23 Mar 2025

‘अडोलसन्स’विषयी...

गोठवून टाकणारा अनुभव
-------------------------------


‘नेटफ्लिस’वर आलेल्या ‘अडोलसन्स’ या मालिकेची सध्या खूप चर्चा आहे. चारच भागांची ही ब्रिटिश मालिका पाहताना आपलं काळीज हादरून जातं. यातल्या प्रसंगाला तोंड देणाऱ्या आपल्यासारख्याच साध्यासुध्या माणसांची घुसमट पाहून आपणही सुन्न होऊन जातो. संवेदनशील मन शिल्लक असेल तर पाठीतून भयंकर थंड असं काही तरी कापत जात असल्याचा गोठवून टाकणारा अनुभवही येऊ शकतो. स्टीफन ग्रॅहम व जॅक थॉर्न कृत आणि फिलिप बरान्तिनी दिग्दर्शित ही मालिका, वयात आलेल्या वा येऊ घातलेल्या प्रत्येक मुलाच्या पालकांनी आवर्जून पाहावी अशीच आहे.
काय आहे या मालिकेत? एका तेरा वर्षांच्या मुलाला त्याच्याच वयाच्या एका मैत्रिणीचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेपासून ही मालिका सुरू होते. यात प्रत्यक्ष दृश्यात्मक हिंसा नाही किंवा खुनाचं बटबटीत, अंगावर येणारं चित्रण नाही. मात्र, त्या घडून गेलेल्या घटनेचं गांभीर्य, त्यातलं अनपेक्षित क्रौर्य, त्यातून निर्माण होणारी बेचैनी, उद्विग्नता एक क्षणही आपली पाठ सोडत नाही; जसं यातला कॅमेरा एक क्षणही पात्रांवरून आपली नजर ढळू देत नाही तसंच! हो. सिंगल शॉट या तंत्राने ही संपूर्ण मालिका चित्रित करण्यात आली आहे, हे तिचं आणखी एक वैशिष्ट्य. थोडक्यात, दृश्य कुठेही ‘कट’ होत नाही. एकदा मालिकेचा भाग सुरू झाला, की तो थेट संपेपर्यंत कॅमेरा एकसलग दृश्य चित्रित करत राहतो. हल्ली ड्रोन किंवा तत्सम अत्याधुनिक पद्धतींनी अशी दृश्यं चित्रित करणं तंत्रदृष्ट्या सोपं झालं असेलही; इथं मात्र दिग्दर्शकानं हा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचं दिसतं. त्यामुळं जवळपास एक तास लांबीचे हे चारही भाग बघताना आपण जणू त्या पात्रांसोबत वावरतो. त्यांच्याच ‘आय-लेव्हल’ने सगळ्या गोष्टी बघतो. एका अर्थानं यातल्या प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सर्व घटिताकडं ‘पाहता’ येतं. प्रेक्षकाचा स्वत:चा असा एक दृष्टिकोन तयार होण्याच्या आधीच, दिग्दर्शक त्याला हवा असलेला एक आयता ‘दृष्टि-कोन’ आपल्याला इथं या तंत्राद्वारे प्रदान करतो आणि त्यामुळं आपण त्या कथानकात अक्षरश: खेचले जातो. 
जेमी मिलर (ओवेन कूपर) या तेरा वर्षांच्या मुलासह त्याच्या आई-वडिलांंचं व मोठ्या बहिणीचं भावविश्व या एका घटनेनं क्षणात उद्ध्वस्त होतं. ‘आपला मुलगा असं काही करूच शकत नाही,’ इथपासून ‘आपण कुठं कमी पडलो, म्हणून आपला मुलगा असं वागला?’ इथपर्यंतचा पालकांच्या भावजीवनाचा प्रवास यात अतिशय संयतपणे चितारण्यात आला आहे. हा प्रवास अर्थात करुण आहे. मात्र, त्यात भावनांचे बेढब कढ नाहीत किंवा आक्रस्ताळा संताप वा मनस्ताप नाही. अत्यंत नाजूक अशा या भावना मालिकाकर्ते तितक्याच नाजूकपणे आपल्यासमोर उलगडत नेतात. 
या घटनेत गुंतलेले पोलिस दल, तपास अधिकारी, वकील, मानसतज्ज्ञ, शेजारीपाजारी, शाळेतील शिक्षक, इतर विद्यार्थी या सर्वांचं ‘जसं आहे तसं’ दर्शन या मालिकेत घडत जातं. या घटनेचा प्रत्येकावरचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात जाणवत राहतो. समाज म्हणून आपण कुठं उभे आहोत, याचंही आत्मपरीक्षण करायला लावणारं दर्शन यात अनेकदा सूक्ष्मपणे दिसत राहतं.

या मालिकेतला तिसरा भाग विशेषत्वाने खास झाला आहे. यात एक ब्रायनी अरिस्टन (एरिन डोहर्टी) ही मानसशास्त्रज्ञ जेमीशी चर्चा करते एवढंच या भागाचं स्वरूप आहे. लहान मुलगा अडोलसन्ट होताना, म्हणजेच पौगंडावस्थेत येताना स्वाभाविकच त्याच्यात खूप शारीरिक, मानसिक बदल होत असतात. हे बदल प्रत्येक मुलापरत्वे बदलत असतात. या बदलांना मुलं कशी सामोरी जातात, हा बदल स्वीकारता न आल्यास त्यांच्यातील आदिम भावना कसं विकृत वळण घेऊ शकतात, हे सारं या चर्चेतून आपल्यासमोर येतं. ओवेन कूपर या मुलानं जेमीची भूमिका फारच समजून केली आहे. सिंगल शॉटमध्ये चित्रित होणाऱ्या या मालिकेत जेमीच्या साऱ्या भावभावना, त्या वयानुरूप येणाऱ्या त्याच्या प्रतिक्रिया, त्याचं चिडणं-रडणं-ओरडणं हे सगळं ओवेननं अतिशय प्रत्ययकारी उभं केलं आहे. 
या मालिकेचा खरा नायक आहे तो एडी मिलर, अर्थात जेमीच्या वडिलांची भूमिका करणारा, या मालिकेचा कर्ता स्टीफन ग्रॅहम. स्टीफन ही पित्याची भूमिका अक्षरश: जगला आहे. आपल्या अवघ्या तेरा वर्षांच्या मुलाला खुनाच्या आरोपाखाली पोलिस अटक करून नेत आहेत या धक्क्यापासून ते शेवटी त्याच्यासाठी जे जे शक्य होईल, ते ते सगळं करणारा पिता त्यानं फार समर्थपणे साकारला आहे. हा पिता सर्वसामान्य माणूस आहे. टॉयलेट दुरुस्ती आदी प्लंबिंगची कामं करणारा एका साधा कामगार आहे. मात्र, त्याचं आपल्या पत्नीवर व दोन्ही मुलांवर मनापासून प्रेम आहे. अगदी लहानपणापासून त्यानं दोघांना, विशेषत: धाकट्या मुलाला - जेमीला - अतिशय लाडाकोडात वाढवलं आहे. दर एपिसोडच्या सुरुवातीला या कुटुंबाचे आधीचे फोटो येतात. त्यात जेमी लहान असतो. हे फोटो आणि लगेच आताच्या काळात सुरू होणारा माालिकेचा भाग आणि तोही सिंगल शॉटमधून अंगावर येणारा, यामुळं योग्य तो परिणाम साधला गेला आहे.
ब्रिटनमध्ये गेल्या काही काळात तरुण मुलांकडून चाकूहल्ल्यांचे वाढते प्रमाण पाहून अस्वस्थ झालेल्या स्टीफन ग्रॅहमनं या मालिकेचा घाट घातला. मालिकेत मुलं आणि इन्स्टाग्राम, फेसबुक यांवरील पोस्ट, त्यावरचं चॅटिंग यांचे उल्लेख येतात. हे पाहता या घटना किंवा हे वातावरण केवळ ब्रिटनपुरतं मर्यादित नाही, तर ते आपल्याही आजूबाजूला आहे, हे सहज लक्षात येतं. मोबाइल वापरू दिला नाही किंवा तत्सम कारणांवरून आपल्याकडेही लहान मुलांच्या आत्महत्या किंवा थेट आईचा खून अशा घटना घडलेल्या आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळंच ही मालिका आपल्यालाही अस्वस्थ करते. विशेषत: ज्यांना या वयातील मुलगे वा मुली आहेत, त्यांची तर झोप उडल्याशिवाय राहणार नाही. ‘तुमची मुलं काय करतात?’ हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी आरडाओरडा किंवा धाकधपटशा हे उपाय नाहीत, तर मुलांचे मित्र होऊन त्यांच्याशी संवाद साधणं हाच यावरचा उपाय आहे, हे आपल्याकडील मानसशास्त्रज्ञही सांगत असतात. 
अनेकदा आपण आपल्या कारकिर्दीत, कामात, वैयक्तिक गोष्टींत एवढे बुडून जातो, की आपली मुलं काय करताहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना काय हवंय, ते नक्की कसा विचार करतात याकडं आपलं नकळत दुर्लक्ष होतं आणि मग त्याची मोठी शिक्षा नंतर भोगायला लागू शकते. ‘अडोलसन्स’सारखी मालिका पाहून आपण मुलांशी संवाद वाढवला आणि या मालिकेत जे घडलं ते रोखू शकलो, तर ते आपलं केवळ वैयक्तिकच नव्हे, तर समाज म्हणून मोठं यश असेल.

(ओटीटी - नेटफ्लिक्स)

--------------

(यातल्या दोन वेगळ्या शब्दांचे अर्थ - 

Nonce -

'nonce' can also refer to a slang term for alleged or convicted sex offenders, especially those involving children, chiefly used in Britain. 

Incel - 

a member of an online community of young men who consider themselves unable to attract women sexually, typically associated with views that are hostile towards women and men who are sexually active.)


-----

1 comment:

  1. भन्नाट झाली आहे ही सिरीज. उत्तम लिहिलं आहेस. शेवटच्या त्या दोन शब्दांचे अर्थही उपयुक्त. हिंदीत त्या Incel साठी नल्ला असा शब्द वापरलाय. नपुंसक, या अर्थाने असावा.

    ReplyDelete