दर वर्षी उन्हाळ्याची सुट्टी पडली, की
माझ्यासारख्या अनेक पालकांना पडणारा एक प्रश्न म्हणजे या सुट्टीचं करायचं
काय? माझ्या लहानपणी, म्हणजे साधारण तीसेक वर्षांपूर्वी हा प्रश्न मला
पडायचं कारण नव्हतं; पण माझ्या आई-वडिलांना किंवा माझ्या पिढीच्या
कुणाच्याच आई-वडिलांनाही हा प्रश्न पडत नसे. तेव्हा सुट्टीचे फंडे अगदी
क्लिअर असायचे. एक तर गावात मित्रांबरोबर हुंदडायचं. सकाळ उजाडल्याबरोबर जे
घराबाहेर पडायचं ते मधल्या वेळेत जेवायला म्हणून घरी टेकल्यासारखं करायचं
की थेट अंधार पडल्यावरच घरी यायचं. किंवा मग नातेवाइकांकडं जायचं. आत्याकडं
किंवा मामाकडं हक्कानं पंधरा दिवस राहायला जायचं, हे अगदी गृहीतच धरलं
जायचं. आपल्याही घरी या नातेवाइकांनी येणं तेवढंच स्वाभाविक मानलं जायचं.
मग सगळ्या बहीण-भावांची किमान दोन ते तीन मुलं धरली, तरी किमान दहा ते
पंधरा जणांची वानरसेना तयार व्हायची. मग बाकी कुणाची गरजच नसायची. मग आंबे
खाण्यापासून ते डबडा ऐसपैस खेळण्यापर्यंत आणि चांदण्या रात्री अंगतपंगत
करण्यापासून ते पॉटमध्ये आइस्क्रीम करण्यापर्यंत सगळे कार्यक्रम सर्वांच्या
बरोबरच व्हायचे. याशिवाय एखादा सिनेमा, एखादी सर्कस किंवा बागेत जाऊन भेळ
इ. कार्यक्रम व्हायचेच. सुट्टीत हमखास दोन-तीन लग्नकार्यं निघायची. मग त्या
कार्यस्थळी गर्दीनं गच्च भरलेल्या एसटीनं लटकत-लोंबकळत जायचं. प्रचंड
उन्हाच्या वातावरणात दोन सुखी जीवांना समारंभपूर्वक दुःखात ढकलायचं,
गरमागरम जिलेब्या खाऊन आणखीनच घामाघूम व्हायचं... बँडवर नाचून वगैरे
त्यांना वाटे लावायचं, नवरी गेली की रडायचं... अशीच सुट्टी जायची. फार
साधे-सरळ असे ते दिवस असत. हे दिवस खूप पूर्वीचे नव्हेत. अगदी अलीकडे
अलीकडेपर्यंतचे... चांगलेच लक्षात असलेले असे!
मग काळ फारच बदलला. जागतिकीकरणाची लाट आली. देश
बदलला. माणसं बदलली. पंधरा-वीस वर्षांत आम्ही जणू चंद्रावर पोचलो. शहरं
वाढली. आमची पिढी पुण्या-मुंबईसारख्या शहरांत येऊन वसली. झटत-लढत तगून
राहिली. आमच्या जगण्याच्या संघर्षात या सुट्टीकडं बघायला आम्हाला फुरसतच
नव्हती. आम्हाला लग्नं करायची होती, घरं घ्यायची होती... चारचाकी गाड्या
घ्यायच्या होत्या... हळूहळू हे सगळं झालं... दोघांच्या आयुष्यात तिसरा जीव
आला आणि आयुष्य अगदी धन्य वगैरे झालं! आमची पिढी तोपर्यंत बेसावध होती. मग
मुलं जसजशी मोठी होऊ लागली, तसतशी ही एप्रिल-मेची सुट्टी पुन्हा आमच्या
आयुष्यात आली. तोपर्यंत आम्ही तिला हसत हसत कोलून टाकलं होतं. तिला फार
महत्त्वच दिलं नव्हतं. आमच्या नोकरी-धंद्याच्या गणितात तिला कुठंच स्थान
नव्हतं.
पण आमचं लाडकं मूल मोठं होऊ लागलं, तसं आमच्या
एकेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. असं लक्षात आलं, की आपलं मूल एकटंच आहे:
त्याला भावंड नाही. आणि ही केवळ आपली स्थिती आहे असं नाही तर बहुतांश
आमच्या पिढीची हीच स्थिती आहे. बहुतेकांना एकच मूल... जास्तीत जास्त दोन;
पण संख्या कमीच. मग असं लक्षात आलं, की आमचं हे एकुलतं एक मूल भलतंच
लाडावलेलं आहे. ते एकटं आहे म्हणून; त्याला आम्हाला वेळ देता येत नाही,
म्हणून आमच्या मनात एक जो नकळत अपराधभाव तयार झालेला आहे, तो या लाडाला
जास्तच खतपाणी घालतोय. मग असं लक्षात आलं, की आपल्या मुलाचं आता एकट्यानं
खेळण्याचं वय झालंय. पण त्याला सखी-सोबती कुणीच नाहीत. जे आहेत ते अगदीच
औपचारिक. म्हणजे बिल्डिंगमधला मुलगा किंवा एखादा मावस वा चुलतभाऊ. पण हे
म्हणजे उभयपक्षी सोयिस्कररीत्या एकत्र आलेले दोन देश नाइलाजानं कसा एखादा
करार करतात, तसं असतं. म्हणजे दोघांनाही आपापल्या टर्मवर खेळायचं असतं. हा
याच्या घरी राजा असतो, तर तो त्याच्या! मग भांडणं होतात. इवले इवले इगो
लगेच आभाळाला जाऊन पोचतात. पोरांची भांडणं मिटतात लगेच; पण पालक एकमेकांवर
फुरंगटून बसतात. गॉसिपिंग सुरू करतात...
मग आमच्या असं लक्षात येतं, की आपल्या मुलाला
किंवा मुलीला अनेक क्षेत्रांत गती असायला पाहिजे. तो एकाच वेळी डॉक्टर,
इंजिनीअर, सीए, वकील, आर्किटेक्ट, जमल्यास क्रिकेटपटू किंवा बिझनेसमन तर
झालाच पाहिजे. पण तो अष्टपैलूही असला पाहिजे. त्याला वाद्य वाजवता आलं
पाहिजे. तिला कथक आलं पाहिजे. त्याला फाड फाड फ्रेंच आलं पाहिजे, तिला
साल्सा आलं पाहिजे. दोघांनाही पोहता तर आलंच पाहिजे; पण बॅडमिंटनमध्येही
त्यांनी किमान नॅशनलला खेळलं पाहिजे. मग आमच्या लक्षात येतं, की आपल्याला
स्वतःला यातलं काहीच येत नाहीय; पण हरकत नाही. आम्ही खेड्यात वाढलो. मुलं
तर शहरांत आहेत ना... त्यांना त्यांच्या नशिबानं सगळं मिळालंय. आम्हाला
कुठं काय मिळालं होतं? मग आम्ही गावाकडं दगडानं कशा कैऱ्या पाडायचो याच्या
रसभरित कहाण्या (गावातलं सगळं विकून इथं गावाबाहेर घेतलेल्या वन बीएच के
फ्लॅटमध्ये) आमच्या बाळराजांना सांगत बसतो. बाळराजांनी शेत कधी पाहिलेलंच
नसतं. मग आम्ही कृषी पर्यटन केंद्रात त्याला घेऊन जातो आणि ज्वारीची भाकरी
अन् पिठलं कसं भारी लागतं हे तिथल्या दोनशे रुपयांच्या थाळीला (मनातल्या
मनात शिव्या देत) सांगू लागतो.
मग आमच्या लक्षात येतं, की आता आपण शहरात आलो
आहोत आणि शहरी माणसांसारखं वागलं पाहिजे. मग आम्ही व्यक्तिमत्त्व विकास
शिबिरात आमच्या बाळराजांना किंवा बेबीराणीला एकदाचे ढकलून घरी येतो. पंधरा
दिवसांच्या क्रॅशकोर्सनंतर बाळाला काही मिळो न मिळो, आम्हाला त्याची
सर्वांगीण प्रगती साधल्याचं एक सर्टिफिकेट चार-पाच हजार रुपये खर्चून
नक्कीच मिळणार असतं. शहरी पालक असल्याचे सर्व निकष पूर्ण केल्यानंतर
आम्हाला जो आनंद मिळतो, त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही.
मग आमच्या लक्षात येतं, की सुट्टीचा काळ फारच
मोठा असतो. या काळात ऑफिसात दीर्घ रजा घेऊन, बायको-मुलांना घेऊन कुठं तरी
टूरवर जायची पद्धत शहरांत असते. आपणही शहरीच असल्यानं रीतसर रजा टाकतो.
सर्व पर्याय तपासल्यानंतर लक्षात येतं, की या काळात विमानाचं भाडं आपल्याला
परवडत नाही. ट्रेनचं बुकिंग दोन महिन्यांपूर्वी करण्याइतपत नियोजन आपल्या
अंगी कधीच नसतं. मग आपण आपल्या जवळच्याच, नेहमीच्या लोकप्रिय पर्यटनस्थळी
दौरा काढतो. बायकोला एकदाचं फिरवून आणलं, यापलीकडं त्या दौऱ्यानंतर कुठलंही
दुसरं समाधान पदरी पडत नाही. एकूण काय, तर सुट्टी अशी आम्हाला खायला उठते.
मग आमच्या लक्षात येतं, की आपण बरंच काही मिस
करत आहोत खरं; पण आपले ते पूर्वीचे दिवस तर आता परत येणं शक्य नाही. मग
आपल्या मुलांना त्यांच्या पद्धतीप्रमाणं सुट्टी एंजॉय करू दिली पाहिजे. आता
आमची मुलं गॅजेटसॅव्ही आहेत. त्यामुळं आम्ही त्यांना सर्व प्रकारचे
कम्प्युटर गेम्स उपलब्ध करून देतो. मुलं कटकट न करता शांतपणे खेळत बसतात.
शेजारच्या राष्ट्रानंही कंटाळून तह केलेला असतो. दोन्ही पालक सुखानं
आपापल्या घरी घोरू लागतात आणि मुलं टॅबची बॅटरी संपवू लागतात...
या सुट्टीचं करायचं तरी काय, असले प्रश्न पडत नाहीत अशा वेळी मग...
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - १७ एप्रिल २०१६)---
श्रीपादजी, या आपल्या लेखाने मन विचारमग्न झाले....नेहमीच्या हसण्यापेक्षाही अधिक अर्थपूर्ण असे जाणव्ले... आत कुठेतरी खोलवर ढवळले गेले.......
ReplyDeleteधन्यवाद महेश... आणि हे 'जी'चे शेपूट नको लावूस मला... माणूसच राहू दे...
Deleteसुट्टीवरचा लेख थेट अाजोळी घेऊन गेला."बिच्चारी अाजची मुलं "हे वाक्य मनात उमटलं. विद्या साताळकर.
Deleteखरंच आहे. तुम्हाला शाळेच्या अनुभवावरून अधिक जाणवत असेल...
ReplyDeleteसुरेख आणि बोलका लेख लिहीला आहेस.
ReplyDeleteधन्यवाद 'मी मनमुक्ता'....
Deleteश्रीपादजी, तुम्ही खरेच मला पुन्हा गावाकडे घेऊन गेलात, आणि परत शहरात आणून सोडलेत..... पण माझे नशीब चांगले असेल कदाचित किंवा माझ्या आई बाबांच्या आशीर्वादाने गावाकडचे घर आजून असल्याने माझी दोन्ही मुले (मोठा मुलगा १२ वर्षाचा आणि मुलगी ४ वर्षाची) आजी आजोबांबरोबर गावाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत राहायला जातात. गावाकडे शेती स्वतःची नसली तरी कुणाच्या तरी शेतात जाऊन येतात तसेच सज्जनगडावर मुक्काम करणे रोज शाहूपुरीचा डोंगर चढणे किंवा जरंडेश्वर ला जाऊन येणे असे अनेक ठिकाणी राहून सुट्टी त्यांच्या मन प्रमाणे सध्या तरी एन्जॉय करताहेत.... पण तरीही जुने दिवस ते जुने दिवस.
ReplyDeleteआपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
Deleteमस्तच लिहिलं आहे.अनिल कपूरला राजगुरू परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
ReplyDelete