पहाटेची वेळ असते.. आपण कुठं तरी निसर्गाच्या कुशीत... टेकडीवर... सूर्योदय होतोय... पूर्व दिशा केशरिया रंगानं उजळलीय... अन् आपण एक गाणं सुरू करतो... इयरफोनमधून 'लेकिन'मधल्या 'सुनियो जी...' गाण्यापूर्वीची ती जोरदार तान कर्णपटलातून थेट शरीरातल्या प्रत्येक पेशीपेशीत घुसते... ती ऐकता ऐकताच डोळे घळघळा वाहू लागतात... काही तरी प्रचंड दैवी अनुभूती येते... मन भरून येतं... एकदम पवित्र, सुंदर भावनेनं आपण गद् गद् होतो... हे लताचं गाणं...! कित्येकदा ऐकलं, तरी हीच अनुभूती कायम देणारं... काय असेल ही लता मंगेशकर नावाची जादू? काही नावं उच्चारली, की मनात एकदम पवित्र, निर्मळ भाव उमटतात. चेहऱ्यावर हसू उमलतं. लता मंगेशकर हे सात अक्षरी नावही असंच. सप्तसूरच जणू... या नावानं आपल्या जगण्याला अर्थ दिला. आपल्या अस्तित्वाला सार्थकतेचा सूर दिला. आपल्या विरूप, क्षुद्र, क्षुल्लक आयुष्याचा गाभारा स्वरओंकाराच्या निनादानं भारून टाकला...
लता मंगेशकर या नावाच्या ख्यातनाम गायिकेविषयी बोलताना अशा अनेक विशेषणांची खैरात करता येईल. तरीही जे सांगायचंय ते पूर्णांशानं सांगता येईलच असं नाही. कारण सर्वोत्तमालाही व्यापून दशांगुळे उरलेली ही लता नावाची जिवंत दंतकथा आहे. अवकाशाच्या भव्यतेचं वर्णन करता येत नाही, महासागराच्या अथांगतेला लिटरचं माप लावून चालत नाही, सूर्याचं तेज थर्मामीटरनं मोजता येत नाही, तसंच लताच्या गाण्याला कशानं मोजता येत नाही. ही एक अनुभवण्याची गोष्ट आहे.
लहानपणापासून ते मृत्यू येईपर्यंत जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर लताचा स्वर आपल्याला साथ देत आलाय. तो ज्यांनी ज्यांनी प्रथम ऐकला, तेव्हाच सगळ्यांना जाणवलं, की हे नेहमीचं साधंसुधं गाणं नाहीय. हे त्यापलीकडं जाणारं काही तरी आहे. काळीज पिळवटून टाकणारी आर्तता त्यात आहे... काही तरी प्युअर, शुद्ध असं त्यात आहे... जे ऐकल्यावर हिंदीत ज्याला 'सुकून मिलना' म्हणतात, तसं काहीसं आपल्याला होतं. आत कुठं तरी शांत वाटतं, खूप आश्वासक वाटतं... अनेकदा अंतःकरण उचंबळून येतं, पोटात कुठं तरी हलतं, अंगावर रोमांच उभे राहतात... डोळे तर अनेकदा पाण्यानं भरतात. असं आपलं शरीर सतत या सूरांना दाद देत असतं. हा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. काय आहे हे? आपला या स्वराशी असा जैव संबंध कसा जोडला गेला? हीच लताच्या आवाजाची जादू आहे, हे निखालस...
आणखी एक म्हणजे संगीत आपल्या श्वासातच आहे. लय-ताल आपल्या रोमारोमांत आहे. आपण गाणं आवडणारी, गाणारी, गुणगुणणारी माणसं आहोत. हे सात सूर हीच आपल्या हृदयाची अभिव्यक्ती आहे. आपण हसतो, रडतो, रागावतो, चिडतो, रुसतो सारं काही गाण्यांतून... आपल्या या प्रत्येक भावनेला लतानं स्वररूप दिलं. आणि ते एवढं उच्च होतं, की आपल्याला दुसऱ्या कशाची गरजच पडली नाही. लताचा आवाज आणि आपलं जगणं... साथ साथ! या स्वरानं आपला सच्चेपणा कधी सोडला नाही. त्यानं आपल्याला कधी फसवलं नाही. न मागता भरभरून दिलं. वर्षानुवर्षं तो स्वर न थकता, न कंटाळता, न चिडता आपल्याला फक्त देत राहिला... आपण घेत राहिलो आणि तृप्त होत राहिलो. आपली झोळी कायमच दुबळी राहिली... एखाद्या उंच पर्वतशिखरावर उभं राहून अजस्र घनांतून सहस्रधारा दोन हातांनी कवेत घेण्याचा प्रयत्न करण्यासारखंच होतं ते. आपण त्या सूराच्या वर्षावात अक्षरशः बुडून जात राहिलो...
एवढं निखळ, नितळ, स्फटिकासारखं पारदर्शक असं या जगात दुसरं काय आहे? लताचा स्वर मात्र आहे तसाच आहे. त्यामुळं नातीच्या वयाच्या नायिकेलाही तो स्वर सहज शोभून जातो. आपल्या देशात एवढं वैविध्य आहे... एवढे भेद आहेत... पण सगळ्या भिंती मोडून एकच सूर सर्वांना बांधून ठेवतो - तो म्हणजे लतास्वर. याचं कारण त्या आवाजात अशी काही जादू आहे, की तो थेट तुमच्या हृदयात उतरतो. एकदा म्हणजे एकदाही, अगदी चुकूनही तो बेसूर होत नाही. त्याचा कधी कंटाळा येत नाही... एक वेगळंच आत्मिक समाधान मिळतं ते सूर कानी पडल्यावर!
आपण देव कधी पाहिलेला नाही, पण अनेकांना त्याचं अस्तित्व जाणवतं. लताचा आवाज ऐकल्यावर अशीच काहीशी अनुभूती येते. यापेक्षा सर्वोच्च, श्रेष्ठ काही असू शकणार नाही, असं वाटतं.
आपलं भाग्य म्हणून आपण या काळात आहोत. आपण अभिमानानं सांगू शकतो, की आम्ही सरस्वती पाहिली नाही, आम्ही स्वर्ग पाहिला नाही... पण आम्ही लताला ऐकलंय...
लता मंगेशकर नाव धारण करणारा देह आज कागदोपत्री ८४ वर्षांचा झाला... पण लता मंगेशकर नावाची स्वरसम्राज्ञी आपल्या मनात कायमच चिरतरुण राहणार आहे... आजन्म...!
---
(पूर्वप्रसिद्धी - २८ सप्टेंबर २०१३, मटा, पुणे आवृत्ती)
----
अप्रतिम लेख.आधी वाचल्याचे आठवते.
ReplyDeleteधन्यवाद... हो, २०१५ चा आहे.
Delete