हिंदी चित्रपटसृष्टीत दर शुक्रवारी नवी स्वप्नं प्रदर्शित होतात आणि त्यासोबत कदाचित कुठल्या तरी अभिनेता किंवा अभिनेत्रीचं नशीबही. या तारांगणात अनेक तारे लुकलुकत असतात. त्यातले अनेक कधी येतात आणि कधी विझतात तेही कळत नाही. सूर्यासारखं नशीब घेऊन आलेले फार थोडे. अनिल कपूर हे त्यातलं एक लखलखीत नाव. मी अनिल कपूरला बॉलिवूडचा ‘लखन’ म्हणतो. अमिताभ बच्चन हा बॉलिवूडचा ‘राम’ असेल, तर अनिल निखालसपणे ‘लखन’ आहे. जसं लक्ष्मणाशिवाय रामायण अपूर्ण तसंच बॉलिवूडचा इतिहास अनिल कपूरच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच. एकाच वेळी अत्यंत हँडसम, देखणा, स्वर्गलोकीचा राजकुमार वाटावा आणि त्याच वेळी अत्यंत साधा, गरीब, ‘बॉय नेक्स्ट डोअर’ असाही वाटावा असं काहीसं अजब कॉम्बिनेशन अनिल कपूरच्या व्यक्तिमत्त्वात आहे. अभिनयाच्या सर्व पैलूंमध्ये वाकबगार, कामामध्ये अत्यंत व्यावसायिक आणि महत्त्वाचं म्हणजे चारित्र्यसंपन्न अशा गुणांनी अनिल कपूर समृद्ध आहे. त्यामुळंच तो दीर्घकाळ या मायानगरीत टिकू शकला आणि यश मिळवू शकला.
अनिल
कपूरचा थिएटरला मी पाहिलेला पहिला सिनेमा म्हणजे बहुतेक ‘साहेब’. मला नक्की आठवत
नाही. पण ‘साहेब’च
असावा. आमच्या जामखेडच्या टूरिंग टॉकीजमध्ये मी तो पाहिला.
अलीकडं बालक-पालक सिनेमात ‘साहेब’चा रेफरन्स आहे. रवी जाधवच्याही लहानपणच्या काही गोड
आठवणी ‘साहेब’सोबत जोडल्या असाव्यात, असं
मला ते पाहून वाटलं. विशेषतः अनिल कपूर आणि अमृतासिंहच्या
जागी ती दोन मुलं स्वतः नाचत आहेत, असं जे दृश्य त्यानं
टाकलंय, त्यावरून. असो. हे विषयांतर झालं. मूळ मुद्दा अनिल कपूर हे नाव
माझ्या आयुष्यात पहिल्यांदा केव्हा आलं हा... अनिल कपूरचा
भोळाभाबडा ‘साहेब’ खूप भावला. अनिलनं १९८० ते १९८४ च्या दरम्यान काही सिनेमे केले. पण त्यातला ‘मशाल’ हा सर्वांत
लक्षात राहिलेला. यात तो अभिनयसम्राट दिलीपकुमारसमोर
तेवढ्याच ताकदीनं उभा राहिला. ‘जिंदगी आ रहा हूँ मैं...’
या किशोरकुमारच्या गाण्यानं (आणि
हृदयनाथांच्या संगीतानं) अनिल कपूरच्या बॉलिवूडमधील येण्याची
वर्दी सर्वांना मिळाली. पण ‘साहेब’मुळं अनिल कपूर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य रसिकांच्या हृदयात जाऊन पोचला,
असं म्हणावं लागेल.
तो
काळ बॉलिवूडसाठी एकूण फारच विचित्र होता. देशातलं वातावरणही फार अस्थिर होतं.
अमिताभ काहीसा उतरणीला लागला होता. राजेश
खन्ना तर केव्हाच गायब झाला होता. व्हिडिओ पार्लरनी गावोगावी
धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती आणि सिनेमाचा धंदा बसवला होता. बॉलिवूड संभ्रमावस्थेत होतं. दाऊद आदी मंडळींचा त्या
वेळी बॉलिवूडवर वरचष्मा होता. काळ्या पैशांची चलती होती.
राज कपूरनं अभिनय केव्हाच सोडून दिला होता आणि तो सिनेमा
चालण्यासाठी ओलेत्या मंदाकिनीवर विसंबून राहू लागला होता. इंदिरा
गांधींची क्रूर हत्या झाली होती आणि राजीव गांधींसारखा उमदा पंतप्रधान आपलं
अस्तित्व सिद्ध करायला चाचपडत होता. भारतानं वर्ल्ड कप आणि
नंतर बेन्सन अँड हेजेस चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सची ट्रॉफी जिंकली असली, तरी नंतर वेस्ट इंडिजकडून वाईट मार खाल्ला होता. शिवाय
शारजातल्या भारत-पाक सामन्यांचं दुष्टपर्व त्याच काळात सुरू
होतं. दुष्टपर्व म्हणायचं कारण, की
त्यावर पुन्हा दाऊद प्रभृतींचं वर्चस्व होतं. सचिन तेंडुलकर,
एसटीडी-आयएसडी बूथ आणि मुक्त अर्थव्यवस्था हे
फिनॉमिना अजून देशाच्या पटलावर यायचे होते. मोबाइल ही तर
परग्रहावरची कल्पना होती. संगीत क्षेत्रातही मेलडी संपून डिस्कोचा जमाना सुरू झाला
होता. गरिबांचा अमिताभ (म्हणे) मिथुन चक्रवर्ती ‘डिस्को
डान्सर’ बनून महानगरी तरुणांच्या रिक्त, पोकळ आयुष्यात झिंग आणण्याचा तोकडाच प्रयत्न करीत होता. पण एकूणच बहुतेक
क्षेत्रांत मीडिऑक्रसीनं कळस गाठला होता. साधं-सोपं जगणं फार बेगडी, कृत्रिम झालं होतं. महागाईनं तेव्हाही कळस गाठला होता आणि अन्नधान्यातल्या भेसळीसारखे
भ्रष्टाचार गाजत होते.
असल्या वातावरणातून, असल्या विचित्र
मानसिकतेतून देशाला बाहेर काढण्यासाठी कुणी तरी ‘मिस्टर
इंडिया’च जन्माला यायला हवा होता... जो दिसत तर नाही,
पण जगातील सगळी सत्कृत्यं करतो आणि जे जे वाईट, गलिच्छ, घाण आहे, ते ते समूळ
नष्ट करतो... जो मुलांचा आवडता आहे आणि जो प्रेयसीबरोबर
उत्कट रोमान्स करतो... शेखर कपूर नावाच्या अस्सल भारतीयत्व
जपणाऱ्या आणि ओळखणाऱ्या जाणत्या दिग्दर्शकानं हे सगळं हेरलं आणि रजतपटावर आकाराला
आला ‘मि. इंडिया...’! या ‘मि. इंडिया’चा चेहरा शेखर कपूरला अनिल कपूरमध्ये दिसला
हे महत्त्वाचं. यापूर्वी म्हटलं तसं एकाच वेळी अत्यंत देखणा,
परिलोकातला वाटावा असा आणि त्याच वेळी साधा, चाळीतला,
भोळाभाबडा वाटावा असा चेहरा हे अनिलचं वैशिष्ट्य होतं. शिवाय तो अभिनय करू शकत होता, ही खूपच मोठी गोष्ट
ठरली त्याच्या बाजूनं. १९८७ मध्ये ‘मि. इंडिया’ अवतरला आणि अनिल रातोरात सुपरस्टार झाला... तेव्हा
आताएवढी माध्यमांची बजबजपुरी नव्हती, पण जी थोडीफार होती,
त्यांनी त्याला लगेच अमिताभचा उत्तराधिकारी घोषित करून टाकलं.
ही फार मोठी गोष्ट होती. ‘मि. इंडिया’ बारकाईनं पाहिला, तर
भारतातल्या तत्कालीन आर्थिक, सामाजिक वास्तवाचं दारूण दर्शन
शेखर कपूरनं घडवलेलं दिसतं. ‘मि. इंडिया भेसळ करणाऱ्या अजित
वाच्छानीला बडवतोय आणि खडे असलेलं अन्न त्याला खायला लावतोय,’ या दृश्याला टाळ्या पडायच्या, असा तो काळ होता.
अनिल कपूर परफेक्ट ‘मि. इंडिया’ शोभला.
श्रीदेवीसोबत ‘कांटे नही कटते’ म्हणत त्यानं केलेला ओलेता
रोमान्सही पब्लिकला भावला आणि मुलांसोबत ‘खिलौना मेरे बच्चों का...’ म्हणत नायिकेसोबत भांडणारा त्याचा अरुणही आवडून गेला.
अनिल
कपूरची ताकद सर्वांच्याच लक्षात आली. याच वेळी चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्रा
हा मराठी दिग्दर्शक ‘अंकुश’, ‘प्रतिघात’ असे ‘हट के’ आणि व्यवस्थेविरुद्धचा संताप व्यक्त करणारे
सिनेमे घेऊन प्रेक्षकांची दाद मिळवत होता. याच एन. चंद्रानं त्याच्या पुढच्या सिनेमासाठी
अनिल कपूरला साइन केलं आणि जोडीला होती एक मराठी मुलगी - माधुरी दीक्षित.
मध्यमवर्गीय घरातला, नेव्हीत जाण्याचं स्वप्न पाहणारा तरुण
व्यवस्थेमधल्या दोषांमुळं गुन्हेगार कसा होतो, असं हे
चंद्राच्या आवडीच्या विषयावरचंच कथानक होतं आणि सिनेमाचं नाव होतं - तेजाब. १९८८
मध्ये ‘तेजाब’ झळकला आणि ‘एक दो तीन...’ म्हणत माधुरी एका रात्रीत सुपरस्टार झाली. अनिल कपूरच्या सुपरस्टारपदावर
शिक्कामोर्तबच केलं माध्यमांनी! त्याचा महेश देशमुख उर्फ
मुन्ना पब्लिकनं डोक्यावर घेतला. मुंबईतल्या अंधाऱ्या रात्री, रुळांवर उभ्या असलेल्या दोन लोकलच्या मध्ये दारूच्या नशेत झिंगत, ‘मैं तो भूल चली बाबूल का देस...’ म्हणत झोकांड्या
खाणारा आणि गुंडांनी हल्ला करताच नशेचं सोंग सोडून एकदम कडक आवाजात ‘तुम मेसे
मुकुटबिहारी कौन है...’ म्हणणारा मुन्ना एकदम सुपरहिट झाला.
अमिताभच्या जंजीरच्या वेळच्या ‘अँग्री यंग मॅन इमेज’शी अनिल कपूरच्या या भूमिकेचं साधर्म्य होतं. ‘तेजाब’नंतर या माणसानं कधीच मागं वळून पाहिलं नाही.
सुभाष
घई हा तेव्हा इंडस्ट्रीतला नवा शो-मॅन होता. राज कपूर १९८८ मध्ये गेल्यानंतर तर हे
बिरुद आपसूक घईंकडं चालत आलं. घईंना संगीताची, कथेची आणि त्यातल्या मसाल्याची नेमकी
जाण होती. हा सगळा सुपरहिट मसाला घालून त्यांनी १९८९ मध्ये आणला ‘राम-लखन’. जॅकी श्रॉफ राम आणि
अनिल लखन! अर्थात ‘वन टू का फोर...’ करणारा अनिलचा राउडी
लखनच हिट झाला. सोबत त्याची सुपरहिट जोडीदार - माधुरी होतीच! घईंचा ‘राम-लखन’ सुपरडुपर हिट झाला. अनिल कपूरची लोकप्रियता
कळसाला पोचली. तत्पूर्वी घईंच्याच ‘कर्मा’मध्येही अनिल कपूर
पुन्हा एकदा दिलीपकुमारांसोबत होताच. ‘तेजाब’च्या आधी केलेले ‘वो सात दिन’, ‘मेरी जंग’, ‘जाँबाज’ या चित्रपटांतही त्यानं आपल्या
अभिनयाचा ठसा उमटवला होता. अनिल कपूरचं वैशिष्ट्य म्हणजे कारकिर्दीच्या ऐन शिखरावर
असतानाही त्यानं कधी आपलं संतुलन गमावलं नाही. तो तेव्हा फार मीडिया फ्रेंडली
नव्हता म्हणे. सुनीता ही अनिल कपूरची पत्नी. हे सर्व सिनेमे येण्याआधीच
सुनीताबरोबर अनिलची लग्नगाठ बसली होती. पण सुपरस्टार पद मिळाल्यानंतरही अनिलचं
कधीच कुणा नटीसोबत अफेअर असल्याची चर्चासुद्धा ऐकायला मिळाली नाही. आपण बरं आणि
आपलं काम बरं, याच वृत्तीनं तो जगला. अनिल कपूरची ही वृत्ती
फिल्म इंडस्ट्रीत फारच दुर्मिळ आणि म्हणूनच ‘काबिले तारीफ’ आहे.
अनिलनं
याच काळात के. विश्वनाथ यांचा ‘ईश्वर’ही (१९८९) केला. ईश्वरनं अनिलच्या सर्वांगीण
अष्टपैलुत्वावर पुन्हा एक शिक्कामोर्तब झालं. विधू विनोद चोप्राच्या ‘परिंदा’मध्ये नाना पाटेकरचा ‘अण्णा’ भाव खाऊन गेला असला, तरी अनिलची भूमिका आणि
अस्तित्व विसरणं शक्यच नव्हतं कुणाला... नंतर बॉलिवूडमध्ये खान मंडळींचं साम्राज्य
सुरू झालं आणि अनिल यात थोडा मागं पडला... पण १९९२ मध्ये इंद्रकुमारच्या ‘बेटा’नं
अनिलला पुन्हा हात दिला. यात माधुरी ‘धक धक गर्ल’ म्हणून
तुफान गाजली, तरी अनिल कपूरची साथ महत्त्वाची होती. यानंतर
विधू विनोद चोप्राचाच ‘१९४२- ए लव्ह स्टोरी’ (१९९४) आला.
सिनेमा फार चालला नाही, तरी त्यातलं ‘एक
लडकी को देखा’, ‘कुछ ना कहो...’ ही गाणी सुपरहिट झाली.
पंचमदांनी संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. अनिल कपूरचं सुदैव असं, की या अवलिया संगीतकाराची शेवटची मास्टरपीस गाणी त्याच्यावर चित्रित झाली.
नंतर १९९७ मध्ये आलेला ‘विरासत’ही
गाजला. पण अनिलच्या करियरला पुन्हा हात दिला तो घईंच्याच ‘ताल’नं...
वर्ष होतं १९९९. विश्वसुंदरी ऐश्वर्या रायसोबत रमलेला हा ‘रमता जोगी...’ पब्लिकला जाम
आवडला. नंतर माधुरीसोबत २००० मध्ये ‘पुकार’ आला. पण फार
चालला नाही. पण २००१ मध्ये राणी मुखर्जीसोबत आलेल्या ‘नायक’ या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकनं अनिल कपूरला चांगला हात दिला. एका
दिवसासाठी मुख्यमंत्री होणाऱ्या त्याच्या शिवाजी राव या पात्राची कथा लोकांना खूप
आवडली.
पण
यानंतर अनिलच्या करियरमध्ये मोठा ब्रेक आला. पुढची चार-पाच वर्षं त्याचा एकही नाव
घेण्यासारखा मोठा सिनेमा आला नाही. पण २००५ मध्ये आलेल्या ‘नो एंट्री’नं
अनिलची बॉलिवूडमधली रि-एंट्री सुखद केली. अनिल विनोदी भूमिकाही उत्तम करतो,
हे पुन्हा सिद्ध झालं. नंतर २००७ मध्ये ‘वेलकम’मध्येही अनिलनं कॉमेडी केली. २००८ मध्ये आलेल्या डॅनी बोएलच्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या महत्त्वाकांक्षी सिनेमात अनिल
कपूरला महत्त्वाची भूमिका मिळाली. या चित्रपटानंतर तो आंतरराष्ट्रीय जगतात एक
मान्यवर अभिनेता म्हणून गणला जाऊ लागला. नंतर टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल’मध्येही त्याने एक छोटी भूमिका केली.
अनिल
कपूरचं वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत तो कधीच वादग्रस्त ठरला नाही.
कधीही कुठल्या अफेअरमध्ये,
वाईट गोष्टींमध्ये त्याचं नाव आलं नाही. त्यानं कधीही त्याचा विषय
सोडून बडबड केली नाही, की कुणाबरोबर भांडण केलं नाही. तो
अंतर्मुख स्वभावाचा माणूस आहे. त्याची मुलगी सोनम कपूर नायिका झाली, तरी तो स्वतःही नायकाच्याच भूमिका करतोय... वयाच्या ५६ व्या वर्षीही
त्यानं स्वतःला जे काही फिट ठेवलंय, ते नक्कीच कौतुकास्पद
आहे. आपलं आयुष्य असावं तर अनिल कपूरसारखं... असं मला अनेकदा वाटतं, यातच त्याच्या यशस्वी आयुष्याचं सार आहे!
---
(पूर्वप्रसिद्धी - साहित्य शिवार, दिवाळी २०१३)
----
(पूर्वप्रसिद्धी - साहित्य शिवार, दिवाळी २०१३)
----
No comments:
Post a Comment