20 Mar 2025

दोन गाणी - दोन आठवणी

१. कोई ये कैसे बताएँ...
---------------------------


‘अर्थ’ या महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपटातील ‘कोई ये कैसें बताएँ के वो तनहा क्यूँ है?’ हे जगजितनं गायलेलं (व त्याचंच संगीत असलेलं) कैफी आझमींचं गाणं म्हणजे एका चिरंतन वेदनेचं, खोल खोल घाव घालणारं, काळजात रुतत जाणारं विलक्षण गाणं आहे. मी हे गाणं कित्येक वर्षांपासून ऐकत आलो असलो, तरी हे गाणं खऱ्या अर्थानं समजायला वयाची निदान चाळिशी उलटावी लागते. त्यामुळं मलाही हे गाणं आत्ता आत्ताच कळू लागलं आहे, असं म्हणता येईल. जेवढं ते ‘कळत’ जातं, तेवढं ते अधिकाधिक रुतत जातं.
हे गाणं आपल्या आयुष्यात अपरिहार्यपणे येणाऱ्या, नाजूक नात्यातल्या कित्येक हळव्या प्रश्नांना पुकारत जातं. जगजितचा आवाज मखमली तर आहेच; पण या गाण्यात त्याच्या आवाजातला तो ‘दर्द’ इतका पुरेपूर उतरला आहे, की त्या धारदार सुरांच्या सुरीनं तो आपला कलेजा कापत चाललाय, असा भास होतो.
‘वो जो अपना था वही किसी और का क्यूं है...’ या प्रश्नातली वेदना, तो घाव आयुष्यात ज्यांनी एकदा तरी सोसलाय त्यांनाच कळावी. ‘यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यूं है?’ असा आर्त सवाल इथं केला जातो, पण याला काही उत्तर नाही, हेही त्याच स्वरांत अधोरेखित होतं, हे जगजितच्या गायकीचं वैशिष्ट्य. ‘तुम मसर्रत का कहो या इसे ग़म का रिश्ता, कहते है प्यार का रिश्ता है जनम का रिश्ता, है जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यूँ है?’ असं शेवटी कवी विचारतो, तेव्हा असल्या जखमा उघड्या पडून, डोळ्यांतील अश्रूंद्वारे घळघळा वाहू लागतात.कैफींच्या शब्दांचं हे मोठेपण, जगजित आपल्या आवाजातून आणि विलक्षण परिमाणकारक संगीतातून आणखी मोठं करत नेतो.विशेषत: जगजित जेव्हा शेवटचे ‘क्यूँ है?’ हे दोन शब्द उच्चारताना ऐकावं. ती हताशा, असहायता, दु:ख, पीडा हे सगळं सगळं त्या अत्यंत कमाल उच्चारांत मिळून येतं.
महेश भट नावाचा मास्टर क्राफ्ट्समन जेव्हा उत्तम, ‘अर्थ’पूर्ण सिनेमे तयार करायचा, त्या काळात त्यानं हे गाणं आपल्या सिनेमात वापरलं. त्याच्या दिग्दर्शकीय नजरेचं कौशल्यही यात दिसतं. राजकिरण हा एक दुर्दैवी अभिनेता. या गाण्यात मात्र या उमद्या नटानं पडद्यावर या गाण्याचं सोनं केलं आहे. गाण्यातली आणि राजकिरणच्या हातातली गिटारही या वेदनेला आणखी गहिरं करते. यातही राजकिरण काही ठिकाणी जे कसंनुसं हसतो ना, ते हसणं खरोखर काळीज चिरत जातं. शबाना आझमी हातात मद्याचा प्याला येण्याच्या आधी आणि नंतरही या वेदनेचं मूर्तिमंत रूप होऊन समोर वावरते. या घावाला कारणीभूत ठरलेला कुलभूषण खरबंदा आणि त्याच्या खांद्याचा आसरा घेणारी स्मिता पाटील यांच्या अस्तित्वाची टोचणी या वेदनेला जणू आणखी जखमी करते!
गायक, संगीतकार, अभिनेते आणि दिग्दर्शक एकत्र येऊन काय चमत्कार करू शकतात, याचं चालतंबोलतं उदाहरण म्हणजे हे गाणं. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असे घाव - मग ते प्रेमभंगाचे असोत वा विश्वासघाताचे - सोसले असतील तर मग एखाद्या ‘शाम-ए-ग़म’ला हे गाणं ऐकत ऐकत स्वत:च स्वत:च्या वेदनांवर फुंकर घालण्याचं काम तेवढं आपल्या हातात उरतं. वयाची एक विशिष्ट प्रगल्भता आल्यावरच अशा गाण्यांचे अर्थ खोलवर उतरतात, हे मात्र खरं.
कितीही वर्णन केलं तरी या गाण्याविषयी नक्की काय वाटतं, हे शब्दांत उतरवता आलंय, असं मला वाटत नाही. त्यामुळं हे गाणं ऐकावं, पुन:पुन्हा ऐकावं आणि काळीजकातर, दुखऱ्या मनाची समजूत काढत राहावं... आणखी काय लिहिणे!


(९-१-२०२५)

हे गाणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

----

२. मेहंदी है रचनेवाली...
----------------------------


अलका याज्ञिकचा आवाज अतिमधुर आहे. प्रचंड गोडवा आहे तिच्या आवाजात... आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ९० चं दशक अलकानं गाजवलं. आमच्या तारुण्याचं गाणं म्हणजे अलका-साधना सरगम-कुमार सानू-उदित नारायण आणि सोनू निगम या पंचमस्वरांनी सजवलं. अलकाचं सर्वश्रेष्ठ सोलो गाणं म्हणून अनेक जण ‘जख्म’मधल्या ‘गली में आज चांद निकला....’चा उल्लेख करतील. ते गाणं आहेच तसं! मात्र, आज मला इथं वेगळ्याच गाण्याचा उल्लेख करायचाय. हे गाणं आहे ‘झुबेदा’मधलं ‘मेहंदी है रचनेवाली...’ संगीतकार अर्थातच ‘९०’चा निर्विवाद सम्राट - मोझार्ट ऑफ मद्रास - ए. आर. रेहमान!
रेहमानचं संगीत आणि अलकाचा मधाळ, पण इथं प्रसंगानुरूप लागलेला किंचित दुखरा आवाज यांचं जबरदस्त मिश्रण मला वारंवार या गाण्याच्या प्रेमात पाडतं. हे गाणं नुसतं ऐकलंत तरी ठीक आहे. मात्र, ते बघितलंत तर त्या गाण्याची व अलकाच्या आवाजाची खरी कमाल कळू शकेल. इथं अर्थातच हे मुख्य श्रेय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं. जोडीला करिश्मा कपूरचंही! करिश्मा ही फार अंडररेटेड अभिनेत्री आहे, असं माझं मत आहे. मला ती प्रचंड आवडते. तिचा झुबेदा आणि ‘दिल तो पागल है’ हे दोन सिनेमे - ती ‘द राज कपूर’ची नात आहे - हे सांगायला पुरेसे आहेत. या चित्रपटात सिच्युएशन अशी आहे, की झुबेदाचं लग्न तिच्या मनाविरुद्ध लावलं जातंय. मुस्लिम कुटुंब आहे. पारंपरिक आहे. त्या पद्धतीनं मेहंदीचा कार्यक्रम सुरू आहे. झुबेदा, म्हणजेच करिश्मा आतून प्रचंड धुमसते आहे. आई फरिदा जलाल व सुरेखा सिकरी शेजारी आहेत. त्या तिला नटवत आहेत, सजवत आहेत. या पार्श्वभूमीवर हे गाणं सुरू होतं. सुरुवातीला ते फरिदा जलालच्या तोंडी आहे व नंतर बॅकग्राउंडला जातं. करिश्मा प्रचंड चिडलेली आहे. ती अचानक उठते आणि आतल्या खोलीत जाऊन पिस्तूल शोधू लागते. ती पिस्तूल डोक्याला लावणार तोच फरिदा तिथं येते आणि ते पिस्तूल दूर फेकून देते. अक्षरश: हतबल झालेली करिश्मा प्रचंड रडत-स्फुंदत स्वत:ला आईच्या अंगावर झोकून देते. तोवर तिकडे वडील - अमरीश पुरी - कारमधून उतरतात. त्यांच्या उपस्थितीत, करड्या नजरेत पुढचा सगळा कार्यक्रम पार पडतो.
करिश्मा निर्जीव पुतळा होऊन, निर्विकार होऊन सगळा सोहळा नाइलाजास्तव पार पाडते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अलकाचं गाणं आपल्याला ऐकू येत राहतं. त्या आवाजात काय नाही? म्हटलं तर लग्नसमारंभात गायलं जाणारं पारंपरिक गाणं. मात्र, अलकाच्या आवाजात त्या प्रसंगाचे सर्व भाव पुरेपूर उतरतात. स्त्रीचं जगणं, तिची हतबलता, तिचं सोसणं, सर्व काही विसरून जणू काही घडलंच नाही अशा रीतीनं सर्व प्रसंग निभावून नेणं... पुरुषांना अनेकदा कळतही नाही आत काय काय वादळं येऊन गेलीयत ते! इथं तिचा होणारा नवरा शांतपणे तिच्या शेजारी बसला आहे आणि आपण प्रेक्षक म्हणून नुकतंच ते वादळ अनुभवलं आहे... अलकाचा आवाज हे सगळं त्या गाण्यात उतरवतो आणि आपल्यापर्यंत पोचवतो. 


हे गाणं स्त्रीच्या वेदनेचं आहे, तसंच ते तिच्या आंतरिक सामर्थ्याचंही आहे. अलकाचा आवाज ‘९०’च्या उडत्या चालींतल्या, तेव्हाच्या खासगी वाहतूक करणाऱ्या जीपांमध्ये वाजणाऱ्या कॅसेटींमधला असला, तरी अशा काही गाण्यांत तो तांब्या-पितळेत उठून दिसणाऱ्या एखाद्या हिऱ्यासारखा लखलखीत झळाळतो.
अलका याज्ञिक, खूप आनंद दिलात! 

(२० मार्च २०२३)

ये गाणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा....

No comments:

Post a Comment