9 Dec 2025

पाँडिचेरी डायरी - भाग ३

असीम शांततेकडे...
------------------------


ता. १ डिसेंबर २०२५. मु. पाँडिचेरी.

आजही सकाळपासून पाऊस होता. मग कालच्याप्रमाणेच आजही छत्र्या घेऊन चहा घेऊन आलो. आज आम्हाला ‘ऑरोव्हिल’ इथं जायचं होतं. हे पाँडिचेरीपासून साधारण १०-१२ किलोमीटरवर आणि तमिळनाडूत आहे. योगी अरविंदांच्या सहकारी, शिष्या मदर (मीरा अल्फासा) यांनी या ‘ऑरोव्हिल’ परिसराची स्थापना केली आहे. श्री अरविंदांच्या कर्मयोगातून ‘आतील शांततेकडे’ नेणाऱ्या या परिसराला भेट देण्याची अतीव उत्सुकता होती. इथल्या ‘मातृमंदिर’ या डोमविषयी आणि तिथल्या ध्यानधारणेविषयीही खूप ऐकलं होतं. तिथं प्रवेश करण्यासाठी आधी मेल पाठवून नंबर लावावा लागतो असंही समजलं होतं. त्यानुसार मी पुण्यात असतानाच मेलवरून बुकिंग करून, आजची वेळ घेतली होती. त्या मेलमध्ये सर्वांनी सकाळी ८.१५ वाजता मुख्य गेटवर जमावं, असं म्हटलं होतं. मात्र, आम्हाला आवरून बाहेर पडायला आणि कॅब मिळायला वेळ लागला. पाँडिचेरी ते तमिळनाडू आणि तिथून परत पाँडिचेरी असा दोन राज्यांचा प्रवास असल्यानं इकडचे कॅबवाले तिकडं येत नाहीत आणि तिकडच्या रिक्षा इकडं येत नाहीत, हे नंतर समजलं. आम्हाला भेटलेला कॅबवाला मी तिथंच तुमच्यासाठी थांबू का, असं का विचारत होता तेही नंतर कळलं. असो.
आम्ही साधारण सव्वानऊच्या सुमारास त्या गेटवर पोचलो. पार्किंगला कार आत आणली तर दीडशे रुपये वेगळे चार्जेस द्यावे लागले असते, म्हणून आम्ही आमची कॅब बाहेरच सोडली आणि आत चालत गेलो. आता पाऊस पूर्ण थांबला होता आणि त्या परिसरातलं वातावरण प्रसन्न होतं. आम्ही त्या पायवाटेवरून आत निघालो. एके ठिकाणी तळ्यासारखं बरंच पाणी साठलं होतं. त्यावर छोटा पूल होता. हे काही एका दिवसाच्या पावसानं साठलेलं पाणी वाटत नव्हतं. मातृमंदिर व तो परिसर याचं रूपांतर एका बेटात करण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण परिसरात गोलाकार चर खणून तलावनिर्मिती करण्यात येत आहे, असं नंतर समजलं. आम्ही आतील माहिती केंद्रावर पोचल्यावर एका  मिनीबसमध्ये काही लोक चढत असल्याचं दिसलं. तिथल्या माणसानं माझं बुकिंग आहे, म्हटल्यावर तातडीनं त्या बसकडं एक मॅडम उभ्या होत्या, त्यांच्याकडं पाठवलं. त्यांनी आणखी एका प्रौढ गोऱ्या (परदेशी) इसमाकडं पाठवलं. तो तिथला मुख्य व्यवस्थापक असावा. त्यानं माझ्या मेलमधला क्रमांक पाहून बॅच कन्फर्म केली. ‘तुला उशीर झाला आहे आणि सुरुवातीचा व्हिडिओ बघणं आवश्यक असतं, तेही तुझं बुडालं आहे,’ असं तो म्हणाला. पण तो दयाळू होता. त्यानं मला नंतर व्हिडिओ बघण्याच्या अटीवर बसमध्ये जाऊ दिलं. तुझ्यासोबत कुणी आहे का, असंही त्यानं विचारून घेतलं. मग धनश्री व नीललाही त्यानं माझ्यासोबत येण्याची परवानगी दिली. (त्यांचं वेगळं बुकिंग करणं गरजेचं होतं. ते आम्ही केलं नव्हतं. किंबहुना प्रयत्न करूनही फक्त मलाच कन्फर्मेशन मिळालं होतं. मात्र, त्या दिवशी पावसामुळं म्हणा, किंवा अन्य काही कारणानं म्हणा, लोक कमी आले असावेत, म्हणून आम्हा तिघांनाही त्यानं बसमध्ये बसू दिलं.) असो. 
त्या बसमधून साधारण दीड-दोन किलोमीटर आत कच्च्या रस्त्यानं गेल्यावर ‘मातृमंदिर’च्या त्या प्रवेशद्वारापाशी आम्ही पोचलो. पाऊस पडून गेला असल्यानं सगळीकडं चिखल झाला होता. तिथं सगळे जमा झाल्यानंतर आमच्या आधीची बॅच आत जायची वाट पाहत थांबलो. त्यानंतर आमचा नंबर लागला. आमच्या ग्रुपमध्ये ३२-३३ लोक होते. त्यात अर्थात काही मराठी लोकही होते. इथं आता आमच्या बॅग आणि मोबाइल स्विच ऑफ करून जमा करायचे होते. ते जमा केल्यावर आम्ही त्या परिसराच्या मुख्य दारातून आत प्रवेश केला. तिथंच एका झाडाखाली ललित नावाच्या व्यवस्थापकानं आम्हाला पुन्हा सगळी माहिती दिली. सगळे नियम समजावून सांगितले. आवाज होणारी कुठलीही गोष्ट (पैंजण इ.) इथंच काढून ठेवा असं सांगितलं. स्मार्ट वॉचमध्ये कॅमेरा असेल तर तोही काढून ठेवा असं बजावण्यात आलं. त्यानंतर ललितभाऊंनी आम्हाला इथल्या स्थानिक स्वयंसेवकाच्या हवाली केलं. तो आम्हाला घेऊन चालत निघाला. समोरच ‘मातृमंदिरा’चा तो भव्य डोम दिसत होता. ही वास्तुरचना अतिशय आगळीवेगळी आहे. बाहेरून सोनेरी रंग असलेली आणि कमळाच्या पाकळ्यांचा आकार असलेली ती वास्तू एकदम वेगळीच भासत होती. त्या वास्तूशेजारीच एक मोठं वडाचं झाड आहे. ते झाड म्हणजे या सर्व परिसराचा केंद्रबिंदू आहे, असं त्या स्वयंसेवकानं आम्हाला सांगितलं. त्यानंतर त्यानं आम्हाला तिथल्या ॲम्फी थिएटरमध्ये नेलं. या परिसराचा विकास सुरू झाला, तेव्हा पहिल्यांदा इथं विविध देशांतील माती आणून मोठा सोहळा करण्यात आला होता. तो सगळा परिसरच अतीव शांततेनं भारलेला होता. आमच्या ग्रुपमधलेही सगळे लोक अगदी शांतपणे हे सगळं बघत होते. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून आपोआपच मौन बाळगलं जात होतं किंवा अगदी हळू आवाजात बोललं जात होतं. आता आम्हाला हळूहळू त्या मुख्य डोमकडं नेण्यात आलं. त्या डोममध्ये शिरल्यावर त्याची भव्यता आणखीनच जाणवली. किमान पाच ते सहा मजल्यांएवढा तो उंच असावा. आम्ही शांततेत, शिस्तीत एक रांग करून आत शिरलो. कमळाच्या पाकळ्यांसारखी सभोवती १२ दालने होती, त्यांच्यामधून आत रस्ता होता. तिथं चपला, बूट काढून ठेवायचे होते. आत सगळीकडं कारपेट टाकलेलं होतं. त्या डोमच्या मधोमध खुली जागा होती. तिथं कमळाच्या आकाराच्या जागेत पाणी खळाळत आत जात होतं. तिथं आम्ही गोल करून बसलो. दहा मिनिटं शांत बसल्यावर बाकी कुठलेही आवाज येणं बंद झालं. केवळ त्या पाण्याचा खळाळता आवाज! थोड्या वेळानं तिथल्या स्वयंसेवक महिलांनी हलकेच टाळी वाजवून आम्हाला उठवलं. नंतर आता मुख्य डोममध्ये जायचं होतं. आत गेल्यावर सर्वांना पांढरे मोजे घालायला दिले. पँट असेल तर तीही मोज्यांच्या आत खोचायची होती. तिथून आम्ही पहिल्या फ्लायरनं वर आलो. तिथून वर जायला वर्तुळाकार, सर्पिलाकार रॅम्प होता. इथं त्यांच्यातली एक स्वयंसेविका आम्हाला घेऊन वर निघाली. ती एका विशिष्ट पद्धतीनं पावलं टाकत हळूहळू वर निघाली होती. आम्ही तिच्या मागे चालत होतो. आमच्यातल्या एका प्रौढ माणसाला काय घाई झाली होती, कुणास ठाऊक. तो तिला ओलांडून भरभर वर गेला. तिथं आडवी दोरी लावून रस्ता बंद केला होता. मग ही स्वयंसेविका अतीव हळू गतीनं तिथं पोचली. शेवटच्या टप्प्यात माझ्या मागचा माणूस मला हळूच पुढं सटकण्यासाठी खुणावत असल्यानं मीही तिला ओलांडून पुढं गेलो. मात्र, नंतर वाटलं, की आपलं हे चुकलं. कारण त्या बाईनं असा काही लूक दिला, की मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. कदाचित ध्यान मंदिरात जाण्याआधी ही आपल्या संयमाची परीक्षा असावी. मी त्यात नापास झालो होतो. मला त्या मागच्या माणसाचा भयंकर राग आला. पण आता चूक होऊन गेली होती.
वर एका गोऱ्या प्रौढानं ती दोरी बाजूला केली आणि मग आम्ही आत शिरलो. आत त्या विशाल डोमच्या मधोमध एक क्रिस्टल बॉल होता. त्यातून प्रकाश येत होता. अगदी काही सिनेमांत दाखवतात तसलं गूढ वातावरण होतं. तिथं मोठमोठे खांब होते. त्यांमधून पांढरीशुभ्र चादर व उशीच्या आकाराचं जाजम अंथरलं होतं. त्यावर एकेकानं बसून घेतलं. इथं साधारण पंधरा मिनिटं ध्यानधारणा करता येणार होती. मी डोळे मिटले. एका विलक्षण, असीम, अलौकिक शांततेचा अनुभव मी घेत होतो. किती काळ गेला, कळलं नाही. एक माणूस मोठ्यानं खोकला. सर्वांचीच तंद्री भंगली. खरं तर या सूचना आधी दिल्या होत्या. मात्र, आपल्याकडं ते नियम मोडणारे, किंवा त्यांना गांभीर्यानं न घेणारे लोक असतातच. तो माणूस दुसऱ्यांदा खोकल्यावर त्या गोऱ्यानं त्याला हळूच दंडाला धरून बाहेर नेलं. आम्ही पुन्हा एकदा ध्यानावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. आता दुसरं कुणी तरी खोकलं. मग त्या गोऱ्यानं त्या व्यक्तीलाही बाहेर नेलं. त्यानंतर मात्र बरीच शांतता लाभली. आपल्या आयुष्यात आपण किती ‘नॉइज’ला, गोंगाटाला तोंड देतो हे कळून आलं. हा सगळा खटाटोप ‘इनर पीस’साठी, अर्थात आतल्या शांततेसाठी सुरू होता. बाहेर कितीही शांतता असली, तरी मनात खळबळ सुरू असेल तर आपलं चित्त एकाग्र होऊ शकत नाही. त्यामुळं मन शांत ठेवणं फार गरजेचं असतं. ते आपल्या एकूण आरोग्यासाठीही महत्त्वाचं असतं. हे सगळं आपल्याला कळत असतं. पण वळत नसतं... असो. त्या शांततेतून बाहेर येण्यासाठी दोनदा लाइट ब्लिंक करण्यात आले. मग आम्ही शांतपणे डोळे उघडले. इशाऱ्यानेच आम्हाला बाहेर जायला सांगण्यात आलं. आम्ही अजिबात आवाज न करता, बाहेर आलो. खालच्या मजल्यावर आलो. ते मोजे काढून ठेवले. तिथून खाली उतरून एकदम बाहेर आलो. तो परिसरही तसा शांतच होता. केवळ पक्ष्यांचे आवाज येत होते. आता आम्ही त्या वडाच्या प्रचंड झाडाखाली टाकलेल्या बाकांखाली जाऊन बसलो. सहज मोजलं तर साधारण २३ खोडं जमिनीत उभी होती, एवढं ते झाड भव्य होतं. खरं तर तिथून निघायला नको वाटत होतं. आज पावसानं कृपा केली होती. थोडा वेळ तर चक्क ऊनही पडलं होतं. आमचं नशीब जोरावर होतं, म्हणून इथं येता आलं. एरवी खूप पाऊस असला, की हे ‘मातृमंदिर’ बंद असतं, असं समजलं. 
आता हळूहळू बाहेर पडायची वेळ झाली होती. सगळे त्या एंट्री गेटपाशी जमलो. आपापल्या बॅगा आणि मोबाइल ताब्यात घेतले. साधारण तास-दीड तास आम्ही मोबाइलपासून दूर होतो. मोबाइल सुरू केल्यावर कळलं, की या काळात फार काही घडलेलं नाही. आपल्यावाचून कुणाचंही काहीही अडलेलं नाही. आपण या काळात जे मिळवलं, ते किती तरी अधिक मौल्यवान होतं! असो.
इथून बसनं पुन्हा मुख्य दारापाशी आलो. इथं कॅफे, कँटीन असं सगळं होतं. आम्ही सकाळी नाश्ता न करताच निघालो होतो. आता कडकडून भूक लागली होती. मग तिथं व्यवस्थित खाल्लं. नंतर ते माहिती केंद्र फिरून पाहिलं. तो सकाळी चुकलेला व्हिडिओही पाहिला. त्यात या ‘मातृमंदिरा’ची संकल्पना ते आजपर्यंतचा प्रवास दाखवला होता. एवढं सगळं झाल्यावर आम्ही परत पाँडिचेरीला जायला निघालो. कॅब बुक केली तर त्यानं ॲपवर दाखवलेल्या पैशांपेक्षा दुप्पट पैसे मागितले. आम्ही येताना ३०० रुपयांत आलो होतो. हा आता ६०० रुपये मागत होता. कारण तेच - दुसऱ्या राज्यात जायचंय. तिथून परत यायला काही मिळत नाही वगैरे. रिक्षावाल्यांनीही तेच ऐकवलं. अखेर एकाला ४५० रुपयांत पटवलं. त्यानं निघाल्याबरोबर काही मिनिटांत उजव्या बाजूला एका कच्च्या वाटणाऱ्या रस्त्यावर गाडी घातली. जरा टरकायला झालं. पण मी लोकेशन ऑन ठेवून मॅपवर रस्ता पाहत होतो. अनेकदा हे गावाकडचे रिक्षावाले शॉर्टकट मारत इंधन वाचवत जातात. हाही तसाच होता. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रियल एरियातून, गल्ली-बोळांतून (बहुतेक पोलिसांना चुकवत) त्यानं रिक्षा पाँडिचेरीत आणली. आम्हाला हॉटेलवर पोचायला दीड वाजला होता. नंतर आम्ही हॉटेलवर आरामच केला. 

आता आजच्या ‘टूर गाइड’मध्ये एका पॅराडाइज बीच नावाच्या ठिकाणाला भेट दर्शविली होती. तिथं वॉटर स्पोर्ट वगैरे होते. त्या आयलंडवर बोटीनं प्रवास करून जायचं होतं. वादळी वातावरणात तिकडं जायला नको वाटलं. मग तो विचारच रद्द करून टाकला. आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा प्रोमोनेडला चालत गेलो. त्याआधी भारती पार्कमध्ये जाऊ, असं ठरवलं. ते पार्क सुंदर आहेच. तिथं मधोमध ते ‘अयी मेमोरियल’ दिसलं. तिथं माहिती फक्त तमिळ व फ्रेंचमधूनच होती. मग ‘गुगल’वर माहिती वाचली. ‘अयी’ची दंतकथा समजली. ही त्या काळातली एक नर्तकी होती. तिचा एक मोठा महाल होता. राजाचे लोक की खुद्द राजाच तिथून चालला असताना, त्यांना हे कुठलं तरी भव्य मंदिर वाटलं. त्यांनी आत जाऊन नमस्कार केला आणि मग त्यांना कळलं, की हे नर्तकीचं घर आहे. या अपमानानं क्रुद्ध झालेल्या राजानं तो महाल जमीनदोस्त करण्याची आज्ञा सोडली. त्यावर ‘अयी’नं राजाकडं धाव घेतली आणि सांगितलं, की इथं मी एक विहीर खोदून तिचं पाणी सर्वांना (स्पृश्यास्पृश्यता न बाळगता) देईन. त्या गोष्टीला राजानं परवानगी दिली. त्यानंतर ‘अयी’ ही पाणी देणारी स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली आणि नंतर तर तिला देवस्वरूप आलं. दुसरी दंतकथा अशी, की कुणी मौलवी वा पीर तिच्या घरावरून चालले होते. त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी ‘अयी’कडं पाणी मागितलं. मात्र, त्या गावातील ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिला मौलवीला पाणी देण्यास मनाई केली. त्यानंतर ‘अयी’नं स्वत:चा महाल उद्ध्वस्त करून सर्वांना पाणी देता येईल, अशी विहीर खोदली. वगैरे वगैरे. (मला स्वत:ला पहिली दंतकथा जास्त विश्वासार्ह वाटली. तमिळनाडूतल्या पेरियार प्रणीत ब्राह्मणेतर चळवळीचा इतिहास पाहिला, तर त्या काळात ही दुसरी ‘राजकीय’ दंतकथा जन्माला आली असण्याची शक्यता अधिक!)

‘भारती पार्क’च्या मधोमध जे स्मारक आहे, ते तिसऱ्या की चौथ्या नेपोलियननं बांधलं आहे. ते ‘अयी’च्याच स्मरणार्थ आहे. शिवाय त्या पार्कमध्ये एक कारंजं होतं. तिथंही ‘अयी’चा पाणी देतानाचा पुतळा आहे. तिच्या घागरीतून सतत पाणी पडत असतं. या पार्कमध्ये अतिशय शांत वाटलं. एकूणच पुण्यााबाहेर कुठंही गेलं, की ‘कमी गर्दी’ हे एवढं जाणवतं ना! आपल्याकडं केवढी प्रचंड गर्दी झाली आहे, हे सतत डाचत राहतं. असो.
पार्कमधून पुन्हा प्रोमोनेडवर गेलो. कालच्या तुलनेत आज समुद्र शांत होता आणि पाऊसही अजिबात नव्हता. सर्व दिवे लागले होते. वातावरण फारच सुंदर होतं. समोरच्या जुन्या कस्टम हाऊसवरचा तिरंगा सहा वाजता खाली उतरवण्याचा सोहळा झाला. बिगुल वाजलं, तेव्हा सगळे तिकडं धावले. अगदी समारंभपूर्वक तो ध्वज खाली घेण्यात आला. गांधीजींचा पुतळा व तो परिसर आता छान झगमगत होता. पर्यटकांची थोडी गर्दी होती. तिथंच अगदी समुद्रावर ‘ल कॅफे’ नावाचं रेस्टॉरंट आहे. आम्हाला भूक लागली होतीच. मग तिथं जाऊन, समुद्राची गाज ऐकत पिझ्झा खाल्ला आणि नंतर मस्त लेमोनेड प्यायलं. इथंही छान लायटिंग होतं. चांगले फोटो काढता आले. सात-साडेसातपर्यंत तिथंच टाइमपास केला. मग चालत निघालो. इथं समोरच एक तुळशीबागेसारखं मार्केट होतं. तिथं टाइमपास केला. थोडी खरेदी केली. आज ‘सुरगुरू’त जायचं नव्हतं. कार्तिक नावाचं एक रेस्टॉरंट सतत ‘सर्च’मध्ये येत होतं. तिथं जाऊन बघू, असं ठरवलं. सुदैवानं ते चांगलं, मोठं रेस्टॉरंट होतं. अनेक लोक तिथं जेवत होते. इथंही ऑर्डर घ्यायला महिलाच होत्या. मग डोसा, राइस असं सगळं रीतसर जेवलो. निवांत चालत चालत हॉटेलवर गेलो. आज एवढ्या असीम शांततेचा अनुभव घेतला होता, की त्यामुळं झोपही पटकन व शांत लागली.


---

पाँडिचेरी/चेन्नई/पुणे. ता. २ डिसेंबर २०२५. 

आज परतीचा दिवस. सकाळी नऊ वाजताच टॅक्सी बोलावली होती, जाताना जो टॅक्सीवाला आला होता, तोच आता येणार होता. तोही थेट चेन्नईहून. तो पहाटे चार वाजता चेन्नईहून निघून आमच्या हॉटेलला नऊ वाजता येऊन थांबला होता. आम्ही सकाळी जवळच्या ‘सुरगुरू’त जाऊन (हे नूतनीकरणासाठी बंद होतं. कालच सुरू झाल्याचं संध्याकाळी समजलं होतं...) नाश्ता केला. नंतर चेक-आउट केलं. बरोबर साडेनऊला आमचा प्रवास चेन्नईच्या दिशेनं सुरू झाला. जयशंकरला झोप येत होती, हे दिसत होतं. मी त्याला गाडी थांबवून चहा घ्यायला सांगितलं. मग तो थांबला. आता आम्ही ‘कचरा रोड’नं न येता, थुथीकोडी (तुतीकोरीन)-चेन्नई हायवेनं टिंडिवनम, चेंगलपट्टू मार्गे परत निघालो होतो. जयशंकरला घरी जायची घाई झाली होती. त्यामुळं त्यानं सुसाट गाडी सोडली. हा हायवेही उत्तम होता. त्यामुळं त्यानं आम्हाला बारा वाजता चेन्नई एअरपोर्टला सोडलंही. आमचं फ्लाइट ३.४० ला होतं. मग त्याला म्हटलं, इथं बाहेर जो फूड मॉल आहे तिथं सोड. मग तिथं जाऊन खाणं-पिणं असा टाइमपास करत बसलो. बरोबर दीड वाजता त्या बॅटरी-ऑपरेटेड गाडीनं टर्मिनल - १ ला आलो. इथं एस्कलेटर, लिफ्ट असं करत सगळं सामान घेऊन दुसऱ्या मजल्यावर आलो. सिक्युरिटी वगैरे पार पाडून गेटवर येऊन बसलो तरी दोनच वाजले होते. मग पुन्हा टाइमपास. आमचं ‘इंडिगो’चं फ्लाइट थोडं उशिरानं आलं. बराच वेळ ‘सिक्युरिटी’ एवढंच दाखवत होते. वेळही ३.४० ऐवजी ४.०० अशी केली होती. अखेर सगळं मार्गी लागलं. बोर्डिंगही साडेतीन-पावणेचारला सुरू झालं. आमचं विमान साधारण तासभर उशिरा, म्हणजे पावणेपाचला उडालं. ते बरोबर सव्वासहा वाजता पुण्यात लँड झालं. (दुसऱ्या दिवशीपासून ‘इंडिगो’चा जो महागोंधळ सुरू झाला, ते बघितल्यावर मंगळवारी तसे वेळेत पुण्यात पोचणारे आम्ही फारच नशीबवान ठरलो, म्हणायचे.) कॅब करून आठ वाजेपर्यंत घरी पोचलो. पुण्यात लँड होताना हवेतला प्रदूषणाचा जाडसर थर अगदी जाणवला. खाली उतरल्यावर घरी येईपर्यंत रस्त्यावरचा कोलाहल, गोंधळ ऐकून आपण किती शांततेत चार दिवस राहत होतो, हे प्रकर्षानं जाणवलं. असो.
एकूण चार दिवसांची ही छोटेखानी ट्रिप फारच मस्त झाली. ‘मातृमंदिर’मधील ध्यानधारणेचे क्षण हे या ट्रिपमधले सर्वोच्च आनंददायी क्षण म्हणता येतील. 
गेल्या तीन-चार वर्षांत आमच्या दक्षिणेकडंच तीन-चार ट्रिप झाल्या. आता उत्तरायण सुरू करायला हवं... बघू या, कधी योग येतो ते!


(समाप्त)


दुबई ट्रिपविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------------------------





8 Dec 2025

पाँडिचेरी डायरी - भाग २

कर्मयोग, शुभ्रग्राम अन् सागर
------------------------------------


३० नोव्हेंबर २०२५. मु. पाँडिचेरी.


रविवारी सकाळी जाग आली, तीच पावसाच्या आवाजाने. अंदाज खरा ठरला होता. ते डिटवाह चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनाऱ्यावर धडकलं होतं. परिणामस्वरूप तमिळनाडूच्या सर्व किनारपट्टीवर पाऊस सुरू झाला होता. आजचा दिवस, किंबहुना दोनच दिवसांची ही ट्रिपच पाण्यात जातेय की काय, अशी शंका आली. मात्र, आश्चर्यकारकपणे, थोड्या वेळात पाऊस थांबला. आम्ही जे हॉटेल घेतलं होतं, तिथं ब्रेकफास्टची किंवा चहापाण्याची काही सोय नव्हती. हॉटेल अगदी गावात असल्यानं बुकिंग करताना असं वाटलं, की आजूबाजूला सगळं सहज मिळेल. मात्र, त्या वेळी पावसाची शक्यताच गृहीत धरली नव्हती. नशिबानं आमच्याकडं छत्र्या होत्या. मग मी आणि धनश्री खाली उतरून त्या गल्लीत कुठलं हॉटेल किंवा चहाची टपरी वगैरे दिसतेय का ते शोधायला बाहेर पडलो. सुदैवानं आमचा रस्ता सोडून पुढं काटकोनात वळल्यावळल्या त्या रस्त्यावर आम्हाला एक सोडून दोन हॉटेलं सुरू असलेली दिसली. ती आपल्याकडच्या ‘अमृततुल्य’सारखीच होती. जरा आडवी व मोठी होती. शिवाय एवढ्या सकाळी तिथं इडल्या आणि मेदूवडेही ठेवलेले दिसले. त्या रस्त्याच्या पलीकडंच तिथली भाजी मंडई किंवा तत्सम मार्केट होतं. तिथं काम करणारी कामगार मंडळी जास्त संख्येनं सकाळी सकाळी तिथं चहा किंवा कॉफी प्यायला जमली होती. त्यात बऱ्याच बायकाही होत्या. धनश्रीनं व मी तिथं अनुक्रमे कॉफी आणि चहा घेतला. नीलसाठी पार्सल चहाही घेतला. चहा घेतल्यानं चांगलीच तरतरी आली होती. पाऊस थांबला तरी अगदी बारीक भुरभुर येत होती.
एक चांगलं होतं, की आमच्या हॉटेलपासून व्हाइट टाउनमधील सगळी ठिकाणं अगदी चालत जाण्याच्या अंतरावर होती. आम्ही आवरून नऊ वाजता बाहेर पडलो. नाश्ताही बाहेरच कुठे तरी करू, असं ठरवलं. पहिल्यांदा आम्ही अर्थातच योगी अरविंदांचा आश्रम पाहायला गेलो. तो आमच्या हॉटेलपासून अवघ्या ६०० मीटर अंतरावर होता. मग चालतच तिथं गेलो. त्या आश्रमासमोर गेल्यावर आमचा जरा भ्रमनिरासच झाला. आश्रम किंवा कुटी म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जे चित्र येतं, तसं इथं काहीच नव्हतं. माझ्या डोक्यात, वर्धा येथील सेवाग्राम आश्रमासारखा हा आश्रम असेल, असं काही तरी होतं. प्रत्यक्षात इथं त्या इतर चार इमारतींसारखीच ही एक बैठी, तशी लहानशीच इमारत होती. तिथं समोर चपला काढून आत जायचं होतं. एका स्वयंसेवकानं मोबाइल आवर्जून बंद करायला लावले. आम्ही आत गेलो. वळून उजवीकडं गेल्यावर एका झाडाखाली योगी श्री अरविंदांची समाधी होती. आम्ही तिचं दर्शन घेतलं. तिथं काही मोजके अनुयायी बसले होते. तिथं बोलायला बंदी होती. आम्ही शांतपणे शेजारच्या इमारतीत गेलो. तिथं ग्रंथालय होतं. अरविंदांची सर्व ग्रंथसंपदा विविध भाषांत तिथं उपलब्ध होती. कर्मयोगावरचं अरविंदांचं प्रभुत्व आणि भाष्य प्रसिद्ध आहे. बहुतेक पुस्तकं तीच होती. ‘सावित्री’ हेही त्यांचं एक गाजलेलं पुस्तक तिथं होतं. नीलनं त्यांचं एक इंग्लिश, तर मी त्यांचं जीवनचरित्र असलेलं मराठीतलं छोटेखानी पुस्तक विकत घेतलं. पुढं अरविंदांच्या आणि त्यांच्या शिष्या मदर  (मीरा अल्फासा - यांनीच नंतर ‘ऑरोव्हिल’ उभारलं) यांच्या फोटोंचं दालन होतं. तिथं विक्रीही सुरू होती. आम्हाला ते फोटो घेण्यात रस नसल्यानं आम्ही बाहेर पडलो. पाँडिचेरीतलं हे एवढं महत्त्वाचं ठिकाण अशा रीतीनं केवळ २० मिनिटांत पाहून झालं होतं. आता काय बघायचं, असा आम्ही विचार करू लागलो. आम्ही निघण्यापूर्वी नीलनं ‘एआय’च्या मदतीनं एक टूर गाइड तयार केलं होतं. ते पाहिलं. त्यात इथून जवळच एक प्रसिद्ध व मोठं विनायक मंदिर आहे, ते आवर्जून पाहा, असा उल्लेख होता. ते मंदिर अगदी समोरच होतं. तिथं गेलो. तिथं बऱ्यापैकी गर्दी होती. या मंदिराचा एक हत्तीही प्रसिद्ध होता. तो मरण पावल्याचं समजलं. दाराशीच त्या हत्तीचा एक मोठा फोटो ठेवला होता. लोक तिथंही फुलं वाहत होते. मंदिराच्या समोरच्या रस्त्यावरच मंडप होता. त्या मंडपाच्या छतावर अतिशय सुंदर अशी गणेशचित्रं रेखाटली होती. आम्ही आत गेलो. आतही बऱ्यापैकी गर्दी होती. थोडी रांग होती. आम्ही त्या रांगेत उभे राहिलो. सुदैवानं त्याच वेळी आरती सुरू झाली. आतील पुजारी आरती घेऊन बाहेर आला. मंदिराच्या सर्व भिंतींवर गणपतीची विविध रूपांतील चित्रं होती. मंदिर आतूनही अतिशय भव्य व सुंदर होतं. दर्शन झाल्यावर तिथं जरा वेळ बसलो. नवीन लग्न झालेलं जोडपं सर्वांना द्रोणातून खिचडीसारखा प्रसाद देत होतं. मीही एक द्रोण आणला. तो उपम्यासारखा पदार्थ अतिशय चविष्ट होता. नाश्ता झाला नव्हता, त्यामुळं तो खाऊन बरंच वाटलं. मग बाहेर पडलो. समोरच एक छोटंसं रेस्टॉरंट सुरू झालं होतं. तिथं इडली, डोसा, मेदूवडा-सांबार असा नाश्ता केला. कॉफी घेतली, हे सांगायला नकोच. सुदैवानं आता पाऊस पूर्ण थांबला होता. आता आम्ही चालत पाँडिचेरी म्युझियमकडं निघालो. तेही अंतर अगदी जवळ, म्हणजे ६०० की ७०० मीटर दाखवत होतं. जाता जाता आम्ही त्या व्हाइट टाउनमध्येच प्रवेश केला होता. आमच्यासारखेच अनेक पर्यटक तिथं फिरत होते. त्या सुंदर इमारतींसमोर फोटो काढत होते. पाऊस नसला तरी वातावरण ढगाळ होतं. त्यामुळं छान गार वाटत होतं. आम्ही चालत पाँडिचेरी म्युझियममध्ये पोचलो. दहा रुपये तिकीट होतं. ते काढून संग्रहालय पाहिलं. तीन मजली होतं. खूप मोठं होतं असंही नाही. लगेच बघून झालं. शेवटची एक-दोन दालनं बघत असताना दिवे गेले. मग लोकांनी मोबाइलच्या बॅटरीच्या उजेडात पुढची दालनं बघितली. आम्हीही तेच केलं. तिथं एका ठिकाणी ‘अयी मेमोरियल’ची प्रतिकृती दिसली. ‘अयी’ म्हणजे तमीळ भाषेत स्त्री, बाई. त्या ‘अयी’ची एक दंतकथा आहे. ती त्या प्रतिकृतीखाली लिहिलेली होती. हे मूळ मेमोरियल चांगलं भव्य आहे. या म्युझियमसमोरच भारती पार्क नावाचं मोठं उद्यान आहे. त्या उद्यानाच्या मधोमध हे स्मारक आहे. (त्या दिवशी आम्ही त्या पार्कच्या आत गेलो नाही. दुसऱ्या दिवशी मात्र तिथं जाऊन ते मेमोरियल पाहिलं.) दिवे गेल्यामुळं म्युझियम बंदच करण्यात आलं. आमचं बघून झालंच होतं. मग बाहेर पडलो.

इथं रस्ता ओलांडला, की त्या भारती पार्कचं एक गेट आहे. त्याच्यासमोरच इथलं ‘राजनिवास’ हे राज्यपालांचं भव्य निवासस्थान आहे. तिथं फोटो काढले. मग पुन्हा त्या व्हाइट टाउनमधून हिंडलो. समुद्र अगदी समोरच होता. अनेक लोक तिकडं जायचा प्रयत्न करत होते. पण चक्रीवादळामुळं पोलिसांनी रस्ते बंद करून ठेवले होते. त्या बॅरिकेडपलीकडं तो प्रोमोनेड रस्ता आणि समुद्र सहज दिसत होता. काहो लोक बॅरिकेडमधून पलीकडं गेलेले दिसले. मग आम्हीही घुसलो. आता अगदी प्रोमोनेडच्या त्या कट्ट्यावर आम्ही उभे होतो. समोर समुद्र चांगलाच उधाणलेला दिसत होता. पोलिस होते. आत जाऊ नका, असं सतत सांगत होते. आम्हीही लांबूनच समुद्राचा आनंद घेत होतो. थोडा वेळ त्या रस्त्यानं फिरलो. आमच्या त्या ‘टूर गाइड’मध्ये इथला गांधींचा पुतळा, फ्रेंच वॉर मेमोरियल व लाइट हाऊस चुकवू नका, असं लिहिलं होतं. मग ते आम्हाला तिथं समोरच दिसलं. तिथंही पर्यटकांची गर्दी दिसली. मात्र, बसायला जागा मिळाली. निवांत बसलो. मागून समुद्राचं गार वारं येत होतं. फार बरं वाटत होतं. पाऊस नसल्यामुळं आम्हाला फिरता आलं होतं. आता दुपारचा एक वाजून गेल्यावर भूक लागली. जवळच एक व्हेज रेस्टॉरंट दाखवलं गुगलबाबानं. मग तिथं चालत गेलो. मात्र, ते नेमकं बंद होतं. मग सुरगुरू रेस्टॉरंट सापडलं. तिथं चालत गेलो. हे रेस्टॉरंट चांगलंच होतं. जेवण उत्तम झालं. तिथून बाहेर पडलो. आता मला इथले रस्ते हळूहळू समजू लागले होते. कुठून कुठं गेलो की कुठं निघतो किंवा कुठं पोचतो याचा अंदाज आला होता. मग मॅप न लावता हॉटेलवर जाऊ या, म्हणून निघालो. अजिबात न चुकता, दहा मिनिटांत हॉटेलवर पोचलो. चालून दमछाक झाल्यानं सरळ ताणून दिली. 
संध्याकाळी पुन्हा बारीक बारीक पाऊस सुरू झाला. मात्र, चहाची तल्लफ त्याहून मोठी होती. मग आवरून बाहेर पडलो. सकाळी चहा घेतला, त्याच्या समोर जे दुसरं दुकान होतं, तिथं आता चहा आणि कॉफी घेतली. पाऊस रिमझिम सुरूच होता. मग आता पावसाला न जुमानता तिथल्या मार्केटमध्ये फिरायचं आम्ही ठरवलं. मग चालत त्या मुख्य रस्त्यावर गेलो. हा अगदी आपल्या लक्ष्मी रोडसारखा रस्ता आहे. दुकानंही अगदी तशीच. बरंचसं विंडो शॉपिंग केलं. काही छोट्या वस्तू खरेदी केल्या. नीलला मला काही तरी वाढदिवसाचं गिफ्ट घ्यायचं होतं आणि ते आजच (३० नोव्हेंबर) घ्यायचं होतं, कारण वाढदिवसाचा महिना आज संपणार होता. मग एका दुकानातून मी एक शर्ट विकत घेतला. नीलनं बिल दिलं. आम्हाला रात्रीचं जेवण करूनच हॉटेलवर जायचं होतं. पण अजून वेळ होता. मग आम्ही ‘टूर गाइड’ काढलं. त्यात व्हाइट टाउनमधलं ‘अवर लेडी ऑफ एंजल्स’ हे चर्च आमचं बघायचं राहिलं आहे, असं लक्षात आलं. ते अंतर जरा जास्त, म्हणजे एक किलोमीटरपेक्षा जास्त होतं. मग रिक्षा करून जायचं ठरवलं. शंभर रुपयांत यायला एक रिक्षावाला तयार झाला. आम्ही चर्चमध्ये पोचलो. त्या परिसरात बराच अंधार होता. चर्चमध्येही अगदी मोजकीच माणसं होती. चर्च खरोखर सुंदर व भव्य होतं. आम्ही आतून ते बघत असतानाच तिथल्या लोकांनी आवराआवरी सुरू केली. खरं तर हे चर्च आठ वाजता बंद होतं, असं समजलं होतं. मात्र, ते आता सात वाजताच बंद करत होते. रिक्षावाल्याला हे माहिती असावं. याचं कारण तो थांबला होता आणि जाताना आणखी शंभर रुपये घेऊन आम्ही म्हणू तिथं सोडायला तो तयार झाला होता. आम्ही लगेच चर्चमधून बाहेर पडलो. आम्ही पुन्हा ‘सुरगुरू’लाच गेलो. हे हॉटेल आम्हाला आवडलं होतं. आता वेगळी डिश ट्राय करायची म्हणून कोच्छू पराठा ऑर्डर केला. फोडणीच्या पोळीसारखा पदार्थ समोर आला. इथं पराठाही असा कुस्करून देतात, हे त्यावरून कळलं. तो चवीला बरा होता. मी नॉर्थ इंडियन थाळी घेतली. मात्र, ती भरपूर आली. नाइलाजानं त्यातला राइस परत द्यावा लागला. ‘इथं राइस परत देणारा हा वेडा इसम कोण आहे?’ अशा नजरेनं तो वेटर माझ्याकडं पाहतोय की काय, असा मला भास झाला. खाऊन झाल्यानंतर बाहेर पडलो. आता रस्ते पाठ झाले होते. चालतच हॉटेलवर पोचलो. नीलनं तो शर्ट रीतसर माझ्या हाती दिला. लेकानं त्याच्या पैशातनं दिलेल्या या गिफ्टचं फार फार कौतुक वाटलं. मन आनंदानं भरून गेलं. दिवसभर दमल्यानं झोपही लवकर लागली.
अर्थात, उद्या एक विलक्षण अनुभव आपण घेणार आहोत, याची स्वप्नातही कल्पना आली नाही...



(क्रमश:)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

-------------




7 Dec 2025

पाँडिचेरी डायरी - भाग १

अळागना पोन्नू...
-------------------


पुणे/चेन्नई/महाबलिपुरम/पाँडिचेरी, २९ नोव्हेंबर २०२५.

गेल्या वर्षी १४ नोव्हेंबरला पन्नाशीत पदार्पण करताना आपण जगातल्या सर्वांत उंच इमारतीवर - 'बुर्ज खलिफा'वर - असायला हवं असं मला वाटत होतं. अगदी त्या दिवशी नाही, पण गेल्या डिसेंबरमध्येच दुबईला जाऊन ते स्वप्न पूर्ण करता आलं. आता पन्नाशी पूर्ण करताना आपण जमीन व समुद्र या दोन पंचमहाभूतांच्या सान्निध्यात असायला हवं, असं मनात आलं. या दोन्ही गोष्टी एकत्र अनुभण्यासाठी अंदमानसारखी दुसरी जागा नाही. त्यामुळं पन्नाशी पूर्ण करताना अंदमानला जाऊ, असं ठरवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या काळकोठडीचं दर्शन घेण्याची आस होतीच. मात्र, सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. काही कारणानं अंदमानला जाणं रद्द झालं. मात्र, निदान निम्म्या वाटेत तरी जाऊ, असं मनात आलं. अनेक दिवसांपासून 'बकेट लिस्ट'मध्ये असलेल्या पाँडिचेरीचं नाव अचानक वर आलं. (पाँडिचेरीचं आताचं अधिकृत नाव पुदुच्चेरी. मात्र, या लेखनात सगळीकडं पाँडिचेरी हाच अधिक रूढ असलेला उल्लेख केला आहे.) त्यामुळं तिथंच जायचं निश्चित केलं. पाँडिचेरी ही एके काळी भारतातील फ्रेंचांची महत्त्वाची वसाहत होती आणि तिथं योगी अरविंदांचा आश्रम आहे, या दोन गोष्टींपलीकडं मला पाँडिचेरीची माहिती पत्रकारितेत येईपर्यंत नव्हती. पाँडिचेरीच्या जमिनीला पाय लागण्याचं भाग्य मात्र तब्बल २४ वर्षांपूर्वी, २००१ मध्ये माझ्या वाट्याला आलं होतं. तेव्हा मी 'सकाळ'तर्फे तमिळनाडूत विधानसभा निवडणूक कव्हर करायला गेलो होतो. तेव्हा चेन्नईवरून कडलूरला बसनं जाताना पाँडिचेरीला आमची बस काही वेळ थांबली होती. मला आमची बस पाँडिचेरीमार्गे जाणार आहे, हेच माहिती नव्हतं. त्यामुळं पाँडिचेरी आल्यावर मी अतिशय उत्सुकतेनं जेवढं दिसेल तेवढं ते टुमदार गाव डोळे भरून पाहिलं होतं. तिथल्या बसस्टँडवर मी डोसाही खाल्ला होता. मात्र, तिथं थांबून ते सगळं गाव नीट पाहणं तेव्हा शक्य नव्हतं आणि नंतर तब्बल दोन तपं हा योग काही आला नाही. तो आला गेल्या महिन्यात. पन्नाशीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन खरोखर महिनाभर चाललं होतं. त्याची सांगता करण्यासाठी ही ट्रिप म्हणजे एकदम योग्य पर्याय होता. मी दोन-तीन महिन्यांपूर्वीच २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर अशी चार दिवसांची ट्रिप आखून टाकली. आमचे नेहमीचे भिडू या वेळी नव्हते. आम्ही तिघंच जाणार होतो. पुणे ते चेन्नई फ्लाइट आणि नंतर कॅब करून पाँडिचेरीला जाऊ, असं ठरवलं. कुठल्याही प्रवासी कंपनीची किंवा एजंटची मदत न घेता, सगळी बुकिंग वगैरे आमची आम्हीच केली. ट्रिपला जाण्याआधी एका ठिकाणी बोलताना असा विषय निघाला, की नोव्हेंबरअखेरीला गेल्या वर्षी चेन्नईत मोठं चक्रीवादळ आलं होतं आणि त्या लोकांचा सगळा प्लॅन त्यात वाहून गेला होता. मी या संकटाची कल्पनाच केली नव्हती. (पुढं ते चक्रीवादळ आलंच.) त्यामुळं मी रोज पाँडिचेरीचं हवामान पाहू लागलो. तिथं जवळपास रोजच पाऊस पडण्याचा अंदाज येत होता. मग आम्ही आमच्या सामानात छत्र्या घेतल्या. आमचं जातानाचं विमान पुण्याहून दहा वाजता होतं. ते बारा वाजता चेन्नईला पोचणार होतं. आम्ही सकाळी साडेसात वाजता घरातून निघालो. बरोबर साडेआठ वाजता पुणे एअरपोर्टला पोचलो. 'इंडिगो'चं विमान वेळेत निघालं (हो!) आणि वेळेच्या आधी म्हणजे ११.३० वाजताच चेन्नईत लँड झालं. (एकाच आठवड्याने या एअरलाइन्सचा काय महागोंधळ होणार आहे, याची तेव्हा अर्थातच कल्पना नव्हती.) जाताना हवा अतिशय स्वच्छ होती. नव्या मोबाइलचा कॅमेरा चांगला होता. म्हणून विमानातून खंबाटकी घाट, कऱ्हाडचा कृष्णा-कोयना संगम असे फोटो टिपता आले. जसजसं चेन्नई जवळ येऊ लागलं, तसतसं निरभ्र आकाश जाऊन ढगांची दाटी दिसून आली. त्या ढगाळ वातावरणातच आम्ही चेन्नईत उतरलो. तोवर आम्हाला डिटवाह नावाच्या दिवट्या चक्रीवादळाची खबर नव्हती. चेन्नईत उतरल्यावर मला बातम्यांत त्या वादळाविषयी समजलं. तेव्हा ते श्रीलंकेच्याही खाली होतं आणि दुसऱ्या दिवशी ते श्रीलंकेत येऊन धडकणार होतं. अर्थात इथं त्याचा परिणाम दिसायला सुरुवात झाली होती. आम्ही उतरलो तेव्हा चेन्नईत हवा स्वच्छ होती आणि पाऊसही नव्हता. अगदी थंडी नव्हती, पण उकाडा अजिबात नव्हता. आम्ही बाहेर पडल्यावर तातडीनं एक टॅक्सी ठरवली. बरंच अंतर चालत जाऊन एअरोमॉलमधून ती टॅक्सी पकडावी लागली. मात्र, बारा वाजता आमचा प्रवास सुरूही झाला होता.

आम्हाला आधी महाबलिपुरमला जायचं होतं. चेन्नईहून पाँडीला जाताना महाबलिपुरम लागतं. इथली ती प्रसिद्ध मंदिरं, शिल्पकारांची कार्यशाळा आणि ती प्रसिद्ध लोण्याचा गोळा असलेली शिळा हे सगळं बघायचं होतं. आम्ही दोन वाजता तिथं पोचलो. आधी पोटपूजा करायची होती. अड्यार आनंदा भवन या तिथल्या प्रसिद्ध साखळी हॉटेलांपैकी एक असलेल्या हॉटेलमध्ये आमच्या जयशंकरनं आम्हाला नेलं. तिथं सेल्फ सर्व्हिस आणि टेबल सर्व्हिस असे दोन विभाग होते. मात्र, गर्दी बरीच होती. तेवढ्यात एक वेटर आला आणि हिंदीत आम्हाला म्हणाला, की तुम्ही इथं बसा. मी तुमची ऑर्डर जागेवर आणून देतो. मग मी सांबार राइस मागवला. धनश्री व नीलनं पावभाजी घेतली. तो वेटर बिहारचा होता. आमचे चेहरे बघूनच त्याला आम्ही पर्यटक असल्याचं समजलं आणि त्यानं आम्हाला अशी मदत केली होती. आमचा जरासा गबाळा आणि बराचसा गबदुल असा चक्रधर जयशंकर हाही तिथं जेवायला बसला. त्यानं आमच्याकडं बोट दाखवून 'हे माझे पैसे देतील,' असं वेटरला सांगून मिल्स मागवलं. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. जेवण झाल्यावर बरं वाटलं. नंतर मस्त कॉफी पण घेतली. बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. मात्र, आता आम्हाला महाबलिपुरम बघायचंच होतं. जयशंकर आम्हाला मुख्य शोअर टेम्पलच्या दारात घेऊन गेला. तिथं आम्ही दरडोई ४० रुपयांची तिकिटं घेऊन आत गेलो. थोडं आत गेल्यावर ते मंदिर होतं. तिथं इंग्लिशमध्ये माहिती देणारे कुठलेही फलक नव्हते. माझा सहकारी अभिजित थिटेनं मला, तिथं पोचल्यावर फोन किंवा व्हिडिओ कॉल कर, सगळी माहिती सांगतो, असं सांगितलं होतं. मात्र, आता जोरात पाऊस सुरू झाला. शेजारीच समुद्र होता आणि तो चांगलाच उधाणला होता. आमच्याबरोबर असलेले बरेच पर्यटक भिजत होते. आमच्याकडं दोन छ्त्र्या होत्या, मात्र आता त्या वाऱ्यानं उलट्या व्हायला लागल्या. अखेर ते मंदिर पाहिलं. तिथं फोटो काढले. अनेक पर्यटक कंपन्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत 'फोटोस्टॉप' नावाचा प्रकार असतो. तोच आम्हाला इथं नाइलाजानं करावा लागत होतं. आम्ही भिजतच बाहेर आलो. अभिजितला फोन केला. त्यानं बरीच माहिती दिली. मात्र, व्हिडिओ कॉल न झाल्यानं त्या माहितीला मर्यादा आली. पुढं जयशंकर आम्हाला अर्जुनाचा रथ आणि त्या शिळेपर्यंतही घेऊन गेला, एके ठिकाणी लेण्यासारखी जागा असल्यानं आम्ही तिथं आत शिरलो. तिथं पाऊस लागत नव्हता, त्यामुळं बरेचसे पर्यटक आतच थांबले होते. तिथं छायाप्रकाशाचा सुंदर खेळ रंगला होता. फोटो सुंदर येत होते. मग बरंचसं फोटोसेशन तिथं केलं. तिथून जरा पुढे गेल्यावर तो प्रसिद्ध तिरपा दगड दिसला. तिथंही आत जायला तिकीट होतं. मात्र, पाऊस परत वाढल्यानं आम्ही बाहेरूनच फोटो काढले आणि निघालो. मोदी आणि जिनपिंग यांची भेट याच ठिकाणी झाली होती. पल्लव राजांच्या काळातलं हे सगळं काम आहे. त्या महाकाय शिळेला श्रीकृष्णाचा लोण्याचा गोळा असंही म्हणतात. 
इथं बघण्यासारखं बरंच काही होतं. मात्र, आता पाऊस वाढल्यामुळं आम्हाला निघणं भाग होतं. मग पुन्हा टॅक्सीत येऊन बसलो आणि जयशंकरनं लगेच टॅक्सी पाँडिचेरीच्या दिशेनं दामटली. त्याला इंग्रजी जेमतेम येत होतं आणि हिंदी समजत होतं. त्यामुळं आमचा तोडकामोडका संवाद सुरू होता. 'चेन्नई आता किती वाढलंय' इथून आमच्या चर्चेची सुरुवात झाली. तो अण्णा द्रमुकचा कार्यकर्ता होता. त्यामुळं आताच्या स्टॅलिन राजवटीला शिव्या घालत होता. सगळीकडं भ्रष्टाचार बोकाळला आहे, असं त्याचं म्हणणं होतं. येत्या निवडणुकीत स्टॅलिन यांच्या द्रमुकला विरोधकांचं मोठं आव्हान असेल, असंही तो म्हणाला. तमिळनाडूत येत्या मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमचं हे बोलणं चाललं होतं. चेन्नईहून पाँडीला जाणाऱ्या रस्त्याला ईसीआर (ईस्ट कोस्ट रोड) म्हणतात. हा रस्ता निसर्गसुंदर आहे. डाव्या बाजूला सतत समुद्र दिसत राहतो. मात्र, जयशंकर त्या रस्त्याला शिव्या घालत होता. खरं तर हा रस्ता चौपदरी करण्याचं काम सुरू असलेलं दिसत होतं. त्यामुळं अनेक ठिकाणी डायव्हर्जन होती. मात्र, जयशंकर सतत 'कचरा रोड, कचरा रोड' म्हणत त्या रस्त्याचा उद्धार करत होता. जसजसं आम्ही पाँडीच्या जवळ येऊ लागलो, तसतसं समोरचं आकाश भरून आलेलं दिसायला लागलं. ऑरोव्हिलेचा बीच लागला. थोड्याच वेळात आमची टॅक्सी पाँडीत शिरली.
पाँडिचेरीविषयी आपण जे काही ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, तसं काही या गावाचं रूपडं लगेच जाणवत नाही. कुठल्याही भारतीय गावात गेल्यावर जे दिसतं तसंच याही गावात दिसतं. पाँडीचं अंतरंग आम्हाला अजून उलगडायचं होतं. हळूहळू आमची टॅक्सी मिशन स्ट्रीटवरल्या आमच्या कोरामंडल हेरिटेज हॉटेलकडं धावू लागली. मुख्य टाउन भागात शिरल्यावर पाँडीचं अंतरंग दिसू लागलं. अतिशय झगमगीत, ब्रँडेड कपड्यांची दुकानं असलेला रस्ता लागला. या गावावर पूर्वीपासून काँग्रेसचं वर्चस्व होतं. तेव्हा वल्लभभाई पटेल सलाई, कामराज सलाई, नेहरू मार्ग, गांधी पुतळा वगैरे सगळं इथं आहे.
फ्रेंचांची ही वसाहत. इथल्या व्हाइट टाउन या भागात त्या वसाहतीच्या खाणाखुणा दिसतात. बाकीचं गाव आता इतर चार भारतीय गावांसारखंच दिसतं. तीच गर्दी, तोच गजबजाट... अर्थात पुण्याच्या तुलनेत पुष्कळच शांत. एकूण टुमदार. वर्गात सर्वसामान्य दिसणाऱ्या अनेक मुलींत एखादीच देखणी मुलगी असावी, तशी तमिळनाडूच्या पोटात ही 'अळागना पोन्नू' (सुंदर मुलगी) दिसते. फ्रेंच वाइनप्रमाणे अधिक मुरल्यानंतर तर तिची खुमारी अधिकच वाढलेली दिसते. त्या सौंदर्याच्या खाणाखुणा इथल्या व्हाइट टाउननं प्राणपणानं जपल्या आहेत. काही काही ठिकाणी तर केवळ तमिळ व फ्रेंच या दोन भाषांतच पाट्या आहेत.
पुदुच्चेरी हे केंद्रशासित राज्य. इथं विधानसभा आहे, मुख्यमंत्री आहेत. मात्र, दिल्लीप्रमाणेच हा भाग सगळा केंद्रशासित. एन. रंगास्वामी हे गृहस्थ अनेक वर्षं इथले मुख्यमंत्री आहेत. सर्वसामान्यांत मिसळणारे, स्कूटरवरून फिरणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. (आमच्या आशिष चांदोरकरने पूर्वी यांची मुलाखत घेतली होती. तेव्हापासून आम्ही रंगास्वामींना आशिषचे मित्र म्हणतो.) असो.
आम्ही हॉटेलमध्ये येऊन टेकलो. आमची रूम दुसऱ्या मजल्यावर होती. त्यामुळं सतत जिन्यानं चढ-उतार करणं आलं. त्यात पाऊस. संध्याकाळी सहा वाजताच अंधार पडला होता. आम्हाला जेवायला बाहेर जायचं होतं. आम्ही जरा फ्रेश होऊन बाहेर पडलो. पाऊस होताच. छ्त्र्यांचा उपयोग झाला. इथं जवळच सुरगुरू नावाचं व्हेज साउथ इंडियन हॉटेल होतं, असं समजलं होतं. मात्र, ते रिनोव्हेशनमुळं तात्पुरतं बंद असल्याचं कळलं. मग आम्ही अगदी शेजारी असलेल्या एका घराच्या टेरेसवर असलेल्या हॉटेलमध्ये गेलो. इथं अगदी कलोनियल व्हाइब्स होत्या. इथलं आर्किटेक्चर, टेबल, कटलरी, भिंतींवरचे फोटो सगळं तसंच होतं. पाऊस नसता तर टेरेसवरही बसायची सोय होती. मात्र, आम्हाला आत आत बसावं लागणार होतं. तिथं एक तरुणी (ती बहुतेक मालकीणच असावी...) आणि दोन-तीन कामावर असलेली मुलं होती. आम्ही लवकर आलो होतो. त्यामुळ बाकी ग्राहक कुणीही नव्हते तेव्हा. आम्ही शांततेत सगळं ऑर्डर केलं आणि निवांत जेवलो. नंतर काही जण जेवायला आले. बिल आल्यावर कळलं, की हॉटेल जरा महागच आहे. ते सगळे त्या ॲम्बियन्सचे पैसे होते. जेवणही बरंच बरं होतं. सूप विशेष छान होतं. मग पुन्हा पावसात जरा भिजत आमच्या शेजारीच असलेल्या हॉटेलमध्ये परतलो. मोबाइलमध्ये बातम्या बघितल्या. उद्या श्रीलंकेत चक्रीवादळ धडकणार, अशाच बातम्या होत्या. इथं तर सतत पाऊस पडत होता. आमच्या ट्रिपचं काय होणार असा प्रश्न पडला. त्या चिंतेत असलो तरी बरेच दमलो असल्यानं लगेच डोळा लागला. उद्याचं उद्या बघू, असं म्हणत झोपलो...

(क्रमश:)


पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

--------------------