30 May 2024

अशोक रानडे - कृतज्ञता

आमची ‘रानडे इन्स्टिट्यूट’
--------------------------------


शनिवारी (२५ मे) रोजी दुपारी दीडच्या सुमारास ‘सकाळ मनी’चे संपादक आणि माझे एके काळचे ज्येष्ठ सहकारी मुकुंद लेले यांचा व्हॉट्सअपवर मेसेज आला. ‘अशोक रानडे गेले’ असं त्यात लिहिलं होतं. मला हा धक्काच होता. याचं कारण अगदी एक-दोन महिन्यांपूर्वीच रानडेंची मुलगी अरुंधती आमच्या ऑफिसला आली होती, तेव्हाच रानडेंचा विषय निघाला होता. मी त्यांच्या तब्येतीची चौकशीही केली होती. मात्र, तेव्हा ते काही खूप आजारी वगैरे असे नव्हते. त्यांना दीर्घ काळ मधुमेह होता, ही गोष्ट खरी होती. मात्र, तरीही शनिवारी त्यांच्या जाण्याने अगदीच धक्का बसला. 


दुसऱ्या दिवशी अनेकांनी रानडेंविषयी फेसबुकवर भरभरून लिहिलं. त्यात माझे अनेक सहकारी होते. ते सगळं वाचत असताना माझं मन २६-२७ वर्षं मागं गेलं. 
मी एक सप्टेंबर १९९७ रोजी ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. त्यापूर्वी अल्प काळ मी ‘लोकसत्ता’त काम केलं होतं. मात्र, ‘सकाळ’मध्ये आल्यानंतर अनेक दिग्गजांची ओळख झाली. ज्यांची नावं आपण लहानपणापासून पेपरमध्ये वाचत आलोय, अशा मंडळींसोबत आता काम करायला मिळणार, हा आनंद काही वेगळाच होता. कुवळेकरसाहेब, पाध्येसाहेब, राजीव साबडे, अशोक रानडे, वरुणराज भिडे, प्रल्हाद सावंत, शशिकांत भागवत, विजय साळुंके, मल्हार अरणकल्ले अशी सर्व मंडळी आम्हाला सीनियर होती. यातील राजीव साबडे सरांकडे आमची बॅच सोपवण्यात आली. एकेक आठवडा एकेका विभागात आम्ही काम करू लागलो. तेव्हा डेस्कवर विजय साळुंके, अशोक रानडे, मुकुंद मोघे, यमाजी मालकर, लक्ष्मण रत्नपारखे, चंद्रशेखर पटवर्धन, अनिल पवार, नवनीत देशपांडे, उदय हर्डीकर, गोपाळ जोशी, मुकुंद लेले, वर्षा कुलकर्णी, स्वाती राजे, स्वाती महाळंक, नयना निर्गुण, मीना संभू आदी मंडळी कामाला असायची. यापैकी रानडेंचा दरारा आम्ही पहिल्याच आठवड्यात ऐकला आणि पाहिला. 
रानडेंना ‘सर’ वगैरे म्हटलेलं आवडायचं नाही. आताही मी त्यांचा उल्लेख ‘रानडे’ असाच करतोय. मात्र, यात अनादर नसून, त्यांनीच घालून दिलेली शिस्त आहे. ऑफिसमध्ये संपादक आणि वृत्तसंपादक हेच दोन साहेब, असं त्यांचं म्हणणं असे. तेव्हा ‘सकाळ’मध्ये ‘सर’ असं कुणी म्हणायचंही नाही. संपादकांना ‘साहेब’ असंच म्हणण्याची पद्धत होती. रानडेंचा अचूकतेचा आग्रह, शब्दांची योग्य निवड करण्याची हातोटी, अनावश्यक अलंकृत भाषा वापरण्याची नावड, शुद्धलेखन वा प्रमाणलेखनाची त्यांची शिस्त याविषयी बहुतेकांनी लिहिलंच आहे. रानडेंची ती ओळखच होती. अगदी साप्ताहिक मीटिंगमध्ये एखाद्या शब्दाविषयी काही वाद निर्माण झाला, तर संपादकही ‘रानडे सांगतील तसं करा’ असं सांगायचे. रानडेंचा शब्द अंतिम असायचा. रानडेंचा दरारा बघून ‘असं का?’ ‘तसंच का?’ हे उलट विचारायची आमची हिंमत नव्हती. ते सांगतील ते आम्ही गुपचूप ऐकत गेलो. अर्थात विचारलं असतं, तरी त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं असतील, याबद्दल सर्वांना खात्री असायची. ‘एव्हरेस्ट सर केलेल्या हृषीकेश चव्हाण यांनी...’ अशा पद्धतीची वाक्यरचना चूक आहे, हे मला पहिल्यांदा रानडेंकडून कळलं. त्यांचं म्हणणं, हृषीकेश चव्हाण हे पुरुष आहेत तर ‘एव्हरेस्ट सर केलेले हृषीकेश चव्हाण यांनी...’ असंच लिहायला हवं. तिथं स्त्री असेल तर उदा. ‘एव्हरेस्ट सर केलेल्या बचेंद्री पाल यांनी...’ ही वाक्यरचना योग्य ठरेल. तुम्हाला अगदी ‘एव्हरेस्ट सर केलेल्या’ असंच लिहायचं असेल तर पुढं ‘हृषीकेश चव्हाण यांनी...’ याऐवजी ‘हृषीकेश चव्हाणांनी’ असे लिहा, असं त्यांनी सांगितलं होतं. थोडक्यात, एखादे वाक्य लिहिताना किती बारकाईने विचार करायचा असतो, हे आम्हाला रानडेंकडून (खरं तर त्यांच्याच सांगण्यानुसार, ‘रानड्यांकडून’) समजलं. तीच गोष्ट निधनाच्या बातमीची. ‘अमुक तमुक यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अमुक ठिकाणी अंत्यसंस्कार झाले,’ अशा क्रमाने बातमी लिहिली, की रानडे चिडायचे. ते म्हणायचे, ‘अहो, याचा अर्थ त्यांच्या पत्नी, मुले व नातवंडांवर अंत्यसंस्कार झाले असा होतो. त्यामुळे ते वाक्य संपलं, की पुन्हा अमुक तमुक यांचं नाव लिहून मग त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, असं लिहायला पाहिजे.’ 
मग वाटायचं, आपण शाळेत नक्की मराठी शिकलो की नाही?
‘सकाळ’मध्ये अनेक वर्षं रात्री ८ ते २ अशी मुख्य उपसंपादकांची ड्युटी असे. रानडे या ड्युटीला येत तेव्हा रात्रपाळीचे आर्टिस्ट आपल्याला घरी जायला तीन वाजणार आहेत, याची खूणगाठ बांधूनच ऑफिसला येत. रानडे पान १ अत्यंत बारकाईने वाचत. एकाही ओळीत, एकाही शब्दात चूक झालेली त्यांना खपत नसे. तेव्हा वेगळ्या पुरवण्या रोज नसायच्या. एक ते १६ पानी सलग ब्लॅक अँड व्हाइट अंक असायचा. प्रिंटिंग सुरू झाल्यावर ताजा ताजा अंक तेथील कर्मचारी वर आणून देत. तो अक्षरश: गरमागरम, ताजा अंक सगळा उलगडून नीट वाचावा लागे. पानांचे नंबर, तारीख-वार, वाढावे (मजकुराचे पुढल्या पानांवर दिलेले कंटिन्युएशन) हे सगळं बरोबर आहे ना, हे तपासून मग त्या अंकावर मुख्य उपसंपादकाला सही करावी लागे. तो सही केलेला अंक मग तो कर्मचारी खाली घेऊन जात असे आणि मग मशिनचा स्पीड धाडधाड वाढून अंक वेगाने छापला जात असे. अशा अंकावर सही करून झाली, की रानडे मंडईत जायला निघत. आम्हीही त्यांच्याबरोबर जायचो. रानडे टिळक रोडला राहायचे. त्यांनी कधीही वाहन वापरलं नाही. मग काही सहकारी त्यांना डबलसीट घेऊन मंडईत येत. तिथं तिखटजाळ सँपल आणि पाव खायचा त्यांचा बेत असे. रात्रपाळी करून पहाटे तीन वाजता सँपल-पाव खाणारे रानडे हे एक अचाट गृहस्थ होते. त्यांच्या अचाटपणाची कथा इथंच संपत नाही. यानंतर आम्ही २०-२२ वर्षांचे ‘तरुण’ थकल्या-भागल्या अवस्थेत कधी रूमवर जाऊन पडतो, अशा बेताला आलेले असताना रानडे मात्र ‘चला, सिंहगडावर जाऊन येऊ’ असं म्हणायचे तेव्हा आमच्या डोळ्यांसमोर अंधारीच यायची. रानडे मात्र खरोखर तिथून चालत सिंहगड वगैरे फिरून येत, अनेकदा ते चालत कोकणात उतरत आणि किनारपट्टी वगैरे भटकून मग दोन-तीन दिवसांनी परत येत. त्यांच्याबरोबर चालायला जायचा योग मला कधी आला नाही. मात्र, ज्यांना आला त्यांच्यासाठी तो कायमचा लक्षात राहणारा अनुभव ठरला असेल यात वाद नाही. ऑफिसमधले रानडे वेगळे होते आणि ऑफिसबाहेरचे रानडे वेगळे होते. कधी तरी एखादाच मिश्कील, पण मार्मिक शेरा ते असा मारायचे, की त्यातूनही त्यांच्या बुद्धिमान स्वभावाची झलक दिसायची. पं. जितेंद्र अभिषेकी गेले, तेव्हा रानडेंनी अग्रलेख लिहिला होता. ‘स्वराभिषेक थांबला...’ असं त्याचं शीर्षक होतं, हे मला आजही आठवतं. साधं-सरळ, पण नेमकं असं शीर्षक. उगाच आलंकारिक, भरजरी शब्दांचा सोस नाही. हा अग्रलेख लिहून झाल्यावर त्यांनी तो मला नजरेखालून घालायला सांगितला होता, तेव्हा ‘परुळेकर पुरस्कार’ मिळाल्याएवढा आनंद मला झाला होता!
रानडे संगीतातील मोठे जाणकार होते. ते स्वत: उत्तम तबला वाजवत. स्वाभाविकच ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची बातमी व रसग्रहण (नंतर फक्त रसग्रहण) तेच करणार, ही काळ्या दगडावरची रेघ असायची. तेव्हा सवाई गंधर्व महोत्सव रात्र रात्र चाले. उशिरातील उशिरा झालेल्या गायन वा वादनाची बातमी अंकात घालविण्याचा तेव्हा आमचा अट्टहास असे. रानडे तिथंच पत्रकार कक्षात बसून बातमी लिहीत. तेव्हा कागदावर पेननं बातमी लिहावी लागायची. मग ऑफिसबॉय ती कॉपी न्यायला तिथं यायचे. ती बातमी मग ऑफिसला जाऊन, ऑपरेट होऊन, प्रूफरीडिंग होऊन पानात लागायची आणि तो ताजा अंक पहाटे चार वाजता ‘सवाई मंडपा’त यायचा. अगदी तीन-चार तासांपूर्वी झालेल्या मैफलीची साद्यंत बातमी रसिकांना ती मैफल अजूनही सुरूच असताना वाचायला मिळायची. रानडेंचा कान अगदी तयार होता. अवास्तव, फालतू कौतुक त्यांना आवडत नसे. ‘पंडित’ ही उपाधी कुणामागे लावावी, याविषयी त्यांची ठाम मतं होती. त्यामुळं कुणाच्याही मागे पंडित लिहिताना आजही माझा हात थरथरतो आणि रानडेंची आठवण येते. 
नंतरच्या टप्प्यात रानडेंकडं सातारा आवृत्तीची जबाबदारी आली. ती त्यांनी एवढ्या तळमळीनं निभावली, की खरोखर कमाल वाटते. श्रीकांत कात्रे, चिंचकर, साळुंके, सोळसकर, बापू शिंदे आदी आमचे सर्व सीनियर-ज्युनिअर सहकारी रानडेंच्या करड्या शिस्तीत तावून-सुलाखून तयार झाले. तेव्हा या सर्वांना आम्ही चिडवायचो. ‘रानडेंचा सासुरवास सोसा’ म्हणायचो. मात्र, त्यांची कामातली कमिटमेंटही आम्ही पाहत होतो. जे काम वरिष्ठांनी सोपवलं आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने, सचोटीने करायचं हा एक मोठाच धडा त्यांनी आपल्या वागणुकीतून घालून दिला होता. रानडेंच्या शिस्तीला जुने सहकारीही वचकून असत, तर नव्या सहकाऱ्यांचा प्रश्नच नसायचा. एकेका वाक्यासाठी त्यांनी अर्धा अर्धा तास एखाद्या नव्या मुलाला पिळून काढलेलं आहे. अर्थात ती चूक पुन्हा त्या मुलाकडून आयुष्यात कधीही होत नसे, हे सांगायला नको. भाषांतर करताना एखाद्या शब्दाचा अर्थ विचारला, तर रानडे स्वत: सांगायचे नाहीत. डिक्शनरी बघायला सांगायचे. एखादा संदर्भ विचारला, तर थेट सांगायचे नाहीत. ‘ग्रंथालयात जाऊन शोधा,’ असं म्हणायचे. तेव्हा त्यांचा राग यायचा; पण आज या शिकवणुकीचं मोल कळतं आणि नकळत डोळे पाणावतात. वास्तविक, इतर चार सहकाऱ्यांसारखे तेही ‘आपण बरं की आपलं काम बरं’ अशा पद्धतीने काम करू शकले असते. मात्र, त्यांनी पुढची पिढी घडवली. अक्षरश: मातीच्या गोळ्याला आकार द्यावा, तशी घडवली. आज मी (नेहा लिमयेसोबत) ‘लिहू या बिनचूक मराठी’सारखं पुस्तक लिहायचं धाडस केलं, त्यामागे रानडेंनी आमच्यावर घेतलेल्या त्या निरपेक्ष कष्टांचा वाटा मोठा आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्यांना ते नेऊन द्यावं, अशी माझी फार इच्छा होती. मात्र, एकीकडं धीरही होत नव्हता. या पुस्तकात त्यांनी काही चुका काढल्या तर, अशी भीती वाटायची. अर्थात पुस्तकाच्या निमित्ताने त्यांना भेटायचं आणि आशीर्वाद घ्यायचे, हे नक्की ठरलं होतं. मात्र, ते आता राहूनच गेलं.
मग वाटलं, रानडे शरीरानं फक्त गेले. आपण जोवर मराठी शब्द वापरत राहू तोवर ते आता आपल्या मेंदूत, अंतर्मनात, खोल कुठे तरी असणारच आहेत.
रानडे, तुमच्याविषयी ही कृतज्ञ शब्दांजली! काही चुकलं असल्यास माफ करा...

--------

(शीर्षकाविषयी - पुण्यात विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग फर्ग्युसन रोडवर ज्या वास्तूत आहे, ती ‘रानडे इन्स्टिट्यूट’ म्हणून ओळखली जाते. पुण्यातले बहुतेक पत्रकार तिथं शिकलेले असल्यानं सर्वच जण ‘रानडे इन्स्टिट्यूट’चे विद्यार्थी आहेत. आम्ही नव्वदच्या दशकात ‘सकाळ’मध्ये काम करणारे काही सहकारी मात्र अधिक भाग्यवान; कारण आम्हाला अशोक श्री. रानडे यांच्याकडं शिकायला मिळालं. रानडे स्वत: एक इन्स्टिट्यूटच होते. त्यामुळं दोन्ही अर्थ सांगणारं हे शीर्षक...)

-----

2 comments:

  1. श्रीपाद,
    रानडे यांच्या आठवणी च्या निमित्ताने तो सर्व काळ समोर उभा राहिला. या आठवणी वाचतांना त्यात रमून गेलो. रानडे यांची भेट नन्तर क्वचितच झाली, पण ते कायम आठवणीत रहातील. त्यांच्या सोबत सर्वाधिक काळ रात्रपाळी केलेली असल्याने मला तर ते पसंग जसेच्या तसे आठवतात. सध्या जर्मनीत कन्येकडे आलो आहे, पण तुमच्या लेखनाने थेट पुण्यात आणि त्या काळात रमण्याचा आनन्द दिला. रानडे मास्तरांना श्रद्धांजली.

    ReplyDelete
    Replies
    1. होय सर... त्या आठवणी विसरणं शक्यच नाही. मनापासून धन्यवाद...

      Delete