6 Dec 2015

सिनेमॅटिक कलाटणी...

सिनेमॅटिक कलाटणी...
-------------------
प्रत्यक्ष जीवनात काही तरी अतर्क्य किंवा आश्चर्यकारक घडलं, की आपण म्हणतो, हे अगदी फिल्मी स्टाइल झालं! कारण सिनेमात जे काही घडतं ते सगळं असंच घडवून आणलेलं असतं. दिग्दर्शक कथानकाला अशी काही तरी कलाटणी देतो, की प्रेक्षक थक्क होऊन पाहत राहतात. प्रत्यक्ष असं काही घडत नसतं, यावर आपला ठाम विश्वास असतो. पण खरं तर आपल्या वास्तव जगण्यातही असे अनेक प्रसंग येत असतात आणि त्यातून अनेकदा काही तरी वेगळं, अनपेक्षित असं निष्पन्न होत असतं. सर्वसामान्यांच्या आयुष्यातही असे प्रसंग घडतात. पण सिनेमातल्या जगात अशी कलाटणी मिळाली, तर ते किस्से दंतकथा म्हणून अजरामर होतात.
भारतातल्या चित्रपटसृष्टीचा जन्मच मुळी अशा कलाटणीतून झाला. धुंडिराज गोविंद फाळके नावाचा अवलिया इसम जादूचे प्रयोग करता करता या हलत्या चित्रांच्या प्रेमात पडतो काय आणि तिथून स्वतःच सिनेमा तयार करण्याचा ध्यास घेतो काय! खरंच सिनेमात शोभावी अशीच ही कथा आहे. दादासाहेब फाळके यांनी मुंबईत सुरू असलेले परदेशी मूकपटांचे प्रयोग पाहिलेच नसते तर... किंवा त्या प्रोजेक्टरवाल्यानं त्यांना माहिती न देता हाकलून लावलं असतं तर... पण त्या एका घटनेनं दादासाहेबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि भारतात सिनेमाचा जन्म झाला. शंभर वर्षांनी मग त्यांच्या आयुष्यावर सिनेमा निघाला आणि ही हरिश्चंद्राची फॅक्टरी कशी जन्माला आली हे आपण डोळे भरून कौतुकानं पाहिलं.
सिनेमाच्या जगात अशा अनेक विस्मयकारक गोष्टींनी अनेकांची आयुष्यं बदलली. तसं नसतं तर बॉम्बे टॉकीजमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून कामाला लागलेल्या कुमुदमल कुंजीलाल गांगुली उर्फ अशोककुमार उर्फ दादामुनी यांचा जीवनपट वेगळाच राहिला असता. बॉम्बे टॉकीजमध्ये 'जीवननैया' या सिनेमाचं काम सुरू असतानाच ती घटना घडली. बॉम्बे टॉकीजचे प्रमुख हिमांशू रॉय यांची पत्नी देविकाराणी नायक नज्मुल हसन याचा हात धरून चक्क पळून गेली. देविकाराणी हे मोठं प्रस्थ होतं. तिच्या या वागण्यामुळं बॉम्बे टॉकीज हादरली. पुढं देविकाराणी पतीकडं परतल्या. पण नायक नज्मुल हसनची हकालपट्टी ठरलेलीच होती. त्या वेळी हिमांशू रॉय यांना दिसले आपले दादामुनी. तोवर दादामुनी अगदी किरकोळ भूमिका करत असत, पण त्यांचं प्रमुख काम लॅबोरेटरी सांभाळण्याचंच होतं. पण जीवननैयामध्ये हिमांशू रॉयनी त्यांना थेट नायक म्हणून देविकाराणींसमोर उभं केलं. तेव्हाच्या प्रथेप्रमाणं कुमुदमलचं नाव बदलून अशोककुमार करण्यात आलं. त्यानंतर लगेचच आलेल्या 'अछूत कन्या' या चित्रपटातही हीच जोडी होती. या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या तुफान यशानंतर अशोककुमार-देविकाराणी ही तेव्हाची सर्वांत 'हॉट पेअर' ठरली. या घटनेनंतर दादामुनींचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून गेलं आणि भारतीय चित्रपटसृष्टीला एक दादा अभिनेता मिळाला...
याच अशोककुमारचा 'अछूतकन्या'मधला अभिनय बघून भारावलेला पंजाबमधला आणखी एक युवक धरम देवदत्त पिशोरीमल आनंद - अर्थात देव आनंद - एका ब्रेकची वाट पाहत होता. नाटकांत-सिनेमात काम करायचंच या ध्येयानं पछाडलेला देव मुंबईत आला. एका अकौंटन्सी फर्ममध्ये क्लार्क म्हणून काम करणारा देव एके दिवशी पुण्यात तेव्हाच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा प्रभात स्टुडिओत येऊन धडकला. तेव्हा प्रभातचे एक मालक बाबूराव पै यांच्या ऑफिसात शिरलेल्या देवकडे पै पाहतच राहिले. या युवकाचं ते खास दिलखुलास हास्य त्यांना विशेष भावलं आणि या तरुणाला संधी दिली पाहिजे असं त्यांनी ठरवलं. आणि अशा रीतीनं प्रभातच्या हम एक है या सिनेमात देव झाला नायक. याच पुण्यात त्याला भेटला आणखी एक अवलिया मित्र... देवपेक्षा दीड-दोन वर्षांनी लहान असलेल्या या मित्राचं नाव होतं वसंतकुमार शिवशंकर पदुकोण - अर्थात गुरुदत्त. या मित्रांनी मग ठरवलं, की ज्याला आधी संधी मिळेल त्यानं दुसऱ्याला मदत करायची. म्हणजे देवनं जर सिनेमा काढला, तर गुरूला दिग्दर्शक म्हणून संधी द्यायची आणि जर गुरूला आधी सिनेमा मिळाला, तर त्यात देव काम करणार. पुढं झालंही तसंच. पण देवनं मुळात धाडस करून बाबूराव पैंच्या ऑफिसात शिरकाव केला नसता आणि आपलं ते प्रसिद्ध हास्य प्रकट केलं नसतं तर...? 
गुरुदत्तचं नाव घेतलं की अभावितपणे वहिदा रेहमानचं नाव ओठांवर येतंच. साठच्या दशकातली ही सुप्रसिद्ध जोडी. पण वहिदाला व्हायचं होतं मुळात डॉक्टर. ते काही जमलं नाही आणि नृत्यनिपुण असलेल्या वहिदाला तेलगू आणि तमिळ सिनेमांत काम मिळालं. तिला गुरुदत्तनं पाहिलं ते हैदराबादमध्ये. तेव्हा सीआयडीसाठी तो नव्या चेहऱ्याच्या शोधात होता आणि त्याचा मित्र अब्रार अल्वी त्याला हैदराबादमध्ये घेऊन आला होता. गुरुदत्त वहिदाला घेऊन मुंबईत आला आणि मग पुढचा सगळा इतिहास प्रसिद्ध आहे. 
प्रत्येक कलाकार मोठ्या यशासाठी, एका ब्रेकसाठी धडपडत असतो. मग असं काही तरी घडतं आणि त्या कलाकाराचं आयुष्यच बदलून जातं. मेगास्टार अमिताभ बच्चन हे याचं सर्वांत मोठं आणि महत्त्वाचं उदाहरण म्हणता येईल. आपल्या खर्जातल्या आवाजासाठी पुढं गाजलेल्या अमिताभला सुरुवातीच्या काळात आवाज चांगला नाही, या कारणासाठी आकाशवाणीवर नोकरी नाकारण्यात आली होती. अर्थात अमिताभचं कुटुंब तसं प्रभावशाली होतं. त्याचे वडील भारतातले प्रख्यात कवी होते. त्यांची गांधी कुटुंबाशी मैत्री होती. या सगळ्या कारणांमुळं अमिताभला चित्रपटसृष्टीत संधी लगेच मिळाली. पण मोठं यश पाहायला जी कलाटणी लागते ती दिली प्रकाश मेहरांच्या 'जंजीर'नं. या चित्रपटासाठी प्रकाश मेहरा आधी देव आनंदचा विचार करीत होते. देवनं गोष्ट ऐकून सिनेमा करायलाच नकार दिला. मग मेहरा गेले धर्मेंद्रकडं. पण त्याचंही काही जमलं नाही. त्यानंतर मेहरांना कुणी तरी अमिताभचं नाव सुचवलं. अमिताभ तोवर चित्रपटसृष्टीत तसा झगडतच होता. पण 'जंजीर'च्या रूपानं अमिताभला पडद्यावरचा अँग्री यंग मॅन गवसला. समजा, जंजीर देव आनंदनं स्वीकारला असता तर?
हिंदी चित्रपटसृष्टीतला आत्तापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट मानल्या गेलेल्या 'शोले'बाबतही वेगळं काही घडलं नाही. रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले मोठा गाजावाजा करून १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला. सुरुवातीला सिनेमा समीक्षकांनी तर या सिनेमाला नाकारलंच. प्रचंड हिंसा असलेला हा चित्रपट आपल्याला फार काही देत नाही, असाच सगळ्यांचा सूर होता. रमेश सिप्पी आणि त्यांचे सहकारी कानात प्राण आणून सिनेमाबाबतच्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी सज्ज होते. मात्र, एकही अनुकूल प्रतिसाद येईना. शोलेची लांबी (१५ ते २० मिनिटांच्या सेन्सॉर कटनंतरही) तीन तास दहा मिनिटं एवढी प्रचंड होती. प्रेक्षकांना सिनेमा आवडत होता की नव्हता, हेच कळत नव्हतं. पहिले दोन दिवस तसे नरमच गेले. असं म्हणतात, की तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी सिप्पींनी निर्णय घेतला, की पुन्हा बंगळूरला जाऊन रिशूट करायचं. शेवट बदलायचा. सिनेमाच्या शेवटी अमिताभ मरतो, हा शेवट प्रेक्षकांना मान्य नाही, अशी कुणकुण त्यांच्या कानावर आली होती म्हणे. (आधीच सेन्सॉरनं सिप्पींना मूळ चित्रित केलेला शेवट बदलायला लावला होता. ठाकूर गब्बरला क्रूरपणे मारतो, हा शेवट तेव्हाच्या सेन्सॉर बोर्डाला मान्य नव्हता. त्यामुळं तो बदलून शेवटी पोलिस घटनास्थळी येतात, असं दाखवण्यात आलं. असो.) 
त्यामुळे पुन्हा एकदा 'शोले'चा शेवट बदलणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्या वेळी कुणी तरी त्यांना आणखी एकच आठवडा थांबून प्रतिसाद पाहण्याचा सल्ला दिला. सिप्पीनं ऐकलं. पुढच्याच आठवड्यात केवळ माउथ पब्लिसिटीवर शोले उचलला गेला. मुंबईत 'मिनर्व्हा'त तुफान गर्दी लोटली. सिनेमातल्या प्रत्येक दृश्याची, संवादाची, गाण्यांची आणि गब्बरची चर्चा नाक्या-नाक्यावर होऊ लागली. तिकिटं ब्लॅकमध्ये खपू लागली आणि शोले नावाचा इतिहास जन्माला आला. समजा, सिप्पींनी एक आठवडा थांबण्याचा निर्णय घेतला नसता तर? कदाचित वेगळीच कलाटणी मिळाली असती. 
आमीर खान आणि आशुतोष गोवारीकर या दोघांच्याही करिअरला महत्त्वपूर्ण कलाटणी देणाऱ्या लगान या चित्रपटाचा किस्साही असाच आहे. आशुतोषकडं 'लगान'ची गोष्ट कित्येक वर्षं तयार होती म्हणे. पण ही गोष्ट प्रत्यक्ष पडद्यावर येणं अशक्य आहे, अशी मनाची तयारी त्यानं करून ठेवली होती. कारण तोपर्यंत आशुतोष फार काही यशस्वी दिग्दर्शक म्हणून गणला जात नव्हता. तो आधी ही गोष्ट घेऊन शाहरुख खानकडं गेला होता. मात्र, शाहरुखला गोष्ट आवडली नाही आणि त्यानं आशुतोषला आमीरकडं पाठवलं. आमीरला गोष्ट आवडली पण एवढं महाकाय बजेट असलेला चित्रपट करायला निर्माताच मिळेना. कारण ही गोष्ट कितपत चालेल, लोकांना रुचेल याचा आधी काहीच अंदाज कुणाला येत नव्हता. फक्त आशुतोष ठाम होता. 
अखेर त्याचा निर्धार पाहून आमीरनं स्वतः या चित्रपटाचा निर्माता होण्याची तयारी दाखवली आणि मग पुढं घडलेला इतिहास आपल्याला माहिती आहे. लगान भारतात तुफान यशस्वी तर झालाच; पण त्यानं ऑस्करमध्येही परदेशी चित्रपटांच्या गटात अंतिम पाचांत स्थान मिळवलं होतं. लगाननं आमीरच्या करिअरला एक निर्णायक वळण दिलं. या चित्रपटानंतर आमीर अगदी निवडक आणि महत्त्वाचेच सिनेमे करू लागला. आशुतोषलाही या चित्रपटानं अव्वल दिग्दर्शकांच्या रांगेत नेऊन बसवलं. आमीरनं आशुतोषच्या पटकथेवर विश्वास दाखवला नसता तर?
मराठी चित्रपटसृष्टीचा विचार करतानाही अशी काही कलाटणी मिळून बदललेल्या कारकिर्दी आपल्याला पाहायला मिळतात. राजा गोसावी हे याचं एक ठळक उदाहरण म्हणता येईल. ते ज्या 'लाखाची गोष्ट' या चित्रपटाचे नायक होते, त्याच चित्रपटाची तिकिटे त्यांनी पुण्यात भानुविलास टॉकीजमध्ये बसून विकली होती. मला वाटतं, हा एक जागतिक विक्रम असावा आणि तो कुणी आता मोडेल असंही वाटत नाही. आणि हो, त्यांनी काही स्वतःच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वगैरे हा फंडा वापरला नव्हता, तर ते खरंच तिथं नोकरी करीत होते. राजा गोसावी यांना नाटका-सिनेमाचं पराकोटीचं वेड होतं. या वेडापायी त्यांनी चौथ्या इयत्तेपर्यंत कसंबसं शिक्षण पूर्ण केलं आणि मग ते लगेच मुंबईला धावले. मा. विनायकांकडं त्यांनी ऑफिसबॉय म्हणून काम ­­­करायला सुरुवात केली.
नंतर सुतारकाम, पुढं मेक-अप, प्रकाश योजना आदी खात्यांत काम करीत करीत ते 'एक्स्ट्रा' नट झाले. त्यांची धडपड पाहून त्यांना सिनेमात कामं मिळू लागली आणि राजा परांजपेंनी तर त्यांना 'लाखाची गोष्ट'मध्ये नायक म्हणून काम दिलं. हा सिनेमा जोरदार चालला. मग आपल्याच सिनेमाची तिकिटं विकणाऱ्या या मनस्वी कलाकाराला नंतर कधी मागं वळून पाहावं लागलं नाही. एका अर्थानं त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात 'लाखाची गोष्ट' आणणारी ही मोठी कलाटणीच ठरली. 
मराठी चित्रपटसृष्टीच्या बाबतीत एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी कलाटणी देणारी एक गोष्ट घडली ती श्वास या सिनेमाच्या निमित्तानं. श्वास सिनेमाचं यश एवढं महत्त्वाचं मानलं गेलं, की मराठीत श्वासपूर्व आणि श्वासोत्तर अशा सिनेमाच्या पिढ्या मानल्या जाऊ लागल्या. नव्वदच्या दशकात आलेल्या सुमार विनोदी सिनेमांच्या लाटेनंतर मराठी चित्रपट अत्यंत मरगळलेल्या स्थितीत होता. स्मिता तळवलकर, सुमित्रा भावे किंवा अमोल पालेकर असे काही अपवाद वगळले, तर चांगले सिनेमे तयार होत नव्हते. वर्षाला तयार होणाऱ्या सिनेमांची संख्या १०-१२ पर्यंत खाली आली होती. 'उरला अनुदानापुरता' अशी एकूण मराठी सिनेमाची भीषण अवस्था होती. अशा वेळी संदीप सावंत दिग्दर्शित श्वास या सिनेमानं जणू या मृतवत इंडस्ट्रीत पंचप्राणांचा श्वास फुंकला. मराठी सिनेमाला संजीवनी मिळाली. पुढं अनेक दर्जेदार सिनेमे निघाले. अनेक तरुण मुलं सिनेमा निर्मितीत, दिग्दर्शनात उतरली... आज मराठी सिनेमांच्या निर्मितीची संख्या वर्षाला शंभरच्या वर गेली आहे. 
अशा या काही आपल्या सिनेमा जगतातल्या कलाटणी देणाऱ्या महत्त्वाच्या घटना. आणखीही अनेक आहेत, असू शकतील. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी...
 
 
-----------------------------------------------
(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी अंक २०१५ - कलाटणी विशेषांक)
----

3 comments: