7 Feb 2023

वर्धा डायरी - पूर्वार्ध

वरदेच्या तीरी, शारदेच्या दारी...
-------------------------------------


गेल्या वर्षी वर्ध्याला साहित्य संमेलन घोषित झालं, त्याच वेळी तिथं जायचं असं मी ठरवून टाकलं होतं. चार-पाच वर्षांपूर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यात सहज शक्य असूनही आयुष्यात अजूनही न घडलेल्या गोष्टी अशी एक रँडम यादी केली होती. त्यात महाराष्ट्रातील कोणती जिल्ह्याची ठिकाणं मी अजून बघितलेली नाहीत, असा एक उल्लेख होता. त्यात धुळे, भंडारा, वर्धा वगैरे शहरं होती. त्यातलं वर्धा आता बघता येणार होतं. याशिवाय वर्धा म्हटलं, की अपरिहार्यपणे आठवणारे सेवाग्राम व पवनार आश्रम हे दोन्ही बघण्याची संधीही सोडण्यासारखी नव्हतीच. हल्ली आपल्यामागं एवढे व्याप वाढले आहेत, की असं ठरवून वर्ध्यासारख्या ठिकाणी आपण जाणं जवळपास अशक्यच. मग साहित्य संमेलनाचं निमित्त बरं पडतं. संमेलनही अनुभवता येतं आणि पूर्वी कधी न पाहिलं गेलेलं ते शहरही! महाराष्ट्राबाहेर झालेल्या घुमान व बडोदा या दोन संमेलनांना मी, अभिजित पेंढारकर व अरविंद तेलकर असं आमचं त्रिकुट गेलं होतं. नंतर नाशिकमध्ये २०२१ च्या डिसेंबरमध्ये (करोनानंतर झालेल्या) साहित्य संमेलनाला मी व मंदार (कुलकर्णी) असे आम्ही दोघं गेलो होतो. मी, मंदार व अभिजित एकत्रित अजून कुठल्याच संमेलनाला गेलो नव्हतो. म्हणून मग या वेळी दोघांना आवर्जून विचारलं आणि दोघंही तयार झाले. वर्ध्याला जाण्यासाठी रेल्वेच सोयिस्कर असल्यानं मी नोव्हेंबरमध्येच तिकिटं काढून ठेवली. नागपूरला जाण्यासाठी पुण्याहून पुणे-नागपूर सुपरफास्ट व पुणे-नागपूर गरीबरथ अशा दोन थेट गाड्या आहेत. त्यांची वेळही सोयिस्कर होती. या गाड्या एकाआड एक दिवशी धावतात. आम्हाला जाताना पुणे-नागपूर मिळाली, तर येताना गरीबरथ! दोन्ही गाड्यांचं थ्री-टायर एसीचं बुकिंग करून टाकलं. (‘गरीबरथ’मध्ये सर्व डबे थ्री-टायर एसीचेच असतात.)
फेब्रुवारी जवळ येत चालला, तसे वर्ध्याचे वेध लागले. जानेवारीच्या अखेरीस आमच्या नागपूर ऑफिसमधले सहकारी मनोज मोहिते आणि आमचे तेथील संपादक श्रीपाद अपराजित यांच्याशी मी संपर्क साधला. दोघांनीही यथायोग्य मार्गदर्शन करून वर्ध्यात आमची सोय केली. लगेच पैसे भरून हॉटेलही बुक करून टाकलं. (कारण वर्ध्यातील हॉटेलची संख्या आणि येणारे पाहुणे यांचं प्रमाण व्यस्त होतं. त्यामुळं ऐन वेळी हॉटेलमध्ये रूम मिळतीलच याची खातरी नव्हती.) एक फेब्रुवारीला बजेट असतं. तो दिवस ऑफिसमध्ये भरपूर कामाचा असतो. दोन तारखेपासून मात्र माझी रजा होती आणि ट्रेन संध्याकाळची होती. त्यामुळं गुरुवारी सकाळी जरा तयारी करायला वेळ मिळाला.
दोन तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता ही ट्रेन पुण्याहून निघाली. हल्ली ट्रेननं प्रवास फारसा होत नाही. त्यातही मंदार तर जवळपास दहा वर्षांनी ट्रेननं प्रवास करत होता. मीही करोनाकाळानंतर प्रथमच ट्रेननं प्रवास करत होतो. आता सगळंच ‘नॉर्मल’ झालं असल्यानं तसा काहीच प्रॉब्लेम आला नाही. ट्रेनमधल्या खाण्याचा धसका घेऊन आम्हाला घरूनच डबा देण्यात आला होता. तो आम्ही इमाने-इतबारे साडेआठ वाजता खाल्ला. एसी ट्रेन असली, की बाहेरचं फार काही नीट बघता येत नाही. त्यातही या ट्रेननं पुणं सोडल्यानंतर तासाभरातच अंधार झाला. मला ती दौंडची कॉर्ड लाइन बघण्यात इंटरेस्ट होता. पूर्वी सर्व गाड्या दौंड जंक्शनला जाऊन पुन्हा उलट नगरच्या दिशेनं वळायच्या. (म्हणजे पुढचं इंजिन काढून ते मागं लावलं जायचं.) त्यात हमखास अर्धा तास मोडत असे. आता हा बायपाससारखा रूट केल्यानं दौंड जंक्शनला न जाता आणि इंजिन न बदलता थेट नगरकडं गाड्या जातात. हा बायपास दौंडच्या बराच अलीकडं असेल असं मला वाटत होतं. प्रत्यक्षात तो जवळपास दौंडमध्येच आहे. त्यामुळं अंतर फारसं वाचलेलं नाही. मात्र, ट्रेनचा उलट वळसा टळला आहे, हे खरंच. मला एकूणच ट्रेनमध्ये एका जागी बसायला आवडत नाही. मात्र, थ्री टायर एसी हा जरा कंजेस्टेड प्रकार आहे. त्यातही हल्ली बहुतेक हे सगळे डबे फुल्ल असतातच. प्रत्येक प्रवाशाची तऱ्हा निराळी. आपण ग्रुपनं प्रवास करत असलो, तर मजा येते. एरवी एकट्याला बोअर होतं. अनेक जणांना संध्याकाळ झाली, की अंथरूण-पांघरूण पसरून लगेच गुडुप झोपी जायचं असतं. लाइट चालू ठेवावा की नाही, फॅन (एसी असला तरी) लावावा की नाही, यावरून बारीकसारीक कुरबुरी होत असतात. लोक एकूण रागरंग बघून ॲडजस्ट करतात हे खरं. मंदारनं पत्त्यांचा कॅट आणला होता आणि आम्ही कित्येक वर्षांनी त्या रेल्वेत ‘५-३-२’ खेळलो. मात्र, समोरच्या मावशींनी ‘लाइट बंद करा’चा धोशा लावला होता. त्यामुळं खेळ आटोपता घ्यावा लागला. मधला बर्थ लावणं, त्यावर बेडशीट पसरणं आणि ती नीट पसरणं हा एक कार्यक्रमच असतो. त्यातही वरच्या बेडवर बेडशीट घालणं कर्मकठीण. हे सगळे व्याप करून, जीन्स पॅंट आणि शर्टवर तिथं झोपणं हे एक दिव्यच असतं. अनेक लोक रेल्वेत घालायचे वेगळे कपडे आणतात. ते खरं तर योग्य आहे. माझ्या खिशातली नाणी तर हमखास पडतात. अनेक सव्यापसव्य करून अखेर आम्ही तिथं आडवे झालो. माझी रोजची झोपण्याची वेळ एक ते दीड आहे. त्यामुळं सव्वादहाला पडून काय करणार, हा प्रश्नच होता. ‘वागले की दुनिया’ बघून झाली, गाणी ऐकून झाली, तरी झोप येईना. त्यात खालच्या काकांनी वरचा ‘घो’ लावला होता. त्यांच्या घोरण्यामुळं माझी झोप भयानक उडालीच. अखेर केवळ रेल्वेच्या लयबद्ध गतीशी शरीरानं समझोता केला आणि झोप लागली.

सकाळी लवकरच जाग आली तेव्हा बडनेरा जवळ आलं होतं. ‘व्हेअर इज माय ट्रेन’ या ॲपमुळं सगळी बित्तंबातमी कळते, हे एक बरंय. सकाळचा चहा झाला. गाडी थोडी लेट होती. साडेसातच्या ऐवजी आम्ही आठ वाजून २० मिनिटांनी वर्धा स्टेशनला पोचलो. आम्ही बहुतेक मुख्य दाराने बाहेर न पडता, दुसऱ्या एका गेटनं बाहेर पडलो. तिथं अगदी एक की दोनच रिक्षा दिसत होत्या. अखेर पुढं जरा चालून मुख्य रस्त्यावर आलो आणि रिक्षा केली. आमचं ‘विद्यादीप रिजन्सी’ हे हॉटेल तिथून साधारण तीन किलोमीटरवर होतं. रिक्षावाल्यानं शंभर रुपये सांगितले. हा इथला ठरलेला रेट होता तिघांसाठी, हे नंतर कळलं. आम्हाला हॉटेलवर पोचायची घाई होती, कारण संमेलनाचं उद्घाटन सकाळीच होतं. बहुतेकदा ते संध्याकाळी असतं. आम्हाला हॉटेलकडं जातानाच्या रस्त्यावरच ग्रंथदिंडी दिसली. मी लगेच व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. हॉटेलवर पोचलो. हॉटेलवाल्यानं सगळे पैसे भरा, असं सांगितलं. आधी खोल्या बघून आलो. बऱ्या होत्या. मग सगळे पैसे भरले आणि एकदाचे रूमवर पोचलो. आवरून लगेच संमेलनस्थळी गेलो. मुख्य प्रवेशद्वारावर महात्मा गांधींचा चरख्यावर सूत काततानाचा कटआउट लावला होता. एकूण ते मैदान भव्य दिसत होतं. उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार होते, त्यामुळं पोलिसांची उपस्थितीही बरीच होती. आम्ही साडेदहाला तिथं पोचलो असलो, तरी उद्घाटन समारंभ सुरू व्हायला वेळ होता. मग आधी पोटोबाची व्यवस्था करायला भोजन कक्षाकडं गेलो. तिथं तीन दिवसांचे नाश्ता, दोन्ही वेळचं जेवण असे प्रत्येकी दोन हजार रुपये भरले आणि आधी ती कुपनं ताब्यात घेतली. ब्रेकफास्ट केला. भूक लागली होतीच. खाऊन, चहा घेऊन मुख्य मंडपात येऊन बसलो. उद्घाटन समारंभ सुरू झाला. स्वागतगीत, मराठी अभिमानगीत, मग एकेक भाषणं असं करत प्रमुख पाहुणे हिंदी साहित्यिक विश्वनाथ प्रसाद तिवारी आणि कुमार विश्वास यांची भाषणं झाली. कुमार विश्वास यांना केवळ पाचच मिनिटं देण्यात आली होती, असं त्यांनीच भाषणात सांगितलं. अर्थात त्यांच्या छोटेखानी भाषणातही त्यांनी जोरदार बॅटिंग करून टाळ्या मिळविल्या. विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांचं भाषण प्रभावहीन झालं. ते बऱ्यापैकी तणावातच वाटले. तीच गोष्ट स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांची. ते आजारी होते, त्यामुळं बसूनच बोलले. मात्र, त्यांच्या बोलण्यातलं एक अक्षरही कळलं नाही. त्याऐवजी त्यांचं भाषण कुणी तरी वाचून दाखवलं असतं, तर बरं झालं असतं. असो. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालं, तेव्हा बारा वाजून गेले होते. त्यांच्या भाषणाच्या वेळी वेगळा विदर्भ आणि पिकांना भाव या दोन मागण्यांसाठी काही लोकांनी गोंधळ केला. पोलिसांनी त्यांना त्वरित बाहेर काढलं. मात्र, नंतर दुसरी बॅच घोषणा द्यायला उठायची. असं एकूण तीनदा झालं. नाही म्हटलं तरी त्या मंडपात अस्वस्थता पसरली. लोक उठून उभे राहिले आणि तिकडं बघू लागले. थोड्या वेळानं स्थिरस्थावर झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. अर्थात, भाषण विस्कळितच होतं. कदाचित, व्यत्यय आल्यामुळं मुद्दाम ते अधिक वेळ बोलले असावेत. मात्र, त्यांचं भाषण संपताच मंडपातले एकदम निम्मे-अधिक लोक उठले आणि बाहेर पडले. संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर थोडाच वेळ बोलणार होते. नंतर त्यांच्या भाषणावर विशेष परिसंवाद ठेवण्यात आला होता. तरीही त्यांचं ते छोटंसं भाषणही त्या बाहेर पडणाऱ्या गर्दीच्या गोंगाटात हरवून गेलं. एवढ्यात गणेश (मतकरी) आला. त्याचा एक परिसंवादात सहभाग होता. मी त्याला आमच्या शेजारी बसायला बोलावून घेतलं. थोड्या वेळानं उद्घाटन समारंभ संपला. तोवर जेवणाची वेळ झाली होती. (या उद्घाटन समारंभाचं सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी प्रभावीपणे केलं. नंतर त्यांच्याशीही भेट झाली.)

संमेलनाचा मुख्य मंडप भव्य होता. शेजारी चार ते पाच लहान मंडप होते. मुख्य मंडपाला आचार्य विनोबा भावेंचं नाव देण्यात आलं होतं, तर मुख्य व्यासपीठाला प्राचार्य राम शेवाळकर यांचं नाव देण्यात आलं होतं. इतर मंडपांपैकी एका मंडपाला विदर्भ साहित्य संघाचे नुकतेच कालवश झालेले अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं नाव देण्यात आलं होतं. गझल कट्ट्याला अर्थातच सुरेश भट यांचं नाव होतं. ग. त्र्यं माडखोलकर यांच्या नावाने प्रकाशन मंच होता. तिथं कुणालाही आपलं पुस्तक प्रकाशन करण्याची सोय होती. कोपऱ्यात एक मावशी केळकर वाचन मंच होता. पलीकडे विजयराज बोधनकर यांनी काढलेल्या साहित्यिकांच्या अर्कचित्रांचं प्रदर्शन होतं; तसंच वर्ध्यातील स्थानिक छायाचित्रकारांच्या फोटोचंही एक प्रदर्शन होतं. या सर्व लहान मंडपांच्या समोरच ग्रंथप्रदर्शन होतं. पुस्तकाच्या आकाराची दोन भव्य प्रवेशद्वारं होती. एरवी पुस्तक प्रदर्शनांतील गाळे आडव्या-उभ्या सरळ ओळींत असतात. इथं मात्र वेगळी रचना होती. पूर्ण गोलाकार असे स्टॉल होते आणि मधोमध दोन ते तीन ओळींतही काही स्टॉल होते. ही रचना वैशिष्ट्यपूर्ण असली, तरी दिवसभरात सूर्याच्या दिशेनुसार, कुठल्या ना कुठल्या स्टॉलवर ऊन येत होतं. नंतर मग बऱ्याच स्टॉलवर ऊन झाकणाऱ्या कनाती लावलेल्या दिसल्या. या सर्व व्यवस्थेच्या मागच्या बाजूला भोजनकक्ष होता. मुख्य मंडपापासून तिथपर्यंत जायचं तर बऱ्यापैकी चालावं लागत होतं. आम्ही पुस्तक प्रदर्शनात संतोषच्या (देशपांडे) ‘स्टोरीटेल’च्या स्टॉलला भेट देऊन पुढं जेवायला गेलो. जेवणाची कुपन दिल्याशिवाय मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेशच दिला जात नव्हता. त्यामुळं आत फक्त जेवणाऱ्या मंडळींचीच गर्दी होती. जेवणाची व्यवस्था उत्तम होती. स्थानिक पदार्थही होते. जेवण झाल्यावर आम्ही जरा वेळ मुख्य मंडपात येऊन बसलो. तेव्हा आमची ‘नागपूर मटा’ची सगळी टीम भेटली. मनोज मोहिते, विनोद वाघमारे, मुंबईहून आलेली अनुजा चवाथे यांना भेटलो. नागपूरच्या वर्षा किडे-कुलकर्णी फेसबुकवरच्या फ्रेंड. त्यांचीही भेट झाली. जर्नालिझमचा बॅचमेट मनोज भोयर आणि पुण्यात पूर्वी ‘लोकमत’मध्ये असलेला निनाद देशमुख हेही भेटले.
आज संध्याकाळच्या वेळी गीताई मंदिर बघून यावं असं ठरलं. आमचा मित्र आशिष तागडे कालच तिथं जाऊन आला होता. त्याची पोस्ट मंदारनं बघितली होती. मग तिकडंच जाऊ या, असं ठरलं. रिक्षा करून चारच्या सुमारास तिकडं गेलो. त्या परिसराला गोपुरी असं नाव आहे आणि गीताई मंदिर असलेल्या त्या भागाला गोपुरी आश्रम असंच म्हणतात, हे तिकडं कळलं. रिक्षानं आम्हाला तिकडं सोडल्यावर आम्ही आत गेलो. एकदम शांत परिसर होता. ती शांतता मनाला स्पर्शून गेली. आत गेल्यावर कळलं, की जमनालाल बजाज यांचं वास्तव्य इथं होतं. त्यांच्या स्मृती त्या बंगल्यात नीट जतन करून ठेवल्या आहेत. शेजारी ‘विनोबा दर्शन’ नावाचं विशेष प्रदर्शन होतं.

जमनालाल बजाज विनोबांना गुरू मानत होते. त्यामुळंच गुरूंची स्मृती शेजारीच उत्कृष्ट प्रदर्शनाद्वारे जतन करण्यात आली होती. आत फोटो काढायला परवानगी नव्हती. जमनालाल बजाज यांनी एका फोर्ड गाडीचं रूपांतर बैलगाडीत केलं होतं आणि तिला ‘ऑक्स-फोर्ड’ असं नाव दिलं होतं. निळ्या रंगाची ती एका बैलाची गाडी बाहेरच होती. तिचा मात्र फोटो काढता आला. नंतर आम्ही गीताई मंदिराकडं गेलो. मंदिरासारखं जवळपास काही दिसेना. तेव्हा तिथल्या व्यवस्थापकांनी सांगितलं, की हे मंदिर म्हणजे विनोबांनी लिहिलेल्या ‘गीताई’तील ओळी लिहिलेल्या पाषाणशिल्पांचा समूह! आम्ही ते पाषाण बघायला गेलो आणि थक्क झालो. साधारण दोन ते तीन मीटर उंचीच्या पाषाणांवर ‘गीताई’तील अध्यायानुसार श्लोक कोरले होते. अध्याय बदलला, की वेगळ्या रंगांचे पाषाण असायचे. असे एकूण सातशेहून अधिक पाषाण तिथं उभारले होते. हे ‘गीताई मंदिर’ बघून आम्ही थक्क झालो. धन्य वाटलं... मी मंदारला उत्स्फूर्तपणे तिथं ‘फेसबुक लाइव्ह’ करण्याची कल्पना सुचविली. त्याला व अभिजितलाही ती कल्पना आवडली. मग आम्ही तिघांनी तिथूनच एक ‘फेसबुक’ लाइव्ह केलं.

शेजारीच एक विश्वशांती स्तूप होता. त्याच्या आधी एक जपानी प्रार्थना मंदिर होतं. विनोबांच्या काळात तिथं आलेल्या एका जपानी साधूबुवांनी (त्यांचं नाव विसरलो) इथं बरंच काम केलं होतं म्हणे. त्यांच्याच नावाने हे प्रार्थना मंदिर होतं. आत कुणीही नव्हतं. अगदी शांत अन् प्रसन्न वाटलं. आजूबाजूचं भान हरपलं अक्षरश:! दोन मिनिटं तिथं मौन उभा राहिलो आणि बाहेर पडलो. विश्वशांती स्तूपही भव्य होता. त्या परिसरातून बाहेर पडताना संध्याकाळ झाली होती. पाखरांची किलबिल होती. सुंदर डांबरी रस्ता आणि शेजारी पदपथही होता. वर्ध्यातली मंडळी बहुतेक तिथं संध्याकाळी चालायला येत असावीत. कारण आम्ही परत येत असताना तसे बरेच लोक दिसले. रिक्षासाठी आम्हाला बरंच चालून थेट मुख्य रस्त्यावर यावं लागलं. तिथं बऱ्याच वेळानं एक रिक्षा मिळाली. तिथून थेट संमेलनस्थळी आलो. बाहेर काही खाण्याचे स्टॉल होते. तिथं चक्कर मारली. संमेलनाध्यक्षांच्या भाषणावरचा परिसंवाद अजून सुरूच होता. तिथं थोडा वेळ थांबलो. तो परिसंवाद संपल्यानंतर गणेशचा सहभाग असलेला ‘आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे’ हा परिसंवाद (जवळपास तीन तासांनी उशिरा) सुरू झाला. सुरुवातीला पी. विठ्ठल बोलले. नंतर गणेश बोलला. त्यानं ते लिहूनच आणलं होतं. त्याचं बोलणं झाल्यावर आम्ही तिथून उठलो. मुख्य मंडपात श्रीपाद अपराजित सर भेटले. पुढच्या परिसंवादात त्यांचा सहभाग होता. आमच्याकडे ‘मैफल’ पुरवणीत लिहिणाऱ्या रश्मी पदवाड-मदनकर यांचीही भेट झाली. आम्ही तोवर केवळ फेसबुकवरच भेटलो होतो. अचानक भेट झाल्यानं आनंद झाला. त्यानंतर जेवायचं होतं. बराच उशीरही झाला होता. रात्रीचं जेवण झाल्यावर फार न रेंगाळता बाहेर पडलो आणि रिक्षा करून, नव्हे ‘ऑटो’ करून हॉटेलवर पोचलो.

हा पूर्वार्ध संपवताना हा ‘रिक्षा’ व ‘ऑटो’चा किस्सा सांगितलाच पाहिजे. रात्री हॉटेलवर जाताना मंदारच्या तोंडून ‘रिक्षा’ असा उल्लेख ऐकून आमचा रिक्षावाला भयंकर अपसेट झाला. त्यानं तसं स्पष्ट बोलून दाखवलं. ‘मी एवढे पैसे घालून ऑटो घेतला आणि तुम्ही त्याला रिक्षा म्हणून राह्यले,’ ही त्याची खंत होती. मंदारला तर काय झालं ते कळेनाच. माझ्या लक्षात आलं. इकडं ‘रिक्षा’ म्हणजे सायकलरिक्षा आणि ‘ऑटो’ म्हणजे आपण इकडं जिला ‘रिक्षा’ म्हणतो ती... मी हे मंदारला सांगितल्यावर आता वर्ध्यात असेपर्यंत तरी ‘रिक्षा’ला ‘ऑटो’च म्हणायचं, असं आम्ही स्वत:ला ‘ऑटो-करेक्ट’ करून घेतलं.
साहित्य संमेलनाच्या मंडपाबाहेर आपल्या मायमराठी भाषेनं आमची अशी फिरकी घेतली होती आणि ‘जे सहित घेऊन जातं ते साहित्य’ ही (बहुतेक विनोबांनी केलेली) व्याख्या मनापासून पटली... वर्ध्यातल्या गोड पाहुणचाराचा पहिला दिवस असा भाषेचा धडा शिकवून संपला होता...!


(ता. क. वर्धा शहर हे वर्धा नदीच्या तीरी वसलं आहे. या नदीचं खरं नाव ‘वरदा’ असं आहे. अपभ्रंश होऊन वर्धा झालं आणि शहराचं नावही तेच पडलं.)


(पूर्वार्ध)

उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-------
No comments:

Post a Comment