चाळिशी नामक 'बुंदीचा लाडू'...
------------------------------------
माणसाला विशी आणि मिशी बरोबरच येते म्हणतात. तशी सोळाव्या वर्षी लव फुटते. पण भरघोस मिशी विशीतच येऊ शकते. चाळिशीबरोबर काय येतं हे ठाऊक नाही. पूर्वी या वयात जो चष्मा लागायचा त्याला चाळिशी असंच म्हणत. हल्ली चार वर्षे वयाच्या मुलालाही चष्मा लागतो. त्यामुळं त्या चाळिशीचा या चाळिशीशी आता संबंध जोडणं योग्य नाही. माझ्यासाठी तरी ही चाळिशी म्हणजे एक नवी ट्वेंटी-२० आहे.
विशीत आपण जसे असतो, तसेच चाळिशीत असतो म्हणतात. विशीत उत्साहानं सळसळणारं यौवन शरीरातून उसळ्या मारत असतं. सगळं जग आपण पादाक्रांत करू शकतो, अशी भावना मनात असते. मन बंडखोर असतं. प्रस्थापित गोष्टी मान्य नसतात. नवं काही तरी करावंसं वाटत असतं. पंधरा ते पंचवीस या वयोगटाला विशीचा वयोगट म्हटलं पाहिजे. या वयोगटात आपण भलतेच स्वप्नाळू तरी असतो किंवा अतिशहाणे तरी असतो. शरीरातून तथाकथित अकलेचे कोंब नको तिथून फुटून बाहेर डोकावत असतात. पण तरी शारीरिकदृष्ट्या आपला हा सर्वोत्तम काळ असतो, असं म्हणायला हरकत नाही. आपण काहीही खाऊ शकतो, पिऊ शकतो, पचवू शकतो. कुठंही हिंडू शकतो, कुठंही राहू शकतो.... एकटं भटकू शकतो. कशाची भीती म्हणून वाटत नाही. पहिलेपणाचे अनेक अनुभव या काळात आपल्या गाठोड्यात जमा होत असतात. वयात येण्याच्या पहिल्या अनुभवापासून ते पहिल्या चुंबनापर्यंत (काहींच्या बाबतीत तर त्याहीपुढे) पहिलेपणाचं नवथर संचित साचत जातं या काळात. आपण आयुष्यात पुढं काय होणार, याचा थोडा फार अंदाज येतो. तरीही जगाच्या दृष्टीनं अजून आपण 'सेटल' झालेले नसल्यानं आपण 'लहान बाळं'च असतो. तरी आयुष्यातला हा सर्वांत धमाल काळ म्हणायला हरकत नाही. थोडक्यात आयुष्य हे माउंट एव्हरेस्ट असेल, तर हा काळ म्हणजे आपला बेस कॅम्प असतो, असं म्हणायला हरकत नाही. (क्रिकेटच्या भाषेत सांगायचं, तर या काळात आपण किमान रणजी सामने खेळू लागतो. 'कसोटी' अजून दूर असते!)
मग येते तिशी... म्हणजे माझ्यासाठी २५ ते ३५ हा वयोगट. आयुष्यात तुम्हाला सर्वार्थानं स्थिर करणारा, सेटल करणारा कालखंड. आपण कोण होणार आयुष्यात, हे याच काळात नक्की ठरतं. करिअर एक तर मार्गी लागतं किंवा त्याची वाट तरी लागते. पण काही तरी निश्चित होतं. करिअर मार्गी लागलं, असं वाटलं, की मग लग्न होतं. एकाचे दोन होतात. दोनाचे चार हात होतात. आपलं जगणं फक्त आपलं राहत नाही. तिथं आयुष्यभराचा जोडीदार साथीला येतो. मग सगळी सुखं-दुःखं दोघांची होतात. आपलं घरही याच काळात होतं. गावभर पाखरांमागं उंडारणारं लेकरू संध्याकाळच्याला गपचिप घरला येऊ लागतं. पोळी-भाजी, आमटी-भात खाऊन गप पडून राहतं. पण त्याला घराकडं चुंबकासारखी खेचणारी त्याची फॅमिली नावाची संस्था तिथं अस्तित्वात आलेली असते हे महत्त्वाचं. थोडक्यात, हा काळ उभारणीचा असतो. विशी म्हणजे घराचं जोतं असेल, तर तिशी म्हणजे भिंती आणि वरचा स्लॅब असते. त्यामुळं या काळात विश्रांती घ्यायला वाव नसतो. आपण अथकपणे पळत असतो. ऑफिसात किंवा व्यवसायात आता आपण थोडे सीनियर झालेलो असतो. त्यामुळं स्वाभाविकच आपल्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा केली जाते. तिथली आव्हानं आणि स्वतःचं घर घेणं, स्वतःची फॅमिली सुरू करणं हे सगळे उभारणीचे प्रयोग याच काळात केले जातात. गिर्यारोहणाच्या भाषेत सांगायचं तर बेस कॅम्पनंतरचा हा मुक्काम असतो. अजून शिखर दूर असतं... पण निम्मा रस्ता आपण जवळपास पादाक्रांत केलेला असतो.
यानंतर येते ती चाळिशी. म्हणजे माझ्या लेखी ३५ ते ४५ हा टप्पा. प्रत्यक्ष वयाची ४० वर्षं पूर्ण होणं म्हणजे या टप्प्यातलाही निम्मा प्रवास संपणं. पण चाळिशी या गटात राहायला अजून पाच वर्षं नक्की हातात असणं. मी ट्वेंटी-२० चा मघाशी उल्लेख केला तो याच कारणासाठी. पूर्वीचं आयुष्यमान जमेस धरलं असतं, तर चाळिशी पूर्ण केलेला माणूस आयुष्याचा निम्मा टप्पा निश्चितच पार केलेला माणूस असं आपण म्हटलं असतं. पण सध्याचं वाढतं आयुष्यमान पाहता मी आणखी पाच वर्षं या टप्प्यात ग्रेस म्हणून देऊ शकतो. थोडक्यात, ४५ वयाचे होईपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याचा निम्मा टप्पा संपला आहे, असं समजायचं कारण नाही. शिवाय आपण त्याकडं कसं पाहतो, यावरही हे अवलंबून आहेच. तर ही पाच वर्षं जमेची हातात आहेत, असं धरलं तर मात्र पुढचा काळ अक्षरशः टी-२० सारखाच खेळावं लागणार आहे, हे निश्चित.
तिशीतल्या आयुष्यानं आपल्याला सेटल केल्यानंतर पुन्हा एक थोडी आरामाची, निश्चिंततेची फेज येते आयुष्यात. तेव्हा असं वाटतं, की विशीमध्ये जे जगायला मिळालं नाही, ते आता जगू या. कारण तारुण्य कायम असतं आणि सेटल होण्यातले महत्त्वाचे टप्पेही पार झालेले असतात. मुलं असतील, तर तीही मोठी झालेली असतात. आपणही करिअरच्या अशा टप्प्यावर आलेले असतो, की तिथून फक्त पुढची शिखरं दिसत असतात. परतीचा मार्ग बंदच झालेला असतो. तेव्हा या काळात ट्वेंटी-२० सारखी तुफान फटकेबाजी करून आयुष्यात जे काही अल्टिमेट साध्य करायचंय त्या ध्येयाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. यासाठी ही चाळिशी आणि पुढची पाच वर्षं महत्त्वाची. पंचेचाळिशीनंतर मात्र आपण निश्चितपणे उताराला लागतो, असं म्हणायला हरकत नाही. अर्थात त्यानंतरही तुम्ही कर्तृत्व गाजवू शकताच. बोमन इराणीचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. इतरही अनेक उदाहरणं असतील.
आणखी एक सांगायचं तर चाळिशीची एक मजा काही वेगळीच आहे. या वयात विवाहबंधनाच्या गाठी पुन्हा पुन्हा घट्ट करण्याचेही प्रसंग येत असतात. पस्तिशीतल्या स्त्रीला एका मराठी चित्रपटात 'बर्फी' असं संबोधण्यात आलं होतं. (आणि ते किती चपखल आहे, हे सांगायला नकोच.) मग पुरुषांनीच काय घोडं मारलंय? पस्तिशीतल्या किंवा चाळिशीतल्या पुरुषाला बुंदीचा लाडू म्हणण्यात यावं. हा लाडू चांगला मुरलेला असतो आणि चवीला तर माशाल्लाह!
हल्लीचा काळ तर असा आहे, की लोक घरचे पदार्थ सोडून बाहेरच बर्फी आणि लाडू खात बसले आहेत की काय, असं वाटावं. चाळिशीतल्या 'प्रमुख आकर्षणां'मधलं हे एक आकर्षण आहे. (फक्त अशा वेळी आपल्या घरच्या बर्फीवरही बाहेरचे बोके ताव मारू शकतात एवढं लक्षात ठेवावं.) बाकी यातला गमतीचा भाग सोडला, तर जेंडर बायस न ठेवता सर्वांशीच मैत्री करण्याचे आणि ती करता करता बर्फीवरून किंवा लाडवावरून घसरून पडण्याचेही हे दिवस असतात. माणसाला असा घसरणीचा मोह होऊ नये, यासाठीच या वयोगटासाठी खास डायबेटिसची योजना झाली असावी. फार गोड खाल्लंत तर पुढं आयुष्यभर ते वर्ज्य करावं लागतं, एवढा सूचक संदेश इथं पुरे.
आता थोडं स्वतःविषयी. चाळिशी आली तरी अस्मादिकांना अद्याप 'चाळिशी' लागलेली नाही. ('टच वूड'! मेल्याची 'नजर' आणि 'दृष्टी' दोन्ही चांगली आहे आणि तशीच राहो!) 'कृतान्तकटकामलध्वजा दिसो लागली' असली, तरी त्यामुळं चेहऱ्यावर एक विनाकारण मॅच्युअर व्यक्ती वगैरे असल्याचा भाव आलेला आहे. साखरेची बाधा झाली असली, तरी अस्मादिक भयंकर शिस्तीचे वगैरे असल्यानं ती बाजू भक्कमपणे लढतील यात शंका नाही.
आता महत्त्वाचं... जगण्याचं प्रयोजन शोधण्याचा प्रयत्न गेलं दशकभर तरी सुरू आहे. शेवटी अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत, की लेखणी हेच आपलं भागधेय आणि लेखन हेच आपल्या जगण्याचं प्रयोजन. आपल्या लेखणीतून सर्वांना निखळ आनंद मिळावा एवढीच इच्छा. अशाच इच्छेतून झालेल्या पहिल्या-वहिल्या लिखाणाचं पहिलं-वहिलं पुस्तक - कॉफीशॉप - लवकरच, म्हणजे येत्या २० डिसेंबरला पुण्यात प्रकाशित करतोय. जगण्याचा उत्सव साजरं करणारं हे लिखाण आहे, असं मला वाटतं. निराशा, दुःख, चिंता, द्वेष आदी गोष्टींना माझ्या व्यक्तिमत्त्वात थारा नाही. तसाच तो माझ्या लिखाणातही नाही. त्यामुळं ते वाचून कुणाला चार घटका निर्भेळ आनंद मिळाला असेल (आणि तो मिळतो असं सांगणारे सुदैवानं खूप जण भेटले...) तर आणखी काय हवं?
आता मी 'वैशाली'तल्या आमच्या लाडक्या कडक कॉफीसारखं ताजतवानं जगायला या टप्प्यावर पुन्हा सिद्ध झालो आहे. माझ्या हातात हात गुंफून, माझे लेख वाचत वाचत तुम्हीही या आनंदसफरीवर यायचंच आहे...
आज इतकंच...
----

वा श्रीपाद. भन्नाट लिहिलं आहेस.
ReplyDeleteबुंदीच्या लाडवाची उपमा तर अफलातूनच.
फक्त एकच खटकलं. तू स्वतःचं वय जाहीर करून आम्हाला आमचं वय लपवण्याची सोय ठेवली नाहीयेस!
धन्यवाद अभिजित... पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया टाकलीस.... धन्य जाहलो... वय तसंही तुझं लपत नाहीच रे....
ReplyDeleteबुंदीचा लाडू भारीच ... २५ ते ३५ हा वयोगट. आयुष्यात तुम्हाला सर्वार्थानं स्थिर करणारा, सेटल करणारा कालखंड. आपण कोण होणार आयुष्यात, हे याच काळात नक्की ठरतं. करिअर एक तर मार्गी लागतं किंवा त्याची वाट तरी लागते....हे वाक्य मला तंतोतत लागू पडते....नेहमीप्रमाणे छान लिहिले आहेस convincing
ReplyDeleteधन्यवाद.... mindspaceofme आतापर्यंत सगुण, साकारांकडून प्रतिसाद मिळत होता. आता mindspaceofme अशा नावाच्या निर्गुण, निराकाराकडूनही प्रतिसाद मिळाला... धन्य जाहलो...
Deleteहा हा हा...अतिशय सुंदर उपमा दिली आहे चाळिशी ची. मी अजुन तिशीत च आहे पण बुंदीचा लाडू च आकर्षण सुरु झाल आहे ;).
ReplyDeleteहा हा हा...अतिशय सुंदर उपमा दिली आहे चाळिशी ची. मी अजुन तिशीत च आहे पण बुंदीचा लाडू च आकर्षण सुरु झाल आहे ;).
ReplyDeleteचांगला मुरलेला आणि चवीला तर माशाल्लाह ! So well said !
ReplyDelete