6 May 2013

आमची दिवाळी पहाट...





ज्या धंद्यात रात्रं थोडी आणि सोंगं फार आणि डे-ड्युटी कमी आणि नाइट शिफ्ट फार अशा पत्रकारितेच्या धंद्यात प्रवेश केला, तेव्हाच रम्य पहाट आणि मनमौजी संध्याकाळ या दोन गोष्टींना आपण कायमचे मुकलो, हे लक्षात आलं. आयुष्यात काही गोष्टी ठराविक वेळेला केल्या, तरच बरं असतं. उदा. काकडआरती ही दुपारी दोनला करून कशी चालेल? किंवा पाणीपुरी संध्याकाळी सहा वाजता जशी लागेल तशी ती दुपारी साडेबाराच्या उन्हात खाऊन कसं जमेल? तसेच लग्न ही गोष्टदेखील वेळेतच करणे इष्ट होय. अन्यथा चाळिशीला लग्न आणि रिटायरमेंटला पोरगं अजून दहावीतच... असली तऱ्हा होऊन काय उपयोग? तर मुद्दा पहाट किंवा संध्याकाळ एन्जॉय करण्याचा आहे. सूर्य डोंगराआडून वर येताना किंवा समुद्रात लुप्त होताना पाहायचा तर आमच्या धंद्यात स्पेशल रजाच टाकावी लागते. आणि रजा काढलीय तर 'झोपू की मस्त' म्हणत सकाळचा सूर्योदय काही पाहायला मिळत नाही तो नाहीच. संध्याकाळचं सुखद वातावरण मात्र आम्ही पुरेपूर उपभोगूच शकत नाही. कारण सुट्टी असली, तरी याचं काय झालं, त्याचं काय झालं असल्या बातम्यांतच आम्हाला जादा रस असतो. तेव्हा या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांत ज्या गोष्टींचं प्रस्थ पुण्यात किंवा महाराष्ट्रातल्या अन्य प्रमुख शहरांत खूप वाढलं आहे, त्या 'दिवाळी पहाट' या कार्यक्रमांना हजेरी लावायचं आम्ही मनोमन ठरवून टाकलं. ही पहाट कधीच साधी नसते.... ती एक तर 'चैतन्याचा झरा' असते किंवा 'सृजनाचा उत्सव' असते... कधी ती 'सप्तरंगी इंद्रधनू' असते, तर कधी ती 'स्वर-शब्द-चित्रांचं शिल्प' असते....! साधारणतः दिवाळीच्या आठ-पंधरा दिवस आधी पेपरांतून या पहाटांच्या जाहिराती झळकू लागतात. मग शहरातली तमाम नाट्यगृहं, लॉन्स आदी बुक झालेली पाहायला मिळतात. आम्ही (बहुदा नरक चतुर्दशीच्या) पहाटे तडमडत कधी नव्हे ते लवकर उठतो आणि आंघोळ... नव्हे, नव्हे, अभ्यंगस्नान उरकून, (लग्नाच्या वेळी घेतलेला आणि फक्त याच दिवसासाठी राखून ठेवलेला) सिल्कचा झब्बा वगैरे घालून, भरपूर अत्तरबित्तर चोपडून तयार होतो. अर्धांगही चक्क साडी नेऊन, गजरा माळून तयार असतं. मग आपण त्या नाट्यगृही पोचतो. तिथं आपल्या आधीच किती तरी पब्लिक जमलेलं असतं. (सगळ्यांत पहिल्यांदा कोण येतं हे एकदा मला शोधायचं आहे...) सनई वगैरे सुरू असते. सगळे टिपिकल चेहरेच असतात. मात्र, सणासुदीला बायका जरा जास्तच नटून (वय लपविण्याचा प्रयत्न करीत) आलेल्या असतात. त्यांच्याकडं पाहण्यासारखं काहीच नसतं. मग आपण मित्रासोबत एखादा कोपरा गाठून गावगप्पा सुरू करतो. तिकडं रंगमंचावर पहाट फटफटू लागलेली असते. दिवाळी पहाट हाच ज्यांचा वर्षभराचा धंदा असतो, अशी माणसं रंगमंचावर दिसत असतात. त्यांची गाणी वर्षानुवर्षं आपण ऐकलेलीच असतात. तरीही त्यांच्या त्याच त्या गाण्यांना, मुरक्यांना लोक पुन्हा पुन्हा दाद देत आपण किती रसिक आहोत, हे चढाओढीनं सांगत असतात. काही काही गायकांचे साथीदारही तेच असतात. दोन गाण्यांच्या मध्ये सांगायचे त्यांचे किस्सेही ठरलेलेच असतात. निवेदकही शनिवारवाड्याएवढेच जुने असतात. पण ते लोकप्रिय असल्याने त्यांना फारच डिमांड असते. त्यांचेही निवेदनाचे साचे ठरलेले असतात. त्यांचेही ठराविक विनोदांचे घाणे पुन्हा पुन्हा काढणे सुरू असते. आपल्याला या साऱ्यांत काही रस नसतो. पण कुठं तरी, काही तरी छान नजरेला पडतं आणि तिकडं पाहत पाहत दिवाळी पहाट सार्थकी लागते.
अशा दिवाळीतल्या बहुतेक 'पहाटा' सारख्याच असतात. काही काळापूर्वी त्याची नवलाई होती. अजूनही खरोखर एखाद्याचं चांगलं गाणं असेल, तर छान वाटतं. बाकी सगळं एवढं टिपिकल आणि बोअर असतं, की त्याला 'क्लिशे' हा शब्द वापरणंही नकोसं वाटतं. अशी ही आमची दिवाळी पहाट... महानगरांतल्या चाकोरीमध्ये अडकलेली... मर्ढेकरांच्या 'सर्वे पि रुटीनः जन्तु' या ओळींची आठवण करून देणारी... पण कधी कधी पहाटेचा थंड वारा मनाला टवटवी आणतो आणि सगळा शिणवटा कुठल्या कुठं पळून जातो... रुटीन असलं, तरी त्यात आपल्या रोजच्या वागण्या-बोलण्यातून चांगला चेंज कसा आणता येईल, याचा विचार मन करू लागतं.... अशा वेळी मग फ्लॅटच्या दारातला आकाशकंदीलही खुशीनं जरा अधिकच लहरतोय असं वाटतं...

(पूर्वप्रसिद्धी - सृजन ई-दिवाळी अंक २०१२)
----

No comments:

Post a Comment