूनच पाहिली पाहिजे. यात दिग्दर्शकानं अनेक बदल केले आहेत, दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य घेतलं आहे, हे मान्य केलं पाहिजे. याचं कारण मूळ कलाकृतीचं जे सांगणं आहे, त्याला त्यानं यात कुठंही धक्का लावलेला नाही. परिणामांची तीव्रता कदाचित कमी-जास्त होऊ शकेल, मात्र मनाला भिडणारा परिणामच हा सिनेमा देत नाही, असं मात्र कुणी म्हणू शकणार नाही.
या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यातले संवाद. यात अनेक पात्रांच्या आणि विशेषतः नानाच्या तोंडी अनेक चमकदार वनलायनर वाक्यं आहेत आणि ती हशा पिकवतात. (किरण यज्ञोपवीतचे संवाद आहेत.)
नटसम्राटचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे त्यातली स्वगतं. ही स्वगतं दिग्दर्शकानं या सिनेमात शेवटाकडं जास्त वापरली आहेत आणि ती पुरेसा परिणाम साधून जातात.
काही गोष्टी नव्या आहेत. त्या म्हणजे विक्रम गोखलेचं राम अभ्यंकर हे मित्राचं पात्र आणि सुरुवातीला येणारं सिद्धार्थ हे नाटकाचं वेड असलेल्या तरुणाचं पात्र या गोष्टींची योजना. नाना आणि विक्रम गोखले हे स्वतंत्रपणे दोघंही मोठे नट आहेत. त्यांना एकत्र आणून काही तरी जबरदस्त धमाल उडवून देऊ, अशी काहीशी दिग्दर्शकानं अपेक्षा ठेवलेली दिसते. सुरुवातीला या दोघांचे एकत्र सीन तसे जमलेही आहेत. विशेषतः राम अभ्यंकर आजारी असताना दोघेही नाटकातील स्वगतं म्हणतात, तो प्रसंग जमला आहे. पण नंतर या पात्राची उपस्थिती अकारण लांबली आहे, असंच वाटतं. तीच गोष्ट सिद्धार्थची. हे पात्र गोष्ट पुढं न्यायला सूत्रधार म्हणून मदत करील, अशी काही तरी दिग्दर्शकाची भावना दिसते. मात्र, तेही काही नीट झालेलं दिसत नाही.
कावेरीच्या भूमिकेत मेधा मांजरेकरनं नक्कीच छाप पाडली आहे. कावेरीच्या भूमिकेची समज आणि अनेकदा डोळ्यांतून कित्येक गोष्टी बोलणं यामुळं मेधा मांजरेकरांनी कावेरीला न्याय दिला आहे, हे नक्की म्हणता येईल.
नानाविषयी काय बोलावं! आधी म्हटल्याप्रमाणं तो उत्तम नट आहेच. त्यानं बेलवलकरांमधल्या कलावंताची वेदना ज्या तडफेनं दाखविली आहे, ती नक्कीच दाद देण्याजोगी! अप्पा आणि कावेरी मुलीचं घर सोडून निघतात, त्या वेळी विभावरी आपटेचं एक गाणं आहे. हा प्रसंगच एकूण जमून आला आहे.
सिनेमातल्या त्रुटींकडही लक्ष वेधलं पाहिजे. एक म्हणजे हा इतर अनेक मराठी सिनेमांप्रमाणे बोलपटच झाला आहे. शब्दबंबाळ झाला आहे. शब्दबंबाळ बोलपटच काढायचा, तर मग मूळ नाटकच पाहिलेलं काय वाईट? सिनेमाची म्हणून एक भाषा असते. कॅमेऱ्यालाही कधी तरी बोलू द्या. पण आपले दिग्दर्शक हे केव्हा शिकणार, कुणास ठाऊक. अप्पा आणि कावेरी घराबाहेर पडतात, त्या एकाच दृश्यात कॅमेराची कमाल आणि एकूणच या माध्यमाची ताकद दिसते. पण मग संपूर्ण सिनेमात असं घडत नाही. तुटक तुटक प्रसंगच हा आनंद देतात. दुसरं म्हणजे हा सिनेमा लांबीलाही खूप मोठा झाला आहे. पावणेतीन तासांचा हा चित्रपट किमान वीस मिनिटांनी सहज कमी करता आला असता. असो.
पण या निमित्तानं मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ कलाकृती रूपेरी पडद्यावर आणून अजरामर केल्याचं श्रेय मांजरेकर आणि सर्व सहकाऱ्यांना निश्चितच द्यायला हवे.

---
दर्जा - साडेतीन स्टार
---

No comments:

Post a Comment