9 Feb 2023

वर्धा डायरी - उत्तरार्ध

‘पागल दौड’ विसरताना...
------------------------------दुसऱ्या दिवशी अभिजित व मी लवकर उठलो. खाली जाऊन चहा घेणं गरजेचं होतं. हॉटेलच्या जवळच एक ‘आरंभ अमृततुल्य’ आणि एक ‘परमात्मा वडापाव सेंटर’ दिसलं. पुण्याबाहेर पूर्वी ‘अमृततुल्य’ दिसत नसे. सोशल मीडियाच्या या काळात सगळीकडं सांस्कृतिक सपाटीकरण झालं आहे. त्या दुकानातल्या पाट्या थेट पुणेरी होत्या. ‘परमात्मा वडापाव सेंटर’मध्ये तर्री पोहेही मिळत होते. अभिजितला भूक लागली होती. त्यामुळं एक प्लेट पोहे घेऊन ताव मारला. जरा वेळानं आवरून तिघंही पुन्हा ‘ऑटो’ करून संमेलनस्थळी पोचलो. (शंभर रुपये झाले हे आता सांगायला नको!) आज सकाळी मुख्य मंडपात डॉ. अभय बंग यांची मुलाखत होती. संपूर्ण संमेलनातलं माझ्यासाठी तरी हे एक प्रमुख आकर्षण होतं. आम्ही नाश्त्यासाठी भोजन कक्षात पोचलो, तेव्हा यशो (यशोदा वाकणकर) आणि मुक्ता (पुणतांबेकर) दोघीही तिथंच होत्या. विवेक सावंत आणि विनोद शिरसाठही होते. सावंत, शिरसाठ आणि मुक्ता हे तिघं अभय बंगांची मुलाखत घेणार होते. मुलाखतीची अधिकृत वेळ सकाळी ९.३० असली, तरी ती इथल्या शिरस्त्याप्रमाणे उशिरा सुरू होणार, हे आता जवळपास सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. त्यातही तिघेही मुलाखतकर्ते आमच्यासोबतच असल्यामुळं आम्ही निवांत ब्रेकफास्ट केला. 
ब्रेकफास्टनंतर मुख्य मंडपात येऊन बसलो. मुलाखत साधारण साडेदहा वाजता सुरू झाली. शिरसाठ, मुक्ता व सावंत यांनी नेमके प्रश्न विचारले. त्यांची तयारी जाणवत होती. (नंतर आम्ही मुक्ताशी बोललो, तेव्हा तिनं या मुलाखतीसाठी किती आणि कशी तयारी केली होती, हे तपशीलवार सांगितलं.) आम्ही डॉ. बंग यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक होतो. त्यांनी अजिबात निराश केलं नाही. मी डॉ. बंग यांचं नाव प्रथम ऐकलं ते अनिल अवचट यांनी त्यांच्यावर ‘साप्ताहिक सकाळ’च्या (बहुतेक १९९४) दिवाळी अंकात लिहिलेला ‘शोध आरोग्याचा’ हा तपशीलवार लेख वाचला तेव्हा! त्यानंतर २००२ मध्ये मी व संतोष (देशपांडे) आम्ही दोघं गडचिरोलीला डॉ. बंग यांच्या ‘सर्च’ प्रकल्पात आणि पुढं हेमलकसाला डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात दोन-दोन दिवस राहूनही आलो होतो. डॉ. बंग आणि राणी बंग यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्यासोबत सकाळी फिरायला जाऊन आम्ही तेव्हा फारच खूश झालो होतो. त्यानंतर बंग यांच्याशी थेट संपर्क काही राहिला नाही. अगदी अलीकडं, म्हणजे २०१९ च्या जानेवारी लोणावळ्यात मनशक्ती केंद्रात शिक्षण परिषद भरली होती, तेव्हा वर्षाच्या (तोडमल) आग्रहास्तव मी खास लोणावळ्याला गेलो होतो, याचं एक प्रमुख कारण म्हणजे तिथं डॉ. अभय बंग येणार होते. तिथं त्यांच्याशी निवांत गप्पा झाल्या. त्यानंतर आता संमेलनात त्यांचे विचार ऐकत होतो. डॉ. बंग शांतपणे, पण ठामपणे आपले विचार मांडत होते. वर्धा परिसरातच त्यांचे वडील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ठाकूरदास बंग यांचं मोठं काम होतं. ते महात्मा गांधी आणि विनोबांच्या नित्य सहवासात होते. त्या प्रभावापासून ते गडचिरोलीत उभारलेल्या ‘सर्च’च्या कामाबद्दल, दारूमुक्तीच्या आंदोलनाबद्दल, विनोबांवर झालेल्या अन्यायाबद्दल ते तपशीलवार बोलले. ‘ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हे तिघे मराठीतील सार्वकालिक श्रेष्ठ साहित्यिक आहेत,’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं. बंग यांच्या विचारांतील ठामपणा, स्पष्टपणा त्यांच्या संयमित प्रतिपादनात सहज जाणवत होता. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीतील अनुभव, त्यांतून आलेलं शहाणपण आणि सहज-साध्या संवादातून मोठा विचार मांडण्याची हातोटी यामुळं ही मुलाखत अगदी संस्मरणीय ठरली. 
मुलाखत संपल्यावर मी व यशो थेट व्यासपीठावर गेलो डॉक्टरांना भेटायला... तिथं अर्थात त्यांच्याभोवती गर्दी होती. त्यात वर्ध्यातली स्थानिक मंडळी तर जवळपास सगळीच त्यांच्या ओळखीची! तरीही मी त्यांना भेटून मुलाखत छान झाल्याचं सांगितलं. व्यासपीठावरून खाली उतरलो तर रेणुका देशकर भेटल्या. त्या आणि मुक्ता मैत्रिणी हे समजलं. देशकर यांच्यासोबत फोटो काढले. मंदार तर त्यांच्या आवाजाचा फॅनच झाला होता. नंतर ग्रंथ प्रदर्शनात गेलो. शासकीय मुद्रणालयाच्या स्टॉलवर ‘इथं डिजिटल पेमेंट चालणार नाही; फक्त रोख’ असा बोर्ड लावलेला दिसला. मला ते जरा विचित्र वाटलं. मग त्या बोर्डचा फोटो काढला. नंतर ‘मनोविकास’च्या स्टॉलवर गेलो. तिथं आशिष पाटकर भेटले. माझं ‘सुपरहिरो’ सीरीजमधलं धोनीवरचं पुस्तक तिथं दिसलं नाही. त्याच्या प्रती संपल्याचं कळलं. नंतर शेजारीच ‘मनशक्ती’चा स्टॉल होता. तिथं दीपक अलूरकर आणि सुहास गुधाटे हे दोघं भेटले. तिथंही फोटोसेशन पार पडलं. मग संपूर्ण ग्रंथप्रदर्शनाला एक चक्कर मारली. ऊन बऱ्यापैकी जाणवत होतं. भूकही लागली होती. जेवण झाल्यावर आता आम्हाला सेवाग्रामला जायचं होतं. साधारण आठ किलोमीटर अंतरावर ‘सेवाग्राम’ आहे. तिथं जायला ‘ऑटो’वाल्यानं २०० रुपये सांगितले. आम्ही लगेच निघालो. अर्ध्या तासात तिथं पोचलो. ‘बापू कुटी’च्या समोरच त्यानं आम्हाला सोडलं. ‘सेवाग्राम’विषयी माझी जी कल्पना होती, त्यापेक्षा ही जागा, परिसर थोडा वेगळा निघाला. आत शिरल्यावर तिथल्या दाट झाडांची सावली आणि समोर दिसत असलेल्या झोपड्या यामुळं आपोआप वेगळं वातावरण जाणवू लागलं. मी यापूर्वी दिल्लीत ‘राजघाट’ला दोन-तीनदा गेलो आहे. इथं सेवाग्रामला प्रथमच येत होतो. महात्मा गांधी इथं १९३६ ते १९४६ या काळात राहिले. (तेही सलग नाहीच.) इथं आदिनिवास (सर्वांत आधी बांधलेली एक झोपडी), मग बा कुटी, मग बापू कुटी, महादेव देसाई कुटी, परचुरे शास्त्री कुटी अशा वेगवेगळ्या झोपड्या आहेत. या झोपड्या असल्या, तरी पक्क्या बांधकामाच्या आणि कौलारू आहेत. पहिली झोपडी बांधताना तिचा खर्च शंभर रुपयांपेक्षा अधिक व्हायला नको, अशी बापूजींची अट होती म्हणे. तरीही तिथं बाथटब, कमोड आदी सुविधा तेव्हाच्या काळात होत्या. यात एक टिनचा बाथटब उभा करून ठेवलेला होता, तो जास्तकरून बापूजी वापरायचे. दुसरा एक संगमरवरी बाथटब होता, ते घनश्यामदास बिर्लांनी पाठवला होता. तो लुई फिशर (गांधीजींचे चरित्रकार) वापरत असत, असं तिथं लिहिलं होतं. तिथं एक आधुनिक पद्धतीचा कमोडही होता. बापूजी तो अर्थात स्वत: स्वच्छ करत. तिथला वेळ वाया न घालवता, ते कागदपत्रं बघत. त्यासाठीची एक छोटी रॅक तिथं शेजारीच ठेवण्यात आली होती. या झोपडीची जागा कमी पडू लागली आणि तिथं इतर पुरुषांचा वावर वाढू लागला, तसं जमनालाल बजाज यांनी कस्तुरबांसाठी दुसरी झोपडी उभारण्याची इच्छा व्यक्त केली. बापूंनी नाइलाजाने ती मान्य केली. त्यानंतर स्वत: बापूजींसाठी आणखी एक कुटी उभारण्यात आली. तीत त्यांच्या दैनंदिन वापरातल्या सर्व वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. बापूजींशी संपर्क साधणं शक्य व्हावं म्हणून तत्कालीन गव्हर्नर लिनलिथगो यानं तिथं एक हॉटलाइन बसवली होती. तो फोनबूथही बापूंच्या कार्यालयात होता. याशिवाय त्या परिसरात नित्य साप आढळत. ते बंदिस्त करून ठेवण्याची मोठी पेटी आणि साप पकडण्याचा मोठा लाकडी चिमटाही तिथं होता. (आत फोटोग्राफीला परवानगी नसल्यानं या वस्तूंचे फोटो काढता आले नाहीत.) शेवटच्या काही दिवसांत आजारी असताना बापूजी (आयसोलेशनमध्ये) दुसऱ्याच एका कुटीत राहिले होते. तिच्याबाहेर ‘पागल दौड’ या शीर्षकाखाली बापूजींचे विचार लिहिलेली पाटी लावली आहे. माणूस भौतिक सुखांमागे पळतो आहे आणि खऱ्या सुखांकडे त्याचे दुर्लक्ष होते आहे, अशा आशयाचे ते विचार अगदी आजही सयुक्तिक वाटतात. 

त्या सर्व कुटींच्या आत फोटो काढायला परवानगी नसली, तरी बाहेर फोटो काढता येत होते. आम्ही तिथं फोटो काढले. व्हिडिओही केले. जरा वेळ तिथल्या डेरेदार झाडांच्या सावलीत बसलो. ही झाडं बापूजी हयात असतानाही इथं होती, या विचारानं अंगावर काटा येत होता. त्या वातावरणातल्या लहरी फार पवित्र, शांतवणाऱ्या, स्नेहशील होत्या. ‘महात्मा गांधी नामक एक महामानव या भूतलावर होऊन गेला, यावर पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत,’ असं अल्बर्ट आइन्स्टाइन गांधीजींच्या मृत्यूनंतर म्हणाले होते. सेवाग्रामच्या त्या परिसरात असताना मात्र वाटलं, त्यांचा हा सर्व इतिहास असा जतन करून ठेवला आहे, की त्या महात्म्याची आठवण तुम्हाला हरघडी व्हावी. सेवाग्राममध्ये अनेक सहली येत होत्या. मुलं चपला-बूट बाहेर काढून बापूंच्या त्या पवित्र वास्तूचं दर्शन घेत होती. अनेक कुटुंबंही मुला-बाळांना घेऊन आलेली दिसली. सर्व जण कुतूहलानं बापूंच्या सगळ्या गोष्टी बघत होते. 
आम्हाला आता तिथून निघायला हवं होतं. तास-दोन तास कसे गेले, ते कळलंही नाही. मुक्ता व यशो आम्हाला तिथंही भेटल्या. त्यांना आता पुण्याला निघायचं होतं. मग त्यांच्यासोबत चहा घेतला. त्याआधी आठवण म्हणून तिथून काही वस्तू खरेदी केल्या. मुक्ता व यशोला बाय करून आम्ही आता पवनार आश्रमाकडे निघालो.
हा आश्रमही तिथून सात-आठ किलोमीटरवर आहे. जवळच्या रस्त्यानं ‘ऑटो’वाल्यानं आम्हाला तिथं नेलं. वर्धा-नागपूर हायवे क्रॉस करून आम्ही धाम नदीच्या तीरावर असलेल्या पवनार आश्रमात पोचलो. आचार्य विनोबा भावे यांच्या दीर्घ वास्तव्यानं पुनीत झालेला हा आश्रम सेवाग्रामच्या तुलनेनं लहान होता. इथं एकच कॅम्पस होता. तिथं आम्हाला गौतम बजाज भेटले. यांच्याविषयी आम्हाला यशोनं सांगितलं होतं. ते आता जवळपास साठ वर्षं याच आश्रमात राहतात. प्रसिद्ध चित्रकार सुजाता बजाज (ज्या आता पॅरिसमध्ये असतात) त्यांची धाकटी बहीण. विनोबांच्या खूप आठवणी त्यांनी सांगितल्या. आम्ही तो आश्रम हिंडून बघितला. मला ‘गीताई’ची प्रत विकत घ्यायची होतीच. ती घेतली. ‘गीता प्रवचने’ हे पुस्तकही घेतलं. बजाज यांच्याशी आम्ही बोलत असताना पुण्यातल्याच आणखी दोन मुली तिथं आल्या. त्याही आमच्यासोबत गप्पा ऐकत थांबल्या. मग त्यांची ओळख झाली. पल्लवी पुरवंत असं त्यातल्या एकीचं नाव. आम्ही सेवाग्राममधून जो ‘ऑटो’ केला होता, तोच आता आम्हाला संमेलनस्थळी सोडणार होता. तो आमच्यासाठी तिथं थांबला होता. मग तिथून निघून अर्ध्या तासात संमेलनस्थळी आलो. भूक लागली होती. म्हणून बाहेरच्या फूड स्टॉलवर जरा चक्कर मारली. तिथं अंबाडी सरबत मिळालं. कोकम सरबतासारखंच लागत होतं. तेव्हा उन्हातून आल्यामुळं त्या सरबतानं जीव अगदी गार झाला. अनेक मंडळी भेटत होती. तिथं मुख्य मंडपात संजय आवटेची भेट झाली. आवटे, मी व मंदार आम्ही २५ वर्षांपूर्वी एकाच दिवशी ‘सकाळ’मध्ये जॉइन झालो होतो. तिघं एकत्र असे खूप दिवसांनी भेटलो. मजा आली. मुख्य मंडपात नागराज मंजुळे, किशोर कदम यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. त्यासाठी गर्दी व्हायला लागली होती. मग आम्हीही जागा पकडून बसलो. मुलाखत उशिराच सुरू झाली. आमचे मित्र बालाजी सुतार (आम्ही प्रेमानं त्यांना बासुदा म्हणतो...) सूत्रसंचालनाला होते. त्यात ऐन वेळी सयाजी शिंदेही व्यासपीठावर आले. मग बासुदांसह अरविंद जगताप आणि वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (यांनी मराठीतून आयएएस केले आहे) या तिघांनी नागराज, किशोर व सयाजी यांची मुलाखत एकत्रितपणे सुरू केली. या मुलाखतीसाठी काही पूर्वतयारी किंवा तिघांचे आधी काही बोलणे झाले असावे, असे अजिबात वाटत नव्हते. मुलाखत विस्कळित होत गेली. सयाजी शिंदेंचे वृक्षप्रेम प्रसिद्ध आहे. मात्र, ते दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर बोलेनातच. शेवटी नागराज व त्यांचा स्टेजवरच जरासा वाद झाला. आपलं भांडण होईल, असं नागराज त्यांना गमतीत म्हणाला. मग शेवटी ‘आईच्या आठवणी सांगा’ वगैरे विषयांवर मुलाखत आली म्हटल्यावर आम्ही तिथून उठलोच. मुलाखत कशी असावी, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे सकाळची डॉ. बंग यांची मुलाखत होती आणि मुलाखत कशी असू नये, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही संध्याकाळची मुलाखत होती. ‘पूर्वतयारी न करता होणारी एकमेव गोष्ट म्हणजे फजिती’ असं पु. ल. देशपांडे म्हणत असत, त्याचीच आठवण झाली.
संध्याकाळी दुसऱ्या मंडपात बासुदांच्या ‘गावकथा’चा प्रयोग होता. मला बासुदा लेखक म्हणून आवडतात. हा प्रयोग कित्येक दिवस बघायचा होता. पण नऊ वाजले तरी त्या छोट्या मंडपात अजून प्रयोगाची तयारी सुरूच होती. मी आत जाऊन बासुदांना भेटलो. त्यांच्या चेहऱ्यावर प्रयोगाचा तणाव स्पष्ट दिसत होता. मी तसं त्यांना म्हटलंही. ‘हा प्रयोग पुण्यात ‘सुदर्शन’ला सर्वाधिक रंगतो,’ असं बासुदांनी सांगितलं. प्रयोग सुरू व्हायला अजून अर्धा तास लागेल, म्हटल्यावर आम्ही जेवायला बाहेर पडलो. आवडते कवी सौमित्रही तिथंच भेटले. मग सेल्फी मस्टच! अर्ध्या तासात आम्ही जेवून आल्यावर मंदारला खरं तर त्या प्रयोगाला थांबायचा कंटाळा आला होता. जवळपास दहा वाजले होते. प्रयोग एकदाचा सुरू झाला. मात्र, थोडी सुरुवात बघितल्यावर आम्ही निघालो. (पुण्यात जेव्हा प्रयोग असेल तेव्हा आता नक्की बघणार...) रूमवर आल्यावर लगेच झोप लागली. दिवसभर दमणूक झाली होती; पण सेवाग्राममधली ती ‘पागल दौड’ शीर्षकाची पाटी सतत डोळ्यांसमोर येत राहिली...


....

रविवार. वर्ध्यातला तिसरा दिवस. सहा फेब्रुवारी. लतादीदींचं प्रथम पुण्यस्मरण. मोबाइलमध्ये ‘रंगोली’ लावली. आज दीदींची गाणी असणार, ही अपेक्षा होतीच. ‘रंगोली’नंही अपेक्षाभंग न करता चांगली गाणी लावली होती. काहीही न करता, डोळे भरून यायला लागले. शेवटी चष्मा ओला व्हायला लागला. तेव्हा तो बाजूला ठेवूनच उरलेली गाणी बघितली. मग आवरून मी व अभिजित ‘आरंभ’मध्ये चहा घेऊन आलो. आज सकाळी फार घाई नव्हती, तरी नाश्त्यासाठी संमेलनस्थळीच जावं लागणार होतं. मग तिघंही ‘ऑटो’ करून निघालो. नेहमीचाच ‘ऑटोवाला’ होता, त्यामुळं नुसतं आत जाऊन बसायचं. तो बरोबर संमेलनाच्या प्रवेशद्वारावर आणून सोडायचा. सकाळी मला ‘सकाळ’मधली एके काळची सहकारी आर्टिस्ट गौरी सावळे-संत हिचा फोन आला होता. तिच्या मुलाचा बालसाहित्य मंचावरील एका कार्यक्रमात सहभाग होता. त्यामुळे ती त्याला घेऊन आली होती.
आम्ही संमेलनस्थळी पोचल्यावर आधी नेहमीप्रमाणे नाश्ता केला. आज इथला शेवटचा दिवस होता, त्यामुळं इथला तो प्रसिद्ध गोरसपाक (दुधात केलेली कणकेची, ड्रायफ्रूट्स असलेली हँडमेड बिस्किटं) घ्यायला आम्हाला मगन संग्रहालयात जायचं होतं. मग चालतच तिकडं निघालो. तिथं गेलो तर रविवारमुळं ते संग्रहालय व गोरस भांडार बंद असल्याचं कळलं. आम्ही कपाळाला हात लावला. कुठल्याही स्थानिक माणसानं आम्हाला ही सर्वांत महत्त्वाची माहिती दिलीच नव्हती. अगदी आम्ही रस्त्यानं मगन संग्रहालयाचा पत्ता विचारत होतो, तेव्हाही लोक पत्ता सांगत होते, पण ते आज बंद असल्याचं कुणीही सांगितलं नाही. (हे मगन असं नाव का आहे, याचा खुलासा संध्याकाळी वर्धा स्टेशनवर झाला. तिथं वर्ध्याची माहिती देणारा मोठा फलक आहे. त्यात महात्मा गांधींचे चुलत भाऊ व सामाजिक कार्यकर्ते मगनलाल गांधी यांच्या नावाने हे संग्रहालय असल्याची माहिती लिहिली आहे.) संग्रहालय बंद असलं, तरी शेजारचं ‘रसोई’ हे रेस्टॉरंट सुरू होतं. इथं नक्की जेवा, असं आम्हाला अनेकांनी सांगितलं होतं. अर्थात आम्हाला संमेलनस्थळीच जेवायचं असल्याचं आम्ही तिथं जेवलो नाही, तो भाग वेगळा! मग समोर एक वर्धिनी नावाचं बचत गटांची उत्पादने विकणारं एक दालन होतं. तिथं गेलो. दारातच सासणे सर भेटले. त्यांच्या ‘सौ.’ तिथं आल्या होत्या. त्यांची मात्र भेट होऊ शकली नाही. आम्ही ‘वर्धिनी’त काही जुजबी खरेदी केली. मात्र, गोरसपाक न घेताच जावं लागणार की काय, अशी परिस्थिती उद्भवली होती. मग तिथं काम करणाऱ्या बायकांनी आम्हाला ‘इंगोले चौकात जा, तिथं अनेक दुकानांत गोरसपाक मिळेल,’ असंं सांगितलं. शेवटी एक ‘ऑटो’वाला गाठला व त्याला इंगोले चौकात जायचंय, असं सांगितलं. आम्हाला गोरसपाक हवाय म्हटल्यावर तो म्हणाला, की तुम्ही मुख्य भांडारात गेला होतात का? आता आम्हाला मुळात असं काही मुख्य आणि उप भांडार आहे हेच माहिती नव्हतं. हा ऑटोवाला पूर्वी गोरस भांडारातच काम करायचा. त्यामुळं त्याला सगळं ठाऊक होतं. त्यानं रिक्षा वळवली आणि आतल्या बाजूच्या एका रस्त्यानं त्या मुख्य भांडारापाशी नेली. तेही बंदच होतं. मात्र, तिथं समोरच त्यांचं एक आउटलेट सुरू होतं. मग तो आम्हाला तिथं घेऊन गेला. तिथं अखेर तो गोरसपाक मिळाला एकदाचा. काही मोजकीच पाकिटं शिल्लक होती. बाकी सगळा माल संपला होता. मग आम्ही एकेक पाकीट घेतलं. नंतर तिथलं दूधही प्यायचं होतं. पंधरा रुपयांना चांगला मोठा ग्लास भरून ते धारोष्ण, अमृतसम दूध समोर आलं. तिथलाच मिल्क ब्रेड घेऊन, दुधात बुडवून मग मी व अभिजितनं त्यावर चांगलाच ताव मारला. दूध प्यायल्यावर तर पोट भरल्याचीच भावना झाली. हे आउटलेट अगदी छोटंसं होतं. हे लोक हातानं हा सगळा माल तयार करतात. त्यामुळं खूप मोठ्या संख्येनं तो तयार होत नाही. तयार झालेला माल लगेच संपतो. त्यात सध्या संमेलनानिमित्त वर्ध्यात पाहुण्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळं तर तो संपणार होताच. एकूणच पुण्यातल्या प्रसिद्ध दुकानाची आठवण यावी, असंच या मंडळींचं वर्तन होतं. अर्थात क्वालिटी उत्तम होती, यात वाद नाही. मात्र, जास्त बिस्किटं तयार करावीत, संमेलनात त्याचा वेगळा स्टॉल ठेवावा, असं काही कुणाच्या मनात आलेलं दिसलं नाही. उलट संमेलनाच्या बाहेर असलेल्या स्टॉलमध्ये या मगन संग्रहालयाचाही एक स्टॉल होता. तिथं नंतर चौकशी केली तर, तिथल्या माणसानं जवळपास जीभ बाहेर काढून, कानाची पाळी पकडून, ‘आम्हाला तो (गोरसपाक) इथं विकायला अलाउड नाही,’ असं सांगितलं. ही विरक्ती भलतीच चमत्कारिक होती. असो.

आम्ही पुन्हा संमेलनस्थळी आलो आणि दारातच आम्हाला डॉ. बंग भेटले. आम्ही लगेच त्यांच्याकडे धाव घेतली. फोटो काढले. ते खरं तर गाडीत बसायला निघाले होते, पण आम्ही आमची ओळख दिल्यावर ते आमच्याशी गप्पा मारत बसले. मी पूर्वी ‘सर्च’मध्ये येऊन गेल्याचं त्यांना सांगितलं, त्यावर ‘आता पुन्हा या’ असं आमंत्रण त्यांनी तिथल्या तिथं दिलं. डॉ. राणी बंग सध्या ‘ब्रेन हॅमरेज’नं आजारी आहेत. मात्र, महिनाभरात त्या पूर्ण बऱ्या होतील, असंही डॉक्टरांनी सांगितलं. आदल्या दिवशीच्या मुलाखतीचा विषय अर्थातच निघाला. सुमित्रा भावे विनोबांवर सिनेमा करणार होत्या, तो विषयही मंदारनं काढला. अनेक विषयांवर गप्पा मारून मग डॉक्टर आमचा निरोप घेऊन तिथून गेले.
जरा वेळ मुख्य मंडपातला गांधीजी व विनोबांवरचा कार्यक्रम ऐकत, हवा खात बसलो. सत्राचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे बोलत होते. तो कार्यक्रम संपल्यानंतर गौरीला फोन केला. ती, तिचे यजमान व मुलगा शार्दूल बालसाहित्य मंचाच्या मंडपात होते. मग तिथं जाऊन त्यांची भेट घेतली. शार्दूलला शुभेच्छा दिल्या. नंतर दुपारचं जेवण घ्यायला भोजन कक्षाकडे गेलो. तिकडं जाताना ‘नागपूर मटा’ची सगळी टीम व अपराजित सर भेटले. मग पुन्हा एकदा फोटोसेशन झालं. भोजन कक्षात जेवण झाल्यावर सकाळच्या परिसंवादातले वक्ते व माझे फेसबुक फ्रेंड प्रशांत धर्माधिकारी भेटले. त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या. ठाण्याच्या वृंदा टिळक व भागवत मॅडम (वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांच्या पत्नी) यांची ओळख झाली. जरा वेळानं निघालो. आता थेट हॉटेलवर जाऊन जरा पडावं व मग संध्याकाळची ट्रेन पकडायला बाहेर पडावं, यावर आमचं तिघांचंही एकमत झालं. मग संमेलनस्थळ सोडून आम्ही हॉटेलवर परतलो. आवराआवरी करण्यात जरा वेळ गेला. थोडा वेळ खरोखरच पडलो. साडेपाचला उठून पुन्हा सगळं आवरलं आणि हॉटेल सोडून बाहेर पडलो. चहा घ्यायचा होता, पण ते अमृततुल्य बंद होतं. मग रिक्षा करून स्टेशनवर गेलो. या वेळी त्या शहराचा आकार-उकार जरा लक्षात आला. स्टेशनच्या बाजूला जमनालाल बजाज यांचा पुतळा होता. पुढं तिथली मोठी मंडई लागली. त्या दिवशी तिथला बाजारही होता. भरपूर गर्दी होती. स्टेशनवर पोचल्यावर डावीकडं माघी पौर्णिमेचा भला मोठा चंद्र दिसला. त्याचे फोटो काढले. स्टेशनवर मिलिंद जोशी भेटले. तेही परत पुण्याला निघाले होते. आमच्यानंतर त्यांची ट्रेन होती. आमची ट्रेन पंधरा मिनिटं उशिरा आली. मग वर्ध्याचा निरोप घेऊन बरोबर साडेसातला आम्ही निघालो. येतानाचा प्रवास तसा नेहमीच कंटाळवाणा होतो. सुदैवानं रात्री झोप लागली. सकाळी नगरच्या पुढं ट्रेन आली तेव्हा जाग आली. दौंड कॉर्डलाइन स्टेशनला गाडी थांबली, तेव्हा खाली उतरून छान चहा घेतला. गाडी बरोबर नऊ वाजता वेळेत पुण्यात पोचली. तासाभरात घरी पोचलो. एकदम श्रम जाणवले.
वर्ध्याच्या आठवणींचा कोलाज मात्र हा थकवा घालवायला पुरेसा होता. ‘पागल दौड’ कमी करायची, हा निर्धार करण्यासाठीची शिकवण देणारा हा दौरा चांगलाच लक्षात राहील. इति लेखनसीमा!


---

(उत्तरार्ध)

---

6 comments:

 1. छानच आहे संपूर्ण वर्धा वृत्तांत...५/६ वर्षापूर्वी search आणि इतर काही ठिकाणी भेट दिलेल्या आठवणी ताज्या झाल्या

  ReplyDelete
 2. दोन्ही अतिशय उत्तम लेख ...पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ...सुंदर वर्णन ...सर्व काही डोळ्यासमोर उभ केलयत ...शिवाय तुमची लिहायची शैली नेहमीप्रमाणे खुसखुशीत..अगदी मी तिथे जावून आल्यासारखं वाटल ...खूप अभिनंदन 👏👌👍🙏,🌹

  ReplyDelete
  Replies
  1. मनापासून धन्यवाद वीणाजी...

   Delete
 3. आमचाही साहित्य संमेलनाचा फेरफटका झाला. छान लिहिलंयत!...

  ReplyDelete