29 Aug 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ९

संमेलन : उत्तरपूजा...
-------------------------


आयुष्यात काही गोष्टी घडायचे योग यावे लागतात. त्यामुळंच डोंबिवली हे गाव आपल्याला अद्याप का घडलं नसावं, याचा आम्हाला विलक्षण खेद होत होता. वायव्य (म्हणजे नॉर्थ-वेस्ट) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असा किताब मिरवणारं, मुंबईत कोटात चाकरीला जाणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसांचं संध्याकाळी परतायचं घरटं असलेलं, पु. भा. भाव्यांपासून शं. ना. नवऱ्यांपर्यंत किती तरी मराठी साहित्यिकांचं निवासस्थान असलेलं आणि या साहित्यिकांना नको त्या ठिकाणी चावून नकोसं करणाऱ्या डासांचं वसतिस्थान असलेलं असं हे अलौकिक गाव आपण पाहिलं नाही, म्हणजे आपल्या आयुष्यात एक फार मोठी उणीव राहून गेली आहे, असंच आम्हाला गेल्या वर्षअखेरीपर्यंत वाटत होतं. मात्र, मराठी सारस्वताचा सर्वोच्च सोहळा असलेलं अ. भा. मराठी साहित्य संमेलन डोंबिवली नगरीत (पूर्व) होणार, हे वृत्त कळल्यानंतर ही उणीव दूर करण्याची मोठीच संधी चालून आली. आम्ही ठोंब्या असलो, तरी अशी संधी सोडण्याइतकेही ठोंबे नाही, याची विनम्र आठवण स्वतःलाच करून देत संमेलनाचा धावता दौरा करायच्या तयारीला लागलो. आम्ही आयोजकांच्या आवडीचे लेखक (किंवा खरं तर लेखिका!) आणि सेलिब्रिटी दोन्ही नसल्यानं संमेलनात आम्हाला कुणी फुकट नेण्याचा प्रश्नच नव्हता. स्वतःच्या खिशाला खार लावून संमेलनाला जाण्याइतपत आमचं साहित्यप्रेम शाबूत असल्यानं आम्ही फारसा विचार न करता गाडी काढली. वास्तविक संमेलनातील परिसंवादातील वक्ता, सूत्रसंचालक किंवा गेला बाजार समन्वयक म्हणून कसे स्थान मिळवावे याचे जाणकारांनी क्लासेस काढल्यास पहिल्या बॅचमध्ये सर्वांत पहिल्या बेंचवर आम्ही दिसू. कारण गेली वीस वर्षं दहा-बारा संमेलनांना जाऊनही ही युगत काही आम्हाला वश झालेली नाही. कुठलीही गोष्ट फुकट करताना आमच्या साहित्यप्रेमी मनास जो आनंद मिळतो, तो स्वतःच्या खिशातले पैसे उडवून होत नाही, ही वस्तुस्थिती होय. मात्र, आम्हाला आत्तापर्यंत कुणीही हिंग लावून न विचारल्यानं आम्हीच दर वेळी स्वखर्चानं संमेलनयात्रा करीत आलो आहोत.
आता संमेलनाचं धावतं वर्णन ऐकवायला हरकत नाही. कारण आम्ही स्वतःच्या चारचाकीतून तिथं पोचल्यानं हे शब्दशः 'धावतं' वर्णन होतं.
तर मंडळी, हा आहे शीळफाटा. खोपोलीजवळही एक शीळफाटा आहे. पण तो वेगळा! हा कल्याण शीळफाटा... (इथं येईपर्यंत रस्ता बरा असल्यानं आपण शीळ घालत गाडी चालवू शकतो.) इथं पनवेलकडून मुंब्र्याला जाणारा रस्ता मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गाला छेदतो. (ही सर्वांत महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत आम्हाला कुणी दिली नाही.) इथं उजवीकडं वळायचं... समोर जे जांभळट डोंगर दिसतात, तेच शाळा कादंबरीतले सोनारपाड्याचे की जांभूळपाड्याचे डोंगर अशी आम्ही स्वतःची समजूत घालून घेतली. या रस्त्यानं अनाकलनीय संख्येनं मालट्रक जात असतात. त्यांच्या शर्यतीतून वाट काढत पुढं जिथं डोंबिवलीकडं डावीकडं वळा, अशी कुठलीही पाटी वगैरे नाही, तिथं डावीकडं वळायचं. पुढं सरळ गेलात तर तुमचं कल्याणच! तर आम्ही योग्य वेळी 'वाममार्गा'ला लागलो. आता अधूनमधून साहित्य संमेलनाचे बोर्ड दिसू लागले. डोंबिवली गाव सुरू झालं. गाव जसं असेल असं वाटत होतं, तसंच ते निघालं. अपेक्षेपेक्षा थोडं मोठं आणि आडवं पसरलेलं वाटलं. सुरुवातीला 'यज्ञेश देशी दारू बार' ही पाटी वाचली आणि पुलंच्या भाषेत सांगायचं तर गावाची 'प्राज्ञ पातळी' झटकन आमच्या लक्षात आली. पुढं एका अरुंद अशा रस्त्यानं दीर्घकाळ प्रवास केल्यानंतर अखेर संमेलनाचं स्थळ आलं.
बहुतेक साहित्य संमेलनांच्या परिसरात गेलं, की साहित्य संमेलनाचा एक खास वास येऊ लागतो. नव्या मंडपाच्या कापडाचा, धूळ बसावी म्हणून पाणी मारल्यानंतर बसलेल्या मातीचा, खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा, ग्रंथदालनातून येणाऱ्या नव्या पुस्तकांचा आणि तिथं ये-जा करणाऱ्या हजारो माणसांचा असा तो संमिश्र वास असतो. डोंबिवलीत अगदी प्रवेशद्वारातून आत गेल्यावरही हा वास येईना, तसं थोडं अस्वस्थ व्हायला झालं. मुंबईच्या खाऱ्या वाऱ्याच्या हवेत हा वास लुप्त झाला असेल, अशी समजूत करून घेतली. मुंबईपासून हे गाव लांब असलं, तरी सगळा संपर्क, संदर्भ मुंबईचाच असतो. अकराच्या सुमारासच वाढलेला उकाडा हे संदर्भ आणखीच कर्कशपणे सांगू लागला. मुंबई म्हटलं, की लोकल स्टेशनांपासून ते रस्त्यापर्यंत सगळीकडं प्रचंड गर्दी असणार हे एक डोक्यात असतं. ती गर्दी इथं दिसेना, तेव्हाही काही तरी चुकल्यासारखं वाटू लागलं. डोंबिवली फास्ट सिनेमातल्या माधव आपटेसारखी बॅट फिरवून गर्दी गोळा करावी, असं काही वेळ वाटून गेलं. आगरी यूथ फोरमनं संमेलनाची तयारी आणि एकूण मंडप आदी व्यवस्था तर चोख केली होती. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच डाव्या बाजूला खाद्यदालन पाहिलं आणि महत्त्वाची चिंता मिटली. आत गेल्यावर समोरच दोन कारंजी आणि संतांचे पुतळे वगैरे होते. नंतर पुलं, कुसुमाग्रज, शांताबाई आदी लोकप्रिय लेखकांचेही पुतळे उभे केले होते. अनेक शाळकरी मुलं पुलंच्या (पुतळ्याच्या) गळ्यात हात घालून फोटो काढून घेत होती. एक मुलगा शांताबाईंच्या शेजारी उभा राहून फोटो काढत होता. तेव्हा तीन-चार शाळा मास्तरणी तिथं आल्या आणि 'ज्यांच्याबरोबर फोटो काढताय त्या कोण आहेत माहिताय का?' असं त्या मुलावर खेकसून गेल्या. वास्तविक पुतळा काढणाऱ्यानं त्या जेमतेम शांताबाई दिसतील असा पुतळा घडवला होता. तेव्हा तो त्या मुलाचा दोष नव्हता. मात्र, ही तर केवळ झलक होती. पुढं तर शाळेचं आणि ज्युनिअर कॉलेजचं आख्खं गॅदरिंग घडायचं होतं. त्या वेळी खरं तर जयंत नारळीकरांचा सत्कार वगैरे कार्यक्रम मुख्य मंडपात व्हायचा होता. मात्र, आम्ही पोचलो तेव्हा त्याची काही हालचाल दिसेना, तेव्हा आम्ही आमचा मोर्चा ग्रंथदालनाकडं वळवला. ग्रंथग्रामास रा. चिं. ढेरेंचं नाव दिलेलं पाहून बरं वाटलं. संमेलननगरीला पु. भा. भाव्यांचं, तर मुख्य मंडपाला शं. ना. नवरे यांचं नाव दिलं होतं, तेही अगदी योग्यच! ग्रंथग्रामात शिरलो, तर सगळीकडं शुकशुकाटच दिसला. आपण फारच लवकर आलो की काय, असं वाटू लागलं. मात्र, पुढं संपूर्ण शनिवारचा दिवस गेला, तरी या परिस्थितीत फारसा फरक पडल्याचं दिसलं नाही.
ग्रंथदालनांत आमचे अनेक प्रकाशक मित्र आपापली नामवंत पुस्तकं घेऊन सज्ज बसले होते. रसिकांनी यावं आणि या पुस्तकांवर उड्या टाकाव्यात अशीच त्यांची इच्छा होती. अनेक मोठमोठे लेखक त्या पुस्तकांच्या रूपानं आपल्या चाहत्यांची वाट पाहत होते. मात्र, गर्दी फिरकलीच नाही. लोक आलेच नाहीत. म्हणजे फारच थोडे आले; जेवढे यायला हवे होते तेवढे अजिबात आले नाहीत! काही शाळकरी मुलं आली होती. एका स्टॉलमध्ये लेखकाबरोबर त्यांना गप्पा मारताना, फोटो काढताना बघून छान वाटलं. मात्र, असे क्षण फार थोडे... दुर्मिळ पुस्तकं होती, लहान मुलांची पुस्तकं होती... मोठ्यांची होती, शहाण्यांची होती, वेड्यांची होती... सगळी पुस्तकं होती. पण वाचकस्पर्शासाठी आसुसलेली ही पुस्तकं बहुतांश अस्पर्शच राहिली...
वैतागून संमेलनाच्या मुख्य मंडपात गेलो. तिथं बालमेळावा की काय सुरू होता. एकूण शाळेचं गॅदरिंग सुरू असल्याची कळा त्या कार्यक्रमाला होती. नंतर परत जेव्हा आलो, तेव्हा काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी भाषणं देत होते. ते पाहून कॉलेजचं गॅदरिंग सुरू आहे, असं वाटायला लागलं. एका स्कॉलर इ. मुलीनं मंचावरून बोलताना इंटरनेटचं महत्त्व एवढ्या ठसक्यात सांगितलं, की आम्हीही आमच्या भ्रमणयंत्रातील नेट प्याक चालू करून चॅटिंगचं महत्त्वाचं कार्य चालू केलं. एवढ्या मोठ्या विस्तीर्ण मंडपात शेकड्यानं खुर्च्या मांडल्या होत्या, पण त्या रिकाम्याच होत्या. उकाडा वाढला होता. त्यामुळं जो तो खाली मांडलेल्या मोठ्या पंख्याच्या तोंडासमोरची खुर्ची पकडून बसत होता. हे दृश्य गमतीदार होतं. 'पण या उन्हाच्या झळांपेक्षा रसिकांच्या दुष्काळाच्या झळा मनाला जास्त पोळत होत्या,' असं एक साहित्यिक वाक्य तत्क्षणीच सुचलं. आम्ही ते त्वरेनं डायरीत नोंदवून ठेवलं. अशी वाक्यं पुढं लेख वगैरे लिहिताना कामी येतात. त्या तरुणांच्या आवेशपूर्ण भाषणांनी आमची भोजनोत्तर पेंग उतरली आणि आम्ही तडक मंडप सोडला. अन्य मंडपी काय चालले हे पाहण्यासाठी डोकवावं, असं ठरवलं. तिसऱ्या मंडपात दुसऱ्या परिसंवादाच्या वेळी पहिलाच परिसंवाद चालू होता. अल्प श्रोते आणि अगम्य वक्ते यांचा सामना करण्यासाठी आम्हाला पुन्हा एक पंखा गाठणं भाग होतं. मागल्या बाजूनं छान झुळूक यायला लागली आणि आम्ही पुन्हा पेंगू लागलो. चहाच्या आठवणीनं जाग आली, तोवर मंडप ओस पडला होता. यानंतर दुसऱ्या मंडपाकडं आणि नाट्यगृहाकडं फिरकण्याचं धाडसच झालं नाही. तिथले कार्यक्रम आम्ही मनःचक्षूंचा प्रोजेक्टर ऑन करून जागच्या जागी पाहिले आणि संबंधित वक्त्यांना दाद देऊन टाकली. खाद्यदालनाच्या स्टॉलांवर गेलो, तर तिथं मात्र गर्दी उसळलेली दिसली. मंडप मोकळे आणि बाहेर गर्दी याचं कोडं उकलेना. मुख्य मंडपासमोर एक मोठी लेखणी मनोऱ्यासारखी उभी केली होती आणि दोन्ही बाजूला पायऱ्या करून या पेनात शिरण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्या पेनापेक्षा मंडपात गर्दी कशी शिरेल याची काही तरी व्यवस्था व्हायला हवी होती, असं राहून राहून वाटायला लागलं. लेखणीचा मनोरा हा एक सेल्फी पॉइंट होता, याचा आम्हाला अंमळ उशिराच उलगडा झाला. मात्र, तो झाल्याक्षणी आम्ही तातडीनं तेथे जाऊन सेल्फी काढला आणि सोबतच्या डायरीत एक आयटेम पूर्ण केल्याची 'टिक्' करून टाकली. ग्रंथग्रामात वारंवार जाणं झालं. तिथल्या मंडपाचा वरचा पडदा फारच पातळ असल्यानं सूर्यमहाराज डायरेक्ट अंगावर येत होते. त्यात स्थानिक हवेतला उकाडा... अशा वातावरणातही तिथं चहा विकणाऱ्या पोऱ्याचं आणि तो विकत घेणाऱ्यांचं कौतुक वाटल्यावाचून राहिलं नाही. चहावाल्याला अच्छे दिन आले आहेत, हे खरं; पण पुस्तकांना कधी येणार, याचा विचार करीत आम्ही आणखी अर्धा-एक तास पंख्याशेजारी घालविला. नंतर घर्मबिंदू टिपून, उरलेल्या स्नेह्यांच्या भेटी-गाठी घेतल्या. वर्षानुवर्षं संमेलनाला हजेरी लावणारे काही उत्साही चेहरेही या वेळी दिसले नाहीत, तेव्हा खरंच खट्टू वाटलं. परिस्थितीचा जरा कानोसा घेतला असता, आणखी काही स्थानिक राजकीय कारणंही सापडली. ती ऐकून हसावं की रडावं, ते कळेना. अखेर दोन्ही करू नये, असा निर्णय घेतला आणि चेहरा निर्विकार ठेवला.
आवडते कवी द. भा. धामणस्कर हे डोंबिवलीचे. आदल्याच दिवशी संमेलनात त्यांचा सत्कार झाला होता. त्यांच्या घरी जावं आणि भेटावं असं फार वाटत होतं. पण तो योग नव्हताच. अखेर डोंबिवलीतल्या त्या प्रसिद्ध गणेश मंदिरात मात्र जायचं असं नक्की ठरवलं. डोंबिवलीतल्या बारीकशा रस्त्यांतून वाट काढत अखेर त्या मंदिरात पोचलो आणि त्या गजाननालाच प्रश्न गेला, हे बुद्धिदात्या, तुझे इथले सगळे भक्त का बरं रुसले संमेलनावर? बाप्पा काही बोलले नाहीत. बाहेर आलो आणि फेसबुकवर विनोद वाचला. एक जण डोंबिवलीतल्या माणसाला विचारतो, अरे, तुझ्या गावात संमेलन भरलंय आणि तू का गेला नाहीस? त्यावर तो म्हणतो, की अरे, ते संमेलन डोंबिवली पूर्वमध्ये आहे. मी पश्चिमेला राहतो....
हा विनोद वाचला आणि बाप्पांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं... आम्ही थोड्याच वेळात दक्षिण दिशेची, अर्थात पुण्यनगरीची वाट धरली. इति डोंबिवली संमेलनाच्या अपूर्ण उत्तरांची कहाणी उत्तरपूजेसह समाप्त!


---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, मार्च २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---

No comments:

Post a Comment