10 Dec 2015

संमेलन : एक घेणे

संमेलन : एक घेणे
----------------


नमस्कार. आमचं नाव सदा हुके. आम्ही पुण्यात राहत असून आणि लेखनकामाठी करण्याच्या धंद्यात असूनही त्या प्रमाणात लोकप्रिय नाही, याचे वास्तविक आम्हास केवढे तरी वैषम्य वाटावयास हवे होते. पण याच पुण्यनगरीच्या मधोमध (अधूनमधून) वाहणाऱ्या मुठेचे पाणी अस्मादिकांच्या देहात असल्याने ते वाटत नाही, हे खरे. याचे कारण स्वतःमध्येच मश्गुल राहण्याचा आमचा स्वभाव. अगदी नार्सिससच म्हणा ना! आपण बरे, आपले लेखन बरे आणि आपले फेसबुकवरील सदैव चकाट्या पिटण्याचे निरुपद्रवी उद्योग बरे अशी आमची एक जगण्याची रीत बनूनच गेली होती. फेसबुकावरील पोस्टीला किती लाइक आले, यावर आमचे त्या दिवसाचे बरे-वाईट मूड अवलंबून राहू लागले. चार लाइक कमी आले, तर आम्हास अन्न गोड लागेनासे झाले. चार लाइक जास्त आले, तर आम्हास गगन ठेंगणेसे वाटू लागले. (आणखी काही विविक्षित कमेंट आल्या, तर मग आम्हास स्वर्ग दोन बोटे उरू लागला...) अशा रीतीने फेसबुकावरील त्या आभासी जगात आम्ही अगदी म्हशीच्या तन्मयतेने डुंबत होतो. पण अचानक एके दिवशी ती पोस्ट पाहिली आणि आमचे 'होशोहवास' की काय म्हणतात ते साफ उडाले. त्या पोस्टमुळे आम्हास कळले, की आमच्या गावात साहित्य संमेलन होऊ घातले होते. आमच्यासारख्या लेखक माणसास ही केवढी पर्वणी लाभली होती, याची लेखक नसणारांस कल्पना यावयाची नाही. आपण कुठल्याशा ओहोळात डुबकी मारावी आणि डोके वर काढावे तर तो त्रिवेणी संगम निघावा, अशी काहीशी आमची गत झाली. स्वप्नच सत्यात उतरल्यासारखे झाले. आता काय वाट्टेल ते करून आपण हे संमेलन गाजवायचेच, असा निर्णय आम्ही घेऊन टाकला.
आधी आपणच आयोजक व्हावे, अशी एक धाडसी कल्पना मनी आली. मात्र, साहित्य संमेलन घोषित झाले आहे, त्या अर्थी त्याला आधीच एक आयोजक लाभला आहे, याची आम्हास 'आयडिया'च नव्हती. संमेलन आयोजित करायचे तर ही मागणी करायला कुठे जावे लागते, हेही आम्हाला ठाऊक नव्हते. एके दिवशी लकडी पुलावरून दुपारच्या वेळी टु-व्हीलर घातली असता, नेमके पोलिसांनी पकडले अन् आमचा हा प्रश्न सुटला. महाराष्ट्रातल्या पोलिसांनाही साहित्यामध्ये एवढी रुची आहे, याची कल्पना नव्हती. आमच्या झोळीतली सगळी पुस्तकं त्या पोलिसांनी काढून घेतली. किमान साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा पत्ता तरी द्या, असं विनवल्यावर टिळक रस्त्याच्या दिशेने बोट करून त्या पोलिसानं आम्हास जवळपास तेथून हाकलून लावलं. टिळक रस्त्यावरील त्या इमारतीत पाऊल टाकताच आम्हाला एकदम आपण मोठ्ठे साहित्यिक असल्याचा फील आला. सुग्रास अन्नाचा वास दरवळत होता. येथे साहित्यिकांना दुपारचे भोजनही मिळते, या कल्पनेने आम्हाला भरून आले. हात वगैरे धुऊन, कुठे पाट-रांगोळी दिसतेय का ते पाहू लागलो. मात्र, हा सुवास समोरच्या डायनिंग हॉलमधून येत असल्याचे समजताच मनात फुटलेला आशेचा अंकुर अवचित खुडला की हो गेला! तिथे एक शाळेतल्या बाईही आल्या होत्या. त्याही अस्मादिकांप्रमाणेच हरवल्यासारख्या वाटत होत्या. पण लवकरच खुलासा झाला, की याच इथल्या 'हेडबाई' आहेत. बाई आता दोन्ही हात पुढे कर म्हणतील आणि सपासप छड्या मारतील, अशी भीती वाटली. म्हणून हात पाठीमागं बांधूनच आम्ही त्यांच्याशी बोलू लागलो. आमच्या अशा पवित्र्यामुळं आम्ही साहित्यिक आहोत, हे बाईंनी लगेच ताडलं आणि अर्थातच आमच्याकडं संपूर्ण दुर्लक्ष केलं. तिथं आलेल्या एका मंडप कंत्राटदाराशी त्या महिरपीच्या डिझाइनविषयी चर्चा करू लागल्या. त्या तसल्या वातावरणात आम्हास कविता होईल की काय, अशी भीती वाटली. तातडीने शेजारच्या हॉटेलात जाऊन मिसळ चापून आलो. मिसळ हेच वास्तव होय अन् कविता हे मिथक होय, यावर आमच्या तृप्त मनाने ढेकर देत शिक्कामोर्तब केलं. तेवढ्यात त्या वास्तूत एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू झालेला दिसला. दारात एक गृहस्थ येणाऱ्या-जाणाऱ्याला पेढा देऊन बळंच आत ओढत होते. एका अवसानघातकी क्षणी आम्हाला पेढ्याचा मोह पडला अन् आम्ही आत ढकलले गेलो. एका कवितासंग्रहाचं प्रकाशन होतं, असं आत गेल्यावर कळलं. कवी आणि प्रमुख पाहुणे असे दोनच लोक आत उपस्थित होते आणि दोघेही एकमेकांना कविता ऐकवीत होते. आम्ही आत येत आहोत, असं कळल्यावर दोघांनीही आमच्याकडं मोहरा वळविला. त्याबरोबर आम्ही प्राणांतिक किंकाळी मारून बाहेर पडलो आणि पहिली बस पकडून मंडईच्या दिशेनं कूच केले.
या प्रकारानंतर संमेलनाचे आयोजक होण्याची आमची इच्छा मटकन खाली बसली. आयोजक नाही तर नाही, पण किमान संमेलनात सहभाग तरी नोंदवू, या इच्छेनं मात्र हार मानली नव्हती. जरा चौकशी केली असता, पुन्हा त्याच इमारतीत जाऊन हेडबाईंना भेटायला लागेल, असं समजलं. या वेळी मात्र पुरती तयारी करून गेलो. भक्कम बायोडेटा बनवला. ती फाइल बगलेत घेऊन आम्ही सराईत राजकारण्यासारखे त्या इमारतीत शिरलो. पण हाय रे दुर्दैव... हेडबाई आज रजेवर होत्या म्हणे. पण तिथं सफारी घातलेले एक सुपरवायझरसदृश गृहस्थ बसले होते. त्यांच्यासमोर रेशनला पूर्वी साखर किंवा रॉकेल घ्यायला लागत असे, तशी एक मोठ्ठी रांग दिसली. आम्ही त्या रांगेच्या जरा जवळ खेटताच मागच्यांनी रांगेच्या स्वभावाला शोभतील अशा शिव्या दिल्या. आम्ही छताकडं पाहत आपण त्या गावचेच नाही, असं भासवू लागलो. तेवढ्यात एकानं सांगितलं, की ही संमेलनातील परिसंवादात सूत्रसंचालक होऊ इच्छिणाऱ्यांची रांग आहे. त्याबरोबर आम्हाला त्या रांगेतील लोकांच्या शब्दवैभवाचं कोडं एकदम उलगडलं. संमेलनातील एखाद्या परिसंवादात किंवा चर्चासत्रात भाग घ्यायचा असेल, तर काय करायचं, अशी चौकशी सुपरवायझर साहेबांकडं केली. तर त्यांनी खेकसून उद्या या, असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा लकडी पुलावरून सिग्नल मोडून आम्ही त्या इमारतीत घुसलो. आज रांग वाढलीच होती. अनेक दाढीधारी पुरुष आणि बॉबकटवाल्या महिल्या रांगेत उभ्या होत्या. चर्चासत्रात किंवा परिसंवादात भाग घ्यायला गडीमाणसांना दाढी अन् बायकांना बॉबकटही पूर्वअटच असावी, अशी आपली आम्हाला शंका आली. आम्ही रोज दाढी केली, तरी ती न केल्यासारखीच दिसते, त्यामुळे आज फावले. रांग मुंगीच्या पावलांनी सरकत होती. त्या वातावरणात आपल्याला पुन्हा कविता होईल की काय, अशी भीती वाटली. पण स्वतःला सावरलं. पुढच्या बॉबकटवाल्या ताईंच्या दंडावर मोर गोंदला होता, तो पाहत बसलो. आणखीही काही जणांच्या अंगावर गोंदलेलं दिसलं. तेव्हा हीदेखील अट असावी की काय, अशी शंका मनास चाटून गेली. समोरवाल्या ताईंना विचारल्यावर त्यांनी, भारीच विनोदी दिसता, असं म्हणून खुदुखुदू हसून घेतलं. संमेलनात विनोद विषयावर परिसंवाद असता, तर आपल्याला नक्कीच चानस गावला असता, या विचारानं आम्हाला हुशारी आली. पण संमेलनाचे कार्यक्रम पाहता, त्यात विनोदाला स्थानच नसल्याचं लक्षात आलं आणि मन अगदीच हिरमुसून गेलं. बॉबकटवाल्या ताईंच्या गोऱ्या दंडाकडं पाहत आम्ही मोरोपंतांची केकावली आठवत होतो अन् साहित्यिक अनुभूती घेत होतो, म्हणून तरी बरं! नेहमीप्रमाणं आमच्या पुढच्या माणसाचं (अर्थात मोर गोंदलेल्या ताईंचं) काम झालं आणि खिडकी बंद झाली. आमच्या चेहऱ्यावर 'ये दिल माँगे मोर'ची अवकळा दिसताच सुपरवायझर साहेबांनी अत्यंत कारुण्यपूर्ण कटाक्ष टाकला अन् हातानंच आता उद्या... अशी खूण केली. शिवाय एक कुपनही दिलं. आम्ही त्यांना मनोभावे नमस्कार केला आणि मिसळीकडं मोर्चा वळवला. 
दिवस तिसरा! लेंगा-झब्बा अन् कळकट झोळी असा वेश करून गेलो आणि फसलो. सुरक्षारक्षकानं तुमची लाइन तिकडं हाय, असं सांगून समोरच्या शाळेच्या पटांगणाकडं बोट दाखवलं. आम्हाला काही कळेचना. पण सुरक्षारक्षकानं जवळपास शाळेच्या दिशेनं धक्केच मारल्यावर आम्ही तिकडं गेलो. तिकडं संपूर्ण मैदानभर लोक रांगेत उभे होते. बहुतांश जण आमच्यासारखाच पेहराव करून आले होते. त्यात ऐंशी वयाच्या, हातात काठी घेऊन आलेल्या कवळी आजोबांपासून शिशुगटातल्या अथर्वांचे थवे जमले होते. ही टोळधाड कुठून आली, असा विचार करीत होतो, तोच डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. ही कवींची रांग होती तर...! अबब! पळा, पळा... इथून पळा... अशा मनातल्या मनात आरोळ्या ठोकीतच तिथून बाहेर पडलो. घरी जाऊन पहिला लेंगा-झब्बा फेकला. दुसरे कपडे घातले आणि पुन्हा त्या इमारतीजवळ आलो. या वेळी काही अडचण आली नाही. सुरक्षारक्षकानं आत सोडलं. पण आत कुठलीच रांग नव्हती. त्याऐवजी तिथं संमेलनाची कार्यक्रमपत्रिकाच लागली होती.  हा हन्त हन्त! 
अशा तऱ्हेनं आमची संमेलनात सहभागी होण्याची इच्छा अपुरीच राहिली. परिसंवादात सहभागाचा किंवा गेला बाजार सूत्रसंचालनाचा चान्स मिळता, तर फुकटात संमेलन झालं असतं आणि वर मानधनाचं पाकीटही मिळालं असतं. पण आम्ही पुणेकर मराठी लेखक असल्यानं संमेलन आमच्या अंगात कायमच घुमत असतं. संमेलनात तंबूत फुकटात शिरायचे अजून दोन मार्ग शिल्लक होते. एक होता प्रकाशकांचा अन् दुसरा होता पत्रकारांचा... आम्ही आधी प्रकाशकांच्या गोटात शिरलो. स्टॉल टाकायचा की नाही, या मूलभूत वादावरून त्यांच्यातील आपापसांतील चर्चाच 'स्टॉल' झाली होती. त्यामुळं आमच्याकडं पाहायला कुणालाच वेळ नव्हता. नवोदित लेखकाला ताटकळत ठेवण्यात प्रकाशकांना नेहमीच गंमत येते. आमच्या चेहऱ्यावर तशीही सदा याचकाची कळा असते. वास्तविक प्रकाशकांकडं जाणाऱ्या लेखकाच्या अंगी डास किंवा माशी यांचं मनोधैर्य अत्यावश्यक असतं. म्हणजे कितीही वेळा हाकललं तरी न लाजता पुन्हा त्यांच्या नाकावर बसायची कला साध्य असली पाहिजे. आम्ही लेखक असलो, तरी आत्ता पुस्तकाचं काही काम नव्हतं. तरीही चेहऱ्यावर सदैव असलेल्या अजीजीच्या भावानं घोटाळा केला होता. प्रकाशक मंडळींनी आमच्याकडं लक्षच दिलं नाही. संमेलन... स्टॉल... लिलाव... इच्छुक... असे शब्द तुटक तुटकपणे उच्चारले तरी कुणीही ढुंकून पाहिलं नाही. शेवटी आम्ही जीव खाऊन 'आवृत्ती संपली...' असं किंचाळलो, तसे सगळे जण हातातलं काम टाकून अस्मादिकांकडं धावत आले. 'संमेलनात तुमच्या स्टॉलची जबाबदारी आम्हाला द्या,' अशी विनंती सगळ्यांना केली. आवृत्ती कुठली संपली, ते आधी सांग, असा एकच गिल्ला प्रकाशकांनी केला. त्यावर जे इथं नाहीत त्या प्रकाशकांची संपली, असं उत्तर दिल्यानंतर प्रकाशकबंधू आणि भगिनींनी आमची कणीक तिंबली.
या अनुभवानंतर पत्रकारमित्रांकडं जावंसं वाटेना. तरीही धाडस करून एकाच्या कार्यालयात डोकावलो, तर तिथं संमेलनाला जाणाऱ्यांच्या चिठ्ठ्या पाडत होते. ते करुण दृश्य आम्हालाच पाहवेना. एवढं की, या सगळ्या पत्रकार मित्रांना आपल्या खर्चानं संमेलनाला न्यावं, अशी इच्छा मनी प्रकट झाली. पण थोड्याच वेळात आमच्या अंगचं मुठेचं पाणी खवळलं आणि कुणालाही फुकट नेशील तर बघ, असं आम्ही स्वतःवरच डाफरलो. संमेलनाला फुकट जाण्यासाठी एवढा आटापिटा करण्यासाठी आपणच संमेलन भरवलं, तर? मनात कल्पना अशी येताक्षणी आम्ही टुणकन उडी मारली. आम्ही लगेच पत्रकार परिषद बोलावून अंटार्क्टिका खंडावर पहिलं मराठी संमेलन घेण्याची घोषणा करून टाकली. आमच्या या ऑफबीट ठिकाणाचं नाव घोषित होताच साक्षात पेंग्विन प्रकाशनानं संमेलनाचं प्रायोजकत्व घेण्याची तयारी दर्शविली. अंटार्क्टिकावर संमेलन होणार या कल्पनेनं अनेक मराठी साहित्यिकांना हुडहुडी भरली. काही बहाद्दर साहित्यिकांनी 'त्यातल्या त्यात आपल्याला इथून बर्फ नेण्याची गरज नाही; फक्त स्टॉक न्यावा लागेल,' या विचारानं आनंद व्यक्त केला. ...आणि ते रमणीय दृश्य आमच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. चार साहित्यिक हिमनगाच्या टोकावर बसून, मस्तपैकी मराठी साहित्याच्या खोलीविषयी चर्चा करीत आहेत. मधूनच शेजारचा बर्फ उचलून आपल्या ग्लासात घालताहेत... काहींच्या मोठमोठ्या मिशांवर, तर काहींच्या टकलांवर, काहींच्या बॉबकटवर, तर काहींच्या चष्म्यावर पांढरा, भुरभुरता बर्फ गोळा झालाय... मराठी साहित्य थंड पडलेय का, या विषयावर एका तळावर गरमागरम चर्चा रंगली आहे. एवढी की, तिथला बर्फ वितळून पेंग्विनांची पळापळ सुरू झालीय... प्रकाशकांनी इग्लूसारखे स्टॉल उभारले आहेत.... वाचक सरपटत आत जाताहेत... कविकट्ट्यावर तर शब्द गोठलेयत आणि प्रतिभा पाझरतेय अशी काहीशी अवस्था झाली आहे... व्वा व्वा! केवढी मज्जा... आम्ही स्वतः एका नौकेत बसून, या अलौकिक साहित्य चर्चेचा हलत-डुलत आस्वाद घेत होतो. तेवढ्यात कुणी तरी रप्पकन बर्फाचा गोळा आमच्या तोंडावर फेकून मारला... हाय हाय... खाडकन जाग आली... आमचं अर्धांग समोर अंधुकसं दिसत होतं. एका चांगल्या स्वप्नाची समाप्ती झाली होती.... पुढं काय घडलं, ते सांगायलाच पाहिजे का?

---

(पूर्वप्रसिद्धी - जत्रा दिवाळी अंक २०१५)
---

No comments:

Post a Comment