सिनेमातलं क्रिकेट
----------------------

भारतीय लोकांना क्रिकेट, सिनेमा आणि क्राइम या तीन ‘सीं’विषयी अतोनात आकर्षण आहे. या तिन्ही विषयांत बोलायला कुणालाही कसल्याही पात्रतेची गरज नसते. या देशातील प्रत्येक नागरिक अगदी मुक्तपणे या तिन्ही विषयांत आपलं मत व्यक्त करत असतो. त्यातल्या त्यात क्राइम या विषयात सर्वसामान्यांना गप्पांव्यतिरिक्त फार काही करता येण्यासारखं नसल्यानं इतर दोन विषयांना फूटेज अधिक मिळतं, हेही खरं. क्रिकेट आणि सिनेमा ही दोन्ही आपल्याकडची ग्लॅमरस क्षेत्रं. दोन्ही अमाप लोकप्रिय. दोन्ही क्षेत्रांतील माणसांना मोठं वलय. त्यात यश मिळवणाऱ्यांचं अफाट कौतुक होतं. त्यांच्याविषयी एक सुप्त आकर्षण आणि आपुलकीही वाटते. मोठे ‘स्टार’ त्यातूनच जन्माला येतात. क्रिकेट आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रांतील मंडळी एकमेकांच्या क्षेत्रांत जात-येत असतात. सिनेमातल्या मंडळींना क्रिकेटमध्ये थेट खेळायला जाणं कठीण, तसंच क्रिकेटपटूंना थेट कॅमेऱ्यासमोर उभं राहून अभिनय करणं कठीण. मात्र, त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा त्या त्या वेळी घेण्यासाठी हे सर्व प्रकार सर्रास केले जातात. क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांचे विवाह किंवा अफेअर यांचीही आपल्याकडे चवीचवीनं चर्चा चालत असते. गॅरी सोबर्स-अंजू महेंद्रू, टायगर पतौडी-शर्मिला टागोर, व्हिव रिचर्ड्स-नीना गुप्ता, रवी शास्त्री-अमृतासिंग, मोहसीन खान-रीना रॉय, वासीम अक्रम-सुश्मिता सेन, विराट कोहली-अनुष्का शर्मा, हरभजनसिंग-गीता बसरा ही त्यातली काही गाजलेली उदाहरणं. क्रिकेटपटूंनी सिनेमात काम करणं हेही आपल्याकडं नवीन नाही. सुनील गावसकर (प्रेमाची सावली), संदीप पाटील (कभी अजनबी थे), अजय जडेजा (खेल) ही उदाहरणं प्रसिद्ध आहेत. गावसकरने मराठीत दोन गाणीही म्हटली आहेत. ऐंशीच्या दशकात सुनीलनं गायलेलं ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा…’ हे गाणं ‘आकाशवणी’वर सतत लागायचं. अलीकडं खूप वर्षांनी मी ते यू-ट्यूबवर ऐकलं, तेव्हा एकदम लहान झाल्यासारखं वाटलं.
क्रिकेट आणि सिनेमाचं हे असं नातं असल्यानं क्रिकेट रूपेरी पडद्यावर या ना त्या रूपात अवतरणार, यात काही आश्चर्य नाही. क्रिकेटवर आधारित अनेक चित्रपट आले. यात प्रामुख्याने दोन प्रकार दिसतात. एक पूर्ण काल्पनिक कथानकावर आधारित, तर दुसरे क्रिकेटपटूंचे बायोपिक. पहिल्या प्रकारात ‘इक्बाल’, ‘फेरारी की सवारी’ किंवा ‘लव्ह मॅरेज’सारखे सिनेमे येतात, तर दुसऱ्यात ‘८३’, ‘अजहर’, ‘एम. एस. धोनी’, ‘शाबाश मिथू’ असे सिनेमे येतात. याशिवाय ‘सचिन- ए बिलियन ड्रीम्स’सारखा डॉक्यु-सिनेमा या दुर्मीळ प्रकारातला ‘सिनेमा’ही आला आहे. क्रिकेटवर माहितीपट तर विपुल आहेत. आता विविध ओटीटी प्लॅटफॉर्ममुळं अनेक माहितीपट पाहायला मिळतात. त्यात क्रिकेटवर भरपूर माहितीपट उपलब्ध आहेत. मात्र, मला आठवते ते नव्वदच्या दशकात ‘दूरदर्शन’वरून प्रसारित झालेली ‘बॉडीलाइन’ ही प्रसिद्ध मालिका. इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील त्या कुप्रसिद्ध मालिकेवर आधारित ही टीव्हीमालिका खरोखर खिळवून ठेवणारी झाली होती. डॉन ब्रॅडमन, डग्लस जार्डिन, हेराल्ड लारवूड ही नावं तोवर नुसती ऐकली होती किंवा वाचली होती. या मालिकेच्या रूपानं (त्यांच्या पात्रांच्या रूपानं का होईना) तेव्हाचं नाट्य पडद्यावर प्रत्यक्ष अनुभवता आलं होतं. अलीकडं आलेली ‘इनसाइड एज’ ही आयपीएलसारख्या स्पर्धांवर आधारित मालिकाही गाजली होती. अर्थात इथे आपल्याला प्रामुख्याने ‘क्रिकेटचा समावेश असलेले चित्रपट’ याच वर्गवारीचा अधिक विचार करायचा आहे.
त्या दृष्टीने विचार केल्यास वरील दोन्ही प्रकारांतला सर्वोत्कृष्ट किंवा आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी हिंदी चित्रपट आहे तो ‘लगान’. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ २००१ मध्ये प्रदर्शित झाला. क्रिकेट सामन्याची मध्यवर्ती कल्पना घेऊन आशुतोषने तीन तासांचं हे भव्य नाट्य रूपेरी पडद्यावर अतिशय तळमळीनं सादर केलं होतं. आमीर खानच्या करिअरला वेगळं वळण देणारा असा हा सिनेमा होता. ब्रिटिशांच्या सत्ताकाळात एकोणिसाव्या शतकात चंपानेर या मध्य भारतातील एका काल्पनिक संस्थानात घडणारी ही गोष्ट होती. दुष्काळामुळं शेतकऱ्यांना सारा (लगान) देता येत नाही. तेव्हा तो वसूल करण्यासाठी त्या प्रांतातील आढ्यतेखोर अधिकारी कर्नल रसेल गावकऱ्यांसमोर क्रिकेट सामना खेळण्याचा प्रस्ताव ठेवतो. ‘लगान’ रद्द करून घ्यायचा असेल तर अर्थात या सामन्यात इंग्रजांच्या टीमला हरवावं लागेल, ही मुख्य अट असते. गावकऱ्यांच्या वतीनं भुवन (आमीर) हे आव्हान स्वीकारतो आणि कधीही न खेळलेल्या त्या चेंडू-फळी नावाच्या ‘विचित्र’ खेळाचा अभ्यास सुरू करतो. या कामी त्याच्या मदतीला येते कर्नल रसेलची बहीण. हिचं मनोमन भुवनवर प्रेम बसतं. भुवन त्या दुष्काळी प्रांतातील नानाविध प्रकारच्या लोकांना एकत्र करून अक्षरश: एकहाती संघबांधणी करतो. त्यानंतर प्रत्यक्ष सामना रंगतो, त्यात येणाऱ्या अडचणी, भोळ्याभाबड्या गावकऱ्यांचं या खेळाविषयीचं आधी अज्ञान, मग कुतूहल आणि मग जिंकणारी ईर्षा, भुवनची प्रेमकहाणी, कॅप्टन रसेलचे राजकारणी डावपेच… या सगळ्याला देशभक्तीचा जोरदार तडका आणि ए. आर. रेहमानची जबरदस्त गाणी असा सगळा योग जुळून आल्यानं ‘लगान’ सुपरडुपर हिट झाला.

आशुतोष गोवारीकरच्या डोक्यात अनेक वर्षं हे कथाबीज घोळत होतं. त्याला हवा तसा सिनेमा तयार करायला बराच खर्च येणार होता. तो खर्च करायला तयार असणारा निर्माता त्याला मिळत नव्हता. मात्र, आमीर खानला या कथेत ‘स्पार्क’ आढळला. आमीरचा हा अंदाज किती योग्य होता, हे भविष्यात सिद्ध झालंच. आशुतोषनं अतिशय तब्येतीनं, वेळ घेत हा सिनेमा तयार केला. या सिनेमासाठी गुजरातमध्ये भुजजवळ एक गावच वसवण्यात आलं होतं. ‘मेकिंग ऑफ लगान’ नावाच्या माहितीपटात हा सर्व प्रवास तपशीलवार दाखवण्यात आला आहे. अनेक बाबतींत ‘लगान’ हा ‘शोले’सारखा होता. दोन्ही चित्रपटांना लाभलेल्या प्रचंड यशात काही साम्यस्थळं होती. अतिशय बंदिस्त पटकथा, प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहील अशा पद्धतीनं केलेलं काम, मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेता आणि उतम संगीत. याशिवाय ‘लगान’च्या पारड्यात अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे क्रिकेट. या सिनेमाच्या केंद्रस्थानी क्रिकेट होतं. भारत अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत असला तरी आपल्या देशात अगदी तळागाळापर्यंत क्रिकेटचं वेड आणि प्रत्यक्ष तो खेळण्याची मुलांमधली आस ही साधारण १९८३ मध्ये आपण इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रुजली असं म्हटल्यास वावगं ठरू नये. यानंतर पुढचीच वर्ल्ड कप स्पर्धा १९८७ मध्ये भारतातच भरली. यामुळं क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढली. याच वर्षी सुनील गावसकर निवृत्त झाला, पण दोनच वर्षांनी भारताला सचिन तेंडुलकर नावाचा सुपरस्टार मिळाला. यानंतर भारतानं १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर भारतात खासगी वाहिन्या दिसू लागल्या. ‘स्टार टीव्ही’चं उच्च दर्जाचं प्रक्षेपण भारतातही दिसू लागलं. जाहिराती वाढल्या. भारतीय क्रिकेट मंडळ पैशांनी श्रीमंत होऊ लागलं. मग १९९६ चा वर्ल्ड कप पुन्हा भारतात (पाकिस्तान व श्रीलंकेसोबत संयुक्त यजमान) भरला. क्रिकेटच्या छोट्याशा जगावर भारताचं साम्राज्य मैदानावर नसलं, तरी आर्थिकदृष्ट्या जाणवू लागलं होतं. याच काळात शतकानं कूस बदलली. सिनेमाही बदलला. भारतात मल्टिप्लेस संस्कृतीचं आगमन झालं. ‘दिल चाहता है’ हा या नव्या तरुणाईच्या मानसिकतेचा वेध घेणारा फ्रेश चित्रपट याच काळात आला. सुभाष घईंपासून ते फरहान अख्तरकडे असा हा प्रवास सुरू झाला होता. चित्रपटांत वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले होते. याच काळात ‘लगान’ आला. मल्टिप्लेक्सचं आगमन झालं असलं, तरी देशभर अद्याप सिंगल स्क्रीन थिएटरचंच प्राबल्य होतं. त्यामुळं तब्बल सव्वातीन तासांचा हा सिनेमा बघणं तेव्हा प्रेक्षकांना जड गेलं नाही. सिनेमाही अर्थात खिळवून ठेवणाराच झाला होता. भारतीय क्रिकेटही बदलत होतं. सचिन, गांगुली, सेहवाग, लक्ष्मण, द्रविड, कुंबळे, झहीर यांच्या संघात आता विजिगिषू वृत्ती दिसत होती. भुवनच्या संघानं तेव्हाच्या राज्यकर्त्या इंग्लंडच्या संघाला हरवणं हे फारच प्रतीकात्मक आणि अपील होणारं होतं. आशुतोषनं सिनेमातील संघात घेतलेले एकेक खेळाडूही भारतातील सर्व धर्म, प्रांत यांचं नेमकं प्रतिनिधित्व करत होते. अगदी ‘अछूत कचरा’ हे पात्र आणून आशुतोषनं त्याला यातून कोणता संदेश द्यायचा आहे हे बरोबर अधोरेखित केलं होतं. ‘लगान’ भारतीयांना मनापासून आवडेल अशी डिश होती. ती तुफान लोकप्रिय होणार होती, याची बीजं तिच्या कथासूत्रात आणि क्रिकेटसारख्या मध्यवर्ती संकल्पनेचा नेमका वापर करण्यात दडली होती. आजही क्रिकेट या विषयावरचा फिक्शन गटातला सर्वोत्तम चित्रपट म्हणून ‘लगान’चं स्थान अढळ आहे.

‘लगान’नंतर फिक्शन प्रकारात मोठी लोकप्रियता मिळविणारा चित्रपट म्हणून नागेश कुकनूरच्या ‘इक्बाल’चा उल्लेख करावा लागेल. सुभाष घईंची निर्मिती आणि नागेश कुकनूरचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला. यातील ‘इक्बाल’ची भूमिका साकारणाऱ्या श्रेयस तळपदेला या चित्रपटामुळं देशव्यापी (खरं तर विश्वव्यापी) प्रसिद्धी मिळाली. यातील नसीरुद्दीन शाह यांची भूमिकाही उल्लेखनीय होती. इक्बालच्या बहिणीच्या भूमिकेत श्वेता प्रसादनं, आईच्या भूमिकेत प्रतीक्षा लोणकरनं, तर वडिलांच्या भूमिकेत यतीन कार्येकरनं चांगली छाप पाडली. ‘इक्बाल’मधलं ‘आशाएँ खिली दिल में…’ हे केकेनं गायलेलं गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. अगदी आजही ते तितकंच लोकप्रिय आहे. ‘इक्बाल’ ही एका मूकबधिर मुलाच्या स्वप्नांची प्रेरणादायी कहाणी होती. या मुलाला क्रिकेटचं वेड असतं. त्याला भारतासाठी क्रिकेट खेळायचं असतं. मात्र, मूकबधिर मुलाला कोण संघात घेणार? त्याचे वडील त्यामुळं त्याला विरोध करत असतात. मात्र, त्याची धाकटी बहीण त्याला कायम प्रोत्साहन देत असते. अखेर ती मोहित (नसीरुद्दीन) नावाच्या एका मद्यपी क्रिकेटरला भेटते आणि इक्बालला प्रशिक्षण देण्याची विनंती करते. हा मोहित एके काळचा चांगला क्रिकेटर असतो. तो मग इक्बालला कसं घडवतो, याची ही कथा. नागेशनं ही गोष्ट अतिशय साध्या, पण प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या पद्धतीनं मांडली होती. इक्बालचा संघर्ष हा जणू भारतात क्रिकेट खेळू इच्छिणाऱ्या, पण विविध कारणांनी तिथपर्यंत पोचू न शकणाऱ्या अनेक मुलांचा प्रातिनिधिक संघर्ष होता. म्हणूनच तो सगळ्यांना एवढा भावला! नागेश कुकनूरची ही एक सर्वोत्तम कलाकृती म्हणता येईल.
नॉन-फिक्शन प्रकारांत क्रिकेटपटूंवरचे बायोपिक बरेच आले. त्यातला नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट चांगला चालला. मला स्वत:ला त्यात काहीसं अपुरेपण जाणवलं. अर्थात क्रीडापटूंवर बायोपिक बनवणं सोपं नाही. विशेषतः तो खेळाडू अद्याप खेळत असेल तर खूपच. पण तरीही नीरज पांडे दिग्दर्शक असल्यामुळं अपेक्षा उंचावल्या होत्या. हे सर्व लक्षात घेता, हा सिनेमा वन टाइम वॉच वाटला. धोनीसारख्या खेळाडूचं आयुष्य नक्कीच प्रेरणादायी आहे. पण सिनेमा ते सगळं आयुष्य दाखवत नाही आणि इथंच तो अपुरा वाटतो. एक मात्र आहे. सुशांतसिंह राजपूतनं धोनीचं काम फार मस्त केलं होतं. तो संपूर्ण सिनेमाभर धोनीच वाटतो, हे त्याचं यश. रांचीसारख्या छोट्या गावातून येऊन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्यातही सर्वाधिक यशस्वी कर्णधार हा धोनीचा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे. नीरजसारखा दिग्दर्शक असल्यानं हा प्रवास रोचक पद्धतीनं पाहायला मिळेल, अशा अपेक्षेनं आपण सिनेमा पाहायला सुरुवात करतो. सिनेमा खूपच मोठा आहे. तीन तास दहा मिनिटांचा... त्यामानाने त्यात नाट्यमयता कमी आहे. पूर्वार्धात धोनीचं पूर्वायुष्य आलं आहे. (जी खरंच आपल्याला माहिती नसलेली, म्हणजेच अनटोल्ड स्टोरी आहे..) ही सगळी गोष्ट एकरेषीय पद्धतीनं साकारते. पण त्यात आपल्याला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी असल्यानं त्यातील रंजकता टिकून राहते. धोनी शाळेत असतानाचं त्याचं फुटबॉलप्रेम, क्रिकेटकडे अपघातानं वळणं इथपासून ते खरगपूर स्टेशनवर टीसी म्हणून त्यानं केलेली नोकरी हा सगळा भाग पूर्वार्धात चांगला जमला आहे. विशेषतः धोनी हा 'यारों का यार' आहे आणि त्याचे सर्व मित्र आणि त्यांनी धोनीच्या उत्कर्षासाठी केलेला आटापिटा हा सर्वच भाग खूपच सुंदररीत्या समोर येतो. उत्तरार्ध धोनीच्या सगळी क्रिकेट करिअरची चढती भाजणी मांडणारा आहे. हा भाग बऱ्यापैकी निराश करतो. धोनीसारख्या छोट्या गावातून आलेला तरुण भारतीय संघात तेव्हा असलेल्या दिग्गजांशी कसा वागतो, कसा बोलतो, संघ उभारणी कशी करतो, त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या राजकारणाचा मुकाबला कसा करतो, तो स्वतः इतरांविरुद्ध कसं राजकारण करतो, त्याच्या बाजूनं कोण असतं, विरोधात कोण असतं, हे सगळं यात आपल्याला पाहायला मिळेल, असं वाटतं. पण तसं ते काहीच होत नाही. कारण आपल्याकडं बायोपिक काढण्यासाठी वास्तवाचा कठोर सामना करण्याचं धैर्य ना त्या कथानायकाकडं असतं, ना दिग्दर्शकाकडं! बीसीसीआयचा यातला उल्लेख तर एवढा गुडीगुडी आहे, की हसू येतं. गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ज्याचं पोस्टर लहानपणी धोनीनं हट्टानं विकत घेतलेलं असतं, तो सचिन तेंडुलकर... या सर्वांसोबत खेळण्याची, एवढंच नव्हे, तर त्यांचा समावेश असलेल्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी धोनीला मिळाली. तेव्हा त्याला काय वाटलं, तो या सगळ्यांशी कसा वागला-बोलला हे पाहण्यात प्रेक्षकांना रस होता. केवढं नाट्य आहे या घटनेत! पण या सगळ्या घटना सिनेमा आला तेव्हा नुकत्याच घडून गेल्यामुळं आणि खुद्द धोनीही तेव्हा वन-डेत का होईना, पण खेळत होता, त्यामुळे त्या सर्वांवर काहीही भाष्य करायला दिग्दर्शकाची छाती झाली नसावी. असो. सिनेमाचा क्लायमॅक्स अर्थातच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०११ मध्ये झालेला वर्ल्ड कपचा अंतिम सामना आणि त्यात धोनीनं षटकार मारून भारताला मिळवून दिलेला अविस्मरणीय विजय हाच आहे. किंबहुना याच दृश्यापासून चित्रपटाची सुरुवात होते आणि शेवटही इथंच येऊन होतो... हा क्षण पुन्हा जगण्यासाठी हा सिनेमा आपण पाहू शकतो.
‘धोनी’प्रमाणे ‘अजहर’ हा महमंद अजहरुद्दीनवरचा बायोपिक सिनेमा आला होता. इम्रान हाश्मीने यात अजहरचं काम केलं होतं. हा सिनेमा म्हणजे अजहरवर झालेले मॅच फिक्सिंगचे आरोप कसे चूक होते आणि त्याच्यावर कसा अन्याय झाला, हे सांगण्याचा आटापिटा होता. मात्र, तो अजिबात कन्व्हिन्सिंग नव्हता. त्यामुळेच हा सिनेमा अपयशी ठरला.

त्या तुलनेत अगदी अलीकडं आलेला ‘८३’ हा भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजयावरचा चित्रपट उत्तम झाला होता. कपिल देवच्या जिगरबाज नेतृत्वाखाली जिंकलेल्या या यशोगाथेची कहाणी सांगणारा हा कबीर खान दिग्दर्शित चित्रपट. तो बघताना अनेकदा आपले डोळे पाणावतात. हृदय उचंबळून येतं. देशप्रेमाच्या भावनेनं मन ओथंबून जातं. सिनेमा संपला, तरी किती तरी वेळ हा प्रभाव टिकून राहतो. मी तर हा सिनेमा बघून आल्यावर पुन:पुन्हा त्या अंतिम सामन्याची क्षणचित्रं यू-ट्यूबवर बघितली. परत परत तो अपार जल्लोष, ती उत्कट विजयी भावना मनात साठवून घेतली. एवढा त्या सिनेमाचा प्रभाव होता!
कबीर खाननं ‘८३’ सिनेमा अगदी ‘दिल से’ तयार केला आहे, हे त्या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं. खरं सांगायचं तर या सिनेमाचा ट्रेलर मी प्रथम पाहिला तेव्हा मला तो काही तितकासा भावला नव्हता. अगदी रणवीरसिंहही कपिल म्हणून पटला नव्हता. इतर खेळाडू तर सोडूनच द्या! मात्र, त्यामुळंच मी अगदी किमान अपेक्षा ठेवून हा सिनेमा पाहायला गेलो होतो. त्या तुलनेत तो खूपच उजवा निघाला आणि अंत:करणापर्यंत पोचला.
हा सिनेमा अर्थातच केवळ वर्ल्ड कपमधल्या त्या विजयापुरता नाही. तो अर्थातच केवळ क्रिकेटपुरताही नाही. भारताला जागतिक स्तरावर एक ताकद म्हणून ओळख मिळवून देणारी, देशवासीयांचा स्वाभिमान जागविणारी, पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारी अशी ती एक ऐतिहासिक घटना होती. म्हणूनच कबीर खान चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्या काळात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचे सूचक उल्लेख करून आपल्याला त्या काळात नेतो. फूलनदेवी आणि नवाबपूरची दंगल हे त्यातले ठळक उल्लेख.
भारतीय क्रिकेट मंडळ आणि तेव्हाच्या क्रिकेटपटूंची एकूणच सांपत्तिक स्थिती, क्रिकेटच्या जगात, त्यातही वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं असलेलं स्थान, स्वातंत्र्य मिळून ३५ वर्षं झाली तरी इंग्लंडबाबत मनात असलेली ‘साहेबाचा देश’ ही मानसिकता, इंग्लिश क्रिकेट बोर्ड आणि एकूणच तेथील पत्रकार, सर्वसामान्य यांच्या मनात भारताबद्दल असलेली तुच्छतावादी मानसिकता, वेस्ट इंडिजच्या संघाचा तेव्हा असलेला प्रचंड दबदबा, आपले क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय, आपल्या संघाचे उत्साही आणि धडाकेबाज मॅनेजर मानसिंह असे सगळे बारकावे आणि व्यक्तिरेखा कबीर खाननं अगदी बारकाईनं टिपल्या होत्या. त्यामुळंही हा सिनेमा अधिक भिडला असावा.
रणवीरसिंह कपिल म्हणून शोभत नाही, हे ट्रेलर बघून झालेलं माझं मत सिनेमा बघितल्यानंतर पूर्ण पुसलं गेलं. त्यानं फारच मेहनतीनं ही भूमिका साकारली, यात वाद नाही. श्रीकांत झालेल्या जिवा या अभिनेत्यानं मजा आणली. पंकज त्रिपाठीनं मानसिंहच्या भूमिकेत हा सिनेमा अक्षरश: तोलून धरला, यात दुमत नसावं.
सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यावर दोन-तीन वर्षांनी‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जेम्स एरिस्काईन यांनी तो दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट म्हणण्यापेक्षा माहितीपट होता, असं म्हणणं योग्य ठरेल. अर्थात सचिनची लोकप्रियता एवढी, की हा माहितीपटही लोकांनी थिएटरला जाऊन पाहिला. सचिनशी बहुतेकांचं नातं भावनिक असल्यानं हा माहितीपट पाहताना, सचिनचं संपूर्ण करिअर पुन्हा अनुभवताना कित्येकदा भावनोत्कट व्हायला झालं. अनेकदा डोळ्यांत अश्रू आले. सचिनचे कौटुंबिक जीवनातील अनेक महत्त्वाचे क्षण या माहितीपटाच्या निमित्ताने सगळ्यांना पाहता आले. महत्त्वाच्या सामन्यांच्या वेळी सचिन काय तयारी करत होता, त्याची मन:स्थिती कशी असायची, कर्णधारपद सोडताना नक्की काय काय घडलं, ‘टेनिस एल्बो’सारख्या त्रासाला तो कसा सामोरा गेला, हे सगळं या चित्रपटातून थोडं फार समजलं. अर्थात, सचिनविषयीची उत्सुकता पूर्ण शमवण्यात हा माहिती-चित्रपट पूर्ण यशस्वी झाला असं म्हणता येत नाही. सचिनवर चित्रपट तयार करणं हे सोपं काम नाहीच. मात्र, भविष्यात त्याच्यावर पूर्ण लांबीचा चित्रपट (माहितीपट नव्हे) तयार होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. अर्थात, त्यासाठी दिग्दर्शक त्या तोलामोलाचा हवा हेही तितकंच खरं.
या पार्श्वभूमीवर अगदी अलीकडं आलेल्या ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करायला हवा. प्रवीण तांबे या क्रिकेटपटूचं नाव हा सिनेमा येण्याआधी खरोखर फार थोड्या लोकांनी ऐकलं होतं. त्यामुळं सिनेमाचं शीर्षक अगदी यथार्थ होतं. हा सिनेमात प्रवीण तांबेचं काम श्रेयस तळपदेनं केलं आहे. ‘इक्बाल’नंतर त्याचा हा दुसरा महत्त्वाचा क्रिकेटपट. अर्थात, या सिनेमात त्याला प्रत्यक्षातील व्यक्तीची भूमिका साकारायची होती. जयप्रद देसाई या दिग्दर्शकाचा हा चित्रपट प्रवीण तांबे या मुंबईतील अवलिया क्रिकेटपटूची कहाणी मांडतो. या प्रवीण तांबेनं वयाच्या ४१ व्या वर्षी एका आयपीएल संघात स्थान मिळवलं, तेव्हा सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी चकित झाले. ‘हा कोण प्रवीण तांबे?’ असाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्याच प्रवीणचा संघर्षपूर्ण, पण प्रेरणादायी लढा हा सिनेमा आपल्याला सांगतो. श्रेयसनं पुन्हा एकदा यात आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे. क्रिकेटविषयी असलेली प्रचंड आत्मीयता एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय उलथापालथी घडवू शकते, त्याला कुठून कुठे नेऊ शकते, याचं फार प्रत्ययकारी दर्शन दिग्दर्शकानं या सिनेमात घडवलं होतं. चित्रपटाची कथा लिहिणारे किरण यज्ञोपवित यांनाही या यशाचं श्रेय द्यायला हवं.
लोकप्रिय खेळाडूंचे चरित्रपट येत असतातच. आपल्याकडे आत्ताआत्तापर्यंत क्रिकेट म्हटलं, की फक्त पुरुषांचं क्रिकेट डोळ्यांपुढं येतं. मात्र, अलीकडं महिला क्रिकेटलाही चांगले दिवस येत आहेत आणि ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. शुभांगी कुलकर्णी, डायना एडलजी अशा जुन्या काळातील दिग्गज खेळाडूंसारखा संघर्ष आताच्या पिढीला तुलनेनं कमी करावा लागतोय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) आता पुरुष व महिला खेळाडूंचे सामन्याचे मानधनही एकसारखे केले आहे. आताच्या हरमन प्रीत कौर किंवा स्मृती मानधना यांचीही लोकप्रियता पुरुष खेळाडूंसारखीच आहे. अर्थात भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत मोठी खेळाडू म्हणून डोळ्यांसमोर नाव येतं ते मिताली राजचं. मितालीच्या नावे असलेले अनेक विश्वविक्रम आणि खेळातील तिची आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. अशा या मितालीच्या आयुष्यावरही ‘शाबाश मितू’ हा चित्रपट आला आहे, ही फार कौतुकाची बाब आहे. श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात मितालीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने केली आहे. सुमारे दोन तास ३६ मिनिटांच्या या चित्रपटात मितालीची पूर्ण कारकीर्द उभी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. दुर्दैवाने ‘बॉक्स ऑफिस’वर या चित्रपटाला फारसे यश लाभले नाही.

ही झाली प्रत्यक्ष क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित काही चित्रपटांची माहिती; मात्र, काल्पनिक कथानक असलेल्या अनेक हिंदी चित्रपटांत या ना त्या प्रकारे क्रिकेट डोकावलं आहे. अगदी जुनं उदाहरण घ्यायचं म्हणजे देव आनंद व माला सिन्हा यांचा ‘लव्ह मॅरेज’ हा १९५९ मध्ये आलेला सिनेमा. सुबोध मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात नायक देव आनंद हा झाशी शहरातील स्टार क्रिकेटपटू असतो. विशेष म्हणजे सिनेमातलं नाव सुनीलकुमार असतं. नायिका माला सिन्हाला आधी हा नायक आखडू वाटतो, मात्र नंतर त्याचं क्रिकेट पाहून ती त्याच्या प्रेमात पडते वगैरे. देव आनंदचं हे क्रिकेटप्रेम तीस वर्षांनंतरही कायम राहिलं. त्यानं १९९० मध्ये निर्माण केलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘अव्वल नंबर’ या चित्रपटाचं कथानक क्रिकेटकेंद्रितच होतं. कोवळा आमीर खान यात नायकाच्या भूमिकेत होता. गंमत म्हणजे यातही नायकाचं नाव ‘सनी’ असतं. (सुनील गावसकर १९८७ मध्ये निवृत्त झाला होता, आणि सचिनचा उदय व्हायचा होता, अशा काळात हा चित्रपट निर्माण होत होता, हे लक्षात घेतलं पाहिजे.) तर या सनीला क्रिकेट संघात घेतलं जातं, त्याच वेळी रॉनी या दुसऱ्या स्टार क्रिकेटपटूला बाहेर ठेवलं जातं. रॉनी सनीचा बदला घ्यायचं ठरवतो. तेव्हाच एक अतिरेकी क्रिकेटच्या मैदानात बॉम्ब ठेवण्याचा कट रचतो. डीआयजी विक्रमसिंह (साक्षात देवसाब) अर्थातच हा कट उधळून लावतात. भारत वि. ऑस्ट्रेलिया या महत्त्वाच्या सामन्यात मग सनी विजयी खेळी करून भारताला विजय मिळवून देतो, हे ओघानं आलंच. हा देव आनंद यांचा चित्रपट असल्यानं तो ‘अफाट’च होता. तो तिकीटबारीवर जोरदार पडला, हे सांगायची गरज नाही.
अगदी अलीकडच्या काळात म्हणजे २०११ मध्ये अक्षयकुमारचा ‘पतियाळा हाऊस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतीय वंशाचा, इंग्लंडचा फिरकी गोलंदाज माँटी पानेसर याच्या जीवनप्रवासावर ढोबळपणे हा चित्रपट आधारित होता. इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्याचं मुलाचं स्वप्न आणि वंशवादाच्या भीतीमुळं वडिलांचा होणारा विरोध हा संघर्ष अखेर मुलाच्या कर्तबगारीमुळं संपुष्टात येतो, अशी ही कथा. या चित्रपटाला माफक यश मिळालं. भारतात २०११ चा वर्ल्ड कप भरला होता, त्याच कालावधीत हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘क्रिकेट फीव्हर’मुळे सिनेमाला नक्कीच फायदा झाला.
याशिवाय राणी मुखर्जीचा ‘दिल बोले हडिप्पा’ हा २००९ मध्ये आलेला आणखी एक महत्त्वाचा क्रिकेटविषयक चित्रपट. ‘शी इज द मॅन’ हा चित्रपटावरून (जो मुळात शेक्सपीअरच्या ‘ट्वेल्थ नाइट’वर आधारित होता) प्रेरित होऊन तयार झालेला अनुरागसिंह दिग्दर्शित हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. शाहीद कपूरने यात नायकाची भूमिका केली होती. क्रिकेट खेळण्यासाठी पुरुष खेळाडू असल्याचं नाटक करणाऱ्या ‘वीरा’ची भूमिका राणीनं ताकदीनं पेलली होती. चित्रपटाचा विषयच असा होता, की त्यात नाट्य भरपूर होतं. शिवाय भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ‘खुन्नस’ची पार्श्वभूमी होती. हा सगळा तडका, मसाला असल्यामुळं सिनेमा थोडा फार चालला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं तेव्हा ६५ कोटींचा गल्ला गोळा केला होता. राणीच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिला पुरस्कारही मिळाले.
याशिवाय ‘जन्नत’ या २००८ मध्ये आलेल्या इम्रान हाश्मीच्या सिनेमानं क्रिकेटमधील काळे पर्व असलेल्या ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणावर भाष्य केलं होतं. साधारण त्याआधी दहा वर्षांपूर्वी, म्हणजे १९९९ च्या आसपास संपूर्ण क्रिकेट विश्व मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळं वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. ‘जन्नत’मधून क्रिकेट आणि सट्टेबाजी, क्रिकेट आणि अंडरवर्ल्ड या संबंधांवर दिग्दर्शक कुणाल देशमुखनं भाष्य केलं होतं. या चित्रपटाला चांगलं यश मिळालं. पुढं ‘जन्नत’चे आणखी काही भाग आले आणि तेही यशस्वी झाले.
‘फेरारी की सवारी’ हा २०१२ मध्ये आलेला राजेश मापुस्कर दिग्दर्शित चित्रपट अतिशय सुंदर होता. या देशातील सर्वसामान्य नागरिकांचं क्रिकेटशी कसं भावनिक नातं आहे, हे या सिनेमात फार लोभसपणे दाखवलं होतं. यात शर्मन जोशी, बोमन इराणी आणि ऋत्विक साहोर या बालकलाकारानं छान काम केलं होतं. चित्रपटात शेवटी साक्षात सचिन तेंडुलकरचं दर्शन होणं हा चाहत्यांना सुखद धक्का होता.
याव्यतिरिक्त २००७ मध्ये आलेला ‘चैन कुली की मैन कुली’, मुथय्या मुरलीधरनचा जीवनपट मांडणारा ‘८००’ किंवा अगदी अलीकडं आलेला ‘मि. अँड मिसेस माही’ असे अनेक चित्रपट क्रिकेटवर आधारित होते. याशिवाय मला ज्ञात नसलेले किंवा स्मरणातून निसटलेले आणखी काही सिनेमे असतीलच. आणखी एक म्हणजे यात प्रामुख्याने मुख्य धारेतील हिंदी सिनेमाचाच विचार केला आहे. प्रादेशिक भारतीय भाषांत तयार झालेल्या, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झालेल्या (तसे असतील तर) अन्य चित्रपटांची दखल यात घेतलेली नाही. तशी ती घेणं विस्तारभयास्तव शक्यही नाही.
सुरुवातीला म्हटलं तसं क्रिकेट आणि सिनेमा ही आपल्या देशातील आत्यंतिक आवडीची दोन क्षेत्रं. ती एकत्र आणण्याचा मोह भल्याभल्या चित्रकर्मींना झाला. काही यशस्वी झाले, तर काही फसले. कितीही मोठा खेळाडू असला, तरी तो प्रत्येक सामन्यात शतक करू शकत नाही, तसंच हे आहे. मात्र, यातल्या जमलेल्या कलाकृतींनी आपल्या मनमुराद आनंद दिला आहे, यात शंका नाही.

(पूर्वप्रसिद्धी : क्रिककथा दिवाळी अंक, २०२४)
-------