लेखक 'रसिक' जाहला...
------------------------------
लेखक म्हणून पुस्तकांच्या 'नकादु'ला भेट देणं हे आमचं एक आद्य कर्तव्यच होऊन बसलं आहे. पुण्यातले पुस्तकांचे 'नकादु'दार आहेत पण फार भारी भारी! मागच्या वेळेला पुस्तकांच्या पेठेत गेलो होतो... तिथल्या मालकांचं मिठीदार आतिथ्यही अनुभवलं; पण खऱ्याखुऱ्या पेठेतल्या पुस्तकांच्या दुकानांची सर कशालाच नाही. या दुकानात आमचे 'सर' बसतात, म्हणून आम्ही हे म्हणत नाही; तर खरंच या दुकानांना कश्शाची सर नाही.
अप्पा बळवंत चौक हा पुण्यातला ऐतिहासिक चौक. या चौकाच्या चारही रस्त्यांना पुस्तकांची भरपूर दुकानं वस्तीला आहेत. ही दुकानंही अप्पा बळवंतांएवढी नसली, तरी आपल्या स्वतःच्या 'अप्पाआजोबां'एवढी तरी नक्कीच ऐतिहासिक जुनी आहेत. त्यांच्या खणांना खास पुणेरीपणाचा वास आहे. तिथल्या खांबांना पेठ नामक अवलिया गोष्टीचं तेलपाणी लागलेलं आहे. तिथल्या प्रभात टॉकीजएवढ्याच जुन्या कर्मचाऱ्यांच्या अंगात बाळपणापासून मुठेचं पाणी चढलेलं आहे. तेव्हा इथं जायचं तर आपला मान, अभिमान, स्वाभिमान आदी आपल्या दुचाकीबरोबरच लांब कुठं तरी 'पार्क' करून यावा लागतो. 'आपल्याला पुस्तकांतलं फार कळतं' हा गंड तर मुठेतच विसर्जन करून यावा लागतो. कारण इथल्या कोपऱ्यातल्या एका खणातल्या छोट्या दुकानातला ग्रंथप्रेमी विक्रेताही तुम्हाला जागतिक वाङ्मयातली लेटेस्ट पुस्तकं विष्णुसहस्रनामासारखी म्हणून दाखवील. तेव्हा तो नादच न करणे इष्ट होय. आम्ही पहिल्या प्रथम इथल्या दुकानांच्या पायऱ्या कधी चढलो हे आठवत नाही. पण फार लहानपणापासूनच अनमोल, रसिक, सरस्वती आणि प्रगती-व्हीनस हे 'चारधाम' करायची सवय लागली एवढं नक्की... आधी शाळेची पुस्तकं, मग बालसाहित्य, मग तरुणपणीच्या कथा-कादंबऱ्या, नंतरचं वैचारिक प्रौढ वाङ्मय हे सगळं या चारीधाम यात्रेतच घडलं. (अजून खऱ्या चारधाम यात्रेला जायची वेळ आलेली नाही. पण जेव्हा येईल तेव्हा धार्मिक ग्रंथांची खरेदी इथूनच होईल, यात शंका नसावी.)
यातही आज विषय आहे यातल्या अंमळ अधिक 'रसिक'वाल्यांचा... अर्थात 'साहित्य सूची'वाल्यांचा... (थोडक्यात 'सा.सू.'च्या मालकांचा... अर्थात सासरेबुवांचा!) हल्ली त्यांच्यातल्या 'रसिका'नं आणि 'रसिक'नंही कात टाकलीय. जुनं-जीर्ण 'नकादु' अगदी झक्कास झालंय. अगदी आधुनिक शो-रूमसारखं रूपडं ल्यायलं आहे. हारीनं मांडलेली पुस्तकं, (पेठेच्या मानानं) मोकळी जागा आणि तुलनेनं फारच प्रेमानं वागणारा स्टाफ हे बघून आम्ही वेळी-अवेळी या दुकानाच्या पायऱ्या चढू लागलो आहोत. अर्थात फार शहाणपणा करायचा नाही, हे तत्त्व पक्कं लक्षात ठेवूनच; अन्यथा आपली 'पायरी' दाखवण्याचं सामर्थ्य इथं वावरणाऱ्या प्रत्येक 'रसिका'कडं आहे, याची नम्र जाणीव आम्हास आहे. एकदा आम्ही आमचंच एक पुस्तक मागण्याचं औद्धत्य दाखवलं होतं. समोरच्या काकांनी बराच वेळ लक्षच दिलं नाही. अशा कृतीतूनही लोक पुष्कळ काही सांगत असतात. त्या 'बिटवीन द लाइन्स' वाचायची पात्रता आताशी आमच्या अंगी येऊ लागली आहे. त्यामुळं पुन्हा काही आम्ही त्या दुकानात हे वाक्य उच्चारलेलं नाही. 'खपली असतील हातोहात' असा मनाशी ग्रह करून घेतो झालं. (असो. त्या जखमेवरची 'खपली' आता काढायला नको!) पूर्वी आमचा संबंध फक्त खालच्या मजल्याशीच यायचा. पण 'नकादु'च्या मालकांची ओळख झाली आणि या 'रसिक'ला वरचा मजलाही आहे, हे ध्यानात आलं. दुकानाचे मालक नावाप्रमाणेच 'रसिक' आहेत, हे सांगायला नकोच! ते पुस्तकांचे विक्रेते, संपादक, प्रकाशक, मुद्रक तर आहेतच; वर माणूस म्हणून भलतेच रसिक आहेत. अनेक गुण त्यांच्या ठायी एकत्र नांदुत... आपलं, नांदत आहेत, हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. या वरच्या मजल्याला जायला दोन वाटा आहेत. एक नेहमीची, समोरची... आणि दुसरी चौकातल्या एका चोरवाटेनं येणारी. आम्ही अनेकदा या चोरवाटेनं थेट वरचा मजला गाठतो. अर्थात कुठूनही गेलं तरी चपला बाहेरच काढाव्या लागतात. चपला जातील या भीतीनं माणूस संपादकांचा फार वेळ घेत नाही आणि साधारण अर्ध्या तासानी येणाऱ्या 'येईलच हो चहा आत्ता' नामक आमिषाला बळी पडत नाही, हा यातला अतिरिक्त फायदा! (चोरी जाईल या लायकीची चप्पलच घालत नसल्यानं, चहा घेतल्याशिवाय आम्ही खाली उतरत नाही, हा भाग वेगळा.) वर दोन गुहा आहेत. एका गुहेत आमचे सर-संपादक बसतात, तर दुसऱ्या गुहेत त्यांचे प्रेमळ भाऊ बसतात. पण कधी कधी संपादक भावाच्या गुहेतही (अर्थात तो नसताना) जाऊन बसतात. कुणाला कुठल्या गुहेत भेटायचं याचे त्यांचे काही संकेत असावेत. ते काही आपल्याला समजत नाहीत. पण स्वतःच्या गुहेत संपादक मालकासारखे बसतात, एवढं खरं. सिंहाच्या गुहेत आत गेलेली पावले दिसतात आणि बाहेर येणारी दिसत नाहीत, असं म्हणतात. इथं आत गेलेलं हस्तलिखित वा तत्सम काहीही पुन्हा बाहेर येताना दिसत नाही. बाकी इथं आत गेलेला लेखकही बाहेर येताना पुन्हा 'तो' लेखक नसतो. त्याच्या वरच्या मजल्यात काही तरी भरच पडलेली असते. याचं कारण संपादकांनी त्याच्या लिखाणातल्या दोषांचं दिग्दर्शन करून, त्याच्या सदराचा सदरा नीटच फाडलेला असतो. त्यामुळं तो पुन्हा शिवून आणण्याखेरीज गत्यंतरच नसतं. याखेरीज हे संपादक महाशय बरेच उपद्वयाप करतात. आपल्या लेखकांना कुठं तरी ट्रिपला काय नेतात, जेवायला काय घालतात, साप्ताहिक मीटिंगा काय घेतात, लेखकांसोबत (लेखिकांबरोबर अधिक) हास्यविनोद काय करतात! खेरीज गावातल्या उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती करतात, दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम स्वतः जाऊन बघतात...छे छे! प्रकाशक आणि संपादक या दोन्ही संस्थांना बट्टा लावण्याचे काम हे गृहस्थ करतात. आता हे करताना कधी कधी मानधन द्यायला विसरतात तो भाग वेगळा. पण आठवण करून दिली, की न चिडता देतात, हीदेखील प्रकाशक या संस्थेला पुष्कळच कलंक लावणारी बाब होय. प्रकाशकाच्या चेहऱ्यावर हव्या असणाऱ्या गांभीर्याचा अभाव आणि संपादकाच्या चेहऱ्यावर हव्या असणाऱ्या खत्रुडपणाचा अभाव या दोन गोष्टींवर मात्र रसिक मालकांना पुष्कळच काम करावे लागेल असे दिसते. बाकी आपल्या आजूबाजूच्या लेखकांना (विशेषतः लेखिकांना-कवयित्रींना) 'रसिक' करून सोडण्याचा विडा त्यांनी उचलला आहे आणि हा विडा दिवसेंदिवस रंगत चालला आहे, हेही आम्हास दिसते आहे. त्यांच्या केवळ स्मरणानेच आमच्यासारखा लेखकही अंमळ 'रसिक' होऊ घातला आहे, हे या ठिकाणी नम्रपणे नमूद करावेसे वाटते.
पेठेतल्या या रसिकाप्रमाणेच आणखी एका 'रसिका'चे पुस्तकप्रेम आम्हाला कायमच मोहवून टाकते. पुण्यनगरीच्या हृदयस्थानातून जाणाऱ्या बाजीराव रस्त्यावर या रसिक दाम्पत्याने अक्षरांच्या धारांचा जो वर्षाव आम्हावर चालविला आहे, तो केवळ अद्भुत होय. 'रसिक'मध्ये केवळ मालकच गुहेत बसतात; तर यांनी आपल्या 'नकादु'चीच आख्खी गुहा करून टाकली आहे. या गुहेत रिक्त पावली जाणारा माणूस बाहेर येताना मात्र जड पावलांनी येतो. (एक तर पुस्तकांची जड पिशवी त्याच्या हाती असते आणि दुसरं, हे एवढं सुंदर दालन सोडून जायचं त्याच्या जीवावर आलेलं असतं.) इथं पुस्तकांचे मालक आणि मालकीण दोघेही आपल्याला भेटतात. मालकीणबाई 'रसिका' असल्या आणि गप्पिष्ट असल्या, तरी मालकही काही कमी रसिक नाहीत. पण ते नेहमीच मोजकं, पण महत्त्वाचं बोलतात. गावोगावी ग्रंथप्रदर्शनं लावून राज्यात सर्वत्र पुस्तकांची वर्दी देणारे आणि त्या पुस्तकांसाठी दर्दींची गर्दी गोळा करणारे हे मालक म्हणजे थोरच! यांच्याकडं तुम्ही कुठलंही पुस्तक मागा, शंभर टक्के मिळणारच. शिवाय त्यांची ही गुहाही अत्याधुनिक. वेगवेगळे सुटसुटीत विभाग, मंद संगीत आणि मदतीला तत्पर असा त्यांचा सेवकवर्ग अशा वातावरणात दोन पुस्तकांची खरेदी जास्तच होते, हे सांगायला नको. आम्हाला एकदा यांच्या गुहेत आमचं एक पुस्तक दिसलं आणि जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पुस्तकांच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी दोघंही कायम झटत असतात. स्नेहपूर्ण वागण्यानं लोकांना जोडून ठेवतात. अंगणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. (आम्हाला बोलवतो, बोलवतो म्हणतात आणि बोलवत नाहीत. तर ते एक असो मेलं!) साहित्य संमेलनात यांचा स्टॉलही भला मोठा असतो आणि तिथं उसळणारी गर्दी त्यांच्या 'ब्रँड'ची महती सांगून जाते. मध्यंतरी मालक बंधूंपैकी 'राम' आणि 'लक्ष्मण' वेगळे झाले खरे; पण त्यामुळं गावात आता पुस्तकाचं आणखी एक दुकान झालं, या आनंदानं आम्हाला 'भरत', आपलं भरतं आलं होतं. तेही बंधू शब्दांच्या अंगणातच बागडत आहेत. तेदेखील साक्षात साहित्याच्या हेडक्वार्टरला शब्दशः डोक्यावर घेऊन! आहे की नाही कमाल!! खरंच, या घराला पुस्तकांपासून दूर करणं अशक्य आहे. पुणेकरांचा आणि त्यांचा जिव्हाळाही खासच आहे. आपल्या पुस्तकाच्या दुकानासमोरच परत वेगळं पुस्तकांचं प्रदर्शन लावणं हा उद्योगही हेच लोक करू जाणे. त्यांचं ते प्रदर्शन म्हणजे पुणेकरांना पर्वणीच असते. भरपूर पुस्तकं विकतात, भरपूर सवलती देतात, तरी भरपूर फायदाही कमावतात. धंद्याचं गणित चोख जमलेलं आहे. उभयपक्षी फायद्याचा सौदा असतो! यांच्या गुहेत जावं आणि बाहेर येऊच नये असं आम्हाला पुष्कळ वाटतं. पण ते शक्य नाही. मग आम्ही स्वप्नात तसली गुहा आणतो आणि गुहेचा एक कोपरा गाठून आवडीचं पुस्तक वाचत तासंतास लोळत पडतो...
अलीकडं या दोन्ही मालकांनी आणि त्यांच्या पुण्यनगरीतल्या इतर सहकाऱ्यांनी 'वाचक जागर अभियान' राबवलं. गेल्या महिन्यात झालेल्या या उपक्रमांतर्गत झालेल्या विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांनी वाचकांना भरभरून आनंद दिला. कुणी नामवंत कवीनं कविता म्हटल्या, कुणा संगीतकारानं गाणी म्हटली, कुणा साहित्यिकानं शब्दांची मैफल रंगविली. एकूण मज्जेचा माहौल तयार झाला होता. आमच्यासारख्या किंचित लेखकुलाही यातून बरंच काही मिळालं. पुस्तकांवर प्रेम करीत राहणारा समुदाय सतत चैतन्यशील राहणं किती गरजेचं आहे, हे लक्षात आलं. अनेकांना पुस्तकांची भूक असते, पण त्यांना पुस्तकांपर्यंत जायला वेळ असतोच असं नाही. अशा उपक्रमांतून हे वाचक पुस्तकांच्या दुकानी आले, त्यांनी पुस्तकं हाताळली, विकत घेतली हे दृश्य डोळं निववणारं होतं, हे निखालस! वाचकाकडं घेण्याची अपरंपार क्षमता आहे; आपण देण्यास सक्षम आहोत का, असा जरा अंतर्मुख इ. करणारा सवालही मनात उमटून गेला. मग यासाठी काय केलं पाहिजे? आमच्यासारख्या लेखकूंनी आधी भरपूर वाचलं पाहिजे, भरपूर पाहिलं पाहिजे, भरपूर ऐकलं पाहिजे, भरपूर काही 'आत' घेतलं पाहिजे... वरच्या मजल्याची पायरी वारंवार चढली पाहिजे, संपादकांबरोबर वाद-चर्चा रंगविल्या पाहिजेत... असं आम्हाला भरपूर काय काय वाटून गेलं. आम्हाला नेहमीच असं काय काय वाटत असतं. पण मूळ स्वभाव ‘ठोंब्या’ असल्यानं अंमलबजावणीच्या पातळीवर त्याचं काहीही होत नाही, हा भाग निराळा. तर ते असो. हे काय काय करायचं असेल, तर मालक-संपादकांकडचा चहा वारंवार प्यायला हवा, एवढं लक्षात आलं. अशी एखादी गोष्ट मनात आली, की आम्ही तातडीनं तिची अंमलबजावणी करून टाकतो. म्हणून आम्ही लगेच फोन उचलला... संपादक-मालक-प्रकाशकांचा (हे एकच गृहस्थ आहेत, बरं का!) नंबर फिरवला... विचारते जाहलो - ‘संपादक सर, येऊ काय चहाला?’
त्यावर संपादक उत्तरले - या की! आनंद आहे...
आम्ही - का बुवा?
सं.मा.प्र. - अहो, लेखक 'रसिक' जाहला...
संपादकांनीच आम्हास ‘रसिक’ घोषित करून टाकल्यानं आम्हास परमानंद जाहला... त्या आनंदातच आम्ही दिवाळी अंकांचे लेख पाडायला बैठक मारली...आता हे लेख आणि दिवाळी यात आमचा पुढला महिना सहजी निघून जाईल...
आता भेटू दिवाळी अंकानंतरच्या अंकात... पण कोणत्या ‘नकादु’त...???
वाट पाहा...
---
(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, सप्टेंबर २०१७)
---
No comments:
Post a Comment