कुरकुरीत ‘कॉफीशॉप’चा खुसखुशीत, फर्मास अनुभव
-----------------------------------------------------------------
मंजूषा आमडेकर
श्रीपादचं ‘कॉफीशॉप’ पुस्तक बघता बघता एक वर्षाचं झालं. पण त्याला मिळालेला प्रतिसाद मात्र अत्यंत
प्रगल्भ होता. पुस्तक वाचून मी त्याला आवडल्याचं कळवलंही होतं, पण तरीही मला माझीच प्रतिक्रिया अपुरी वाटली. या पुस्तकाबद्दल काहीतरी
लिहायचा मोह मला टाळता आला नाही. खरं सांगायचं, तर गेली कित्येक
वर्षं लेखनाच्या क्षेत्रात मी काम करते आहे, अन् तरीही मला
श्रीपादच्या लेखनशैलीचं खूपच कौतुक वाटतं. कारण, इतक्या कमी शब्दांत,
कमी वेळात, खूप काही सांगणं, आणि तेही खमंग, चुरचुरीत शब्दांत... मेरे बस की बात
नहीं है. विशेषत: त्याची शीर्षकं! मला ती अतिशय आवडतात. ‘‘महा’गाईचा वळू’ किंवा ‘आणि‘पाणी’’, ‘दिवाने ‘आम’’ असो, की ‘‘वीस’वात्मके देवे’;
त्याला ती कशी सुचतात, हा प्रश्न विचारणंच व्यर्थ;
कारण, कवीला कविता कशा सुचतात, या प्रश्नाला उत्तर देणं अवघड असतं, तसंच याही
प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. तो केवळ आणि केवळ त्याच्यातल्या प्रतिभेचा मामला आहे.
आम्हा स्त्रियांना रोज उठून आज कुठली भाजी करावी, हा यक्षप्रश्न सोडवताना भलताच वात येत असतो; इथे जे
वर्तमानपत्र रोज लाखो लोक वाचणार असतात, अन् तेही वेगवेगळ्या
वयोगटांचे, सामाजिक थरांतले, निरनिराळ्या
आवडी-निवडी असणारे अनंत प्रकारचे लोक... त्या सर्वांना एकसाथ अपील होऊ शकेल, असा
विषय इतक्या झटपट, उत्स्फूर्तपणे सुचतो तरी कसा या माणसाला...
खरंच नवल आहे! बरं, महिन्याभरात देतो हं लेख, अशी सवलत मागायचीही सोय नाही. जे काही लिहायचं ते आत्ता, या क्षणी! तेही समर्पक, अचूक, कुणाच्याही
जिव्हारी न लागणारं, आणि तरीही, नेमकं
वर्मावर बोट ठेवणारं, गालातल्या गालात हसत आयुष्यातली
विसंगती सांगून जाणारं... ही करामत श्रीपादला अगदी सहजपणानं जमून गेलेली आहे. ही
शैली त्यानं कमावलेली आहे, असं ‘कॉफीशॉप’
पुस्तक वाचताना कुठेही वाटत नाही.
या पुस्तकाची आणखी एक गंमत म्हणजे, तुम्ही ते सलग नाही वाचलंत तरी चालतं. प्रत्येक लेख वेगळा, आपल्या परीनं संपूर्णच असतो. लिंक तुटायचा प्रश्न नाही, संदर्भ लागायची समस्या नाही. कधीही, कुठलंही पान
उघडा आणि वाचायला सुरुवात करा, हवं तिथे थांबा. जितकं वाचून
झालं असेल त्यातून मिळायचा तो आनंद मिळाल्याविना राहणारच नाही. प्रवासात वाचा,
एकटे असताना वाचा, कुटुंबासोबत चहा पिताना कुरकुरीत
खारी, चकली चावताना वाचा, कुणाची तरी
वाट पाहताना वाचा, बसस्टॉप, रेल्वे
स्टेशन, एअरपोर्ट, ट्रॅफिक जॅम... किती
तरी क्षण सापडतील हे पुस्तक वाचायसाठी. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यातला प्रत्येक लेख ज्या संदर्भात लिहिला गेलाय, त्याची
पूर्वपीठिका आपल्याला माहीत नसली, तरीही त्यातली गंमत अनुभवण्यात
अडचण येत नाही.
याला कारण म्हणजे, लेखनाची खुमासदार
शैली. जागोजागी मुद्दामहून न पेरता सहज जमलेल्या कोट्या, नर्मविनोद
आणि झटकन एखाद्या गंभीर, अस्वस्थ करणाऱ्या विसंगतीला जाता
जाता केलेला स्पर्श. बहुतेकशा विनोदी लेखकांचं हे अगदी खास, हुकमी
असं शक्तिस्थान असतं. श्रीपादला हे निश्चितपणानं जन्मत:च अवगत आहे, असं मला नक्की वाटतं. कारण लिहायला जमतं, म्हणून
विनोदी लिहिता येईलच असं नाही, हे मी अनुभवानं सांगू शकते.
विनोद लिहायला खास अशी प्रतिभा असावी लागते. ती माणसाच्या निरीक्षणशक्तीवर, विसंगती टिपण्याच्या क्षमतेवर, शब्दभांडारावर,
विनोद उघडपणे बोलून दाखवण्याच्या साहसी वृत्तीवर, अफाट वाचनावर, मनुष्यसंग्रहावर, सजग अशा सामान्यज्ञानावर, ताजेपणानं जगत राहणाऱ्या,
चहा-कॉफीसारख्या तरतरी आणणाऱ्या तरोताजा वृत्तीवर, कुणाला न दुखावता काही तरी महत्त्वाचं, कदाचित टोचत
असणारं, घडू नये ते घडत असणारं काही तरी, हळूच बोट ठेवून सांगता येण्याचं कौशल्य असण्यावर अवलंबून असतं. हे सगळे
पैलू श्रीपादमध्ये आहेत, म्हणूनच त्याला अशा प्रकारचं हलकं-फुलकं
आणि तरीही आशयघन लेखन करायला जमलेलं आहे.
‘कॉफीशॉप’मधल्या विनोदाच्याही
अनंतरंगी छटा आहेत. ‘हसरा दसरा’,
‘दिवाळी’, ‘धंदे का टाइम’मधल्या मोरूचं टिपिकल मध्यमवर्गीय वर्णन वाचताना गंगाधर गाडगीळांच्या बंडू
आणि स्नेहलताची आठवण होते. ‘बांधले मी बांधले’मध्ये हळूच चिमटा काढणारा उपहास आहे. ‘हॅप्पी पाडवा’सारख्या लेखांमधल्या कोट्या वाचताना मजा येते. ‘रंगीला
रे’ किंवा ‘पेर्ते होऊ या’त अलगद, सहजपणानं येणारं आयुष्याचं साधं-सोपं तत्त्वज्ञान
हळूच अंतर्मुख करून जातं. ‘‘महा’गाईचा
वळू’ लेखातला ‘हापूस आंबे आपली ‘पायरी’ ओळखून खावेत,’ हा विनोद
मनापासून दाद घेऊन जातो. ‘ओलेते दिवस’ लिहिताना
मात्र श्रीपामधला प्रणयरम्य, नवतरुण कॉलेजकुमार बोलतोय की काय
असं वाटतं. ‘दिवाने ‘आम’’मध्ये तर धमालच उडवून दिली आहे. यातल्या कोट्या अत्यंत चपखल जमलेल्या
आहेत. एकेक वाक्य वाचून त्यातला आम‘रस’ चाखून पाहावा असेच आहे. ‘बिहाराष्ट्र’तले चिमटे मुळीच बोचत नाहीत, हसूच येत राहतं आणि ‘त्याच क्षणी ठरवलं, आता वाजपेयींचा उल्लेखही यापुढे
नुसता ‘अटल वाजपेयी’ असाच करायचा!’
हे शेवटचं वाक्य मनसोक्त हसवतं.
‘गेले ते दिवस’ आणि ‘‘गे’ मायभू’ हे लेख भलतेच मिश्कील
झाले आहेत. यातले विषय ‘हट के’ आहेत, प्रौढ आहेत, श्रीपादनं दिलेली शीर्षकं द्व्यर्थी असूनही जराही अश्लीलतेकडे न झुकणारी
अन् चपखल आहेत. श्रीपादच्या सभ्य विनोदाला या ‘विषया’चंही वावडं नाही, हाही एक जगण्याचा पैलूच आहे असं
सहज सांगणारे हे लेख गंमत आणतात.
‘क्या ‘कूल’ हैं हम’ काय किंवा ‘चंद्र माझा’
काय, अशा लेखांमधून पुणेरी पुणेकराला जाता जाता कोपरखळी मारताना
श्रीपादनं दाखवलेल्या खोडकर कौशल्याला ‘जातिवंत पुणेकर’ही दाद दिल्यावाचून राहणार नाही. ‘‘गॅस : एक देणे’ हा लेख वाचताना तर हसून हसून मुरकुंडी
वळते. पुणेरी, कोकणी, वऱ्हाडी, बम्बईय्या... कुठल्याही बोलीची गोफण श्रीपाद सरसर घुमवत असतो. ‘हुकी हुकी सी जिंदगी’, ‘युवराजांचा
विजय असो’ आणि ‘आई ग्ग!’सारख्या लेखात खेळ आणि राजकारण आणि या दोन्हीतल्या ‘खंडोबा’चा अचूक वेध घेण्यात आला आहे. नेमक्या लक्ष्यावर ‘शरसंधान’
करण्यातलं श्रीपादचं कसब टाळी घेऊन जातं. ‘गाढ‘वी’ संकल्प’ खुसखुशीत टपली मारतो.
‘३६५ - (८/३) = ०’मध्ये केलेला पत्नी
किंवा स्त्रीचा ‘आठ मार्च’ असा उल्लेख मजेशीर
वाटतो आणि शेवटी, वर्षातले ३६५ दिवस ‘पुरुष
दिन’च साजरा केला जात असतो, या
पुरुषप्रधान संस्कृतीतल्या कटु सत्यावर अचूक बोट ठेवलेलं आहे. ‘‘आठ मार्च’च्या डोळ्यांतलं प्रेम पाहून आमचे ओले डोळे
म्हणाले... ‘चिअर्स मॅन’!’ ही शेवटची
ओळ लिहून श्रीपादनं तमाम स्त्रीवर्गाची मनं कायमची जिंकून घेतलेली आहेत, हे मी पैजेवर सांगू शकते.
‘लता’वरच्या कवितेत मात्र कुणीही
काव्यगुण शोधायचा अट्टाहास करू नये; त्यामागचा भाव पाहावा, तो आपल्या सर्वांच्याच मनातला आहे, एवढे नक्की!
शेवटचे दोन लेख, प्र. के. अत्रे आणि द.
मा. मिरासदार यांची क्षमा मागून श्रीपादनं लिहिले आहेत खरे! पण माझी खात्री आहे,
की श्री. मिरासदारांनी तर श्रीपादला दाद दिलीच असेल, पण
अत्रे आणि पु. ल.ही आत्ता हयात असते तर त्यांनी श्रीपादच्या पाठीवर जोरदार थाप
दिली असती. आपण खरंच भाग्यवान आहोत मित्रांनो, की हा असा
कसदार विनोदी लेखनाचा वारसा मागे ठेवून जाणारे महान लेखकही आपल्याला लाभले आणि त्या
वारशावर हक्क दाखवू शकतील, असे श्रीपादसारखे ‘वारसदार’ही आपल्याला लाभले आहेत. ‘कॉफीशॉप’ वाचल्यावर माझी खात्री पटली आहे, की पृथ्वीच्या अंतापर्यंत महाराष्ट्राच्या
आकाशावर ‘मराठी’ भाषेचा तारा दिमाखात
तळपत राहीलच राहील!
---
No comments:
Post a Comment