बॉलिवूड नावाचा 'मिनी इंडिया'
------------------------------------
आत्ताचा भारत किंवा जगात तो ज्या नावाने ओळखला जातो तो 'इंडिया' नावाचा देश अधिकृतपणे १५ ऑगस्ट १९४७ रोजी जगाच्या नकाशावर आला. यंदा आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. अर्थात आधुनिक, स्वतंत्र भारताचा हा अमृतमहोत्सव असला, तरी ‘भारतवर्ष’ किंवा ‘हिंदुस्थान’ किंवा ‘भरतखंड’ नावाची ही भूमी प्राचीन काळापासून वैभवशाली वारशाची, रक्तरंजित लढायांची, अवाक करणाऱ्या विविधतेची, अचाट सत्तासंघर्षाची मोठी परंपरा कित्येक शतकं आपल्या अंगाखांद्यावर वागवत आली आहे. या भूमीत अत्यंत समृद्ध अशी सिंधुसंस्कृती नांदली. तक्षशिला, नालंदा यांसारखी विद्यापीठं वसली. हडप्पा, मोहेंजोदडोसारखी आजही अभ्यासकांना थक्क करायला लावणारी शहरं निर्माण झाली. रामायण, महाभारत अशी भव्य महाकाव्यं दंतकथांच्या रूपानं अजरामर झाली. इथल्या कौलांमधून सोन्याचा धूर निघत असल्याच्या कहाण्यांनी जन्म घेतला. या विशाल, श्रीमंत आणि लोभसवाण्या भूमीचा मोह जगातील अनेक भूपालांना पडला. मग तिचा उपभोग घेण्यासाठी इथं राक्षसी स्पर्धा सुरू झाली. त्यातून आक्रमकांच्या फौजा या भूमीत आल्या. काही परत गेल्या; काही इथल्याच होऊन राहिल्या. वंशसंकर झाला; वर्णसंकर झाला. पुढील अनेक पिढ्यांनी दोन्ही वंशांचे गुण अंगी अभिमानानं मिरवले. अवगुणही होतेच. त्यातून घातपात होत राहिले. वंशविच्छेद होत राहिला. काळाच्या वृक्षावर इथल्या अनेक पिढ्यांची घरटी तयार झाली, मोडली, पुन्हा तयार झाली! ऋतू आले-गेले, पण पिढ्यांचं वंशसातत्य कायम राहिलं; एवढंच नव्हे तर बहरलं, फुललं. त्यातून जन्माला आली भारतभूमी नावाची एक उदात्त, उत्तुंग अशी मंगल कल्पना!
या कल्पनेत अध्याहृत होती ती विविधतेतील एकता. विविध जाति-धर्मांचे, विविध वंश, विविध वर्ण, विविध भाषांचे असे सगळे लोक एकत्र येऊन सुखानं नांदत आहेत, अशी ती कल्पना! ही कल्पना भारतात जर कुठे प्रत्यक्षात उतरताना दिसली असेल, तर ती सिनेमासृष्टीत... 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील मोहमयी दुनियेत! देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना या चित्रपटसृष्टीची वाटचाल देशाच्या प्रगतीमध्ये, इथल्या नागरिकांना एका धाग्यात बांधून ठेवण्यामध्ये कशी उपयुक्त ठरली, याचा आढावा घेण्यासाठी याहून अधिक चांगले निमित्त असणार नाही.
फ्रान्सच्या ल्युमिए बंधूंनी सर्वप्रथम सिनेमाचा शोध लावला आणि वर्षभरातच म्हणजे १८९६ मध्ये त्यांनी मुंबईत आपला 'अरायव्हल ऑफ ट्रेन' हा छोटासा चलच्चित्रपट दाखवला. यानंतर केवळ १७ वर्षांत म्हणजे १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' पडद्यावर आणला. भारतीय चित्रपटसृष्टीची ती मुहूर्तमेढ मानली जाते. त्यानंतर गेल्या १०४ वर्षांत हा व्यवसाय प्रचंड ऊर्जितावस्थेला आला. क्रांती म्हणावी एवढा आमूलाग्र बदल सिनेमानं भारतात घडवून आणला. सिनेमाचं जग स्वप्नमय, मोहमय होतं. वेडी स्वप्नं पाहणाऱ्या अनेक कलंदरांना, अवलियांना या सृष्टीनं हाकारे घातले. सिनेमाचं वेड आणि कलेची जाण या दोनच घटकांची इथं आवश्यकता होती. तेव्हा तर अखंड हिंदुस्थान होता. पश्चिमेकडं अफगाणिस्तान आणि पूर्वेला ब्रह्मदेशाला आपल्या सीमा भिडल्या होत्या. त्यामुळं या विशाल अशा भारतवर्षातून मुंबई नामक स्वप्ननगरीकडं अनेक स्वप्नाळू तरुण-तरुणींचा ओघ सुरू झाला. चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीला गाजलेली त्रयी म्हणजे राज कपूर, देवआनंद आणि दिलीपकुमार उर्फ युसूफखान. हे तिघेही उत्तरेकडचे. दिलीपकुमार पेशावरचा, राज कपूरही पेशावरचाच आणि देवआनंद गुरुदासपूरचा. पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांताकडून मुंबईकडं अनेक कलंदर लेखक, अभिनेते, गायक आले. त्यात बी. आर. चोप्रा, यश चोप्रा, राज खोसला, गुलजार, सावनकुमार, मनोजकुमार, प्रकाश मेहरापासून ते आदित्य चोप्रा, करण जोहर यांच्यासारखे यशस्वी निर्माते-दिग्दर्शक होते; राज कपूर, देवआनंद, सुनील दत्त, धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना, विनोद मेहरापासून ते सनी देओल, अक्षयकुमारपर्यंत किती तरी गाजलेले नायक होते. ओ. पी. नय्यर, रोशन, सरदार मलिक, रवी यांच्यासारखे नाणावलेले संगीतकार होते. पंजाबी लोकांची धाडसी वृत्ती आणि रग्गड कष्ट करण्याची तयारी यामुळं हे लोक जगभरात गेले. तसे ते मुंबईच्या चित्रपटसृष्टीतही आले. तेव्हापासून या लोकांनी बॉलिवूडवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. पंजाबी गाणी, पंजाबी भांगडा, पंजाबी पदार्थ यांचा प्रभाव सर्वदूर पसरला तो सिनेमाच्या माध्यमातूनच.
पंजाबी लोकांसारखाच बॉलिवूडवर लक्षणीय प्रभाव आहे तो मुस्लिमांचा. मुस्लिमांनी या बॉलिवूडवर अक्षरशः राज्य केलंय आणि अजूनही ते करताहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. दिलीपकुमारपासून ते फारुक शेख, नसीरुद्दीन शाहपासून आमीर-सलमान-शाहरुख या तीन मेगासुपरस्टार खानांपर्यंत चित्रपटसृष्टीत अनेक मुस्लिम कलाकारांनी आपलं स्वतःचं अढळ असं स्थान इथं निर्माण केलंय. मुस्लिम नायिका तर एक से एक देखण्या आणि रूपगर्विता! मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी, सायराबानूपासून ते शबाना आझमीपासून आजच्या हुमा कुरेशीपर्यंत किती नावं सांगावीत! चरित्र अभिनेत्यांमध्ये जॉनी वॉकर, मेहमूदपासून आगापर्यंत किती तरी जण होते. संगीतकारांमध्ये सज्जाद हुसेन, नौशाद यांच्यापासून आजच्या ए. आर. रेहमानपर्यंत प्रचंड मोठी परंपरा आहे. गीतकारांमध्येही मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, हसरत जयपुरी ते राहत इंदौरी अशी किती तरी नावं सांगता येतील. दिग्दर्शकांमध्येही के. असीफसारख्या अवलियापासून ते नासिर हुसैन, मुजफ्फर अली, मन्सूर खान यांच्यापासून ते आजच्या शाद अलीपर्यंत अनेक नामवंत मुस्लिम दिग्दर्शक कार्यरत होते आणि आहेत.
पंजाबप्रमाणेच हिंदी सिनेमावर प्रभाव टाकणारे आणखी दोन प्रांत म्हणजे बंगाल आणि अर्थातच महाराष्ट्र. बंगाली आणि मराठी लोकांनीही हिंदी सिनेमासृष्टीवर काही काळ राज्य केलंय. 'बॉम्बे टॉकीज'ची स्थापना करणारे शशधर मुखर्जी यांच्यापासून बंगाली लोकांची परंपरा सांगता येते. सत्येन बोस, सत्यजित राय, हृषीकेश मुखर्जी, मृणाल सेन, बासू भट्टाचार्य, बासू चटर्जी ते आजच्या शुजित सरकार, दिबाकर बॅनर्जीपर्यंत ही अत्यंत समृद्ध अशी नामावली आहे. कलाकारांमध्ये अशोककुमार, किशोरकुमार आणि अनुपकुमार हे तीन भाऊ म्हणजे बंगालची हिंदी सिनेमाला मिळालेली फार मोठी देणगीच होय. याशिवाय अन्य कलाकारांमध्ये सुचित्रा सेन, उत्पल दत्त, शर्मिला टागोर, उत्तमकुमार, मिथुन चक्रवर्ती, राखी, जया भादुरी असे किती तरी उत्कृष्ट कलाकार बंगालमधून आले. संगीतकारांमध्ये सचिनदेव आणि राहुलदेव बर्मन यांचं योगदान केवळ अविस्मरणीय!
मराठी आणि महाराष्ट्र यांचं हिंदी सिनेमातलं योगदानही केवळ अतुलनीय म्हणता येईल, एवढं मोठं आहे. मुळात ही मुंबईतली चित्रपटसृष्टी महाराष्ट्रात असल्यानं मराठी कलाकारांना अधिकचा फायदाही मिळाला आहे, यात शंका नाही. आपल्या चित्रपटसृष्टीची स्थापनाच मुळी दादासाहेब फाळके या मराठी माणसानं केली. त्यानंतर व्ही. शांताराम, राजा नवाथे, अमोल पालेकर, सचिन, आशुतोष गोवारीकर, (दिवंगत) निशिकांत कामत अशा नामवंत मराठी दिग्दर्शकांनी मराठीचा झेंडा हिंदी सिनेमात फडकवत ठेवला. नायिकांमध्ये दुर्गा खोटे, शोभना समर्थ, नलिनी जयवंत, नूतन, तनुजा, स्मिता पाटील, पद्मिनी कोल्हापुरे, माधुरी दीक्षित, ऊर्मिला मातोंडकर, सोनाली कुलकर्णी (सीनियर) अशा अनेक मराठी मुलींनी आपली झळाळती कारकीर्द इथं घडविली. नायकांमध्ये व्ही. शांताराम, सचिन, अमोल पालेकर, नाना पाटेकर ते आजच्या श्रेयस तळपदे, रितेश देशमुखपर्यंत किती तरी मराठी नायक हिंदी सिनेमात रूपेरी पडद्यावर आले. संगीतकारांमध्ये स्नेहल भाटकर, सुधीर फडक्यांपासून ते लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीतील लक्ष्मीकांत कुडाळकरांपर्यंत अनेक चांगले संगीतकार बॉलिवूडमध्ये ठसा उमटवून गेले. आणि शेवटी, मंगेशकर कुटुंबाशिवाय हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिता शक्य तरी आहे का? लता, आशा, उषा, हृदयनाथ यांचं योगदान भाषा, धर्म, वर्ण यांच्यापलीकडं गेलं आहे. एक लताचा आवाज सर्व भारताला संगीताच्या एका सूरात बांधून ठेवू शकतो. लतानं भारतातल्या जवळपास प्रत्येक भाषेत गाणं म्हटलंय. त्यामुळं लताचा आवाज ही आता आपल्या भारतीयत्वाचीही ठळक ओळख बनली आहे, यात शंका नाही. या वर्षी फेब्रुवारीत लता मंगेशकर नावाचा ऐहिक देह आपल्याला सोडून गेला असला, तरी तो अमृतस्वर हजारो गाण्यांच्या रूपात आपल्यात कायमचा राहणार आहे आणि याचा अनुभव आपण गेले सहा महिन्यांपासून घेत आहोतच. लताएवढंच हिंदी चित्रपटसंगीतात महत्त्वाचं स्थान आहे ते आशा भोसलेंचं. या जन्मानं मराठी असलेल्या भगिनींनी भारतीयांच्या अबोल भावनांना फार गोड, सच्चा सूर दिला. आमची सगळी अभिव्यक्ती त्यांच्या गळ्यांतून आली, असं म्हणायला हवं.
दक्षिणेतून आलेले गुणवंत कलाकारही कमी नव्हते. तत्कालीन मद्रास हे मुंबईएवढंच सिनेमानिर्मितीचं मोठं केंद्र होतं. दाक्षिणात्य जनतेच्या सिनेमाप्रेमाची महती काही औरच. एम. जी. रामचंद्रन, शिवाजी गणेशन, एन. टी. रामाराव, राजकुमार, जयललिता, रजनीकांत, विजयकांत, कमल हसन, विष्णुवर्धन, चिरंजीवी, नागार्जुन, वेंकटेश, मामुट्टी, मोहनलाल, नासर यासारख्या कित्येक महान कलावंतांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी अखंड गाजवत ठेवली. वैजयंतीमाला, श्रीदेवी, हेमामालिनी, रेखा, वहिदा रेहमानपासून ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, विद्या बालनपर्यंत अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींनी हिंदी सिनेमात नाव कमावलं. किंबहुना पंजाबी किंवा उत्तरेतला धष्टपुष्ट, उंचापुरा नायक आणि दाक्षिणात्य सौष्ठवपूर्ण नायिका असा ट्रेंड कित्येक काळ हिंदी सिनेमात चालला आणि हिटही झाला. दक्षिणेतल्या नायकांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलं स्थान मिळवलं. विशेषतः रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी, वेंकटेश, नागार्जुनपासून ते प्रभास, राणा दुगुबत्तीपर्यंत अनेक नायक हिंदीत हिट ठरले. मणिरत्नमसारखा दिग्दर्शक हिंदीमधलाही महत्त्वाचा दिग्दर्शक मानला जातो. त्यापूर्वी श्याम बेनेगल, के. बालचंदर, के. बापय्या, के. विश्वनाथ, गिरीश कासारवल्ली, अदूर गोपालकृष्णन या दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी देशभर लौकिक मिळविला. आणि हो, गुरुदत्तला कसं विसरून चालेल? अतिशय मनस्वी अशा या दिग्दर्शकाची अभिव्यक्ती फार उच्च पातळीवरची होती. ‘प्यासा’ किंवा ‘कागज़ के फूल’सारख्या त्याच्या कलाकृतींनी आता ‘अभिजात’ दर्जा मिळविला आहे आणि जगभरातले सिनेअभ्यासक त्या कलाकृतींचा अभ्यास करत असतात.
याव्यतिरिक्त देशातील इतर प्रांतांतूनही अनेक महत्त्वाचे कलाकार बॉलिवूडमध्ये आले. त्यात गुजरातमधून संजीवकुमार, आशा पारेख, मनमोहन देसाई, संजय लीला भन्साळी असे कलाकार आले. उत्तर प्रदेशातून अमिताभ बच्चनसारखा ('छोरा गंगा किनारेवाला') मेगास्टार मिळाला. बिहारमधून शत्रुघ्न सिन्हा आला. अनुराग कश्यप, प्रकाश झा यासारखे दिग्दर्शक मिळाले. नेपाळमधून माला सिन्हा, मनीषा कोईराला यांच्यासारख्या देखण्या अभिनेत्री आल्या. हरियाणातून रणदीप हुडासारखा अभिनेता पुढं आला. सिंधी समाजातून रणवीरसिंगसारखा हिरो गवसला. पारशी समाजातून बोमन इराणी, पेरेझाद झोराबियन किंवा रॉनी स्क्रूवालासारखे कलाकार, निर्माते आले. आसाममधून भूपेन हजारिका, जान्हू बरुआसारखे कलाकार इथं आले आणि लोकांनीही त्यांना डोक्यावर घेतलं.
काही सिनेमांच्या उदाहरणांतून या विविधतेतून भारत नावाच्या संकल्पनेचं दर्शन कसं घडतं, हे पाहणं रंजक ठरेल. हिंदी चित्रपटसृष्टीचं मुख्यालय मुंबई असल्यामुळं इथं देशभरातून कलाकार येत असतात. त्यामुळं खुद्द मुंबई शहर म्हणजेच एक 'छोटा भारत' झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीच्या काळात मराठी माणसांसोबतच बंगाली आणि पंजाबी माणसांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. महाराष्ट्रातून दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम, बंगालमधून हिमांशू रॉय, सुबोध मुखर्जी, पंजाबमधून राज कपूर, देवआनंद अशी नावं सुरुवातीपासूनच हिंदी सिनेमात आघाडीवर राहिली. सुरुवातीच्या स्टुडिओ संस्कृतीत विविध प्रांतातील, जातिधर्मांतील लोक एका छताखाली काम करीत असत. नेमून दिलेलं काम चोख करता येणं एवढीच पूर्वअट इथं होती. मुंबईतच हे सगळं सिनेमाचं जग आल्यानं मराठी माणसांचा या व्यवसायात पहिल्यापासूनच राबता राहिला. अगदी ७० वर्षांपूर्वीच्या सिनेमांची शीर्षक नामावली पाहिली तरी त्यात किती तरी मराठी नावं दिसतील. स्पॉटबॉयपासून ते संकलन, सिनेमॅटोग्राफीपर्यंत अनेक कामांत मराठी मंडळी आघाडीवर होती. संगीत, गायन या क्षेत्रांतही मराठी व बंगाली लोक आघाडीवर होते. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून अनेक उत्तमोत्तम कलाकृती तयार झाल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय विषय मांडायला मर्यादा असत. त्यामुळं पौराणिक सिनेमांतून प्रतीकात्मक पद्धतीनं राजकीय प्रचार होत असे. त्यातही संपूर्ण देशाला अपील होईल, अशा गोष्टी निवडल्या जात. त्यामुळं 'राजा हरिश्चंद्र'पासून ते 'अयोध्येचा राजा'पर्यंतचे सिनेमे पाहिले, तर त्यात रामायण, महाभारतकालीन कथांचाच प्रामुख्यानं भरणा झालेला दिसून येईल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एक वेगळंच चैतन्याचं वातावरण वाहू लागलं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाची नव्यानं उभारणी सुरू होत होती. देशावर मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या समाजवादाचा पगडा होता. आज युक्रेनवर लादलेल्या युद्धामुळं रशिया जगाच्या नजरेत खलनायक झाला असला, तरी हा आपला मित्रदेश जगाच्या रंगमंचावर तेव्हा भारताची पाठराखण करीत होता. नेहरू प्रणीत समाजवादाची भुरळ त्या वेळच्या अनेक कलावंतांना पडली. राज कपूर हे त्यापैकी एक प्रमुख नाव. राजच्या सुरुवातीच्या 'आवारा', 'श्री ४२०' या चित्रपटात हा गरीब विरुद्ध श्रीमंत, भांडवलशाही विरुद्ध समाजवाद असा थेट संघर्ष ठळकपणे दिसतो. राज कपूरवर चार्ली चॅप्लिनचा मोठा प्रभाव होता. त्यामुळं त्यानं त्याचा 'राजू' हा सर्वसामान्य नायक या चॅप्लिन शैलीत चितारला. 'मेरा जूता हैं जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी' या त्याच्या ओळी तेव्हाच्या भारतीय तरुणांच्या भावना नेमकेपणानं व्यक्त करीत होत्या. सत्यजित राय यांचा 'पथेर पांचाली' (१९५५) हा जागतिक कीर्तीचा चित्रपट याच काळात तयार झाला. बिमल रॉय हेही असंच मोठं नाव. रॉय यांनी आपल्या चित्रपटांतून तेव्हाच्या ज्वलंत सामाजिक विषयांवर भाष्य केलं. 'दो बिघा जमीन', 'सुजाता', 'बंदिनी' यासारख्या अभिजात चित्रपटांतून त्यांनी तत्कालीन सरंजामशाही, स्पृश्यास्पृश्यता, जातीयवाद, स्त्रीवरील अन्याय अशा समस्यांना वाचा फोडली. व्ही. शांताराम यांनीही याच काळात 'दो आँखे बारह हाथ'सारख्या चित्रपटातून एक वेगळा सामाजिक विषय मांडला. मेहबूब खान यांनी 'मदर इंडिया' (१९५७) या चित्रपटाद्वारे कणखर भारतीय स्त्रीचं दर्शन सगळ्या जगाला घडवलं. ऑस्कर स्पर्धेत अंतिम नामांकनापर्यंत या चित्रपटानं धडक मारली. 'मदर इंडिया'नं खऱ्या अर्थानं 'भारतीयत्वाची संकल्पना' पडद्यावर अधोरेखित केली, असं म्हणायला हरकत नाही. बी. आर. चोप्रांच्या 'नया दौर'नं (१९५८) माणूस विरुद्ध यंत्र हा तेव्हा नव्यानंच उद्भवू पाहणारा संघर्ष वेधक पद्धतीनं चित्रित केला होता. या सर्व सिनेमांचे विषय संपूर्ण देशाला आवडणारे, भावणारे आणि प्रसंगी देशवासीयांच्या डोळ्यांत अंजन घालणारे असे होते. सत्तरीचं दशक हे देशातलं सर्वांत रोमँटिक आणि रसिलं दशक होतं, असं तेव्हाच्या कलाकृतींकडं पाहताना लक्षात येतं. स्वातंत्र्य मिळून केवळ दहा-पंधरा वर्षंच झाली होती. नेहरू अद्याप हयात होते. वातावरणातला स्वप्नाळूपणा कायम होता. देशभरात अनेक नवनव्या कलाकृती निर्माण केल्या जात होत्या, धरणं बांधली जात होती, विद्यापीठं उभारली जात होती, कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या, 'बीटल्स'चा प्रभाव महानगरांवर होता, सिनेमा रंगीत होत होता, दलित लेखक पुढं येत होते, समाजातल्या तोवर मूक राहिलेल्या अनेक वर्गांना अभिव्यक्ती लाभत होती... अशा या वातावरणाचा प्रभाव हिंदी सिनेमावर पडला नसता तरच नवल! राज-दिलीप-देव आनंद ही त्रयी जोरात होती. संगीताचा तर सुवर्णकाळच होता. मदनमोहन, एस. डी. बर्मन, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, रवी, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल असे अनेक संगीतकार त्या वेळी एक तर कारकिर्दीच्या ऐन शिखरावर तरी होते किंवा उदयाला तरी येत होते. महंमद रफी, मुकेश व किशोरकुमार ही त्रयी पुरुष गायकांमध्ये आघाडीवर होती, तर लता-आशाशिवाय नायिकांना दुसरा आवाज नको होता. (अर्थात सुमन कल्याणपूर यांच्यासारख्या महान गायिकेनंं तेव्हा या स्पर्धेतही आपलं ठळक असं वेगळं स्थान निर्माण केलंच होतं.) सत्तरचं दशक संपता संपता 'आराधना'द्वारे (१९६९) राजेश खन्ना नामक 'फिनॉमिना'चं हिंदी चित्रपटसृष्टीत आगमन झालं. रोमँटिक नायकांचे ते दिवस होते. पुढची तीन-चार वर्षं राजेश खन्नानं चित्रपटसृष्टीवर राज्य केलं आणि तो पहिला 'सुपरस्टार' झाला. याच काळात मनोजकुमारनं 'उपकार' या गाजलेल्या चित्रपटापासून भारताला केंद्रस्थानी ठेवून सिनेमे काढायला सुरुवात केली. त्याचे चित्रपट बटबटीत व भडक असत. त्यातून राष्ट्रप्रेमाचा हेवी डोस प्रेक्षकांना पाजला जाई. 'मेरे देश की धरती'सारखी हिट गाणी त्यानंच दिली. मनोजकुमारचं हे भारतप्रेम पुढं एवढं बळावलं, की लोक त्यालाच 'भारतकुमार' म्हणायला लागले. मनोजकुमारच्या सिनेमांचा दर्जा कसाही असला, तरी त्याच्या देशप्रेमाविषयी कुणीही शंका घेतली नाही किंवा आजच्या भाषेत सांगायचं, तर त्याला 'ट्रोल'ही केलं नाही.
राजेश खन्नाचं राज्य सुखेनैव सुरू असताना एक लंबूटांगा नट 'जंजीर'द्वारे मोठ्या पडद्यावर आला आणि त्यानं या रोमँटिसिझमला पहिली काडी लावली. त्या नटाचं नाव अमिताभ बच्चन. कुठलीही कलाकृती ही त्या काळाचं प्रॉडक्ट असते. 'जंजीर' (१९७३) हा प्रकाश मेहरांचा चित्रपट अशा काळात आला होता, की तो लोकप्रिय होणं हे त्याचं विधिलिखितच असणार होतं जणू... देशाला स्वातंत्र्य मिळून २५ वर्षं झाली होती. स्वप्नाळूपणाचा 'हनीमून पीरियड' केव्हाच संपला होता. नेहरू जाऊन दहा वर्षं होत आली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या. दिल्लीत 'परमिटराज'मुळं नवी बाबू आणि खाबू संस्कृती उदयास आली होती. भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा लाभली होती. देशातल्या गरिबांचे हाल सुरू होते. रेशनवरच्या धान्याचा काळाबाजार होत होता. त्यात १९७२ मध्ये देशात पडलेल्या भयंकर दुष्काळानं तर या देशाच्या चेहऱ्यावरच्या सात्त्विकतेचा उरलासुरला बुरखाही टराटरा फाडून टाकला. माणसं माणसांना घाबरू लागली. चोऱ्या-दरोडे वाढले. हजारो खेडी ओस पडली. शहरांकडं स्थलांतरितांचे लोंढे वाहू लागले. व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात या घटनेचं वर्णन '...आणि माणसं जगायला बाहेर पडली' अशा काळजात चर्रर्र करणाऱ्या शब्दांत केलं आहे. अशा या काळात 'जंजीर' आला. त्यात शेरखानसारख्या गुंडाला 'जब तक बैठने को कहा न जाए, चूपचाप खडे रहो... ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं...' असं ठणकावणारा पोलिस इन्स्पेक्टर जनतेनं डोक्यावर घेतला नसता तरच नवल. त्यानंतर आलेला यश चोप्रांचा 'दीवार' म्हणजे आपल्या त्या वेळच्या समाजाचं अवघं दुभंगलेपण कवेत घेणारा क्लासिक चित्रपट होता. याही चित्रपटात अमिताभ होता. अमिताभची 'अँग्री यंग मॅन'ची प्रतिमा ही त्या काळाचं प्रॉडक्ट होती. सलीम-जावेद यांच्यासारख्या हुशार दुकलीनं त्या सामाजिक परिस्थितीचा पुरेपूर अंदाज घेऊन अमिताभला त्या प्रतिमेत कायम पेश केलं. अमिताभचे तेव्हाचे सगळे चित्रपट म्हणजे तेव्हाच्या भारताचं प्रतीकच आहेत. कुठलीही कलाकृती फक्त तात्कालिक मनोरंजनापलीकडं जाऊन असं काही ठोस 'स्टेटमेंट' करते, तेव्हा ती कालातीत होऊन जाते. पुढच्या काळात गुलजार यांनी अशाच पद्धतीनं सामाजिक विषयांची हाताळणी केली आणि एक प्रकारे तेव्हाच्या समाजाचं दस्तावेजीकरण केलं. हृषीकेश मुखर्जी, बासू चटर्जी, बासू भट्टाचार्य, सई परांजपे यांनी अमोल पालेकर, शबाना आझमी, झरिना वहाब, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह यांना घेऊन केलेले मध्यमवर्गीय जाणिवांचे हलकेफुलके चित्रपटही तेव्हाच्या समाजाचं यथार्थ चित्रण करतात. अलीकडच्या काळात आशुतोष गोवारीकरनं 'लगान', 'स्वदेस'सारख्या चित्रपटांतून पुन्हा भारतीयत्वाची जाणीव अधोरेखित केली आहे. मधुर भांडारकरच्या चित्रपटांतून एकविसाव्या शतकातील भारतीय समाज आणि विशेषतः स्त्रिया यांचं टोकदार चित्रण काही वेळा पाहायला मिळालं आहे. अलीकडं 'चक दे इंडिया' या शाहरुखच्या गाजलेल्या सिनेमानंतर लोकप्रिय क्रीडापटांची लाट आली. त्यातही 'पानसिंग तोमर', 'भाग मिल्खा भाग', 'मेरी कोम', ‘दंगल’ अशा चित्रपटांनी राष्ट्रीयत्वाची भावना जागृत ठेवायला मदत केली आहे. सध्या अक्षयकुमार थोडासा मनोजकुमारच्या भूमिकेत शिरल्यासारखा दिसतो. 'टॉयलेट - एक प्रेमकथा', 'पॅडमॅन' अशासारखे त्याचे चित्रपट विशिष्ट प्रचारकी हेतू डोळ्यांसमोर ठेवून निर्मिलेले आहेत. अर्थात त्यात काही गैर नाही.
एका अर्थानं संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करणारं बॉलिवूड म्हणजे एक प्रकारचा 'मिनी इंडिया'च आहे. इथं तुमच्यातल्या गुणवत्तेला महत्त्व आहे. तुम्ही कुठून आलात, तुमचा चेहरा कसा आहे, तुमची जात कोणती आहे या गोष्टी मग फारशा महत्त्वाच्या ठरत नाहीत. ओम पुरीसारखा कुठल्याही अँगलनं हिरोचा चेहरा नसलेला माणूसही केवळ अफाट गुणवत्तेच्या जोरावर इथं अभिनेता म्हणून प्रस्थापित होतो. तीच गोष्ट अलीकडच्या काळातील नवाझुद्दीन सिद्दिकीची. त्याला संघर्ष करावा लागला हे नक्कीच; पण एक संधी मिळाली, तर त्या गुणवत्तेचं कधी ना कधी चीज होतं असा विश्वासही हीच इंडस्ट्री देऊ शकते. अलीकडच्या काळातलं असंच एक उदाहरण आहे कंगना रनौट हिचं. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं ती भलत्याच कारणांसाठी चर्चेत असते; पण मुळात तिचा संघर्ष आणि कोणीही गॉडफादर नसताना तिनं इथं येऊन मिळवलेलं यश हे अनेकांना स्फूर्तिदायी, प्रेरणादायी वाटतं.
असं म्हणतात, की मुंबापुरीत रोज किमान दीड ते दोन हजार तरुण-तरुणी रोज बॉलिवूडमध्ये संधी मिळेल या शोधात इथं येत असतात. पूर्वी स्टुडिओच्या फेऱ्या मारत. आता मुंबईतल्या गिरण्यांच्या जागी उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतीतल्या या चित्रपट निर्मात्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये फेऱ्या मारतात. दूर उपनगरांत कुठं तरी रूम शेअर करून राहतात. दोन-दोन तास प्रवास करून कुणाकुणाला कामासाठी भेटत राहतात. जेवण वगैरे दूरच; मग मुंबईतला हक्काचा वडापाव मदतीला येतो. अक्षरशः कित्येक हजार तरुणांची ही रोजची कहाणी आहे. हल्लीची तरुणाई प्रॅक्टिकल पण आहे. ती एकदम नायक किंवा नायिका होण्याचं स्वप्न पाहत नाही. कुणी तांत्रिक विभागातला अभ्यासक्रम केलेला असतो, कुणी लेखन-काव्य यात क्रिएटिव्हिटी दाखवत असतो... या प्रत्येकाकडं हजारो कल्पना असतात आणि त्यांना त्या लोकांसमोर सादर करायच्या असतात. या तरुणाईला कुठलीही जात नसते, धर्म नसतो, वंश नसतो, भाषा नसते. त्यांना गरज असते ती फक्त एका संधीची! आणि गेली आठ-दहा दशकं हिंदी सिनेमा अनेकांना अशी संधीची दारं उघडत आला आहे. अनेकांचं नशीब एका रात्रीत बदलून गेलं आहे. अर्थात एका यशस्वी कहाणीसोबत अनेक अपयशी कहाण्याही जोडलेल्या असतात, हे नाकारण्यात अर्थ नाही. पण कधी तरी संधी मिळू शकते, हा विश्वास अद्याप कायम आहे.
हा संघर्षाचा काळ कठीण असतो, तसा तो आपल्यातल्या चांगल्या गुणांची परीक्षा पाहणाराही असतो. मग मुंबईत एकत्र राहणाऱ्या या 'आंतरभारती'चं मैत्र सुरू होतं. कलेची अंतर्यामी असलेली ओढ या एकाच धाग्यानं गुंफलेले सगळे एकत्र येतात. एकत्र जेवतात, एकत्र झोपतात, एकत्र सुख-दुःख वाटून घेतात. एकमेकांना मदतीचा हात देतात. म्हणून तर दक्षिणेतला गुरुदत्त आणि उत्तरेतला देवआनंद यांची उत्तर-दक्षिणेचा दुवा असणाऱ्या महाराष्ट्रात, पुण्यात ओळख होते, चांगली मैत्री होते आणि देव आपल्या संस्थेच्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शक गुरूकडं सोपवतो. म्हणून तर राज कपूर आपल्या 'आह'चं दिग्दर्शन मराठमोळ्या राजा नवाथेंकडं देतो. बिमल रॉयना आपली नायिका म्हणून मराठमोळी नूतनच हवी असते. 'बैजू बावरा' (१९५२) या सिनेमातील 'मन तडपत हरी दर्शन को आज' या गाण्याचं उदाहरण तर नेहमीच दिलं जातं. हिंदू भजन असलेलं हे गीत लिहिलंय शकील बदायुनी यांनी, संगीत दिलंय नौशाद यांनी आणि गायलंय महंमद रफी यांनी! 'आयडिया ऑफ इंडिया' म्हणजे दुसरं काय! लता मंगेशकरांनी गायलेलं 'अल्ला तेरो नाम' हे ‘हम दोनो’मधलं गाणंही असंच अजरामर आहे. उस्ताद बिस्मिल्लाँ खाँ यांचं शहनाईवादन हे असंच एक उदाहरण! खाँसाहेबांच्या सनईच्या सूरांशिवाय हिंदूंचं कुठलंही कार्य पूर्ण होत नाही. सलमान खानकडं बसणारा गणपती हा अनेकांच्या कौतुकाचा विषय असतो. अर्थात कलाकारांकडं जात किंवा धर्म या दृष्टीनं कधी पाहिलं जात नाही हेही आहेच. आणि तसं पाहिलं जाऊही नये. मंगल सूरांना, प्रार्थनेच्या शब्दांना, माणुसकीच्या गोष्टींना जात-धर्माचं लेबल लावण्यात काय अर्थ!
आपल्या हिंदी सिनेमानं असं 'भारतीयत्व' जपलं आहे. 'आयडिया ऑफ इंडिया'ची खरी मांडणी आणि ओळख या सिनेमाजगतानंच आपल्याला करून दिली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
अलीकडच्या काळात मात्र या चांगल्या वातावरणाला तडा जातोय की काय, अशी भीती वाटण्याजोगी परिस्थिती आहे. विशेषतः १९९२ च्या बाबरी मशीद पतनानंतर भारतात हिंदू-मुस्लिम ऐक्याला मोठा तडा गेला, यात वाद नाही. त्यानंतरच्या मुंबईत झालेल्या जातीय दंगली, विशेषतः गुजरातमधल्या दंगली, इस्लामी मूलतत्त्ववादाची लागण, त्याला बळी पडणारे भारतीय मुस्लिम तरुण या सर्वांमुळं वातावरण विखारी आणि विषारी होत गेलं. त्याची लागण बॉलिवूडलाही नक्कीच झाली. विशेषतः खान त्रयीच्या उत्तुंग यशानंतर 'मुस्लिम हिरो', 'हिंदू हिरो' असं वर्गीकरण अप्रत्यक्षपणे करण्यात येऊ लागलं. बाळासाहेब ठाकरे यांनी मागं 'तुमचा दाऊद, तर आमचा गवळी' असं म्हणून गुंडांच्या टोळीयुद्धालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. आताही 'कशाला त्या मुसलमानांचे सिनेमे पाहता?' असा प्रचार होतोच. मग शाहरुखच्या सिनेमासमोर अजय देवगणचा किंवा सलमानच्या सिनेमासमोर अक्षयकुमारचा किंवा आमीरच्या सिनेमासमोर हृतिक रोशनचा सिनेमा लावला जाऊन नकळत धार्मिक रंग दिला जातो. हे सगळंच चुकीचं आहे. दोन्ही बाजूंनी चुकीचं आहे. 'मन तडपत हरी दर्शन को आज' असं आर्ततेनं गाणारे रफीसाहेब खरे आहेत! बिस्मिला खाँसाहेबांची मंजूळ सनई खरी आहे. लताच्या गळ्यातला गंधार खरा आहे... हा 'भारतीयत्वा'चा सूर आहे. तो मंगल सूर निनादत राहिला पाहिजे... तो सूर आहे तोवर 'भारत' ही संकल्पनाही असेल...
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीत चित्रपटांनी आपल्याला दिलेलं हे देणं लक्षात ठेवून त्याबद्दल सर्वांनी कृतज्ञभाव ठेवला पाहिजे.
---
(पूर्वप्रसिद्धी : चपराक दिवाळी अंक २०२२)
---
No comments:
Post a Comment