काजोल म्हणजे उत्साहाचा अखंड कोसळणारा धबधबाच. तिचा लडिवाळपणा, अवखळपणा... कधीच न आटणारा हास्याचा झरा... हळूच दाताखाली ओठ दाबून स्माइल टाकण्याची तिची अदा... सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तिचं सावळं सुंदर रूप. सौंदर्य म्हणजे पांढरापिट्ट गोरेपणा हे समीकरण नामंजूर करणाऱ्या वहिदाची परंपरा पुढं चालविणारी ही काजोल. ती परीराज्यातली राणी कधीच वाटली नाही. 'गर्ल नेक्स्ट डोअर' असणं हे तिचं शक्तिस्थान होतं. आपली जिवाभावाची मैत्रीण असावी, तर अशी... हे तिच्याबद्दल जसं वाटलं, तसं इतर नायिकांबद्दल क्वचितच वाटलं. (त्यांच्याबद्दल काय वाटलं तो वेगळा भाग!) पण काजोलचं हे असं आपल्याआपल्यात असणं इतकं नैसर्गिक होतं, की पाहता पाहता 'कार्टी काळजात घुसली'!
काजोलची कारकीर्द अकरा वर्षांची. हिंदी नायिकांच्या मानानं पुष्कळच मोठी. या काळात तिनं केलेले एकूण चित्रपट (गेस्ट अपिअरन्ससह) केवळ २५. मात्र, तरीही ती लक्षात राहिली, ठसा उमटवत राहिली ते तिच्या उत्स्फूर्त, नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर.
राहुल रवैलच्या 'बेखुदी'तून (१९९२) तिनं चाचपडतच पदार्पण केलं. पुढच्याच वर्षी आलेल्या 'बाजीगर'नं खऱ्या अर्थानं तिच्यासाठी यशाची कवाडं खुली केली. 'उधार की जिंदगी'तल्या जितेंद्रच्या नातीची तिनं साकारलेली भूमिका समीक्षकांचीही वाहवा मिळवून गेली. त्यानंतर काजोलचा प्रवास निर्वेधपणे सुरू झाला. १९९४-९५ मध्ये तिला धडाधड सिनेमे मिळत गेले. 'ये दिल्लगी', 'करन-अर्जुन', 'ताकत', 'हलचल', 'गुंडाराज' हे तिनं या काळात केलेले चित्रपट. त्यात तिला अभिनेत्री म्हणून करण्यासारखं काहीच नव्हतं. पण प्रेक्षकांच्या नजरेसमोर सातत्यानं येत गेल्यानं आघाडीच्या नायिकांमध्ये तिचं नाव चमकू लागलं.
'डीडीएलजे'ची क्रांती
याचाच फायदा मिळून तिला मिळाला यशराज बॅनरचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'. यश चोप्रांनी प्रथमच दिग्दर्शनाची धुरा आपल्या मुलाकडं - आदित्य चोप्राकडं - सोपविली होती. त्यानं या चित्रपटाचा फॉर्म्युलाही टिपिकल निवडला. मूळ पंजाबी, पण लंडनमध्ये स्थायिक झालेलं कुटुंब, भारतीय संस्कारांना जपणारं... नायिकेला प्रवासात भेटणारा 'जिप्सी' नायक, त्यांचं एकमेकांच्या प्रेमात पडणं, तिथून भारतात... मग लग्न समारंभ... मुलीच्या घरच्यांना नाराज न करता त्यांचं प्रेम मिळवूनच मुलीचा हात मिळविण्याची नायकाची 'घरंदाज' प्रवृत्ती! सगळा कसा 'हिट'चा फॉर्म्युला! 'यशराज'चा फॉर्म्युला तोच असला, तरी 'आदी'ची दृष्टी नवी होती. त्यांच्या नायिकेच्या 'रोल'मध्ये अवखळ, 'चुलबुली' काजोल 'सिमरन'च्या रूपात फिट्ट बसली. शाहरुखनं तिला मारलेली 'सेन्योरिटा' ही लाडिक हाक आणि काजोलनं 'मैं चली बन के हवा...' म्हणत दिलेला तितकाच खणखणीत प्रतिसाद हे 'कॉम्बी' एवढं तुफान यशस्वी झालं, की 'डीडीएलजे'चं यश ही 'बॉलिवूड'ची दंतकथा बनली. काजोलशिवाय 'डीडीएलजे' ही कल्पनाच आपण करू शकत नाही, एवढी तिची 'सिमरन' हिट झाली!
अर्थात काजोलनं एवढ्यावरच समाधान मानलं नाही. पुढे आलेल्या राजीव रायच्या 'गुप्त'मध्ये (१९९७) तिनं नकारात्मक भूमिका वठविली. या चित्रपटाबद्दल तिला सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेबद्दलचं 'फिल्मफेअर' मिळालं. हे पारितोषिक मिळविणारी ती पहिलीच अभिनेत्री. यानंतर तनुजा चंद्रानं 'दुश्मन'मध्ये (१९९८) काजोलला डबल रोल दिला. सोनिया आणि नयना सहगल या दोन्ही भूमिकांत काजोलनं जबरदस्त छाप पाडली. आशुतोष राणाच्या तगड्या व्हिलनसमोर उभी राहिलेली काजोल एक 'समर्थ' अभिनेत्री आहे, यावर शिक्कामोर्तबच केलं 'दुश्मन'नं. याशिवाय 'प्यार तो होना ही था'मधली तिची 'संजना' कोण विसरेल? यातील तिचा नायक अजय देवगण हाच तिच्या खऱ्या आयुष्यातलाही नायक आहे, हे हळूहळू सर्वांनाच ठाऊक झालं होतं. इतर नायक-नायिकांप्रमाणे केवळ 'अफेअर' न करता, अजय व काजोलनं १९९९ मध्ये लग्न केलं.
लग्न केल्यानंतर बॉलिवूडच्या नायिकेचं काय होतं, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. काजोलचंही तसंच झालं. करण जोहरच्या आग्रहास्तव केलेला 'कभी खुशी कभी गम' (२००१) वगळता काजोल हळूहळू रूपेरी पडद्यावरून अस्तंगत झाली. त्यातच 'निसा' या कन्येच्या जन्मानंतर तर ती 'संसाराला लागली', असंच वाटलं. पण गेल्या वर्षी 'व्हर्लपूल' आणि नंतर 'टाटा इंडिकॉम'च्या जाहिरातीत पतीसह झळकलेली हसरी काजोल पाहून बरं वाटलं. 'संसार सुखाचा चाललाय', 'मुलगी झाल्याचं मानवलंय' असंही वाटलं. आता हिचं दर्शन जाहिरातींतूनच होणार, असं वाटत असताना अचानक 'फना'ची ती गूढ पोस्टर्स प्रदर्शित होऊ लागली. हळूहळू बातमी फुटली. 'ती' परततेय... चक्क आमीर खानसह. यापूर्वी तिनं आमीरसोबत फक्त इंद्रकुमारचा 'इश्क' केला होता. त्यातही तिचा नायक अजय देवगणच होता. आता मात्र 'फुलफ्लेज्ड' नायिका म्हणून आमीर खानसह. तिची 'फना'मधली 'झूनी अली बेग'ही 'सिमरन'इतकीच लोभस असेल, याची खात्री आहे. तिच्या दुसऱ्या 'इनिंग'मुळे बॉलिवूडमध्ये इतिहास निर्माण झालाय. (लग्न झालेली, तीन वर्षांच्या मुलीची आई हिंदी चित्रपटाची 'नायिका' असू शकते, हे ती सिद्ध करीलच.)
सो! वेलकम सेनोरिटा!
(पूर्वप्रसिद्धी - १८ मे २००६, कलारंजन, सकाळ)
----
No comments:
Post a Comment