2 Dec 2015

माझे 'पत्र-मित्र'


वृत्तपत्रांतील वाचकांच्या पत्रव्यवहाराचं मला कळत्या वयापासूनच आकर्षण होतं. अगदी पुढं आयुष्यात मी पत्रकारच होईन आणि माझं रोजचं आयुष्य वृत्तपत्राशीच जोडलं जाईल, याची मला अजिबात कल्पना नव्हती, तेव्हापासून हे आकर्षण होतं. वाचकांच्या पत्रव्यवहारातील अनेक नावं वाचून वाचून माहिती झाली होती. मी वृत्तपत्रं वाचायला सुरुवात केली ती वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासून. तो काळ होता १९८१-८२ चा. तेव्हा वाचलेल्या काही बातम्या, उदा. आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा अजहरुद्दीन नावाच्या नव्या खेळाडूचं रणजी स्पर्धेतील शतक वगैरे मला आजही आठवतात. क्रिकेट हा आवडता खेळ असल्यानं क्रिकेटपटूंचे फोटो कापून ठेवायचा छंदही होता. या काळात प्रामुख्यानं सकाळ, तरुण भारत किंवा केसरी ही वृत्तपत्रं आमच्या गावी (जामखेडला) जास्त वाचली जात. लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स किंवा नवा काळ ही मुंबईची वृत्तपत्रं ग्रंथालयात क्वचित पाहायला मिळायची. पुढं मी नगरला राहायला गेलो आणि तेव्हा नगरमध्ये स्वतंत्र आवृत्ती सुरू झालेला 'नगर केसरी' हा पेपर आम्ही घरी घ्यायला सुरुवात केली. अगदी सहाच पानांचा हा पेपर असायचा आणि त्याची किंमत पन्नास की साठ पैसे एवढीच होती. मात्र, तो भल्या पहाटे म्हणजे सहा वाजताच घरी यायचा. जामखेडमध्ये आम्हाला एवढ्या सकाळी पेपर घरी येण्याची सवय नव्हती. आपण शहरात आलो, याची ती पहिली सुखद जाणीव होती, असं म्हणायला हरकत नाही. तर या 'केसरी'मध्ये मी सर्वांत पहिल्यांदा एक पत्र पाठवलं. अजहरुद्दीनच्या संदर्भातच होतं, एवढंच आता आठवतंय. त्यानंतर 'सकाळ'मध्येही मी काही पत्रं पाठवली. मात्र, 'सकाळ'मध्ये एकदाही माझं पत्र छापून आलं नाही. (पुढं पत्रच काय, माझे अनेक लेख, बातम्या, परीक्षणं 'सकाळ'मध्ये छापून यायची होती, हे तेव्हा माहिती नव्हतं.) पुढं नगरला 'लोकसत्ता' सुरू झाला आणि आम्ही हा पेपर घरी लावला. मग मी 'लोकसत्ता'तही पत्रं पाठवू लागलो. तिथंही एक-दोन पत्रं प्रसिद्ध झाली. तोपर्यंत अनेक पत्रलेखकांची नावं पाठ झाली होती. उदा. रा. चिं. दाते (राजगुरुनगर), वसंत देवधर (बार्शी), धोंडीरामसिंह राजपूत (वैजापूर), अशोक कोर्टीकर (पंढरपूर), अशोक आफळे (कोल्हापूर), सुधाकर डोईफोडे (नांदेड), डॉ. प्रकाश कवळी (दादर) आदी लोक नियमितपणे विविध वृत्तपत्रांना पत्रं पाठवीत असत. त्यातली ही फक्त काही वानगीदाखल, सहज आठवलेली नावं. (चु. भू. दे. घे.) 
पुढं मी १९९७ मध्ये 'सकाळ'मध्ये रुजू झालो आणि वाचकांच्या पत्रव्यवहाराचं विराट स्वरूप माझ्या लक्षात आलं. आम्ही जर्नालिझममध्ये शिकलो, त्याप्रमाणं किमान असिस्टंट एडिटर (सहसंपादक) दर्जाची व्यक्ती वाचकांचा पत्रव्यवहार हाताळत असे. त्यावरून या गोष्टीला वृत्तपत्रांत किती महत्त्व दिलं जातं, हे लक्षात आलं. 'सकाळ'मध्ये काम करीत होतो, तोपर्यंत वाचकांच्या पत्रव्यवहाराचं काम मला प्रत्यक्ष कधीच पाहायला मिळालं नाही. कारण तिथं संपादकीय पानाची एक वेगळी टीम होती आणि त्यात सर्व सीनियर सहकारी असत. मात्र, मुक्तपीठ पुरवणीच्या निमित्तानं मी आणि माझा सहकारी अभिजित पेंढारकरनं एकूण वाचकांचे लेख आणि त्यांचा प्रतिसाद हा काय प्रकार असतो, हे जवळजवळ दोन-तीन वर्षं नीटच अनुभवलं. आमच्या आधी दीनदयाळ वैद्य या पुरवणीचं काम पाहत असे. त्यानं 'मुक्तपीठ'ची नीट घडी बसवली होती आणि सदरंही सुरळीत सुरू होती. मात्र, त्याच्यानंतर आम्हाला या पुरवणीचं काम पाहायला सांगण्यात आलं तेव्हा वाचकांच्या प्रतिसादाची नेमकी कल्पना आली. आम्हाला आमचं ऑफिसमधलं नियमित उपसंपादकी काम सांभाळूनच हे काम पाहायचं होतं. एक आठवडा मी आणि एक आठवडा अभिजितनं हे काम पाहावं, असं ठरलं. दीनदयाळनं शिस्तीत सर्व सदरांच्या फायली करून ठेवल्या होत्या. मात्र, या फायली आता अक्षरशः ओसंडून वाहत होत्या. 'मुक्तपीठ'सारखं व्यासपीठ मिळाल्यानं पुणेकरांच्या प्रतिभेला विलक्षण पान्हा फुटला होता. ही प्रतिभा आमच्याकडच्या फायलींमधून ओसंडून वाहत होती. 'लिहिणाऱ्यांचे हात हजारो, दुबळी माझी पुरवणी...' असं म्हणायची बारी आली होती. तरीही आम्हाला हे काम करण्यात आनंद होत होता. या पुरवणीनं अनेक लोकांना लिहितं केलं. अनेकांमधली उपजत साहित्य प्रतिभा उफाळून आणली. त्यामुळं आम्हालाही अनेकांच्या आयुष्यातले चित्तथरारक प्रसंग समजले. जगाची भटकंती करणारे हौशी लोक अन् त्यांचे तेथील नानाविध अनुभव कळले. प्रवासाचे नमुनेदार किस्से वाचून हसलो. डोळ्यांत पाणी आणणारे, भावनाशील व्हायला लावणारेही काही लेखन असायचे. या सर्वांच्या वाचनातून माणूस म्हणून मी जास्त घडत गेलो, असं आता वाटतं. आयुष्य किती गुंतागुंतीचं आहे किंवा त्यात केवढ्या शक्यता दडलेल्या आहेत, याचा उलगडा स्तंभित करायला लावणारा होता. नाना प्रकारच्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव, नातेसंबंध, त्यातले ताण, माणसांचे निरनिराळे पैलू, जगण्यातलं अफाट वैविध्य हे सारं पाहून जगण्याच्या या विशाल रहाटगाडग्याकडं पाहण्याचा एक उदार दृष्टिकोन आपोआप तयार झाला. 
'मुक्तपीठ'मध्ये आलेले दोन अनुभव विशेष लक्षात राहिले. एक लेख होता 'चक्रव्यूह' नावाचा. पिंपरी-चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका मध्यमवयीन गृहस्थांनी तो लिहिला होता. आर्थिक ताणामुळं आयुष्यात निर्माण झालेल्या चक्रव्यूहाचं वर्णन त्यात त्यांनी केलं होतं. या लेखावर खूप मोठ्या प्रमाणावर वाचकांचा प्रतिसाद आला. त्यांना मदत करायची तयारी अनेकांनी दाखवली. काही उद्योजकांनी त्यांना नोकरी देऊ केली. काहींनी हे लिहिणारे गृहस्थ कसे पैसे बुडवण्यात पटाईत आहेत, हेही सुनावलं. एकूणच असे उलट-सुलट अनुभव लक्षात घेता, आम्ही त्या गृहस्थांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. त्यांच्या पत्नीसह ते आले. आमच्या वरिष्ठांकडं त्यांना घेऊन गेलो. वरकरणी तरी हा माणूस सभ्य व खरा वाटत होता. त्यामुळं त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं. या लेखाला आलेल्या प्रतिसादामुळं त्यांचं जगणंच बदलून गेलं होतं आणि त्यांना आता जगण्याची पुष्कळ उमेद वाटू लागली होती. खरं तर आम्ही असे लेख प्रसिद्ध केले, तेव्हा त्या लिहिणाऱ्या माणसानं केलेलं प्रतिपादन सत्य आहे की नाही, हे ताडून पाहण्याची कोणतीच यंत्रणा आमच्याकडं नव्हती. लोक खरं लिहितील, या गृहितकावर, विश्वासावर हे सगळं चाललं होतं. सुदैवानं आम्हाला फार वाईट अनुभव आले नाहीत. शिवाय आपल्याला नैसर्गिकरीत्याच एक सेन्स असतो. कोण खरा, कोण लफंगा हे अनुभवी नजरेतून सहज कळू शकतं. त्यातून आम्हाला तर आमच्या व्यवसायामुळं रोज अनेक लोकांना भेटण्याचा अनुभव आणि प्रत्येकाचे वेगळे किस्से. त्यामुळं फार अडचण आली नाही. या उपरोक्त लेखाबाबतही आमची धारणा सकारात्मकच होती आणि त्या गृहस्थांना मदत झाल्याचं समाधान वाटलं.
दुसरा अनुभव तर फारच भन्नाट होता. तळेगाव दाभाडे येथील शिरीष जोशी यांचा 'कोण म्हणतं बेरोजगारी आहे?' या शीर्षकाचा एक लेख छापून आला. जोशीबुवा स्वतः खाद्यपदार्थांची फिरती गाडी घेऊन या पदार्थांची विक्री करीत. ते रोज सकाळी तळेगावातून औंध परिसरात येत आणि तिथून हिंजवडी आयटी पार्क आणि लगतच्या परिसरात हे पदार्थ विकत असत. आयटी कंपन्यांतील मराठी मुलांना पोळी-भात, भाजी असं साधं जेवण पुरवणारे डबे हवे आहेत आणि तिथं प्रचंड मागणी असूनही पुरवठा त्या मानानं कमी आहे, असं त्यांचं निरीक्षण होतं. तेव्हा ज्यांची कष्ट करायची तयारी आहे, त्यांनी ही पुरवठ्याची जबाबदारी घ्यावी आणि बऱ्यापैकी पैसे कमवावेत, असं आवाहन त्यांनी त्या लेखात केलं होतं. हा लेख प्रसिद्ध झाला आणि त्यावर प्रतिक्रियांची एवढी धो-धो बरसात सुरू झाली, की आम्ही थक्क झालो. रोजगार आणि रोजगारनिर्मिती हा आपल्या समाजातला केवढा ज्वलंत प्रश्न आहे, याची त्या निमित्तानं जाणीव झाली. अनेक बेरोजगार तरुणांना जोशींना भेटायचं होतं. त्यांच्याशी संवाद साधायचा होता. आम्ही पुढच्या आठवड्यात या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या. जोशींच्या फोनला तर विश्रांतीच नव्हती. पुढच्या आठवड्यात त्यांनी हा भारावून टाकणारा अनुभव पुन्हा शब्दबद्ध केला. त्यानंतरही हा ओघ थांबेना. शेवटी जोशींनी आमच्या वरिष्ठांना विनंती केली आणि या सगळ्या लोकांसाठी एखादा मेळावा भरवता येईल का, अशी विचारणा केली. त्यानंतर प्रत्यक्षात असा एक मेळावा झालादेखील. त्यातून काही जणांनी तरी निश्चित रोजगारनिर्मितीच्या दिशेनं पाऊल टाकलं. एका लेखाचा हा क्रांतिकारक परिणाम होता. आपल्या कामाचं समाधान मिळणारे जे काही मोजके क्षण असतात त्यातलाच हा एक क्षण होता. 
असं असलं, तरी संपादकीय पानावरील वाचकांच्या पत्रव्यवहाराचं संपादन करण्याचं माझं स्वप्न हे स्वप्नच राहिलं होतं. पुढं मी २०१० मध्ये 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये रुजू झाल्यानंतर मात्र अचानक माझं हे स्वप्न पूर्ण झालं. इथं पहिल्या दिवसापासून मला 'बहुतांची अंतरे' हे 'मटा'तलं वाचकांच्या पत्रव्यवहाराचं सदर हाताळता आलं. 'मटा'ला पुण्यात पहिल्या दिवसापासूनच उदंड प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला मूळ मुंबईतले किंवा कोकणातले किंवा नोकरीच्या कारणाने अनेक वर्षे मुंबईत राहिलेले असे लोक मटा प्राधान्यानं घेऊ लागले. त्याचबरोबर नवा पर्याय हवा असणारे अनेक पुणेकरही मटा घेऊ लागले. हे सर्व वाचक मटाला भरभरून पत्रं पाठवून प्रतिसाद देऊ लागले. 'महाराष्ट्र टाइम्स'मधील पत्रव्यवहाराला एक गंभीर चर्चेचं स्वरूप सुरुवातीपासून होतं. अनेक विषयांवर चर्चा इथं झडल्या. अगदी आत्म्याच्या अस्तित्वापासून ते बुद्धिप्रामाण्यवादापर्यंत आणि संघाच्या विचारधारेपासून ते कम्युनिस्टांच्या पोथिनिष्ठतेपर्यंत अनेक विषयांवर वाद-विवादाच्या फैरी झडल्या. अनेकदा बहुतांची अंतरे या सदरातील लहान जागा पुरत नसे. त्यामुळं मी संपादकीय पानासमोरच्या पानावर (ज्याला 'ऑप-एड' म्हणतात) 'मतमतांतरे' नावाचं सदर सुरू केलं. यात सविस्तर पत्र छापता येत असे. वाचकांच्या लक्षात हे आल्यानंतर खास 'मतमतांतरे'साठी पत्रं यायला सुरुवात झाली. गेल्या पाच वर्षांत यातील अनेक लेखकांची व माझी प्रत्यक्ष भेट नसली, तरी त्यांच्या लिखाणातून एक नातं तयार झालं आहे. जवळपास रोज नेमानं एक पत्र पाठवणारे दिलीप कुलकर्णी, बँकेत काम करणारे व आता सेवानिवृत्त झालेले सुरेश परांजपे, चिंचवडचे जीवनधर जबडे, प्रा. य. ना. वालावलकर, अनिल अगावणे, प्रभा वझे, वासंती सिधये, स्वाती देशपांडे, गजानन कुलकर्णी, बाळासाहेब कुंभार, गंगाराम ताटी, काशिनाथ देवस्थळी, विजय वामन आगाशे, धनंजय अवसरीकर, सुबोध पारगावकर, कुमार करकरे, शुभा देव, प्रतिभा मुळ्ये, शरद कौलगेकर, श्री. रा. पुरंदरे, अरविंद करंदीकर, अनिल तोरणे, म. वि. अकोलकर, सुहास मुंगळे मास्तर, पंडित हिंगे, विजय प्रभू, मनोहर जोशी, अभिनंदन कासार, राजन भोसले असे अनेक पत्रलेखक आता त्यांच्या पत्रांद्वारे परिचयाचे झाले आहेत. कोण कुठल्या विषयावर पत्र पाठवील, याचाही अंदाज असतो. धनकवडीचे अश्विनकुमार जोशी फक्त क्रीडा विषयावरच पत्र पाठवतात. आकाशवाणीचे सिद्धार्थ बेंद्रेही नियमितपणे पत्रं पाठवतात. त्यांचे विषय सहसा क्रिकेट व सिनेमा हेच असतात. काही जणांचं पत्र आलं नाही तर चुकल्याचुकल्यासारखं होतं. यातले काही जण प्रत्यक्ष ऑफिसमध्ये येऊनही भेटतात. प्रतिभा मुळ्ये यांच्याशी माझी 'सकाळ'मध्ये असताना मुक्तपीठच्या निमित्तानं ओळख झाली होती. मी 'मटा'त आल्यानंतरही त्यांनी ती कायम ठेवली आणि त्या नियमितपणे पत्रं पाठवू लागल्या. एवढंच नव्हे, तर आमच्या मटा हेल्पलाइन या उपक्रमातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. एका वर्षी त्यांनी सर्व मानकरी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी फराळाला बोलावलं. मलाही त्यांनी निमंत्रित केलं. त्यांचे अनेक पाहुणे या मुलांना भेटायला खास तिथं आले होते. तो सोहळा अगदीच भावपूर्ण झाला होता. असेच माझे आणखी एक सीनियर मित्र म्हणजे मधुसूदन ढेकणे! ढेकणे काकांचा व माझा परिचय मी 'सकाळ'मध्ये अगदी ट्रेनी असताना झाला. तेव्हापासून आजपर्यंत तो स्नेह टिकून आहे. ढेकणेकाका तेव्हा कसबा पेठेत राहत असत. काही कारणाने मी त्यांना भेटायला गेलो होतो. अनेक चांगल्या गुणवंत लोकांना प्रसिद्धी मिळावी यासाठी काका निरपेक्षपणे धडपडत असतात. ते स्वतः दोन्ही पायांनी अपंग आहेत. सध्या ते निवारा वृद्धाश्रमात असतात. मात्र, तेथूनही त्यांच्या पत्रांचा ओघ सुरूच आहे. प्रत्येकाला फोन करून त्या विषयाचा मागोवा घेत राहणं हा त्यांचा छंद आहे. काका हक्कानं आम्हा सर्वांना फोन करून प्रत्येक पत्राचा फॉलोअप घेत असतात. त्यांच्या निरपेक्ष भावनेमुळं त्यांना नाही म्हणणं किंवा दुखावणं खूप जड जातं. 
अर्थात चांगल्यासोबत काही वाईट अनुभवही येतात. एक पत्रलेखक दर वेळी त्यांच्या पत्रात आमच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करणारी काही वाक्यं हमखास लिहून पाठवतात. कधी कधी ती भाषा सभ्यतेची पातळीही ओलांडते, तेव्हा वाईट वाटतं. आधी रागही यायचा, पण नंतर मी त्याकडं सहिष्णू वृत्तीनं पाहायला शिकलो. त्यामुळंच त्यांची चांगल्या विषयावरची पत्रं मी प्रसिद्ध करतोच. काही जण आम्हाला मूर्ख समजतात. त्यामुळं ते वेगवेगळ्या खोट्या नावांनी पत्रं लिहून पाठवतात. अर्थात अशी दोन-तीन पत्रं एकाच वेळी हाती पडल्यानं त्यांचं बिंग फुटतं आणि ते कायमचे ब्लॅक लिस्टमध्ये जातात. पण हे त्यांना कळत नाही. असो. काही पत्रांमध्ये विनाकारण एखाद्या समाजाची, व्यक्तीची किंवा समूहाची बदनामी केलेली असते. अशी पत्रांना मग केराची टोपली दाखवावी लागते. काही जणांची अपेक्षा असते, की त्यांनी पाठवलेलं प्रत्येक पत्र प्रसिद्ध व्हावं. काही जण प्रत्येक पत्र पाठवलं, की फोन करून विचारतात. असं हे सगळं सुरू असतं रोज. एकूण हा एक थँकलेस जॉब आहे, यात शंका नाही. माझ्या मागे मी किती जणांच्या शिव्या-शापांचा धनी होत असेन, याची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्याविषयी खोटे-नाटे समज-गैरसमजही पसरवले जातात, हेही ठाऊक आहे. पण मी हे सगळं व्यवसायातील उपद्रवता (ऑक्युपेशनल हॅझार्ड) म्हणून घेतो आणि गप्प बसतो. कारण मला मूलतः माणसांमध्ये रस आहे... आणि जगात वाईटापेक्षा चांगल्याचं पारडं कायमच जड असेल, याची खात्रीही आहे! त्यामुळंच मी माझं हे काम अत्यंत रुची घेऊन, आनंदानं करतो. यातून मला मिळालेले अनेक 'पत्र-मित्र' ही आता माझी आयुष्यभराची ठेव झाली आहे.
---
(पूर्वप्रसिद्धी : चपराक, दिवाळी २०१५)
----

7 comments:

  1. एवढी नावं आणि एवढे अनुभव....!
    तुझी स्मरणशक्ती अफाट आहे.
    मला परवा माझ्या दिवाळी अंकातल्या कथेवरून एका ताईंचा फोन आला होता. त्या `मुक्तपीठ`मध्ये लिहायच्या आणि त्यांच्या एका लेखाला मी एकदा चांगलं शीर्षक दिलं होतं, असंही त्या म्हणाल्या. मला घंटा काही आठवत नाही. मी आपलं हो-हो म्हणत राहिलो.
    असो.
    हे शिरीष जोशी मला आठवतायंत. नोकरी सोडण्याबद्दलच्या घालमेलीच्या काळात मी त्यांना त्यांच्या दुकानात भेटूनही आलो होतो. त्यांचे काही मान्यवरांसोबतचे फोटो बहुधा अजूनही माझ्याकडेच आहेत.
    बाकी पत्रलेखकांच्या भडीमाराची मला कल्पना आहे. त्यामुळे तुला पुढील वाटचालीसाठी आणि शिव्या-शापांसाठी शुभेच्छा...!

    ReplyDelete
  2. सुंदर शब्दांकन !!!

    ReplyDelete
  3. सर, मस्त लिवलंय...तुमच्या लेखनशैलीप्रमाणे सगळ्या खाचाखोचा योग्य पद्धतीने भरल्यात.....

    ReplyDelete
  4. भरल्यात ना... भरून पावलो बाबा...

    ReplyDelete